आम्ही नुकताच माझ्या ८५ वर्षांच्या आईसाठी आणि ९३ वर्षांच्या बाबांसाठी असिस्टेड लिविंग/ डिपेंडंट लिविंग निवडण्याचा कठीण निर्णय घेतला आणि त्यांना तशा प्रकारच्या सेंटरला हलवले. या वयात हा बदल त्यांच्या साठी खूप मोठा आहेच पण आमच्यासाठीही आहे. अजून न्यू नॉर्मलला सरावणे सुरु आहे. वाड्यात या बद्दल सांगितले तेव्हा मी या विषयी जरा सविस्तर लिहावे असे बर्याच जणांचे म्हणणे पडले म्हणून जमेल तसे शब्दांत मांडायचा प्रयत्न करत आहे.
थोडी पार्श्वभूमी लिहीणार आहे म्हणजे आईबाबांच्या केअरगिविंगच्या प्रवासातील टप्पे कव्हर होतील -
आईबाबांनी लग्न झाले तेव्हा सुमारे ६० वर्षांपूर्वी दोनच अपत्य होवू द्यायची हा निर्णय घेतला, दोन मुली झाल्या. दोन मुली, मुलगा नाही तेव्हा त्या काळच्या विचारानुसार 'शेवटी आपणच एकमेकांना' म्हणत त्यांचे वृद्धापकाळचे मानसिक प्लॅनिंग आमच्या लहानपणीच सुरु झाले.
आजूबाजूचे लोकं टोकत, सहानुभूती दाखवत पण आईबाबा शांत होते. काळ पुढे जात होता. माझ्यासाठी स्थळे बघणे सुरु झाले आणि मुलीला भाऊ नाही, पुढे आईवडीलांची जबाबदारी या मुद्द्यावर नकार येवू लागले. मी मोठी मुलगी तेव्हा आईबाबांची जबाबदारी माझी या मुद्द्यावर मी ठाम होते. यथवकाश दोन्ही कडच्या आईबाबांची जबाबदारी आपली दोघांची असे मानणार जोडीदार मिळाला आणि मी लग्न करुन अमेरीकेला आले. आम्ही परदेशत रहाणार म्हणजेच जे काही केअरगिविंग आहे ते लाँग डिस्टन्स असणार हे तेव्हाच पक्के झाले. +१ ला भावंडे होती, मलाही बहिण होती त्यामुळे एकंदरीत जमवता येइल असे वाटले. पुढे दुर्दैवाने माझ्या बहिणीचे दीर्घ आजाराने निधन झाले आणि जे काही करायचे ते आपल्याला एकट्याला करायचे आहे ते देखील परदेशत राहून ही खूणगाठ पक्की झाली. मधल्या काळात सासूबाई आणि सासरे यांच्या केअरगिविंग बाबतीत भारतात भावंडे असतानाही आम्ही सगळ्यांनीच बरीच चॅलेंजेस झेलली होती, बहिणीची सर्व सुशृषा आईनेच केली होती त्यामुळे त्या बाजूनेही सर्व किती कठीण याचा अंदाज आला होता. सुदैवाने आईबाबांची प्रकृती चांगली होती, गावात नातेवाईक होते आणि त्यांच्याशी संबंध जिव्हाळ्याचे होते. आईबाबांनी नातेवाईकांचे करणे आणि त्यांनी आईबाबांचे करणे अशी टू वे स्ट्रीट होती. आईबाबांची मोतीबिंदूची ऑपरेशन्स चुलतभावाच्या मदतीने पार पडली, बाबांना कानाला हिअरिंग एडची गरज पडायला लागली तरी तसे ते दोघेही रोजचे सर्व व्यवहार व्यवस्थित करु शकत असल्याने फारशी काळजी नव्हती. सोसायटीतल्याच एका कुटुंबाला अडीनडीला त्यांची छोटी संभाळायला मदत करणे, स्वयंपाकाच्या बाईंच्या मुलीचे शिक्षण, इतर सोसायटीची कामे यात त्यांचा वेळ छान जात असे.
