काल ट्रेनमधून उतरलो. सोबत मुलगा होता. जो नुकताच दुसरीत गेला आहे. त्याला ट्रेनमधून प्रवास करायला फार मजा येते. बाय रोड जायचे म्हटले की रडायलाच लागतो, ट्रेनचा हट्ट धरतो. पहिल्या विमान प्रवासात सुद्धा झोपून गेला, ट्रेन सारखी मजा आली नाही म्हणाला. कारण ट्रेनच्या खिडकीची त्याला वेगळीच क्रेझ आहे. ट्रेनमध्ये चढलो आणि खिडकीची जागा रिकामी दिसली नाही तर तो चिडतो, रडतो, माझ्या हाताला खेचून मला ट्रेनमधून उतरायला भाग पाडतो. कारण ट्रेनच्या गर्दीचा अनुभव अजून त्याने घेतला नाहीये. ट्रेनमध्ये साधे बसायला मिळणे सुद्धा कित्येकांसाठी त्या दिवसाचे सर्वात मोठे सुख असते याची त्याला कल्पना नाहीये. ट्रेनला लोकं लटकून प्रवास करतात हे त्याच्या गावीही नाहीये. कारण आम्ही नेहमी उलट्या दिशेने प्रवास करतो आणि गर्दीची वेळ नसताना घराबाहेर पडतो. ट्रेन ईतकी रिकामी असते की त्या मोकळ्या वातावरणाचा फायदा घेऊन मुलांना हॅंडलला धरून लटकायचे खेळ करता येतात. चप्पल काढा आणि मांडी घालून बसा, एकमेकांच्या अंगावर तंगड्या पसरून पत्ते कुटा किंवा एकत्र मोबाईल गेम्स खेळा, खा प्या गप्पा मारा, असे खाजगी वाहन असल्यासारखे प्रवास करता येतो.
पण दुसरी बाजू दाखवणे देखील गरजेचे म्हणून एकदा संध्याकाळच्या वेळी तिकीट काढून त्याला स्टेशनवर केवळ फिरायला म्हणून नेले. लोकं कसे जीवावर ऊदार होत लोकल ट्रेनचा प्रवास करतात हे दाखवायला म्हणून नेले. तर ती दारावर लटकलेली माणसे बघून त्याने भोकाडच पसरले. पण तेव्हापासून त्याला सांगता येते की खिडकी नाही मिळाली तरी बसायला मिळणे हा देखील चांगल्या नशीबाचा भाग आहे.
असो, तर मी काय सांगत होतो. काल ट्रेनमधून उतरलो, सोबत मुलगा होता. ट्रेन थांबायच्या किंचित आधी उडी मारायची त्याला सवय आहे. पण ती उडी नेहमी ट्रेनच्या दिशेने मारावी म्हणजे आपण धडपडत नाही हे भौतिकशास्त्र त्याला सांगूनही समजत नाही. तो स्विमिंगपूलमध्ये ऊडी मारावी तशी उडी मारून मोकळा होतो. त्यामुळे ट्रेन पुरेशी थांबत नाही तोपर्यंत त्याचा हात घट्ट धरून ठेवायची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. तर कालही तो असाच ऊडी मारून उतरला आणि डावीकडे जायचे की उजवीकडे याचा विचार न करता विरुद्ध दिशेने चालू पडला. ईतके वेळा प्रवास करून सुद्धा त्याला हे लक्षात राहिले नाही किंवा तसेच लक्षात ठेवायची गरज भासली नाही. कारण त्याला सुखरूप पोहोचवणारा बाप सोबत होता.
काल मनात विचार आला, मुलगी मोठी आहे पण तिला देखील एकटीला हा प्रवास करायला सांगितले तर जमेल की नाही याची आपल्याला खात्री नाही. कारण तशी वेळ कधी तिच्यावर आली नाही किंवा आपण येऊ दिली नाही. कारण जमाना खराब आहे असाच विचार एक पालक म्हणून आपण करतो. त्यांना बिनधास्त डोळे मिटून पाण्यात टाकायला घाबरतो. अन्यथा ही जनरेशन आपल्यापेक्षा स्मार्ट आहे.
