रोजच्या आयुष्यात न लागणाऱ्या गोष्टी अभ्यासात का शिकायच्या?
.
या प्रश्नाचे एक मला पटणारे एक उत्तर वाचायला मिळाले, ते पुढे सांगतोय.
.
मला हा प्रश्न नेहमी पडायचा की उदाहरणार्थ लॉगॅरिदम, कॅलकुलस सारखे विषय अभ्यासात का शिकवले जातात. जर रोजच्या आयुष्यात जगतांना या गोष्टी लागणारच नाहीयेत तर हे शिकण्यासाठी वेळ का वाया घालवायचा? शिक्षण पद्धती अशी बदलायला नको का की ज्यात खरेच आवश्यक असतील तेच विषय आणि कौशल्ये शिकवले जातील. तसे केल्याने वेळ आणि ऊर्जा वाचणार नाही का?
.
इतक्यातच वाचनात मला एक संदर्भ मिळाला आणि माझ्याच या प्रश्नाचे एक उत्तर वाचायला मिळाले आणि मला ते बरेचसे पटले म्हणून इथे ते मांडतोय, कदाचित तुम्हाला देखील असाच प्रश्न पडला असेल तर या उत्तरावर तुम्हाला पण विचार करायला आवडेल.
.
आपण शिकतांना आतापर्यंत जगात लागलेले विज्ञानाचे शोध आणि सिद्धांत फक्त शिकत नसतो, तर ते शोध कसे लागले आणि ते सिद्धांत कसे सापडले याचा ईतिहास त्याची गोष्ट सुद्धा शिकत असतो. या शिक्षणातून फक्त शास्त्रज्ञांना काय सापडले हे समजणेच महत्वाचे नसते तर ते कसे सापडले, त्यांनी कोणता मार्ग वापरला, म्हणजेच वैज्ञानिक पद्धती याचे पण ज्ञान आपल्याला घ्यायचे असते.
.
कोणते शोध लागले आणि ते कसे लागले, म्हणजे कश्या कश्यातून पुढच्या संकल्पना तयार होत गेल्या तो पूर्ण ज्ञानाचा चढता क्रम आपल्याला कळायला लागला तर आपण त्या शास्त्रज्ञांना त्यांच्या काळात केलेल्या कृती आपल्या काळानुसार अद्ययावत करून त्यांचे काम पुढे वाढवू शकतो.
.
आधीच्या विचारवंतांनी त्यांना जे ज्ञान वारस्याने मिळाले त्याच्या पायऱ्या करून त्यावर आणिक नव्या पायऱ्या तयार केल्या आणि नवे विचार नवे शोध करून दाखवले आणि पुढे आणले. तेच काम आपण आपल्याला उपलब्ध आताच्या ज्ञानाच्या पायऱ्या करून करू शकलो तर त्या शिक्षणाला अधिक उपयोगी शिक्षण म्हणता येईल.
.
विज्ञानचे विषय हे फक्त जुन्या शोध आणि सिद्धांतांची माहिती देणारे विषय नसून ती माहिती कशी मिळाली ते शोध कोणी आणि कसे लावले त्या पद्धती त्यांच्या गोष्टी यांचे सुंद्धा संकलन आहे असे समजले तर त्या माहितीला वेगवेगळ्या दृष्टीकोनातून लक्षात ठेवता येते आणि ते कंटाळवाणे राहत नाही.
.
लॉगॅरिदम आणि कॅलकुलस सारखे विषय गणितात पुढचे अनेक शोध लागण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरात येणार म्हणून त्यांची माहिती आणि त्यांचा वापर आपल्याला शाळेत शिकवला जातो हे समजून घेतले तर कठीण वाटले तरी त्यांची उपयुक्तता आपल्याला कळू शकते.
.
आपल्या सुदैवाने आता आपल्याला माध्यमिक शाळेत शिकावे लागतील असे जुजबी विज्ञान शिकवले जाते आणि पुढे आपल्याला आपल्या रूचीनुसार अभ्यासाची शाखा निवडता येते. त्यामुळे आपल्याला रस आहे त्या विषयांची निवड आपण करू शकतो.
.
