तुम्ही कोणत्या शाळेत जाता?

Submitted by तुष्कीनागपुरी on 18 February, 2025 - 08:40

विचारधारांच्या दोन ध्रृवीय शाळा

तुम्ही कोणत्या शाळेत जाता?

टिम अर्बन यांनी ‘व्हॉट्स अवर प्राबलम’ नावाचे एक वैचारिक पुस्तक लिहिलेले आहे. त्यात त्यांनी दोन प्रकारच्या समुदायांचा उल्लेख केलेला आहे. एकाला ते साईंटिफिक लेबॉरेटेरी म्हणतात त्याला आपण मुक्तप्रयोगशाळा म्हणुया आणि दुसऱ्याला ते इको चेंबर म्हणतात त्याला आपण प्रतिध्वनीशाळा म्हणुया.

मुक्तप्रयोगशाळा हा जो समुदाय असतो तो वैज्ञानिक विचारधारा असलेली विचार बैठक घेऊन असतो. यांच्यात रूढ असलेली तत्थे आणि गृहितके ते तात्पुरते सत्य मानतात. जोपर्यंत त्या तत्थाला मोडता घालणारे अधिक सूक्ष्म ज्ञान उपलब्ध नाही तोपर्यंत ते तत्थ सत्य मानले जाते. आपल्या सध्याच्या समजांना तत्थांना ते सतत तपासत राहतात, किंबहुना तपासायला ते तयार असतात. कुणी त्यांच्या एखाद्या विधानाला खोटे ठरवणारे पुरावे दिले किंवा मोडता घातला तर त्याचे स्वागत होते आणि आपली विधाने या घटनेने अधिक तपासल्या जातील ताऊन सुलाखून अधिक लख्ख होतील असे मानले जाते. हे अगदी आपल्या प्राचिन काळातल्या शास्त्रार्थाचे वर्णन वाटावे असे आहे.

टिम भाऊंनी उल्लेख केलेले मुक्तप्रयोगशाळा आपल्या प्राचीन ग्रंथांमधे उल्लेख केलेल्या आहेत ते शास्त्रार्थ नावाने असे समजून घेतले तर ही संकल्पना आपल्या संदर्भात समजून घेता येईल

प्रतिध्वनीशाळा हा जो समुदाय असतो तिथे काही खास लोकांचे अधिक महत्व असते. त्यांनी लिहिलेले सांगितलेले म्हटलेले हे ब्रह्मवाक्य समजले जाते. काही किरकोळ गोष्टी चर्चा आणि आवाहनास उपलब्ध असतात ज्याने ते स्वतःला पुरोगामी दाखवतात पण अनेक गोष्टी थिजलेल्या असतात ज्या ते बदलायचा विचार पण करायला तयार नसतात. या गटात जर कुणी काही विशिष्ट लोकांच्या मतांना किंवा रूढींना आव्हान द्यायला आले किंवा प्रश्न उपस्थित केले तर ते गटाचे शत्रू समजले जातात. आमच्या खास व्यक्तीने म्हटलेल्या गोष्टीला प्रश्न विचारले म्हणजे ते आपल्या गटाचे शत्रू असे जाहीर केल्या जाते.

सध्या प्रत्येक प्रस्थापित धर्मात आणि पंथांमधे अश्या प्रतिध्वनीशाळा तयार झालेल्या मला दिसतात. या अश्या प्रकारचे दोन विचारधारांचे गट याबद्दल वाचल्यावर माझ्या मनात शोध सुरू झाला की आपण सुद्धा अश्या काही प्रतिध्वनीशाळांचे सभासद असू शकतो आणि मग आपल्याच विचारांचा तपास आणि अनुसंधान करण्याची सुरवात झाली.

