चुकीची दुरूस्ती – शब्दांवर अर्थांचे प्रक्षेपण बदलत असते

Submitted by तुष्कीनागपुरी on 13 February, 2025 - 04:00

एक जुनी कविता आहे ती खाली देतो आहे पण आज या कवितेतल्या एकाच शब्दाबद्दल बोलायचे आहे.
ती कविता अशी होती:

कुणी अर्थ देता का अर्थ

मित्रांनो..
आता कविता अडखळली आहे
रदिफ अलामत काफियांच्या गराड्यात
अडकून कोरडी पडली आहे
तांत्रिक दृष्ट्या तरबेज असूनही
वजनामधे ढळली आहे
कोणी अर्थ देता का अर्थ..

कवितेला हवाय
आता गंध
आतून येणाऱ्या संवेदनेचा
आणि एक ओलावा हवाय
भावनांच्या शिडकाव्याचा
याला त्याला उत्तरे देण्यात
माझी कविता गुंतली आहे
बोनसाय होऊन, आपलाच तोरा
मिरवताना खुंटली आहे
कोणी अर्थ देता का अर्थ…

वाचल्यावर काटा येईल
असा एक विषय हवाय
पाणी डोळा काठी येईल
असा उदात्त आशय हवाय
तिला वाचताच
हृदयाच्या आतून दाद द्यावी लागेल
असा प्रभाव ज्याचा परिणाम
हृदयाचा ठोका मागेल

मित्रांनो
त्याच त्याच विषयातून फिरून
कविता थकली आहे
काहीच कळेनासे होऊन
मटकन खाली बसली आहे..

कुणी अर्थ देता का अर्थ…

~ तुष्की नागपुरी

या कवितेत मी बोन्साय शब्दाला विशेषणासारखे योजले आहे. कवितेत लिहिताना असे बरेचदा होते की शब्दाचे रूप बदलून नवे विशेषण किंवा क्रियापद घडून जाते. या ओळीत कविता बोनसाय होऊन मिरवते आहे पण खुंटलेली आहे असे म्हणताना बोनसाय या संकल्पनेला नकारात्मक अर्थाने मी योजले होते.

अनेक लोकांच्या लिखाणात मला कदाचित हाच अर्थ वाचायला मिळाला असणार आणि तसाच अर्थ माझ्या मनात राहिला असणार म्हणून तेव्हा मला हा शब्द योजताना काहीतरी झकास उपमा मिळाली असे वाटले असणार.

आज चंद्रशेखर गोखलेंच्या भिंतीवर कुणीतरी बोन्साय होतांना झाडांना यातना होत असतील असे मनात येऊन कसे बोन्साय अगदी बघवत पण नाही असे काहीसे मत वाचायला मिळाले, आणि मनात विचार सुरू झाला.

जापानी भाषेमधे हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे (जापानी भाषा शिकत असण्याचे हे परिणाम आहेत की त्या शब्दाची उकल करायची बुद्धी झाली) आणि त्याचा अर्थ छोट्या कुंडीत लावलेले झाड इतकाच होतो. त्याला कोणतीच नकारात्मक छटा नाही अगदी न्यूट्रल अर्थ आहे.

बरेच लोकांचे बोन्साय शब्दाचे प्रयोग शोधून वाचले तेव्हा अनेक लोकांना तो शब्द खुजेपणा, खुंटणे, मनातले उड्डाण राहून जाणे, सावली देण्याची संधी न मिळणे, पक्षांची घरटी धारण न करता येणे अशी यातना आणि छळ प्रकट करणारा आहे असे वाटल्याचे दिसून येते, किमान मराठी लेखकांमधे तरी तसे मला बरेच सापडले.

जे बोन्साय जोपासण्याच्या दृष्टीने करतात आणि ज्यांना बोन्साय ही कला येते माहिती आहे अश्या लोकांचे मराठीतले देखील लिखाण वेगळा दृष्टीकोण मांडते. ती एक जापानी कला आहे आणि त्यात सौदर्य दिसते बिन्साय कला जोपासणाऱ्यांना.

कोरा डॉट कॉम या समाज माध्यमावरच्या पानात तर काही लोकांचे प्रश्ण आहेत की बोन्साय म्हणजे झाडांवर अत्याचार करणे आणि त्यांना यातना देणे नाही का? तिथेच काही उत्तरे हे देखील सिद्ध करणारी आहेत की झाडांना मुळे कापली तर यातना होत नाहीत, पाने कापली तरी यातना होत नाहीत. निसर्गात पाने गळणे फांद्या कापल्या गेल्या की अधिक जोमाने पुन्हा पालवी धरणे हे चक्र सुरू असते आणि त्याला अत्याचार म्हणता येणार नाही इथपर्यंत मते वाचायला मिळाली.

