आपण करत असलेले निरागस गॅसलाइटींग

Submitted by तुष्कीनागपुरी on 4 April, 2025 - 04:10

आपल्या मनात बरेच वेळा गॅसलाईटींग करणाऱ्या लोकांची एक साचेबद्ध प्रतिमा असते. अमूक अमूक खलनायकाच्या भूमिकेत असलेली व्यक्ती गॅसलाईटींग करते अशी काही उदाहरणे देखील मनात असतात. आपणही तसे करत असू याची आपल्याला कधी कल्पना येत नाही किंबहुना आपण तसे कधी करूच शकत नाही याची खात्री पण काही लोकांना वाटू शकते.
.
गॅसलाईटींग म्हणजे थोडक्यात समोरच्या व्यक्तीला वाटलेल्या भावना नाकारणे किंवा ती व्यक्ती जे म्हणतेय ते झालेलेच नाहीये असे समजून ते ठासून मांडणे कबूल करून घेणे.
.
काही साधारण संवाद पाहुया:
.
मित्रांमधला एक संवाद:
मित्र १: माझा मुद्दा मला निट मांडता आला नाही असे वाटले त्यामुळे काही मुद्दे निट बोलता आले नाहीत
मित्र २: तू छान बोललास रे. छान मांडलेस तू, आम्हाला सगळे कळले.
.
आई मुलीचा एक संवाद:
मुलगी: हे चार दिवस फार जड जातात मला
आई: अग फक्त पुढचे २५ वर्ष सहन करायचे आहे तुला, यात काहीच नाही सगळेच करतात, हे मान्य करून जगणे आवश्यक आहे
.
बाबा मुलाचा एक संवाद:
मुलगा घाबरल्यामुळे रडतोय.
बाबा: आधी रडणे बंद कर. तिथे काहीच नाहीये. रडणे एकदम बंद, घाबरायचे काही कारणच नाहिये.
.
सेवानिवृत्त आई आणि पन्नाशीतला मुलगा एक संवाद:
मुलगा: मला असे वाटले की अमुक वेळी माझ्या आईने माझे कौतुक केले नाही
आई: तुझ्यासाठी मी काय काय केले तुला माहित आहे, तुझ्याशिवाय माझे आयुष्यात दुसरे काहीच नाहिये. इतके करूनही तुला असे वाटत असेल तर मी हतबल आहे. तुला कळलेच नाही माझे सगळे काही तुझ्यासाठीच आहे. तुला असे वाटेल याची मला कल्पना पण नव्हती, हे माझ्यासाठी अनपेक्षित आहे, आणि खूपच दुःखदायी आहे.
.
या सर्व संवादांमधे संवाद सुरू करणारी व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती एकमेकांसाठी जवळचे आणि घनिष्ट आहेत हे गृहित आहे. दोघांमधे प्रेम आहे, एकमेकांचे भले करण्याची तीव्र इच्छा आहे. काही बाबतीत तर एक व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून आहे.
.
सध्या बहुचर्चित असलेल्या अडोलसन्स या नेटफ्लिक्स मालिकेचा तिसरा भाग पाहताना एका जागेवर त्या मालिकेतले मध्यवर्ती पात्र तेरा वर्षांचा मुलगा जेमी आणि समुपदेशक यांचा संवाद सुरू असताना, जेमी काही बोलतो आणि मग तिच्या कडून अपेक्षा करतो की आता तू मला “तसे नसतेच, त्याला अमुक अमुक पद्धतीनेच करायचे असते” असे काही सांगणे अपेक्षित आहे तसे कर म्हणून आग्रह करतो. त्याचे म्हणणे असते की सगळेच तसे करतात. जेव्हा तो कथित मुद्दे मांडतो तेव्हा त्याला सगळ्यांकडून सांगितले जाते तशिच ठराविक साचेबद्ध उत्तरे तिने पण त्याला द्यावीत अशी त्याची अपेक्षा असते. तेव्हा ती त्याला सांगते की मला फक्त तुला त्याबद्दल काय वाटले हे जाणून घ्यायचे आहे. ते मूळात काय आहे यापेक्षा तुला ते कसे जाणवले तुझ्या मनात त्याची काय प्रतिमा आहे हे जाणून घेणे माझे काम आहे. त्या एका क्षणाला त्या समुपदेशिकेने माझे मन जिंकले.
.
