सकाळ झाल्या झाल्या हरिभाऊंनी पोलिसांना कळवलं कि दोन चोर रात्री बंगल्यात गुपचूप शिरून आरडाओरडा करून लोकांना घाबरवण्याचे चाळे करताना पकडले गेलेत. त्यानुसार सकाळीच पोलिसांनी आपल्या गाडीतून रंगा आणि बाळू या दोन्ही चोरांना पकडून नेले. तरीही ते दोघे पकडले गेले आहेत याची गुप्तता बाळगण्याबद्दल रॉबिनने पोलिसांना सूचित केले होते.
रात्री झोप न झाल्याने रॉबिन केशवच्या खोपटातच झोपी गेला. हरिभाऊ मात्र घराकडे निघून गेले होते. दुपारी केशव रॉबिनसाठी जेवण घेऊन खोपटात आला तेव्हा रॉबिन नुकताच उठला होता.
“ गुप्तहेर साहेब तुमच्यासाठी जेवण आणले आहे” केशव हसत म्हणाला.
“ गुप्तहेर म्हणू नकोस, नुसतंच रॉबिन म्हण मित्रा” अंग झटकत तोंड धुण्यासाठी उठत रॉबिन म्हणाला.
रॉबिन हा एक गुप्तहेर आहे हे केशवने कालच ओळखलं होतं. केशव हा शहरात चांगला शिकलेला युवक होता. तिथे असताना महाविद्यालयातील लायब्ररीमधे वर्तमानपत्रात गुंतागुंतीची प्रकरणे सोडवणाऱ्या रॉबिनचा फोटो त्याने एक दोनदा पाहिल्याचं त्याला आठवत होतं, पण रॉबिनला प्रत्यक्ष कधी भेटण्याचा योग आला न्हवता. काल रात्री शेतात हरिभाऊंनी रॉबिनची ओळख मित्राचा मुलगा अशी करून दिलेली असतानाच त्याला शंका आली होती पण अंधारात्त त्याला नीट समजलं न्हवत. रंगा आणि बाळूला खोपटात नेऊन चौकशी करताना केशवला रॉबिनचा चेहरा व्यवस्थित दिसला आणि त्याने बरोबर ओळखलं कि हा गुप्तहेर रॉबिनच आहे. रॉबिनला आणि हरिभाऊंना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं होतं. नंतर केशवला शेंडेंना भेटून रॉबिनने या प्रकरणाचा कसा तपास चालू केला याची माहिती कळली होती.
“ बऱ ठीक आहे, पण मला सांगा आता रंगा आणि बाळू तर पकडले गेले आहेत, पण त्यांना हे कृत्य करायला कोणी सांगितले हे कसे समजणार “ केशवने बेडवर बसत विचारले.
“आपल्याला ते सुद्धा समजेल पण फक्त रंगा आणि बाळू हे दोघेच नाही तर त्या बंगल्यात रात्री केस मोकळे सोडून एक बाई सुद्धा वावरायची” रॉबिन म्हणाला.
“ अरे हो ..काही लोकांना एक दोनदा त्या बाईचं दर्शन झाल्याचं गावातील लोकं सांगत होते” केशव विचार करत म्हणाला.
“ पण मला समजलंय कि ती बाई आपल्याला कुठे मिळू शकेल” रॉबिन पाण्याने तोंड धूत म्हणाला.
“ काय सांगता .. कुठे आहे मग ती” केशवने अजीजीने विचारलं.
“ समजेल लवकरच..आधी मस्त जेवण करून घेतो.. बर मला सांग शेतात रात्रीचे पाणी देत असताना तुला कधी भुताटकीचे अनुभव नाही का आले? म्हणजे तुझं शेत हे बंगल्याच्या मागच्या शेंडेंच्या शेतांच्या मागेच आहे” रॉबिन मांडी घालत जमिनीवर बसत म्हणाला.
“ कधीतरी ऐकू यायचे पण मी जास्त लक्ष दिलं नाही तसंही बंगला माझा शेतापासून लांब असल्याने तिथे जाऊन बघण्याचा योग कधी आला नाही कि इच्छा सुद्धा झाली नाही, तसंही घरच्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं कि तिथे जायचं नाही म्हणून” केशव म्हणाला.
“ तुझा भूताखेतांवर विश्वास आहे का?” रॉबिन म्हणाला.
