आईबाबांचे वृद्धत्व संभाळताना

Submitted by स्वाती२ on 22 March, 2025 - 09:43

आम्ही नुकताच माझ्या ८५ वर्षांच्या आईसाठी आणि ९३ वर्षांच्या बाबांसाठी असिस्टेड लिविंग/ डिपेंडंट लिविंग निवडण्याचा कठीण निर्णय घेतला आणि त्यांना तशा प्रकारच्या सेंटरला हलवले. या वयात हा बदल त्यांच्या साठी खूप मोठा आहेच पण आमच्यासाठीही आहे. अजून न्यू नॉर्मलला सरावणे सुरु आहे. वाड्यात या बद्दल सांगितले तेव्हा मी या विषयी जरा सविस्तर लिहावे असे बर्‍याच जणांचे म्हणणे पडले म्हणून जमेल तसे शब्दांत मांडायचा प्रयत्न करत आहे.
थोडी पार्श्वभूमी लिहीणार आहे म्हणजे आईबाबांच्या केअरगिविंगच्या प्रवासातील टप्पे कव्हर होतील -
आईबाबांनी लग्न झाले तेव्हा सुमारे ६० वर्षांपूर्वी दोनच अपत्य होवू द्यायची हा निर्णय घेतला, दोन मुली झाल्या. दोन मुली, मुलगा नाही तेव्हा त्या काळच्या विचारानुसार 'शेवटी आपणच एकमेकांना' म्हणत त्यांचे वृद्धापकाळचे मानसिक प्लॅनिंग आमच्या लहानपणीच सुरु झाले.
आजूबाजूचे लोकं टोकत, सहानुभूती दाखवत पण आईबाबा शांत होते. काळ पुढे जात होता. माझ्यासाठी स्थळे बघणे सुरु झाले आणि मुलीला भाऊ नाही, पुढे आईवडीलांची जबाबदारी या मुद्द्यावर नकार येवू लागले. मी मोठी मुलगी तेव्हा आईबाबांची जबाबदारी माझी या मुद्द्यावर मी ठाम होते. यथवकाश दोन्ही कडच्या आईबाबांची जबाबदारी आपली दोघांची असे मानणार जोडीदार मिळाला आणि मी लग्न करुन अमेरीकेला आले. आम्ही परदेशत रहाणार म्हणजेच जे काही केअरगिविंग आहे ते लाँग डिस्टन्स असणार हे तेव्हाच पक्के झाले. +१ ला भावंडे होती, मलाही बहिण होती त्यामुळे एकंदरीत जमवता येइल असे वाटले. पुढे दुर्दैवाने माझ्या बहिणीचे दीर्घ आजाराने निधन झाले आणि जे काही करायचे ते आपल्याला एकट्याला करायचे आहे ते देखील परदेशत राहून ही खूणगाठ पक्की झाली. मधल्या काळात सासूबाई आणि सासरे यांच्या केअरगिविंग बाबतीत भारतात भावंडे असतानाही आम्ही सगळ्यांनीच बरीच चॅलेंजेस झेलली होती, बहिणीची सर्व सुशृषा आईनेच केली होती त्यामुळे त्या बाजूनेही सर्व किती कठीण याचा अंदाज आला होता. सुदैवाने आईबाबांची प्रकृती चांगली होती, गावात नातेवाईक होते आणि त्यांच्याशी संबंध जिव्हाळ्याचे होते. आईबाबांनी नातेवाईकांचे करणे आणि त्यांनी आईबाबांचे करणे अशी टू वे स्ट्रीट होती. आईबाबांची मोतीबिंदूची ऑपरेशन्स चुलतभावाच्या मदतीने पार पडली, बाबांना कानाला हिअरिंग एडची गरज पडायला लागली तरी तसे ते दोघेही रोजचे सर्व व्यवहार व्यवस्थित करु शकत असल्याने फारशी काळजी नव्हती. सोसायटीतल्याच एका कुटुंबाला अडीनडीला त्यांची छोटी संभाळायला मदत करणे, स्वयंपाकाच्या बाईंच्या मुलीचे शिक्षण, इतर सोसायटीची कामे यात त्यांचा वेळ छान जात असे.
२०१० च्या सुमारास माझ्या धाकट्या आत्याचे निधन झाले आणि त्या नंतर मात्र आईबाबांच्या मनात वृद्धाश्रमाचे विचार येवू लागले. शेजारी रहाणारे जोडपे त्यांच्याच वयोगटातले आणि त्यांच्याच विचाराचे असल्याने त्यांना अजूनच जोड मिळाली. भारतवारीत मी समजावायचा प्रयत्न केला पण त्यांना वृद्धाश्रमाचा पर्याय योग्य वाटत होता. आईने या काळात वयाच्या सत्तरीत लॅपटॉप वापरणे शिकून घेतले, ती इंटरनेट-स्काईप वगैरे वापरु लागली. आमचे परदेशातली वास्तव्य लक्षात घेत मी देखील वृद्धाश्रमाच्या पर्यायाचा विचार करु लागले. मला आठवते की मायबोलीवर (की संयुक्तात) त्यासंबधी पोस्ट टाकली होती आणि मला सुजा यांनी संपर्क करुन वृद्धाश्रमांची यादी दिली होती. अजून काही आयडीजनी देखील मदतीचा हात पुढे करत माहिती दिली होती. आईबाबा आणि शेजारचे काकाकाकू त्यातल्या काही ठिकाणी ८-१५ दिवस ट्रायल म्हणून राहून देखील आले होते. मात्र यातले बहूतेक वृद्धाश्रम हे एबल बॉडीड असे पर्यंतच ठेवून घेवू प्रकारातले होते आणि शहरांपासून दूरही होते. आता तुम्हाला सर्व जमत असताना अशा ठिकाणी कशाला रहायचे त्यापेक्षा आपण वरकामासाठी, बँक-डॉक्टर विजिट-गावातली मोठी खरेदी याला सोबत म्हणून दिवसभराची मदतनीस ठेवू असे म्हणत आम्ही वृद्धाश्रम पर्याय मोडीत काढला. त्या नंतर स्वयंपाकाच्या बाईंच्या मदतीने सकाळी ४ तास आणि दुपारी ४ तास येणारी मदतनीस शोधणे सुरु झाले. थोडीफार शोधाशोध केल्यावर तशी मदतनीस मिळालीही. परंतू तरी वृद्धाश्रमाचा विषय अधूनमधून निघेच. २०१४ला झालेल्या भारतवारीत शॉर्ट लिस्ट केलेल्या वृद्धाश्रमांपैकी एका ठिकाणी आई, माझी जावू आणि माझा नवरा असे जावून आले. त्यांना सर्व काही पसंत पडले मात्र माझ्या मोठ्या नणंद बाईंना हे कळल्यावर त्या आम्हा दोघांवर खूप रागावल्या. एकाच्या जागी चार माणसे ठेवा पण आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवायचे नाही नाहीतर माझे घर तुम्हा दोघांसाठी बंद असे एकदम निर्वाणीचे बोलणे केले. सोसायटीच्या सेक्रेटरीना कळल्यावर त्यांनीही खूप विरोध नोंदवला. याच सेक्रेटरींनी आईबाबांची पोलीसांच्या जेष्ठ नागरिक स्किममधे नोंदणी केली होती. शेवटी ४-४ तासाच्या स्लॉटमधे मदतनीस या पर्यायावर शिक्कामोर्तब होवून आही परतलो. त्या नंतर पँडेमिक सुरु होईपर्यंत आईबाबांकडे हे मदतनीस प्रकरण ऑन -ऑफ सुरु राहीले. आमची २०१८ ची भारतवारी झाली तोवर साधारण ६-७ मदतनीस झाल्या होत्या. या मुली काही काळ रहायच्या नंतर एक तर त्यांचे लग्न होई किंवा मॉलमधे नोकरी लागे. आईबाबांचे थकणे यावेळी चांगलेच जाणवले पण पुढे काय हा प्रश्न मनातच दडपून आम्ही परतलो. नवे वर्ष आले आणि होळी नंतर माझा चुलतभाऊ अचानक गेला. यातून सावरत नाहीत तर माझ्या मोठ्या मामाची तब्येत खालावली. २०२० च्या सुरवातीला मामा गेला आणि आई मनाने मोडलीच. त्यातच आलेल्या पँडेमिकने आमचे सर्वच प्लॅनिंग मोडीत काढले. लॉकडाऊन लागला, घरकामाला येणारी माणसे गावी परतू लागली, आईबाबांचे काय असा प्रश्न आ वासून उभा राहीला. या सगळ्यात स्वयंपाकाच्या बाई मात्र ठामपणे उभ्या राहिल्या. त्या सुदैवाने जवळच रहत होत्या. त्यांनी पोलीसंची परवानगी काढली, सकाळी लवकर येवून त्या सर्व काही उरकून जात. त्या उभ्या राहिल्या नसत्या तर काय झाले असते याचा विचारही करवत नाही. पँडेमिक काळात माझा नवरा ऑफिसला जात होता, दोन्ही प्लांट्स तीन शिफ्ट्स मधे सुरु होते. जावयाच्या काळजीने आईचा जीव अर्धा होई. त्यातच नात्यातली, ओळखीतली माणसे कोविडने नेली. या काळात आईबाबा खूपच थकले, मुख्यत्वे मनाने.
