बिदेशिनी : एक स्वैर अनुवाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 January, 2025 - 18:19

२०११ सालच्या मराठी भाषा गौरवदिनानिमित 'केल्याने भाषांतर' नावाचा एक कल्पक उपक्रम घेतला गेला होता. त्यात प्रथमच मी रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांना हात लावायचं धाडस केलं होतं.
उपक्रमाच्या घोषणेसाठी एक आणि उपक्रमात 'Then finish the last song' आणि 'Your questioning eyes' या 'Gardner' या काव्यसंग्रहातल्या त्यांच्या छोटेखानी कविता निवडल्या होत्या.

रवींद्रनाथांच्या कवितांचा अवकाश अक्षरशः अणुरणिया थोकडा ते आकाशाएवढा अमर्याद आहे. चुकून स्पर्श झाला तरी विस्कटणार्‍या दंवाच्या थेंबाइतकी अलवार प्रतिभा! केवळ मायबोलीचं अंगण होतं म्हणून ही वेडीवाकडी पावलं टाकून पाहिली. ती आवडल्याचं अनेकांनी कळवलं.

त्यानंतर कित्येक वर्षांनी एप्रिल २०२३मध्ये Alaikadal गीताचा अनुवाद करायचा प्रयत्न केला. हे थोडं अवघड प्रकरण होतं, कारण भाषेतून भाव पोचवतानाच संगीत आणि लयीचा तोल सावरण्याची कसरत गीतात करावी लागते. मायबोलीकरांनी या प्रयत्नालाही उदार मनाने प्रोत्साहन दिलं.

ते ऐकून एका मायबोलीकर मैत्रिणीने रवींद्रनाथांच्या 'बिदेशिनी'चा अनुवाद करायची मागणी केली होती. त्यांच्या 'नष्टनीड' या लघुकादंबरीवरून सत्यजित रे यांनी केलेल्या 'चारुलता' चित्रपटातलं हे गाणं. रवींद्रनाथांचेच जादुई शब्द आणि संगीत असलेलं, किशोर कुमारने गायलेलं.

करू करू म्हणत शेवटी आज त्याला मुहूर्त लागला. अनुवाद अगदी एकेका शब्दाचा केलेला नाही, पण भाव आणि लयतालसंगीत सांभाळून करायचा प्रयत्न केला आहे. कसा वाटतो जरूर सांगा.

हे अनुवादित शब्द :

मज माहीत माहीत सारे
परदेशी पाखरा
दूर बांधले घरटे का रे
परदेशी पाखरा

कोवळ्या उन्हात न्हात कधी
रेखित चांदणरात कधी
वावरशी
मनी माझ्या रे तूच वावरशी
मनी माझ्या रे परदेशी पाखरा

रोज नभाला लावून कान
ऐकली ऐकली तुझीच तान
तुला वाहिले पंचप्राण विदेशी पाखरा
परदेशी पाखरा

क्षितिजे लांघून सारी
तुझ्या पोचलो येऊन दारी
इथे अखेरची पथारी
परदेशी पाखरा

आणि इथे मी गायलेलं गीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुवाद आणि त्याचं गायन दोन्ही आवडलं. पार्श्वसंगीताच्या क्रेडीट्स मध्ये तुमच्या पाखराचं नाव पण टाका. छान वाटत होतं ते मागे. Happy
रोज नभाला लावून कान
ऐकली ऐकली तुझीच तान
मस्तच. चाल पण गोड आहे.

'अखेरची पथारी' वरुन शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात आठवलं. Happy

व्वा! फारच सुंदर. अनुवाद करणं हे अवघडच असतं. ते भावाला अनुरूप आणि चालीलाही अनुरूप करणं ही बरीच मोठी कसरत आहे. छान जमलं आहे. तुझा आवाज फारच गोड आहे आणि गाताना त्या चालीतल्या हरकती बारकाव्यांसकट घेतल्या आहेत. खूप छान वाटलं ऐकताना.