सध्या आंतरजालामुळे आणि खास करून युट्यूब (याला तूनळी म्हटलेले वाचलेय कुठेतरी आणि मला तो शब्द आवडला पण होता, तरीही हे कंपनीचे आणि उत्पादनाचे नाव असल्याने आहे तसे वापरायला हरकत देखील नाही). इथे आपल्याला स्थापित असलेले एखादे प्रमेय किंवा विधान यावर समिक्षात्मक दुसऱ्या बाजूने कुणी काय म्हटले आहे ते सापडायला सोपे जाते आणि मग ते विचार आपल्या विचारांशी घासून त्यांना प्रतीउत्तर देता येते का पाहता येते. जिथे तसे उत्तर देता येत नाही तिथे आपल्याजवळची माहिती कमी पडतेय किंवा आपली बाजू अजून सर्व बाजुंनी आपल्याला कळलीच नाहीये हे समजते आणि त्या विषयात अधिक अभ्यास करायला वाव आहे हे पुढे येते.

सध्या यज्ञदेवम यांच्या इंडस शिलालेखांची लिपी यावर उपलब्ध झालेल्या शोध निबंधांवर साधक बाधक चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत. प्रत्येक बाजूच्या लोकांना त्यातून हवे असलेले पुरावे मिळताहेत आणि ते सगळे ऐकतांना वाचताना या दोन्ही विचारशाळा समोर येताहेत त्या अनुषंगाने हे सगळे आठवले.

मला जे पुस्तक अतिशय प्रिय आहे आणि ज्याचा मला खूप फायदा झाला ते म्हणजे, स्टीवन कवी यांनी लिहिलेले सेवन हॅबिट्स ऑफ हायली फेक्टिव पिपल, त्यावर स्काट यंग आणि बरेचसे रेडिटर्स यांच्या लिखाणातून सडकून टीका आणि उणीवा काढल्याचे वाचले तेव्हा मी हादरलो होतो. आपली प्रतिध्वनीशाळा झाली आहे की काय असे वाटले होते.

तुम्हाला असे तुमचे जुने ठोकताळे उद्ध्वस्त कसणारे नवे लिखाण किंवा विचार मिळाले आहेत का? ते समोर आल्यावर तुम्ही काय केले? विरोधात बोलणाऱ्याच्या उद्देशांनाच दोष देऊन एड होमिनिम हल्ला चढवणे सर्वात सोपे असते तसे न करता तुम्ही त्यावर काही वेगळे केले आहे का?

(शाळकरी)
तुषार जोशी
नागपूर, घुरूवार, २३ जानेवारी २०२५

Group content visibility: 
Use group defaults

सध्या यज्ञदेवम यांच्या इंडस शिलालेखांची लिपी यावर उपलब्ध झालेल्या शोध निबंधांवर साधक बाधक चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत.>>> हे कुठे चालू आहे???

स्टीवन कवी यांनी लिहिलेले सेवन हॅबिट्स ऑफ हायली फेक्टिव पिपल, त्यावर स्काट यंग आणि बरेचसे रेडिटर्स यांच्या लिखाणातून सडकून टीका आणि उणीवा काढल्याचे वाचले तेव्हा मी हादरलो होतो. >>>> कन्फर्मेशन बायसच्या सापळ्यात फक्त सामान्य लोकच नाही तर मी मी म्हणणारे वैज्ञानिक दृष्टीकोन आणि कार्यपद्धती ठेवणारे संशोधक सुद्धा कसे फसलेले आहेत हे डॅनियल कानमन यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखवले आहे.

तुम्हाला असे तुमचे जुने ठोकताळे उद्ध्वस्त कसणारे नवे लिखाण किंवा विचार मिळाले आहेत का? >>>-थिंकींग फास्ट ॲंन्ड स्लो

ते समोर आल्यावर तुम्ही काय केले?>>>- पुन्हा पुन्हा त्याचे वाचन केले, कॉन्सेप्ट्स समजून घेतले, LLM च्या सहाय्याने, रिसर्च पेपर्स धुंडाळून विषयाच्या खोलात जायचा बऱ्यापैकी प्रयत्न केला, स्वतःच्या अनुभवांशी ताडून पाहीले.

विरोधात बोलणाऱ्याच्या उद्देशांनाच दोष देऊन एड होमिनिम हल्ला चढवणे सर्वात सोपे असते तसे न करता तुम्ही त्यावर काही वेगळे केले आहे का?>>> I had no option but to surrender to that kind of research & knowledge.

वाचायला अवघड पण चांगला आहे.
खर आहे कळप झालेत, प्रत्येक धर्म , देश, पंथ सगळीकडेच.