कोविड प्रकरण संपल्यावर एकंदरीत परीस्थिती पाहून आम्ही आईबाबांसाठी लिव इन केअर शोधायचा निर्णय घेतला. माझ्या जावेने वृद्धांचे पालकत्व हा फेसबुक ग्रूप जॉईन करायला सुचवले. मी मैत्रीण संकेत स्थळावर माझी समस्या मांडली. तिथे आणि इथे सदस्य असलेल्या मंजूडीने आपणहून माहिती देवू केली, स्वतःचा रेफरन्स दिला आणि नेरळजवळच्या कोतवालवाडी ट्रस्टकडे आम्ही आईबाबांसाठी लिव इन केअर गिवरसाठी चौकशी केली. माझ्या गावातच रहाणार्‍या नातेवाईकांना ही कल्पना फारशी पटली नव्हती पण मान्य करण्यावाचून दुसरा पर्यायही नव्हता. आईबाबांना समजावणे हे अजूनच अवघड काम होते. पण ट्राय करा तुम्हाला बघायला कुणीतरी २४ तास हवे म्हणत आम्ही गळच घतली. फोन इंटरव्ह्यू वगैरेचे सोपस्कार पार पडून ट्रस्ट तर्फे नर्सिंगचे शिक्षण घेतलेली मुलगी आईबाबांसोबत रहायला आली. आल्या आल्या चारच दिवसात तिने घराचा आणि आईबाबांचा ताबाच घेतला. तिच्या प्रेमळ, मोकळ्या स्वभावाने हळू हळू आईबाबा या व्यवस्थेला अनुकूल झाले. नातेवाईक प्रत्यक्ष येवून खातरजमा करुन जात होते आणि एकंदरीत व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करत होते. गावात रहाणार्‍या माझ्या चुलतभावाने आणि भाच्याने आईबाबांचे आर्थिक व्यवहार संभाळू सांगून मला खूप आश्वस्थ केले. मात्र या सगळ्यात आम्ही दुर्लक्ष केलेला मुद्द होता तो केअरगिविंगच्या खर्चाचा. लेक- जावई हा खर्च उचलणार यामुळे आईबाबा बरेच व्यथित झाले. आत्तापर्यंतच्या मदतनीसांचे खर्च त्यांच्या आवाक्यातले होते पण हा खर्च मोठा होता. माझा नवरा आणि लेक यांनी आईबाबांची समजूत घातली आणि लिव इन केअरगिविंग सुरु झाले. आईकडे स्वयंपाकाच्या बाई आणि लादी पोछा-धुणे वाल्या बाई खूप वर्षे होत्या. त्यांना ही नवी व्यवस्था फारशी आवडली नव्हती. त्यामुळे नवी मुलगी विरुद्ध आधीच्या दोघी असे मानापमानाचे प्रयोग अधून मधून होत. दर वेळी फोनाफोनी करुन मी समजूती काढणे करत असे. एकंदरीत बरे चालले होते पण दिड वर्षांनी आईला नागिण झाली. केअरगिवरने एकंदरीत लक्षणे ओळखून लगेच डॉक्टरांकडे नेले आणि योग्य उपचार मिळाले. त्यातून आई रिक्व्हर होत आहे बघून केअरगिव्हर ठरल्याप्रमाणे दोन दिवस सुट्टीला गेली आणि दुसर्‍या दिवशी सकाळी आई अचानक चक्कर येवून पडली. सुदैवाने तेवढ्यातच स्वयंपाकाच्या बाई आल्या आणि त्यांनी तो दिवस निभावून नेला. मला एकंदरीत परीस्थिती बिकट होत आहे हे ठळक झाले. त्या नंतर चार दिवसांनी आई घरातच सोफ्यावर बसताना अंदाज चुकून पडली. फ्रॅक्चर नव्हते पण कमरेला आणि पाठीला खूप मुकामार बसला होता. यापुढे अजून एक मदतनीस लागणार हे लक्षात घेवून संस्थेला विनंती केली आणि २-३ दिवसांनी अजून एक केअरगिवर सामील झाली. दोघींनी मिळून आईची खूप छान काळजी घेतली आणि आई आठवड्या भरात हिंडती फिरती झाली. मात्र या नंतर आईच्यात लक्षात येइल असा एक बदल झाला तो म्हणजे मूड स्विंग्ज. तिचे चिडचिड करणे अचानक खूप वाढे. जोडीला हळू हळू विसरणेही वाढायला लागले. आई नातेवाइक आले किंवा त्यांचे फोन आले की नॉर्मल असे त्यामुळे ती आजारी आहे हे कुणाला पटत नव्हते. ती डॉक्टरांकडे जायला तयार नव्हती. मग घरी विझिट करतील असे डॉक्टर शोधावे असा विचार सुरु झाला. शोध घ्यायला सुरुवात केली आणि तिकडे आणि इथे सदस्य असलेल्या एव्हीने योग्य माहिती दिली. जेष्ठ केअरशी संपर्क साधून होमविझिटसाठी डॉक्टरांची सोय झाली आणि आईची ट्रिटमेंट सुरु झाली. लक्षणे कधी कमी कधी एकदम तीव्र . औषधोपचार सुरु होते. एकंदरीत अनुभव बघून बाबांसाठीही त्यांच्याकडे नोंदणी केली. माझ्या बाबांना माइल्ड स्वरुपाची मानसिक व्याधी बरीच वर्षे आहे जी औषधाने मॅनेज होते. तर ते बाबांचे प्रिस्क्रिप्शनही इकडे ट्रान्सफर केले. दोन पावले पुढे, एक पाऊल मागे सुरु होते. शेवटी आईच्या बाबतीत जी शंका होती तिच खरी ठरली. अर्ली स्टेज डिमेंशिया. पुन्हा एकदा पुढे काय हा प्रश्न पुढे ठाकला. सध्या घरी ठेवून मॅनेज होत होते तरी वी वेअर ऑन बॉरोड टाईम. या सगळ्यात अवलशी संवाद होताच. तिथे धीर देवून मंजीरी वेदकना संपर्क करण्याविषयी सुचवले आणि त्यांनाही माझ्या परीस्थितीची थोडी कल्पना दिली. मंजीरी वेदक यांचा डिमेंशिया, अल्झायमर बाबतीत बराच अनुभव असल्याने त्यांच्याशी बोलून खूप क्लॅरीटी आली. असिस्टेड लिविंग बाबतीत आईबाबा दोघांना एकत्र रहाता येणे ही आमची मोठी गरज होती. त्या दृष्टीने त्यांनी अनामय हेल्थचे नाव सुचवले आणि संपर्कासाठी फोन नंबर दिला. अनामयला संपर्क केल्यावर त्यांनी खूप आस्थेने सर्व चौकशी केली, माझ्या मनातले प्रश्न/ शंका यांचे समाधान केले. त्यांची बाणेर पुणे आणि नेरुळ, नवी मुंबई अशा दोन ठिकाणी सेंटर्स आहेत आणि दोन्ही ठिकाणी एकत्र रहाण्याची सोय होईल असे सांगितले. नेरुळच्या सेंटरची मी विडीओ टुर घेतली तर माझ्या भाच्याने (नणंदेचा मुलगा) बाणेरला प्रत्यक्ष विझिट दिली. माझ्या जावेशी सविस्तर बोलले. नेरुळला आमचे कुणीच नाही, पुण्यात नातेवाईकही आहेत आणि कोथरुडच्या आमच्या आणि भाच्याच्या घरापासून बाणेर लोकेशन २० मिनीटावर आहे तेव्हा बाणेरच योग्य राहील असे भाच्याचे म्हणणे पडले. पुन्हा एकदा नातेवाईकांना समजावणे केले. माझा चुलतभाऊ आणि वहिनी या निर्णयाने खूप उदास आणि दु:खी झाले. खरे तर ते देखील सत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत. बुद्धीला पटते पण मनाला नाही अशी काहीशी त्यांची अवस्था झाली होती. अनामयशी बोलून अ‍ॅडमिशनची प्रोसेस सुरु केली. भारतात जायचे म्हणून डॉककडून नवर्‍यासाठी प्रवासाची परवानगी घेतली आणि तिकीटे बुक केली. भारतात आल्यावर आईबाबांना सर्व समजावून सांगितले. एका लेव्हलवर त्यांना सर्व पटत होते पण एका लेव्हलवर नव्या ठिकाणी कसे ही काळजीही होती. त्यात आईला विस्मरण होत असल्याने ती पुन्हा पुन्हा कायम तिथेच रहायचे का, खर्च खूप होणार का वगैरे विचारत होती. पुढले काही दिवस आम्ही दोघे ऑटो पायलटवर असल्यासारखे आईबाबांसाठी खरेदी करणे, कागदपत्रांचे व्यवहार, बँक व्यवहार वगैरे करत होतो. त्यातच आई आम्ही परत कधी जाणार विचारत होती. या सगळ्या गोंधळात दोन्ही केअरगिवरनी खूप सहकार्य केले. किती झाले तरी गेली काही वर्षे त्या २४ तास आईबाबांसोबत होत्या. आईबाबांच्या बदललेल्या गरजांची नेमकी माहिती त्यांना होती. आईबाबांच्या डॉक्टर्सच्या फाईल्स रेडी ठेवण्यापासून ते त्यांना कुठली बिस्किटं लागतात पर्यंत आणि बाबांना कशा प्रकारचे टीशर्ट आवडतात पासून आईला कुठल्या रंगाचे गाऊन्स घ्यायचे, कुठल्या लाल शेडच्या कितपत मोठ्या टिकल्यांपर्यंत सर्व काही आम्हाला समजावून सांगत हे ट्रांझिशन सोपे केले. त्यांचे खरे तर ते कामाचे शेवटचे दिवस होते कुठल्याही प्रकारची कुचराई न करता दोन्ही मुलींनी सर्व काही संभाळले. आमच्या दोघांच्या खाण्यापिण्याची ही खूप काळजी घेतली.
शेवटी निघायचा दिवस आला. भाचीने कॅब बुक केली होती. तीन-साडे तीन तासांचा प्रवास करुन बाणेरला पोहोचलो. भाचा आधीच आला होता. आजीआजोबा प्रवासाने थकले असतील तर त्यांना आधी त्यांच्या खोलीत विश्रांती घेवू द्या असे म्हणत तिथल्या अटेंडंट्सनी त्यांना खोलीत नेले. थोडी विश्रांती झाल्यावर गप्पा मारत नर्सने त्यांना चेक केले, डॉकच्या फाईल्स त्यांची सध्याची औषधे वगैरे सर्व ताब्यात घेवून व्यवस्थित नोंदी केल्या. खरे तर भाच्यासोबत नणंदेने जेवणाचा डबा पाठवला होता पण स्टाफने आग्रहाने आता गरम गरम जेवून घ्या नंतर पेपरवर्क करु म्हणत आम्हाला जेवू घातले. जेवण घरगुती चवीचे कमी तेलाचे, कमी तिखट असे होते. नंतर नवर्‍याने आणि भाच्याने पेपरवर्क पूर्ण केले. 'मामी, माझेही ते आजीआजोबाच आहेत' म्हणत भाच्याने नातू/ लोकल गार्डियन म्हणून सह्या करुन सगळी जबाबदारी स्विकारली तेव्हा कौतुकाने आणि अभिमानाने मन भरुन आले. आईबाबांना त्यांचे युनिट आवडले. त्यांचा निरोप घेवून निघालो तेव्हा दोघांनी हसतमुखाने निरोप दिला.

