मुक्तस्रोत – एक भन्नाट कल्याणकारी संकल्पना – 2

Submitted by तुष्कीनागपुरी on 11 March, 2025 - 00:19

या आधीचा भाग – https://www.maayboli.com/node/86463
.
मागच्या लेखात मी उल्लेख केला होता १९८० च्या दशकात झालेल्या महत्वाच्या घडामोडीचा आणि नंतर १९९० च्या दशकात आलेल्या मोफत संचालन प्रणालीचा. त्याचे कालानुसार सारांश बघुया.
.
१९८३ – रिचर्ड स्टॉलमॅन यांनी जिएनयू प्रकल्प सुरू केला
१९८५ – फ्री सॉफ्टवेयर फाऊंडेशन तयार केले आणि जिएनयू जिपिएल हा करार शब्दबद्ध केला
१९९१ – लिनस टॉरवाल्ड यांनी लिनक्स कर्नल लिहिले आणि कालांतराने त्याला मोफत उपलब्ध करून दिले
.
मोफत या शब्दामुळे गोंधळ होत होता कारण मोफत म्हणजे विनाशुल्क इतकेच त्या शब्दातून कळत होते, या चळवळीतून विनाशुल्क या संकल्पनेपेक्षाही अधिक बदल करण्याचे स्वातंत्र्य, उपयोग करण्याचे स्वातंत्र्य, असे अनेक घटक पुढे येत नव्हते त्यामुळे विचारांती मुक्त स्रोत हा शब्द उपयोगात आणायचे विकल्प समोर आले आणि तेव्हाच्या सॉफ्टवेयर लिहिणाऱ्यांनी त्याला अनुमोदन देऊन मुक्तस्रोत हा शब्द मान्य केला आणि तेव्हापासून ‘मुक्तस्रोत’ सॉफ्टवेयर ही संकल्पना उदयास आली.
.
ओपन सोर्स इनिशियेटिव्ह – या नावाने संस्था तयार झाली आणि तेव्हापासून या चळवळीला बळ आले.
.
सॉफ्टवेयर प्रोग्राम तयार करायला त्याची संहिता लिहावी लागते जी प्रोग्रामर लोक हाय लेवल लॅंगवेज मधे लिहितात. त्याला सोर्स कोड असे म्हणतात, ती संहिता कुणाला मिळाली तर त्या सॉफ्टवेयर ला तयार करता येते आणि त्यामुळे ही संहिता सगळे जपायचा प्रयत्न करतात. ही संहिता ज्याला मिळेल त्याला ते सॉफ्टवेयर ची प्रत बनवता येईल आणि वापरता येईल. म्हणून या संहितेला बौद्धिक संपदा मानण्यात येते.
.
जेव्हा आपण सॉफ्टवेयर विकत घेतो किंवा डाऊनलोड करतो तेव्हा आपल्याला ती संहिता मिळत नाही तर त्या संहितेपासून तयार केलेले सॉफ्टवेयर मिळते. हे समजायला वेगळे उदाहरण घेऊन पाहुया. एक रांगोळीचा साचा म्हणजे संहिता समजलो तर त्या साच्याने काढलेली रांगोळी हे झाले सॉफ्टवेयर, ते आपण विकत घेतो साचा नव्हे. आपल्याला साचा मिळाला तर आपण हवे तितके त्या सॉफ्टवेयर च्या प्रती तयार करून वापरू शकतो किंवा वाटू शकतो. त्यामुळे ती संहिता महत्वाची असते. त्या संहितेला स्रोत म्हटले जाते. सॉफ्टवेयर तयार करण्यासाठी हवा असणारी संहिता म्हणजेच स्रोत.
.
मुक्तस्रोत संकल्पनेच्या अंतर्गत हा विचार समोर आला की ही संहिताच समाजासाठी मुक्त करायची, जो ही संहिता लिहेल तो ती संहिताच सगळ्यांना उपलब्ध करून देईल, म्हणून त्याला म्हणायचे मुक्तस्रोत. मुक्तपणे कुणालाही उपलब्ध असलेला स्रोत हाच मुक्तस्रोत. या प्रकाराने सॉफ्टवेयर तयार करणारे लोक म्हणजे मुक्तस्रोत निर्माते.
.
मी एक मुक्तस्रोत निर्माता आहे.
.
अशी मुक्त संहिता तयार करून ती सगळ्यांना उपलब्ध करून देणे सुरवातीला सोपे नसायचे. २००५ च्या सुमारास लिनस टॉरवाल्ड यांनी गिट नावाची विकेन्द्रीत संहिता व्यवस्था नावाची एक प्रणाली विकसित केली आणि त्यानंतर संहिता उपलब्ध करून देणे आणि अनेक लोकांना तिच्या बदल करून ते पुन्हा सगळ्यांना उपलब्ध करून देता येणे सोपे झाले.
.
गिटहब नावाची साईट २००८ मधे अस्तित्वात आली आणि मग मुक्तस्रोत संकल्पनेला पंख मिळाले. मी काही महत्वाचे आणि ओळख होण्याला आवश्यक अश्याच गोष्टी इथे नमूद करतोय. हा काही संपूर्ण इतिहास नाही, त्यामुळे माझ्या या गोष्टीत अनेक सूक्ष्म गोष्टींचा उल्लेख नाही आणि ते ठरवून केलेले आहे. मुक्तस्रोत ची ओळख मिळावी यासाठी लागणारे घटक मी थोडेथोडे इथे घेतले आहेत. खोलात जाऊन या गोष्टीला अनेक पदर आहेत आणि घडलेल्या गोष्टी अनेक लोकांच्या आणि अनेक घटकांनी मिळून तयार झालेली आहे, ते सगळे या लिखाणात घेणे सध्या ओळख घेतांना आवश्यक नाही म्हणून वगळले आहे.
