२०२४चं वर्ष आमच्यासाठी भटकंतीच्या दृष्टीने फार चांगलं गेलं. नवीन देश पाहिले, नवीन शहरं पाहिली, काही आधी पाहिलेली शहरं, ठिकाणं, पुन्हा पाहिली, नवे अनुभव घेतले. घरची मंडळी, मित्र मैत्रिणी, नातेवाईक ह्यांच्याबरोबर भटकंती केली. आणि ह्या भटकंतीदरम्यान निसर्गाने काहीश्या अनपेक्षितपणे भरपूर गमती-जमती दाखवल्या.
पुण्यात पूर्वी म्हणजे उंच इमारतींचं जंगल व्हायच्या आधी पर्वती कुठूनही दिसायची तसा सिअॅटल शहरातून कुठूनही माउंट रेनियर दिसतो. जवळ जवळा बारही महिने बर्फाच्छादित असलेलं ते काहीस गंभीर, पोक्त, गुढ हिमशिखर प्रत्येक वेळी नवीन उर्जा देतं हे नक्की. सिअॅटलहून माउंट रेनियर नॅशनल पार्क जेमतेम तास-सव्वातासाच्या अंतरावर असल्याने आत्तापर्यंत तिथे बर्याच फेर्या झाल्या आहेत. शिवाय कोणी फिरायला इथे आलं की त्यांच्याही यादीत ते असतं. ह्या उन्हाळ्यात बे-एरीयातले काही मित्र मैत्रिणी इथे आले होते. आमची ठरलेली भेटाभेटी झाल्यानंतर एक दिवस त्यांचा "रेनियरला चलताय का ?" असं विचारायला फोन आला. त्यांना म्हंटलं तुम्ही सुट्टीवर आला आहात पण आम्हांला सुट्टी नाहीये. तर ते म्हणे हरकत नाही. कामं संपवून संध्याकाळी उशिरा या, आम्ही रात्रभर जागणार आहोत. सुर्योदय पाहून उद्या सकाळी परतूया. रेनियरच्या इतक्या फेर्यांमध्ये आधी कधी सुर्योदय पहायला जाणं जमलं नव्हतं. त्यामुळे हो म्हंटलं. काम, जेवणं आटोपून घरून निघायला उशीरच झाला. रेनियरच्या पायथ्याशी पोहोचून सन राईज पॉईंटच्या रस्त्याला लागेपर्यंततर अगदी मिट्ट काळोख झाला. योगायोगानं त्याच एक दोन दिवसात अमावस्या होती, त्यामुळे चंद्रप्रकाशही फार नव्हता. हे सगळं पथ्यावरच पडलं. का ते नंतर समजलं. पार्किंगला पोचलो आणि मित्र मंडळी भेटले. पार्किंग पासून एक छोटीसी पाऊलवाट होती. साधारण १० मिनिटं चढून गेल्यावर मोकळं पठार होतं. समोर रेनियरचं शिखर होतं आणि वर खुलं आकाश. पठारावर जाऊन बघतो तर आकाशात चांदण्यांचा सडा! त्या परिसरापासून शहरं लांब असल्याने प्रकाशाचा स्त्रोत नाही आणि शिवाय चंद्रही नाही. मानस सरोवराच्या काठावरून पाहिल्या होत्या, त्या नंतर इतक्या चांदण्या पहिल्यांदाच पाहिल्या. जराशी सपाट जागा बघून आम्ही पथार्या पसरल्या. पडल्या पडल्या हात जरा लांब करून मुठभर चांदण्या उचलून घ्याव्या असं