आईबाबांनी हसतमुखाने निरोप दिला खरा पण दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर नव्या जागेत ते एकदम गोंधळून गेले. आईला त्यांचे युनिट रिसॉर्ट प्लेस सारखे वाटत होते मात्र स्टाफने समजूत घालून संभाळून घेतले. आईबाबांना रुळायला सोपे व्हावे म्हणून काही दिवस नातेवाईकांचे फोन-भेटीगाठी नको असे सुचवले. त्यामुळे सगळे नातेवाईक अपसेट झाले. मग पुन्हा समजूत काढणे झाले. आम्ही फोनवरुन आईशी बोलत होतो. विडीओ कॉल इतक्यात नको असे आम्हाला सांगितले होते. आम्हाला त्यांच्या अ‍ॅक्टिविटीजचे विडीओ अपडेट्सही मिळत होते. बाबा तसे रुळले पण दरवेळी आईला इथे कायमचे रहायचे याची आठवण करुन देणे क्लेशकारक होते. पण भारतातून निघण्याआधी बोलणे झाले तेव्हा बर्‍यापैकी समजूत पटली होती. तिचे औषधांचे डोस आता अ‍ॅडजस्ट झालेत. सर्व अ‍ॅक्टिविटीजमधे दोघे भाग घेतात त्याचे विडीओ अपडेट मिळत आहेत. ग्रूप फिझिओ थेरपी सेशन्स कलर थेरपी असे काही ना काही असते. सर्व सण साजरे केले जातात. होळी साजरी केली, रंगपंचमीच्या निमित्ताने गाण्याचा कार्य्क्रम होता. काल आईबाबांशी पहिल्यांदाच विडीओ कॉल केला तर आई छान बोलली. बाबांनीही हसून हात हलवून ठीक असल्याचे सांगितले.
एकंदरीत आईबाबा सुरक्षित आहेत हे बघून आम्ही समाधानी आहोत. हे परफेक्ट सोल्यूशन नाही याची पूर्ण जाणीव आहे परंतू आमच्या परीस्थितीत सध्या तरी आम्हाला जे त्यातल्या त्यात योग्य उत्तर वाटले ते आम्ही निवडले.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही पार्टीजना जुळवून घ्यायला कठीण जाणे हे बघितले आहे >>> हे तर १००% मान्य आहेच. पण दोन्ही पार्टीजना असा विचार नाही करता येणार का? ....

