अनिरुद्ध आपटे हा मुंबईतील अंधेरी (ईस्ट) येथील क्रिस्टल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये शिफ्ट ड्युटी करायचा. शिफ्टमध्ये काम करणाऱ्या इंजिनियर्सचा तो लीडर होता. तो, त्याची पत्नी अनघा आणि सात वर्षाचा मुलगा अरीश हे दहिसर (पश्चिम) येथे वन रूम किचन मध्ये राहायचे. रोजचे तेच तेच नीरस आणि कंटाळवाणे काम असूनही अनिरुद्ध ते काम अगदी अचूकपणे आणि मन लावून करायचा. सगळ्या टीम मेंबर्सचा तो लाडका आणि लोकप्रिय लीडर होता.
सुट्टी मिळाली आणि फावला वेळ मिळाला की तो वाचन आणि लेखन करीत असे. त्याच्या कथा अनेक मासिकांमध्ये छापून आल्या होत्या. लेखक म्हणून सुद्धा तो लोकप्रिय होता. सध्या त्याची कंपनीतली जबाबदारी वाढल्यामुळे लेखनाला फारसा वेळ त्याला मिळेनासा झाला. पुढे संधी मिळाल्यास टिव्ही मालिका लेखक किंवा चित्रपट पटकथा लेखक म्हणून काम करायचे असा त्याचा विचार होता. दिवसभरात अचानक एखादी कथा कल्पना सुचली की ती कल्पना अनिरुध्द मोबाईलमध्ये थोडक्यात लिहून घ्यायचा.
प्रत्येकी आठ तासांची मॉर्निंग शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट आणि नाईट शिफ्ट असे शिफ्टचे रोटेशन असायचे. ऑफिसचे टाइमिंग नेहमीच्या जनरल शिफ्ट करणाऱ्या लोकांपेक्षा नेहमी वेगळे असल्यामुळे त्याला लोकल ट्रेनमध्ये फारसा गर्दीचा सामना करावा लागत नव्हता.
पावसाळ्याचे दिवस होते. सध्या अनिरुद्धची सेकंड शिफ्ट चालू होती. एके रात्री सेकंड शिफ्ट संपल्यानंतर अकरा वाजून सात मिनिटांची विरार लोकल अनिरुद्धाने अंधेरी येथून पकडली.
दरम्यान, संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली. सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले, ज्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. स्टेशनवर आल्यानंतर गर्दी बघून त्याला अंदाज आलाच होता. नेमका रात्री साडेदहा पासून मुसळधार पाऊस सुरू झाला होता. रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या, ज्यामध्ये रुळांवरील पाणी उपसण्याची यंत्रणा आणि पंप लावले होते. मात्र, पावसाचा जोर कायम असल्यामुळे परिस्थिती सुधारण्यास वेळ लागत होता. या परिस्थितीमुळे अनेक लोकांना पर्यायी प्रवास मार्गांचा वापर करावा लागत होता, जसे की बस किंवा खासगी वाहन. मात्र, शहरातील इतर वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाल्यामुळे सगळीकडे ट्रॅफिक जाम झाला होता. त्यापेक्षा उशिरा तर उशिरा परंतु लोकलने गेलेले बरे असे म्हणून तो लोकलमध्ये चढला होता.
पण ट्रेन मालाड स्टेशनपर्यंत पोचलीसुद्धा नव्हती, तेवढ्यात रुळांवर एवढे पाणी साचले की लोकल ट्रेनच्या ड्रायव्हरला म्हणजे लोको पायलटला ती मध्येच थांबवावी लागली.
घरी अनघा खूप चिंता करत होती. तिचा चार-पाच वेळा फोन आला तेव्हा त्याने घडलेली परिस्थिती तिला सांगितली. डब्यातच अडकून पडलेले लोक नेहमीप्रमाणे प्रशासनाला शिव्या देऊ लागले. दर वर्षी जुलै महिन्यात मुंबईत पूरस्थिती निर्माण होते परंतु महापालिका, मंत्री प्रशासन काहीच उपायोजना करत नाही वगैरे वगैरे. लोकलमध्ये अनाउन्समेंट झाली की ही लोकल पुढील एक तास तरी येथेच थांबेल कारण संपूर्ण रेल्वे यंत्रणेमध्ये पावसामुळे अभूतपूर्व अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
काही वेळानंतर पावसाचा जोर कमी झाला. रुळांवरील पाणी थोडे थोडे कमी झाले. पाण्यामधून रूळ थोडे थोडे दिसायला लागले. परंतु जवळपास सगळ्याच ट्रेन अडकल्यामुळे याही लोकल ट्रेनला पुढे जाण्यासाठी लवकर सिग्नल मिळत नव्हता. बरेच जणांनी तिथेच उतरून पायी चालत पुढच्या स्टेशनपर्यंत जाऊन मग तिथून मिळेल त्या वाहनाने घरी जाण्याचे ठरवले. जिथे गाडी थांबली होती तो तसा अंधारलेला भाग होता. त्यातच आजूबाजूच्या सर्व एरियातले लाईट गेलेले होते.
