आनंदाची बातमी
दारावरची बेल वाजली तसं मी घड्याळात बघितलं.
रात्रीचे पावणेअकरा वाजले होते. नेटफ्लिक्सवरचा चालू असलेला कार्यक्रम मी pause केला आणि उठलो. प्रिया आली असावी. महिन्यातून एकदा या मैत्रिणी कुणा एकीच्या घरी पार्टी करतात, तशी आज एकीच्या घरी पार्टी होती. नेहमी अशा पार्टीवरुन परत येताना बऱ्यापैकी दमलेली प्रिया आज खूपच उत्साहात आणि वेगात घरात शिरली.
“परेशss आनंदाची बातमी आहे.”
तिचा उत्साहाचा धबधबा अगदी ओसंडून वाहताना कळत होता.
‘आनंदाची बातमी!’ माझ्या काळजात धस्स झालं. प्रियाचे आई-वडील येणार आहेत की काय? एक तर ते आले की महिनाभर तरी जात नाहीत आणि या महिनाभरात- तिचे वडील खाण्याचे शौकीन असल्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बाहेर खाणे हे ठरलेलेच असते. आणि तिची आई मराठी नाटकांची शौकीन असल्याने दर शनिवार किंवा रविवार एखादे नाटकही दाखवायला लागायचे. कधी मराठी चित्रपट. शिवाय पुण्यातील तुळशीबागेचे दोघेही fan असल्यामुळे तिथेही- त्या प्रचंड गर्दीमध्ये किमान या काळात दोन-तीनदा चक्कर टाकावी लागायचीच. कावरेचे ice cream, अगत्यचे जेवण हे मग व्हायचेच. एकूण पुढील किमान एक महिना खिसा रिकामा करणारा आणि प्रचंड दमवणारा ठरणार या भीतीने मी केवळ विचार करूनच गर्भगळीत झालो.
“तुझे आई-बाबा येणार आहेत?” मी भीतभीत विचारलं.
“नाही रेss ही नाही आनंदाची बातमी!” प्रिया म्हणाली आणि माझा जीव भांड्यात पडला.
पण मग आनंदाची बातमी कोणती? मी परत विचारात पडलो, आणि डोक्यात आलेल्या एका विचाराने काळजीतही!
“अगं पण प्रथमेशनंतर चान्स घ्यायचा नाही असं आपलं ठरलं होतं ना? आपण व्यवस्थित काळजीही घेतली होती. मग ही आनंदाची बातमी..?” मी तिला परत विचारलं.
“अरेs तीही नाही. काहीतरी बोलू नकोस.”
प्रिया तोपर्यंत हॉलमधल्या सोफ्यावर स्थानापन्न झाली होती.
“बस्स, सांगते तुला कोणती आनंदाची बातमी ते.”
“थांब!” असं म्हणून मी माझा netflixवरचा pause केलेला कार्यक्रम बंद करून टाकला. एक तर आता तो शांतपणे बघणं शक्यच नव्हतं. शिवाय मी जे बघत होतो ते प्रियाला आवडेलच याची खात्री नव्हती, किंबहुना बहुतेक तिला ते आवडलं नसतंच.
“अरेs मला एक सुंदर जॉब अपॉर्च्युनिटी आली आहे!”
“जॉब अपॉर्च्युनिटी? अगं तू पार्टीला गेली होतीस ना मैत्रिणीकडे?”
“सांगतेs जरा दम धर..” प्रिया म्हणाली. “तुला माझी ती मैत्रीण कल्पना माहितीये ना? तिच्याकडेच आज पार्टी होती.”
माझ्या डोळ्यासमोर ‘ती’ कल्पना उभी राहिली. होss तीच! नाकावर छोटासा तीळ असलेली.
“तिचा नवरा रमेश एसटी महामंडळात मोठा अधिकारी आहे.”
“बरं मग त्याचं काय?”
“अरेs एसटी महामंडळात शिवनेरी गाड्यांमध्ये शिवनेरी सुंदरी ठेवणार आहेत. ते काम करण्यासाठी तिने मला ऑफर दिली आहे.”
“शिवनेरी सुंदरी आणि तू!! आणि तुला कशी काय ऑफर दिली त्यांनी?”
“अरेs रमेश कल्पनाला म्हणाला, शिवनेरी सुंदरी म्हणून प्रिया एकदम शोभेल! गालावर छान खळी पडते तिच्या!”
या रमेशनं प्रियाच्या गालावरची खळी कुठे पाहिली? आणि पुन्हा त्याबद्दल स्वतःच्या बायकोपुढे बोलायचं ही तर कमालच होती! मला एकाच वेळी रमेशचा राग आणि कौतुक दोन्ही वाटलं.
“उद्यापासूनच ट्रेनिंग चालू होणार आहे. सात दिवसांचं! मी जाणार आहे.” प्रिया आधीच्याच उत्साहात म्हणाली.
“पण मग रमेशनं कल्पनाचं- त्याच्या बायकोचं नाव का सुचवलं नाही शिवनेरी सुंदरीसाठी?” मी प्रियाला विचारलं.
