शेबटी काकींनि मनाचा हिय्या केला. वेगवेगळ्या आकाराच्या चार जड चांदीच्या वाट्या ओच्यात बांधल्या. नेसण घट्ट केली. कपाटाच्या किल्ल्या जागेवर ठेवल्या. मदत करणाऱ्या मुलीचे लक्ष नसल्याचे पाहून त्या पिशवी घेउन निघाल्या.
काकी , थोराड चेहेऱ्याच्या ,पासष्टी कडे झुकलेल्या व्रुद्धा होत्या. गेली चारपाच वर्ष हॉलच्या मॅनेजरकडे कामाला होत्या. म्हणजे काकांना अपघात झाल्यापासून. काकींचा चेहेरा तरूणपणी ही असाच थोराड असल्याने त्यांना काकी म्हणत. त्यांना ते आवडत नसे. आज सकाळी निघतानाच त्यांना काका म्हणाले, "रोज, रोज ते गोड पदार्थ आणू नकोस, जरा मसालेदार चमचमीत पदार्थ आण की. ". त्यावर त्या म्हणाल्या, "दान न मागता घेणाऱ्याला निवडीचा अधिकार नसतो. लोक रोजच गोड पदार्थ देतात , त्याला , मी काय करू?"
तसं काकी हे एक प्रस्थच होतं. आसपासच्या पंचक्रोशीत आळूची भाजी , मसालेभात , सोलकढी वगैरे पदार्थ करण्यात त्यांचा हातखंडा होता. हॉलच्या मॅनेजर बरोबर भाड्याची घासाघीस झाली की त्याचेच केटरींग असल्याने गिऱ्हाईक ओघानेच विचारी , "काकी आहेत ना? "(म्हणजे ' कामाला' असे त्याला म्हणायचे असे. )त्यावर मॅनेजरही विनोदाने म्हणे, " हो, हो काकी आहेत की अजून, 'कामाला' . आणि आपल्याच विनोदावर हासत सुटे . समाजातल्या कोणत्याही थरातले, लग्न, पार्टी, अथवा समारंभ असो, केटरिंग म्हंटलं की , काकी असल्याची लोक खात्री करून घेत. नाहीतर केटरर दुसरा आणू असे म्हणत.
काका गेली चारपाच वर्ष अंथरूणाला खिळले होते . जुने तुटपुंजे सरकारी पेन्शन. पण काकींनी हातभार लावल्याने बरं चालत असे. महागाई आकाशाला भिडत होती. त्यांना मूल नव्हतं तसेच जवळपासचे नातेवाईकही नव्हते. स्वतःची जबाबदारी स्वतःच घेणं भाग होतं. सुरवातीला साठ्वलेले पैसे , काकांचे उपचार आणि रोजचा खर्च भागविण्यात गेले. जरा पैसे वाचवले की ते काढायचीच वेळ येत असे. देवही अगदी ओरबाडून काढीत होता. प्रथम, प्रथम काकींना स्वयंपाकाला जाण्याची लाज वाटे. पण मॅनेजरनी समजावले आणि उत्तेजनही दिले.
तो भला माणूस होता.
काकींना कामाचे पैसे इतरांपेक्षा जास्त मिळत असत. पण काकी रोजच्या ओढगस्तीला फारच कंटाळल्या होत्या. आणि त्यांचा तोल जाऊ लागला. जुने पुराणे चांदीसोने त्यांनी केव्हाच विकून खाल्ले होते. काकी मूळच्या कर्नाटकातल्या. आपल्या अनुनासिक आवाजात त्या कानडी भाषेतील लग्नाची गाणी गात. कधीकधी समारंभातही ; त्यांना गाण्याचा आग्रह होई. समोरच्या मौल्यवान वस्तू पाहून आजकाल त्यांचे मन विचलीत होई. आज मात्र त्यांनी त्या बाट्या बांधल्या , आणि त्या निघाल्या. निदान महिना दोन माहिन्यांचा प्रश्न तरी नक्की मिटेल.