वाटून गेलं. सप्तर्षी, शुक्राची चांदणी, ध्रुव तारा वगैरे तांत्रिक बाबींमध्ये न अडकता ती लुकलुक बघत किती वेळ गेला कळलच नाही. वेळ जात होता तशी त्या ग्रह तार्यांची स्थितीही बदलत होती. साधारण मध्यरात्री नंतर मध्यभागी तारकापुंज एकत्र व्हायला लागले आणि दुधाळ पट्टा दिसायला लागला. ट्युब पेटली.. मिल्की वे.. हीच तर आपली आकाशगंगा! भूगोलाचा पुस्तकात शिकलो होतो, कधीतरी शोधायचा प्रयत्न केला होता, इंटरनेटवर फोटोही बघितले होते पण ही अशी अचानक आणि इतकं स्पष्ट दर्शन देईल असं वाटलं नव्हतं. इतक्या प्रचंड मोठ्या आणि अगणित तारे असलेल्या आकाशगंगेतल्या, एका लहानश्या तार्याच्या, लहानश्या उपग्रहावरचे आपण! निसर्गाच्या त्या भव्यतेपुढे आपण किती नगण्य आहोत ह्याची कल्पनाही करता आली नाही. बर्फाच्छिदीत रेनियरच्या मस्तकी विराजमान झालेलं ते आकाशगंगेचं दृष्य फार सुंदर दिसलं. फोटो काढायच्या फार फंदात न पडता फक्त डोळे भरून बघून घेतलं. दोन अडीच नंतर चांदण्या कमी झाल्यासारखं वाटलं आणि थंडीही फार वाजायला लागली म्हणून जरावेळ गाडीत येऊन उबेत बसलो. उन्हाळ्याचे मोठे दिवस आणि त्यात आम्ही एव्हडे उंचावर, त्यामुळे चार सव्वाचारच्या सुमारास फटफटायला लागलं. आम्ही पुन्हा त्या आधीच्या पठारावर गेलो. झुंजूमुंजू प्रकाशात रेनियरचं शिखर चढू बघणार्या गिर्यारोहकांच्या बॅटर्यांच्या प्रकाशाची अंधूक लुकलूक दुरवर दिसत होती. शिखराच्या विरूद्ध बाजूने सुर्योदय होतो. तिथेही डोंगररांग असल्याने हळूहळू उजाडत होतं. एका क्षणी सुर्यकिरणं एका विशिष्ठ कोनात त्या बर्फाच्छादित शिखरावर पडली आणि ते शिखर सोनेरी रंगात झळाळू लागलं! पूर्ण उजाडलेलं नसल्याने त्या मंद पार्श्वभुमीवर तो सोनेरी गुलबट रंग फारच उठून दिसत होता. सेकंदागणीक झळाळी वाढत गेली आणि एका क्षणी त्या स्वर्णिम आविष्काराने सर्वोच्च बिंदू गाठला. हा असाच सोनेरी रंगाचा खेळ मी मागे हिमालयातल्या कौसानीला आणि कॅनडातल्या बॅम्फ नॅशनल पार्कमधल्या लेक मोरेनला बघितला होता. पण इथे शिखर फारच जवळ होतं. डोळे भरून ते पहात असताना किरणांचा कोन बदलला आणि धगधगती आग शांत व्हावी तसं ते सोनेरी शिखर हळूहळू राखाडी होत नेहमीसारखा पांढुरकं झालं. काही क्षणांचा खेळ पण रंगांच्या इतक्या छटा की हल्लीचं आधुनिक 'डिजीटल कलर पॅलेट' कमी पडावं!
आकाशगंगा-१ (फोटो श्रेय: शैलेश भाटे)
आकाशगंगा-२ (फोटो श्रेय: शैलेश भाटे)
सोनेरी रेनियर
ह्याच्या जरा दोन महिने आधीची गोष्ट. २०१७ नंतर अमेरिकेत पहिल्यांदाच खग्रास सूर्यग्रहण होणार होतं. २०१७ साली आम्ही अटलांटाला होतो आणि तिथून खग्रास ग्रहणाचा पट्टा अगदी जवळ म्हणजे २५-३० मैलांवर होता. पण तेव्हा काही कारणांनी तिथे जायला जमलं नाही. ह्यावेळी एका खगोलप्रेमी मित्राने येणार का विचारलं म्हणून टेक्सासला जायची तयारी केली. डॅलस, ऑस्टीन परिसरातून हवामानानुसार कुठूनतरी बघू ह्या हिशोबाने तीन-चार ठिकाणी हॉटेलं घेतली होती. शेवटच्या दिवशी पर्यंत हवामानाच अंदाज घेऊन अखेरीस डॅलसच्या जवळ एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. माझ्या मित्राने टेलिस्कोप आणि बाकी उपकरणं कुठे लावता येतील ह्याची रात्रीच चाचपणी करून घेतली. सगळी तयारी झाली, मात्र सकाळी उठून बघतो तर आकाश ढगाळ आणि पावसाची शक्यता! एव्हड्या सगळ्या तयारीवर पाणी फिरणार का? आता काय करायचं ह्याचा विचार करत असताना त्या परिसरात रहाणार्या माझ्या चुलत भावाचा फोन आला. म्हणाला तुम्ही आहात त्यापेक्षा त्याच्या घराच्या इथे पावसाची शक्यता कमी आहे आणि ढग उघडू शकतात तर तुही इकडेच या. मग सगळी उपकरणं आणि माणसं ह्यांच्या लवाजमा घेऊन आम्ही तिकडे जायला निघालो. रस्त्यात पावसाची जोरात सर आली. भावाच्या घरी पोचलो. आकाशात ढग होतेच पण काहीतरी चमत्कार होईल ह्या अपेक्षेने टेलिस्कोप आणि इतर सामानाची पुन्हा मांडामांड केली. ग्रहण घटीका जवळ येत चालली होती, टिव्हीवर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या स्थितीबद्दल जोरदार चर्चा सुरू होती पण सूर्यासमोर ढगांचा एक मोठा पुंजका होता. खग्रास स्थितीला साधारण २० मिनीटं राहिलेली असताता खरच चमत्कार झाला आणि ढगांचा पडदा दूर झाला आणि झाकोळत चाललेला सूर्य स्पष्ट दिसू लागला. वातावरणातले बदल म्हणजे प्रकाश, तापमान, वारा स्पष्ट जावणू लागले. हळूहळू करत संपूर्ण सूर्य झाकोळला गेला. कंकणाकृती दिसायला लागली. अखेर तो क्षण आला.. सूर्य दुसर्या बाजूने खुला व्हायला लागला आणि ती अफाट सुंदर डायमंड रिंग चमकायला लागली. अंगठीला लावलेल्या हिर्याची प्रभा फाकावी तसा तो सूर्याच्या कंकणावरचा हिरा चकाकू लागला. इतकं अभूतपूर्व सुंदर दृष्य होतं ते की आधी आम्ही देह भान हरपून बघत बसलो आणि नंतर सगळ्यांनी जोरदार चित्कार केले. त्याही वेळी मोबाईलवर फोटो न काढता निव्वळ अनुभूती घेण्याचा प्रयत्न करत राहिलो. आता 'हिर्याच्या खड्याची अंगठी' असा दागिना तयार करायची कल्पना माणसाला ह्या ग्रहणाच्या दृष्यावरून सुचली की दागिन्यावरून त्या ग्रहणस्थितीला हे नाव दिलं गेलं कोणास ठाऊक पण ती नैसर्गिक हिर्याची अंगठी फार सुंदर दिसली एव्हडं मात्र नक्की.
डायमंड रिंग (फोटो श्रेय: शैलेश भाटे)