मलाच माझ्या मनातला बोन्साय शब्दाचा अर्थ साधक बाधक फेरविचार केल्यावर बदलावासा वाटला. आता बोन्साय शब्द माझ्या मनात नकारात्मक उरलेला नाही. वरच्या कवितेतही मी तो शब्द बदलून वेगळा शब्द योजणार आहे.

बोन्साय झाड हे आकाराने छोटे असते. झाडाने पूर्ण वाढ होताना जे रूप साकारायचे असते ते त्या छोट्या आकारात देखील त्या झाडाला साकारता आलेले असते. ते एक वेगळे प्रकटीकरण म्हणता येईल पण खुजे, वाढ खुंटलेले असे म्हणता येणार नाही.

निसर्गातही अनेक जागांवर प्राकृतिकरित्या जिथे बिकट परिस्थिती असते, मुळांना धड जागा मिळत नाही तिथे देखील प्राकृतिक बोनसाय पाहायला मिळतात. झाडातले जीवन द्रव्याची जिद्द अशी दिसते की मिळेल त्या परिस्थितीत ते त्याच्या प्रोढ रूपाला साकार करते. जी जीवन तत्वाची जिद्द आहे जी कमी जागेत जसे छोटी कुंडी असली तरी संपूर्ण वाढ झालेले झाड दिसावे त्या रूपात ते झाड वाढते, छोट्या आकारात पूर्ण रून साकारत वाढते आणि अगदी शभ्भर दोनशे वर्षे जगणारी बोन्साय झाडे असल्याचा उल्लेख देखील वाचायला मिळतो.

असा विचार मनात आला तेव्हा बोन्साय माझ्यासाठी जिद्दीचे, प्रखर आशावादाचे आणि कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्याच्यातही वाट शोधून आपले रूप साकारण्याचे प्रतीक झाले.

त्या बोनसाय होणाऱ्या झाडाला चेतनगुणोक्ती मधे गुंतवून (मानवी भावना कल्पून) त्याला यातना होताहेत, छळ होतोय हा अनुमान लावणे काव्यात शक्य आहे आणि म्हणूनच खुजे होण्याच्या वाईट होण्याच्या अर्थाने या शब्दाला अजूनही वापरलेले आढळेल, आणि मला त्या शब्दाचा लेखकाला जसा अर्थ हवाय तसाच मानावा देखील लागेल, पण आता मी जेव्हा हा शब्द वापरेन तेव्हा मला त्या शब्दात जगण्याची सापडलेली जिद्द, तीव्र जगण्याची इच्छा आणि आशा दिसेल यात शंका नाही.

परिस्थितीने रूजायला कमी जागा दिली
तर त्याने जिद्द सो़डली नाही,
बोन्साय होऊन छोट्या रूपात का होईना
फुलणे पत्करले.

असे काहीतरी आता माझ्या लिखाणात उमटू लागेल अशी आता त्या शब्दाची स्थिती माझ्या मनात बदलली आहे.

तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का की आधी वापरलेले शब्दांचे अर्थच बदलून गेलेत आणि आताच्या जाणिवा शब्दांना वेगळेच अर्थछटा देताहेत, आणि जुना योजलेला शब्द बदलावासा वाटतोय इतकी पाळी आली आहे?

(शब्दशः)
तुषार

Group content visibility: 
Use group defaults

माझ्यापुरते वैयक्तिक बोलायचे तर झाडे माझ्यासाठी फक्त एक जीवशास्त्राचा भाग नाहीत. माझ्या आयुष्यात झाडांना सांस्कृतिक, आध्यात्मिक, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, पर्यावरण, वास्तूशास्त्र, एनर्जी फील्ड असे बहुआयामी स्थान आहे. त्यामुळे बोन्साय करून कृत्रिमरीत्या तुमच्या घरात असलेल्या किंवा तुमच्या मालकीच्या झाडांची वाढ खुंटवणे तुमच्या आयुष्यावर बहुआयामी परिणाम करते यावर माझातरी ठाम विश्वास आहे.

निसर्गातही अनेक जागांवर प्राकृतिकरित्या जिथे बिकट परिस्थिती असते, मुळांना धड जागा मिळत नाही तिथे देखील प्राकृतिक बोनसाय पाहायला मिळतात.

>> बोन्सायच्या समर्थनार्थ हे विधान अगदीच चीड आणणारे आहे. जन्मत: हात पाय नसलेली बालके जन्माला आली तरी स्वतःच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आधारे ती आपले जीवन व्यतीत करतातच. म्हणून स्वतः हून पुढाकार घेऊन एखाद्या बालकाचे हात पाय तोडून "त्यात काय एवढे मोठे" असा आव आणलात तर जितके संतापजनक होईल तितकेच !!

