न काढलेलं चित्र

Submitted by शिल्पा गडमडे on 14 February, 2025 - 16:24

समोर पसरलेला मोठा कोरा कागद.. त्याशेजारी कोरून ठेवलेली पेन्सिल, पांढराशुभ्र खोडरबर.. आणि कागदावर काय चित्र काढावं याचा विचार करत तिथेच अडकून पडलेलं तिचं मन.

तसं पाहिलं तर तिचा आणि चित्रकलेचा फारसा जवळचा संबंध नव्हता कधी. लहानपणी चित्रकलेच्या तासाला किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीतला अभ्यास म्हणून चित्र काढायला सांगत तेव्हादेखील कागदावर चित्र उमटायच्या आधीच मनात गोंधळ उडायचा. चित्रकलेत नैसर्गिक गती असलेले मित्रमैत्रिणी सहज फुलपाखरं, डोंगरदऱ्या, घर रेखाटायचे, पण तिला मात्र एक साधं फूलसुद्धा काढणं आव्हानासारखं वाटायचं. अशा वेळी ट्रेसिंग पेपरचाच आधार वाटायचा तिला—रेषा उमटवण्याची एक सोपी पण फसवी युक्ती!

ती ज्या निवासी शाळेत शिकत होती, तिथे चित्रकलेचे उत्तम शिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी चित्रकलेच्या एलिमेंटरी परीक्षेची तयारी करत होते. तिच्यासोबत निवासी शाळेत शिकणारी तिची बहीणसुद्धा परीक्षेला बसणार होती. मात्र, शाळा लहान गावात असल्यामुळे परीक्षेसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागणार होतं. पालक महिन्या दोन महिन्यातून मुलांना भेटण्यास येत असत पण निवासी शाळा असल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जाण्याची जबाबदारी शिक्षकांवरच होती. योगायोग असा की, परीक्षा ज्या शहरात होती, तिथे तिचे काही नातेवाईक राहात होते. त्यामुळे परीक्षेनंतर दोन दिवस त्यांच्याकडे राहण्याची परवानगी तिला आणि तिच्या बहिणीला पालकांनी घेऊन ठेवली होती. प्रत्यक्ष परीक्षेशी तिचा काहीच संबंध नसला तरी तीही या प्रवासाचा एक भाग बनली होती.

परीक्षेच्या दिवशी सकाळी लवकर निघून शिक्षक आणि विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले. तिला वगळता सोबत आलेले सगळे विद्यार्थी परीक्षा देणार होते. तिचं चित्रकलेचं कौशल्य अगदीच प्राथमिक असल्यामुळे नावपूरते देखील परीक्षा देण्याचा काही संबंधच नव्हता. सगळे विद्यार्थी परीक्षा देत असताना जिल्ह्यातील इतर काही कामं उरकावीत असा शिक्षकांनी विचार केला. पण या दहा-अकरा वर्षांच्या मुलीचं काय? तिला आपल्यासोबत उन्हात फिरवत कशाला न्यायचं?

शेवटी, त्यांनी तिला सरळ परीक्षागृहातच बसवायचं ठरवलं. “नाव विचारलं तर सांग… आणि काहीतरी काढत बसल्यासारखं कर!” असं सांगून तिला इतर विद्यार्थ्यांसोबत परीक्षा केंद्रावर सोडून दोन्ही शिक्षक बाहेर पडले.

आता तिच्यासमोर होता मोठा कोरा कागद. बाजूला पेन्सिल, खोडरबर… आणि मनात अपरिमित गोंधळ. काहीही काढायचं म्हणजे काढायचं तरी काय? तिचा हात कितीतरी वेळा कागदाजवळ गेला आणि पुन्हा मागे आला.

आजूबाजूला बाकी विद्यार्थी आपल्या रेखाटनात मग्न होते. कोणी समोर ठेवलेल्या तबकातली फळं आणि भांडी निरखून स्थिर चित्र रेखाटत होतं. कोणी निसर्ग चित्र काढत होतं तर कोणीतरी पावसात खेळणारी मुलं, दिवाळीत आकाशकंदील लावणारे लोक, किंवा गावातली बैलगाडी रेखाटण्यात गुंग होतं.

तिला हे सगळं पाहून अजूनच घाबरल्यासारखं वाटलं. स्वतःच्या कागदाकडे पाहिलं- तो अजूनही कोराच! हातात पेन्सिल होती, पण मनात ठाम कल्पना नव्हती. परीक्षकाच्या करड्या नजरेने तिचा गोंधळ ओळखला.