आपण जे काही निवडले त्यातही जुने कालबाह्य असलेले काही सिद्धांत असू शकतातच. त्यांना आपण आपल्या आधीच्या अभ्यासकांनी काय शोधले आणि कसे शोधले याचा इतिहास आणि अभ्यास म्हणून स्वीकारले तर ते समजून घ्यायला सोपे होतील असे वाटते.
.
भारतीय शिक्षणाच्या नशिबात मॅकॉले साहेबाने तयार केलेले बाबू निर्माण कारखाना पद्धती आल्याने आपल्या विषयांमधे मर्यादा आणि कालबाह्यता आलेली असेल तरीही आता आपल्याला ज्ञानाचे अनेक भांडार उपलब्ध आहेत आणि त्यामुळे आपण आपले शिक्षण बहुआयामी करू शकतो आणि फक्त विषय रोजच्या वापरात नाहीत म्हणून त्यांच्याकडे उदासवृत्तीने पाहण्यापेक्षा ती माहिती कशी समोर आली कोणी आणली आणि कोणते सहाय्यक सिद्धांत त्यांनी त्यासाठी वापरले हा इतिहास म्हणून त्याकडे पाहिले तर आपला शिक्षणाकडे पहण्याचा दृष्टीकोण नव्या दिशांना व्यापू शकतो.
.
युट्यूब वरती मला शाळेत फार न कळलेल्या विषयांचे अनेक लोकांनी तयार केलेले विडियो पहायला मिळतात आणि शिक्षण कधी थांबत नसते तर ती एक नित्य निरंतर सुरू रहावी अशी प्रक्रिया आहे याचा आनंद होतो.
.
(निरंतरविद्यार्थी)
तुषार जोशी
नागपूर, शुक्रवार, २१ मार्च २०२५
रोजच्या आयुष्यात न लागणाऱ्या गोष्टी अभ्यासात का शिकायच्या?
Submitted by तुष्कीनागपुरी on 21 March, 2025 - 00:10
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रोजच्या आयुष्यात न लागणाऱ्या
रोजच्या आयुष्यात न लागणाऱ्या गोष्टी अभ्यासात का शिकायच्या?मला तर लहानपणापासून हा प्रश्न पडलाय
युट्यूब हे उत्तम माध्यम आहे नवनविन गोष्टी शिकण्याचं.
शिक्षण कधी थांबत नसते तर ती एक नित्य निरंतर सुरू रहावी अशी प्रक्रिया आहे याचा आनंद होतो. >>> अगदी अगदी
शिक्षण पद्धतीत कालानुरूप
शिक्षण पद्धतीत कालानुरूप किंवा मूळातच काही त्रुटी असतील तर त्या काढुन बदल करणे योग्यच आहे.
पण
कुणाच्या आयुष्यात पुढे काय लागणार आहे हे कसे ठरवतात?
प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना जर प्रत्येकाने मला आयुष्यात अमुक अमुक करायचंय आणि फक्त तेवढेच करायचेय असे नमुद केले तर त्याप्रमाणे पहिलीपासून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ज्याची गरज पडणार आहे तेवढे नेमके शिकवता येईल.
शिक्षण पद्धती अशी बदलायला नको
शिक्षण पद्धती अशी बदलायला नको का की ज्यात खरेच आवश्यक असतील तेच विषय आणि कौशल्ये शिकवले जातील. तसे केल्याने वेळ आणि ऊर्जा वाचणार नाही का? >>> वेळ आणि ऊर्जेचे एक वेळ जाऊ द्या, पण हे अवघड विषय न जमल्यामुळे निर्माण होणारी निराशा व न्यूडगंड हे खूप मोठे तोटे आहेत. अनेक विद्यार्थ्यांना यामुळे शिक्षणाची गोडी वाटत नाही. मग त्यांचा शिक्षणातला रस कमी झाल्यामुळे इतर विषयावरही व्यवस्थित लक्ष देता येत नाही. परिणामी शिक्षणातले लक्ष उडते. मग नापास होणे, शाळा सोडणे हे परिणाम होतात.
