![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2024/12/09/Picsart_24-12-09_19-34-45-526.jpg)
"माझ्या मनातली शंका खरी ठरली राजाभाऊ." श्री म्हणाला.
"कोणती शंका ? काय झालं श्री ?" चटकन राजाभाऊंनी विचारलं.
वॉकला गेलेला श्री लवकरच घरी परतला होता. शांतपणे आणि स्वतःच्याच तंद्रीत. जरासा चिंतितही दिसत होता तो. ही सहजी घडणारी गोष्टच नव्हती. तेव्हा सहाजिकच राजाभाऊंना आश्चर्य वाटलं. आणि आता हे त्याचे शब्द. काहीतरी गंभीर बाब असणार हे त्यांच्या लक्षात आलं.
"वाटेत रूपाली भेटली होती." एवढं सांगून श्री थांबला.
"हं...मग ?"
"तिचे डोळे, तिचं बोलणं, हसणं यावरून माझी खात्री झाली आहे..."
"कसली ? व्यवस्थित सांगा ना ?" राजाभाऊ अधीरतेने म्हणाले.
"राजाभाऊ... आपली रूपाली संक्रमित झाली आहे. किंवा होऊ लागली आहे."
"काय ?" हे अर्थात अनपेक्षित होतं. राजाभाऊंना जरासा धक्काच बसला. "पण हे कसं शक्य आहे ? रूपालीने तर वेळीच हुशारीने मुलांना तिथून बाहेर काढलं होतं. मग ती स्वतः कशी...?"
"राजाभाऊ, ड्रॅक्युला म्हणजे फक्त माणसांचं रक्त पिणारा एवढंच नाही. त्याच्याकडे अतिमानवी शक्ती असतात. तो माणसाच्या मेंदूवर नियंत्रण मिळवू शकतो. रूप बदलू शकतो. अजूनही काही गोष्टी असतील. रात्री मुलं त्या झोपडीतून बाहेर पडल्यानंतर काय घडलं असेल, कुणी सांगावं ?" गूढ, गंभीर आवाजात श्री म्हणाला. एक हलकासा शहारा राजाभाऊंच्या अंगावरून गेला.
"आता तर खरी सुरुवात झाली आहे. वेळीच काही केलं नाही तर हे संक्रमण झपाट्याने वाढत जाईल,पसरत जाईल. लवकरात लवकर काय करता येईल ते पहायला हवं."
"श्री, रूपाली पुन्हा पूर्ववत होऊ शकेल
"अर्थात. त्यांचा दंश झाला की रक्तात ते अमानवी विषाणू पसरू लागतात. माणसात परिवर्तन व्हायला सुरुवात होते ; पण जोवर शरीरात प्राण आहे, तोपर्यंत मानवी अंश, माणुसकी, स्नेह, कणव हे मानवी गुणविशेष कुठेतरी शिल्लक असतातच. तोपर्यंत हे अघोरी, अमानवी परिवर्तन रोखलं जाऊ शकतं. पण हे सहज शक्य नाही. रूपालीला इथे आणावी लागेल. ते कसं जमावं ?
*******
मुलं शाळेला निघाली होती. कालच्या त्या भयानक प्रसंगाच्या धक्क्यातून ते अजून पुरेसे सावरलेले नव्हते. ते दृश्य अजूनही सारखं सारखं डोळ्यांपुढे येत होतं. त्यामुळेच
ते जरा शांत शांतच होते. पण समोरून हसऱ्या चेहऱ्याने त्यांच्याकडेच येणाऱ्या श्रीला पाहून एकदम त्यांचे चेहरे जरासे खुलले.
"अरे श्री दादा तू..?" त्याला यावेळी पाहून रोहितला आश्चर्य वाटलं.
"काय मुलांनो. स्कूलला निघालात का ?" श्रीने विचारलं.
"हो.." सगळे एकसुरात ओरडले.
"अरे! पण चिल्लर पार्टी दिसत नाहीये ? छोटू, मिंकी वैगेरे..?"
"दादा..." शिवानी दबलेल्या सुरात म्हणाली. " काल रात्री जे झालं त्यामुळे मुलं खूप घाबरली होती. छोटूच्या आई तर म्हणाल्या की रात्री मध्येच उठून तो मोठमोठ्याने रडायलाच लागला ! त्यामुळे त्यांच्या ममी पप्पांनी आज त्यांना शाळेत नाही पाठवलं.