पालकांकरता: स्वतःचे घर सोडून असिस्टेड लिव्हींग मध्ये रहायला पण जुळवून घ्यावे लागेलच ना? आता स्वतंत्र रहायचा पर्याय मला उपलब्ध नाही. मग मुलांकडे रहाण्यात जुळवून घेतलेले काय वाईट?
मुलांकरता: पालकांना दूरदेशी ठेऊन त्यांची आणि आपली कुतरओढ करण्यापेक्षा ते आपल्या नजरेसमोर असलेले बरे.

१. अर्थात हा माझा विचार आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात.
२. आर्थिक गणित कुठचं बरं याची तुलना मला माहीत नाही. पण भारतातही हे करणे स्वस्त नाही याचा स्वानुभव आहे.
३. अमेरिकेत नेउन पालकांना केअर होम मध्येच ठेवावे लागणार असले तर याचा फारसा उपयोग नाही.
४. मला डिमेन्शिआचा खूप जवळून अनुभव नाही. पण केअर गिव्हींग स्टाफ पेशंटशी आपल्या समोर एक आणि आपल्या मागे एक असा वागतो. आपले पर्सनल लक्ष असावेच लागते आणि आपला वचक असावाच लागतो हे अनुभवातून शिकलोय. सगळेच असे असतील असे नाही. पण ते लोक ज्या आर्थिक स्तरातून येतात, त्यात पैसे कमावणे हे माणुसकीपेक्षा जास्त महत्वाचे असते. त्यामुळे हे अनुभव मला खूप जास्त आले.

परदेशात रहायचे तर अनेक बाबतीत जुळवून घ्यावे लागणार हे ओघाने आले. त्याची तयारी नसेलच तर मग कितीही केले तरी काही ना काही प्रश्न येत रहाणार. >>> हे तर १००% खरं आहे. बाकी गोष्टी जाऊद्या स्वतःची गाडी असतानाची अमेरिका आणि गाडी नसतानाची अमेरिका या दोन अनुभवातली तफावत चांगलीच अनुभवली आहे.

तुमची आणि तुमच्या आई-वडलांची पुढली वाटचाल सुकर होऊ दे.

>>>>> केअर गिव्हींग स्टाफ पेशंटशी आपल्या समोर एक आणि आपल्या मागे एक असा वागतो. आपले पर्सनल लक्ष असावेच लागते आणि आपला वचक असावाच लागतो हे अनुभवातून शिकलोय. सगळेच असे असतील असे नाही. पण ते लोक ज्या आर्थिक स्तरातून येतात, त्यात पैसे कमावणे हे माणुसकीपेक्षा जास्त महत्वाचे असते. त्यामुळे हे अनुभव मला खूप जास्त आले.<<<<
+१
आम्हाला ह्या बाबतीत बरेच वाईट अनुभव आले.
असे निर्णय प्रत्येक घरानुसार बदलतात. बरीच गणितं असतात व बदलतात हे मी स्वतः अनुभवलय.
माझ्या अनुभवावरून, अश्या परीस्थितीत डोकं शांत ठेवून, आपली आर्थिक , शारीरीक बळ व मानसिक बळ कसे साथ देइल त्यावर निर्णय करावे. मी एकुलती एक असल्याने भार हा एकटीवरच होता. नातेवाईक आपापल्या व्यापात व तसेही काही मदतीचे नाही आहेत. त्यामुळे मला भारतात परतावे लागले.