शालेय शिक्षण हे विविध
शालेय शिक्षण हे विविध ज्ञानशाखा / व्यावसायिक अभ्यासक्रम / खेळ / कलाकौशल्य इ. यांची ओळख करून देण्यासाठी असतं असं मला वाटतं. चांगले नागरिक घडवणे आणि भविष्यात उपयोगी पडेल अशा क्षेत्रात प्राविण्य मिळवणे यासाठी लहानपणी तयारी करून घेणे हा पण उद्देश असावा..
भाषा आणि बोली यांचा समन्वय साधला तर प्रत्येक विद्यार्थ्यांला ते सोपे वाटेल.
हे झाले न लागणाऱ्या
हे झाले न लागणाऱ्या गोष्टींविषयी पण जीवनात लागणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी शालेय शिक्षणात शिकवल्या जायला हव्यात. माझ्या मते पुढील गोष्टींचा किंवा कौशल्यांचा शालेय शिक्षणात समावेश असावा.
भाषा कौशल्य(व्याकरण वगळून ती भाषा उत्तम प्रकारे बोलायला शिकवायला हवी. त्याच प्रमाणे, भाषेमध्ये सुसूत्रबद्धपणे विचार करणे व आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडणे या गोष्टीही शिकवायला हव्यात. यासाठी भरपूर अवांतर वाचन, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा या गोष्टी अभ्यासक्रमाचा भाग असायला हव्यात. )
उत्क्रांतीचा सिद्धांत (यामुळे अंधश्रद्धा नष्ट व्हायला मदत होईल असे मला वाटते)
मूलभूत शेतीशास्त्र, मूलभूत आहारशास्त्र, मूलभूत पाकशास्त्र, सामान्य आजार व त्यांच्यावरचे शास्त्रीय घरगुती उपचार, बाल संगोपनाची मूलभूत तत्वे, मूलभूत फायनान्स व बँकिंग, मूलभूत मानसशास्त्र व कॉग्निटीव बायसेस, कायदे व न्यायप्रक्रिया यांचे मूलभूत ज्ञान, करिअरच्या विविध संधी व ते कसे निवडावे याचे औपचारिक शिक्षण.
यातले कितपत सध्या शाळेत शिकवले जाते माहित नाही.
शिक्षण हे "जीवन शिक्षण व आनंद शिक्षण" असावे.
बाकी आजच्या कस्टमाइज्ड वस्तू व सेवांच्या युगात शिक्षण मात्र एकसुरी आहे. मुंबईतल्या आईवडील नुरोलॉजिस्ट असलेल्या मुलाचे आणि गडचिरोलीतील आदिवासी मुलीचे आयुष्य हे खूप भिन्न असेल. मग त्यांना सारखेच शिक्षण देऊन कसे चालेल.
बाकी मी तैगा टुंड्रा मधील हवामान व दक्षिण अमेरिकेतील खनिज संपत्ती शिकल्याचा आयुष्यात काहीही फायदा झाला नाही.
मुंबईतल्या आईवडील नुरोलॉजिस्ट
मुंबईतल्या आईवडील नुरोलॉजिस्ट असलेल्या मुलाचे आणि गडचिरोलीतील आदिवासी मुलीचे आयुष्य हे खूप भिन्न असेल. मग त्यांना सारखेच शिक्षण देऊन कसे चालेल.
>>>>>>
पण मग त्यांच्यातील दरी कमी कशी होणार?
अन्यथा डॉक्टरच्या पोराने डॉक्टर आणि आदिवासीच्या मुलाने जंगलातच काम करावे असे झाले हे..
शाळेचे काम आहे समान शिक्षण देणे.
तुम्हाला जे वेगळे शिक्षण अपेक्षित आहेत ते देणे पालकांचे काम आहे असे वाटते.
तसेच तुमच्या पोस्टमध्ये मुलगा मुलगी हा भेद सुद्धा दिसला. तो अनवधानाने झाला की तसेच अपेक्षित होते.
पढ लिख के क्या करेगी .. बाद मे पती का घर ही संभालना है असे झाले हे सुद्धा..
मुलगा मुलगी भेद दिसला>>> नाही
मुलगा मुलगी भेद दिसला>>> नाही तसं त्यांनी लिहिलेच नाहीये .