शेवटी अनिरुद्धने पण रूळांवरून पायी चालत जायचा निर्णय घेतला. बायकोला त्याने कॉल करून तसं थोडक्यात सांगितले, तेवढ्यात मोबाईलची बॅटरी सुद्धा डाऊन झाली. आज पौर्णिमा होती खरी, परंतु चंद्राला ढगांनी झाकून टाकले होते.
रुळांवर चालणारे आता खूप कमी लोक होते. आजूबाजूला तसा अंधारच होता. फक्त लोकल ट्रेनच्या थांबलेल्या इंजिन्सचे हेडलाईट चालू होते आणि त्यांचा प्रकाश पडून पाण्यात त्याचे प्रतिबिंब तयार होत होते. अनिरुद्धचे मोजे पूर्ण ओले झाले. बुटांमध्ये पाणी गेले होते. नेहमी बॅगेत अनिरुद्ध टॉर्च बाळगत असल्यामुळे त्याने ती काढली आणि ऑन केली. त्यामुळे चालणे आता सोपे झाले होते. पाठीला नेहमीची ऑफिसची सॅक लटकवलेली होती. रुळांवरचे खडे बुटांमधून सुद्धा थोडे टोचत होते. बॅग मध्ये रेनकोट होता परंतु आता पाऊस बंद झाल्यामुळे तो रेनकोट घालण्याची आवश्यकता नव्हती.
अनिरुद्धचा कुणीतरी रुळांवरून चालताना पाठलाग करत होते. पाठलाग करणारा व्यक्ती अगदी कमी वेळेत अनिरुद्धपर्यंत आला आणि त्याने अनिरुद्धच्या खांद्यावर एकदम हात ठेवला. अनिरुद्ध मोठ्याने दचकला. तेव्हा जवळपास रात्रीचे बारा वाजत आले होते.
" को.. कोण तुम्ही?", घाबरत मागे बघून अनिरुद्धने विचारले.
"मला ओळखले नाहीस? आश्चर्य आहे?", तो अनोळखी व्यक्ती म्हणाला.
अनिरुद्धाने त्याच्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश फेकला परंतु तो चेहरा त्याला ओळखीचा वाटला नाही आणि विशेष म्हणजे तो चेहरा अस्पष्ट होता. त्या चेहऱ्यावरचे नाक, कान, डोळे आणि भुवया आपापल्या जागी नव्हते. डोळ्यात बुब्बुळे नव्हती. त्या चेहऱ्याची भूमिती सुद्धा विचित्र आणि अभद्र होती.
घाबरून नजर पटकन खाली करून अनिरुद्ध म्हणाला, "न... नाही! मी ओळखले नाही, तुम्हाला!"
"मी विक्रम!", असे म्हणून त्याने चालणाऱ्या अनिरुद्धचा हात पकडला आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.
"कोण विक्रम? मी नाही ओळखत कुणा विक्रमला! सोडा माझा हात!"
"या इथेच बाजूच्या 20 मजली बिल्डिंग मध्ये मी राहतो. म्हणजे रहात होतो. पण तुम्ही मला मारलेत! तुम्ही रोहितच्या मनात विष कालवले आणि मला बिल्डिंगच्या टेरेस वरून त्याने धक्का दिला. खाली रुळांवर पडून लोकल ट्रेन अंगावरून गेल्याने माझा मृत्यू झाला!"
"काय? मी? तुला? रोहित?" अंगावर शहारे येऊन अनिरुद्ध थरथरू लागला आणि त्याच्या हातातून टॉर्च खाली पडली. पाण्याबरोबर वाहत ती दूर निघून गेली.
कोणी मदतीला दिसते का असे म्हणून हाक मारण्यासाठी अनिरुद्धने इकडे तिकडे पाहिले. पण आता रुळांवर अनिरुद्ध आणि विक्रम वगळता दूर दूर पर्यंत कुणीही नव्हते.
"म्ह... म्हणजे, तू कोण आहेस? भू... भू... भूत??"
