मुक्तस्रोत ही सहकारी तत्वावर चालणारी एक उपयुक्त प्रणाली आहे.
.
या आधीचा भाग१ – https://www.maayboli.com/node/86463
या आधीचा भाग२ - https://www.maayboli.com/node/86464
.
२००८ मधे नेटबिन्स नावाचे एडीटर आम्ही जावा या संकणकीय भाषेमधे सॉफ्टवेयर संहिता लिहायला वापरायचो. जसे वर्ड वापरून आपण साहित्यातले लेख लिखाण करू शकतो त्याच्या फाईल तयार होतात. ती पण एक संहिताच असते. जसे नाटकासाठी लिहिलेले संवाद जर फील मधे असले तर ती नाटकाची संहिता म्हटले जाते. ती संहिता वाचून कुणिही ते नाटक वठवू शकते. तसेच जावा या संकणकीय भाषेत लिहिलेले फाईल एकत्रित पणे आपण संहिता म्हणू शकतो. त्या संहितेमधून सॉफ्टवेयर निर्माण करता येते.
.
जावा भाषेत ज्या फाईल लिहायच्या त्या लिहायला वर्ड सारखेच एक एडीटर सॉफ्टवेयर लागते, त्याला आयडीई म्हणतात, म्हणजे इंटिग्रेटेड डेवलपमेंट इन्व्हायरनमेन्ट, थोडक्यात संहिता संपादन करण्यास लागणाऱ्या अनेक साधनांची एकत्रित केलेली यंत्रणा तिचे सॉफ्टवेयर, संहिता संपादन प्रणाली. वर्ड डाऊनलोड करून साहित्य लिहिता येते. नेटबिन्स डाऊनलोड करून जावा मधे संहिता लिहिता येतात.
.
संहिता संपादन प्रणाली अनेक असतात. जसे वर्ड वापरून पण लिहिता येते आणि गुगल डॉक च्या साईट वर पण लिहिता येते, या झाल्या साहित्य लिहिण्याच्या संपादक प्रणाल्या. वर्ड, गुगल डॉक, एपल पेजेस, लिब्रे ऑफिस चे डॉक्युमेंट, नोटपॅट, टेक्स्टपॅट हे सगळे साहित्य लिहिण्यास कामी येतील असे सॉफ्टवेयर यांना आपण टेक्स्ट एडिटर म्हणतो. साहित्य संपादन प्रणाली.
.
तसेच जावा भाषेत लिहिण्यासाठी देखील अनेक संहिता संपादन प्रणाली मिळतात, जसे इक्लिप्स, इंटेलिजे आयडिया, विज्यूअल सोर्स कोड, नेटबीन्स वगैरे यातून कोणतीही वापरून संहिता लिहिता येते. (त्यातही अमुकच एडीटर चांगला आणि त्याचे भक्त समुदाय असतात ती कहाणी नमतर कधीतरी)
.
मी जावा भाषा शिकवायचो आणि जावा मधे संहिता लिहायला निटबिन्स हे संपादक वापरायचो. सन मायक्रोसिस्टिम्स या कंपनीने नेटबिन्स तयार करणाऱ्या चमूला हस्तगत केले आणि नंतर ती नेटबिन्स संहिताच मुक्तस्रोत जाहिर केली. असे करणे या व्यवसायिक कंपन्या करू लागल्या त्यालाही अनेक कारणे आहेत. असे समहिता मुक्त केल्याने अनेक कंपनीबाहेरचे लोक देखील तिला वापरून पाहू शकतात, त्यात सुधारणा करू शकतात आणि ती संहिता अद्ययावत ठेवायला मदत होते आणि कंपनीला स्वतःचे पदरचे पैसे टाकून निर्माते नोकरीवर ठेवावे लागत नाहीत हा पण एक फायदा.
.
संहिता म,क्त केल्याने विश्वास संपादन होतो. कारण आता त्या संहितेत छुपे असे काही नाही हे जाहिर असते, आणि त्यामुळे तौ संहिता वापरणे याचा निर्णय घेणे अनेकांना सोपे होते.
.
एक संहिता संपादन प्रणाली तयार करणे जसे नेटबीन्स हे मोठे काम आहे. नव्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याला तशी संहिता तयार करायला शिकणे हे वेळ आणि अभ्यासानेच शक्य होते. नेटबिन्स ची संहिताच मुक्तपणे मिळाल्याने ती मला शिकता येणे सोपे होते आणि मी ती संहिता वाचून अनेक अश्या गोष्टी शिकलो ज्या त्या संहितेविना शिकणे सोपे नव्हते.
.
त्या संहितेच्या अभ्यासाने मी माझा नेटबिन्स वर नवा ब्लाग सुरू केला. नेटबिन्समधे अमुक कसे करायचे, तमुक कसे करायचे असे नव्या संहिता लेखकांना कामी येईल असे लेख मी त्या ब्लाग वर लिहू लागलो. ते लेख लिहितांना मला ती संहिता मुक्तस्रोत असणे याचा प्रचंड फायदा झाला.
.
जेव्हा अशी मुक्तस्रोत संहिता लिहिल्या जाते तेव्हा त्यावर काम करणाऱ्यांची एक खास पद्धती तयार झालेली आहे. जगभरातले असंख्य निर्माते त्या मुक्त संहितेला वाररून पाहत असतात, त्यावर सल्ले देता यावे आणि काय बदलले काय चुकतेय या माहितीच्या देवाण घेणाणी साठी आंतरजालावर उपलब्ध असलेले एक साधन ज्याला इमेल म्हणतात त्याचा उपयोग केला जातो.
.
इमेल खाते म्हणजे डिजिटल जगातले (याला आभासी म्हणणे मला आवदत नाही, कारण ते आभासात नव्हे तर प्रत्यक्षात अस्तित्वात आहे, आपल्याला दिस नसले तरीही त्याचे अस्तित्व कुठेतरी आहे आणि त्याचा आपल्याला वापर करता यतो त्यामुळे ते आभासी नाही, त्याला काही पर्यायी शब्द सुचतोय का यावर विचार करतोय). इमेल खाते हे आपले एक पोस्टबॉक्स नंबर असल्यासारखे आहे. आपल्याला एक यूनिक नाव मिळते आणि त्या इमेल नावाने आपल्याला कुणीही इमेल संदेश पाठवू शकते. या तत्थ्या चा वापर करून मुक्तस्रोत निर्मात्यांनी एक नवी कल्पना तयारे केली. जरका दहा लोकांच्या एका गटाला एकच संदेश मिळवायचा असेल तर ते कसे करता येईल याची शक्कल काढली. एक असा इमेल पत्ता ज्याला कुणी संदेश पाथवला तर त्या पत्यावर जितके लोक सांगून गेलेत त्या सगळ्यांना तो संदेश पाठवण्यात येईल अशी व्यवस्था.
.
हे म्हणजे सध्या जसे आपण व्हॉटसॅप गटात अनेक लोकांना जोडतो, आणि सगळ्यांचे संदेश एकाच चौकोनात आपल्याला एका खाली एक दिसतात, जशी गटचर्चा सुरू असावी तसेच पण इमेल च्या माध्यमातून. मुक्तस्रोत संहिता निर्माते असे इमेल गट तयार करतात.
.
तुम्हाला जर नेतबिन्स कसे वापरायचे याबाबतित काही शंका असतील तर नेटबिन्स-युजर्स नावाचा इमेल गट असतो, निटबीन्स च्या नवीन बदलांबाबत तुम्हाला संदेश मिळवत राहायचे असतील तर नेटबिन्स-अनाऊंस नावाचा गट असतो. हे इमेल गट सांभाळणाऱ्या प्रणालीला मेलिंग लिस्ट असे म्हटले जाते. आपल्याला त्या मेलिंग लिस्ट ला एक इमेल पाठवायची असते की मला या इमेल गटावर येणाऱ्या सर्व संदेशांना वाचायचे आहे, जर कुणी या इमेल गटाला इमेल पाठवला तर मला माझ्या इमेल खात्यावर त्याची एक प्रत पाठवा. अशी विनंती करण्याला सबस्क्राईब करणे असे म्हणतात. म्हणजे त्या इमेल गटाचे सभासद होणे.
.
मी नेटबिन्स-युजर्स आनि नेटबिन्स-अनाऊंस या इमेल गटाचा सभासद झालो आणि इथल्या चर्चा वाचू लागलो. फक्त इथल्या इमेल वर होणाऱ्या चर्चा वाचणे हे देखिल माझ्यासाठी शिक्षण होते. नेटबिन्स वापरताना अमुक एक गोष्ट करायला येणारी अडचण या इमेल गटावर विचारता यायची आणि कुणी काही साधे प्रश्न विचारले तर त्यांची उत्तरे पण देता यायची. या इमेल गटाचा शिष्टाचार असा असतो की जे अनुभवी निर्माते आहेत त्यांना साध्या प्रश्नांना उत्तरे देण्याची वेळ येऊ नये म्हणून आमच्यासारखे जरा अधिक शिकलेले विद्यार्थी ती जवाबदारी घेऊ शकतात. मी येणाऱ्या सोप्या प्रश्नांना उत्तरे देऊ लागलो.
.
असे कोण कोण सध्या उत्तरे देते आहे ते या जाहिर इमेल गटात सगळ्यांना दिसत असते. यातूनच सध्या कोण कोण नेटबिन्स च्या कम्युनिटी मधे सक्रिय आहे आणि कोण योगदान देते आहे ते जग जाहिर होत असते. आपले योगदान अश्या वेगवेगळ्या आणि साध्याकृत्यातूनही करता येणे हे मुक्तस्रोत संकल्पनेचे सौंदर्य आहे.
.
या योगदानातूनच निटबीन्स संहितेच्या उभारणीत कोणाचा हातभार किती यावर एक अनुक्रम करता येतो आणि वरच्या बाजूला सर्वाधिक योगदान देणारे आणि खाली खाली त्याहून थोडे कमी योगदान देणारे अशी गुणवत्ता क्रम लावता येतो. मुक्तस्रोत निर्मात्यांमध्ये अशी गुणवत्ता मिळवणे अभिमानाचे मानले जाते आणि अशी गुणवत्ता अचानक आणि विकत घेता येत नाही. लहान लहान योगदान सातत्याने करत राहिल्याने जी गिणवत्ता तयार झालेली असते ती कमाई असते, तिचे कोणी कृत्रिम अवडंबर करू शकत नाही त्यामुळे तिला एक प्रतिष्ठा असते.
.
मी नेटबिन्स या संहितेच्या मार्फत एका खास प्रतिष्ठीत गटात शामिल झालो ते अपाचे कमिटर झाल्याचे कळले तेव्हा. हा मान विकत घेता येत नाही, तर अनेक वर्षात केलेल्या छोट्याछोट्या योगदानाने मिळालेले ते पद आहे.
.
असे कोणत्याही मुक्तस्रोत संहितेच्या प्रकल्पात कुणालाही सहभागी होता येते. असे करता येते हे माहित नसल्याने अनेक विद्यार्थी या ज्ञानापासून वंचित राहतात. ही गोष्य़ आपल्या भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचायला हवी. मी शिक्षणाने स्थापत्य अभियांत्रिकी शिकलेला व्यक्ती मुक्तस्रोत प्रकल्पांमधे सहभागी होऊन बरेच काही शिकलो आणि त्यामुळे मी अमेरिका आणि हांगकांग सफरी पण पदरचा फेकाही खर्च न करता केल्या. हे ज्ञान मुक्त आहे उपलब्ध आहे. सध्या ची स्थिती अशी आहे की तरूणाईकडे मोफत आंतरजालाची सोय आहे पण तिच्यात दडलेले हिरे पाचू यांची माहिती नसल्याने ते फक्त फेसबुक, व्हाटसॅप आणि खेल यांच्यातच वेळ देतात आणि या ज्ञानाला मुकताहेत.
.
याला मी नळ सुरू आहे आणि बादली लावायला विसरून गेलो आहोत असे म्हणत असतो. कितीतरी पाणी या नळातून वाहून चालले आहे. अनेक जण बादली लावायला विसरून गेलेले आहेत. माझ्या या लेखामधून काही लोकांना हे लक्षात आहे आणि त्यांनी बादल्या लावल्या तर हे वाहून जाणारे ज्ञान त्यांच्या कामी येईल याची खात्री आहे.
.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२५
.
(नेटाने पाणी भरणारा)
तुषार जोशी
नागपूर, सोमवार २० जानेवारी २०२५
.
मुक्तस्रोत – एक भन्नाट कल्याणकारी संकल्पना – ३
Submitted by तुष्कीनागपुरी on 11 March, 2025 - 00:25
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान झाली आहे हि लेखमाला.
छान झाली आहे हि लेखमाला. साध्या व सोप्या भाषेतून संकल्पना समजावून सांगितली आहे. मुक्तस्रोतसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे कौतुक व आदर वाटतो.