आमच्या घराच्या जवळ एक तळं आहे. तळ्याच्या एका बाजूला व्यवस्थित बांधलेला ट्रेल आहे तर दुसर्या बाजूला फुटपाथ असलेला रस्ता आहे. तळं खोलगट भागात असून दोन्ही बाजूंना टेकड्या आहेत. थोड्या थोड्या अंतरावर ह्या टेकड्यांवरून येणारं पावसाचं पाणी (सांडपाणी नाही) तळ्यात सोडण्यासाठी ओहळ (स्ट्रीम्स) तयार केलेले आहेत. शेजारून जाणारा रस्ता तसेच ट्रेल ह्यांच्या खालून हे ओहळ जातात. आम्ही बर्याचदा ह्या ट्रेलवर फिरायला, सायकल चालवायला जातो. सरत्या उन्हाळ्यात आमच्या लक्षात आलं की ह्यातल्या एका ओहळाच्या पुलावरून चालताना आमचा ज्योई खूप वेळ रेंगाळत रहातो आणि कधीकधी थोडा भुंकतोही. काही दिवसांनी पाण्याच्या प्रवाहापाशी थोडासा वेगळा वासही यायला लागला. ताज्या वाहत्या पाण्याचा खरतर कधी वास येत नाही, त्यामुळे आम्हांला जरा आश्चर्य वाटलं. नंतर एकदा थांबून आम्ही नीट बघितलं तर निसर्गातली अजून एक गंमत तिथे घडत होती ते म्हणजे 'सालमन होमकमिंग'. सालमन हे समुद्री मासे. खुल्या समुद्रात ते त्यांचं बालपण आणि वाढीचं वय घालवतात. तिथे मिळणारं खाणं खाऊन चांगले धष्टपुष्ट होतात. पुढे प्रजननाच्या वयात ते समुद्राला मिळणार्या गोड्या पाण्याच्या प्रवाहांमधून म्हणजे नद्या, झरे ह्यांमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध उलटे पोहत जातात आणि तिथे सुरक्षित जागा शोधून अंडी घालतात. प्रवाहाच्या उलट पोहून त्यांनी आधी कमावलेली शक्ती जवळ जवळ संपलेली असते आणि त्यामुळे अंडी घालून झाल्यावर त्यांचं आयुष्यमान संपतं. ह्या अंड्यांतून पुढे पिल्लं जन्माला येऊन ती आपले आई-वडील ज्या मार्गाने आले, त्या मार्गाने पुन्हा खुल्या पाण्यात जातात. असं म्हणतात की ह्या प्रवासादरम्यान त्यांना पाण्याची चव, वास ह्यावरून तो मार्ग बरोबर लक्षात रहातो आणि वयात आल्यावर ते पुन्हा तिथेच परतात. आता आमचं तळं काही खार्या पाण्याचं नाही, पण त्यातही हे सालमन मासे आहेत. खारं पाणी असो किंवा गोडं निसर्ग नियम न पाळायला ती काही माणसं नाहीत. त्यामुळे त्यांचा निसर्गक्रम ते इथेही चालवतात. त्या ओहळामध्ये ज्योईला, आणि त्याच्यामुळे आम्हांलाह, हे प्रवाहाच्या विरूद्ध दिशेला पोहणारे सालमन मासे दिसले! जे पोहतात किंवा कयाकिंग करतात त्यांना चांगलच माहीत असेल की असं प्रवाहाच्या विरूद्ध पोहोणं अजिबात सोपं नाही. त्यात इथे चांगलाच चढ आहे. आम्ही पाहिलं तेव्हा पुलाच्या एका बाजून तीन मासे पाण्याशी झगडत होते. दोन पुढे होते आणि एक थोडासा मागे होता. जरावेळ थांबून बघितलं तर अक्षरशः एक पाऊल पुढे आणि दोन पावलं मागे अशी त्यांची अवस्था होती. आम्ही आमची फेरी संपवून परत आलो तर तो मागे असलेल्या मासा इतर दोघांपर्यंत आलेला होता. नंतर आम्हांला रोज त्या पुलावरून डोकावून बघायची सवयच लागली. दोन एक दिवसांनी माश्यांच त्रिकूट पुलाच्या दुसर्या बाजूला दिसलं पण ते एकमेकांपासून पुढे मागे गेलेले होते शिवाय जरा खालच्या बाजूला अजूनही काही मासे होते. आता ते त्रिकूट आम्ही आधी पाहिलेलच होतं की वेगळं ते माहित नाही. पण एकंदरीत प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा सगळ्यांचा झगडा चालू होता हे मात्र खरं. आमच्या परिसरात बॉबकॅट, कायोटी, क्वचित कधीतरी अस्वलं वगैरेही दिसतं. पाणी पिण्यासाठी आलेल्या ह्या प्राण्यांची ते मासे मेजवानी ठरले की खरोखरीच योग्य स्थळी पोहोचून अंडी घालू शकले हे माहीत नाही. पण ह्यावर्षी आमच्या तळ्यात गेल्या काही वर्षांतली विक्रमी सालमन पैदास झाली अशी बातमी काउंटीच्या समाजमाध्यमांमध्ये वाचली, त्यामुळे त्या माश्यांचं इप्सित साध्य झालं असावं!