विक्रम हसायला लागला आणि म्हणाला, "चूप! बिलकुल चूप! एक तर माझे नाव विक्रम ठेवलेस आणि मला वेताळ बनवलेस!"
हे काय चालले आहे अनिरुद्धला समजेनासे झाले. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली तर त्याला असे दिसले की चारही दिशांनी जिथपर्यंत त्याची नजर जात होती, तिथपर्यंत फक्त असंख्य रूळ होते आणि लोकल ट्रेन्स रुळांवर उभ्या होत्या. सगळीकडे अंधार! फक्त लोकल ट्रेनच्या इंजिनचे लाईट सुरु! रुळांवर थंडगार पाणी. लोकल ट्रेनमधल्या अंधारलेल्या सर्व डब्यात जे कुणी प्रवासी होते ते काहीच हालचाल न करता फक्त जागच्या जागी बसलेले किंवा उभे होते. जवळच्या एका लोकल ट्रेनच्या डब्यातील एक जण मोबाईल कानाला लावून तशाच स्थितीत उभा होता आणि त्याचे डोळे मात्र अनिरुद्धकडे रोखले गेले होते आणि दूर कुठेतरी आकाशाला भिडणाऱ्या असंख्य बिल्डिंग्स सगळ्या दिशेने गोल गोल दिसत होत्या, जसे आपण एखाद्या जास्त वक्र असलेल्या बहिर्गोल आरशातून खूप दूरपर्यंत पसरलेले जग बघण्याचा प्रयत्न करतो, तसे दृश्य दिसू लागले. हे सर्व असह्य झाल्याने पुन्हा त्याने समोर उभ्या असलेल्या विक्रमकडे पाहिले. विक्रमच्या चेहऱ्यावर कुत्सित हसू होते. अनिरुद्धची मती कुंठित झाली होती.
अनिरुद्ध विक्रमला घाबरून या रुळावरून त्या रुळावर उद्या मारत पळायला लागला. जिकडे पहावे तिकडे रूळच रूळ! रुळांवर साचलेले पाणी आणि रुळांवर उभ्या असलेल्या लोकल ट्रेनस्. त्या व्यतिरिक्त चहूबाजूंनी दुसरे काहीच दिसत नव्हते. जणू काही रुळ आणि लोकल ट्रेन यांचा अनंत भुलभुलैय्या किंवा चक्रव्यूह तयार केलेला आहे. आजूबाजूच्या रुळांवर उभ्या असलेल्या दोन लांबलचक लोकल ट्रेनच्या मधोमध तो पळायला लागला. तो ज्या ज्या दिशेने पळत होता त्या त्या दिशेने, लोकलमध्ये पुतळ्यासारख्या बसलेल्या आणि उभ्या असलेल्या लोकांच्या माना आणि चेहरे त्याच्या दिशेने वळत होत्या. काहींचे फक्त डोळ्याचे बुब्बुळ वळत होते. आणि विशेष म्हणजे कितीही दूरवर नजर टाकली तरीही लोकल ट्रेनचे डबे संपतच नव्हते. जणू काही सर्व डबे क्षितिजाला भेदून आकाशात कुठेतरी अनंत पोकळीत गेले आहेत. अनिरुद्धला वाटले की पळत पळत तो एवढ्या दूर पळून आलेला आहे की आता विक्रम तर सोडा, कोणी वेताळ जरी आला तरी त्याचा पाठलाग करू शकणार नाही.
तेवढ्यात समोरच्या रुळावर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. घाबरून जाऊन अनिरुद्ध तेथेच थांबला. हळूहळू घोड्यांच्या टापांचा आवाज जवळ यायला लागला. त्या घोड्यावर, महाभारत काळात युद्धात जाण्यासाठी करतो तशी वेशभूषा केलेली, केस मोकळे सोडलेले, डोक्यावर शिरस्त्राण घातलेली आणि हातात तलवार घेतलेली एक सुंदर स्त्री बसलेली होती. अनिरुद्धच्या समोर येऊन ती थांबली आणि घोड्यावरून उतरली. तिने अनिरुद्धच्या खांद्यावर तलवार ठेवली. त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले.
"विसरलास मला? मी रत्नमाला?"
"कोण रत्नमाला?"
"वाटलंच की तू मलासुद्धा विसरला असशील. मला युद्धात पाठवले आणि तिथेच मरायला सोडून दिलेस? किती दिवस युद्ध करायला लावशील? एकसारखी न थकता तलवारबाजी किती दिवस मी करत राहणार? कोणाला तरी जिंकायला हवे ना?"
