एक 'दिन'

Submitted by शिल्पा गडमडे on 7 March, 2025 - 20:23

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे…

बाहेर टीव्हीच्या कुठल्यातरी चॅनेलवर गाणं सुरू होतं.

आणि आत स्वयंपाकघरात तिची स्वयंपाकाची गडबड. तिच्याकडे स्वयंपाकाला बाई होती पण महिला दिनानिमित्त कुठल्यातरी राजकीय पक्षाने तिच्या वस्तीत कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आज ती येणार नव्हती. ‘नशीब शनिवारी आलाय हा महिला दिन!’ नाहीतर ऑफिसच्या दिवशी किती गोंधळ उडाला असता याचा विचार करूनच तिला दमायला झालं. खरंतर महिला दिनानिमित्त तिच्या कॉलनीतल्या महिलांनी एकत्रित जेवायला जाण्याचा प्लॅन ठरला होता. पण बाहेर पडण्याआधी घरच्या लोकांच्या जेवणाची सोय करणं आवश्यक होतं. मागचे काही दिवस सतत बाहेर खाणं होत असल्यामुळे ‘होममेड फूड इज द बेस्ट फूड’ म्हणून बाहेरचं मागवायचं नाही असं ठरलं.

तिने पटकन स्वयंपाक उरकला, छान तयार होऊन ती बाहेर पडली. एकाच कॉलनीत राहत असल्यातरी आपापल्या व्यापात अडकलेल्या या सुपरवूमन आज कितीतरी दिवसांनी एकत्र भेटत होत्या. जेवतांना नेहमीच्या गप्पा रंगल्या. ‘तुझा ड्रेस छान आहे’, ‘गळ्यातलं नवीन केलंस का? सुंदर दिसतंय’. कॉम्प्लिमेंट्सची देवाणघेवाण झाली. निघतांना आठवणीने सेल्फी काढण्यात आल्या. तिने लगेच व्हॉट्सॲप वर स्टेट्स टाकलं, कुणी इंस्टाग्रामला स्टोरी टाकली. एकमेकींना निरोप देऊन घरी परततांना पारंपरिक वेशभूषा करून डोळ्यावर गॉगल लावून निघालेल्या महिलांची रॅली दिसली.

घरी आल्यावर चहाची वेळ झाली होती. सगळ्यांसाठी चहा बनवून ती टीव्हीसमोर बसली. महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेणाऱ्या कार्यक्रमांबरोबर नुकत्याच घडलेल्या स्वारगेट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘महिला सुरक्षा’ यावर देखील चर्चा सुरू होत्या. स्त्रियांनी कशी काळजी घेतली पाहिजे, अंधार असताना बाहेर पडायला नको, कपडे विचारपूर्वक घातले पाहिजे असे एक ना अनेक उपाय सुचवल्या जात होते.

तिनं चॅनेल बदललं..

‘स्त्रियांनी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे’ याच्या टिप्स देणं सुरू होतं.

हे ऐकून कंटाळा आला म्हणून तिने मोबाईल हातात घेतला. आज सकाळपासूनच तिच्या मोबाईलमध्ये महिला दिनाचे मेसेज येऊन पडले होते.
“तूच दुर्गा, तूच लक्ष्मी”,
‘संसार, ऑफिस, पाहुणे या सर्व आघाड्यांवर हसत मुखाने लढणाऱ्या सुपरवूमनचं कौतुक’,
‘तुझ्या त्यागाला सलाम’
असे अनेक मेसेजेस होते.

तिला कामाच्या गडबडीत सकाळपासून त्याकडे बघायला वेळही मिळाला नव्हता. एक बरा वाटलेला मेसेज सगळीकडे चिटकवून तिने रील्सकडे मोर्चा वळवला. ‘सगळे कसे सदानकदा बायकांना शहाणपण सांगत सुटलेले असतात त्यापेक्षा पुरुषांना का नाही सांगत कसं वागायचं ते’ अशा आशयाची रील होती. कुतूहल म्हणून तिने त्यावरचे कमेंट वाचायला सुरुवात केली. त्यात मुख्य मुद्द्यावरून चेहरा नसलेल्या गर्दीने आई बहिणीच्या शिव्यांकडे कधी कूच केली तिला कळलेच नाही. ‘छे, हे नेहमीचेच’ म्हणत कंटाळून ती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला पुन्हा स्वयंपाकघरात गेली.

सगळी आवरसावर करून उद्याच्या दिवसाला बघायला सज्ज होण्यासाठी ती झोपायला गेली. कामाच्या गडबडीत वाचन मागे पडलं म्हणून तिने पुन्हा वाचन करायला सुरुवात केली होती. सीमॉन द बोव्हारचं पुस्तक उघडलं. नवीन चॅप्टरची पहिली ओळ होती-
“One is not born, but rather becomes, woman.”

महिला दिनानिमित्त तिला सकाळी दिलेल्या फुलांचा सुवास घरभर दरवळला होता.

#सुरपाखरू
@शिल्पा गडमडे
०८.०३.२०२५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults