माझे स्थित्यंतर- आपुलाची संवाद आपणासी..{SharmilaR}

Submitted by SharmilaR on 7 September, 2024 - 01:23

माझे स्थित्यंतर- आपुलाची संवाद आपणासी..

प्रिय,

बघ, तुझ्या करता मी ‘प्रिय’ लिहिलं, अन् मायन्यालाच अडखळले. हल्ली कुठल्याही पत्रात ‘प्रिय’ शब्द लिहिल्या जातो, तो निव्वळ सवयीने.

तसं बघायला गेलं.. तर, पत्र तरी कुठे लिहिल्या जातात म्हणा हल्ली! लिहायची असतात ती फक्त ‘ऑफिशियल’ लेटर्स! आणी आजच्या जमान्यात त्यातला ‘रिसपेक्टेड' शब्द केव्हाच बाद झालाय. (रिसपेक्ट सारखा?) तिथे बॉसला किंवा अगदी परक्या माणसांनाही ‘डिअर’ वापरतात. (डिअर नसला तरी.. आणी नसतोच तो कधी!). बाकी शहरी मराठी म्हणजे, इंग्रजीचं भाषांतर होतं बरेचदा. म्हणूनच मग ‘डिअर सर/मॅडम’ लिहीण्याच्या त्या सवयीने तुझ्याकरिता पण माझ्याकडून ‘प्रिय’ शब्द लिहिल्या गेला एवढंच.

बाकी मी तुला कधी प्रिय होते म्हणा! आणी तू मला? विचारच नाही केला कधी. तुझा आवाजच एवढा वरचा असायचा नं नेहमी.., की त्या आवाजाचं अनुसरण करणं, एवढंच माहिती होतं मला. मी तुझं ऐकायचं फक्त! अगदी आवडत नसलं तरीही! कारण तू तर माझा ‘आतला आवाज’ होतीस नं! कधीतरीच मात्र असं व्हायचं, की तुला तोंड उघडायला वेळच मिळायचा नाही, अन् मग परिस्थिती बघून, मी पटकन निर्णय घेऊन टाकायचे.

मला आठवतंय तेव्हापासून मला तुझं सल्ले देणं चालू होतं. सल्ले कसले? मला सावध करण्याच्या बहाण्याने दर वेळी माझ्या कशातही तुझा मोडता घालणं! माझ्या नसलेल्या रूपाची.., माझ्यात नसलेल्या गुणांची.. मला काहीच नं जमण्याची.. जाणीव.. तूच तर मला करून देत आली आहेस सतत.

कित्येकदा तुझा रागही यायचा मला. पण तुझ्या मते ‘उगाच माझा फज्जा व्हायला नको चारचौघांसमोर..’ हे कारण होतं. पण त्यामुळे व्हायचं एवढंच, की मी सतत मागे मागे रहायला लागले. तुझं सगळंच सांगण मी ऐकत होते. कारण तुझा आवाज मला बंद करता येणं शक्य नव्हतं.

मला आवडायचे ते लाल.. पिवळे... जांभळे.. गडद रंग. ‘पण शोभणार आहेत का तुझ्या काळ्या रंगाला ते?’, नवीन कपडे घेतांना तू मला टोचायचीस. माझा चेहरा पडायचा. मी निमुटपणे फिके रंग निवडायचे, अन् चारचौघीत विरघळून जायचे. ‘पहिल्या पाचात वगैरे येणं तुझं काम नाही हं.. तेवढी हुशार नाहीयेस तू.. ’ माझी अभ्यासाची नावड जोखत तू म्हणायची. मग मी जेमतेम पास होण्या पुरता अभ्यास करून सरळ एखाद्या कोपऱ्यात निमुटपणे गोष्टीची पुस्तकं वाचत बसायचे. अगदी परीक्षांच्या दिवसात पण!

बाकी एक झालं, त्यामुळेच मला सतत वाचत बसायची खोड लागली. मी जग विसरून माझ्या माझ्या परी राज्यात रमायला लागले. तेवढ्या पुरता तुझा आवाज पण बंद असायचा (की मी दुर्लक्ष करायचे?)
माझ्यातलं काहीच कसं तुला आवडत नव्हतं गं? सगळ्याच गोष्टी कशा फक्त दुसऱ्यांच्याच छान होत्या?

तुझं असं मला कानपिचक्या देणं.., सतत मला जाणीव करून देणं.. हे काही फक्त माझ्या दिसण्याबद्दल अन् माझ्या अभ्यासबद्दलच होतं असं नाही, तर ते गाणं, नाच, भरतकाम, विणकाम अशा सगळ्याच कलांबाबत पण होतंच. म्हणजे मी काहीही केलं, की तू म्हणायचीस, ‘केलंस.. पण ते त्या अमकी तमकी सारखं सुंदर नाही जमलं..’. मी खट्टू व्हायचे.
तसंच मी स्टेज वर जातांना पण! ‘जमेल का तुला ते..? आधी बघ जरा इतर सगळे कसं करताहेत ते!’ मी निमुटपणे मागे वळायचे (मुळात आधीच माझे पाय थरथरत असायचे ही गोष्ट वेगळी).

वेळ प्रसंगी तू म्हणायचीस, ‘फ्रेम मधून बाजूला होत जा.. तू फोटोजनिक नाहीये..’ मी हळूच बाजूला होऊन गर्दीचा भाग बनायचे. तू सांगितलस, ‘तुझं एकटेपण कुणावर लादू नकोस.. कधीच..’ मग मी एकटी एकटीच रहायला अन् फिरायला लागले.

दिवस, महीने, वर्षे सरत होती. हळूहळू मा‍झ्या लक्षात आलं, तू मला माझ्यात काय नाहीये, ते सांगणं जरा कमी केलं होतंस. बहुतेक आत्ता पर्यंत मला ते कळलंच असेल, असं तुला वाटलं असावं. आता तू इतरांमधे काय चांगलं आहे, तेच फक्त सांगायला सुरवात केलीस.

तुझं ऐकण्यात आणी रोजचं आयुष्य जगण्यात काळ पुढे सरकतच होता. जग रहाटी प्रमाणे मीही माझं सामान्य आयुष्य जगतच होते. मग ह्यात मला झेपेल तेवढं शिक्षण आलं..., पुढ्यात आलेली नोकरी करणं आलं.. लग्न करून घर संसार सांभाळणं आलं.. पण हे सगळं करत असतांनाच, तुला मी समजून घेत गेले..

आज मागे वळून बघतांना जाणवतय.., ‘बरं झालंय की सगळं!’ ‘जमणार नाही.. झेपणार नाही..’ वाटता वाटता.., जमलं की मला सगळं! बऱ्या पैकी शिक्षण.., फार सायास नं करता, समोरून चालत आलेली चांगली नोकरी... तिथेही ग्रुप लीडर म्हणून टीम सांभाळणं. पूर्वी ‘स्टेज फियर’ होता तरी, आता गरज पडेल तेव्हा चांगली ‘प्रेझेंटेशनस’ द्यायला लागले. (पहिलं ‘प्रेझेंटेशन’ झालं तेव्हा तू कुबुजली होतीसच.., ‘फार शेफारून जाऊ नकोस.. अजून बरीच द्यायची आहेत पुढे तुला..’)

पुढे पुढे तुझा आवाज जरा क्षीण होत गेला. कधी कधी तर तो नसायचाच, म्हणजे मी विसरूनच जायचे तुला. मी लग्न, नोकरी सांभाळून संसार.. त्यात येणाऱ्या अनंत अडचणी.. सगळं सांभाळत होते. नं येणाऱ्या गोष्टी प्रयत्नपूर्वक जमवत होते.

आता मुलंबाळं शिकून मार्गी लागली.. जगण्यात निवांतपणा आला. आणखींन काय हवं माणसाला? हे सगळं घडत असतांना तू कुठे होतीस? तुझा आवाज जरा कमी झाला होता का? की मीच गडबडीत होते..?

कधीतरी मात्र अचानक तुझा आवाज यायचा. तू म्हणायचीस, ‘तिने बघ घर किती छान ठेवलय..’ मीही माझ्या घराची तुलना तिच्या घराशी करू लागायचे.. (तिच्या कपाटाखाली गेलेल्या झुरळाकडे दुर्लक्ष करून..) ‘मलाही घर छान ठेवता यायलाच हवं..’ म्हणत. ‘ती कीती छान दिसतेय..!’ तू थोडी हेव्याने म्हणायचीस.. मी माझा नवीन ‘हेअरकट’ करून आरशात बघायचे. ‘नॉट बॅड..’ मी उत्तर द्यायचे. ‘तुला येईल इतका सुंदर स्वयंपाक करता?’ कुणाकडे तरी जेवायला गेल्यावर तू विचारायची मला.. मी तसा प्रयत्न करायला लागले..

म्हणजे हळू आवाजात का असेना, पण तू होतीसच की कधी कधी माझ्याबरोबर! आत्ता माझ्या लक्षात येतंय.., पूर्वी तुझं सगळंच सांगण बरोबर होतं असं नाही. पण तुझे प्रयत्न प्रामाणिक होते. तू मला उडण्यापासून रोखत होतीस हे खरंय. पण मला सतत नवीन शिकायला लावण्याची तुझी क्षमता तू टिकवून होतीस अखंडपणे. पूर्वी मला जे मागे खेचणं वाटायचं, ती तुझी माझ्याकडून केल्या गेलेली उत्तमाची अपेक्षा होती. दुसऱ्यांमधलं फक्त चांगलं असेल ते निवडून घेण्याची, त्याची प्रशंसा करण्याची सवय तू मला लावलीस.

तू मला स्वत:मध्ये बदल घडवायला शिकवलंस. लहानपणापासून पुस्तकांच अन् एकांताचं ज्ञानभांडार माझ्यासमोर खुलं ठेवून, मला जग वाचायला लावलंस अन् त्यावर विचार करायलाही भाग पाडलस. मला मागे मागे ठेवून आधी चांगलं निरीक्षण करायला शिकवलसं. मला माझ्याबरोबर जगायला शिकवलं. मुख्य म्हणजे सतत जमिनीवर रहाणं शिकवलंस तू मला.

पण आता तूही बदलली आहेस का गं थोडी? की आता माझा प्रवास चांगला चाललाय, तुझी जबाबदारी कमी झालीय, हे तुझ्याही लक्षात आलंय? थोडा समजूतदारपणा आला आहे तुझ्यात. मी काही लिहिलं, तर आता तू चक्क सांगायला लागलीस, ‘दाखव चार लोकांना .. बरं लिहिलंय..’
परवा परवा तर आरशात बघत, अंगाला लावून घेत मी तुला विचारलं, ‘मी हा वनपीस घालू?’ तर तू सरळ ‘घाल की..’ म्हणालीस. आणी खुदकन हसलीस सुद्धा. माझ्याही लक्षात आलं, तुझ्या हसण्याचं कारण! ‘काय फरक पडतोय? हल्ली कोण कुणाकडे बघतयं? जो तो स्वत:तच मशगुल असतो. अगदी ग्रुप फोटोत असलं तरी, प्रत्येकजण आपलाच फोटो बघतो तसं..’

मी तुला पत्र लिहिलं, कारण हल्ली तुझं अस्तित्व खूपच कमी झालंय. म्हणजे ‘माझ्यातली मी बाहेर पडून क्रिटीक दृष्टीने’ माझ्याकडे बघत नाहीय तर!
पण आता लिहिता लिहिताच जाणवलं.., तू तर आता मा‍झ्यातच पूर्ण सामावली आहेस. (म्हणजे मी तुला प्रिय होते तर! पण आपल्यात असं बोलून दाखवण्याची पद्धत नाहीय नं!)

अधून मधून तुझं मला शिकवणं चालू असलं, तरी तुला आता खात्री पटलीय.., मी पण शिकेनच (अजूनही!).. आपली आपली. अगदी तूही नं सांगता! तू आणी मी एकच तर आहोत नं शेवटी!

-आता “तू” झालेली मी,
****************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय! खूप दिवसांनी वाचलं तुमचं..

‘मी हा वनपीस घालू?’ तर तू सरळ ‘घाल की..’ म्हणालीस. आणी खुदकन हसलीस सुद्धा. माझ्याही लक्षात आलं, तुझ्या हसण्याचं कारण! ‘काय फरक पडतोय? हल्ली कोण कुणाकडे बघतयं? जो तो स्वत:तच मशगुल असतो. अगदी ग्रुप फोटोत असलं तरी, प्रत्येकजण आपलाच फोटो बघतो तसं..’>>>>>
Happy Happy Happy

वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर ( प्रत्येकांसाठी वेगळा ). खरंच कोण काय बोलतोय किंवा आपण कुणाला कडे वाटतोय याची तमा बाळगायची सोडून देतो... तेव्हा खऱ्या अर्थाने मोकळं होतो...

वाह खूपच सुंदर लिहिले आहे...!!
आपल्याला या जगात आपल्यापेक्षा चांगले कोणीच ओळखू शकत नाही. त्यामुळे आपल्यातील मी शी छान मैत्री आणि संवाद झालाच पाहिजे.

खूपच छान!
तुका म्हणे होय मनासि संवाद
आपुलाची वाद आपणासि

>>>>>वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर ( प्रत्येकांसाठी वेगळा ). खरंच कोण काय बोलतोय किंवा आपण कुणाला कडे वाटतोय याची तमा बाळगायची सोडून देतो... तेव्हा खऱ्या अर्थाने मोकळं होतो...
प्रतिसाद आवडला.

एक नंबर!
वाचताना ती दुसरी कोण आहे माहीत असूनही हरवून जायला झालेलं. फारच आवडलं हे स्थित्यंतर!