“ नाही ..मी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. हा पण रात्री शेतात जंगली जनावर उच्छाद घालत असायचे, बऱ्याचदा सकाळी वीज नसायची त्यामुळे रात्री पाणी देण्यासाठी शेतावर जावं लागायचं ते देऊन झालं कि मी काही वेळ शेताची निगराणी करायचो” केशवने माहिती दिली.
“ कमाल करतोस तू .. बंगल्यातून चित्रविचित्र किंकाळ्याचे आवाज येत असताना तू एकदा जरी बंगल्यात जाऊन पाहून आला असतास तर एव्हाना रंगा आणि बाळू पोलीस कोठडीत असते” रॉबिन घास चावत म्हणाला.
“ हो तसं झालं सुद्धा असत, पण माझा लक्षात आला नाही ते कधी आणि शेतात कामं असल्याने असा विचार कधी आलाच नाही, तसंही या भागात रस्त्यावर विजेची सोय नाहीये म्हणून रात्रीचं काहीही दिसत नाही म्हणून कोणी फिरकत देखील नाही” केशव म्हणाला.
केशवने आणलेले जेवण रॉबिनने संपवले आणि हात धुवून जवळच्या रुमालाने पुसत तो बेडवर बसला.
“ काय वाटत तुम्हाला कोण असेल ज्याने रंगा, बाळूला आणि त्या बाईला असं बंगल्यावर तरी जाऊन भुताटकीचा प्रकार करायला सांगितला असेल” केशवच्या चेहऱ्यावर कुतूहल होतं.
“ ती व्यक्ती जी कोणी असेल तिला शेंडे साहेबांच्या बंगल्यात खूप रस आहे एवढ मात्र नक्की. आता ती व्यक्ती लवकरच आपल्याला सापडायला हरकत नाही” रॉबिन दात टोकरत म्हणाला.
“ खरंच तुम्ही खूप छान काम करता, शहरात शिकताना मी तुमच्या गुन्हेगारीच्या सोडवलेल्या प्रकरणांचे किस्से ऐकलेले होते, ते ऐकून खूप भारी वाटायचं. गुप्तहेर होण्याएवढी अक्कल नाहीये मला पण पोलीस दलात सामील व्हायची इच्छा व्हायची.” केशव स्मितहास्य करत म्हणाला.
“ तशी तुझी इच्छा असल तर तू जरूर प्रयत्न करावास, तुला नक्की त्यामध्ये यश येईल असं मला वाटत” रॉबिन केशवला प्रोत्साहन देत त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला.
बंगल्यात रात्रीच्या वेळी चित्र विचित्र आवाज काढणाऱ्या दोन अट्टल चोरांना रॉबिन आणि केशवने मुसक्या बांधून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं पण इतक्यात हि गोष्ट कोणाच्या कानावर जाऊ देऊ नका अशी सूचना रॉबिनने हरिभाऊ, केशव आणि पोलिसांना सुद्धा दिली होती कारण रंगा आणि बाळू यांना हे काम करायला लावणारा माणूस या बातमीने सावध होऊ शकतो असं रॉबिनचं मत होतं.
काही वेळ तिथे केशवसोबत गप्पा मारून रॉबिन तडक पोलीस स्टेशनला जायला निघाला होता. केशवने सुद्धा सोबत येण्याबाबत आग्रह केला होता. रॉबिन इथे आहे तोपर्यंत रॉबिनची सोबत करायची केशवची इच्छा होती, यावर रॉबिनने देखील नकार दिला नाही आणि मग ते दोघे लागलीच पोलीसस्टेशनवर आले.
पोलीस स्टेशनवर इन्स्पेक्टर इनामदार आपल्या टेबलवर समोरची फाईल बघत बसले होते. सकाळीच त्यांनी रंगा आणि बाळूची फाईल काढून त्यामध्ये त्या दोघांनी अजून काही गुन्हे केलेलं आहेत का हे पाहत बसले होते. रंगा आणि बाळू हे फक्त भुरटे चोरच होते, चोऱ्यामाऱ्या, घरफोडी आणि लुटालूट सारखे गुन्हे त्यांनी केलेले होते, त्यासाठी जेलची हवा देखील त्यांनी खाल्लेली होती.