माझ्या डोळ्यापुढे पुन्हा एकदा कल्पनाचा चेहरा आला. नाकावरच्या त्या तिळामुळे ती फारच क्युट दिसते असं माझं प्रामाणिक मत आहे. खरं तर तो तीळ आहे छोटासाच; पण मोबाईलवर फेसबुकवरचा फोटो झूम करून बघितलं की लक्षात येतो. तंत्रज्ञानाने हा एक छान फायदा करून दिला आहे. अर्थात तंत्रज्ञानाचे जसे फायदे असतात तसे तोटेही असतात. आणि त्यामुळेच रमेशसारख्यांचे फावते. दुसऱ्यांच्या बायकांच्या गालावरच्या खळ्या बघण्याची संधी मिळते ना!
प्रिया आपल्याच विचारात दंग होती. तिनं माझ्या प्रश्नावर काहीच उत्तर दिलं नाही.
प्रियाला थांबवण्यात काही अर्थ नव्हता. तरी मी तिला म्हटलं, “आणि फक्त आठवड्याभराचंच ट्रेनिंग?”
“होs आठवड्याभराचंच ट्रेनिंग आणि लगेच जॉब. अरे एअर होस्टेसचं काम तसं प्रत्येकाला माहितीच असतं. बसमध्ये ते करताना जे काही थोडेफार बदल असतील तेवढे फक्त या ट्रेनिंगमध्ये आम्हाला शिकवणार. त्यात काही फारसं अवघड नाही, असं म्हणत होती कल्पना.”
माझ्या डोळ्यापुढे परत ‘त्या’ कल्पनाचा चेहरा आला. पण प्रयत्नपूर्वक तो दूर सारून मी म्हणालो,
“अगं पण कुणाचं bossing आवडत नाही म्हणून तू जॉब करायचा नाही असं ठरवलं होतंस ना?”
“अरे इथे कोण करणार आहे bossing? शिवाय मला प्रवासाची किती आवड आहे, हे तुला माहीत आहेच. दररोज बसमधून भटकायला मिळेल आणि त्याचा पगारही मिळेल. शिवाय बसमध्ये बिसलरीच्या बाटल्या आणि सँडविचेस पण देणार आहेत म्हणे. मी घेऊन येईन हं तुझ्यासाठी रोज!”
प्रियाला थांबवण्यात काहीच अर्थ नव्हता, त्यामुळे मी गप्पच राहिलो.
“चल झोपूया आता. उद्या सकाळी सातला ट्रेनिंगला जमायचे आहे स्वारगेटवर.” प्रिया म्हणाली.
दुसऱ्या दिवसापासून प्रियाचं ट्रेनिंग चालू झालं आणि दुपारी घरी आल्यावर त्याचा वृत्तांत मला देणंही. एकूण ती या कामावर फारच खुश दिसली. सुंदर युनिफॉर्म मिळणार होता. चार लोकांशी गप्पा मारायला मिळणार होत्या- जी तिची आवडीची गोष्ट होती. शिवाय खास ड्रायव्हरशेजारी बसायला स्पेशल सीट मिळणार होती.
असंच एके दिवशी घरी आल्यावर ती मला उत्साहात म्हणाली, “आज आम्हाला बस हायजॅक झाली तर काय करायचं शिकवलं!”
“अगंs बस कशाला कोण हायजॅक करेल?”
“असं काही नाही हं, होऊ शकेल बसदेखील हायजॅक. जगात असं कुठे, कधीतरी झालंही आहे असं म्हणत होते सर. शिवनेरी सुंदरी ही जशी नवीन कल्पना आहे, तशीच बस हायजॅक हीसुद्धा नवीन कल्पना कोणा गुन्हेगाराच्या सुपीक डोक्यात येऊ शकते.”
‘कल्पना, कल्पना’ अशा दोनदा उल्लेखामुळे माझ्या डोळ्यापुढे पुन्हा कल्पनाचा तो ‘क्यूट’ चेहरा येऊन गेला.
“बरं मग काय करायला सांगितलंय असं कुणी बस हायजॅक केली तर?” मी उत्सुकतेनं विचारलं.
“असं काही झालं तर हायजॅकरशी कसं प्रेमाने बोलायचं, त्याच्या कसं कलकलाने घ्यायचं, त्यानं कुणा प्रवाशांना इजा करू नये म्हणून प्रसंगी त्याच्या बंदूक किंवा चाकूपुढे आपणच समोर कसं जायचं वगैरे आम्हाला त्यांनी शिकवलं.”
‘बापरे!’ मी मनातच म्हटलं. अर्थात काहीही सांगून प्रियाला तिच्या या निश्चयापासून दूर करणं शक्यच नव्हतं म्हणून मी नेहमीप्रमाणे पुन्हा गप्प राहिलो.
असेच सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी प्रिया ‘शिवनेरी सुंदरी’ म्हणून कामावर रुजू झाली. आज मात्र तिचा या अनोख्या नोकरीचा पहिला अनुभव ऐकून घेण्यासाठी मी मनापासून उत्सुक होतो. रात्री आठचे सुमारास बेल वाजली आणि दार उघडताच प्रिया समोर दिसली.
