बिदेशिनी : एक स्वैर अनुवाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 January, 2025 - 18:19

२०११ सालच्या मराठी भाषा गौरवदिनानिमित 'केल्याने भाषांतर' नावाचा एक कल्पक उपक्रम घेतला गेला होता. त्यात प्रथमच मी रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांना हात लावायचं धाडस केलं होतं.
उपक्रमाच्या घोषणेसाठी एक आणि उपक्रमात 'Then finish the last song' आणि 'Your questioning eyes' या 'Gardner' या काव्यसंग्रहातल्या त्यांच्या छोटेखानी कविता निवडल्या होत्या.

रवींद्रनाथांच्या कवितांचा अवकाश अक्षरशः अणुरणिया थोकडा ते आकाशाएवढा अमर्याद आहे. चुकून स्पर्श झाला तरी विस्कटणार्‍या दंवाच्या थेंबाइतकी अलवार प्रतिभा! केवळ मायबोलीचं अंगण होतं म्हणून ही वेडीवाकडी पावलं टाकून पाहिली. ती आवडल्याचं अनेकांनी कळवलं.

त्यानंतर कित्येक वर्षांनी एप्रिल २०२३मध्ये Alaikadal गीताचा अनुवाद करायचा प्रयत्न केला. हे थोडं अवघड प्रकरण होतं, कारण भाषेतून भाव पोचवतानाच संगीत आणि लयीचा तोल सावरण्याची कसरत गीतात करावी लागते. मायबोलीकरांनी या प्रयत्नालाही उदार मनाने प्रोत्साहन दिलं.

ते ऐकून एका मायबोलीकर मैत्रिणीने रवींद्रनाथांच्या 'बिदेशिनी'चा अनुवाद करायची मागणी केली होती. त्यांच्या 'नष्टनीड' या लघुकादंबरीवरून सत्यजित रे यांनी केलेल्या 'चारुलता' चित्रपटातलं हे गाणं. रवींद्रनाथांचेच जादुई शब्द आणि संगीत असलेलं, किशोर कुमारने गायलेलं.

करू करू म्हणत शेवटी आज त्याला मुहूर्त लागला. अनुवाद अगदी एकेका शब्दाचा केलेला नाही, पण भाव आणि लयतालसंगीत सांभाळून करायचा प्रयत्न केला आहे. कसा वाटतो जरूर सांगा.

हे अनुवादित शब्द :

मज माहीत माहीत सारे
परदेशी पाखरा
दूर बांधले घरटे का रे
परदेशी पाखरा

कोवळ्या उन्हात न्हात कधी
रेखित चांदणरात कधी
वावरशी
मनी माझ्या रे तूच वावरशी
मनी माझ्या रे परदेशी पाखरा

रोज नभाला लावून कान
ऐकली ऐकली तुझीच तान
तुला वाहिले पंचप्राण विदेशी पाखरा
परदेशी पाखरा

क्षितिजे लांघून सारी
तुझ्या पोचलो येऊन दारी
इथे अखेरची पथारी
परदेशी पाखरा

आणि इथे मी गायलेलं गीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान, स्वाती. चारुलता अणि हे गाणं, खुप आवडीचं. आधी शब्द वाचले तेव्हा "परदेशी" ह्या शब्दावर जराशी अडखळले होते, पण तुझ्या आवाजात आत्ताच ऐकलं, आणि just loved it.

धन्यवाद, अनू! Happy
एका ओळीत मीटरसाठी ‘विदेशी’ म्हटलं, पण सरसकट वापरण्याहतकं ते ‘मराठी’ वाटेना! चाललं असतं खरंतर, पण एक आपला हट्ट! Happy

Happy मीही पाखरा..वर जरा अडखळले होते.
पाखरू शब्द तितकासा सभ्य वाटत नाही ना... एकदम लावणी किंवा ग्राम्य बाज वाटतो.
आणि वाचताना आधी मला वाटलं की हे एक स्त्री म्हणतेय..कारण त्या काळात साधारणपणे पुरुषांनी परदेशी जाणे अधिक कॉमन होते ना... Happy
पण गोड गाण्याने हे संदेह दूर झाले!!!