फाईल बघत असतानाच त्यांच्या केबिनमध्ये एका हवालदाराने रॉबिन आल्याची माहिती पुरवली. इ. इनामदारांनी लगेचच रॉबिनला आतमधे सोडण्यास सांगितलं. इनामदारांनी या आधी कधीही रॉबिनसोबत काम केलेलं न्हवत पण रॉबिनच्या तपास केलेल्या बऱ्याच प्रकरणांची त्यांना पोलीसखात्यात असल्याने माहिती होती. शेंडेच्या भूतबंगला प्रकरणात रॉबिनने कशाप्रकारे ओळख लपवून तपास केला याची माहिती त्यांना समजली होती.
“ नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, काय म्हणतायत रंगा आणि बाळू?” केबिनमध्ये प्रवेश करत रॉबिन म्हणाला.
मागोमाग केशव सुद्धा आलेला होता, इ. इनामदारांनी रॉबिनला आणि केशवला बसण्यास सांगितलं.
“ आमच्या दोन हवालदारांनी रंगा आणि बाळूची चांगलीच खातिरदारी केलीय. गावाच्या बाहेर एका पडक्या जागेवर त्यांना कोणीतरी भेटायला बोलावलं होतं कोणीतरी पैसे देऊन हे काम करायला सांगितलं, त्याचा चेहरा कसा आहे हे त्यांना माहिती नाही एवढचं ते सांगतायत. बंगला सोडून ईतर कुठेही ते गेले नाहीत असं ते म्हणतायत” इनामदार म्हणाले.
“ अजून काही लपवत नाहीयेत ना ते इन्स्पेक्टर साहेब” रॉबिनने विचारलं.
“ शक्यच नाही.. अहो आमचे ते दोन हवालदार भल्याभल्या गुन्हेगारांना पोपटासारखं बोलायला भाग पाडतात आणि त्यांच्यापुढे हे भुरटे चोर काहीच नाहीत” इ. इनामदार म्हणाले.
“ ह्म्म्म ... म्हणजे कोणीतरी असं होतं, ज्याला आपली ओळख लपवायची होती. मुख्य म्हणजे शेंडेंच्या गावातील घरात रंगा आणि बाळू गेले नाहीत तर, बर मला सांगा मिस शिलांची चौकशी केलीत का तुम्ही?” रॉबिनने विचारल.
“ त्यांना ठाण्यावर बोलावलंय, येतीलच इतक्यात. पण रंगा आणि बाळूला ज्याप्रकारे तुम्ही सापळा लाऊन पकडलंत खरंच मनापासून कौतुक करावसं वाटतं तुमचं” इ. इनामदार म्हणाले.
“ खरंतर मी काहीच केलं नाही, या केशवने रंगा आणि बाळूला काठीचा चांगला प्रसाद देऊन आसमान दाखवलं होतं. त्याला या कामाचं सरकारकडून बक्षीस नक्कीच मिळायला हवं” केशवकडे पाहत रॉबिन कौतुकाने म्हणाला.
“ हो हो ..का नाही.. अशा तरुण आणि तडफदार युवकांचीच समाजाला गरज आहे. यांचा सरकारतर्फे उचित सन्मान केला जाईल” स्मितहास्य करत इनामदार बोलले.
“ बर.. बंगल्यावर जाऊन रात्री लोकांना घाबरवण्यात फक्त रंगा आणि बाळूचाच हात न्हवता, तिथे एक बाई पण याच कामासाठी यायची, केस मोकळे सोडून अंगावर कापड पांघरून बंगल्याच्या खिडकीत उभं राहून लोकांना घाबरवायची. रंगा आणि बाळूला याबाबत कल्पना नसणार कारण तिला कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तीने हि कामगिरी सोपविली होती” रॉबिन म्हणाला.
“ ओह्ह म्हणजे तुमचं म्हणण असं आहे कि रंगा आणि बाळूला कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तीने तिथे बंगल्यावर पाठवलं होतं आणी त्या बाईला कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीने.” आश्चर्याने इ. इनामदार म्हणाले.
“ हो असंच म्हणावं लागेल.. तुमचं तपासाचं तुम्हाला एके ठिकाणी पाठवावा लागेल तिथे तुम्हाला ती बाई सापडेल” रॉबिन म्हणाला.