कदाचित जेव्हा आपल्याला संवाद साधताना समोरच्याने म्हटलेले बरोबर नाही असे वाटते आणि आपण जर लगेच ते त्यांना सांगितले तर त्यांचा फायदा होईल असे आपल्याला वाटत असते. आपण तसे करून त्यांची मदत करतोय अशीच आपली भावना असते आणि कधी कधी तर तेच आपले कर्तव्य आहे हे देखील आपल्याला वाटत असते आणि माहित असते. पण तसे करताना आपले एका सूक्ष्म मुद्यावर दुर्लक्ष होत असते.
.
पहिल्या संवादात जिथे मित्र मित्र बोलत आहेत तिथे पहिल्या मित्राला एक खंत आहे ती व्यक्त झाली आहे. त्यावर उत्तर मिळालेय की जी खंत आहे ती बरोबर नाही पहिल्या मित्राने खंत करायलाच नको. आपल्याला ही खूपच साधी आणि नेहमीची गोष्ट वाटेल पण एक समजून घेणे आवश्यक आहे की पहिल्या मित्राला अशी खंत वाटून घेण्याचा आणि स्वतःच्या भावना असण्याचा आणि त्या व्यक्त करण्याचा अधिकार असावा की नाही? तसा तो असावाच हे जरका पटत असेल. तर आपल्या मित्राला अशी खंत वाटते आहे हे समजून घेणे आणि त्याची पावती देणे सर्वप्रथम आवश्यक आहे हे समजून घेता येईल.
.
या संवादामध्ये आलेल्या उत्तराचा एक अर्थ असाही होतो की पहिल्या मित्राला खंत करायची गरजच नाही त्यामुळे त्याची खंत अनावश्यक आहे. थोडक्यात त्या मित्राच्या भावना नाकारल्या जाताहेत. इथे खरे काय आहे किंवा काय बरोवर आहे हे बघण्याच्या आधी त्या पहिल्या मित्राला हे वाटून गेलेले आहे, त्याच्या साठी ही वास्तविक घडलेली घटना आहे त्यामुळे तसे नाहीच हे सांगणे पटवणे म्हणजे त्या भावना नाकारणे ठरते हे आपल्याला समजत नाही.
.
त्या संवादामधे एक उत्तर असेही असू शकले असते की. अच्छा तुला अशी खंत वाटलेली दिसते, तुला असे वाटले का? अजून सांग तुला काय वाटले. तुला असे वाटण्यामधे अजून काही घटक तुला सांगावेसे वाटताहेत का जे मला माहित नसतील. मला अजून जाणून घ्यायला आवडेल.
.
असे उत्तर असले तर किमान मित्राला वाटलेली खंत आपण समजून घेतोय आणि ती नाकारत नाहीये असे दिसते.
.
पुढच्या आई मुलीच्या त्या चार दिवसांच्या बाबतित चाललेल्या संवादात, मुलीला जो त्रास होतोय ते तिने व्यक्त केलेय त्याची नोंद घेतलीय असे कदाचित आईला वाटत असेल. कदाचित हा संवाद प्रत्येक महिन्यात घडत असावा त्यामुळे ते ठराविक साचेबद्ध उत्तर दिलेले असेल. पण एक समजून घेणे आवश्यक आहे की हे प्राक्तन आहे ते सहन करायचेच आहे या शब्दात असे दिसते की मुलीने हा त्रास हा त्रागा आता बोलणे बंद करावे असे आईला वाटते आहे.
.
“हो का गं. तुला हा त्रास जड वाटतो आहे का पुन्हा. मग तू आज काय करणार आहेस? मला अजून सांग आज काही वेगळे झाले आहे का?” किंवा अश्या काही शब्दांमुळे किमान आई त्या त्रासाची नोंद घेतेय आणि त्याबाबत ऐकायला वेळ देते आहे असे मुलीला वाटेल. कदाचित मुलीला पण विज्ञान आणि प्राक्तन हे सगळे माहित आहे, फक्त आईजवळ व्यक्त व्हायचे आहे आणि उत्तरात तिला तिचा त्रास बरा करून किंवा सोडवून नकोच आहे तर तिचा त्रास समजून घेणारी एक व्यक्ती आहे इतके जाणून व्यक्त होण्याचा वेळ हवा आहे.
.
तिसऱ्या संवादात, मुलाने रडणे थांबवणे हे बाबाला सर्वात आधी व्हावे असे वाटतेय. मुलगा घाबरलाय ही घटना मान्यच नाहीये किंवा शक्य तितक्या लवकर ती स्थिती बदलायची आहे असे बाबाचे विचार दिसताहेत. उत्तरात एक रडणारा मुलगा असे चित्रच बाबाला नकोय असेही दिसते, त्यामुळे ते चित्र शक्य तितक्या लवकर बदलायचा प्रयत्न दिसतोय. कदाचित घाबरणे ही वाईट गोष्ट आहे, त्याची गरजच नाहीये हे बोलण्यातून व्यक्त होतेय.