ट्रेनचा प्रवास हा मुलांच्या आयुष्यात केवळ एक मनोरंजनाचा भाग म्हणून येतो त्यामुळे याबाबतचे त्यांचे ज्ञान तितकेच सिमीत आहे. प्लॅटफॉर्म बदलणे, ट्रेन बदलणे, ईंडीकेटरवर ट्रेन कधीची आहे हे चेक करणे, तिथे लिहिलेले शॉर्टफॉर्म वाचून आणि त्यातून आपली ट्रेन कुठली हे ओळखणे, स्टेशनची नावे पाठ करणे ईतकेच त्यांना सवयीने जमू लागले आहे. चुकामूक झाली तर काय करावे याच्या सूचना दिल्या आहेत, पण त्या वापरायची वेळ कधी येऊ नये अशीच प्रार्थना नेहमी करतो. याउलट ट्रेनमधील फेरीवाल्यांच्या मुलांना मात्र माश्याला पोहायला शिकवावे लागत नाही तसे ट्रेनचा प्रवास शिकवावा लागत नाही. दैनंदिन आयुष्याचा भाग म्हणून त्यांना तो जमतोच.
अशीच वेळ नव्वदीच्या दशकात माझ्यावर आली होती. राहायला मी माझगाव, मुंबई ईथे. चाळीतील लहान वयाची सारी मुले जवळपासच्या शाळांमध्ये. पण माझ्या वडिलांच्या डोक्यात मुलाला एखाद्या मोठ्या नावाजलेल्या शाळेत घालायचे खूळ. अन्यथा बालवाडीच्या मुलाला तेव्हा कोण तासभर स्कूलबसचा प्रवास करून दूरच्या शाळेत पाठवायचे. पण माझे नर्सरी, छोटा शिशू, मोठा शिशू, सारे काही दादरच्या आय.ई.एस. (ईंडियन एज्युकेशन सोसायटीच्या) शाळेत झाले. या ईयत्तेत ईतक्या लांबचा प्रवास करणारे दुसरे कोणी नसल्याने माझ्या वयाच्या मुलांची वेगळी स्कूलबस सुद्धा आमच्या रूटला नव्हती. पण त्याने भीड चेपली. आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलांसोबत प्रवास केल्याने ते काही आपल्याला खात नाहीत हे फार लवकर समजले.
ईयत्ता तिसरी पर्यंत हे स्कूलबस प्रकरण व्यवस्थित चालू होते. माझे बघून ईतर मोठ्या मुलांच्या पालकांनी देखील आमच्या शाळेचा आणि स्कूलबसचा पर्याय निवडला होता. चाळीतील छोट्यामोठ्यांचा भलामोठा ग्रूप तयार झाल्याने स्कूलबस प्रवासाची धमाल सुरू झाली होती. तिथल्या गमतीजमती पुन्हा कधीतरी वेगळ्या लेखात घेतो.
तिसरी नंतर मात्र ईयत्ता चौथी प्राथमिक स्कॉलरशिपचे वर्ष आले. जी तेव्हा मानाची परीक्षा समजली जायची. ज्याचे शाळेत एक्स्ट्रा क्लासेस घेतले जायचे. जे तिसरीची वार्षिक परीक्षा संपल्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीतच सुरू होणार होते. ज्यासाठी स्कूल बस हा पर्याय नव्हता. झाली का पंचाईत. आता रोजच्या रोज मला शाळेत सोडायला कोण येणार होते? कारण आई वडील दोन्ही जॉबला. बरे हा प्रश्न फक्त मे महिन्याच्या सुट्टीचा नव्हता. तर त्यानंतर देखील शाळा भरायच्याआधी आणि शाळा सुटल्यानंतर स्कॉलरशिपचे क्लास सुरू राहणार होते. त्यामुळे हे काही जमणार नाही म्हणत स्कॉलरशिपची परीक्षा न देणे हाच पर्याय शिल्लक राहिला होता.