आता थोडी म्हणजे एक तीन चार महिने पुढची आमच्या न्युझिलंड ट्रीप दरम्यानची गोष्ट. तिथे रहाणार्या माझ्या मित्राने अगदी आग्रहाने सांगितलं की टिमारू-ओमारू ह्या गावांना नक्की जा! आधी आम्ही जे ठरवलं होतं त्यात ही नावं फारशी आली नव्हती. साऊथ आयलंडच्या पूर्व किनार्यावर म्हणजे पॅसिफीक महासागरावर पण जरा दक्षिणेकडे वळलेले हे समुद्रकिनारे आहेत. आम्ही ठरवलेल्या मार्गाच्या फार आड नव्हतं म्हणून जायचं ठरवलं. ख्राईस्टचर्चहून दक्षिणेकडे जाताना आधी टिमारू लागतं. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले. तिथून आमचा मुक्काम असलेलं ओमारू असून दोन तासांवर होतं. तिथे आसपास बघण्याच्या बाकी गोष्टी होत्याच पण नंतर जाताना समजलं की तिथे निळ्या रंगाचे पेंग्विन येतात आणि ते सूर्यास्तानंतर ते मध्यरात्रीपर्यंत असतात! तिकडे उन्हाळा असल्याने सूर्यास्त व्हायला अजून दोनेक तास होते. मग ठरवलं की टिमारूलाच रात्रीची जेवणं उकरून घेऊ आणि किनार्यावर पेग्विनांची वाट बघत बसू. निळे पेंग्विन कसे दिसत असतील, किती मोठे असतील, ते नक्की कुठून येतात, का येतात हे काही माहिती नव्हतं आणि गुगल करून बघावसं वाटत नव्हतं. आम्ही किनार्यावरचं गाडी लावली आणि जवळ बांधलेल्या जेट्टी स्वरून रस्त्यावर चांगली जागा बघून थांबलो. हळूहळू लोकं जमायला लागली. एकंदरीत पक्षांना त्रास होऊ नये तसेच ते घाबरू नयेत म्हणून सगळे शांतता पाळत होते. समुद्राच्या लाटांची गाज होती. शिवाय एखादा बगळा, तिथे वावरणार्या डॉल्फीनने शेपूट दाखवत डुबकी मारली की येणार्या पाण्याचा आवाज, कुठल्यातरी पक्ष्याचं ओरडणं असं काही बाही ऐकू येत होतं. अचानक एक वेगळाच जरा केकाटण्याकडे झुकणारा आवाज आला आणि पलिकडे थांबलेल्या घोळक्यात कुजबूजीपेक्षा मोठा आणि चित्कारांपेक्षा लहान अश्या आवाजात बडबड सुरू झाली. त्या दिवशीचं पहिलं पेंग्विन दर्शन झालं होतं. आम्हीही पुढे जाऊन बघितलं. जेट्टीखालच्या दगडांमधून एक लहानसं पेग्विंन उड्या मारत होतं. थोड्या वेळाने अजून दोन तीन दिसली. ज्योई आणि त्याचे डॉग फ्रेंड्स जसे खेळतान एकमेकांच्या अंगावर उड्या मारतात, चावे (प्ले बाईट्स) घेतात अगदी तसेच ते तिघे एकत्र खेळत होते. नंतर एक थोडं मोठं आणि जरासं पोक्त पेग्विंन तिकडे आलं आणि त्यातल्या एकाला चोचीतून काहीतरी भरवलं. ते बघून बाकीचेही येऊन खाऊ मागायला लागले आणि मग तिघेही दगडांखाली गेले. आपण फोटोंमध्ये किंवा व्हिडीयोमध्ये जे पाहिलेले असतात, त्यापेक्षा हे पेग्विंन खूपच लहान होते आणि त्यांची पाठ अगदी काळी नसून अगदी गडद निळ्या रंगाची होती! आम्हांला तेव्हड्यात तिथे नॅशनल पार्कची गाईड दिसली. ती उन्हाळ्याचे महिने रोज रात्री तिथे येऊन ह्या पेग्विंनांचा अभ्यास करते आणि नोंदी ठेवते. तिच्या म्हणण्याप्रमाणे ह्या उन्हाळ्यात साधारण २५- ३० पेग्विंन रोज येत आहेत. आत्ता जे तीन मस्ती करणारे पेग्विंन होते, ती भावंड आहेत आणि ते मोठं पेग्विंन पालक आहे. आम्ही बाकीही माहिती विचारली. तर हे पक्षी उन्हाळ्यात दक्षिणेकडील थंड समुद्रातून सुमारे चाळीस मैल पोहून सूर्यास्तानंतर ह्या