रक्तपिपासू
भाग ७
दुसऱ्या दिवशी साऱ्या आगोटी गावात खळबळ उडाली होती. शांत, संथ जीवन जगणारं गाव. दरोडा, खून अशा गंभीर गुन्ह्यांपासून शेकडो कोस दूर. अशा गावात एका सकाळी अचानकपणे चक्क दोन मृतदेह आढळून आले होते ! तेही मोठ्या विचित्र, भयानक अवस्थेत. रूपालीचे वडील त्यांच्या घराच्या अंगणातच अस्ताव्यस्त पडलेले दिसले होते. त्यांच्या शरीरावर टोकदार नख्यांचे ओरखडे पडले होते. चेहराही ओरबाडला गेला होता. त्यांचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती मुळीच नव्हता. सहाजिकच पोलिस तपासणी, पंचनामा वैगेरे सोपस्कार झाले. मृतदेहाच्या एकूण अवस्थेवरून वाघ, सिंहासारख्या जंगली, हिंस्र श्वापदाचं हे काम असावं असं अनुमान केलं गेलं ; पण गावात अचानकपणे श्वापद आलं कसं ? सामान्यतः वाघ, सिंह यांच्यासारखी जनावरं एखाद्यावर झडप घातल्यावर त्याला आपल्यासोबत घेऊन जातात. इथे असं झालं नव्हतं. आणि आपल्या घराबाहेरच असा सगळा प्रकार घडत असताना रूपालीला चाहूलही कशी लागली नाही ?
हा प्रकार एवढ्यावरच थांबत नव्हता. दुसरीकडे सखूआजीच्या घराजवळच्या रस्त्यावरच एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला होता. संपूर्ण शरीरावर भाजल्याच्या खुणा दिसत होत्या. पोलिस तपासणी झाली. चौकशी झाली. कुणीच त्या महिलेला ओळखतही नव्हते. शेवटी प्रशासनाकडून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
*******
रूपालीच्या वडलांच्या अंत्यविधीला श्री आणि राजाभाऊ अर्थातच हजर होते. राजाभाऊंचं लक्ष आपसूक रूपालीकडे जात होतं. ती गंभीर, अबोल होती. तिला दु:ख झाल्याचं तर स्पष्ट दिसतच होतं. मात्र त्याचबरोबर ती काहीशी अस्वस्थ असल्यासारखी वाटत होती. ते श्रीच्याही ध्यानात आलं होतं ; पण त्याला त्याबद्दल फारसं आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं नाही. त्याने तिच्यापाशी जाऊन तिचं सांत्वनही केलं.
*******
श्री आपल्या खोलीतल्या खिडकीपाशी पाठमोरा उभा होता. खोलीतील एका खुर्चीवर राजाभाऊ बसले होते.
"फारच भयानक, आणि अनपेक्षित प्रकार. नाही ?" ते शून्यात पाहत म्हणाले.
"भयानक तर आहे खरा ; पण अनपेक्षित...? तुम्हाला खरच असं वाटतं ?" श्री शांत पण सूचक स्वरात म्हणाला.
राजाभाऊ न समजून प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे क्षणभर बघत राहिले. मग त्या शब्दांचा अर्थ त्यांच्या ध्यानात आला.
"म्हणजे.. काल ती म्हातारी रूपालीच्या घरी..."
"आतापर्यंत घडलेल्या घटना पाहता रूपालीच्या वडलांना ज्या भयानक रीतीने मृत्यू आला, त्याला हेच स्पष्टीकरण लागू पडतं. नाही का ?" श्री शांतपणे ; पण विषण्ण स्वरात म्हणाला. थोडावेळ शांतता पसरली. राजाभाऊंना तर काय बोलावं हेच सुचेना. किती भयंकर !
" आणि गावातल्याच रस्त्यावर एका म्हाताऱ्या स्त्रीचाही मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी चौकशी केली ; पण ओळख पटली नाही म्हणे."
"हम्म. कशी पटणार ? ती आपल्या गावची नाहीच ना..."
" काय ? म्हणजे, तुम्हाला ठाऊक आहे की ती बाई कोण होती ?" राजाभाऊंनी आश्चर्याने विचारलं.
"राजाभाऊ..." क्षणभर थांबून श्रीने राजाभाऊंकडे पाहिलं. "मीच काय ? त्या गल्लीतल्या मुलांनीही ओळखलं असतं, त्यांना गोष्ट ऐकायला बोलावणाऱ्या त्या ठकू आजीला."