पण पुन्हा एकदा वडिलांच्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालू होते. परीक्षेला माझे नाव नोंदवले. क्लासचे पहिले दोन दिवस माझ्या सोबत आले. ४६ नंबरची भाऊची धक्क्यावरून सुटणारी बस आमच्या दारातून जायची. जिचा दादर टी.टी ला बसस्टॉप होता. तिथून पुढे तूफान ट्राफिक आणि सिग्नलचे नियम पाळून, तर काही बिनासिग्नलचे रस्ते ओलांडून हिंदू कॉलनीतील शाळेत चालत जायचे होते. मला त्यांनी ते दाखवले, शिकवले, आणि विचारले एकटे जायला जमेल?
आठ वर्षे नऊ महिने वय होते माझे तेव्हा.. झाडून सार्याच नातेवाईकांनी ओरडा सुरू केला. पण वडिलांनी मात्र आपला निर्णय बदलला नाही. आई आज सांगते की रोज संध्याकाळी मी घरी पोहोचेपर्यंत तिचा जीव मुठीत असायचा. पण तेव्हा तिनेही याला पाठिंबा दिला होता. तेव्हा जमाना तसा खराब नव्हता. पण मुलगा एकुलता एक होता.
मी स्वतः मात्र सातव्या आसमानात होतो. शाळेत ईतक्या लांबून एकटा येणारा मी एकटाच होतो, त्यामुळे थोडे कौतुक वाट्याला यायचे. बाईच नाही तर शाळेतल्या ईतर मित्रांचे पालक सुद्धा हे समजल्यावर कौतुक करायचे. चाळीत आधीच हुशार मुलगा म्हणून ओळखला जायचो ते यामुळे निव्वळ अभ्यासात हुशार नाही तर व्यवहारात सुद्धा हुशार असा लौकिक पसरला. नातेवाईक भले आधी विरोध करत होते, पण भेटणे व्हायचे तेव्हा माझीच कॉलर टाईट व्हायची. कौतुकाने ते आणखी शेजारच्यापाजारच्या चार लोकांना सुद्धा हे सांगायचे. मध्यमवर्गीय लोकांना अप्रूप सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींचेच फार असते.
महिनाभर बसचा प्रवास केल्यावर मला दोन शोध लागले.
एक म्हणजे आपली नेहमीची ४६ नंबरची बस फार फिरून जाते आणि तिची फ्रिक्वेन्सी फार कमी आहे. एक चुकली की अर्धापाऊण तास थांबावे लागते. त्याऐवजी आपल्या ईथून भायखळ्याला तीन बस जातात, ज्यातली एखादी दर पाच दहा मिनिटात येते. आणि तिथून पुढे दादरला जाणार्या बसेस चिक्कार आहेत. पहिल्या बसमधून उतरायचा अवकाश की पुढची बस आपली वाट बघत उभीच असते. आणि ती कुठेही गल्लीबोळात न वळता थेट दादर गाठते.
दुसरा शोध म्हणजे अक्षरशा युरेका युरेका होता. भायखळ्यावरून जी ट्रेन सुटते ती केवळ दहा मिनिटात दादर गाठते. फास्ट लोकल असेल तर तिला सहा मिनिटे पुरतात. दादर टीटी बसस्टॉपपासून आपली शाळा जेवढ्या अंतरावर आहे तेवढीच ती दादर रेल्वे स्टेशनपासून आहे. त्यामुळे वेळ तर कमी लागतोच पण महिन्याभराचा पास काढला तर बसपेक्षा पैसे देखील कमी लागतील. त्यामुळे घरचे सुद्धा आपल्याला आनंदाने परवानगी देतील जी मला कुठल्याही परिस्थितीत हवीच होती. आणि याचे कारण म्हणजे - ट्रेन..! आणि ट्रेनवरचे माझे प्रेम
भायखळ्याला माझे आजोळ होते. बैठ्या घरांची वाडी होती. त्यांच्या घराला बंगला म्हणायचे. जिथे आणखी चार बिर्हाडे राहायची. त्या बंगल्याच्या मागच्या कंपाऊंड वॉलवर बसले की या अश्या नजरेसमोर ट्रेन दिसायच्या. तिथे कारशेड / रेल्वे वर्कशॉप असेच काहीसे असल्याने दूरदूरपर्यंत वेडेवाकडे पसरलेले, एकमेकात मिसळलेले रेल्वे ट्रॅक आणि बॅकग्राऊंडला मुंबईत दुर्मिळ अशी हिरवीगार झाडी असे एक छानसे द्रुश्य तयार व्हायचे. तिथे थांबलेले एखादे ईंजिन, एखादी मालगाडी अचानक शांततेचा भंग करत सुरू व्हायची आणि हळूहळू झाडींमागे लुप्त व्हायची. तर लोकलचे चार रेल्वे ट्रॅक मिळून दर दुसर्या मिनिटाला एखादी तरी ट्रेन धडधडत समोरून जायची. तो ट्रेनचा वेग आणि त्या वेगाचा खडखडाट मला फार आवडायचा. जेव्हा समोरासमोरून विरुद्ध दिशेने दोन ट्रेन एकत्र यायच्या तेव्हा तो आवाज डबल व्हायचा, म्हणून तसे घडण्याची वाट बघत, त्या ट्रेन बघत मी तासनतास तिथेच बसून राहायचो. रस्त्यावरून धावणार्या कुठल्याही वाहनाला त्याची सर नव्हती.