२०१० च्या सुमारास माझ्या धाकट्या आत्याचे निधन झाले आणि त्या नंतर मात्र आईबाबांच्या मनात वृद्धाश्रमाचे विचार येवू लागले. शेजारी रहाणारे जोडपे त्यांच्याच वयोगटातले आणि त्यांच्याच विचाराचे असल्याने त्यांना अजूनच जोड मिळाली. भारतवारीत मी समजावायचा प्रयत्न केला पण त्यांना वृद्धाश्रमाचा पर्याय योग्य वाटत होता. आईने या काळात वयाच्या सत्तरीत लॅपटॉप वापरणे शिकून घेतले, ती इंटरनेट-स्काईप वगैरे वापरु लागली. आमचे परदेशातली वास्तव्य लक्षात घेत मी देखील वृद्धाश्रमाच्या पर्यायाचा विचार करु लागले. मला आठवते की मायबोलीवर (की संयुक्तात) त्यासंबधी पोस्ट टाकली होती आणि मला सुजा यांनी संपर्क करुन वृद्धाश्रमांची यादी दिली होती. अजून काही आयडीजनी देखील मदतीचा हात पुढे करत माहिती दिली होती. आईबाबा आणि शेजारचे काकाकाकू त्यातल्या काही ठिकाणी ८-१५ दिवस ट्रायल म्हणून राहून देखील आले होते. मात्र यातले बहूतेक वृद्धाश्रम हे एबल बॉडीड असे पर्यंतच ठेवून घेवू प्रकारातले होते आणि शहरांपासून दूरही होते. आता तुम्हाला सर्व जमत असताना अशा ठिकाणी कशाला रहायचे त्यापेक्षा आपण वरकामासाठी, बँक-डॉक्टर विजिट-गावातली मोठी खरेदी याला सोबत म्हणून दिवसभराची मदतनीस ठेवू असे म्हणत आम्ही वृद्धाश्रम पर्याय मोडीत काढला. त्या नंतर स्वयंपाकाच्या बाईंच्या मदतीने सकाळी ४ तास आणि दुपारी ४ तास येणारी मदतनीस शोधणे सुरु झाले. थोडीफार शोधाशोध केल्यावर तशी मदतनीस मिळालीही. परंतू तरी वृद्धाश्रमाचा विषय अधूनमधून निघेच. २०१४ला झालेल्या भारतवारीत शॉर्ट लिस्ट केलेल्या वृद्धाश्रमांपैकी एका ठिकाणी आई, माझी जावू आणि माझा नवरा असे जावून आले. त्यांना सर्व काही पसंत पडले मात्र माझ्या मोठ्या नणंद बाईंना हे कळल्यावर त्या आम्हा दोघांवर खूप रागावल्या. एकाच्या जागी चार माणसे ठेवा पण आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवायचे नाही नाहीतर माझे घर तुम्हा दोघांसाठी बंद असे एकदम निर्वाणीचे बोलणे केले. सोसायटीच्या सेक्रेटरीना कळल्यावर त्यांनीही खूप विरोध नोंदवला. याच सेक्रेटरींनी आईबाबांची पोलीसांच्या जेष्ठ नागरिक स्किममधे नोंदणी केली होती. शेवटी ४-४ तासाच्या स्लॉटमधे मदतनीस या पर्यायावर शिक्कामोर्तब होवून आही परतलो. त्या नंतर पँडेमिक सुरु होईपर्यंत आईबाबांकडे हे मदतनीस प्रकरण ऑन -ऑफ सुरु राहीले. आमची २०१८ ची भारतवारी झाली तोवर साधारण ६-७ मदतनीस झाल्या होत्या. या मुली काही काळ रहायच्या नंतर एक तर त्यांचे लग्न होई किंवा मॉलमधे नोकरी लागे. आईबाबांचे थकणे यावेळी चांगलेच जाणवले पण पुढे काय हा प्रश्न मनातच दडपून आम्ही परतलो. नवे वर्ष आले आणि होळी नंतर माझा चुलतभाऊ अचानक गेला. यातून सावरत नाहीत तर माझ्या मोठ्या मामाची तब्येत खालावली. २०२० च्या सुरवातीला मामा गेला आणि आई मनाने मोडलीच. त्यातच आलेल्या पँडेमिकने आमचे सर्वच प्लॅनिंग मोडीत काढले. लॉकडाऊन लागला, घरकामाला येणारी माणसे गावी परतू लागली, आईबाबांचे काय असा प्रश्न आ वासून उभा राहीला. या सगळ्यात स्वयंपाकाच्या बाई मात्र ठामपणे उभ्या राहिल्या. त्या सुदैवाने जवळच रहत होत्या. त्यांनी पोलीसंची परवानगी काढली, सकाळी लवकर येवून त्या सर्व काही उरकून जात. त्या उभ्या राहिल्या नसत्या तर काय झाले असते याचा विचारही करवत नाही. पँडेमिक काळात माझा नवरा ऑफिसला जात होता, दोन्ही प्लांट्स तीन शिफ्ट्स मधे सुरु होते. जावयाच्या काळजीने आईचा जीव अर्धा होई. त्यातच नात्यातली, ओळखीतली माणसे कोविडने नेली. या काळात आईबाबा खूपच थकले, मुख्यत्वे मनाने.