किनार्यावर येतात. साधारण मध्यरात्रीपर्यंत थांबतात आणि परत जातात. त्यांना किनार्याच्या परिसरात मुबलक अन्न मिळते आणि त्यासाठी ते येत असावेत असा अंदाज आहे. त्यांच्या बरोबर त्याच वर्षी जन्मलेली पिल्लही असतात. फक्त खाण्यासाठीच येतात की बाकी काही कारणं जसं की सुरक्षितता, प्रजनन की अजून काही ? निवडक किनारेच का? ह्याबद्दल संशोधन गेली काही वर्षे सुरू आहे. आम्ही नंतर बराच वेळ थांबलो होतो. अजून पेग्विंन आणि त्यांचे खेळ, ओरडणं बघितलं. 'पेग्विंन इफेक्ट' असं म्हणतात, त्याचं प्रात्यक्षिकही बघितलं. ते मध्यरात्रीपर्यंत थांबणार होते पण आम्हांला पुढे प्रवास होतं. निळ्या पेग्विंनांच्या ह्या अनपेक्षित दर्शानाचा आणि रोज इतकं पोहायच्या ह्या सुरस आणि काहीश्या चमत्कारीक सवयीचा विचार करत आम्ही पुढे निघालो.
आम्ही न्युझिलंडला जायच्या थोडसं आधी म्हणजे इथे सिअॅटलला हिवाळा सुरू झाला तेव्हाची गोष्ट. नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात आमच्या परिसरात बॉम्ब सायक्लॉन येणार अश्या बातम्या माध्यमांमध्ये यायला लागल्या. ह्या दरम्यान हवामान खात्याने ताशी ४० ते ६० मैल प्रतितास इतक्या वेगाने वारे वहातील अशी शक्यता वर्तवली. सिअॅटल शहराच्या परिसरात सुचिपर्णी वृक्ष म्हणजे पाईन, सेडार वगैरेंची जुनी आणि उंच उंच झाडं आहेत. इतक्या जोरात वारा येणार म्हणजे सगळ्यात मोठा धोका म्हणजे झाडं किंवा फांद्या पडण्याचा. त्यामुळे रस्ते बंद होणं, मोडतोड होणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या वीजवाहिन्या जमिनीखालून नसल्याने त्यांवर झाड पडून वीज जाणं हे सगळे धोकेही आलेच. इथे गेल्या काही वर्षात असे काही अंदाज असले की लोकं जरा जास्तच आचरटपणा करून प्रचंड खरेदी करतात. ह्याही वेळी तश्याच बातम्या यायला लागल्या. आम्ही थोडीफार तयारी केली आणि बाकी होईल तसं बघू असं ठरवलं. ज्या दिवशी वार्याचा अंदाज होता, त्या दिवशी दुपार पर्यंत सगळं शांत होतं. अगदी वादळापूर्वीची शांतता म्हणतात ती हीच. दुपार नंतर मात्र हळूहळू पाऊस, वारा सुरू झाला. नंतर पाऊस थांबला पण वारा मात्र खरोखर खूप सोसाट्याचा होता. ताशी ५० ते ६० मैल प्रतितास वेगाने वारा वहात होता. शिवाय ह्या परिसरात सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून उत्तरेला वारा असतो आणि त्यामुळे झाडांना त्या वार्याला तोंड द्यायची सवय असते. पाण्यातली लव्हाळी कशी प्रवाहाच्या दिशेने न मोडता वाकू शकतात तसच. पण ह्यावेळी मात्र हा वारा वायव्येहून आग्नेयेकडे होता, त्यामुळे झाडांची पडझड लगेचच व्हायला लागली आणि थोड्याच वेळात वीज गेली. ढग खूप होते, त्यामुळे चंद्रप्रकाशही नव्हता. त्या किर्र काळोखात वार्याचा जोराचा आवाज आणि गदागदा हलणार्या मोठ मोठ्या झाडांच्या आकृत्या हे प्रचंड भितीदायक दृकश्राव्य वातावरण होतं. रात्री बराचवेळा वार्या पावसाचं थैमान सुरू होतं. सुदैवाने आमच्या अंगणात फार पडझड झाली नाही. पण शेजारी झाड पडून आमच्या कॉलनीतून बाहेर जायचा रस्ता बंद झाला. शहरातल्या सुमारे सहा लाख घरांमध्ये पुढे जवळजवळ पाच दिवस वीज नव्हती.
