अंधार मान्य झाला की दिवा लावणे उत्तम

Submitted by तुषार जोशी on 8 February, 2025 - 19:34

एक कविता जशी आठवतेय तशी मांडतो आहे:

दुःख चिरंतन
सुखाचे काहीच क्षण
पण..
गडद अंधाराला मोहक करून जाते
तारकांची अंधुक पखरण
~ प्रसन्न शेंबेकर

या कवितेत अंधार अंधार आणि त्याचा काही भाग उजळून मिळालेली मोहकता यांचा काव्यात्मक उल्लेख आहे पण मी व्यवसायिक जगात येणाऱ्या एका अनुभवाबद्दल काही विचार मांडणार आहे.

आपण जेव्हा एखाद्या विभागात नवे रूजू होतो तेव्हा आपल्याला तिथले अनेक खाच खळगे दिसू लागतात. आधीपासून रूळलेले त्या विभागातल्या लोकांना ते खाच खळगे माहिती आहेत हे पण आपल्याला लक्षात यायला लागते. ते खाच खळगे कुणी भरत का नाही याचा विचार आपल्या मनात हमखास येतो. अती उत्साही नवखे यावर कुणी अजून हे खळगे भरले का नाहीत असा यक्ष प्रश्न जाहिरपणे विचारतात देखील. त्यांचे बहारदार हसे होते, आणि कुणीतरी जुने जाणते हळूच समजावते की तिथे हात घालू नका तिथे भुमिगत सुरूंग आहेत किंवा ते खळगे भरायला बऱ्याच भानगडी कराव्या लागणार आहेत आणि त्याच्या मोबदल्यात हवे तसे श्रेय मिळणार नाही हे माहित असल्याने कुणी त्या वाटेला गेलेले नाहीये.

हा विषय किचकट आहे आणि त्याला बरीच वलये आहेत पण आजच्या मुद्यासाठी असे गृहित धरूया की आपल्याला एक जागा सापडली आहे जिथे काही बदल घडवायला आपल्या जवळ कौशल्य आहे आणि आपल्याला ते करण्याची संधी मिळाली तर आपण ते करू शकतो. असे असेल तर ते करायचे का? मी माझ्या कार्पोरेट आयुष्यात असे काही अनुभव घेतले आहेत जिथे असे आपणहून कुणीतरी काही कल्पक बदल करून दाखवते आणि तो बदल घडला तर ते सगळ्यांना आवडते देखील आणि तुम्ही असे केले तर एखादा खळगा आपण भरला याचे तुम्हाला समाधान पण मिळते. यात गोम ही आहे की तुम्हाला त्या योगदानाचे हवे तसे श्रेय मिळत नाही, अरे हा खळगा भरला गेला का वा, सर्वांचे अभिनंदन असे काहीसे श्रेय निसटून गेल्याचे अनुभव अधिक आहेत.

आपण एखादे अनेक दिवस रखडलेले काम पूर्ण करू शकतोय किंवा दिसलेला खळगा जो सर्वांना माहिती आहे तो भरू शकतोय असे कौशल्य आपल्यात आहे हे जाणवत असेल तर एक मुद्दा मांडतोय त्याचा विचार करा.

ज्या क्षणी आपल्याला लक्षात येते की असे काहीतरी रखडलेले काम आहे, किंवा खळगा आहे आणि आपल्याजवळ ते सुधारण्याचे कौशल्य आहे, किमान प्रयत्न करून पाहण्याचे धाडस आहे. तेव्हा त्या रखडलेल्या कामाबद्दल टिम मधे बैठकिंमध्ये उल्लेख करायला सुरवात करा. कुठे अंधार आहे हे जिथे जिथे बोलून दाखवता येईल तिथे दाखवा. जर जमले तर लिखित अहवालात सुद्धा सध्या रखडलेले काय आहे किंवा कुठे खळगा आहे ते मांडायचा प्रयत्न करा.

असे केल्याने काय होईल? तर काय नाही याचे लिखित उल्लेख तुमच्या नावाने तयार होतील. अंधार आहे हे तुम्ही म्हटले आणि इतरांनी मान्य केले त्याचे पुरावे तयार होतील. अगदीच थेट मान्य केले गेले नाहीत तरीही तुमच्या त्या दाखवून देण्याला कुणी असत्य म्हणू शकणार नाही, जे आहे ते सगळ्यांना माहितच होते ते फक्त आता लिखित स्वरूपात दस्तावेज बद्ध झाले इतकेच होईल, तरीही हे होण्याने पुढची एक मोठ्ठी उपलब्धी याने साधणार आहे.

यात महत्वाचे हे की आपण फक्त तेच समोर आणणार आहोत जे आपण ठिक करू शकू याबद्दल आपल्याला खात्री किंवा आशा आहे. पण ते दुरूस्त करायच्या आधी आपल्याला त्या कमतरतेची वाच्यता करायची आहे, तिच्याबद्दल लिहायचे आहे आणि त्या कमतरतेमुळे किती तोटा होतो आहे यावर पण प्रकाश टाकता आला तर तो टाकायचा आहे.

यानंतर जेव्हा आपण तो खळगा भरणार, जेव्हा आपण ती तृटी भरून काढणार तेव्हा आपण आधी केलेल्या अहवालाचा संदर्भ देऊन, मागच्या अहवालात उल्लेख केलेली कमतरता आता माझ्या अमुक अमुक कृतीने किंवा योगदानाने अशी अशी बदलली आहे किंवा पूर्ण झाली आहे असा अहवाल तुम्हाला लिहिता येईल पाठवता येईल आणि तसा खळगा होता आणि तो तुम्ही भरला आणि त्याने काय फायदा झाला हे दस्तावेज बद्ध होईल कुणी अनुल्लेखाने ते टाळू शकणार नाही.

जर तुम्हाला दिवा लावता येणार असेल तर कुठे अंधार आहे तो जमेल तिथे जमेल त्याला दाखवायला विसरू नका, अंधार आहे हे मान्य असतेच पण ते जाहिर पणे स्वीकार होईल असे त्याचे वर्णन करायचा प्रयत्न करा, त्या नंतर तुम्ही जे दिवे लावाल त्याचे श्रेय तुमच्यापासून लाटणे कुणाला सहज जमणार नाही.

तुम्ही एक खळगा भरणारच होतात. तुम्हाला ते येतच होते. पण या पद्धतीने तुम्ही आधी जगजाहिर करता की खळगा आहे आणि तो सर्वमान्य आहे, आणि तो अजून कुणी भरलेला नाही, मग तुम्ही तो खळगा भरता तेव्हा त्याचे श्रेय तुमच्या नावाने प्रकाशमान होणार याची तुम्ही खात्री केलेली असते.

(दिवाधारक)
तुषार जोशी
नागपूर, रविवार २६ जानेवारी २०२५

Group content visibility: 
Use group defaults

आवडला लेख.
बरेच खळगे भरलेत. पण नंतर एवढी लोकं बदलली.... सोडून गेलीत... किंवा नवीन आलीत... की आधी खळगे होते हेच मुळी कुणाला माहित नव्हतं.