.
या उत्तरात मुलगा घाबरला आहे याचा स्वीकार करायला बाबा तयारच नाही आणि ते तसे नाहीच व्हायलाच नको हे त्याला अधिक महत्वाचे वाटते असे दिसते आहे.
.
“तू घाबरलास का? तुला कशाची भीती वाटली सांग. भिती वाटल्यावर तुला काय करावेसे वाटले ते सांग.” काही उदाहरणे देऊन अशी भिती कुणाला आधी वाटायची आणि मग काही काळाने त्या भीतीचे काय झाले अशी एखादी गोष्ट सांगता आली असती. रडणे लगेच बंद करावे असे बाबाला का वाटते? यावर विचार होणे मला आवश्यक वाटतो.
.
शेवटच्या चौथ्या संवादात मुलाला वाटलेली एक भावना एका विशिष्ट वेळेची एक भावना आहे आणि तसे मुलाला वाटू शकते त्याचा स्वीकार उत्तरात दिसत नाही. कदाचित विषय खोल असेल त्याला अनेक पदर असतील आणि मुलाला वाटलेली भावना चूकीची असेल किंवा त्याला वेगळा संदर्भ असेल पण अश्या कोणत्याही कारणाने मुलाला असे वाटणे हाच त्या मुलाचा गुन्हा आहे असे उत्तरातले शब्द सुचवतात. असे बोलून त्या मुलाने आईला कठोर यातना दिलेल्या आहेत हे त्या उत्तरातून पुढे येते. या बाबतीत देखील मुलाला वाटलेली भावना नाकारण्यात येते आहे असे त्या मुलाला वाटतेय हे आपल्याला समजू शकते का याचा विचार करावा लागेल.
.
“कदाचित तुला असे वाटले का? असे वाटले की खूप त्रास होत असेल नाही का? हे तुला नेहमीच वाटते की त्या एका ठिकाणी वाटले, आणि तसे का झाले असावे असे तुला वाटते?” असे काही उत्तरातून संवाद पुढे गेला असता तर कदाचित अजून काही वेगळेच यातून बाहेर आले असते त्याला या वरच्या उत्तराने वाव दिलेला नाही.
.
आपण जेव्हा आपल्या जवळच्या लोकांशी बोलतो तेव्हा त्या लोकांच्या भावना ते सांगतात त्या त्यांच्या आयुष्यात घडलेल्या वास्तविक घटना असतात हे समजून घेऊन, त्यांना आधी स्वीकार करता यायला हवे. त्याची नोंद घेतल्या गेलीय इतके जरी आपण संवादातून कळवू शकलो तर कदाचित संवाद एकतर्फी ठरणार नाहीत.
.
कुणी जर आपल्याला सांगत असेल की मला खरचटले आणि दुखतेय त्याला आपण जर उत्तर दिले की “पाहू अरे हे काहीच नाही खूपच थोडे खरचटले आहे यात काही फार दुखायलाच नको, जाऊदे विसरून जा काही दुखत वगैरे नाहीये” असे सांगितले तर ते त्या खरचटण्याच्या दुःखात आणि एका दुःखाची आपण भर घालतो, भावना नाकारल्या जाण्याचे दुःख हे समजून घ्यायला हवे.
.
समोरचा व्यक्ती काय सांगतोय ते समजून घेणे हे एक महत्वाचे कौशल्य आहे आणि ते लक्षपूर्वक साध्य करावे लागते. ते सोपे नसते. आपण निरागसपणे कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या भावनाच नाकारत असतो हे समजून त्यावर विचार केला तर आपल्याला आपल्या संवादांमधे बदल घडवून आणता येईल.
.
तुम्हाला कधी असे वाटले आहे का की तुम्ही सांगितलेले पोहोचलेच नाही आणि तसे नाहीच हे तुम्हाला समजावण्यात आलेले आहे. असे अगदी जवळच्या व्यक्तीकडून अधिक होते का?
.
या चार संवादांमधून आपल्याला आपल्या काही जुन्या संवादांची आठवण येऊ शकते आणि त्यावर आपण विचार सुरू केला तर आपल्या जगण्यात भावनिक बदल होऊ शकेल याची मला खात्री आहे.
.
(ऐकून बघणारा)
तुषार जोशी
नागपूर, शुक्रवार,४ एप्रिल २०२५

