समविचारी प्रेरणांची समष्टी

Submitted by तुष्कीनागपुरी on 11 February, 2025 - 05:22

गमतीदार उदाहरण आहे पण रानात एकट्या पडलेल्या कोल्ह्याला आकाशाकडे बघून कोल्हेकुई करताना आणि रानातून सर्व बाजूंनी त्याला उत्तरादाखल इतर कोल्ह्यांचे कोल्हेकुई चे सूर त्याच्या सुरात शामिल होताना अनेक चित्रपटांमधे पाहिले आहे. त्या बिचाऱ्या एकट्या कोल्हयाच्या पिल्लाला कुणाला शोधणे सोपे नसेल कदाचित पण ते कुठे आहे त्याची जाणीव सर्व रानाला करून देणे त्याला उपजत येत असते. त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाला प्रसारित करणे कळते आणि तितके इतर रानाला ते पुरेसे असते.

दोन हजार आठ सालाच्या आसपास मी मुक्तस्रोत प्रोग्रामिंग एडिटर नेटबिन्स या सॉफ्टवेयर वर काम करत होतो तेव्हा असाच एकटा आणि नवा बच्चू प्रोग्रामर होतो. त्या वेळेस मी एक ब्लाग सुरू केला. तो ब्लाग लिहितांना मी त्या विषयात कोणतेच कौशल्य प्राप्त केलेले नव्हते. मी नेटबिन्स मधे काय कसे करायचे हे स्वतःच शिकत होतो. मी जे काही शिकतोय त्यातूनच अमुक कसे करायचे तमुक कसे करायचे याचे लेख लिहायला सुरवात केली.

जसे मी आज नेटबिन्स सुरू करायला शिकलो त्यासाठी काही वेळ मला शोधाशोध करावी लागली, ती माझ्यानंतर येणाऱ्या कुणाला काही वेळ वाचवता यावा याच प्रेरणेने मी मला जे साधले त्याला लिहून काढत होतो. मला स्क्रिनशॉट घेण्याचा छंद याच वेळात लागला, मी जे करू शकलो त्याचे स्क्रिनशॉट काढायचे आणि आपल्या लेखात टाकायचे म्हणजे माझ्यानंतर येणाऱ्याला तेच करायचे असेल तर माझ्याइतका वेळ घालवावा लागू नये.

सलेल काटा तिथेच ठेवा
फूल खुणेचे जर्द गुलाबी
निदान मागून येणाऱ्यांना
तरी मिळावा स्पर्श सुखाचा
~ प्रसन्न शेंबेकर

या आवडत्या ओळींच्या साथीने आपण कुणाला तरी मदत करतोय ही भावना तेव्हा मनात होती. मी जो प्रवास सुरू केला होता त्यात मी सुद्धा नवाच होतो. मला खूप काही शिकायचे होते. त्या विषयात कौशल्य प्राप्त करायचे होते. हे असूनही ते लेख लिहिणे याने आपण आपल्यासारख्या इतर सहप्रवाशांना काही तरी खूण ठेवत चाललोय ही जाणिव सुखदायी होती.

त्या वेळेस ते नॅटबिंन्स मधे हे कसे करायचे ते कसे करायचे या धरतीचे लेख लिहिणे म्हणजे माझी कोल्हेकुई होती हे नंतर लक्षात यायला लागले. माझा तो ब्लाग लोकप्रिय व्हायला लागला. स्टॅकओव्हरफ्लो मधे उत्तरे देतांना काही लोकांनी माझ्या लेखाच्या लिंक देऊन अधिक माहितीसाठी हा लेख वाचा असे सांगायला सुरवात केली.

नेटबिन्स या आंतरराष्ट्रीय टीम ने एक व्हाईस ऑफ नेटबिन्स नावाचा एक गट करायचे ठरवले तेव्हा जे लोक नेटबिन्स बद्दल मुक्तपणे लिहिताहेत अश्या लोकांना त्यांनी संपर्क केला आणि मला त्या टीम बरोबर काही वर्ष काम करायची संधी मिळाली.

नंतर नेटबिन्स एडीटर ची मालकी ओरॅकल कंपनीकडून अपाचे फाऊंडेशन कडे हस्तांतरित झाली आणि नेटबिन्स हा अपाचे नेटबिन्स या नावाने ओळखला जाऊ लागला आणि मी कम्युनिटी टेस्टर आणि इवेंजलिस्ट म्हणून स्थापित असल्याने मला अपाचे नेटबिन्स कमिटर यादीत प्रवेश मिळाला.

अपाचे कमिटर यादीत प्रवेश मिळणे हे कौशल्याच्या कसोटीवर ठरत असते आणि ते मुक्तस्रोत निर्मात्याला आदराचे आणि मानाचे पद असते हे त्या क्षेत्रातले जाणकार वाचक समजू शकतील.

आपण काय आहोत आणि आपल्याला कशात रस आहे त्या क्षेत्रात आपल्या जागेवरूनच आपले प्रक्षेपण सुरू ठेवले तरीही समविचारी घटक आपल्याला स्वतःहून शोधून घेतात आणि आपण आपल्या इच्छित समुहात पोहोचतो हे माझ्या या उदाहरणातून मला शिकायला मिळाले.

तुम्हाला जर वाटत असेल की मला काहीच येत नाही मग मी कशाला लेख लिहू किंवा मी जे काही लिहिणार ते बाळबोध असेल तर पुन्हा विचार करा. कदाचित त्याच पातळीचे लिखाण वाचून काही तुमच्या नंतर येणारे स्वतःचा काही वेळ वाचवू शकत असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी मूल्यवर्धक आहात.

तुशार जोशी
नागपूर, गुरूवार, १६ जानेवारी २०२५

Group content visibility: 
Use group defaults

छान लेख. असे छोटे पाऊल पण पुढे खूप प्रगती करू शकते. Benevolent dictator for life (BDFL) सुद्धा अशीच छोटी सुरुवात करतात. पाऊल टाकणं महत्त्वाचे, तुमचे अभिनंदन.

स्टॅकओव्हरफ्लो मधे उत्तरे देतांना काही लोकांनी माझ्या लेखाच्या लिंक देऊन अधिक माहितीसाठी हा लेख वाचा असे सांगायला सुरवात केली.>> वा!
तुमच अभिनंदन!

छान लेख
इंग्लिश मध्ये लिहून नंतर भाषांतर केलंय का?
असं वाटतंय की ट्रान्सलेशन टूल ने केलंय

शेवटचा पराग्राफ आवडला..
जसे वाचन फुकट जात नाही म्हणतात तसेच लिखाण सुद्धा फुकट जात नाही.

छान लेख.
कधीही केलेलं काहीच कधी फुकट जात नाही.

> इंग्लिश मध्ये लिहून नंतर भाषांतर केलंय का?
> असं वाटतंय की ट्रान्सलेशन टूल ने केलंय
@किल्ली, हा अभिप्राय स्तुती समजू की टोमणा या संभ्रमात मी आहे. Happy हा संपूर्ण लेख मी माझ्या स्वतःच्या शब्दात अक्षरश: टंकीत केलाय इतकेच कबूली देईन.

टोमणा नक्कीच नाहीये
एकही english शब्द नाहीये सगळीकडे देवनागरी आहे
आणि भाषा जरा वेगळी वाटली म्हणून
.
मुलीच्या शाळेचे मराठी messages आठवले.
.
लेख छानच आहे शंका नाही त्यात