“ काय सांगता कुठे..” इनामदार आश्चर्याने म्हणाले.
“ शेजारच्या गावात एक तमाशाचा फड आला आहे, त्या फडात काम करणाऱ्या कोणत्यातरी बाईने बंगल्यावर रात्री येऊन भुतासारख फिरून लोकांना घाबरवलं आहे” रॉबिन म्हणाला.
“ हे कशावरून म्हणता तुम्ही” इनामदार म्हणाले.
“ मी बंगल्यात तपासणीसाठी गेलेलो असताना मला एका खोलीत कापडाच बोचकं आढळलं त्यात बरीच मोठी कापडं होती, सोनेरी कडा असलेले, रेशमी वस्त्र तंबू ठोकण्यासाठी लागतात त्या कापडात ती गुंडाळलेली होती आणि त्यांना एक मंद सुवासाचा स्प्रे मारल्यासारखा गंध येत होता. अशा प्रकारची कापडे हि फक्त सर्कसमधे काम करणारी माणसे किंवा तमाशातील लोकं यांना लागतात. मला गावात चौकशी करत असतानाच तमाशाच्या फडाबद्दल समजलं होतं. म्हणून मला राहून राहून असं वाटत होता कि कोणीतरी तमाशाच्या फडात काम करणारी व्यक्ती या बंगल्यात ये जा करते.” रॉबिन म्हणाला.
रॉबिन बोलत असतानाच बाहेरून एक हवालदार केबिनमध्ये आला आणि त्याने मिस शिला पोलीस स्टेशनमधे आल्याची बातमी इ. इनामदार यांना दिली.
स्टेशनमध्ये चौकशीच्या करण्याच्या खोलीत मिस शीला बसलेली होती. पोलिसांनी बोलावलं हे समजल्यावर ती मनातून चांगलीच हादरलेली होती पण चेहऱ्यावर तसं दाखवत न्हवती. चौकशी खोलीत इ. इनामदार, एक महिला पोलीस आणि रॉबिन आत आले. रॉबिनला पाहतच मिस शिलांना आठवलं कि या माणसाला आपण कुठेतरी पाहिलं आहे. काही क्षणातच मिस शिलांना आठवलं कि शेंडेसाहेबांच्या घरात रॉबिनला आपण पाहिलं होतं. बापरे म्हणजे हा माणूस पोलीस होता तर. म्हणजे शेंडेनी आपली तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली आहे का ? असं वाटून मिस शिलांना चांगलाच घाम फुटला. इनामदार साहेबांनी मिस शिलांची जुजबी चौकशी केली, मिस शीलाने मला इथे का बोलावण्यात आलं आहे असं विचारल्यानंतर नंतर रॉबिनने चौकशीची धुरा हातात घेतली.
“ मिस शीला शेंडेंच्या बंगल्यात तुम्हाला जास्तच रस आहे.. असं का ? रॉबिनने मिस शिलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत विचारलं.
“ मी ..मी एक प्रॉपर्टी एजन्ट आहे. मी स्वस्तात मिळणाऱ्या प्रॉपर्टी विकत घेत असते, त्यात शेंडेंच्या बंगल्यात भूतांचा वावर असल्याचं समजलं आणि मग मी त्या बंगल्यात रस घेऊ लागले.” चेहऱ्यावर भीती न दाखवता शीला म्हणाली.
“ भूत असलेली प्रॉपर्टी विकत घेता म्हणजे धाडसी आहात तुम्ही आणि अशी प्रॉपर्टी तुमच्याकडून घेणार कोण? रॉबिनने प्रश्न केला.
“ शहरात अनेक लोक असतात त्यांना अशा भाकडकथांमध्ये रस नसतो, ती लोकं अशा मालमत्ता विकत घेऊन त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी उभारतात.” शीलाने उत्तर दिलं.
“ तुमचा विश्वास आहे का भूतांवर?” रॉबिन नजर रोखत म्हणाला.
या प्रश्नावर शीला काहीच बोलली नाही. तिला आता जरा भीती वाटू लागली होती. रॉबिन पुढे म्हणाला.