>>मूलभूत शेतीशास्त्र, मूलभूत आहारशास्त्र, मूलभूत पाकशास्त्र, सामान्य आजार व त्यांच्यावरचे शास्त्रीय घरगुती उपचार, बाल संगोपनाची मूलभूत तत्वे, मूलभूत फायनान्स व बँकिंग, मूलभूत मानसशास्त्र व कॉग्निटीव बायसेस, कायदे व न्यायप्रक्रिया यांचे मूलभूत ज्ञान, करिअरच्या विविध संधी व ते कसे निवडावे याचे औपचारिक शिक्षण.>> हे मुलांनी म्हणजे मुलं मुली दोघांना शिकवावे (जे गरजेचे आहे व्यावहारिक ज्ञान म्हणून आणि असंही जनरल)असं म्हणत आहेत .
बाकी समान शिक्षण देण्याचा मुद्दा पटला.
नाही तसं त्यांनी लिहिलेच
नाही तसं त्यांनी लिहिलेच नाहीये.
>>>
मी माबो वाचक यांच्या पोस्ट बद्दल म्हणत आहे.
डॉक्टर मुलगा आणि आदिवासी मुलगी.
यात आर्थिक सामाजिक स्तरातील भेदासोबत मुलगा मुलगी भेद सुद्धा आहे. आदिवासी मुलगा न लिहिता मुलगी असे लिहिले आहे.
मुंबईतल्या आईवडील नुरोलॉजिस्ट
मुंबईतल्या आईवडील नुरोलॉजिस्ट असलेल्या मुलाचे आणि गडचिरोलीतील आदिवासी मुलीचे आयुष्य हे खूप भिन्न असेल. मग त्यांना सारखेच शिक्षण देऊन कसे चालेल. >>>>
ह्या वाक्याचा मला समजलेला अर्थ - "समानता नको न्याय हवा"

ट्रंपतात्यानी अमेरिकेत एका
ट्रंपतात्यानी अमेरिकेत एका फटक्यात शिक्षण खाते रद्द केले आणि पाच हजार कर्मचाऱ्यांची सुट्टी केली.
.......बातमी.
तसेच तुमच्या पोस्टमध्ये मुलगा
तसेच तुमच्या पोस्टमध्ये मुलगा मुलगी हा भेद सुद्धा दिसला. तो अनवधानाने झाला की तसेच अपेक्षित होते. >>>> मागे एकदा कुठेतरी वाचले की ऐकले होते की आदिवासींमध्ये मुलगीला पाळी आली की तिला शाळेतून काढून तिचे लग्न लावून देतात. म्हणून मुलगी हा शब्द वापरला. मग अशा परिस्थितीमध्ये तिच्या आयुष्यात जे उपयोगी आहे तेच शाळेत शिकवायला हवे. जसे की मुलांचे संगोपन, आरोग्य, आहार, कायदा इत्यादी ज्ञान.
पढ लिख के क्या करेगी .. बाद मे पती का घर ही संभालना है असे झाले हे सुद्धा.. >>>>> मी असमान शिक्षण म्हणालो नाही. कस्टमाईज्ड शिक्षण असे म्हणालो. ज्या प्रकारच्या आयुष्य असणार आहे त्याला पूरक असे शिक्षण.
आणि हे शिक्षण शाळेतच मिळायला हवे. पालकांनी का द्यायचे हे समजले नाही. प्रगत देशांमध्ये हे विषय शाळेत शिकवले जातात.
मला वाटतं आपल्याकडे समस्या
मला वाटतं आपल्याकडे समस्या काय शिकवत आहेत ही नाही. सिलॅबस, पुस्तके सगळे चांगले आहे.
प्रॅाब्लेम शिकवण्याच्या पद्धतीत, शाळा, शिक्षक, पालक यांच्यात आहे.
विषय समजणे, त्याची गोडी लागणे, या पेक्षा मुलांकडून ते घोकून घेऊन परिक्षेत ओकून घेणे जास्त आहे.
मी असमान शिक्षण म्हणालो नाही.
मी असमान शिक्षण म्हणालो नाही. कस्टमाईज्ड शिक्षण असे म्हणालो.
>>>>>>
म्हणजे जे कोणी लोक हे ठरवणार तेच त्या मुलानी भविष्यात काय बनावे असे ठरवण्यासारखे झाले ना..