" ओह ! बरं." श्री विचारात पडला. खरंतर ही मुलंही जरा भ्यायली होतीच. सहाजिकच होतं ते. पण शाळा, अभ्यास, खेळ, मित्रमैत्रिणी यांच्यात रमल्यावर हळूहळू ती आठवण आपोआप पुसट होणार होती. त्यामुळे काळजीचं कारण नव्हतं.
"बरं मुलांनो. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे."
" त्या कालच्या प्रकाराबद्दल ?" शिवानी.
" अं.. होय. मुलांनो, रात्री अंधार पडल्यावर रूपाली तुमच्याकडे आली, आणि तुम्हाला एकट्याला आपल्यासोबत बोलावू लागली तर तिच्यासोबत जाऊ नका बरं."
मुलांच्या चेहऱ्यावर नवल - आणि कदाचित थोडीशी नाराजीही -उमटली. अर्थात याची त्याला कल्पना होतीच. तो स्पष्टीकरण देत म्हणाला -
"नाही म्हणजे तिच्यापासून काही धोका आहे असं मी मुळीच म्हणत नाहीये. पण काल तुम्ही त्या घरातून पळून गेल्यानंतर ती एकटीच मागे राहिली होती. त्यामुळे फक्त आपली एक सावधानी बाळगावी म्हणून सांगतोय. पण काळजी करू नका. मी पाहतो काय करायला हवं ते. हं."
"बरं. ठिक आहे दादा." शिवानी हसून म्हणाली. तेव्हा श्रीला बरं वाटलं."बरं येऊ आम्ही ? बाय"
"हो. बाय." मुलं शाळेला निघाली.
•••••••
" अरे श्री भाऊ, या आत या."
"काकू, छोटू कुठं आहे ?" श्रीने आतमध्ये येत विचारलं. तशा छोटूच्या आईच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालं. त्यावर काळजी दिसू लागली.
" आतल्या खोलीत आहे."
त्यांच्यामागून श्री खोलीकडे गेला. मध्यमवर्गीय कुटुंब. मुलांसाठी स्वतंत्र खोली, अशी चैन त्यांना परवडणारी नव्हती. आणि शक्य असतं तरी त्यांनी तसं केलं नसतं. छोटू त्यांचा एकुलता एक मुलगा. शिवाय अजून खूप लहान. त्यामुळे त्यांची ते खूप काळजी घेत.
ते दोघे दारापाशीच थांबले. छोट्याशा पलंगावर छोटू पडून होता."
"बघा ना श्रीभाऊ. काल उशिरा रात्री घरी आला, तेव्हापासून शांत शांतच आहे. रात्री झोपही नीट लागली नाही. सारखा दचकून उठायचा. सकाळपासून अंगात थोडी कणकणही आहे. म्हणून म्हटलं दोन दिवस घरीच राहूदे." छोटूची आई काळजीत पडली होती.
"हं... बरोबर केलंत. काकू तुम्ही मुळीच काळजी करू नका. छोटू लवकर ठणठणीत बरा होईल. मी जरा त्याच्याशी गप्पा मारतो म्हणजे बघा कसा त्याचा मूड बदलतो."
"हं. श्री भाऊ तुम्ही बसा त्याच्याजवळ. मी तुमच्यासाठी चहा टाकते. आता न्हाई म्हणू नका. एकतर तुम्ही इकडं कधी येत नाही. आज आलाय तर थोडा पाहुणचार करू दे तुमचा."
"बरं. ठीक आहे." श्री हसून उत्तरला. छोटूची आई किचनकडे गेली. आणि तो आतमध्ये शिरला. तेव्हा तो जरा गंभीर झाला होता. छोटू जागाच होता. आताही जरा घाबरल्या सारखा वाटत होता. त्याचा गोंडस, टवटवीत चेहरा जरासा सुकला होता.
"छोटू." त्याच्या जवळ जाऊन श्रीने आवाज दिला.
त्याला बघून छोटूचा सुकलेला चेहरा खुलला. "अरे दादा.." म्हणत तो लगबगीने उठू लागला.
"अरे अरे सावकाश." त्याला उठायला मदत करत श्री म्हणाला.
एका बाजूची खुर्ची त्याने छोटूच्या पलंगाजवळ ओढून घेतली.
"काय रे छोटू एकदम आजारी कसा पडलास ? तू तर स्ट्रॉंग मुलगा आहेस ना."
"दादा ती म्हातारी आजी कित्ती भयानक होती माहितीये का ?" डोळे मोठे करत छोटू म्हणाला. "ती मान खाली घालून बसली होती. आणि अचानक... अचानक झटकन तिने मान वर केली. तिचा तो चेहरा... तो.."