असंतुलितपणे निर्णय घेतल्याने कुटुंबाची झालेली वाताहत पाहिलीय जवळच्याच नात्यात.
माझ्या वडिलांचा चुलत-चुलत भावाच्या घरात मारामार्‍या, वाद इतकी प्रकरणं झालीत की कोण काकांना डॉ कडे घेवून कोण जाणार? कोण भारतात येवून बघणार?, खर्च कोणी किती केला?. कुठला डॉ कोण ठरवणार? कोणाला कशी अक्कल नाही? ती तर ५ भावंडे आहेत. काका पुर्णपणे वेजिटेशन स्टेजमध्ये गेले तरी जगवायचं असा एकाचा अट्टाहास, मग डिनआर वरून मारामार्‍या.
त्यात एखादी भावंडं कमकुवत( आळशी, आर्थिक व भावनिक) असतील तर जे भावंडं करणार असतील त्यांच्यातच वाद होतात कारण कमकुवत भावंडं विरोध करतात ( कारण त्यांचा ईगो) व वाद वाढतात. अचानक बरेच पॉलिटीक्स सुरु होतात.
तर जे आपणच करतो ते बरोबर असे एक भावंडं असतं ते फक्त त्यांच्याच विचारानेच करतात व वर रडतात हि की मीच करते व मरते. एक चुलतबहिण अशीच होती ह्या ५ भावंडंमध्ये. भारतातच असणारी २ भावंडांची आर्थिक बाबतीत मदत न्हवती पण सांभाळ करत होते कसातरी भारतातच ती रहात असल्याने.
पण, माझेच बरोबर म्हणणारी बहिण खुपच हेकेखोर होती. ती काही काकांना असिस्टेड लिविंग मध्ये ठेवण्यास तयार झाली नाही. ती अमेरीकेतून येवून जावून करायची. वर वाद घालायची की मीच करते वगैरे.
इतर २ भावंडं जी अमेरीकेतच होती ती पुर्णपणे बायकोच्या ताब्यातच की ढूंकूनही फिरकले नाही काकांना एकदाही बघायला आजारपणात. कधीतरी थोडेसेच पैसे पाठवत, ते ही काकी फोनवर रडली की.
जेवढं ती एक हेकेखोर बहिण करायची, तितकी ती दादागिरि व विरोध करायची दुसर्‍यांनी काही सुचवले की असे प्रकरण होते. काका शेवटी म्हणाले, तु जिथे नेशील तिथे मरेन. आज ती भावंडं एकमेकांची तोंड बघत नाहीत. काका गेले आणि अजुनही काही समज नाही आली त्या हेकेखोर बहिणीला.
आता काकींना सांभाळते ती एकटीच कारण कोणीही भावंडं बोलत नाहीत एकमेकांशी व काकीची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. कारण हिच्याशी पटत नाही. ती हेकेखोर चुलत बहिणीचे नुकसान खुपच झालेय पण एकायची समजून घ्यायची वृत्ती नाही. पैशाचे कर्ज, अमेरीकेतली सुटलेली नोकरी, नवरा दुरावलेला अश्या परीस्थितीत ती करतेय काकींचे भावंडांना नावं ठेवत. खरं सांगायचं तर काकींचा स्वभाव पण हेकेखोरच आहे. त्यामुळे ती चुलत बहिण तशीच आहे.

ह्यातून एकच शिकण्यासारखे आहे, वागण्यात व विचारांमध्ये संतुलितपणा हवा अश्या परीस्थितीत.

झंपी, किती मोलाचं सांगितलंस!
वागण्यात आणि विचारात संतुलितपणा हवाच.
मी तर असे सांगून ठेवणार आहे मुलांना की जर फार अगदी कोमात वगैरे गेले तर काहीच प्रयत्न करू नका जगवायचे.
आणि जर देमेंशिया वगैरे झाला..तर असिस्टेड लिव्हिंग मधे पाठवा खुशाल

हे तर १००% मान्य आहेच. पण दोन्ही पार्टीजना असा विचार नाही करता येणार का? ....>>>>

हे असे एकमेकांचे विचार केले असते तर जग किती शांत राहिले असते ना.

मी गेली ५ वर्षे म्हातार्‍यांमध्येच जास्त वावरतेय. माझे निरिक्षण असे आहे की वाढत्या वयासोबत इन्सिक्युरिटिज वाढत जातात. आपल्याला आपले निर्णय घेता येत नाहीत, मुले परस्पर ठरवायला लागतात तशा या भावना अजुन वाढतात. हातात पैसे नसले तर नैराश्य ग्रासते आणि असले तर माझे पैसे घेऊन मला उघड्यावर टाकणार ही भिती ग्रासते. स्त्रियांचे किचन जाते आणि पुरुषांचे घरातील कर्ते हे स्थान जाते. ह्याचा किती खोल परिणाम मनावर होतो हे प्रत्यक्ष पाहिलेय. अशा व्यक्तींना मन दुसरीकडे रमवा, नव्या जागी जुळवुन घ्या, रिकामी मनाला आधार म्हणुन नामस्मरण करा हे कितीही सांगितले तरी त्यांना ते ऐकुच येत
नाही. मानसिकरित्या भुतकाळात अडकलेल्या या माणसांना रुचेल असा पर्याय शोधुन सर्व संबंधितांचे आयुष्य सुकर करणे खुप खुप कठिण जाते.

स्वातीचे विषेश अभिनंदन की ती शांतपणे आईबाबांना व नातेवाईकांना, आईबाबांसाठी सर्वोत्तम काय हे पटवुन देऊ शकली. हे करणे किती अबघड आहे हे वरिल कित्येक प्रतिसादांतुन दिसतेय.

एका महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर इतके सविस्तर आणि प्रांजळ लिहील्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या आईवडिलांना व तुम्हालाही पुढील वाटचालीकरता शुभेच्छा!

नव्या पीढीला जसं स्वातंत्र्य हवं असतं, तसंच ते आधीच्या पिढीलाही हवं असतं. आपली हक्काची जागा सोडून , अगदी मुलांकडेही जायला ते सहजासजजी तयार होत नाहीत, यात नवल नाही आणि वावगंही नाही.
दुसरा मुद्दा - आता वय- प्रकृती यांच्यामुळे दुसर्‍या कोणावर अवलंबून राहायला लागेल याचाही त्यांना त्रास होतो..

