पौतकाल : आमची ‘उलटी’ वारी

Submitted by ब्लू कोलंबसे on 13 June, 2024 - 10:17

वारी महाराष्ट्राला माहीतच आहे. तो आषाढातला सोहळा कोणाला माहीत नाही? अनेक गावातून दिंड्या निघतात. लोक चालत पोचतात. काही संतांच्या, देवांच्या, गावांच्या पालख्यांचा संगम पंढरपुरात होतो. पण एक अशी वारी ‘मंगळवेढ्याचे’ लोक करतात, जिथे ना पालखी असते, ना पंढरपूरात जाण्याचे बंधन ! आहे ना interesting प्रथा !! पौतकाल म्हणतात त्याला!

आता ‘पौतकाल’ या नावापासून याचा इतिहास अज्ञात ! कदाचित् वारीइतकाच जुना असावा. ‘मंगळवेढा’ हे गाव पंढरपूरच्या दक्षिणेकडचे, २० km. वरचे ! त्या गावापासून अर्धा तासाच्या अंतरावराच्या पंढरपुरात आषाढीची एकादशी गाठण्यासाठी शेकडो पालख्या निघतात. पण अगदी जवळ असणाऱ्या या गावाने ही एकादशी साजरी करण्याच वेगळेपण आजही जपले आहे.

तशी या गावातून संत दामाजीपंताचीही पालखी निघते, पण पौतकाल प्रथेसाठी लोकांना पंढरपूरात जाण्याचे बंधन नाही. छोटी मुले (६ ते १५) आषाढी एकादशीच्या सकाळी सकाळी छान आवरुन पंढरपूरच्या रस्त्याला लागतात- बरोबरच्या पिशवीत खाऊचा डबा (खिचडी, रताळे, केळी) उपवासाच्या जिन्नसांनी भरलेला. चालत चालत ही मुले रस्त्यावरच्या २-३ किमी. अंतरावरच्या एका विठ्ठल/ महादेव मंदिरात पोचतात. तिथे जाताना जुलैच्या ढगाळ-पावसाळी हवेने चालण्याचे श्रम कधीच जाणवत नाहीत. मंदिरात पोचताच नमस्कार करुन डबा खाऊन रमतगमत परतायचे. असा हा पौतकाल !!

वारीच्या इतिहासात पालखीशिवाय आणि पंढरपूरात विठ्ठलाचे दर्शन न घेता साजरी होणारी ‘पौतकाल’ प्रथा कदाचित एकमेव असावी!

मंगळवेढ्याच्या लोकांच्या या प्रथेला मायाजालात जपण्याचा एक प्रयत्न.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान नवीन माहिती.
व्युत्पत्ती बद्दल नाही कळले. पवित्रकाल असावे का?
पंढरपूरच्या वारी सर्वांना माहीत आहे पण ती वारी परतीच्या मार्गावरून करणारे फारच कमी असतात. तिला परतवारी म्हणतात. सुधीर महाबळ यांचे यावर एक पुस्तक देखील आहे.

Cute cute. I would love to join the kids. And share dabba of course.

मी छोटा होतो तेव्हा नेहमी जायचो. हीच आमची दुपारची वारी होती. तो भाग माळ असलेला. नुसतं वारं वाहायचं जाताना. मोठे लोक फार कमी असायचे. नावाची उत्पत्ती काय असेल काय माहित? एखाद्या गावातल्या बुवाला विचारले पाहिजे. या शब्दाची जादू तो प्रवास, एकादशी ची सुट्टी आणि मित्रांसोबत जाण्याने कधीच न पुसण्यासारखी घट्ट मनात आहे. यावर इंटरनेटवर पाहिले तर कोणी काहीच अद्याप लिहिले नाही. गावात साधे लोक आहेत त्यामुळे यावर लिहावे असे कोणाला वाटले नसे, इतका तो जगण्याचा भाग होता आणि त्यात छोट्या मुलांची ही गोष्ट लिहिणार कोण? शेवटी मीच मोठा झाल्यावर लिहिलं काल.

पौतकाल
नवीन माहिती.

गावात साधे लोक आहेत त्यामुळे यावर लिहावे असे कोणाला वाटले नसे, इतका तो जगण्याचा भाग होता .... किती सुरेख लिहून गेलात.

मंगळवेढे भूमी संतांची हे खरेच , कान्होपात्रा, चोखामेदा, दामाजीपंत, कर्नाटकात टीकाचार्य नावाने प्रसिद्ध असलेले जयतीर्थ.