तिचा नेहमीचा उत्साह कुठल्या कुठे पळून गेला होता. ती एकदम गळून गेली होती. केवळ पुणे-ठाणे आणि ठाणे-पुणे अशा दोन ट्रिपा करून ही एवढी का दमली असावी? असा मला प्रश्न पडला आणि मी त्या प्रश्नार्थक नजरेनेच तिच्याकडे पाहिलं.
ती काहीही न बोलता अगदी हळूहळू पावलं टाकत सोफ्यावर जाऊन जवळजवळ त्यावर आडवीच झाली. मी पहिल्यांदा किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी पाणी घेऊन आलो. अगदी सावकाश तिनं ते पाणी प्यायलं, आणि मला म्हणाली, “मी नोकरी सोडून आले आहे.”
“आं?” मी थक्कच झालो.
“केवळ एका दिवसात?” मी तिला विचारलं.
“अरेs काही विचारू नकोस. मला एक बॉस नको होता, इथे तर जवळ जवळ चाळीस-पंचेचाळीस बॉस समोर बसल्यासारखे वाटले मला. ट्रेनिंगमध्ये फक्त सर सांगत होते आणि ते आणि तेवढेच आम्ही करत होतो. पण इथे तर सगळंच वेगळं होतं. एका दिवसात किती किती लोकांचे मूड सांभाळावे लागणार आहेत आपल्याला, हे माझ्या लक्षात आलं. ही कल्पना नवीनच अस्तित्वात आल्यामुळे तर लोक आणखीनंच चेकाळलेत. स्वतः हात वर करून साधं एसी कमी जास्त न करता, ते करण्यासाठी लोक बोलवत होते मला. सँडविच वगैरे खाऊन झाल्यानंतर तो चिकट कागद वगैरे गोळा करायला प्रत्येक जण बोलवत होता. इतक्या आरामदायी एसीमध्येसुद्धा सारखं कोणाला ना कोणालातरी पाणी लागत होतं. ज्येष्ठ बायकांचं तर काही विचारूच नका. ‘घरी कोण कोण असतं, नवरा काय करतो, घरी सासू-सासरे आहेत का? मुलांना कुणाकडे ठेवलं आहे?” इतक्या चांभारचौकशा करत होत्या. तो एक वेगळाच त्रास! महिना दहा-पंधरा हजार रुपयांसाठी रोज हे सहन करायचं मला तर बाई अगदीच अशक्य आहे. या सगळ्यापेक्षा तुझं थोडं bossing सहन करणं चालेल मला. कशी वाटली माझी ही कल्पना?”
आज मात्र माझ्या नजरेसमोर ती- नाकावरचा तीळवाली कल्पना आली नाही. माझ्या डोळ्यात आणि मनात माझीच ती लाडकी, पण प्रचंड दमलेली, गळून गेलेली, तरीही गालावर ती सुंदर खळी दिसत असलेली प्रिया होती.
मी प्रेमानं प्रियाला लहान मुलासारखं थोपटत राहिलो...
**
अरे वा, झकास. तुमची 'कल्पना
अरे वा, झकास. तुमची 'कल्पना'शक्ती छान आहे.
मस्तच.. आवडली..
मस्तच..
आवडली..
मस्त!!!
मस्त!!!
मस्त लिहीली आहे
मस्तच लिहीली आहे
दुसऱ्या बायकांचे कौतुक करताना मात्र खरेच जपून करावे लागते. (हा स्वतंत्र धाग्याचा विषय होईल. नोट करून ठेवतो.)
छान विनोदी लिखाण
छान विनोदी लिखाण
आवडली. मस्त लिहलं आहे..हल्कं
आवडली. मस्त लिहलं आहे..हल्कं फुलकं..
हे हे मस्त लिहिलंय. आवडलंय
हे हे मस्त लिहिलंय.
आवडलंय
मस्त लिहिलय.,,
मस्त लिहिलय.,,
सर्वांना अगदी मन:पूर्वक
सर्वांना अगदी मन:पूर्वक धन्यवाद!
हा हा . मस्त लिहिले आहे.
हा हा . मस्त लिहिले आहे.
मस्तच जमली आहे गोष्ट.
मस्तच जमली आहे गोष्ट.
छान लिहिलं आहे... आवडलं
छान लिहिलं आहे... आवडलं
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
मस्त!
मस्त!
सर्वांचे खूप खूप आभार!
सर्वांचे खूप खूप आभार!
मस्त कथा..
मस्त कथा..
मस्त !
मस्त !
अरे वा! कल्पना शक्तीला सलाम.
अरे वा! कल्पना शक्तीला सलाम.
एकदम भारी....खूप छान रंगवली
एकदम भारी....खूप छान रंगवली आहे कथा
mrunali.samad, आ_रती, आर्च
mrunali.samad, आ_रती, आर्च आणि sarika choudhari - खूप खूप धन्यवाद!
लेखन आवडले.
लेखन आवडले.