"छोटू.. स्टेडी. शांत हो." त्याचा हात हातात घेत श्री म्हणाला. "ती म्हातारी आता काही नाही करणार. हं ? मुळीच घाबरू नको. आणि तिचा विचारच करू नको. ओके ?" त्याच्या डोळ्यांत डोळे घालून पाहत, त्याचा हात घट्ट दाबत हळूवार स्वरात श्री म्हणाला.
"ओके." निरागसपणे छोटू उत्तरला.
"आता बिलकुल घाबरायचं नाही. ब्रेव्ह मुलगा आहेस ना तू ?"
"हो."
"गुड बॉय." त्याच्या गालावर थोपटत हसून श्री म्हणाला.
•••••••
चहा पीत ते दोघे गप्पा मारत होते. त्या मुलांना दिलेली सूचना श्रीने छोटूलाही दिली.
"छोटू.. माझं एक छोटंसं काम करशील ?"
"हो दादा. सांग ना." चटकन छोटू म्हणाला.
"आता तुला बरं वाटू लागेल ; पण आज लगेच घराबाहेर खेळायला जाऊ नकोस हं. आराम कर. आणि उद्या सकाळी जर रूपाली तुमच्याकडे आली तर तिला घेऊन माझ्याकडे ये. माझं घर इथं जवळच आहे ना."
"ठिक आहे दादा ; पण तूच डायरेक्ट रूपालीला का नाही यायला सांगत ?"
"अं... छोटू तुला तपासल्यावर डॉक्टरांनी गोळ्या दिल्या असतील ना ?"
"हो ना दादा. किती कडू कडू असते गोळी. मला आजिबात आवडत नाही ; पण आईने खायलाच लावली."
"हो मग, तुला लवकर बरं वाटायला नको का ? आता तुला माहित आहे की गोळी खाल्ल्यावर बरं वाटेल ; पण तू ती लगेच घेतली नसेल. तुला गोळी चारण्यासाठी आईने किती समजावून सांगितलं असेल. तुला खेळणी आणून देण्याचं प्रॉमिस केलं असेल. तेव्हा तू गोळी घेतली असशील ना ?"
"हो." हसून खाली मान घालत छोटू म्हणाला.
"आजारी पडलेल्या माणसांचं असंच असतं. आपली रूपाली पण जरा आजारी पडली आहे. माझं ती ऐकणारच नाही ; पण तू तिचा लाडका आहेस ना... तुझं नक्की ऐकेल ती."
"हो." छोटूला त्याचं म्हणणं पटलं.
"बरं चल. आता येतो मी." त्याला टाळी देऊन श्री उठला. आणि बाहेर पडला.
•••••••
आज रोहितला झोप लागत नव्हती. त्याचे आई पप्पा दिवसभराच्या कामांनी थकून केव्हाच निद्रेच्या अधीन झाले होते. अंथरूणावर पडून मोबाईलमध्ये डोळे घालून बसलेली त्याची ताई पण शेवटी मोबाइल बाजूला ठेवून झोपी गेली होती. तो मात्र डोळे टक्क उघडे ठेवून तसाच अंथरूणात पडला होता. डोक्यात विचार सुरू होते.
'श्रीने असं का सांगितलं असेल ? आपल्या रूपालीला..? नाही.. तसं काही नसेल. फक्त काळजी म्हणून तो म्हणाला असणार ; पण.. पण ती म्हातारी...!"
ती आठवण येताच पुन्हा कालचं ते भयानक दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर येऊ लागलं. तसे त्याने दोन्ही डोळे गच्च मिटून घेऊन जोरजोरात मान हलवली. झोप तर येत नव्हती. घशाला कोरड पडली होती ; पण अंधारात, एकट्याने किचनमध्ये जायचीही त्याला जरा भीतीच वाटत होती. पण उठावं तर लागणार होतं.
'ती म्हातारी काय इथं आपल्या घरात येणार आहे का ? घाबरायचं काय कारण ?" असं स्वतःलाच समजावून तो उठला. आपली छोटी पेन टॉर्च घेऊन तरातरा चालत किचनमध्ये आला. पाणी प्यायला, आणि ग्लास जागेवर ठेवून निघणार तोच समोरच असलेल्या खिडकीतून आवाज आला.
"शुक् शुक्."
मुळातच घाबरलेल्या रोहितचा एकदम दचकून थरकाप उडाला. त्याने खिडकीकडे पाहिलं. खिडकीची काच थोडी उघडी होती. आणि त्या फटीतून, जाळीआडून हसत त्याच्याकडे पाहणारी रूपाली दिसत होती.
क्रमशः
मस्त भाग!! पुभाप्र !
मस्त भाग!!
पुभाप्र !