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलेय. असाही विचार करता येऊ शकतो.

मध्यंतरीच्या काळात असे सांगितले जात होते की अमुक एकाची भिती वाटत असेल तर त्या भितीवर मात करायला शिकवा. मुलाला बागेत घसरगुंडीवर चढायची भिती वाटत असेल तर त्याला चढायला मदत करुन भिती घालवा नाहीतर तो कधीही चढणार नाही. यात त्याला भिती वाटते हे स्विकारले जात नाही.

विचार करण्यासारखा लेख.
गॅसलाईटींग हा शब्द हल्ली हल्ली जरी जास्त वाचनात आला असला, तरी हा प्रकार खरंतर लहानपणापासूनच सुरु होतो, अगदी मुल पडलं तर त्याला म्हणायचं काही नाही झालंय किंवा बाईंनी आज मला उगाच शिक्षा म्हणून मारलं, मी काहीच केलं नाही तरी, तेव्हा नाही तूच काहीतरी केलं असणार म्हणून अविश्वास दाखवायचा .यात खरंतर आईवडिलांचा दोष तितका नसतोही ,पण मुलाची बाजू पाहता त्याला जर तो खरं बोलत असेल तर अविश्वास दाखवल्या सारखे वाटून, त्याला दुःखी वाईट वाटू शकते, पुढे जाऊन आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही ,या कल्पनेने गोष्टी लपविण्याकडेही कल जाऊ शकतो. बाहेरच्या लोकांपेक्षा जवळच्या लोकांनी केलेलं गॅसलाईटींग जास्त दुःखदायक असतं आणि जवळचेच लोक जास्त गॅसलाईटींग करतात हेही खरंय.

अडोलसन्स जेमी आणि समुपदेशक तुम्ही उल्लेख केलेला सीन मलाही आवडला . खरंतर तिला त्याच्याशी बोलताना स्ट्रेस आलेला असतो तरीही त्याच्याशी बोलताना चेहर्यावर न दाखवून देता जे शांततेत पण ठामपणे उत्तर देते ,न मॅनिपुलेट होता, हा सीन हायलाईट आहे वेबसेरीज चा.

छान लिहिलयं!
आपला हेतू जरी चांगला असला तरीही कळत न कळत आपल्याकडून गॅस लायटिंग होवू शकते या गोष्टीचा विचारच केला नव्हता.

मला माझ्या बाबतीतली अशी चांगली आणि वाईट दोन्ही उदाहरणं आठवली. अर्थात मी हे दुसऱ्याच्या बाबतीत कळत/ न कळत असंख्य वेळा केलं असणार, ही खात्री आहे.
एक गमतीदार उदाहरण सांगते.
मला लोकरीचं विणकाम, भरतकाम, ओरीगामी असं करायला फार आवडतं. स्वतःची स्तुती करू नये. पण तरी सांगते की ह्या कामात माझं फिनिशिंग चांगलं असतं. शिवणकामात मात्र अगदी ढ आहे. छान, सुबक शिवता येत नाही. ते यावं, असं तिव्रतेने वाटतही नाही. ते दुसऱ्याकडून करून घेते.

असं बोलता बोलता सांगितलं, की समोरचा माणूस समजूत घालायला लागतो. 'अगं, मनावर घेतलंस तर येईल तुला. सराव हवा मात्र'. बरोबर आहे. पण मला नाही शिकायचं ते!!