“ पोलिसांना अशी माहिती मिळाली आहे कि भुतांच्या नावाखाली त्या बंगल्यावर रात्री एक महिला केस मोकळे सोडून साडी पसरून, अंगावर कापड गुंडाळून फिरत असते आणी तसं करायला तिला कोणत्या तरी व्यक्तीने सांगितलं आहे आणि तुमचा सुद्धा त्या बंगल्यात रस आहे म्हटल्यावर तुम्हाला बोलावून जरा चौकशी करावीशी वाटली” रॉबिन गंभीर आवाजात म्हणाला.
“ पण इथे माझा काय संबंध आहे.. तुम्हाला माझावर संशय आहे का? कोणत्या पुराव्यावरून तुम्ही असं बोलताय “ उसनं अवसान आणून शीला बोलत होती पण रॉबिनला कळून चुकलं होती कि मिस शीला पुरती घाबरली आहे. तिला अजून घाबरवून तिच्याकडून सत्य वदवून घेण्यासाठी रॉबिन पुढे म्हणाला
“ ती बाई बंगल्यावर केस मोकळे सोडून फिरत असताना पकडली गेलीय आणि तिने पोलिसांना सांगितलंय कि कोणी तिला असं करायला कोणी सांगितलं होत, तुम्हाला या प्रकरणाबाबत काही माहिती असल्यास आत्ताच इथे सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू कारण उद्या जर काही वेगळी माहिती हातात आली तर बंगल्यावर भुतांच्या नावाखाली लोकांना त्रास दिल्याबद्दल त्या बाईला आणि तिला तसं करायला सांगणाऱ्या व्यक्तीला दीर्घकाळ तुरुंगाची हवा खाऊ लागू शकते, वर बदनामी होईल ती वेगळीच” रॉबिनने स्पष्ट शब्दात सांगितलं.
रॉबिनच्या वाक्याने मिस शीला चांगलीच घाबरली आणि ओळखलं कि आता आपली काही धडगत नाही. तिने तत्काळ कबुली दिली कि शेंडेच्या बंगल्यात चित्रविचित्र आवाज काढण्याचे आणि ओरडण्याचे आवाज रात्री अपरात्री यायचे अशी अफवा पसरली होती, तेव्हा या अफवेचा फायदा घेऊन तिने एका बाईला पैसे देऊन रात्रीचं बंगल्यावर रात्री केस मोकळे सोडून खिडकीच्या भागात उभं राहायला सांगितलं होतं. जेणे करून रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांना ती बाई दिसावी आणि बंगल्यात भूत आहे हि अफवा अजूनच मजबूत व्हावी. स्वस्तात प्रॉपर्टी मिळवण्याच्या उद्देशाने तिने तसं केलं होतं. मला शिक्षा देऊ नका मी बाकी काही केलं नाहीये अशी गयावया तिने केली.
“ बंगल्यात रात्रीच्या वेळी अजून दोन लोकंसुद्धा येत असायचे रात्रीच्या अंधारात किंकाळ्या मारत फिरायचे, त्यांना सुद्धा तुम्हीच असं करायला सांगितलं होतं का?” इनामदार कडक आवाजात म्हणाले.
“ न नाही नाही... मला इतर कोणाबद्दल काही माहिती नाहीये, शेंडेच्या बंगल्यात आधीच तसे आवाज यायचे याचा फक्त मी फायदा उचलला एवढचं आहे. उलट मी ज्या बाईला पैसे देऊन रात्रीचं तिथे उभं राहायला सांगायचे तिलासुद्धा असं जाणवलं होतं कि बंगल्यात तिच्याशिवाय दुसरं कोणीतरी येतंय. रात्री तिथे फिरताना जागोजागी खड्डे पडलेले दिसायचे. तिने मला तसं सांगितलं देखील आणि खरंच इथे भूतांचा वावर आहे का असं वाटून घाबरून तिने नंतर हे काम करायला नकार दिला”
“ म्हणूनच काल संध्याकाळी तिथे जाऊन बंगल्याबाहेर उभं राहून प्रत्यक्ष जाऊन भुते आहेत कि नाही हे पाहून आलात का”. काल रात्री बंगल्यावर पाळत ठेवताना रॉबिनला मिस शीला बंगल्याकडे पाहत उभी असलेली दिसली त्यावरून रॉबिनने तर्क लावत विचारलं
“ अ..हो ..” असं बोलून शीला गप्प बसली.
