रक्तपिपासू भाग ६

Submitted by प्रथमेश काटे on 14 December, 2024 - 09:44

अचानक बसलेला धक्का ओसरल्यावर रोहितनं स्वतःला सावरलं. तोंड जरा पुढे नेऊन तो हलक्या आवाजात म्हणाला.

" अगं रूपाली तू ? एवढ्या रात्री, इथं ?"

"अरे दरवाजा तर उघड. थंडी वाजतेय." तीही खालच्या आवाजात म्हणाली.

तो चटकन मागे वळाला. मधल्या खोलीत येऊन त्याने दरवाजा उघडला. रूपाली दरवाजात उभी होती. हसऱ्या चेहऱ्याने.

"काय गं रूपाली ?"

"ये की बाहेर ?" हाताने इशारा करत ती म्हणाली.

"बाहेर ? आणि आता ?"

"चल‌ रे..."

"अगं चल् काय, रात्र किती झाली आहे ! घरचे सगळे झोपलेत. आता कुठे बाहेर ?"

"माझ्यासोबत चल.."

"पण कुठे ?"

"चल तर खरा."

"बरं." क्षणभरच विचार करून तो म्हणाला आणि बाहेर पडण्यासाठी त्याने पाऊल उचललं, तोच... श्रीने सांगितलेली गोष्ट त्याच्या ध्यानात आली. त्याने दचकून पाऊल मागे घेतलं, आणि म्हणाला -

"नाही नको. मला भीती वाटते."

"अरे भीती कसली ? मी आहे ना तुझ्याबरोबर ? आता जास्त नखरे नको करू.‌ चल निमूटपणे." ती खोट्या रागाने म्हणाली. तो गुपचूप बाहेर आला. 'श्री दादाची फक्त एक शंका आहे. त्यासाठी बिचाऱ्या आपल्या रूपालीला दुखवायला नको.' त्याला वाटलं.

ते दोघे बाहेर रस्त्यावर आले. यावेळी सहाजिकच रस्ता शांत शांत, निर्जन होता. फक्त चांदण्यांचा अगदी मंद, निळसर प्रकाश होता.‌ रूपाली त्याच्या दोन तीन पावलं पुढे होती. ती आपल्याला नक्की कुठे नेते आहे हेच त्याला समजत नव्हत. मध्येच ती एका अरूंद बोळात वळाली. त्याच्या पेन टॉर्चच्या बारीकशा उजेडाच्या बिंदू भोवतालचा अंधार अजूनच गडद झाला होता. रोहितला आता जरा अस्वस्थ वाटू लागलं.

"रूपाली..." न राहवून तो म्हणाला. ती थबकली. तशीच पाठमोरी उभी राहिली.

"कुठे नेत आहेस मला ?" त्याने विचारलं. मात्र ती काहीच बोलली नाही. वळालीही नाही.

" रूपाली..."
काहीच प्रतिक्रिया नाही. हालचाल नाही. आता मात्र तो जरा घाबरलाच. तसं पाहता रूपालीच तर होती. त्याच्या चांगल्या ओळखीची ; पण तिची पाठमोरी आकृती आता भयावह वाटत होती. जरासा बिचकत तो पुढे झाला.

"रूपाली..." तिचा हात हलवत तो जरा मोठ्याने म्हणाला. तिच्या तोंडाकडे त्याने टॉर्चचा झोत टाकलेला. आणि.. झटकन ती वळली. टॉर्चच्या उजेडात तिचे डोळे, आणि तोंडातील अणकुचीदार दात चमकले. त्याला भ्यायलाही उसंत मिळाली नाही. त्याचे खांदे पकडून तिनं त्याला जवळच्या भिंतीवर दाबलं.‌ त्याला ओरडायचं होतं ; पण तोंडातून आवाज फुटेना. तिचा चेहरा.. तिचे मोठाले, अणकुचीदार दात जवळ जवळ येऊ लागले. आणि...

"अं...ह्ह.." गुदमरल्यासारखा, कण्हण्याचा आवाज तोंडून निघत असतानाच रोहित दचकून झोपेतनं जागा झाला. छाती धडधडत होती. श्वास फुलला होता.‌ अंग घामाने निथळून गेलेलं.

"रोहित. काय झालं रे ?" शेजारच्या खाटेवर झोपलेल्या त्याच्या आईला बहुतेक त्याचा आवाज आला असावा. अर्धवट झोपेतच तिने विचारलं.

"अं..? नाही. काही नाही." तो हलक्या आवाजात उत्तरला. स्वप्न होतं तर.. कालपासून मनात भीती बसली होती. आणि श्रीने सुचना दिल्यापासून रूपाली बद्दल जरा काळजी, अन् जरा संशय वाटत होता. त्यामुळेच असं स्वप्न पडलं असावं. इतक्या स्पष्टपणे नाही ; पण काहीसा असाच विचार तो करत होता. एकदा मनाला स्पष्टीकरण भेटल्यावर तो जरा रिलॅक्स झाला. आणि खाली पहुडला.