आता मात्र अनिरुद्धाच्या मनातल्या भीतीची जागा चिडण्याने घेतली. रत्नमालेवर प्रचंड चिडून अनिरुद्ध म्हणाला, "कोणते युद्ध? कोण रत्नमाला? माझा काय संबंध या सगळ्यांशी?"
तेवढ्यात बाजूच्या लोकल ट्रेनच्या इंजिनमधून, हसऱ्या चेहऱ्याच्या लोको पायलटच्या स्थिर पुतळ्याच्या बाजूने मार्ग काढत एका चष्मेवाल्या, लांब काळीशार दाढी आणि मिशा असलेल्या एका बारीक माणसाने रुळांवर उडी मारली आणि त्या दोघांच्या जवळ येत तो म्हणाला, "मी सांगतो की तुझा काय संबंध आहे तिच्याशी, विक्रमशी आणि माझ्याशी! माझे नाव अय्यर! सायंटिस्ट अय्यर! आणि आम्ही तिघे येथे आलो आहोत कारण आम्हा तिघांना न्याय हवा आहे!"
आता विक्रमसुद्धा त्या तिघांजवळ केव्हा येऊन उभा राहिला ते अनिरुद्धला समजले नाही. पण तो हवेत अधांतरी तरंगत होता.
आता अनिरुद्धला भोवळ यायचीच बाकी होती पण कसेबसे त्याने स्वतःला सावरले आणि बोलला, "न्याय? कसला न्याय? मी काय न्यायाधीश आहे? मला नाही ऐकायचे तुमचे कुणाचेच! मला सोडा येथून. मला घरी जायचे आहे! माझी पत्नी मुलगा काळजी करत असतील. मला जाऊ द्या ना घरी. माझा कसलाच संबंध नाही तुम्हा तिघांशी!"
सायंटिस्ट अय्यर म्हणाला, "संबंध नाही? जर उद्या भगवंताने तुला असे म्हटले की माझा तुझ्याशी काही संबंध नाही तर चालेल का तुला? तुला हा अन्याय नाही का वाटणार?"
"म्हणजे?"
"म्हणजे तू आमचा निर्माता आहेस पण तू आम्हाला विसरून गेलास. खूपच मोठा निष्काळजी निर्माता आहेस तू! आणि वर म्हणतोस की मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा?", वाकोल्या दाखवत एखाद्या अप्सरेच्या नृत्याची नक्कल करत अय्यर म्हणाला.
हसून रत्नमाला म्हणाली, "जाऊदे अय्यर! 'वाजले की बारा' या गाण्यावर 'अप्सरा आली' या गाण्याचा डान्स करू नको!"
"मी तर काय एक सायंटिस्ट आहे. मी जास्त सिनेमे पाहत नाही!", ओशाळत अय्यर म्हणाला.
या गोंधळात संधी साधून अनिरुद्ध तिथून सटकण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्यात तलवार हवेत उगारत रत्नमाला अनिरुद्धकडे पाहून म्हणाली, "मुकाट्याने उभा रहा आणि अय्यर पुढे काय सांगतोय ते ऐक! नाहीतर आम्ही तिघे तुझे इथेच बारा वाजवू!"
आता अनिरुद्ध समोर काही पर्याय नव्हता. अय्यर आणि रत्नमाला अनिरुद्धच्या समोर येऊन उभे ठाकले आणि विक्रम मात्र हवेत अधांतरी तरंगत होता. हवेत तरंगणाऱ्या विचित्र चेहऱ्याच्या विक्रमची आकृती खूप भयानक वाटत होती.
अय्यर सांगू लागला, "ऐक. आम्ही तिघे तू लिहिलेल्या तीन वेगवेगळ्या कथांमधली मुख्य पात्रे आहोत. तू मागे एक ऐतिहासिक कादंबरी वाचली होतीस आणि त्यानंतर एक ऐतिहासिक कथा लिहायला घेतली होतीस. 'राजकुमारी रत्नमाला'. पण ती मध्येच लिहायची सोडून दिलीस. त्यात रत्नमाला तिच्या दुश्मन राज्याशी एक युद्ध लढते आणि त्यानंतर तू ती कथा पूर्णच केली नाहीस. मग अनेक दिवसांनी तू एक अशी कथा लिहायला घेतलीस की जात एक शास्त्रज्ञ म्हणजे मी, स्पेसशीप मध्ये बसून दुसऱ्या आकाशगंगेत जाऊन ब्लॅक होल शोधण्याच्या बेतात असतो जेणेकरून त्याला त्यात शिरून वेळ या मितीला शोधून त्यावर नियंत्रण मिळवता येईल. म्हणजे ब्लॅक होलमध्ये असलेल्या टाईम डायमेंशनला नियंत्रित करून काल प्रवास शक्य होईल. म्हणजे तो भूतकाळात किंवा भविष्यकाळात जाऊ शकेल. पण स्पेसशीप आकाशात उडाले आणि त्यानंतर तू कथाच लिहिली नाहीस. मूर्ख!"