पण काकींना पाहिले , ते असि. मॅनेजरने. धावतच तो मॅनेजरया खोलीकडे धावला. मॅनेजर पैशाचा हिशेब करीत होता. कामात व्यत्यय आल्याने तो खेकसून म्हणाला, "काय आहे रे , मधे, मध्ये ? " असिं. ने त्याच्या कानात सांगितले. त्यावर तो म्हणाला, "शुद्धीवर आहेस का ? कोणाबद्दल बोलतो आहेस तू? विश्वासू बाई आहे ती. अस ती करणारच नाही. " पण असिं. ने हिंदी सिनेमातल्या सारख्या वाटेल त्या शपथा घ्यायला सुरवात केली. तेव्हा थोड्याशा अनिच्छेनेच तो विचार करू लागला. त्याला प्रसंगाचे गांभिर्य लक्षात आले. तो धावतच हॉलच्या मुख्य दरवाज्यापाशी पोचला.
काकी दरवाज्याबाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात त्याने हाक मारली . "काकी , अहो काकी , आज अगदी न सांगता निघालात? आणि पैसे नकोत का? काकींच्या छातीत धस्स झाले. हलकासा घाम कपाळावर आला. तो पदराने पुसत कसतरी हासत काकी म्हणाल्या, "अरे पैसे कुठे पळून जातात की काय? घेईन नंतर. आज ह्यांना डॉक्टरांकडे न्यायचय , म्हणून घाईनी निघाले. " मॅनेजर पुढे होऊन म्हाणाला, "ते ठीक आहे , पण काकी, माझ्या आईसारख्या तुम्ही. तरीपण एक गोष्ट धाडसानी विचारतो. ओच्यात काय घेऊन चाललात?
" अरे पिशवीत तूच न्यायला सांगीतलेले पदार्थ आहेत. "काकींचे हात थरथरू लागले." मी ओच्यातल्या वस्तूबद्दल विचारतोय. " मॅनेजर गरजला. असि. मॅनेजर पण धावत आला. हळूहळू कार्यालयातले एकदोन लोकही आले, म्हणाले, " जाऊ द्या हो, म्हातारी आहे. दो न पदार्थ नेले जास्ती नेले तर कुठे बिघडलं? मॅनेजर पुन्हा ओरडला , "अहो पण मी त्यांच्या ओच्यात चांदीची वस्तू आहे त्याबोलतोय. "
परत लोक म्हणाले, "काय मॅनेजर ?काकी एवढ्या जुन्या . त्यांच्यावर संशय घेता? बघता बघता आवाज वाढले. आता मात्र मॅनेजर आवाज चढ्वून म्हणाला, "हे पाहा काकी , तुमच्या ओच्यात जर चांदीच्या वस्तू नसतील तर तुम्हाला आणि काकांना मी जन्मभर मी पोसायला तयार आहे.. पण त्या जर निघाल्या ना तर मात्र पोलिसांना बोलवीन. त्यावर काकी म्हणाल्या, "तुझ, म्हणणं खरं आहे . खरच चादीच्या वाट्या आहेत. ह्या घे. पण पोलिसांना बोलावू नकोस. " त्यां हमसून हमसून रडू लागल्या.
मॅनेजरने वाट्या ताब्यात घेत म्हंटले, "काकी पैशाची नड होती तर मला सांगायच होत. असा तमाशा तरी झाला नसता. मी तुम्हाला आज ओळखतो का? जाऊन द्या , निघा तुम्ही. उद्या पण काम आहे . वेळेवर या.
काकींचा बांध फुटला होता. त्या तशाच डोळे पुशीत निघाल्या. पुन्हा कामावर न जाण्याचे ठरवून.
(संपूर्ण)
अरुण कोर्डे
©®
परिस्थिती खुप वाईट..
परिस्थिती खुप वाईट.. लोकांकडुन नको ते करवुन घेते.
कथा छान लिहिलीय .
अगदी हळहळले.. कथा छान लिहिली
अगदी हळहळले.. कथा छान लिहिली आहे.
छान कथा!
छान कथा!
अगदी हळहळले.. कथा छान लिहिली
अगदी हळहळले.. कथा छान लिहिली आहे.
+११
परिस्थिती खुप वाईट..
परिस्थिती खुप वाईट.. लोकांकडुन नको ते करवुन घेते.>>>>>खरंच.
छान लिहिलंय