>>> पाखरू शब्द तितकासा सभ्य वाटत नाही ना...
अर्र! ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ किंवा ‘माझिया माहेरा जा, पाखरा’ ऐकलं नाहीये का? Happy

ते कुण्या गावाचं आलं पाखरू मुळे झालं असेल. पण वरच्या २-३ उदाहरणांखेरीज रूणूझुणूत्या पाखरा हे तर गौरीसंबंधित गाणे आहे.

बहुधा शब्दशः अर्थाने वापरले तर सभ्य आहे. मेटॅफोरिक अर्थाने ग्राम्य Happy

‘आकाशी झेप घे रे’ मेटॅफरच आहे की.
आणखी अलीकडची उदाहरणं (दोन्ही मेटाफोरिक आणि नॉन तमासगीर स्त्रियांसाठी) म्हणजे ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ - त्याला सामोरं येतंया आभाळ’ आणि ‘अल्लड भांबावल्यालं बिल्लोरी पाखरू न्यारं’. Happy

आता बहुतेक छल्लांना कुण्या गावाचं पाखरूही सोज्ज्वळ वाटायला लागेल. Proud

मी पाखरा आणि परदेशीवर नुसताच अडखळलो नाही, तर अडकलो होतो. आधी कुण्या गावाचं आलं पाखरू हेच आठवलं. काही वेळाने रानिच्या पाखरा रे, उगिच भेट झाली , हे आठवलं. नंतर माझ्या प्रीतिच्या पाखरा, रानभरी होऊ नको , हे आठवलं. आणि आता त्या लाडिक चालीला पाखरूच फिट बसतंय असं वाटू लागलं. परदेशी मात्र अजूनही तितकासा आवडत नाहीए.
पुढची कविता आणि गाणं तर फारच गोड.
मूळ चालीला चिकटून भावानुवाद करणं हे दुहेरी आव्हान आहे, आणि ते सुंदर पेललं आहे. वर ते स्वतः गायलं आहे म्हणजे चांदीचा वर्ख.

या गाण्याची एक आठवण आहे. आमचे चेअरमन की मार्केटिंग हेड संगीतप्रेमी होते आणि एजंट्सना त्यांच्या क्लायंट्सना भेट देण्यासाठी म्हणून दर वर्षी दोन कॅसेट्सचा एक संच काढत. दुसर्‍या वर्षी त्यात रवींद्र संगीत होतं. त्यातलं अ‍ॅकला चालो रे आणि हे गाणं लक्षात राहिलं आहे. बाकीची पुन्हा ऐकली तर आठवतीलही. तेव्हा अर्थ शोधायला सुचलं नव्हतं आणि शक्यही नव्हतं.

तसा तर बिदेशिनी हाच शब्द जसाच्या तसा मराठीत चालू शकेल - चालावा!
पण मराठीत, परदेशी गेलेली प्रियतमा - अशी कन्सेप्ट च नसल्याने, तो रुळणार नाही. Happy
आणि ही इथून तिकडे गेलेली आहे, ( उदा :प्रियांका चोप्रा) की मूळची तिथलीच आहे, ( उदा: सोनिया गांधी) हेही गुलदस्त्यात
आहे. Happy

भरत, पहिली लिंक चुकली आहे.
मला काही कल्पना नाही पण वरच्या गाण्याच्या व्हिडिओत अरविंद पिळगावकर म्हटलंय.

काल वावेने 'कोण्या देशिचे पाखरू माझ्या अंगणात आले'चीही आठवण काढली होती. मलाही इथली उदाहरणं वाचून 'चल उडुनी पाखरा पहा जरा' आणि 'जा जा रानीच्या पाखरा तू जाय भरारा' ही दोन आठवली.
'परदेशी'वरून 'सजण शिपाई परदेशी' आठवलं होतं.

अर्थात, कोर्टात वकील जुन्या खटल्यांचे दाखले देतात तसं इथे करण्याचा उद्देश नाही.