आपला हेतू जरी चांगला असला तरीही कळत न कळत आपल्याकडून गॅस लायटिंग होवू शकते या गोष्टीचा विचारच केला नव्हता>>>>

येस.. यापुढे कुणाशी असे काही बोलताना हा लेख आठवेल
आणि मी गॅस लायटिंग करत नाहीय ना हे चेक केले जाईल Happy

@साधना, @सिमरन, @स्वाती, @अनया
विचारप्रक्रियेत सहभागी झालात आणि लिहून अभिप्राय कळवलात त्याबद्दल अनेक आभार.

मायबोलीवरच खुप चालतं की गॅस लाईटींग.
एखादी गोष्ट कोणी सांगितली की डावलून लावायची आणि म्हणायचे, छे तसे नसेलच, ते १० वर्षापुर्वी असेल.....
किंवा तुम्हाला कसं सगळ्या विषयातलं माहिती?
आणि बरेच आहेत असे नमुनेदार प्रतिसाद काहिंचे. :डोळा:

छान धागा आणि विषय

मुलांना एखाद्या गोष्टींबाबत भीती वाटणे, कंटाळा येणे, इरिटेट होणे, त्याच्या स्वतःच्या अमुकतमुक आवडीनिवडी आणि स्वभावानुसार काही सवयी असणे अश्या बरेच गोष्टी आपण त्यांना शिस्त आणि संस्कार लावायच्या प्रक्रियेत नाकारतो.
हे लक्षात घेऊन मुलांबाबत असे होऊ नये याची काळजी नेहमीच घेतली जाते.

पण हेच मोठ्याबाबत मात्र नेहमीच तसा विचार करून त्यांना समजून घेतले जात नाही.
किंबहुना प्रामाणिकपणे सांगायचे तर प्रत्येकवेळी असे ध्यानात ठेवून वागणे शक्य देखील नसते. पण कुठेतरी हे डोक्यात असलेले केव्हाही चांगले. काही चुका सुधारता तेव्हाच येतात जेव्हा त्या आपल्याला आधी उमगल्या आणि कबूल झाल्या असतात.

नुकतेच मी सीमा पाहवा यांची एव्हरीथिंग ईज फाईन ही शॉर्ट फिल्म पाहिली. त्यात आई मुलीला सांगत असते की मला आता खरंच राहवत नाही तुझ्या बाबा सोबत. तर त्यावर मुलगी काय झालं काय झालं म्हणून थेट "दु:ख कोणाच्या आयुष्यात नसतात? तू फक्त थकली आहेस. झोप" असं फिलॉसॉफिकल बोलू पाहते. आता कळालं हा ही गॅस लाईट चा प्रकार. ह्या संवादा नंतर जो काय सीमा ने अभिनय केलाय, तोड च नाहीये त्याला. छान आहे फिल्म युट्युब वर.

खूपच जिव्हाळ्याचा विषय !!

Invalidating other's emotions is number one indicator of a toxic relationship !!

माझ्याकडून असे कोणाच्याही बाबतीत होणार नाही याची मी यापुढे अगदी नीट काळजी घेईन.

मला असं वाटत की समोरच्या माणसाला प्रोत्साहन देण्यासाठी, धीर देण्यासाठी, सकारात्मकता दाखवण्यासाठी असं बोलणं कधी कधी गरजेचं असत.
वरच्या चार केस मधली फक्त तेवढीच वाक्य लक्षात न घेता त्यांची पार्श्वभूमी ही विचारात घ्यायला हवी. उदा. एक नंबर संवाद मध्ये तो मुलगा अगदी खूपच घाबरलेला आहे , कधीच वादात सामील होत नाही, चार लोकांपुढे आपलं म्हणणं मांडायचं त्याला धैर्य नाही, पण ह्या वेळेस तो निदान बोलला तरी जरी मुद्दा नीट मांडला नाही तरी म्हणून त्याला प्रोत्साहन म्हणून आम्हाला कळलं तुला काय म्हणायचं आहे ते असं त्याला सांगितलं तर त्यात काय एवढा गॅस लायटनिंग झालं ?
किंवा चार नंबर मध्ये सगळ्या तपासण्या झाल्या आहेत, काही ही प्रॉब्लेम नाहीये, dr. मानसिक आहे नवीनच असल्यामुळे अस म्हणतायत तर मुलीला धीर देण्यासाठी आई जे बोलली ते योग्यच आहे असं मला वाटतय.

मला असं वाटत की समोरच्या माणसाला प्रोत्साहन देण्यासाठी, धीर देण्यासाठी, सकारात्मकता दाखवण्यासाठी असं बोलणं कधी कधी गरजेचं असत. >>>>> मान्य! पण हे तो त्यावेळेला ऐकण्याच्या मनस्थितच नसतो. त्या माणसाला जे वाटत असतं ते तो बोलून दाखवत असतो ते फक्त कोणीतरी ऐकावे एवढ्यासाठी
लेख आवडला. माझ्याबाबतीत खूप वेळेला झालंय… झक मारली अन् ह्या व्यक्तीशी बोललो! पियूने कोट केलंय तसं बरीच नाती कमी झाली. मी मात्र काळजी घेते.

> वरच्या चार केस मधली फक्त तेवढीच वाक्य लक्षात न घेता त्यांची पार्श्वभूमी ही विचारात घ्यायला हवी.

लेखातले संवाद एक मुद्दा समोर आणण्यासाठी आहेत. तसे तर्क करायला गेलो तर प्रत्येक विधानात वेगळे काहीतरी शोधून काढून ते विधान कोण कोणत्या बाबतित खोटे ठरते किंवा अचूक नाही हे दाखवता येऊ शकते कदाचित.

वाचकांना विनंती अशी आहे की या उदाहरणांच्या अनुषंगाने जर लेखाचा मुद्दा समजून घेता आला तर त्यासाठी मदत व्हावी म्हणून ही काही उदाहरणे मांडलेली आहेत.

गॅसलाईटींग, हे मुळात कुणाच्या केवळ भावना नाकारण्यापेक्षा  एखाद्या रिलेशनशिपमध्ये समोरच्याला भावनिकरीत्या मॅनिप्युलेट करण्यावर  व इम्बॅलन्स ऑफ पॉवर निर्माण (स्वतःच्या फायद्यासाठी) करण्यावर भर देणारी जाणूनबुजून केलेली कृती असते. माझ्या मते सोशल मीडियावर आता नव्याने फोफावलेल्या पॉप-सायकॉलॉजीच्या विचार प्रवर्तकांच्या कृपेने गॅसलाईटींग या संज्ञेचं खोलात न जाता सरसकट सगळीकडे लेबलिंग सुरु झालं आहे... गॅसलाईटींग  ही संज्ञा अँप्लिकेबल होण्यासाठी,  pattern of behaviour देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आवश्यक असतो, एखाद दुसरा आयसोलेटेड प्रसंग निश्चितच त्या प्रवर्गात मोडत नाही. 
DJC7eNFW0AA-VQs.jpg

@फार्स
गिल्टी एज़ चार्ज्ड सर
मी तो शब्द क्रियापदासारखा वापरला आहे. त्यासाठी वेगळे क्रियापद शोधले आणि वापरले असते तर सध्या वाचताहेत तितके देखील वाचक नसते या लेखाला

या शब्दाची वा क्रियापदाची व्युत्पत्ती काय आहे?>>> कुठे तरी वाचलेलं की हा नोवेल मधे आलेला शब्द १९५० च्या सुमारास...त्यामधे एक एक पुरुष पात्र आपल्या बायकोला की प्रेयसीला सिस्टमॅटीकली गॅसलाइटींग करुन तीच्या वागण्यावर आणि रिॲक्शन्सवर पुर्ण कंट्रोल मिळवते, असं काहीतरी...जसं पेट्रोमॅक्स चे दिवे कमीजास्त प्रकाशमान करु शकतो तसं काहीसं... नंतर हा शब्द सायकॉलॉजी स्टडी मधे आला.... मी २०१८ नंतर जास्त वापरात आलेला पाहीला.