.
मुक्तस्रोत संकल्पनेचा महत्वाचा घटक हा की संहिता निर्मात्याला ती सगळ्यांना उपलब्ध करून देता येते. मग ती कुणालाही वापरता येते त्याचे सॉफ्टवेयर तयार करून वापरून पाहता येते. त्यात काही बदल करावेसे वाटले तर ते पण करता येतात. संहितेतच बदल केल्यामुळे ती बदललेली संहिता मग सगळ्यांना उपलब्ध होते आणि ते नवे बदल सुद्धा सगळ्यांना उपलब्ध होतात. संहिताच मुक्त असल्याने नसलेल्या किंवा त्रास देणाऱ्या गोष्टी दुरूस्त करण्यासाठी संहिता निर्मात्या कंपनी वर किंवा लोकांवर अवलंबुन राहणे आवश्यक नसते. हा मुक्तस्रोत आणि गुप्तस्रोत सॉफ्टवेयर मधला फरक आहे.
.
मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पावरपाईंट हे गुप्तस्रोत आहेत, त्यांची संहिता मायक्रोसॉफ्ट कंपनी कुणाला देत नाही ती त्यांची बौद्धिक संपदा मानल्या जाते. आपल्याला त्या संहिते पासून तयार झालेले सॉफ्टवेयर फक्त विकत मिळते आणि डाऊनलोड करता येते.
.
लिब्रेऑफिस हे सॉफ्टवेयर मुक्तस्रोत आहे. त्याची संहिता सुद्धा आपल्याला उपलब्ध असते. हे तयार करणारे निर्माते ती संहिता मुक्तपणे गिटहब साईटवर ठेवतात आणि त्याचे बदल सार्वजनिक पद्धतीने करतात.
.
मुक्तस्रोत संहिता निर्मिती मध्ये योगदान करणे हे महत्वाचे यासाठी असते की ती एक समाजास दिलेले योगदान ठरते. मी एक मुक्तस्रोत संहिता लिहिली आणि उपलब्ध करून दिली तर ती माझ्यावर अवलंबून उरत नाही. मी काही कारणाने तिच्यात बदल करणे सुधारणा करणे बंद केले तरीही इतरांना तिच्यामध्ये बदल करता येतात आणि सुधारणा सुरू ठेवता येते आणि ते सॉफ्टवेयर अद्ययावत राहू शकते आणि समाजाच्या कामास येत राहू शकते.
.
मुक्तस्रोत संहिता अश्या सहकारी तत्वावर निर्माण होत राहतात. त्याचे पालक म्हणजे सध्या जे ती संहिता सांभाळताहेत आणि तिच्यावर काम करताहेत. ते पालक बदलत राहतात आणि ती संहिता पुढे जात राहते.
.
मुक्तस्रोत संहितेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे मी तयार केलेली संहिता अनेकांना वापरून तपासता येते आणि त्यात काही त्रृटी आढळल्यास त्यांनी माहिती देता येते. संहिता कुठे कुठे चुकतेय याची माहिती देणे आणि त्याचे विवरण तयार करणे याला पण वेळ लागतो आणि एक निर्माता जेव्हा मुक्तस्रोत संहितेवर काम करतो तेव्हा ते सहसा आवड म्हणून आणि छंद म्हणून केलेले असते त्यामुळे मिळालेला वेळ वापरून केलेले असते त्यामुळे इतका वेळ देणे कदाचित शक्य नसते, पण जर काही लोकांनी ती संहिता वापरून त्या जागा दाखवून दिल्या तर त्यांना दुरूस्त करणे मला जमू शकते. कधी कधी असे त्रृटी दाखवणारे आणि त्यांना दुरूस्त करणारे वेगवेगळे लोक मदतीला येतात आणि अश्या प्रकारे ती मुक्तस्रोत संहिता खऱ्या अर्थाने सहकारी तत्वावर सांभाळली जाते.
.
मी हे लिहितांना मुद्दाम त्या गोष्टींचे इंग्रजी नावे लिहिण्याचे टाळतोय कारण संकल्पना समजणे अधिक आवश्यक आहे. तुम्हाला वाचताना मी कशाबद्दल बोलतोय हे कळेलच आणि याबाबतित काही प्रश्न पडले तर नक्की विचारा. त्यांची उत्तरे देतांना मला या विषयाला अधिक सविस्तर मांडता येईल
.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२५
.
(मुक्तस्रोत निर्माता)
तुषार जोशी
नागपूर, रविवार १९ जानेवारी २०२५
.
भाग ३ - https://www.maayboli.com/node/86465

Group content visibility: 
Use group defaults