•••••••

रूपाली स्वतःच्याच विचारात मग्न होती. रात्रीचा एक वाजत आला, तरी तिच्या डोळ्याला डोळा लागलेला नव्हता. बाजूला खाटेवर तिचे म्हातारे वडील झोपले होते. ती मात्र अंथरूणावर पडल्यापासून तशीच जागी होती ; पण तिचं जागरण अस्वस्थ मुळीच नव्हतं. तिला कालचा प्रसंग आठवत होता. त्या म्हातारीच्या काटकुळ्या हातांची मिठी. ती क्षणभराचीच तीव्र वेदना. आणि त्यानंतरची ती सुखद जाणीव.‌ हवीहवीशी वाटणारी.. त्याच सुखद आठवणीत तिचं मन गुंग झालं होतं. ती जाणीव तिला परत अनुभवायची होती. पुन्हापुन्हा. आणि ती पुन्हा अनुभवता येणार याची तिला खात्री वाटत होती. तिला मनातून खात्री होती, की आज रात्री ती म्हातारी तिला भेटायला नक्की येणार. रूपाली तिचीच वाट बघत होती.

"शुक् शुक्." खाटेपलिकडच्या खिडकीबाहेरून आवाज आला. तिनं चटकन मान वळवून पाहिलं. अंधारात फक्त माणसाच्या चेहऱ्यासारखा आकार तेवढा दिसत होता. केस मोकळे सोडलेला चेहरा. म्हातारीच. तिने ओळखलं ती लगबगीने उठून बसली. तो चेहरा खिडकीतून गायब झाला. चटकन अंथरूणातून उठून ती दबक्या पावलांनी दरवाजापाशी गेली. आवाज न करता, हलक्या हातांनी दरवाजाची कडी काढून, दरवाजा उघडून बाहेर आली.‌ घराजवळच्या एका झाडाखाली म्हातारी उभी होती‌.‌ घाईघाईने, एक प्रकारच्या अनामिक ओढीने रूपाली तिच्यापाशी पोहोचली. म्हातारीच्या त्या विद्रूप, भयानक चेहऱ्याची आता तिला बिलकूल भीती वाटत नव्हती. म्हातारी बटबटीत डोळ्यांनी तिला निरखत होती.‌ आणि ती स्मितवदनाने, प्रेमळ नजरेने म्हातारीकडे बघत होती. तिच्या नजरेत कणव, कृतज्ञता होती. तर म्हातारीच्या नजरेत फक्त आसुसलेपण, लालसा होती.

हळूच तिने लडखडतं पाऊल पुढे‌ टाकलं. रूपालीने खांद्यावरचा पदर हळूच सरकवला, आणि म्हातारीला जवळ घेतलं.‌ तशी म्हातारीच्या काटकुळ्या हातांची घट्ट मिठी तिच्या कमरेला पडली. तिच्या हृदयाची धडधड वाढली. डोळे मिटले.‌ आता क्षणाचीच जराशी वेदना, आणि मग...

" रूपालीss" एकदम आलेल्या ओरडण्याच्या आवाजाने रूपाली दचकली. म्हातारी थबकली. रूपाली ने आवाजाच्या दिशेने पाहिलं.‌ तिचे वडील थरथरत्या शरीराने दरवाजात उभे होते‌. रूपाली दचकून म्हातारीपासून दूर झाली. तरातरा चालत तिचे वडील त्यांच्याजवळ येऊन पोहोचले. त्यांनी म्हातारीवर अत्यंत तुच्छतेचा कटाक्ष टाकला. मग रूपालीकडे वळून कडाडले -

"काय चाललंय हे ? कोण आहे ही थेरडी ?"

रूपालीने झटकन मान वर करून अत्यंत रागीट नजरेने वडलांकडे पाहिलं.

"पाहतेस काय ?? आत जा." ते पुन्हा ओरडले.

रूपाली त्यांच्याकडे रागारागाने पाहत जागीच उभी होती.‌

"जा म्हणतो ना..." ते अजूनच त्वेषाने ओरडले. रूपाली किंचीत दचकली. मग स्वतःशीच चरफडत घरात निघून गेली. ते पुन्हा म्हातारीकडे वळले. तिची अत्यंत क्रुद्ध, जळजळीत नजर त्यांच्यावर खिळली होती. रागाने चेहरा अजूनच क्रूर, भयावह दिसत होता ! तिचं ते रूप पाहून रूपालीचे वडील हबकलेच. इतका क्रुद्ध, इतका भयानक चेहरा त्यांनी आजवर पाहिला नव्हता. मनातल्या तीव्र संतापाची जागा, जीवघेण्या भीतीने घेतली. पळून जावंस वाटत होतं ; पण पाय जागेवरून हलत नव्हते. त्या विद्रूप चेहऱ्याकडे पाहवत नव्हते ; पण त्यावरून नजर सोडवताही येत नव्हती. तोंडून आवाजही फुटत नव्हता. ते गर्भगळीत होऊन थरथरत्या शरीराने तसेच उभे राहिले. ती म्हातारी एखाद्या दगडी पुतळ्याप्रमाणे त्याच्याकडे रागाने पाहत काही क्षण तशीच उभी होती.

" अं..." भीतीने त्यांच्या तोंडून निरर्थक हुंकार बाहेर पडला.‌‌ आणि... आणि इतक्यात फिस्कारत म्हातारीने‌ त्यांच्यावर झेप घेतली.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults