.
एकोणीसशे ऐंशी च्या दशकात युनिक्स नावाची संगणक संचालन प्रणाली लोकप्रिय होत होती. संगणक आपल्या मेंदूपेक्षा अधिक गतीने ठराविक दिलेली कामे करणारे यंत्र आहे असे मानले तर संगणकाला आपली कामे संगणकाच्या भाषेत सांगू शकेल आणि आपल्याशी संवाद साधू शकेल अशी प्रणाली लागते आणि तिला मी संचालन प्रणाली म्हणतोय.
.
युनिक्स अशीच एक संचालन प्रणाली होती. सध्याच्या काळाच्या भाषेत बोलायचे तर आता आपल्याला माहिती असलेल्या संचालक प्रणाल्या म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोज, उबुंटू आणि मॅकओएस या संगणकावर चालणाऱ्या आणि आयओएस आणि एंड्रोइड या मोबाईल वर चालणाऱ्या संचालन प्रणाल्या आहेत.
.
तर त्या युनिक्स प्रणाली ला तयार करणारी कंपनी बेल लेबॉरेटरीज, यांनी ती प्रणाली सुरवातीला काही विश्वविद्यालयांना मोफत वापरायला दिली होती पण कालांतराने त्यांनी ती प्रणाली व्यवसायिक दृष्टीने परवाना पातळीवर उपलब्ध करून दिली, म्हणजेच तुम्हाला जर युनिक्स प्रणाली वापरायची असेल तर त्याचा परवाना विकत घ्यावा लागे. असे विकत घेतलेला युनिक्स वापरण्याचा परवाना तुम्हाला युनिक्स प्रणालीचे त्या काळी अद्ययावत असलेले स्वरूपात वापरायचे हक्क देत असे आणि तुम्हाला ते हक्क फक्त मिळालेली प्रणाली वापरणे इतकीच परवानगी देत. त्या प्रणाली मधे काही चुका आढळल्या तर त्या सुधारणे, त्या प्रणाली मधे अधिक नव्या गोष्टींचा समावेश करणे असे बदल करण्याची परवानगी त्या परवान्यामधे शामिल नसायची.
.
सध्या देखील अश्या कोणताही बदल न करता वापरण्याच्या परवान्यावर आपल्याला संचालक प्रणाली मिळतात त्यात महत्वाच्या दोन म्हणजे मायक्रोसॉफ्ट बिंडोज आणि ऍपल मॅकओएस. आपण या प्रणाली विकत घेऊ शकतो आणि पावरू शकतो. त्यांच्या बदल करणे, सुधारणा करणे किंवा आपण केलेले बदल कुणाला देणे याची परवानगी त्या परवान्यात नसते.
.
या संगणक प्रणाली मुळे आपण संगणकाशी संवाद साधू शकतो पण तो संवाद साधायला पण आपल्याला त्या प्रणालीची भाषा शिकावी लागते. त्या भाषेत कामाची व्यवस्था करून तो त्या प्रणालीकडून करवून घेणे यासाठी आपल्याला अप्लिकेशन प्रोग्राम मिळतात, ज्यांना आजकालच्या भाषेत आपण एप म्हणतो. हे अप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे आपल्याशी आपल्या भाशेत संवाद करून आपल्या कामाची विनंती संचालक प्रणालीला आवश्यक अश्या भाषेत सांगणारे मदतगार असतात. आपण जे वर्ड, एक्सेल, पावरपाईँट वगैरे वापरतो ते या प्रकारात मोडतात.
.
संचालक प्रणाली बरोबर असे काही जुजबी एप्लिकेशन आपल्याला मिळतातच पण काही विशेष कामासाठी आपल्याला असे अप्लीकेशन प्रोग्राम ज्यांना आपण सॉफ्टवेयर म्हणूया ते पण ते तयार करणाऱ्यांकडून विकत घ्यावे लागतात. आपल्याला हे सॉफ्टवेयर सुद्धा काही बदल न करता मिळाले तसे वापराच्या परवानगीच्या परवान्यासकट मिळतात.
.
जर तुम्हाला प्रोग्रामिग येत असेल आणि तुम्ही त्या सॉफ्टवेयर मधे काही सुधारणा करू शकत असाल तरीही तसे करण्याची तुम्हाला परवानगी नसते. रिचर्ड स्टॉलमॅन अश्याच एका अडचणीत होते, त्यांच्या प्रिंटर मधे वापरले जाणारे सॉफ्टवेयर निट काम करत नव्हते पण प्रिंटर बनवणारी कंपनी ते दुरूस्त करून देण्यात वेळ लावत होती आणि त्यांना ते सुधारता येऊ शकले असते तरी ते त्यांना कायद्याच्या नियमांप्रमाणे करता येणार नव्हते.
.
यातून त्यांना मोफत सॉफ्टवेयर ची कल्पना सुचली. त्यांनी मुद्दा मांडला की मला जर सॉफ्टवेयर लिहिता येते आहे आणि माझे सॉफ्टवेयर मी कुणालाही मोफत देण्याची तयारी ठेवतो आहे तेव्हा मला असे सॉफ्टवेयर सगळ्यांना देता आले पाहिजे ज्याला मी मोफत सॉफ्टवेयर म्हणणार आणि त्या सॉफ्टवेयर मधे कुणाला काही अजून सुधारणा करता आली तर त्यांनी ती करावी याची परवानगी देखील मी त्या सॉफ्टवेयर बरोबर देणार, जेणेकरून अनेक लोकांची मदत होऊन ते सॉफ्टवेयर अधिकाधिक उन्नत होऊन समाजाच्या कामात येऊ शकते.