एखाद्या गाण्या-कवितेत एखादा शब्दप्रयोग सहजगत्या येतो तर एखाद्या ठिकाणी खटकतो हे खरंच आहे. पण अनुवादात - तेही चालीवर केलेल्या अनुवादात - मुळातच खूप कमी 'wiggle room' असते, इतकंच. Happy
त्यात हे गीत ज्याला/जिला उद्देशून आहे ती एक foreign/alien/novel संकल्पना किंवा व्यक्ती आहे, हेच त्याचं 'इंगित' आहे, जे मला काही केल्या हरवू द्यायचं नव्हतं.

आकाशाला कान लावल्यावर टागोरांना 'बिदेशिनी'चं गान ऐकू येतं, आणि मग ते तिचा माग काढत भुवनभ्रमण करून तिच्या उंबर्‍याशी पोचतात ही फार फार सुंदर कल्पना आहे. इंग्रजीत wanderlust असा शब्द वापरतात. ही homesickच्या नेमकी उलट भावना - दूरातलं काहीतरी, जे अजून अनुभवलेलंही नाही, असं काहीतरी हाक घालतं आणि व्याकुळ करतं आहे, पर्युत्सुक करतं आहे! पण ते इथे येऊ शकत नाही, मलाच त्याच्यापर्यंत जायला हवं!
'पाखरू' शब्दाने तो विरोधाभास (ते पाखरू असून इथे उडून येऊ शकत नाही, मलाच पाय ओढत त्याच्यापर्यंत जायला हवं) अधोरेखित होईल असं वाटलं.

सर्व नवीन अभिप्रायदात्यांचे अनेक आभार. Happy

परदेसी वरुन
परदेसी सजण घरी आले,
देहताप सरले, सुखमय मी मंगलगीत म्हणाले.
हे गाणं आठवलं. याची कॅसेट होती घरी. हे जानकी अय्यर यांनी म्हटलेलं आठवत होतं. पण पुढचे शब्द मनातून पुसले गेलेले. ते आठवणीतील गाणीवर सापडलं. गजानन वाटव्यांची साधी पण फार गोड अर्थवाही चाल आहे. Happy

>>>>>>>>>>>हे गायक नट अरविंद पिळगावकर सचिनचे वडील नव्हेत. सचिनचे वडील शरद पिळगावकर
ओह ओके. भरत धन्यवाद.

स्वाती, खूप सुरेल गाणं!!
लय ताल आणि काय भावना पोहोचवायच्या आहेत ते डोक्यात पक्कं आहे हे गाणं ऐकताना जाणवलं,त्यामुळे गायिकेबरोबरचा प्रवाह बर्यापैकी "सहप्रवास" झाला Happy विदेशातले पाखरू दिसले बहूतेक Happy

बाकी अनुवाद छान झाला म्हणणं,किंवा मधे लेख लिहीला होतास त्यावर प्रतिक्रीया राहून गेली होती, तिथे "अफाट लेख" असं लिहीणं, म्हणजे "पिवळे पीतांबर " Happy
बाय द वे "नभाला कान लावून ऐकणे "हा अलंकार किती सहज आणि चपखल वापरला आहेस्,ह्याबद्दल विशेष कौतुक Happy

हा धागा दोन, तीन दिवसांपासून वाचायचा होता. आत्ता वाचला. लेखाचे शब्दांकन उत्तम (व अती विनम्रपण) आहे. गायन उत्तम! अनुवादाच्या गुणवत्तेबाबत काही म्हणण्याची माझी योग्यता नाही.

तरीही, महान लोकांचे काही काही लेखन वाचताना एक प्रश्न मला नेहमी पडतो. या विशिष्ट गीताच्याबाबतीतही हा प्रश्न मनात आला. या गीतात फार ग्रेट असे काय आहे बुवा, हा तो प्रश्न!

दुसरे एक मत असे टायपावेसे वाटले की भारत भूषण त्या नटाहून थोडा जास्त अभिनय करू शकत असावा.

असो, मैत्रिणीला शुभेच्छा!

>>>>>दुसरे एक मत असे टायपावेसे वाटले की भारत भूषण त्या नटाहून थोडा जास्त अभिनय करू शकत असावा.
हाहाहा Lol Lol

Pages