मुंबईकरांना समुद्राचे फार कौतुक असते, आणि ट्रेनच्या गर्दीबद्दल त्यांना चिडवले जाते. पण लहानपणी असे कट्ट्यावर बसून लोकल ट्रेन बघणे हे एक वेगळेच आणि अनुभवल्याशिवाय न समजणारे सुख आहे. तर अश्या या लोकल ट्रेनने मी एकटा प्रवास करणार होतो जे माझ्या वयाच्या ईतर कुठल्या मित्रांच्या नशिबी नव्हते या विचारानेच मला हुरूप चढला होता.
पण घरच्यांना मात्र हे रुचले नाही. कारण ट्रेनच्या अजस्त्र धूडाची भिती त्यांना बसपेक्षा जास्त होती. ती का होती हे आज मला समजते जेव्हा मला स्वत:ला मुले झाली आहेत आणि "कृपया गाडीचे पायदान आणि फलाट यांच्यातील अंतरावर लक्ष द्या" अश्या बेसिक गोष्टींबाबत लोकांना वारंवार का जागरूक करावे लागते हे कळू लागले आहे. पण तेव्हा मात्र मला माझ्या आवडीचा ट्रेन प्रवास का करू दिला जात नाहीये हे अनाकलनीय होते. त्यामुळे बरेच झगडून, भांडून, रडून, हट्ट करून, मी हे सुरक्षितपणे करू शकतो असा विश्वास घरच्यांना देऊन अखेर मी परवानगी मिळवली.
यातले सारे काही तर आठवत नाहीये, पण आईने घाबरून हे माहेरच्यांपासून लपवून ठेवले होते. राहायला ते भायखळ्यालाच, त्यामुळे एकदा त्यांनी मला स्टेशनवर पाहिले तेव्हा भांडे फुटले होते. आईला त्यांनी झाप झाप झापले होते. कारण काल परवापर्यंत त्यांच्या अंगणात बसून ट्रेन आल्यावर टाळ्या पिटणारा मुलगा ट्रेनने एकटा कसा जाऊ शकतो हेच त्यांच्या पचनी पडत नव्हते.
माझा ट्रेनचा प्रवास मात्र छान चालू होता. अजून काही नवीन शोध लागत होते.
जसे की शाळेतल्या मुलांना सेकंड क्लासचा पास काढून सुद्धा फर्स्ट क्लासने प्रवास करायला परवानगी होती. (हल्ली असे असते का याची कल्पना नाही).
