आयुष्याच्या समांतर प्रवास यात्रा

Submitted by तुष्कीनागपुरी on 9 February, 2025 - 19:33

कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं जमीं तो कहीं आसमाँ नहीं मिलता

या शेरात आलेला आशय आपल्या आयुष्यात क्षणा क्षणाला आपली सत्यता पटवत असतो. ते सगळे काही एकाच व्यक्तीत मिळवायचा अट्टहास जर आपण सोडू शकलो तर आपल्या आयुष्यात अनेक जागांपासून सुखाची आनंदाची तिरिप शिरू लागते.

आंतरजालाच्या संपर्कात आल्यापासून आपण एका वैश्विक गावाचे नागरिक झालेलो आहोत आणि या गावात असे काही धागे जुळण्याच्या अनेक शक्यता आपल्याला खुल्या होतात.

आपले एक मुख्य धारेत सुरू असलेले आयुष्य असते. ते आपल्याला व्यवहार आणि स्थिरतेच्या पातळीवर जगायचेच असते. त्या आयुष्याला हवा तो वेळ द्यायचा असतो. तसे केल्यावरही आपल्याकडे काही भाग उरतो तो एकटा असतो, काही भाग उरतो ज्याला अधिक काही हवे असते.

विडियो गेम्स मधे रममाण होणारी मंडळी त्या गेम मधे सुरू असलेले एक समांतर आयुष्य जगण्यात आनंद मिळवतात. त्या काही काळासाठी ते मुख्य आयुष्याच्या धारेतून मोकळे होऊन एका वेगळ्या विश्वात शिरतात आणि तिथे एक वेगळा चेहरा वेगळे पात्र आणि वेगळे सवंगडी जोडतात आणि त्यांच्या बरोबर काही काळ घालवून परत आपल्या मुख्य धारेच्या आयुष्यात परत येतात. या गोष्टीचा अतिरेक झाला तर ते मानसिक विकारात मोडते पण सध्या मी अती होण्याच्या स्थितीबद्दल बोलत नाहीये. त्या काही अपवादात्मक घटना सोडल्या तर या समांतर आयुष्याचा आपल्याला फायदा सुद्धा होतो.

उदाहरणादाखल, कविता लिहिणारे अनेक जण कवितांबाबत आस्था असणाऱ्या गटांमधे जोडले जाऊन एक कवितांचे विश्व जगतात, नव्या ओळखी तयार करतात, त्या वेगळ्या कवितांच्या गावात एकत्रीकरणे करतात आणि आपल्या छंदाच्या गावात एक वेगळे अस्तित्व जगू लागतात. या कवितांच्या गावाचा मला पण अनुभव आहे आणि तो एक विलक्षण आनंद आहे.

मुख्य आयुष्य एकच असते, त्यात काय काय होणार याला मर्यादा आणि परिस्थितीचे नेमलेले आराखडे असतात. आंतरजालीय समांतर नाती जी जोडल्या जातात त्यांना वेळेचे बंधन नसते, आणि एकाच वेळी किती समांतर प्रवास सुरू असावेत याचेही बंधन नसते.

हे वाचताना कॅटफिशिंग चा पण उल्लेख करणे आवश्य आहे कारण मी कॅटफिशींग बद्दल इथे बोलत नाहीये. कॅटफिशींग म्हणजे आंतरजालावर स्वतःचे एक छद्मी रूप आणि चरित्र प्रक्षेपित करणे आणि जोडल्या जाणाऱ्या लोकांना खरे आपण कोण हे कळू न देता एक समांतर नाते आणि आयुष्य सांभाळणे, मग कधी त्याचा गैर फायदा करून घेणे.

तसे न करता, आपण जे आहोत त्याच रूपाने पण फक्त आंतरजालावर सुरू झालेली काही नाती आणि मैत्री असतात, ज्या कुणाला न कळता सुरू असतात. या मैत्रीमध्ये शामिल दोघांनाही एकमेकांची पुरेशी माहिती असते, त्यांच्या मुख्य धारेतल्या आयुष्याची माहिती असते. पण हे नाते एक वेगळेच कारण म्हणून निर्माण झालेले असते. मुख्य धारेत कदाचित न मिळणाऱ्या कोणत्यातरी घटकाची पूर्तता यातून होत असेल किंवा समान छंद आणि समान विचारधारा असणाऱ्या पण वयाने, स्थळ काळाने भिन्न पण आंतरजालाच्या संपर्कामुळे जोडले गेलेले असल्याने सहज शक्य असल्याने निर्माण झालेले असते.

अनेक पदरी समांतर आयुष्ये जगण्याचे साधन या आंतरजालाने आपल्याला मिळवून दिले आहे. या समांतर प्रवासाची एक लवचिकता अशी असते की या प्रवासात कुणाचे वेळेचे किंवा अंतराचे बंधन नसते, ते लवचिक असते. आपल्याला जमेल त्या वेळात ते पुढे नेता येते आणि तसे समांतर प्रवास करणारे अनेक जण मी आजुबाजुला पाहतो.

कोणत्यातरी एका कारणाने एकत्र आलेले आणि भेटलेले आंतरजालावरचे दोन जण असा समांतर प्रवास सुरू करतात आणि मग वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहतात. प्रत्यक्ष भेटतातही पण प्रत्यक्ष भेटणे हे त्या नात्याचे मुख्य ध्येय नसतेच मुळी. समांतर प्रवास करणे आपापल्या मुख्य आयुष्याला सांभाळून आणि त्यातूनही काही क्षण एकमेकांना देऊन जगत राहणे आणि कुणी तरी या व्हॉटसॅप च्या या फोन च्या या इमेल च्या पलिकडे आहे जे मी लिहिलेले वाचेल आणि केव्हा तरी उत्तर देईल याची शाश्वती देणारे हे नाते असते. जगण्याची जिद्द बळकट करणारे आणिक एक मूळ आपल्या मुळांमधे जोडणारे हे नाते असते. या नात्याला नाव देऊच नये असे वाटते कारण वेळ प्रसंगी हे नाते हवे त्या नात्याची पूर्तता करायला सिद्ध होऊ शकते.

तुषार जोशी
नागपूर, शुक्रवार १७ जानेवारी २०२५

Group content visibility: 
Use group defaults