https://youtube.com/shorts/xxnrs16a2l4
खग्रास सूर्यग्रहण, माऊंट रेनियर वरून दिसणारा सूर्योदय आणि आकाशगंगा, प्रवाहाच्या विरुद्ध जाणरे सालमन मासे, अन्नासाठी
रोज मैलोन मैल पोहणारे निळे पेंग्विन, ह्यांशिवाय अगदी अंगणातून दिसलेले नॉर्दन लाईट्स, फक्त न्युझिलंडमध्येच दिसणारे गुहांमधल्या भिंती उजळवून टाकणारे ग्लो-वर्मस ह्या सगळ्यांपुढे वादळा वारा ही गंमत नव्हती. पण असं म्हणतात की समतोल पाळणे हा निसर्ग नियमच आहे. त्याला अनुसरून निसर्गाने आधीच्या गंमतींबरोबरच बॉम्ब सायक्लॉनचा बडगा दाखवला आणि ह्या निसर्गायणाला हलक्यात किंवा फक्त मजेतच न घेण्याची एक प्रकारची समजच दिली!
निसर्गाच्या नोंदी आवडल्या.
निसर्गाच्या नोंदी आवडल्या. मस्त लेख.
वा वा! अतिशय चित्रदर्शी वर्णन
वा वा! अतिशय चित्रदर्शी वर्णन! अगदी रंगून जायला झालं वाचताना!
फोटो असले तर तेही बघायला आवडतील.
बापरे एका लेखात बरेच काही आले
बापरे एका लेखात बरेच काही आले.. फोटो नसून देखील आधी याचे पाहिलेले फोटो डोळ्यासमोर आले.
वाचायला आवडलंच पण थोडे फोटो
वाचायला आवडलंच पण थोडे फोटो असते तर बरं असंही वाटलं.
निसर्गापुढे माणसाचं काही चालू शकत नाही हे एक बरं आहे. लावली तेवढी वाट पुरे आहे.
खूप सुरेख लेख! फोटोपण असायला
खूप सुरेख लेख! फोटोपण असायला हवे होते असं वाटलं, पण नाहीयेत तरी फार काही बिघडलं नाही असंही वाटून गेलं मग.
अतिशय चित्रदर्शी वर्णन! +1
अतिशय चित्रदर्शी वर्णन! +1
चित्रदर्शी वर्णन! +1
चित्रदर्शी वर्णन! +1
सगळ्यांना प्रतिक्रियांसाठी
सगळ्यांना प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.
मी लेखात म्हंटलं तसं बर्याच ठिकाणी फार फोटो न काढता फक्त अनुभव घेतला होता. आता मित्राकडून घेऊन आणि माझ्याकडचे एक-दोन फोटो लेखात घातले आहेत. वार्याचा एक लहानसा व्हिडीयोही अपलोड केला आहे. फोटो वापरायची परवानगी दिल्याबद्दल माझा मित्र शैलेश भाटे ह्याचे आभार!
चित्रदर्शी वर्णन, फोटो नसले तरी फार बिघडलं नाही ह्या प्रतिक्रिया वाचून छान वाटलं.
मस्त वर्णन
मस्त वर्णन
फोटोंमधे चंद्र नसला तरी
फोटोंमधे चंद्र नसला तरी त्यांनी लेखाला “चार चांद“ नक्कीच लावले आहेत
चित्रदर्शी वर्णन..
चित्रदर्शी वर्णन..
मस्त मस्त!
मस्त मस्त!