कोविड प्रकरण संपल्यावर एकंदरीत परीस्थिती पाहून आम्ही आईबाबांसाठी लिव इन केअर शोधायचा निर्णय घेतला. माझ्या जावेने वृद्धांचे पालकत्व हा फेसबुक ग्रूप जॉईन करायला सुचवले. मी मैत्रीण संकेत स्थळावर माझी समस्या मांडली. तिथे आणि इथे सदस्य असलेल्या मंजूडीने आपणहून माहिती देवू केली, स्वतःचा रेफरन्स दिला आणि नेरळजवळच्या कोतवालवाडी ट्रस्टकडे आम्ही आईबाबांसाठी लिव इन केअर गिवरसाठी चौकशी केली. माझ्या गावातच रहाणार्या नातेवाईकांना ही कल्पना फारशी पटली नव्हती पण मान्य करण्यावाचून दुसरा पर्यायही नव्हता. आईबाबांना समजावणे हे अजूनच अवघड काम होते. पण ट्राय करा तुम्हाला बघायला कुणीतरी २४ तास हवे म्हणत आम्ही गळच घतली. फोन इंटरव्ह्यू वगैरेचे सोपस्कार पार पडून ट्रस्ट तर्फे नर्सिंगचे शिक्षण घेतलेली मुलगी आईबाबांसोबत रहायला आली. आल्या आल्या चारच दिवसात तिने घराचा आणि आईबाबांचा ताबाच घेतला. तिच्या प्रेमळ, मोकळ्या स्वभावाने हळू हळू आईबाबा या व्यवस्थेला अनुकूल झाले. नातेवाईक प्रत्यक्ष येवून खातरजमा करुन जात होते आणि एकंदरीत व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करत होते. गावात रहाणार्या माझ्या चुलतभावाने आणि भाच्याने आईबाबांचे आर्थिक व्यवहार संभाळू सांगून मला खूप आश्वस्थ केले. मात्र या सगळ्यात आम्ही दुर्लक्ष केलेला मुद्द होता तो केअरगिविंगच्या खर्चाचा. लेक- जावई हा खर्च उचलणार यामुळे आईबाबा बरेच व्यथित झाले. आत्तापर्यंतच्या मदतनीसांचे खर्च त्यांच्या आवाक्यातले होते पण हा खर्च मोठा होता. माझा नवरा आणि लेक यांनी आईबाबांची समजूत घातली आणि लिव इन केअरगिविंग सुरु झाले. आईकडे स्वयंपाकाच्या बाई आणि लादी पोछा-धुणे वाल्या बाई खूप वर्षे होत्या. त्यांना ही नवी व्यवस्था फारशी आवडली नव्हती. त्यामुळे नवी मुलगी विरुद्ध आधीच्या दोघी असे मानापमानाचे प्रयोग अधून मधून होत. दर वेळी फोनाफोनी करुन मी समजूती काढणे करत असे. एकंदरीत बरे चालले होते पण दिड वर्षांनी आईला नागिण झाली. केअरगिवरने एकंदरीत लक्षणे ओळखून लगेच डॉक्टरांकडे नेले आणि योग्य उपचार मिळाले. त्यातून आई रिक्व्हर होत आहे बघून केअरगिव्हर ठरल्याप्रमाणे दोन दिवस सुट्टीला गेली आणि दुसर्या दिवशी सकाळी आई अचानक चक्कर येवून पडली. सुदैवाने तेवढ्यातच स्वयंपाकाच्या बाई आल्या आणि त्यांनी तो दिवस निभावून नेला. मला एकंदरीत परीस्थिती बिकट होत आहे हे ठळक झाले. त्या नंतर चार दिवसांनी आई घरातच सोफ्यावर बसताना अंदाज चुकून पडली. फ्रॅक्चर नव्हते पण कमरेला आणि पाठीला खूप मुकामार बसला होता. यापुढे अजून एक मदतनीस लागणार हे लक्षात घेवून संस्थेला विनंती केली आणि २-३ दिवसांनी अजून एक केअरगिवर सामील झाली. दोघींनी मिळून आईची खूप छान काळजी घेतली आणि आई आठवड्या भरात हिंडती फिरती झाली. मात्र या नंतर आईच्यात लक्षात येइल असा एक बदल झाला तो म्हणजे मूड स्विंग्ज. तिचे चिडचिड करणे अचानक खूप वाढे. जोडीला हळू हळू विसरणेही वाढायला लागले. आई नातेवाइक आले किंवा त्यांचे