Submitted by तुष्कीनागपुरी on 7 April, 2025 - 20:01>>>> हरकत नाही सर, तुमचे लेखन वाचताना ही भावार्थ निसटून जायची ही आठवणीतली दुसरी वेळ आहे......पुढील वेळेपासून तुमचे नाव दिसल्यावर काय अभिप्रेत आहे हे काळजीपूर्वक समजून प्रतिसाद देण्याचा प्रयत्न राहील. Happy

फार्स यांचा पहिला प्रतिसादही का गॅसलायटिंगसारखा वाटतोय मला Lol म्हणजे लोकं बोलतायत ते गॅसलायटिंग नाहीये त्याचं प्रसंगांना सरसकट लेबल दिलं जातंय. त्यांच्या मते
पण तुम्ही म्हणताय तेही बरोबरच आहे एका अर्थी ,कारण प्रत्येक प्रसंगाला त्या नजरेने पाहणं म्हणजे सतत संशयाने पाहण्यासारखे होईल.

व्याख्या नवीन असली तरी वागणे जुनेच आहे आपल्या समाजात . प्रत्येक गोष्टीचा एक स्पेक्ट्रम असतो त्यात थोडंफार जितकी सहन रेषा असते त्याच्या आत गोष्टी असतात तोपर्यंत ठीक असतात . आता लोकांच्या भाव भावना , entitlements ची जाणीव , हक्क , indivisualism वगैरे गोष्टींमुळे एकूणच ते स्पेक्ट्रम लहान होत चालले आहेत . आपल्या समाजाला सायकॉलॉजी हा विषय सक्तीचा व्हायला हवा असा काळ आला आहे .

फार्स यांचा पहिला प्रतिसादही का गॅसलायटिंगसारखा वाटतोय मला Lol म्हणजे लोकं बोलतायत ते गॅसलायटिंग नाहीये त्याचं प्रसंगांना सरसकट लेबल दिलं जातंय. त्यांच्या मते>>>
प्रचलित सरसकटीकरणाने अभिप्रेत होणाऱ्या अर्थानुसार असं वाटल्यास त्यात काही नवल नाही असंच मी म्हणेन.  मी या बाबत तुम्हाला अधिक माहिती गोळा करा, अधिक वाचा ( सोमी वर आयतं मिळणारं फास्टफूड नको ) असं सुचवेन. माझ्या मते नक्कीच गॅसलायटिंग ही संज्ञा कोणत्या प्रसंगात समयोचित ठरते हे आज काल खोलात जाऊन न पाहता सरसकटपणे वापरली जाते. (it's a best example of oversimplification due to overuse of any term). कदाचित ही संज्ञा खूपच कॅची आणि फॅन्सी भासत असल्यामुळेही असेल . (An example of Shiny Object Syndrome (SOS) or Magpie Syndrome).
जे तुष्की  यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे, की कुणाच्याही  भावना नाकारणं हे गॅसलायटिंगचं  लक्षण आहे , माझा याबाबत मतभेत मुळीच नाही. पण ते एकमेव लक्षण दिसणे म्हणजेच गॅसलायटिंग हे खचितच नाही. जसं, जर ओव्हरसिम्पलीफाईड करायला गेलो, तर  वेळी अवेळी चक्कर येणं  हे ब्रेन ट्युमरचं  लक्षण असू शकतं. पण चांगला निदानकर्ता त्या सोबत इतर काही टेस्ट करतो, इतर संलग्न लक्षणे तपासतो आणि मगच ते चक्कर येणं म्हणजे ब्रेन ट्युमर आहे, कमी रक्तदाब आहे, व्हर्टिगो आहे की आणखी काही आहे याचे निदान करतो. तो इतर लक्षणे तपासतो/ अथवा तपासा असं सुचवतो म्हणजे त्याचा ब्रेन ट्युमरमुळे चक्कर येतात यावर विश्वास नसतो असं नसतं. तसंच काहीसं मला गॅसलायटिंग म्हणजे भावना नाकारणे याबाबत म्हणायचं  होतं.  

आपल्या समाजाला सायकॉलॉजी हा विषय सक्तीचा व्हायला हवा असा काळ आला आहे >>>> +१

व्याख्या नवीन असली तरी वागणे जुनेच आहे आपल्या समाजात>> +१. लेखात लिहिलेले निरागसच नव्हे फार्स यांनी लिहिले तसे इंटेन्शनल गॅसलाइटिंग घरात, नात्यातही होत रहाते, मॅनिपुलेट करायला.