आपण काल संध्याकाळी तिथे गेल्याचं पोलिसांना माहित असल्यानं आता काही लपवण्यात अर्थ नाही असं वाटून शीलाने सगळं खरं सांगितलं कि बंगल्यात भूतें असल्याच्या अफवेचा फायदा घेऊन तमाशात हलकी सलकी काम करणाऱ्या एका बाईला पकडून पैशाचं आमिष दाखवून बंगल्यात फिरायला सांगितलं. म्हणून मग रॉबिन आणि इनामदारांनी मिस शिलाला अजून काही विचारलं नाही.
चौकशीच्या करण्याच्या खोलीमधून आता रॉबिन आणि इ. इनामदार बाहेर आले.
“ तुमचा तर्क बरोबर ठरला रॉबिन, तमाशात काम करणाऱ्या बाईनेच रात्री खिडकीत उभं राहून लोकांना घाबरवलं आहे तेही मिस शीला यांच्या सांगण्यावरून. पण एक लक्षात येत नाहीये ज्या कोणी व्यक्तीने रंगा आणि बाळू यांना बंगल्यावर रात्री अपरात्री किंकाळ्या मारायला पाठवले असावे तो कोण असावा, त्या बंगल्यात अजून कोणाचा रस असावा. कि अजून कोणीतरी प्रॉपर्टी एजन्ट यामधे सामील आहे?” इनामदार न समजून बोलले.
“ नाही.. ती व्यक्ती कोणी प्रॉपर्टी एजन्ट नाहीये, मात्र बंगला विकत घेण्यात त्या व्यक्तीचा रस नाहीये. उलट कोणीही हा बंगला विकत घेऊ नये किंवा तिथे राहायला येऊ नये म्हणून त्या व्यक्तीने हा प्लॅन रचला आहे. रंगा आणि बाळूसारख्या बदमाष लोकांशी बोलून त्यांना पैसे देऊन हे काम करण्या इतपत ती व्यक्ती मुरलेली आहे. रंगा आणी बाळू यांनी त्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार बंगल्यात राहून भूतांची कामगिरी चोख बजावली ” रॉबिनने माहिती पुरवली.
“ बर मग आता ती व्यक्ती कोण आहे, ती कशी सापडणार आपल्याला” इनामदार विचार करत म्हणाले.
“ ती व्यक्ती स्वतःहून चालत आपल्या जाळ्यात येणार आहे इनामदार साहेब, आपल्याला फक्त जाळ फेकून शांत बसायचं आहे” रॉबिन हलकंस हसत म्हणाला.
इनामदारांनी लगेचच एक पोलीस पथक पाठवून तमाशाच्या फडात काम करणाऱ्या त्या बाईला पकडून आणायला सांगितलं. रॉबिन तोपर्यंत पोलीस स्टेशनमधेच थांबून राहिला आणि त्याने केशवला गावात जायला सांगितलं. गावात जाऊन सगळीकडे भूतबंगल्यावर धुमाकूळ घालत असलेली भुते पकडली गेलीत अर्थात चोर पकडले गेलेत अशी बातमी सगळीकडे पसरवायला सांगितली. याकामात हरिभाऊंची मदत घेण्यास देखील सांगितले.
तोपर्यंत पोलीसस्टेशनमध्ये बसून रॉबिन शहराच्या आसपासच्या सगळ्या गुन्हेगारी प्रकरणांचे रेकॉर्ड चाळत बसला. त्यात त्याचा निम्मा दिवस गेला. इनामदारांच्या पथकाने तमाशातील बाईला पकडून आणले होते, रॉबिनने तिची चांगलीच चौकशी केली, आधीच घाबरलेल्या तिने आपली चूक मान्य केली. रॉबिनने तिला अन्य कोणाला तिने बंगल्यात रात्री अपरात्री फिरताना पहिले का हे विचारलं, त्यावर तिने सांगितलं कि ती फक्त संध्याकाळी तासभर तिथे थांबायची ते सुद्धा लोकं रस्त्यावर दिसल्यावर त्यांना घाबरवण्यासाठीच. नंतर जास्त अंधार पडल्यावर ती तिथून मागच्या बाजूने निघून जायची. पण तेवढा वेळ बंगल्यात असताना तिला जाणवायचं कि ती सोडून इतर कोणीतरी सुद्धा इथे वावरत असतं. कारण भिंतींवर चरे पडलेले दिसायचे, काही खोल्यांमध्ये आणि मधल्या जाण्यायेण्याच्या भागात खड्डे पडलेले दिसायचे.
