जीवनमूल्यांची मुक्तस्रोत संहिता

Submitted by तुष्कीनागपुरी on 11 March, 2025 - 01:01

स्वतःला उपयोगी पडेल असे काही निर्माण केलेले किंवा शोधून काढलेले, पद्धती तयार केलेले आणि त्याचा उपयोग होतो आहे हे अनुभवास आलेले असले की त्या निर्मिती च्या बाबतीत दोन विचार करता येतात. पहिला असा की अश्या निर्मितीला बौद्धिक संपदा म्हणून पेटंट मिळवता येऊ शकतात ज्यानंतर त्या संपदेचा कुणी वापर केला तरी तुम्हाला त्याचा मोबदला मिळत रहावा. दुसरे असे की ती निर्मिती जगाला तशीच मुक्तपणे उपलब्ध करून देता येऊ शकते, जे जनहिताचे एक धोरण म्हटता येईल, आणि सॉफ्टवेयर क्षेत्रात असे जेव्हा सुरू झाले त्याला मुक्तस्रोत निर्मिती म्हटले जाऊ लागले.
.
मुक्तस्रोत निर्मिती आणि सॉफ्टवेयर मधल्या मुक्तस्रोत संकल्पनेच्या इतिहासावर अधिक चर्चा मी , मुक्तस्रोत एक भन्नाट संकल्पना[१] इथे केलेली आहे तिथे वाचता येईल.
.
जगतांना जेव्हा मला काही विचार जीवनमूल्यांसारखा जपावासा वाटतो तेव्हा मला वाटते की तो मी लिहून ठेवावा आणि त्याबद्दल येणारे अनुभव लिहून ठेवावेत आणि ते मुक्तपणे सर्वांना वाचायला अनुकरण करायला उपलब्ध करावेत. असे केले तर त्याला जीवनमूल्यांची मुक्तस्रोत संहिता म्हणता येईल हे सुचल्यावर एक सुंदर कल्पना सुचली असे वाटले.
.
एक संहिता, एक यादी ज्यात मला पटलेल्या काही जीवनमूल्यांचा समावेश मी करेन. मुक्तस्रोत असल्याने कुणी ते वाचून त्यात काही अनावश्यक भाग दाखवू शकेल, कुणी त्यात अंशिक बदल केले तर वेगळे काही मिळते ते दाखवू शकेल, आणि कुणी त्यांना उपयोगी पडलेली काही आणिक मूल्ये त्यात सुचवू शकेल, असे सहकारी तत्वावर ही संहिता विकसित होईल असे वाटते.
.
मुक्तस्रोत संकल्पनेचे जे उपयोग तांत्रिक जगाला झालेत ते जीवनविषयक तत्वज्ञानाच्या चर्चेसाठी आणि बांधणीसाठी पण झाले तर करू पाहायला हवे.
.
सुरवातीला मी या यादीला मूल्यांची यादी असे म्हणतोय त्याचे कारण म्हणजे चर्चेच्या अनुषंगात ती बदलू शकतात त्यांचे विकसित शब्दरूप चर्चेने पुढे येऊ शकते आणि तत्व ही संकल्पना न बदलणारी असते असे एका चर्चेत मला मित्रांनी सुचवले, त्यामुळे या यादीला तत्वांची यादी किंवा संहिता न म्हणता सध्या मी मूल्यांची संहिता म्हणतोय.
.
प्रत्येकाच्या जन्माला आलेल्या पंथात, समुदायात आणि संस्कृतीमध्ये अशी जीवनमूल्ये असतातच, त्यांच्या कथा, संकल्पना फक्त ऐतिहासिक संदर्भ घेऊन असतात, कदाचित मी हे करतांना त्याच सगळ्या जुन्या संकल्पना पुन्हा लिहितो आहे असे होईल, पण किमान माझे संदर्भ नवे किंवा समकालीन असतील असा तो फरक असेल.
.
हा एक प्रयोग आहे आणि आपण वैज्ञानिक प्रयोगशाळा गटात [२] आहोत असे मी समजतो, त्यामुळे असा प्रयोग जाहिर रित्या झाला तर मला त्यातून बरेच शिकायला मिळेल अशी माझी आशा आहे.
.
#सुरपाखरू #प्रयोग२०२५ #मुक्तस्रोत #संहिता #जीवनमूल्ये
.
(मुक्तवैज्ञानिक)
तुषार जोशी
नागपूर, शुक्रवार ७ मार्च २०२५
.

.

Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही खरच खूप छान लिहीत आहात , खर तर मला यातले काही समजत नाही . पण जे ह्या क्षेत्रात आहेत त्यानं याचा नक्कीच फायदा होईल