अनपेक्षितपणे झालेल्या दर्शनाची गंमत निराळीच असते.
निसर्गाच्या नोंदी आवडल्या.
निसर्गाच्या नोंदी आवडल्या. मस्त लेख. >>> +१
समोर चित्र उभे रहिले
समोर चित्र उभे रहिले
चित्रदर्शी वर्णन +१.
चित्रदर्शी वर्णन +१.
लेख आवडला.
वा! भारीच! एकाच वर्षात इतके
वा! भारीच! एकाच वर्षात इतके विविध आविष्कार बघायला मिळणे म्हणाजे खरंच भाग्य आहे!!
मस्त फोटो! तुझं वर्णन किती
मस्त फोटो! तुझं वर्णन किती समर्पक होतं ते फोटो पाहिल्यावर अधोरेखितच झालं!
मस्त फोटो
मस्त फोटो
फार सुरेख लिहिलं आहेस. फोटो
फार सुरेख लिहिलं आहेस. फोटो पण सुंदर.
फोटो मस्त. तो छोटु पेन्ग्विन
फोटो मस्त. तो छोटु पेन्ग्विन किती क्यूट आहे. आकाशगंगा is very humbling.
छानच.
छानच.
या निमित्ताने न्यूझीलंडचं ओपनिंग झालं.
आणखी थोडे परिच्छेद पाडायला हवे होतेस.
(मला या उपक्रमात दक्षिण आफ्रिकेच्या fynboss वर लिहिण्याची इच्छा होती. पण जमलंच नाही
)
<फोटो काढायच्या फार फंदात न
<फोटो काढायच्या फार फंदात न पडता फक्त डोळे भरून बघून घेतलं. > मला हे आवडलं. कुठे काही प्रेक्षणीय दिसलं की आजकाल आपण ते कॅमेर्यातूनच बघायला आणि टिपायला लागतो. मग ते इतरांना दाखवायची घाई आणि सोस. खोल श्वास घ्यावा तसा तो क्षण पूर्णपणे जगून घेण्यातला आनंद विसरला जातो आहे.
तुम्ही कॅमेर्याच्या मागे न जाता with naked eyes ती दृश्य डोळे आणि मनभरून पाहिल्याने ते क्षण तुम्हांला पुन्हाही आठवणीतून जगता येतात, याचा प्रत्यय या लेखातून आला.
कसलं मस्त लिहिलंयस ! असाच
कसलं मस्त लिहिलंयस ! असाच लिहित रहा म्हणजे आम्हाला वाचायला मिळेल
पुन्हा एकदा सगळ्या
पुन्हा एकदा सगळ्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
काय सुंदर लेख आहे! एकदम
काय सुंदर लेख आहे! एकदम चित्रदर्शीतर आहेच पण विविध ठिकाणची वर्णने एकदम निसर्गयात्राच घडवतात! फोटोही छान आहेत. अजून असते तर आवडलेच असते पण जे आहेत ते ही सुंदर आहेत - मिल्की वे, सोनेरी शिखर ई. यातील काही विशिष्ठ क्षणांची वर्णनेही अगदी वाचनीय आहेत - हिर्याची अंगठी, रेनिअरचे शिखर सोनेरी होणे, पेंग्विन्सची वाट पाहताना ऐकू येणारे इतर आवाज - ही सगळी निरीक्षणे व त्याचे वर्णन - सुरेख आहे.
अतिशय चित्रदर्शी वर्णन! अगदी
अतिशय चित्रदर्शी वर्णन! अगदी रंगून जायला झालं वाचताना!.....+१.
फोटो काढायच्या फार फंदात न पडता फक्त डोळे भरून बघून घेतलं. > >>>>> खूप आवडलं.
मस्त.
मस्त.
सर्व निसर्गाच्या नोंदी आवडल्या.
वाचताना समोर चित्र उभे राहिले.
तुम्ही कॅमेर्याच्या मागे न जाता with naked eyes ती दृश्य डोळे आणि मनभरून पाहिल्याने ते क्षण तुम्हांला पुन्हाही आठवणीतून जगता येतात, याचा प्रत्यय या लेखातून आला.>>>>>> +११११
वा!
वा!