बोन्साय हा शब्द कविता अथवा कथेत नाकरात्मक छटेत वापरलेला पाहिले आहे.
तुम्ही म्हणता तो सकारात्मक अर्थही योग्य वाटतो.

पण साहित्यात बोन्साय हा शब्द अमुक अर्थानेच वापरावा असे असु नये असे मला वाटते. योग्य संदर्भानुसार वापर होईल तसा अर्थ व्यवस्थित पोचत असेल तर तर पुरेसे होईल.

मुळातच वनस्पतींना भावना असत नाहीत, याचा अर्थ असा होत नाहीत की त्या परिसृष्टीतील उद्दीपकांप्रती (stimulis) संवेदनशील नसतात. पण त्यांच्या या प्रतिक्रिया कोणत्याही भावनिक प्रक्रियेशी निगडीत असत नाहीत, तशाच त्या बोन्साय केलेल्या झाडाच्याही असतात. त्यामुळे बोन्साय हा शब्द विशेषण म्हणून वापरुन आपण त्या अन्वये कोणता अर्थ ध्वनीत करतो आहे अथवा सुचवू इच्छितो हा सर्वस्वी त्या त्या लेखकाच्या वैयक्तिक परसेप्शन चा प्रश्न, त्याने काहीही अर्थ विचारात घेतला/ प्रक्षेपित केला तरी तो ओपिनियनेटेड आणि त्या विचारामुळे बोन्साय ही फक्त एक छोट्या कुंडीत मोठे झाड लावण्याची कला या मूळ तथ्याला कहीही धक्का लागायची शक्यता संभवत नाही.

छान. बोन्साय बद्दल वेगळा विचार...

दुधाची तहान ताकावर...
मला ही म्हण कधीच पटत नाही. कारण मला पर्सनली दुधापेक्षा ताक जास्त आवडते. त्यामुळे मी ही म्हण कधीच वापरत नाही. माझा यावर धागा सुद्धा होता. मिळाला तर शोधून देतो.

वेळेला केळं.. ही म्हण मात्र मी वापरतो. कारण मला ते बिलकुल आवडत नाही. पण केळे खूप आवडणारे सुद्धा असतीलच की..

साहित्यात रुजलेल्या उपमा सर्वांनाच सर्वकाळ लागू होत नाहीत

> जन्मत: हात पाय नसलेली बालके जन्माला आली तरी

@पियू, इथे काही तरी गल्लत होतेय असे मला वाटते. माणसांची आणि झाडांची जैविक रचना वेगळी असते हे आधी समजून घ्यावेच लागेल. त्यामुळे झाडाचे मूळ कापणे आणि मुलाचे पाय कापणे सारखेच असते असे म्हणणे इतके सरसटिकरण करता येणारच नाही. ती तुलना बरोबर ठरणारच नाही.

झाडाला आपण उपमा म्हणून वापरतो, झाडासारखा विशाल आणि उदात्त वगैरे पण त्यापुढे जाऊन झाडाच्या फांद्या कापणे यांना माणसाच्या हातांना कापणे या क्रूरतेशी त्याची तुलना ही अतिशयोक्तीच ठरेल.

माळी रोज आणि सगळीकडे झाडांच्या फांद्या कापत असतात, मुळे सुद्धा जिथे अधिक झाले तिथे छाटत असतातच, त्याला आपण झाडांना यातना देणे म्हणत नाही, तर मशागत करणे, खुरपी करणे, छाटणी करणे असे म्हणतो.

कविता आवडली.
बोन्साय शब्द मराठीत रूढ अर्थाने वापरला असेल आणि वाचकांपर्यंत कवीचे म्हणणे पोहोचले असेल तर पुरेसे नाही का?
एखाद्या प्रतिमेला अर्थ चिकटवणे, चिकटणे हे कवितेत होतंच.
अर्थात, त्या शब्दाचा अर्थ नकारात्मक नाही हे समजले म्हणून दुसरा शब्द योजावा हा विचार सुद्धा चूक नाही.
बोन्साय म्हणजे झाडाचे खुजे रूप (जे प्राकृतिक नाही) हे पण चूक वाटत नाही. प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन भिन्न असणार म्हणून एकमत अशक्य वाटते.

माळी रोज आणि सगळीकडे झाडांच्या फांद्या कापत असतात, मुळे सुद्धा जिथे अधिक झाले तिथे छाटत असतातच, त्याला आपण झाडांना यातना देणे म्हणत नाही, तर मशागत करणे, खुरपी करणे, छाटणी करणे असे म्हणतो.

>> त्याची तुलना मी नखे कापणे, केस कापणे, दाढी मिश्या, आयब्रोज, वॅक्सिंग वगैरेशी करेन. पूर्ण वाढ खुंटवणे आणि फक्त ब्युटीफीकेशन करणे यात फरक आहे.