फोन आले की नॉर्मल असे त्यामुळे ती आजारी आहे हे कुणाला पटत नव्हते. ती डॉक्टरांकडे जायला तयार नव्हती. मग घरी विझिट करतील असे डॉक्टर शोधावे असा विचार सुरु झाला. शोध घ्यायला सुरुवात केली आणि तिकडे आणि इथे सदस्य असलेल्या एव्हीने योग्य माहिती दिली. जेष्ठ केअरशी संपर्क साधून होमविझिटसाठी डॉक्टरांची सोय झाली आणि आईची ट्रिटमेंट सुरु झाली. लक्षणे कधी कमी कधी एकदम तीव्र . औषधोपचार सुरु होते. एकंदरीत अनुभव बघून बाबांसाठीही त्यांच्याकडे नोंदणी केली. माझ्या बाबांना माइल्ड स्वरुपाची मानसिक व्याधी बरीच वर्षे आहे जी औषधाने मॅनेज होते. तर ते बाबांचे प्रिस्क्रिप्शनही इकडे ट्रान्सफर केले. दोन पावले पुढे, एक पाऊल मागे सुरु होते. शेवटी आईच्या बाबतीत जी शंका होती तिच खरी ठरली. अर्ली स्टेज डिमेंशिया. पुन्हा एकदा पुढे काय हा प्रश्न पुढे ठाकला. सध्या घरी ठेवून मॅनेज होत होते तरी वी वेअर ऑन बॉरोड टाईम. या सगळ्यात अवलशी संवाद होताच. तिथे धीर देवून मंजीरी वेदकना संपर्क करण्याविषयी सुचवले आणि त्यांनाही माझ्या परीस्थितीची थोडी कल्पना दिली. मंजीरी वेदक यांचा डिमेंशिया, अल्झायमर बाबतीत बराच अनुभव असल्याने त्यांच्याशी बोलून खूप क्लॅरीटी आली. असिस्टेड लिविंग बाबतीत आईबाबा दोघांना एकत्र रहाता येणे ही आमची मोठी गरज होती. त्या दृष्टीने त्यांनी अनामय हेल्थचे नाव सुचवले आणि संपर्कासाठी फोन नंबर दिला. अनामयला संपर्क केल्यावर त्यांनी खूप आस्थेने सर्व चौकशी केली, माझ्या मनातले प्रश्न/ शंका यांचे समाधान केले. त्यांची बाणेर पुणे आणि नेरुळ, नवी मुंबई अशा दोन ठिकाणी सेंटर्स आहेत आणि दोन्ही ठिकाणी एकत्र रहाण्याची सोय होईल असे सांगितले. नेरुळच्या सेंटरची मी विडीओ टुर घेतली तर माझ्या भाच्याने (नणंदेचा मुलगा) बाणेरला प्रत्यक्ष विझिट दिली. माझ्या जावेशी सविस्तर बोलले. नेरुळला आमचे कुणीच नाही, पुण्यात नातेवाईकही आहेत आणि कोथरुडच्या आमच्या आणि भाच्याच्या घरापासून बाणेर लोकेशन २० मिनीटावर आहे तेव्हा बाणेरच योग्य राहील असे भाच्याचे म्हणणे पडले. पुन्हा एकदा नातेवाईकांना समजावणे केले. माझा चुलतभाऊ आणि वहिनी या निर्णयाने खूप उदास आणि दु:खी झाले. खरे तर ते देखील सत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत. बुद्धीला पटते पण मनाला नाही अशी काहीशी त्यांची अवस्था झाली होती. अनामयशी बोलून अॅडमिशनची प्रोसेस सुरु केली. भारतात जायचे म्हणून डॉककडून नवर्यासाठी प्रवासाची परवानगी घेतली आणि तिकीटे बुक केली. भारतात आल्यावर आईबाबांना सर्व समजावून सांगितले. एका लेव्हलवर त्यांना सर्व पटत होते पण एका लेव्हलवर नव्या ठिकाणी कसे ही काळजीही होती. त्यात आईला विस्मरण होत असल्याने ती पुन्हा पुन्हा कायम तिथेच रहायचे का, खर्च खूप होणार का वगैरे विचारत होती. पुढले काही दिवस आम्ही दोघे ऑटो पायलटवर असल्यासारखे आईबाबांसाठी खरेदी करणे, कागदपत्रांचे व्यवहार, बँक व्यवहार वगैरे करत होतो. त्यातच आई आम्ही परत कधी जाणार विचारत होती. या