अफाट! तू गायलेले गाणे हे कसलीही पार्श्वभूमी डोक्यात न घेताही ऐकायला कमालीचे गोड झाले आहे. ऐकताना बंगाली संदर्भही जाणवतो. मी मूळ गाण्याचे एकच कडवे नीट ऐकले पण अनुवादाबद्दल आधी विचारणारच होतो. नंतर लेख वाचल्यावर त्याबद्दल लिहीलेले दिसले.. फार सुंदर जमले आहे गाणे.

मलाही ते ऐकली ऐकली तुझीच तान फार आवडले आणि शेवटचे घरटेचीही आठवण झाली.

Just wow.
You made my day.
आज सकाळी २६ जानेवारीच्या दिवशी अशी गोड गाणी, एक बंगाली आणि एक मराठी ऐकून फार चांगला दिवस जाईल आजचा असे पटले. धन्यवाद.
कित्ती सुंदर अनुवाद झाला आहे.
आवाज अगदी गोड आहे तुझा.
तुझ्या नवीन कलाकृती साठी खूप खूप शुभेच्छा स्वाती.

मधुर आवज व गोड गाणे. मागे पोपट बोलतोय बहुतेक. तो ही समसमा संयोग!
‘अखेरची पथारी’ शब्द अवघड आहे सुचायला. पण चपखल भावना कळते त्यातून.

किती गोड गायलं आहेस. शब्द आणि आवाज यांचा मधूर संगम आहे. सोबत तुझा काकाकुवाही गातोय त्यामुळे छानच वातावरणनिर्मिती झालीये.

या सुप्रसिद्ध बंगाली गीताची चाल टिपिकल बंगाली आणि फार सुंदर आहेच. लेकीच्या शाळेत ती पहिलीत असताना तिला एक बंगाली टीचर होत्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांना हे गाणं शिकवलं होतं. तेव्हा लेक हे गाणं गात असे.

अखेरची पथारी’ शब्द अवघड आहे सुचायला. >>>> +1. अनुवाद उत्तम साधला आहे.

सुरेख!
रोज नभाला लावून कान
ऐकली ऐकली तुझीच तान...... अहा!
तुम्ही गायलंदेखील सुरेख आहे.आवाज गोड आहे.

खूपच सुंदर, उत्कट झाला आहे अनुवाद, स्वाती.
आणि रात्रीमुळे चंद्राला शोभा की चंद्रामुळे रात्र सुंदर.... असे वाटते ना तसे झाले आहे....की गोड आवाजात ,सुरेल गायलेले गीत चांगले की अनुवाद सुंदर..की दोन्ही एकमेकांमुळे अधिक सुंदर वाटतेय...?!
Happy

खूब भालो. मूळ कविता, पद्यानुवाद आणि वर मंजुळ गायन …

जणू लकाकता सुगंधी सुवर्णहोन. ❤️

सुंदर! तुझ्या अनुवादित कवितांची मी फॅन आहेच.

पण यातलं प्रास्ताविक लिहिलंय ते सुद्धा खूप आवडलं.

खूब भालो. मूळ कविता, पद्यानुवाद आणि वर मंजुळ गायन …

जणू लकाकता सुगंधी सुवर्णहोन. ❤️>>> ++१११११

अप्रतिम! चपखल भावानुवाद आणि तो चालीत बसवणे, वर पुन्हा इतके सुंदर गाणे!! काय प्रतिभा की काय म्हणायची ही !! Happy
त्यामुळेच मूळ गाणे लक्ष देऊन ऐकले. सुंदर!!

मध्यंतरी रवींद्रनाथांचा, इंग्रजीत' अनुवादित गार्डनर' काव्यसंग्रह सापडला होता. आणि एकामागे एक कविता, वाचतच गेले. मी आत्ता इंग्रजी अनुवाद वाचून आले.
>>>>>>>>>>>तुला वाहिले पंचप्राण विदेशी पाखरा
समर्पण आणि प्रेम या आरस्पानी आणि सर्वात सुंदर भावना फार मस्त पकडल्यात स्वाती. वर लिहील्याप्रमाणे, चाल आणि आवाज फार फार गोड आहे.

गाणं मस्त गायलं आहे, अनुवादही सुरेख जमलाय. मूळ बंगाली गाणेही बघितले.