दुसरे म्हणजे आपण व्हीटीच्या (आताच्या सीएसटीच्या) विरुद्ध दिशेने ते देखील फर्स्ट क्लासने प्रवास करणारे असल्याने आपल्याला पुर्ण रिकामी ट्रेन मिळते. पण तरी खरी मजा दारावर उभे राहण्यातच येते. त्यातही फास्ट लोकल कुठे न थांबता वेगात जात असल्याने तिच्या दारावर उभे राहायला जास्त मजा येते. त्यामुळे शक्य असल्यास फास्ट लोकलनेच जायचे आणि जोपर्यंत कोणी मोठी व्यक्ती हटकत नाही तोपर्यत दारातच उभे राहायचे. फास्ट लोकल जिथे थांबते अश्या महत्वाच्या स्टेशनपैकी एक आपले आहे याचेही तेव्हा एक वेगळेच कौतुक होते
तेव्हापर्यंतच्या आयुष्यात खादाडीसाठी केवळ शाळेचेच कँटीन काय ते होते. तिथला वडा किंवा शाळेबाहेरचा वडापाव हे माझ्यासाठी राष्ट्रीय अन्न होते. नाही म्हणायला चिंच बोरे, आणि गोळेवाला होतेच. पण त्यापलीकडे कुठे हॉटेलात एकट्याने खायला जावे ईतके ना वय होते ना खिश्यात पैसे होते. पण आता रेल्वे कँटीन सुद्धा आपलेच झाले होते. तिथला पंजाबी समोसा फेवरेट झाला होता. एका प्लेटमध्ये समोसा, त्यावर गरमागरम ऊसळ आणि सोबत पाव हे आवडीचे कॉम्बिनेशन होते. जे बजेटमध्ये सुद्धा यायचे, कारण भायख़ळा स्टेशन ते घरापर्यंत नेहमीची बस न पकडता अकरा नंबरची बस पकडली (चालत गेले) की पैसे वाचतात हा सुद्धा एक शोध लागला होता
आयुष्यातील पहिली नीरा मी त्याच वयात भायखळा स्टेशनवरील सरकारी नीरा केंद्रात प्यायलो. ही आठवण विशेष आहे कारण नीरा आजही फार आवडते हे कारण आहेच, पण तेव्हा मला त्या पेयाबद्दल फार उत्सुकता होती. मोठ्या लोकांना घटाघट ग्लास रिकामा करताना बघायचो, पण हे काहीतरी ताडीमाडी टाईप्स अंमली पेय आहे आणि कोणी आपल्या वयाच्या मुलांना ते पाजत नाहीये या विचाराने हिंमत होत नव्हती. एकदा धीर एकवटून प्यायलो आणि चटकच लागली. घरच्यांपासून मात्र हे लपवले होते. पण एकदा वडिलांसोबत भायखळा स्टेशनहून ट्रेनने कुठेतरी जात होतो. तेव्हा त्यांनीच मला "चल तुला आज नीरा काय चीज असते हे दाखवतो" या आवेशात त्याच स्टॉलवर नीरा पाजली आणि माझा भ्रमाचा ताडगोळा फुटला
साधारण आठवीत असताना मात्र एक अप्रिय आणि दुर्दैवी घटना घडली..
एव्हाना आमचा ट्रेनने प्रवास करणार्यांचा चार पाच जणांचा ग्रूप झाला होता. दोघे आम्ही एकाच चाळीतले होतो तर बाकीचे जवळपास राहणारे. स्टेशनवर सारे भेटायचो, सर्व जमेपर्यंत तर एक दोन ट्रेन सोडायचो. फार उशीर झाला तर निघायचो. एकत्र फार धमाल करत जायचो. दारावरच ऊभे राहायचो. पण जीवाला जपूनच आनंद लुटायचो. तारतम्य बाळगायचो. दांड्याला धरून दरवाज्याबाहेर झुकायचा मुर्खपणा किंवा स्टेशन आले की चालत्या गाडीत चढाऊतरायचे स्टंट कधी केले नव्हते. फक्त एकच गोष्ट आम्हाला बेभान करायची ती म्हणजे पाऊस..! तो कोसळताना ट्रेनच्या दारावर ऊभे राहणे हे वेगळेच सुख होते. गार झोंबणारा वारा आणि त्या सोबत येणारे, चेहर्यावर सुयांसारखे तडतड टोचणारे पावसाचे टोकेरी थेंब.. चेहरा आणि मेंदू सुन्न पडायला तितके पुरेसे होते. "ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते" या मालिकेच्या पहिल्या भागात देखील त्याबद्दल लिहायचा मोह आवरला नव्हता.
तर त्या दिवशी स्टेशनला एक मित्र वेळेत आला नव्हता. शाळेला फार ऊशीर व्हायला नको म्हणून बाकीचे आम्ही निघालो. पण तेव्हा आम्हाला याची कल्पना नव्हती की तो आता पुन्हा कधीच आमच्यासोबत नसणार. दुपारी शाळेत त्याची थेट न्यूजच आली. ट्रेनच्या दारावर उभे राहिले असताना खांबाला डोके आपटून तो फटक्यात देवाघरी गेला होता. शाळेतून स्टाफचे काही जण त्याच्या अंत्यसंस्काराला जाणार होते आणि तो कुठे राहतो हे दाखवायला म्हणून मला सोबत नेले होते. त्या दिवशी फार अपराधी वाटत होते.
त्याने काय म्हणून डोके बाहेर काढले असेल याची कल्पना नाही. कदाचित स्टेशन येतेय का हे बघायला.. की आणखी काही.. नेमके काय झाले हे तो सोबतच घेऊन गेला. पण त्या घटनेनंतर देखील माझ्या ट्रेन प्रवासावर बंधने आली नाहीत हे विशेष.
हे खरेच थोडे विशेष आणि आश्चर्यजनक होते. कारण माझा जन्म झाला त्याच वर्षी आमच्याच सोबत राहणारे माझे काका स्कूटर अॅक्सिडंटमध्ये गेले. ज्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला कधीच दुचाकी चालवायला प्रोत्साहन दिले नाही, आणि त्यामुळे ती मला आजही चालवता येत नाही. बाईक, स्कूटर तर दूरची गोष्ट, पण साधी सायकल चालवता येत नाही. लहानपणी मी क्रिकेट खेळायला कुठेही गेलो तरी कधी मला अडवले नाही, पण कधी पतंग उडवायला ईतर मित्रांसोबत गच्चीवर पाठवले नाही, कारण ती थोडीशी धोकादायक होती. माझ्यावर विश्वास ठेवून मला मित्रांसोबत हवे तिथे जाऊ दिले, पण कधी खाजगी वाहन करून रात्रीचा प्रवास करू दिला नाही. ही अशी तेव्हा फारशी जाचक न वाटणारी,पण माझ्या जीवाला जपणारी काही बंधने जवळपास दहावीपर्यंत माझ्यावर होती. पण त्याचवेळी जेमतेम तिसरी पास झालेल्या मुलाला त्यांनी माझगाव ते दादर बस-ट्रेनचा प्रवास एकटे करायला पिटाळले होते
तसे म्हटले तर ईतक्या वर्षात कधी असे वाटले नव्हते की आपण आपल्या ईतर मित्रांच्या, भावंडांच्या तुलनेत लहान वयात एकट्याने बस-ट्रेनचा प्रवास करून फार काही मोठा तीर मारला आहे. पण आज मात्र माझ्या तेव्हाच्या वयापेक्षा दोनेक वर्ष जास्त आणि माझ्यापेक्षा काही पटींनी स्मार्ट असलेल्या लेकीला जेव्हा जवळपासच्या ठिकाणी एकटे जायला परवानगी देतो, तेव्हा तिच्या चेहर्यावर जो आनंद बघतो, आणि नंतर ती घरी सुखरूप परत येईपर्यंत जी धाकधूक स्वतः अनुभवतो, ते पाहता आता मागे वळून पाहताना आईवडीलांचेच जास्त कौतुक वाटते!
जाता जाता, ता.क. - या सगळ्यात एक चांगले झाले. ज्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी हे केले होते त्यात मी मुंबईत चौथा वगैरे आल्याने पेपरात फोटो वगैरे आला होता, जो नातेवाईकांना दाखवून बघा याचसाठी केला होता अट्टाहास असे आईवडिलांना म्हणता आले
- ऋन्मेऽऽष
शर्मिला ओके, हा काळ माझ्या
टिबल पोस्ट
हा व्हिडिओ बघितला आणि हा धागा
हा व्हिडिओ बघितला आणि हा धागा आठवला..
Even Dogs know how to get off the Mumbai Local Train
https://www.facebook.com/share/r/194tVrHwHX/
खूप छान लिहिलय
खूप छान लिहिलय
Pages