अनिरुद्धच्या डोक्यात चांगलाच प्रकाश पडला. आपल्या अपूर्ण राहिलेल्या तिन्ही कथेबद्दल त्याला आठवायला लागले. तिसऱ्या कथेमध्ये विक्रम नावाच्या एका साध्या सरळ माणसाला त्याचा बिजनेस पार्टनर मित्र रोहित एका गैरसमजामुळे धोका देतो आणि "तेजस हाईट्स" या बिल्डिंगवरून ढकलून देतो. त्यानंतर विक्रमचा आत्मा मुक्ती न मिळाल्यामुळे भटकत राहतो. येथून पुढे काय करायचे हे न ठरवता आल्यामुळे तिथून पुढे ती कथा लिहायचा नाद अनिरुद्धने सोडून दिला होता. त्यानंतर या तिन्ही कथांकडे त्याचे पूर्ण दुर्लक्ष झाले होते.
"मला आठवलं. मीच तुमचा निर्माता आहे! पण तुम्ही इथे कसे आलात? म्हणजे जिवंत कसे झालात?"
विक्रम सांगू लागला, "अतृप्त असलेल्या मृत व्यक्तींची या अमर्याद अवकाशात एक ठरलेली मिती (डायमेंशन) असते. त्यात ते आत्मे वावरत असतात. त्या मितीमधून आपल्या पृथ्वीवरच्या जगात काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी ते आत्मे प्रवेश करतात. त्यासाठी पंचमहाभूतांपैकी (पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश) कोणत्याही एका भूतामधील (इलेमेंट) एक ठराविक संवेदनशील जागेतून ते आत्मे त्यांच्या मितीमधून सध्याच्या जगात प्रवेश करतात. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मिती या अनंत पसरलेल्या अवकाशात आहेत! हे माहिती होतं का तुला?"
अनिरुद्धाने उत्तर दिले, "नाही! मला हे असलं काही माहिती नव्हतं. मी तर वेगळ्या पद्धतीने विक्रमची कथा लिहिणार होतो."
पुढे अय्यर सांगू लागला, "आणि अशीच एक आणखी मिती अवकाशात आहे. आपल्या आकाशगंगेत नेपच्यून ग्रहापासून 100 प्रकाशवर्ष दूर असलेल्या एके ठिकाणी ती मिती आहे. आणि ती म्हणजे सगळे लेखक मंडळी ज्या वेगवेगळ्या कथा लिहितात, ती दुनिया! त्याला लेखनमिती असे म्हणतात. रायटिंग डायमेंशन. त्यातील सगळी पात्रे तिथे वावरत असतात. कथा लिहिता लिहिता लेखक जेव्हा ब्रेक घेतो तेव्हा त्या मितीमध्ये ही सर्व पात्रे पुढच्या घटना घडण्याची वाट बघत बसतात. कथेतील सर्वात अलीकडच्या प्रसंगात ती पात्रे अडकून राहतात. लेखक जसा जसा लिहीत जातो त्याप्रमाणे ही पात्रे वागायला कटिबद्ध आहेत. एखादा लेखक एखादी कथा जितकी लवकर पूर्ण करेल तेवढे चांगले. कथा लिहिण्यामध्ये जास्त उशीर झाला तर ही पात्रे त्या डायमेंशनमध्ये अस्वस्थ होत जातात. ब्रेक वाढत गेला तर हळूहळू त्या सर्व पात्रांची स्वतःची एक इच्छाशक्ती तयार होते. मग ते लेखकाच्या विरोधात सुद्धा जाऊ शकतात. पण आम्ही तिघे चांगले आहोत. तुम्ही लवकर अपूर्ण राहिलेल्या आमच्या कथा पूर्ण करून आमच्या जीवनात पुढे काय घडणार आहे ते ठरवा. याचा इशारा द्यायला आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. लेखनमिती मध्ये विविध लेखकानुसार अनेक उपमिती असतात. लेखकाच्या ब्रेकमध्ये एका कथेतील पात्र दुसऱ्या कथेतील जगात फिरून येते! तेवढेच मित्र मंडळी मिळतात, ओळख वाढते. आमच्या जगात सुद्धा एक फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप सारखे ॲप आहेत. रोजचा आमचा आरामचा वेळ संपला की जेव्हा आम्ही मोठ्या आशेने आमच्या लेखकांच्या कथेत प्रवेश करतो तेव्हा आम्हाला त्याच त्याच प्रसंगात दिवसाचे आठ तास राहावे लागत होते. तुम्ही पुढे कथा लिहितच नव्हता! "
"अरे वा! हे तर माझ्याही कल्पनेच्या पलीकडचे आहे!"