'नष्टनीड'ची (The broken nest) चारूलता आणि बिनोदिनी ह्या माझ्या रवींद्रनाथांच्या नायिकांपैकी अत्यंत आवडत्या नायिका आहेत. चारुलतेच्या गोष्टीचे मी पारायण केले होते, बिनोदिनीवर लिहिलेही आहे येथे. त्यामुळे तर जास्तच आवडले. Happy

खूप मस्त अनुवाद आणि गोड गायलंय!
सोबत तुझा काकाकुवाही गातोय त्यामुळे छानच वातावरणनिर्मिती झालीये.>> +१
मला या गाण्याची काहीच पार्श्वभूमी माहिती नव्हती. आता ऐकते.

बिदेशिनी चा मूळ बंगाली गीतातील संदर्भ कळला नाही पण.
कोणाला उद्देशून म्हटले आहे हे गाणे?

गायलेलं गीत सुंदरच आहे.

कवितेचं म्हणाल तर मराठी काय आणि बंगाली काय - दोन्ही काला अक्षर भैस बराबर अशी अवस्था आहे. तुमच्या पद्धतीने कविता उकलून दाखवली तर आस्वाद घेता आला असता.

सर्व प्रतिसाददात्यांचे अनेक आभार! Happy

गाण्यात मागे ऐकू येतो आहे तो माझ्या Cockatiel चिकूचा आवाज. आमच्या घरातल्या बहुतांशी संभाषणांना त्याचं पार्श्वसंगीत असतं. Happy
हे आमचं परदेशी पाखरू :
47F069B9-8FE6-480A-98CB-97626C75C1A4.jpeg

अस्मिता, 'नष्टनी' आहे का ते नाव? बदलते, धन्यवाद. Happy

छल्ला, मला प्रश्न नीटसा कळला नाही, रवींद्रनाथांबद्दल विचारताहात की चित्रपटातील पात्राबद्दल?
ते पात्र 'अमल'देखील कवीचंच आहे, आणि हे एक प्रेमगीत आहे.

रवींद्रनाथांनी हे गीत १८९५ साली लिहिलं होतं असा उल्लेख इथे सापडला.
अर्जेन्टिनियन साहित्यिका व्हिक्टोरिया ओकम्पो यांच्याशी टागोरांचा ऋणानुबंध जुळला होता, हे गीत त्यांच्यासाठी ते लिहिलं गेलं असावं असाही एक दावा वाचण्यात आला, पण व्हिक्टोरियांचा जन्मच १८९०चा आहे, त्यावरून ते बरोबर वाटत नाही.

खेरीज, कवितेच्या बाबतीत 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' असं दाखवता येत नाही, तो निरनिराळ्या भावनांच्या मंथनाचा परिपाक असू शकतो.
हेच गीत कदाचित प्रतिभेला उद्देशून असेल, कदाचित मृत्यूला, कदाचित निसर्गाला, किंवा कदाचित स्वातंत्र्याच्या कल्पनेला ('स्वतंत्रते भगवती'सारखं) किंवा या सगळ्यांचं काही मिश्रण किंवा याव्यतिरिक्त तिसरंच काहीतरी.... आपण केवळ तर्कच करू शकतो. Happy

स्वाती, मी पात्राबद्दल म्हणत होते, की अमोल चे कुणी बिदेशिनी वर प्रेम असते का?
पण जसे तू म्हणते आहेस, की ती प्रतिभा असू शकते, किंवा आणखीही काही...
Happy

अप्रतिम! मी पहिल्या वेळेस फक्त अनुवाद वाचला आणि आवडला. आज ऐकले. Your singing took it to another level. किती सुंदर सुरुवात झाली दिवसाची! अतिशय मधुर आवाज, चाल, भाव! गाणा-या लोकांचे फार कौतुक वाटते! तुमचे तर वाटतेच!

धन्यवाद. Happy

मघाशी लिहायचं राहिलं - 'अखेरची पथारी' लिहितानाच मलाही 'शेवटचे घरटे माझे' आठवलंच होतं. Happy

Pages