कस्टमाईजड शब्द छान वाटतो कानाला ऐकायला. पण त्यात ते ग्राहक डिमांड करतो की त्याला काय कसे कस्टमाईज करून हवे. इथे ज्या मुलाना आपले भविष्य घडवायचे आहे ते सगळे तशी डिमांड करत आहेत का? नसल्यास हा न्याय नाही तर अन्याय झाला.
अर्थात विचारामागच्या भावना पोहोचल्या, पण ते मूल्य शिक्षण अतिरिक्त द्या, बेसिक शिक्षण प्रत्येकाला सारखेच हवे.
प्रॅाब्लेम शिकवण्याच्या
प्रॅाब्लेम शिकवण्याच्या पद्धतीत, शाळा, शिक्षक, पालक यांच्यात आहे.>>>>>
काही शाळांना व नशिबवान विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक लाभलेत. पण सगळीकडे तसे नाही. कोकणात बहुसंख्य शिक्षक मराठवाडा, विदर्भ इथुन येतात. त्यांना चरीतार्थ चालवायला नोकरी हवी असते ज्यासाठी दहा लाखांपर्यंत पैसे भरुन नोकरी मिळवतात. इथे परक्या मुलखात मन रमत नाही, शाळेतल्या मुलांशी संवाद जुळत नाही. शेवटी पाट्या टाकल्या जातात. आमच्या गावात १ली ते चौथी एक खुप चांगले शिक्षक होते जे गेल्या वर्षी बदलुन दुसरीकडे गेले. त्यांच्या जागी ज्या शिक्षिका आल्यात त्यांचे इंग्रजी function at() {
[native code]
}इशय वाईट आहे. मराठी माध्यम मुलांना इन्ग्रजी हा विषय पहिलीपासुन आहे ह्यात संवादावर भर दिलाय. भाषेचे व्याकरण नंतर पाचवीपासुन. संवादातुन भाषा कळावी तर शिक्षिकेला काय छापलेय तेच कळत नाही. यंदा शाळा एप्रिल शेवटपर्यण्त सुरु ठेवणार आहेत, एन्ग्रजीचा अभ्यास करुन घ्यायला. पण शिक्षकच असे तर मुले काय शिकणार? ती शिक्षिका चुकीचे इन्ग्रजी लिहुन देतेय हे मला कळतेय. पालकांना इन्ग्रजी येत नाही, त्यांना चुकीचे आहे हे कळत नाही.
रानभुली सहमत.
समान शिक्षण म्हणजे बेसिक भाषा
समान शिक्षण म्हणजे बेसिक भाषा, मूल्य शिक्षण, गणित वगैरे जस की 9 वी पर्यंतचे आकडेमोड व्यावहारिक जगात लागनारे गणित सगळ्यांना शिकावावं नंतरच हाई लेवल गणित प्रत्येकाला जमेल असं नाही. म्हणून तर दहावीला गणितात नापास होणाऱ्याचंप्रमाण जास्त आहे. यावरून आठवलं नववीत आमचा अ वर्ग असूनही अर्धापेक्षा जास्त वर्ग भूमितीत नापास झाला होता .मग स्पेशल वर्ग घेऊन या निकालानंतर कसं शिकायचं आणि नापास का झाला हे समजावून सांगितलं होतं,शेवटी भूमिती समजून घेण्यापेक्षा प्रमेय पाठ करून जशीच्या तशी लिहायचा सोपा मार्ग अनेकांनी अवलंबला.दहावीला तर 15 पैकी 10प्रमेय एकदम घोकंपट्टी करून तयार करून ठेवले तरी त्यातलेच येणार अशी युक्ती अनेकांनी केली होती शिक्षकांनी खूप प्रयन्त केला होता पण सगळीच मुलं सारखी नसतात . एखाद दुसरा जिनियस होता जो प्रमेय समजून उमजून पाठ ना करता लिहून आला होता परीक्षेत .आणि प्रत्येकाला काही गणितज्ञ बनायचं नसतं .मला अजूनही मी लिहून आलेले प्रमेय आयुष्यात काय उपयोगाचे होते कळले नाही कारण त्या पाठ करणार्यामध्ये मी पण एक होते .