"काय काढायचं ठरलं नाही का अजून?" त्यांनी विचारलं.
"हो... म्हणजे नाही... मी..." तिचा आवाज अडखळला.
"तुझं नाव काय?" म्हणत परीक्षकाने परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाची यादी तपासायला सुरुवात केली.

ती गडबडली. उत्तर द्यावं की नाही_याचा ती विचार करत होती. तिचा गोंधळ अजूनच वाढला. एवढासा जीव—खरं काय, खोटं काय सांगावं, हेच तिला कळेना. तिच्या घुटमळणाऱ्या उत्तरांमधून सत्य उघड झालं. मग काय— परीक्षेला नावनोंदणी न केलेल्या तिला, परीक्षकांनी सरळ परीक्षागृहाबाहेर काढलं!

बाहेर पडताना तिच्या हातून पेन्सिल गळून पडली.

परीक्षागृहाबाहेर पडण्याचा वेग जास्त होता की तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंचा, याचं भान तिला नव्हतं. बाहेर पडताच, कोणी पाहू नये म्हणून ती एका कोपऱ्यात भिंतीला टेकून उभी राहिली. वरून ऊन तळपत होतं, आणि ती अपमानाने लालेलाल झाली होती.

हे जे तिच्यासोबत झालं त्याला अपमान म्हणायचं की काही वेगळं, हे देखील नीटसं कळण्याचं वय नव्हतं तिचं. तिच्यासोबत आलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांपैकी कुणीच काही बोललं नाही, परीक्षकाला काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही, हे तिला सुन्न करत होतं. एक ना दोन—असे असंख्य प्रश्न मनात घोंगावत होते. मनात विचारांचा गोंधळ सुरू असताना, तिच्या नजरेसमोर परीक्षागृहातून बाहेर पडणाऱ्या दोन ओळखीच्या सावल्या पाठमोऱ्या दिसल्या.

अश्रुपूर्ण नजरेने तिकडे बघत असताना तिला जाणवलं की ते दोघे तिचे शिक्षक होते. मोठ्याने त्यांना आवाज द्यावा असं क्षणभर वाटलं, पण त्या क्षणी तिला तेही करावंसं वाटलं नाही. ते दोघं बरेच लांब गेल्यावर मात्र तिने त्यांना जोरात हाक मारली आणि त्यांच्या दिशेने धावत सुटली. त्यांच्यातील एक चित्रकलेचे शिक्षक होते, तर दुसरी स्त्री शिक्षिका— त्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय कडक म्हणून ओळखल्या जायच्या.

ती जवळ पोहोचताच, त्या शिक्षिकेने तिला अलगद जवळ घेतलं.

"शांत हो, पाणी पी आधी." म्हणत तिला शांत करत पाणी प्यायला दिलं.

त्या जवळच्या बागेत बसल्या. त्यांनी तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि हलकेच तिच्या केसांवरून हात फिरवत राहिल्या. ती हळूहळू शांत होत गेली, पण त्या स्पर्शाने मनात दाटून आलेलं बरंच काही पाझरत राहिलं. कडक शिक्षिकेची प्रतिमा तोडून तिची शिक्षिका मायेची पाखर घालत होती आणि तिच्या मनात एक आठवण कोरल्या गेली जे कुठल्याच कागदावर उतरू शकली नसती- कुठल्याच चित्रकाराकडून. चित्र न काढता येण्यामुळे तिच्या मनात एक चित्र कायमचं कोरलं गेलं— न काढलेलं चित्र. कुठल्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान.

#सुरपाखरू
@शिल्पा गडमडे
१२.०२.२०२५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा आवडली. वेगळ्या विषयावर लिहिले आहे. त्यातून चित्रकलेत मला गती नसल्यामुळे त्या लहानगीची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करू शकले.

अगदी चित्रकथा लिहिलीत. प्रसंगांमध्यते हरवून जायला होते, पुढे काय होणार याची उत्सुकता पण ‘गोडी अपूर्णतेची..’ ठेवून जाते.

ऑह Sad

छान कथा.. आवडलीच.. वेगळीच
या प्रकारचे बरेच प्रसंग डोळ्यासमोर आले जे स्वतःशी घडले होते..

कथा आवडली आणि त्यातले प्रसंग तुम्हाला ओळखीचे वाटले हे आवर्जून कळवलंत त्याबद्दल धन्यवाद सामो, urmilas, तुषार जोशी, ऑर्किड, जाई, ऋन्मेष.