सध्या algoritm च असे लावलेत की ते हे गटवादीकरण आणि त्यातील दरी/ विरोध/ द्वेष प्रबळ करत जातात...
दुसरी बाजू ऐकायला मुद्दाम जाऊन खोदून खोदून शोधावे लागते.

आत्ता लगेच आठवत नाहीये.
पण जर संदर्भ/ प्रमाण दाखले/ दिले, तार्किक दृष्ट्या पटणारे असेल तर दाखवलेल्या चुका/ समाज सुधारायला/ बदलायला नक्कीच आवडतं... जी कमतरता असेल ती भरून निघण्याची एक संधी मिळते.
पण उगाच आम्ही म्हणतोय म्हणून ते करा किंवा चुकीच्या/ न पटणाऱ्या गोष्टी करत रहा हे मात्र अजिबात जमत नाही.

@फार्स, @छन्दिफन्दी,
अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद.
.
> सध्या यज्ञदेवम यांच्या इंडस शिलालेखांची लिपी यावर ... चर्चा आणि वादविवाद कुठे चालू आहे???
.
युट्यूब आणि रेडिट वर अनेक धागे मिळतील. त्यांचे शोध ज्यांच्या प्रमेयांना साधक आहेत ते त्यांना उचलून धरताना आणि ज्यांच्या प्रमेयांना बाधक आहेत त्यांना टिका करताना वाचायला मिळेल.
.
> सध्या algoritm च असे लावलेत की ते हे गटवादीकरण आणि त्यातील दरी/ विरोध/ द्वेष प्रबळ करत जातात...
.
आपल्याला असे काही सूत्र तयार करता येते का जे येणाऱ्या गोंगाटातून संकेत तेवढे वेगळे करून आपली मदत करेल याचा विचार सुरू आहे. मराठीत या संकल्पना लिहून त्यावर मराठीत विचार करून देखील काही वेगळे हाती लागेल अशी आशा आहे त्यामुळे वाचायला अवघड वाटले तरीही मी मराठीत लिहून बघतोय.
.

@फार्स, @छन्दिफन्दी,
अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद.
.
> सध्या यज्ञदेवम यांच्या इंडस शिलालेखांची लिपी यावर ... चर्चा आणि वादविवाद कुठे चालू आहे???
.
युट्यूब आणि रेडिट वर अनेक धागे मिळतील. त्यांचे शोध ज्यांच्या प्रमेयांना साधक आहेत ते त्यांना उचलून धरताना आणि ज्यांच्या प्रमेयांना बाधक आहेत त्यांना टिका करताना वाचायला मिळेल.
.
> सध्या algoritm च असे लावलेत की ते हे गटवादीकरण आणि त्यातील दरी/ विरोध/ द्वेष प्रबळ करत जातात...
.
आपल्याला असे काही सूत्र तयार करता येते का जे येणाऱ्या गोंगाटातून संकेत तेवढे वेगळे करून आपली मदत करेल याचा विचार सुरू आहे. मराठीत या संकल्पना लिहून त्यावर मराठीत विचार करून देखील काही वेगळे हाती लागेल अशी आशा आहे त्यामुळे वाचायला अवघड वाटले तरीही मी मराठीत लिहून बघतोय.
.

आपल्याला असे काही सूत्र तयार करता येते का जे येणाऱ्या गोंगाटातून संकेत तेवढे वेगळे करून आपली मदत करेल याचा विचार सुरू आहे.>>>> सूत्र! यावर काहीही गवसले तरी नक्की लिहा.....अर्धे कच्चे पक्के ही चालेल....नव्या विचारांना चालना मिळेल.

@फार्स,
मनात साचलेले बरेच काही सांगण्यासाठी एक समान विचारांची बैठक लागणार आहे त्यामुळे क्रमाने काही विचार मांडून मग त्यांच्या आधाराने पुढचे काही विचार चर्चेत घ्यायचे असे ठरवून पुढच्या लेखांमधे प्रयत्न सुरू केला आहे. https://www.maayboli.com/node/86414 -> हा लेख त्यातलाच एक तेव्हा तिथे नक्की तुमचा अभिप्राय कळवा