या बाबत तुम्हाला अधिक माहिती गोळा करा, अधिक वाचासोमी वर आयतं मिळणारं फास्टफूड नको ) असं सुचवेन.>> हो याबाबतीत माहिती गोळा करून सखोलच वाचावे लागेल.नक्की वाचेन.

आपल्या समाजाला सायकॉलॉजी हा विषय सक्तीचा व्हायला हवा असा काळ आला आहे >>>> +१

चर्चा आणि विश्लेशण वाचून विषयाचे नवे आयाम कळताहेत. गॅसलाईटींग हा शब्द लोडेड असल्याने अनेक वाचकांच्या मनात त्याचे वेगळे रूप आहे हे कळतेय, तरीही अनेक वाचकांना माझ्या लेखातले मूळ मुद्दे अनुभवाच्या कक्षेत सापडताहेत असे काही अभिप्रायातून कळतेय.
.
@बन्या,
इंटरेंस्टींग आणि कल्पक अभिप्राय आहे तुमचा. तेरा वर्ष सात महिने इतका तुमचा या सदाशिवपेठी पुणेकर प्रोफाईल चा मायबोलीचा वावर आहे. जुने जाणते आहात म्हणून तुमच्या अभिप्रायात काही खास विचार असेल. धन्यवाद.

> जे तुष्की यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे, की कुणाच्याही भावना नाकारणं हे गॅसलायटिंगचं लक्षण आहे , > माझा याबाबत मतभेत मुळीच नाही.
> पण ते एकमेव लक्षण दिसणे म्हणजेच गॅसलायटिंग हे खचितच नाही.
> जसं, जर ओव्हरसिम्पलीफाईड करायला गेलो, तर वेळी अवेळी चक्कर येणं हे ब्रेन ट्युमरचं लक्षण असू शकतं.
.
@फार्स,
माझा लेख गॅसलाईटिंग विषयाची व्याख्या करण्यासाठी लिहिलेला नाही. मी जो मुद्दा मांडला आहे त्याला मी निरागस गॅसलाईटिंग असे नाव दिले आहे. माझे नाव अचूक नसले तरीही माझे मुद्दे अनुभवांवर आधारित आहेत.
.
गॅसलाईटींग म्हणजे नेमके काय, याबाबतीत एक वेगळा लेख होऊ शकतो. या लेखाचा तो मुद्दा नाही त्यामुळे काही गोष्टी आपण माहित नसल्याने जे अजाणतेपणी भावना नाकारतो त्याबद्दल माझे मुद्दे यावर वाचकांनी मांडलेले विचार मला अधिक महत्वाचे वाटतात.
.
“तारे जमीन पर” चित्रपटात जसे बाबाला शिक्षक विचारतात की या खेळाच्या डब्यावर लिहिलेले वाचा ते जापानी भाषेत असल्याने त्यांना वाचता येत नाही तेव्हा तो म्हणतोप तुम्ही मन लावून वाचतच नाहीये म्हणून तुम्हाला वाचता येत नाहीये.
.
ते बाबा त्यामच्या मुलाला अभ्यास मन लावून केलास तर होतो हेच सांगत झापत आलेले आहेत शाळेची सर्व वर्षे. गॅसलाईटींग च्या शास्त्रीय व्याख्येत हे वागणे येते की नाही येत हा एक चर्चेचा विषय असू शकतो, पण माझा मुद्दा असे प्रसंग आपण पण घरात अगदी रोजच्या वागण्यात अजाणतेपणे करतो आहोत का याचे अवलोकन करायला आपल्याला या मुद्यांमधून प्रेरणा मिळाली तर आनंद होईल.

इंटेंशन महत्वाचे आहे का?
माझी आई नेहमी मला तुला हे जमत नाही ते जमत नाही म्हणून टोकायची. अजून टोकते. त्या वेळी (सेफ पिटी म्हणून) माझं खच्चीकरण आईच करतेय असं वाटायच. पण आता आई समजते तशी काळजी समजते. त्या वेळी नसतं टोकलं तर काय संकट आलं असतं असा विचार येतो..
हे सुद्धा गॅसलायटिंग असेल का?

Pages