रॉबिनने तिचं सगळं म्हणण ऐकून घेतलं आणि एवढ ऐकूनच तिला जास्त काही प्रश्न विचारले नाहीत आणि परत आपल्या गुन्हेगारी रेकोर्डच्या फायली चाळत बसला.
संध्याकाळी केशव आणि हरिभाऊ पोलीस स्टेशनवर आले. तेव्हा रॉबिन एका टेबलाच्या जवळ बसून कोऱ्या कागदावर काहीतरी लिहित बसलेला दिसला.
“ रॉबिन तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या आसपासच्या गावात सांगितलं, आपल्या गावात सुद्धा हि बातमी पसरली आहे, कि बंगल्यावर भुतांच्या नावाने गोंधळ घालणाऱ्या चोरांना पोलिसांनी पकडले आहे” केशव उत्साहात म्हणाला.
“ हो.. शेंडे साहेब तर अगदीच खुश झालेत. म्हणाले कि रॉबिनमुळे आपल्या मागची पीडा गेली” हरिभाऊ बोलले. त्याचं बोलणं चालू असतानाच इ. इनामदार तिथे आले आणी टेबलजवळ बसलेल्या रॉबिनला म्हणाले.
“ बऱ रॉबिन आता पुढे काय”
“ बंगल्यातील चोरांना पकडल्याच्या बातम्या गावात वाऱ्यासारख्या पसरल्या असतील, त्यामुळे ज्याने कोणी रंगा आणि बाळूला हे काम दिलं असेल तो माणूस नक्कीच आज रात्री बंगल्यात येणार आहे” रॉबिन खुर्चीवरून उठत म्हणाला.
“ काय..बंगल्यात तो माणूस येणार आहे. पण तो का आणि कशाकरिता येईल” इनामदार गोंधळून म्हणाले.
“ कारण ज्या कामासाठी त्याने रंगा आणि बाळूला ठेवले होते ते करायला आता तिथे कोणीही नाहीये आणि बंगला सुद्धा भयमुक्त झालाय, त्यामुळे उद्यापासून गावातील लोकसुद्धा त्या बंगल्याच्या आसपास यायला घाबरणार नाहीत. कदाचित शेंडे सुद्धा आपलं बंगल्याचं उर्वरित काम तिथे सुरु करतील. म्हणून ज्या कोणाचा त्या बंगल्यात रस आहे किंवा ज्याला असं वाटतं होतं कि कोणीही बंगल्याच्या आसपास फिरकू नये तो व्यक्ती गडबडीने बंगल्यात येईल. “ रॉबिन म्हणाला.
“ पण मला अजूनही समजत नाहीये कि बंगल्यात त्या व्यक्तीचा एवढा रस का आहे, काय हवय नक्की त्या व्यक्तीला “ इनामदार म्हणाले.
“ ते आपल्याला आज रात्रीचं कळणार आहे, कारण आज रात्री आपण सगळे त्या व्यक्तीची वाट पाहत बंगल्यात दबा धरून बसणार आहोत, आणि ती व्यक्ती आली कि लगेच तिला तिथे जेरबंद करूयात, मग ती व्यक्तीचं काय ते उत्तर देईल आपल्या प्रश्नांची” हसत रॉबिन म्हणाला.
“ पण नक्की ती व्यक्ती येईल का “ हरिभाऊ साशंकतेने बोलले
“ नक्की येणार ..कारण आज नाही तर पुन्हा कधीच अशी संधी त्या व्यक्तीला मिळणार नाहीये. म्हणूनच आज आपण सगळे बंगल्याच्या आसपास दबा धरून बसणार आहोत, आज आपल्या हातातून ती व्यक्ती निसटणार नाहीच” रॉबिन म्हणाला.
रॉबिनच्या उद्गारासरशी इ. इनामदार, केशव आणि हरिभाऊ उत्साहाने तिथून बाहेर पडले.
क्रमशः
ओह , अंदाज लावते आहे कोण असेल
ओह , अंदाज लावते आहे कोण असेल ती व्यक्ती याचा . आता बघूया बरोबर येतो आहे का ते ?
छान चालू आहे कथा...
छान चालू आहे कथा...