अय्यर पुढे म्हणाला, "विक्रम हा लेखक मंडळींच्या पात्रांच्या जगातल्या एका उपमितीमधले पात्र आहे. कारण लेखकांची पात्रं जेव्हा मरतात आणि इच्छा अपूर्ण राहिल्यास ते जेव्हा भूत योनीत जातात तेव्हा ते त्या लेखनमितिमधील 'भुतांच्या उपमितीमध्ये' जातात, जी कथेतल्या मेलेल्या आत्म्यांची मिती असते! हा विक्रम त्याच उपमिती मधला आहे! त्यानेच आम्हा दोघांचे दु:ख ओळखले, आम्हाला एकत्र आणले आणि पृथ्वीवर असलेल्या आमच्या निर्मात्याकडे म्हणजे तुमच्याकडे येण्याचा मार्ग शोधून काढला!"
अनिरुद्धला आता सगळे काही समजले होते. त्याने पुढे विचारले, "म्हणजे तुम्ही सर्वजण जल या पंचमहाभूतामधून म्हणजे आज होणाऱ्या पावसामधून या पृथ्वीवर आला आहात! बरोबर?"
रत्नमाला म्हणाली, "अगदी बरोबर! पण आम्हाला खूप त्रास झाला ही विशिष्ट जागा शोधायला. पण विक्रमने आम्हाला ही जागा शोधायला मदत केली! कारण रोज लोकल ट्रेनमधून प्रवास करतांना तुम्ही नेहमी "तेजस हाइट्स" ही बिल्डिंग लोकलच्या दरवाजात उभे राहून बघायचात आणि विक्रम हे पात्र तुम्ही याच बिल्डिंगमध्ये राहते अशी कल्पना करून कथा लिहिली, बरोबर?"
"अगदी खरं आहे ते", अनिरुद्ध म्हणाला.
रत्नमाला म्हणाली, "आज घरी जाऊन आमच्या कथा पूर्ण करा. मी एकसारखे युद्ध लढून लढून थकले आहे. मी त्याच प्रसंगात अडकले आहे!"
अय्यर पुढे म्हणाला, "अपूर्ण राहिलेल्या कथेच्या सर्वात अलीकडच्या प्रसंगामध्ये अडकून, कथा पूर्ण होण्याची वाट बघता बघता जर का एखाद्या पात्राचा लेखनमिती मध्ये मृत्यू झाला तर ते पात्र लेखकाला आपल्या लेखनमिती मध्ये घेऊन जातं आणि लेखक त्या मितीत अडकतो. तिथे कायद्यानुसार त्या लेखकावर खटला चालतो आणि त्याला शिक्षा होते आणि पृथ्वीवर लोकांना वाटतं की एक लेखक अचानक गायब झाला! आम्ही तिघे तुला तात्पुरते घाबरवण्यासाठी एका प्रसिद्ध लेखकाच्या फॅन्टसी कथेत घेऊन आलो आहोत. त्यात त्या लेखकाने अनंत रूळ आणि अनंत डबे असलेल्या लोकल ट्रेनच्या जगाची कल्पना केली होती. पण घाबरू नकोस. तुला लवकरच या मितीमधून नेहमीच्या जगात आम्ही नेऊ!"
विक्रम मोठ्याने हसायला लागला आणि म्हणाला, "रत्नमाला आणि अय्यर हे दोघे चांगले असतीलही, पण मी चांगला नाही. तुम्ही लेखकाला इथेच काहीतरी शिक्षा द्यायला हवी आणि मग सोडायला हवे. अन्यथा मी तुम्हाला तिघांना सोडणार नाही!"
अनिरुद्ध म्हणाला, "मला आज घरी जाऊ द्या. मी आज रात्रीच तुमच्या तिघांच्या कथा पूर्ण करायला बसतो. लागल्यास उद्या सुद्धा ऑफिसातून सुट्टी घेतो आणि घरी बसून त्या कथा पूर्ण करतो, मग तर झालं!"