कोणाकडून तरी आपली सेवा - उदा: अंघोळ घालून घेणं इ.इ. करून घेणं हेही काहींना क्लेषदायक असतं.

>>मुलांकरता: पालकांना दूरदेशी ठेऊन त्यांची आणि आपली कुतरओढ करण्यापेक्षा ते आपल्या नजरेसमोर असलेले बरे.>>
मुले ज्या देशात आहेत तिथे वृद्ध पालकांना स्थलांतरीत करण्याचा मुद्दा येत आहे तर त्यावर जरा विस्ताराने -
मुळात पालकांना दूरदेशी ठेवून असे नसून पालक मायदेशी आणि मुले परदेशात (दूरदेशी) असे बघणे गरजेचे. आता मुले परदेशात आहेत म्हटल्यावर त्या त्या देशाचे स्थलांतराचे नियम लक्षात घेणे आले. नुसते विझिटर वीसा वर मुलांकडे जायचे तरी प्रत्येक देशाचे किती महिने राहू शकता याचे नियम असतात, बरेचदा टुरीस्ट विसा रिजेक्ट होणे-खूप कमी काळासाठी मिळणे होते. कायमस्वरुपी मुलांकडे वास्तव्य म्हणजे कायम स्वरुपी स्थलांतरासाठी पेपरवर्क करणे आले. ते काही मनात आले आणि केले असे होत नाही. काही देशांत असे पालकांना कायम स्वरुपी स्थलांतरीत करता येते, सगळ्याच नाही हे इथे लक्षात घेणे गरजेचे.
इथे समजून चालू की अपत्य अमेरीकेत आहे. तर पालकांना कायम स्वरुपी स्थलांतर करण्यासाठी अपत्याकडे अमेरीकेची सिटीझनशिप हवी. - अपत्याचे ग्रीन कार्ड झाल्यावर ५ वर्षे थांबून मग सिटीझनशिपसाठी अर्ज करता येतो. अर्ज केल्यावर प्रोसेसिंग टाईम १८-२४ महिने. अपत्याकडे सिटीझनशिप आहे धरुन चालू तर पालकांच्या ग्रीनकार्डसाठी पुन्हा प्रोसेसिंग टाईम १८-२४ महिने. यात एकच पालक की दोन्ही पालक हयात आहेत त्यानुसार तुम्हाला ते अमेरीकेवर भार होणार नाहीत याची खात्री देणे, त्यांची काळजी घेण्याची आर्थिक कुवत आहे दाखवणे आले. पालक काही प्रमाणात परावलंबी झाले असतील तर ही जबाबदारी अजून खर्चिक असणार तर त्या दृष्टीने जास्तीची आर्थिक कुवत दाखवता यायला हवी. ग्रीनकार्ड झाल्यावर ५ वर्षांचा वेटिंग पिरीयड असतो या काळात मेडीकेअर, मेडीकेड, चिप वगैरे सुविधा नाहीत. ५ वर्षांचा वेटिंग पिरीयड झाल्यावरही तुमची इथे वर्क हिस्ट्री नाही तर मेडीकेअर पार्ट ए चा महिन्याचा हप्ता स्वखर्चाने भरणे आले. काही ब्ल्यू स्टेट उदा. कॅलिफोर्निया अनडॉक्यूमेंटेंड इमिग्रंट्स सकट सर्वांचा भार उचलते, भरपूर देशी तिथे रहातात ती गोष्ट वेगळी. मी इथे सर्वसाधारण परीस्थिती मांडत आहे. थोडक्यात सुरवातीची ५ वर्षे मेडीकलचा खर्च अ‍ॅफोर्डेबल केअर अ‍ॅक्टखाली मार्केट प्लेसमधून इंशुरन्स घेवून भागवणे आले असे धरुन चालूया. काही परावलंबित्व असेल त्याचा खर्चही भागवणे आले. यात उद्याच्या लाँग टर्म केअरचा विचारही केलेला नाही. ते वेगळेच खर्चिक प्रकरण आहे. त्यासाठीचा इंशुरन्स धडधाकट असताना घेणे गरजेचे . आपण पैशाची अडचण नाही असे गृहित धरुन चालणार असू तर हे सगळे जमवता यावे. माझ्या सर्कलमधे असा अमर्याद पैसा असलेले कुणी नाही. जेमतेम ३ मिलीयन नेटवर्थवाले देखील भाग्यवान म्हणावे अशी परीस्थिती.
आता इतर अडचणी - इथे फुल रिटायरमेंट एज ६७. रिड्यूस्ट बेनिफिटवर लवकरात लवकर म्हणजे ६२. थोडक्यात वृद्ध, काही प्रमाणात परावलंबी पालक घरी एकटे आणि तुम्ही कामावर अशी परीस्थिती असल्यास काय याचा विचार करणे आले. सर्वांनाच घरुन काम ही सुविधा नसते, बर्‍याचदा १२-१४ तास मुले घराबाहेर असतात, काही वेळा देशात -परदेशात कामानिमित्त प्रवासही असतो. तुम्ही जिथे रहाणार तिथे भरपूर देशी असतीलच असे नाही, असले तरी सातत्याने सोशलायझेशन शक्य होईलच असे नाही. वयोमानानुसार अपत्य जिथे रहात आहे तिथले हवामान सोसणे हा अजून एक फॅक्टर येतो. या शिवाय भाषेची अडचण येवू शकते. अगदी देशात इंग्रजीची सवय असली तरी इथले स्थानिक इंगजी थोडे वेगळे पडते. त्याची सवय व्हायला वेळ लागतो. इथे हॉस्पिटलायझेशन वगैरेची वेळ आली तर हाऊसकिपिंग-केअरगिविंग स्टाफशी संवाद साधणे कठीण जाणे ते हॉस्पिटलचे पथ्याचे अमेरीकन जेवण न रुचणे वगैरे अनेक प्रश्न उद्भवतात. तसेही ' परक्या देशात' अशी भावना मनात असतेच ती अधिकच तीव्र होते. इथल्या लिमिटेड रजा, अगदी फॅमिली लिव लक्षात घेतली तरी हा एक वेगळाच मुद्दा येतो. साहाजिकच इथली सिस्टिम पेशंट सोबत सतत २४ तास कुणी नसले तरी चालेल अशी असते, मात्र बहुसंख्य देशी पालकांना याच्याशी जमवून घेणे कठीण जाते हा अनुभव आहे. त्यामुळेही बर्‍याच अडचणी येतात.
मी इथे ६०-६५ वयातले पालक कायमसाठी आलेत, बर्‍यापैकी सोशलायझेशन आहे, दिवस भर एकटे रहात असले तरी बागकाम, जवळच्या पार्कात फिरणे वगैरे आहे, विंटर देशात काढणे वगैरे सुरु आहे, थोडक्यात एकंदरीत आनंदात आहेत पासून वय वाढलेय, सोशल सर्कल लहान झाले आहे, काही प्रमाणात परावलंबित्वही आहे, वयानुरुप हट्टीपणा आलाय, मुलांचेही वय वाढले आहे हे समजून घ्यायची तयारी नाही, एकंदरीत कुरकुर-असमाधानी हा प्रवास बघितला आहे. वय वाढले आहे, मुलांचा विरोध आहे तरी देशात काही काळ काढायचा हट्ट, तिथे आजारी पडल्यावर इथल्या मंडळींची होणारी धावपळ, ओढाताण वगैरे प्रकारही अनुभवले आहेत. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, जमवून घ्यायची वृत्ती वेगळी आणि म्हातारपणही वेगळे. सत्तरीत परदेशात अपत्याकडे छान आनंदात रहाणारे आजोबा ८०-८५ ओलांडतात तेव्हा तसेच आनंदात राहतील याची खात्री नाही. त्यातून उभ्या रहाणार्‍या समस्यांना तोंड देण्याची कुवत अपत्यात असेलच असे नाही. शेवटी प्रत्येक कुटुंब वेगळे. 'अ' कुटुंबात जे शक्य झाले ते 'ब' कुटुंबात शक्य होईलच असे नाही, त्यामुळे प्रत्येकाचा या अशा पालकत्वाचा प्रवास वेगळा. मात्र तो शक्य तितका सहृदयतेने व्हावा या साठी जजमेंटल न होता जमेल तसा मदतीचा हात पुढे करणे एवढे आपल्या हातात नक्कीच आहे.