सगळ्या गोंधळात दोन्ही केअरगिवरनी खूप सहकार्य केले. किती झाले तरी गेली काही वर्षे त्या २४ तास आईबाबांसोबत होत्या. आईबाबांच्या बदललेल्या गरजांची नेमकी माहिती त्यांना होती. आईबाबांच्या डॉक्टर्सच्या फाईल्स रेडी ठेवण्यापासून ते त्यांना कुठली बिस्किटं लागतात पर्यंत आणि बाबांना कशा प्रकारचे टीशर्ट आवडतात पासून आईला कुठल्या रंगाचे गाऊन्स घ्यायचे, कुठल्या लाल शेडच्या कितपत मोठ्या टिकल्यांपर्यंत सर्व काही आम्हाला समजावून सांगत हे ट्रांझिशन सोपे केले. त्यांचे खरे तर ते कामाचे शेवटचे दिवस होते कुठल्याही प्रकारची कुचराई न करता दोन्ही मुलींनी सर्व काही संभाळले. आमच्या दोघांच्या खाण्यापिण्याची ही खूप काळजी घेतली.
शेवटी निघायचा दिवस आला. भाचीने कॅब बुक केली होती. तीन-साडे तीन तासांचा प्रवास करुन बाणेरला पोहोचलो. भाचा आधीच आला होता. आजीआजोबा प्रवासाने थकले असतील तर त्यांना आधी त्यांच्या खोलीत विश्रांती घेवू द्या असे म्हणत तिथल्या अटेंडंट्सनी त्यांना खोलीत नेले. थोडी विश्रांती झाल्यावर गप्पा मारत नर्सने त्यांना चेक केले, डॉकच्या फाईल्स त्यांची सध्याची औषधे वगैरे सर्व ताब्यात घेवून व्यवस्थित नोंदी केल्या. खरे तर भाच्यासोबत नणंदेने जेवणाचा डबा पाठवला होता पण स्टाफने आग्रहाने आता गरम गरम जेवून घ्या नंतर पेपरवर्क करु म्हणत आम्हाला जेवू घातले. जेवण घरगुती चवीचे कमी तेलाचे, कमी तिखट असे होते. नंतर नवर्याने आणि भाच्याने पेपरवर्क पूर्ण केले. 'मामी, माझेही ते आजीआजोबाच आहेत' म्हणत भाच्याने नातू/ लोकल गार्डियन म्हणून सह्या करुन सगळी जबाबदारी स्विकारली तेव्हा कौतुकाने आणि अभिमानाने मन भरुन आले. आईबाबांना त्यांचे युनिट आवडले. त्यांचा निरोप घेवून निघालो तेव्हा दोघांनी हसतमुखाने निरोप दिला.
आईबाबांनी हसतमुखाने निरोप दिला खरा पण दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर नव्या जागेत ते एकदम गोंधळून गेले. आईला त्यांचे युनिट रिसॉर्ट प्लेस सारखे वाटत होते मात्र स्टाफने समजूत घालून संभाळून घेतले. आईबाबांना रुळायला सोपे व्हावे म्हणून काही दिवस नातेवाईकांचे फोन-भेटीगाठी नको असे सुचवले. त्यामुळे सगळे नातेवाईक अपसेट झाले. मग पुन्हा समजूत काढणे झाले. आम्ही फोनवरुन आईशी बोलत होतो. विडीओ कॉल इतक्यात नको असे आम्हाला सांगितले होते. आम्हाला त्यांच्या अॅक्टिविटीजचे विडीओ अपडेट्सही मिळत होते. बाबा तसे रुळले पण दरवेळी आईला इथे कायमचे रहायचे याची आठवण करुन देणे क्लेशकारक होते. पण भारतातून निघण्याआधी बोलणे झाले तेव्हा बर्यापैकी समजूत पटली होती. तिचे औषधांचे डोस आता अॅडजस्ट झालेत. सर्व अॅक्टिविटीजमधे दोघे भाग घेतात त्याचे विडीओ अपडेट मिळत आहेत. ग्रूप फिझिओ थेरपी सेशन्स कलर थेरपी असे काही ना काही असते. सर्व सण साजरे केले जातात. होळी साजरी केली, रंगपंचमीच्या निमित्ताने गाण्याचा कार्य्क्रम होता. काल आईबाबांशी पहिल्यांदाच विडीओ कॉल केला तर आई छान बोलली. बाबांनीही हसून हात हलवून ठीक असल्याचे सांगितले.