अय्यर म्हणाला, "ठीक आहे! आम्ही तुला माफ केले. पण प्लीज, आमच्या कथेचा शेवट गोड करा! मला ब्लॅकहोल मध्ये कालप्रवास करण्याचा फॉर्म्युला सापडू द्या आणि रत्नमाला युद्धामध्ये फारशी जखमी न होता युद्ध जिंकते असे लिहा!"
"अगदी बरोबर बोललात तुम्ही, अय्यर!", रत्नमाला म्हणाली.
"नक्की नक्की! यात काही वादच नाही. तिन्ही कथेचे शेवट अगदीच साखरेएवढे गोड करीन मी! आणि तुम्हा तिघांवर जो अन्याय झाला आहे त्याचे परिमार्जन होईल. तुम्हाला तिघांना न्याय मिळेल", अनिरुद्धने गयावया करून वचन दिले.
पण विक्रम खुश दिसत नव्हता. तो म्हणाला, "पण माझे काय? तुम्ही आधीच कथेत मला मारून टाकले आहे. मला पुन्हा जिवंत करा."
"पण ते कसे शक्य आहे? ती कथाच मुळात हॉरर कथा आहे!", अनिरुद्धने सांगितले.
"मला माहितीच होते तू ऐकणार नाहीस. म्हणून मी काय केले माहिती आहे? तुमच्या पृथ्वीवरच्या खऱ्या जगातील जी भूतांची मिती आहे त्यात मी संपर्क साधला. आणि तिथल्या एका आत्म्याच्या मदतीने तुझा मी बदला घेणार!", विक्रम संतापून म्हणाला. तो हवेत अधांतरी लटकलेल्या अवस्थेत संतापला होता.
अनिरुद्ध गयावया करू लागला व म्हणाला, "नको नको. बदला वगैरे नको. थांब एक मिनिट! मला एक आयडिया सुचली आहे. मी घरी जाऊन तू ज्या पानांमध्ये मरतोस, ती पाने फाडून जाळून टाकतो. मग तर झालं?"
अय्यर म्हणाला, "पण मग ती लेखनमितीमधील काळाशी छेडछाड होईल! असे केल्यास लेखनमितीच्या कायद्यानुसार लेखकाला शिक्षा होऊ शकते!"
अनिरुद्ध म्हणाला, "ती शिक्षा होईल तेव्हा होईल. मी भोगायला तयार आहे. सगळ्यात आधी घरी जाऊन मी सर्व कथा पूर्ण करतो. विक्रमची कथा दोन पाने फाडून मग बदलून लिहितो. त्यात विक्रमला जिवंत ठेवतो!"
विक्रम सुद्धा आता मान्य झाला.
अनिरुद्धच्या मनात आले की, बिल्डिंगच्या टेरेसवर विक्रमला ढकलण्याच्या प्रयत्नात रोहित असताना विक्रम बाजूला होतो आणि रोहितच बिल्डिंगवरून खाली पडतो असे मी लिहीन.
आता सर्व रुळांवरील सर्व लोकलमध्ये लाईट आले. लोकलचा चालू होण्याचा हॉर्न वाजू लागला. लोकलमधील सर्व पुतळ्यासारखे झालेले लोक नेहमीप्रमाणे जिवंत झाले. लोकलचे क्षितिजापर्यंत पसरलेले डबे एकात एक, एकात एक असे सामावून जात नेहमीप्रमाणे 12 डब्यांची किंवा 15 डब्यांची लोकल तयार झाली. अनेक अनावश्यक लोकल ट्रेनचे डबे एकात एक, एकात एक शिरत शिरत शेवटी नाहीशा झाल्या. आकाशाला गोल गोल भिडलेल्या सर्व बिल्डिंग पुन्हा आपापल्या जागेवर आणि उंचीवर येऊन बसल्या. हे सर्व घडत असताना रत्नमाला, अय्यर आणि विक्रम कुठे नाहीसे झाले हे अनिरुद्धला कळलेच नाही. त्याच्या थांबलेल्या लोकल ट्रेनने हॉर्न दिला.
अनिरुद्ध त्याच्या लोकल ट्रेनमध्ये चढला. लोकल सुरू झाली.
रात्री घरी पोचायला दोन वाजले. अनिरुद्ध सुखरूप पोहोचल्यामुळे अनघाचा जीव भांड्यात पडला. मुलगा अरिश तर झोपून गेला होता. ओले कपडे बदलून, केस पुसून झाल्यावर त्याने थोडेसे खाल्ले आणि मग, "मला कंपनीचे थोडे अर्जंट कागदपत्रांचे काम आहे, मी रात्रभर जागणार आहे", असे अनघाला सांगितले. अनघा पुन्हा झोपी गेली.