स्वाती२, तुमचे अनुभव, निर्णयप्रक्रिया, वाटेतले खाचखळगे यांबद्दल सविस्तर आणि प्रांजळ माहिती दिलीत, त्याबद्दल आभार.

मैत्रेयी म्हणाली तसं अशा रीसोर्सेसची एक यादीही त्यासोबत - किंवा त्यानिमित्ताने वेगळ्या धाग्यात संकलित करता आली तर इतरांनाही मदत होईल.

हो, भरतला अनुमोदन. शिवाय ज्येष्ठांना नवीन ठिकाणी जुळवून घेणं अवघड वाटतं - आणि मी हे मानसिकदृष्ट्या म्हणत नाही, पण राहत्या जागेत एक 'मसल मेमरी' तयार झालेली असते. नेहमीच्या वापरातल्या वस्तू/उपकरणं, लेआऊट, स्विचेस वगैरेंच्या नेमक्या जागा ओळखीच्या/सवयीच्या असतात. कान, डोळे इत्यादी अधू होत जातात तसं या मसल मेमरीचं महत्त्व वाढत जातं. नवीन ठिकाणी गोंधळणं, भीतीपोटी सोयी वापरायच्याच टाळणं असंही नकळत केलं जातं.

>>आईबाबांच्या सध्याच्या व्याधी लक्षात घेता भारतात असिस्टेड लिविंग ऐवजी ते इथे माझ्याकडे रहात आहेत हे सोपे झाले असते का ? तर याचे उत्तर दुर्दैवाने 'नाही' असेच येते.<<
तुमच्या बाबतीत हा पर्याय वर्कआउट झाला नसला तरीहि सध्या सूपात असणार्‍या माबोकरांकरता हा ऑप्शन थोडा विस्ताराने लिहिण्याचा प्रयत्न करतो -

अर्थात, हा निर्णय स्पर-ऑफ-द-मोमेंट प्रकारात मोडणारा नाहि. त्याकरता प्लॅनिंग आवश्यक आहे, बिसाइडस, एक्झिक्युशन इट्सेल्फ इज ए लाँग प्रोसेस. हा पर्याय ज्यांचे आई-बाबा परावलंबी किंवा वयोवृद्ध झालेले आहेत, सगळी मुलं/नेक्स्ट-ऑफ-किन परदेशात असल्याने भारतात एकटे आहेत यांच्याकरता विचार करण्याजोगा आहे, असं मला वाटतं..

१. पालकांचं ग्रीन कार्ड करणं हि पहिलि स्टेप. अमेरिकन सिटिझन्स्चे पालक असल्याने ग्रीन कार्ड मिळायला इतर कॅटगोरि इतका विलंब लागत नाहि.
२. मुलं परदेशात असलेल्या आणि वार्धक्यात झुकलेल्या पालकांचा अमेरिकेत स्थायीक न होण्याचा सुरुवातीचा निर्णय पुढे मावळतो, अशी बरीच उदाहरणं माझ्या समोर आहेत.
३. प्लॅनिंगचा एक महत्वाचा भाग म्हणजे लिविंग ट्रस्ट (इस्टेट प्लॅनिंग). लिविंग ट्रस्ट मधे हेल्थकेर डायरेक्टिव (लिविंग विल), पावर ऑफ अ‍ॅटर्नी, विल इ. चा समावेश करता येतो. भारतातली अ‍ॅसेट्स लिक्विडेट करुन प्रोसिड्स भारतातच (एनआरओ/एनआरइ) गुंतवुन मंथली इन्कम स्ट्रीम सेट करता येते, अर्थात एखाद्या चांगल्या फायनांशियल प्लॅनरच्या सल्ल्यानुसार. हे इन्कम अमेरिकेत डॉलर्समधे आणता येते. सिए/टॅक्स कंसल्टंट याबाबत मार्गदर्शन करु शकेल. हि रक्कम अमेरिकेत मंथली मेंटेनंस करता वापरली जाउ शकते. आई-बाबा आपल्याला जड होत नसले तरीही मुलांवर अवलंबून राहणं त्यांना पटत नाहि, अशावेळी हि रक्कम कामी येते. अमेरिकेत टॅक्स भरावा लागेल परंतु तो रिफंड होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय सिनियर्सना लागु असलेल्या फायद्यांचा (टॅक्स ब्रेक) लाभ मिळतो.
४. मेडिकेर साइन अप केल्यावर हॉस्पिटलायझेशन/हॉस्पिस, डॉक्टर्स व्हिजिट्स, लॅबवर्क इ. कवर होते, मामुली डिडक्टिबल भरल्यानंतर. गरजे नुसार अ‍ॅडिशनल कवरेज इंशुरंस कंपन्यांकडुन घेउ शकतो. थोडा रिसर्च केला तर मंथली हेल्थकेर कॉस्ट आवाक्या बाहे जात नाहि.
५. आर्थिक नियोजन व्यवस्थित झालं कि भावनिक निर्णय घेणं कठिण जात नाहि. शिवाय निगेटिव पॅरामिटर्स आई-बाबा डोळ्यासमोर असल्याने बॅकफुटवर जातात.