एकंदरीत आईबाबा सुरक्षित आहेत हे बघून आम्ही समाधानी आहोत. हे परफेक्ट सोल्यूशन नाही याची पूर्ण जाणीव आहे परंतू आमच्या परीस्थितीत सध्या तरी आम्हाला जे त्यातल्या त्यात योग्य उत्तर वाटले ते आम्ही निवडले.
>> एक चांगली गोष्ट म्हणजे
>> एक चांगली गोष्ट म्हणजे तुमच्याशी प्रत्यक्ष बोलले.>>
हो. मी मेसेज करुन विचारले की तुम्हाला फोनवर बोलायचे असेल तर आपण बोलूया म्हणून. एक परदेशस्थ अपत्य या रोल मधून मला त्यांना वास्तव काय असते ते दाखवायचे होते.
होते काय, आपल्याकडे कथा, कादंबर्या, मुवी, अगदी ललीत लेख म्हणूनही आधीच एकांगी चित्र रंगवलेले असते कारण बाजारात विकायचे असते. मध्यम मार्ग विकला जात नाही एकतर टोटल स्वार्थी मुलं नाहीतर मग एकदम त्यागमूर्ती - करोडो रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी सोडून मुलगा वृद्ध आईसाठी भारतात परतला वगैरे! दुसरे म्हणजे परदेशस्थ अपत्यं महिनाभराची रजा घेवून येतात, जी काही अॅक्शन घ्यायची ती घेतात आणि परत जातात याकडे घाईघाईने घेतलेला निर्णय, पालकांना वृद्धाश्रमात 'टाकून गेले' असे बघितले जाते. त्या आधीच्या काळात परदेशात राहून रोज वेळेचा फरक सांभाळायची कसरत करत पालकांशी सकाळ संध्याकाळ होणारे विडीओ कॉल्स-डायरीत होणार्या नोंदी, डॉकशी बोलण्यासाठी रात्री २ वाजता अलार्म लावून उठणे, सेकंड- थर्ड ओपिनियन्स, पुढे काय याबद्दल आतल्या वर्तुळातील नातेवाईकांशी होणार्या चर्चा, केअरगिविंगसाठीचे पर्याय शोधणे-सांभाळणे हे जे खाजगीतले तणावाचे जगणे आहे ते लोकांना कळत नाही /जाणवत नाही. साधे ५ वर्षाच्या मुलासाठी शुज घ्यायचे तर आपण चार दुकाने फिरतो इथे प्रत्यक्ष आईवडीलांसाठी 'सेवा खरेदी' करायची. भावनांच्या गुंत्यातून मार्ग काढत, व्यवहार सांभाळत, पालकांचे पालक होत त्यांच्यासाठी निर्णय घ्यायचा तर तो असा घाई गडबडीत थोडा ना घेतला जातो पण लोकं विशिष्ठ चष्म्यातून बघत निष्कर्ष काढून मोकळे होतात.
अमेरीकेत रहाणारे म्हणजे "खोर्
अमेरीकेत रहाणारे म्हणजे "खोर्याने पैसा कमावलेले" हा हि मी एकलेला कायम डायलॉग आहे.
आई वडिलांच्या मूडनुसार , त्या त्या दिवसाच्या तब्येतीनुसार डॉक च्या अपॉईंटमेंट घेत बसणे / कॅन्सल करणं केलय मी. ते ही भारतीय वेळेनुसार.
त्यामुळे सगळच रीलेट होतं.
हे कोसावरून शेळ्या हाकणारे नातेवाईक त्रासदायकच असतात. आणि आता तर वॉट्सॅप वर वेगळे वेगळे ग्रूप काढून टवाळ्या करायला मोकळे असतात. अश्या नातेवईकावरून पाणी सोडलय मी.
Pages