पण एखाद्याला संगीतात किंवा कलेत इंटरेस्ट असेल तर त्याचं शिक्षण द्यावं. म्हणजे कस्टमाईज शिक्षण.
सिमरन , सहमत आहे , फक्त
सिमरन , सहमत आहे , फक्त बेसिक शिक्षणाच्या नावाखाली बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी अवघड व निरुपयोगी गोष्टी शिकविल्या जातात, त्या पर्यायी कराव्यात . म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा तिकडे कल नाही ते विद्यार्थी ते विषय नाकारू शकतील व त्याऐवजी त्यांच्या कलानुसार , जीवनपद्धती नुसार विषय ते निवडू शकतील.
पण एखाद्याला संगीतात किंवा कलेत इंटरेस्ट असेल तर त्याचं शिक्षण द्यावं. म्हणजे कस्टमाईज शिक्षण. >>> अगदी बरोबर.
पहिली ते दहावी विविध विषयांचे
पहिली ते दहावी विविध विषयांचे बेसिक शिक्षण प्रत्येकाला द्यावे. पण त्यावरून नापास करू नये. नंबर लावायला टक्केवारी काढायची झाल्यास बेस्ट ३ विषयांची काढावी. मुळात हे नंबर लाऊच नयेत.
काही मुले हुशार आहेत तर त्यांना वेगळे शिक्षण द्यायला त्यांचा वेगळा वर्ग बनवायचा हे देखील मला पटत नाही.
याने हुशार मुलांची अ तुकडी बनते आणि ड तुकडीतील विद्यार्थ्यांना आपण ढ असल्याचे वाटून न्यूनगंड येतो. समाज सुद्धा त्यांच्याकडे तसेच बघतो.
आमच्या शाळेत अशा तुकड्या होत्या. मी अ तुकडीत असल्यामुळे मला मागच्या तुकडीतील मुलाना काय वाटत असावे याची कल्पना नाही. पण बिल्डिंग मधले आमच्या शाळेत असणारी इतर मुले मागच्या तुकडीत असल्याने कधी एकत्र आले नाही आणि पूर्ण शालेय जीवनात आमच्यात ती एक रेष कायम ओढली गेली.
आजच हा मुद्दा डोक्यात आला कारण आज मुलांची शाळा संपली. निकालाचा दिवस होता. नवीन वर्षाची नवीन तुकडी समजली. जी अशा कुठल्या टक्केवारीवर आधारित नव्हती. दरवर्षी मित्र बदलत राहतात. नवे ग्रुप बनतात. ज्यांच्यात सर्व प्रकारची हुशारी मिक्स असते.
नाब्येन्दु डे (देब) नावाचे एक
नाब्येन्दु डे (देब) नावाचे एक कम्युनिस्ट कार्यकर्ते आहेत.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चीन आणि रशिया मधे ठराविक काळानंतर त्यांचे शिक्षक त्या विद्यार्थ्याचा कल कुठे आहे याची चाचणी घेतात. त्यानंतर स्टुडंट्सचे वर्गीकरण होते. खेळाडू, शास्त्रज्ञ, कामगार , इंजिनियर इ. त्याप्रमाणे त्यांचे शिक्षण सुरू होते. त्या स्टुडंट्सना फक्त तेव्हढे आणि त्यासाठी लागणारे इतर शिक्षण (फक्त कामापुरते) दिले जाते. उदा. खेळाडूंना गणित शिकायची गरज नाही पण फिटनेस शी संबंधित जे काही शिकावे लागते ते शिकवले जाईल. त्यांच्या मते ही आदर्श शिक्षण पद्धती आहे.
पण त्या मुलाला पुढे जाऊन वेगळे काही करायची इच्छा झाली, सुरूवातीचा कल बदलला तर ? कदाचित इतर क्षेत्रात रूची निर्माण झाली, किंवा परिस्थिती मुळे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात करीयर करावी लागली तर ? इमर्जन्सी मधे हवं असणारं ज्ञान त्याच्याकडे असावं असं त्याला मागाहून वाटलं.. असे बरेच प्रश्न यात गृहीतच धरलेले नाहीत.