हा पर्याय अवाजवी, अव्यवहारिक आहे कि नाहि हा चर्चेचा विषय आहे. त्या निमित्ताने तो डॉक्युमेंट व्हावा, हा त्यामागचा उद्देश.

आय होप समवन, समव्हेअर वुड गेट बेनिफिटेड अँड प्रोव्हाय्ड बेस्ट ऑटम ऑफ लाइफ फॉर देर पेरेंट्स...

राज, उत्तम पोस्ट! विशेषतः भारतील अ‍ॅसेट्सचे प्लँनिंग करुन आर्थिक गणित जमवण्याविषयी सविस्तर लिहिलेत त्या बद्दल धन्यवाद. सध्या सुपात असलेल्यांना नकीच मार्गदर्शक आहे.

स्वाती ताई, अतिशय संतुलित असा लेख लिहून तुम्ही एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे. त्यासाठी धन्यवाद!
या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर हे प्रत्येकासाठी वेगळे असेल पण कोणते पर्याय उपलब्ध आहेत याची कल्पना जात्यात/सुपात असलेल्या सर्वांना या लेखातून आणि लेखावरच्या प्रतिसादांमधून येतेय ही फार मोलाची गोष्ट आहे.

स्वाती ताई, अतिशय संतुलित असा लेख लिहून तुम्ही एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे. त्यासाठी धन्यवाद! >> +1

लेख आणि प्रतिसादांमधून फार उपयुक्त माहिती मिळते आहे.

प्रत्येक माणूस आणि प्रत्येक परिस्थिती ही युनिक असते त्यामुळे आपल्याला आणि आपल्या परिस्थितीला जमतील तसे निर्णय घेऊन आपल्या माणसांना कमीत कमी त्रास होईल हे बघणे आपल्या हातात असते.

राज, ग्रीनकार्डचा ऑप्शन वाटतो तितका अवघड नाही, हे खरंय. प्लॅनिंगचा मुद्दा चांगल्या पद्धतीनं विशद केलाय.

प्रत्येकाची केस वेगळी हे जरी खरं असलं, तरिही पालकांच्या ग्रीनकार्ड च्या बाबतीत नकारात्मक मत असण्यामागे बर्याच सब्जेक्टीव्ह आणि त्यापेक्षाही खूप जास्त (ह्या प्रॉसेसचा प्रत्यक्ष अनुभव नसणार्यांच्या) अ‍ॅनेक्डोटल कथांचा वाटा असतो असा माझा अनुभव आहे. एकदा त्या ऐकीव कथानकांतून मार्ग काढला तर पुढचा मार्ग इतका अवघड नाहीये. सहसा पालकांचं ग्रीनकार्ड १-१.५ वर्षात होतं. त्यानंतर (५ वर्षात सिटिझनशिप वगैरे इतका पुढचा विचार करत नसाल) पालकांची तब्ब्येत बर्यापैकी व्यवस्थित असेल तर काही महिने भारतात, काही अमेरिकेत असं सुरूवातीला, अमेरिकेत रुळेपर्यंत करता येतं (१ वर्षाच्या आत परत अमेरिकेत यावं लागतं. रि-एन्ट्री परमिट घेऊन, २ वर्षापर्यंत बाहेर राहता येतं). अमेरिकेत टॅक्सेस फाईल करणं, इन्श्युरन्स, ड्रायव्हिंग लायसन्स/स्टेट आयडी ह्या गोष्टीतून अमेरिकेतले टाईज पण मेंटेन होतात. प्रत्येकाच्या बाबतीत हे लागू होत नसलं तरिही हा एक व्हायेबल पर्याय नक्कीच आहे.

एकच महत्वाची गोष्ट म्हणजे, तहान लागल्यावर विहीर खणायला घेऊ नये. आता काही पर्यायच नाही म्हणून ग्रीनकार्ड करण्यापेक्षा अमेरिकेतलं वास्तव्य एन्जॉय करता येईल अश्या परिस्थितीत ते केलं तर अमेरिकेतलं वास्तव्य शिक्षा न वाटता, ती एक मुला-नातवंडांबरोबर आनंदाने दिवस घालवायची सुसंधी वाटू शकते. तब्ब्येत आणि आर्थिक स्वातंत्र्य असेल तर अमेरिकेत किंवा अमेरिकेबाहेरही प्रवास करता येतो. बर्याच ठिकाणी प्रवास सोपा होतो. भारतातलं नागरिकत्व आणि अमेरिकेतली पर्मनंट रेसिडेन्सी, दोन्ही मेंटेन करता येऊ शकतं.

स्वाती२, तुमचे अनुभव, निर्णयप्रक्रिया, वाटेतले खाचखळगे यांबद्दल सविस्तर आणि प्रांजळ माहिती दिलीत, त्याबद्दल आभार.>>>+१

ज्या नातेवाईकांवर वृद्धांना सांभाळण्याची जबाबदारी नैतिकदृष्ट्या नसते ते त्या वृद्धांच्या बाबतीत वृद्धाश्रम वगैरे विषय आला की कडाडुन विरोध का करतात? ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे त्यांनी ठाम भुमिका घेऊन जे वृद्धांसाठी योग्य ते करावे.>>

माझ्या एका मित्रावर हा प्रसंग आला होता. जबाबदारी न घेणारे बहिण आणि नातेवाईक काय म्हणतील याला घाबरून आईची घरीच सुश्रुशा करायचा प्रयत्न त्याने केला होता. शेवटी आजींची प्रकृती इतकी बिघडली की दोनदा इस्पितळात भरती करावे लागले. घरी संभाळताना हालही होत होते व तब्येतही बिघडत होती.
शेवटी हिय्या करून एका सुसज्ज अशा संस्थेत ठेवल्यानंतर आजींची प्रकृती खूप सुधारली.

माझ्या मते वृद्धांची काळजी घरच्या पेक्षा अनुभवी संस्थांमधे चांगल्या प्रकारे होउ शकते. योग्य सोयी असतात, अनुभवी कर्मचारी व वैद्यकीय क्षेत्रातील मानसे जवळ असतात, आजकाल विडियो कॉल मुळे कुणिही कधिही संपर्कात राहू शकते. मुले भारतात असो वा नसो एका विशिष्ट स्थिती नंतर या पर्यायाचा विचार व्हावा. वृद्धांनी स्वतःची मानसिक तयारी या गोष्टीसाठी करून ठेवावी. खर्च मात्र येतो.
संस्थेची निवड आपण डोळस पणे करायला पाहिजे.

Pages