.
जसे आपल्या स्वयंपाकघरात तयार होणारे पक्वान्न एका रेसिपी वर आधारित समजले तर अश्या रेसिपी पिढ्यांपिढ्या एकमेकांना सांगून समाज त्या टिकवत आलाय. तसेच सॉफ्टवेयर क्षेत्रात देखील असे काम करून त्याचा एक प्रघात पाडायचा मुद्दा त्यांनी मांडला. आपला मुद्दा पुढे ठेवत त्यांनी जीएनयू ही संकल्पना स्थापन केली. जिएनयू म्हणजे जे युनिक्स नाही ते – असे गमतीदार नाव ठेवताना देखील विकत मिळणारे युनिक्स वर हाणलेला हा टोला होता.
.
असे मोफत दिलेले सॉफ्टवेयर वापरणे, इतरांना देणे, त्यात बदल करणे या सगळ्याची परवानगी देणारे अनुमती पत्र त्यांनी तयार केले त्याला ते जिएनयू जिपिएल म्हणू लागले. म्हणजेच जिएनयू जनरल पब्लिक लायसंस. म्हणजे सामान्य जाहिर वापराचा परवाना – ज्या परवान्याअंतर्गत सोबत असलेल्या सॉफ्टवेयर ला कुणालाही वापरणे, इतरांना देणे, त्यात सुधारणा करणे, याची परवानगी दिलेली होती. अश्या मोफत मिळालेल्या सॉफ्टवेयर ला विकण्याची सुद्धा परवानगी त्यात होती फक्त एकच अट त्यात महत्वाची होती म्हणजे ते इतर कुणाला देतांना आणि त्यात बदल करताना ते करणाऱ्याला मूळ निर्मात्याचे नाव आणि समदर्भ कायम ठेवावे लागतील आणि केलेले बदल देखील सगळ्यांना मोफत उपलब्ध करून द्यावे लागतील.
.
जगातल्या अनेक प्रोग्रामर मडळींना ही संकल्पना आवडली आणि अनेकांनी त्यात योगदान द्यायला सुरवात केली. याचा परिणाम म्हणजे अनेक मोफत सॉफ्टवेयर तयार होऊ लागली आणि लोकांमधे त्यांची देवाण घेवाण होऊ लागली, पण अजून संचालन प्रणाली ही कुणालाही मोफत मिळत नव्हती. ते सॉफ्टवेयर चालवण्यासाठी एक संचालन प्रणाली लागायची जी युनिक्स होती आणि तिला विकत घेऊनच ते मोफत सॉफ्टवेयर त्यावर चालवावे लागायचे.
.
एकोणिसशे नव्वद चे दशक उजाडताच लिनस टॉरवार्ल्ड नावाच्या सद्गृहस्थाने संचालक प्रणाली मधले एक महत्वाचे घटक असलेले कर्नल प्रणाली हे सॉफ्टवेयर स्वतः कुणाचीही मदत न घेता लिहून काढले आणि उपलब्ध जिएजयू जिपिएल या परवान्याअंतर्गत ते संपूर्ण जगाला कालांतराने मोफत उपलब्ध करून दिले आणि एक महत्वाची गरज पूर्ण झाली. जगाला मोफत अपलब्ध असणारी संचालन प्रणाली मिळाली, या कर्नल चे नाव लिनक्स ठेवले गेले आणि याच मूळ घटकाला विकसित करून अनेकांच्या सहयोगाने लिनक्स नावाची संचालक प्रणाली अस्तित्वात आली.
.
युनिक्स ही व्यवसायिक अनेक हक्क सुरक्षित ठेवून वापरायच्या परवान्याअंतर्गत मिळणारे संचालक प्रणाली होती, आणि लिनक्स त्याविरूद्ध मोफत आणि सर्व हक्कांसकट मिळणारी संचालक प्रणाली होती. याच लिनक्स प्रणाली च्या अनेक प्रकाराममधे सध्या उबुंटू ही प्रणाली प्रचलित आहे आणि तशीच मोफत आहे.
.
हा विषय आणि ही गोष्ट मोठी आहे पण रोचक आहे, ही पुढे वाढवत नेण्याची इच्छा आहे, हे तुम्हाला वाचावेसे वाटते आहे का कळवा, मला अजून ही गोष्ट पुढे सांगायला आवडेल.
.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२५
.
तुषार जोशी
नागपूर, शनिवार, १८ जानेवारी २०२५
.
भाग २ - https://www.maayboli.com/node/86464
भाग ३ - https://www.maayboli.com/node/86465
मुक्तस्रोत – एक भन्नाट कल्याणकारी संकल्पना
Submitted by तुष्कीनागपुरी on 11 March, 2025 - 00:15
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
'महाजालाचे मुक्तायन' हे
'महाजालाचे मुक्तायन' हे लोकसत्तामधलं सदर याच थीमवर होतं बहुतेक.
हो . पुढे वाचायला आवडेल.
हो . पुढे वाचायला आवडेल.
तुमचा हा उपक्रम खूप आवडला!
तुमचा हा उपक्रम खूप आवडला!
हे सगळं मराठीत लिहायला तसं किचकट काम आहे.