आता रात्रीचे तीन वाजले होते. अनिरुद्धने टेबल लॅम्प ऑन केला. कथेच्या तिन्ही वह्या कपाटातून बाहेर काढल्या. खुर्चीवर बसला. सर्वात आधी त्याने विक्रमची वही उघडली आणि ज्या दोन पानांमध्ये विक्रमला बिल्डिंगवरून ढकलणे आणि त्या संदर्भातील आधीचे सर्व प्रसंग होते, ती पाने त्याने फाडायला हात नेला तेवढ्यात...
त्याचा हात कुणीतरी घट्ट पकडला....
अनिरुद्धने भित भित वर पाहिले....
त्याचा हात धरणारा मनुष्य कावेबाजपणे हसत म्हणाला, "मी रोहित. मी तुम्हाला ती पाने फाडू देणार नाही. मला विक्रमला बिल्डिंगवरून ढकलायचे आहे आणि ते मी तुम्हाला बदलू देणार नाही! त्याला जिवंत करून मला मारण्याचा तुमचा प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही. अन्यथा तो माझ्यावर अन्याय होईल. ती पाने फाडलीत तर लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे!"
दरम्यान, आकाशातून अय्यरचे स्पेस शिप वेगाने पृथ्वीकडे दहिसरच्या दिशेने येऊ लागले. त्या स्पेस शिप मध्ये, रत्नमालेच्या दुश्मन देशाचा राजा प्रचंडसेन, सेनापती विराटसिंग, अमात्य चंद्रमिहिर आणि राणी गुलाबमती हे बसलेले होते आणि नेपच्यून ग्रहावर मात्र जखमी अवस्थेत अय्यर आणि रत्नमाला पडले होते.
(समाप्त?)
भन्नाट... मजा आली..
भन्नाट... मजा आली..
मायबोली वरच्या लेखकांनी आता तरी जाग व्हावं...
पाऊस सुरू होऊन लोकल मधे अडकाण्याचे दिवस आता जवळ आलेत...
ह्यापूर्वी काही लेखक कायमचे गायब झालेत इथून.. आज उलगडा झाला
वाह मस्त आवडली
वाह मस्त
आवडली
धन्यवाद manya आणि किल्ली
धन्यवाद manya आणि किल्ली
मस्त जमली आहे
मस्त जमली आहे
हा हा.. मस्त कल्पना आहे :,P
हा हा.. मस्त कल्पना आहे
एकदम छान कल्पना आहे.
एकदम छान कल्पना आहे.
इथल्या सगळया अर्ध कथांच्या लेखकांना धमकीच...
मस्त कथा!
मस्त कथा!
वाह! काय मस्त कल्पना.
वाह! काय मस्त कल्पना.
@ बेफिकीर, 'अन्या' पुर्ण करा लवकर नाहीतर पावसाळा जवळ आलाच आहे
ह्या वर्षी सर्व अर्ध-कथा
ह्या वर्षी सर्व अर्ध-कथा लेखकांचेच ववी भरवून तिकडेच काय तो त्यातील पात्रांकडून सोक्षमोक्ष लावण्यात यावा.
धन्यवाद सगळ्या
धन्यवाद सगळ्या प्रतिक्रियांबद्दल!!
आवडली.
आवडली.
जबरदस्त....!!
जबरदस्त....!!
सर्व अर्धवट लेखकांना (म्हणजे अर्धवट लिखाण करणार्या लेखकांना) ही वॉर्निंग आहे असे समजा.
अप्रतिम @ निमिष सोनार.
अप्रतिम @ निमिष सोनार.
अगदी झकास लिहिली आहे. फोटो तर जाम आवडला. याची शॉर्ट फिल्म वर्जन एखाद्या ott वर बघण्यात मजा येईल. सुरुवातीस हॉरर वाटणारी कथा पुढे हलका फुलका मध्य आणि शेवट ताण न उत्सुकता वाढवणारा!!! तुमच्या कल्पक मेंदूस सलाम!
Worth to read it at maayboli!!!
मस्त कथा व कल्पना.
मस्त कथा व कल्पना.
मस्त कथा!
मस्त कथा!
छान कल्पना आणि कथा
छान कल्पना आणि कथा
मस्त आहे कथा
मस्त आहे कथा
एकदम झकास गोष्ट आहे. आवडली.
एकदम झकास गोष्ट आहे. आवडली.
सर्वांचे खूप खूप आभार!!
सर्वांचे खूप खूप आभार!!