"काय ??" हा राजाभाऊंसाठी खरंच अनपेक्षित धक्का होता. " श्री... तुम्हाला खरच असं वाटतं ?"
"माझी तशी खात्री आहे." श्रीचा थंडपणा, शांतपणा मुळीच कमी झाला नव्हता.
" पण हे कसं म्हणजे...?"
"मला वाटतं मी त्याचा अंदाज करू शकतो. रात्री जरा उशिरा, सारं गाव पूर्णपणे चिडीचूप झाल्यानंतर ती म्हातारी बाहेर पडली असेल. रूपालीच्या घरापर्यंत पोहोचून कोणत्यातरी पद्धतीने रूपाली जवळ जाण्याचा तिने प्रयत्न केला असेल ; पण तिच्या वडिलांनी म्हातारीला रूपाली सोबत पाहिलं. त्यांचा काय समज झाला असेल, ठाऊक नाही. पण ते मध्ये पडले असतील. म्हातारी वर संतापले असतील. एक मात्र नक्की. रूपालीला लुचणं म्हातारीला शक्य झालं नाही. त्यामुळे चिडून जाऊन म्हातारीने त्यांच्यावरच हल्ला केला. आणि तिथून पुन्हा आपल्या जागेकडे ती निघाली असेल ; पण शेवटी म्हातारं, अशक्त शरीर. एवढं मोठं अंतर पार करायला बराच उशीर लागला असेल. तोपर्यंत सुर्योदय झाला असेल. सुर्याची कोवळी किरणं शरीरावर पडताच त्या शरीरातील त्या अमानवी अस्तित्वाने शरीर सोडलं असेल. आणि ते शरीर निष्प्राण होऊन तिथेच कोसळलं असेल ; पण ते शरीर जर रात्रीपर्यंत तिथेच पडून राहिलं असतं तर त्यात नक्की पुन्हा अमानवी अस्तित्व संचारलं असतं. त्याचा संपूर्ण नाश करण्याचे दोनच मार्ग. एकतर त्या शरीराच्या छातीत चांदीचा सुरा खुपसावा लागतो किंवा दिवसाच्या वेळी, शरीरात त्याचा वास नसताना शरीर दहन करावे लागते. पैकी दुसरा उपाय नकळतपणे अमलात आणला गेला."
म्हणजे त्या अमानवी अस्तित्वाचा नाश झाला तर. आता हे आगोटी गाव सुरक्षित आहे. हे प्रकरण असं अचानकपणे, इतक्या लवकर निकालात निघेल असं वाटलं नव्हतं." राजाभाऊ मोकळं हसत म्हणाले. श्री मात्र गंभीरच होता.
"नाही." तो एकदम म्हणाला.
"अं..? नाही ? म्हणजे ?" राजाभाऊंच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालं.
"राजाभाऊ ती म्हातारी स्त्री म्हणजे संक्रमणातून निर्माण झालेलं अमानवी अस्तित्व होतं. याचाच अर्थ या संक्रमणाचं, या पाशवी, रक्तपिपासू अस्तित्वाच्या निर्मितीचं मूळ असणारा जागा झालाय. आणि तो आसपासच कुठेतरी असणार. मला खात्री वाटते. तो केव्हाही आगोटी गावात प्रवेश करू शकतो."
"श्री. तुम्ही मला घाबरताय."
"नाही राजाभाऊ. हे मी नुकत्याच घडलेल्या घटना पाहता विचारपूर्वक बनवलेलं तर्कशुद्ध मत आहे. एक मात्र चांगलं झालं असं म्हणावं लागेल. त्या म्हातारीच्या अचानक येण्याने आपल्याला पुढे येऊ पाहणाऱ्या धोक्याची कल्पना आली आहे. आपल्याला तयार रहायला हवं. " श्री गंभीरपणे बोलत होता. त्याची धारदार नजर खिडकीबाहेर पसरलेल्या गडद, काळोख्या अंधारावर रोखलेली होती.
क्रमशः
मस्तच!
मस्तच!
अगदी नारायण धारपांचा वारसा
अगदी नारायण धारपांचा वारसा चालवताय!
अगदी नारायण धारपांचा वारसा
अगदी नारायण धारपांचा वारसा चालवताय! >> छे हो. काहीतरीच. हो पण नारायण धारपांच्या बऱ्याच कथा वाचल्यामुळे आपसूक त्यांच्या शैलीचं काहीसं अनुकरण होत असावं.
मस्तंच
मस्तंच