१९७२/७३ साल असेल. मी चिंचवडला एका कंपनीत कामाला होतो. तेव्हा मी एकवीस वर्षांचा होतो.ही नोकरी स्वीकारल्यावर वडील म्हणाले होते. " अरे लोकं लांबून लांबून नोकरी साठी मुंबईला येतात. तूच एक वेगळा आहेस. मुंबई सोडून पुण्याला चालंलायस". मला त्यांचं बोलणं आवडलं नाही.पण जुना जमाना. वडलांपुढे बोलणार कोण? मी चुपचाप कंपनीत जॉईन झालो. सुरवातीला मी पुण्याला लॉजमधे राहायचो. महिना चाळीस रुपये. दोघांची रुम. चिंचवडला जायला इंजिन लोकल होती. संध्याकाळी काहीच काम नसल्याने भटकंती हाच टाइमपास. असेच एकदा आम्ही चोघेपाच जण हनुमान हिल (ज्यांना पुण्याची माहिती आहे त्यांनाच कळेल)खाली असलेल्या दीपाली हॉटेल मधे जेवत होतो. प्यायला बिअर होतीच. रात्रीचे दहा वाजत होते. गप्पा रंगात आल्या होत्या. अचानक माझं लक्ष घड्याळाकडे गेलं. साडेदहा झाले होते. थंडीचे दिवस. त्यावेळी पुण्याला जबर थंडी पडायची.पुन्हा आग्रहाखातर खातपीत राहिलो. बारा वाजायला आले. तरी कोणी उठून देईनात. पण मी उठत म्हणालो," ए, मला सकाळी आठला निघायला लागतं रे. आणि उद्या ऑफिसमधे हेड ऑफिसचं इन्स्पेक्शन आहे. मला निघायला हवं. " असं म्हणून मी बॅग उचलली. तेवढ्यात वराडकर आणि बाकी सगळेच म्हणाले," आम्हाला काय ऑफिस नाही? आम्ही काय दहा वाजेपर्यंत झोपणार आहोत ? " पण मी ठाम होतो. " नाहीरे , तुम्ही जवळ राहता. लॉजला रिक्षानी जावं लागेल. आणि अर्धा तास तरी लागतो. " असं म्हणून मी बाहेर आलो. थोडी चढलीही होती. एवढ्या रात्री रिक्षा मिळत नव्हती. चुकून माकून आलेली रिक्षाही थांबायला तयार नव्हती. कशीबशी साडेबारा पाऊणच्या आसपास एक रिक्षा माझ्याजवळ येऊन थांबली. रिक्षावाला कंटाळला असावा. खेकसून म्हणाला," लवकर बसा की राव." मी धडपडत रिक्षात बसलो. कारण मी बसतोय न बसतोय तोच रिक्षानी चांगलाच वेग घेतला. मला जरा राग आला पण बोललो नाही.
पंधरावीस मिनिटांनी रस्त्यावरच्या एका स्त्रीने रिक्षा थांबवली. ती माझ्या बाजूला बसली. पांढरे स्वच्छ चंदेरी केस , कपाळावर रुपया एवढं कुंकू , चेहऱ्याच्या मानाने डोळे मोठे आणि पिवळी फिक्कट साडी. चेहरा नीट दिसलाच नाही. जे डोळ्यात भरलं ते सांगतोय. बसल्यापासून तिने जे तोंड बाहेर काढलं ते मला कधी दिसलंच नाही. रिक्षाचा वेग प्रचंड वाटत होता. रिक्षावाल्याला एवढी कसली घाई आहे कळेना. मी जरा जोरात म्हटलं," अरे जरा सावकाश चालवा. " त्यावर तो तिरसटून म्हणाला " त्या बाईंचं काय बी म्हणणं नाही. तुम्ही कशाला वचवच करताय ? घरला जायचंय. उतरुन देऊ का हितंच ? " माझं लॉज अजूनही बरंच लांब होतं. मी चुपचाप बसलो. ती बाई पण काहीच बोलत नव्हती. मी विचार केला,या बाईनी थोडा चेहरा इकडे केला तर चार शब्द बोलता येतील. पण तिनी जे तोंड बाहेर काढलं होतं,ते बाहेरच ठेवलं. अचानक रिक्षाचा वेग कमी झाला. बाहेर डोकावलो,तर समोरुन एक प्रेतयात्रा येत होती. ती गेली आणि पुन्हा भन्नाट वेग वाढला. समोर पुणे स्टेशनचा परिसर दिसू लागला. त्या बाईने रिक्षा थांबवली. ती उठली. पण चेहरा दिसला नाही .मग सहजच माझं लक्ष तिच्या पायांकडे गेलं. रिक्षातल्या उजेडात तिचे पाय " उलटे " असलेले दिसले. एवढ्या थंडीत मला घाम फुटला होता. ती उतरुन गेल्यावर मी रिक्षावाल्याला म्हटलं, " अहो ती बाई भूत होती. तिचे पाय उलटे होते. "
लॉजला पोहोचायला अजून किमान दहा मिनिटं तरी होती.वेग तितकाच भन्नाट. मला सारखं उतरावंस वाटत होतं.सोमवार पेठ दिसायला लागली.रिक्षावाल्याच्या तोंडावर मफलर असल्याने त्याचा चेहरा दिसत नव्हता. मला तर वाटलं हा कधीच थांबणार नाही. पण मला आमच्या लॉजचं गेट दिसायला लागल्यावर मी त्याला थांबायला सांगितलं. त्याने लक्षच दिलं नाही. त्याला नक्की कुठे जायचं होतं मला कळेना. मी चुळबुळत राहिलो. तेवढ्यात त्याच्या खांद्याला धरून त्याला थांबायला सांगितलं. त्यावर तो खेकसला. " शेट्टीचंच लॉज ना ? मग तो थांबू की आता. जरा धीर नाही तुम्हाला. आजची रात्र माझ्या घरी काढलीत तर काय बिघडणार आहे का ? " मला राग आला. " अहो ,पण मला उतराचंय. थांबा." असं म्हणून मी त्याचा हात जोरात धरला. जोरात ब्रेक मारीत त्याने रिक्षा थांबवली. मी झटकन उतरलो. त्यांच्या अंगावर पैसे फेकले आणि म्हणालो, " खरं सांगा ,त्या बाईचे पाय उलटे होते, हे माहीत होतं ना ? " त्यावर तो विचित्र हसून म्हणाला," हे बघ माझे पाय तरी कुठे सुलटे आहेत?". जाता जाता माझी नजर त्याच्या पायांकडे गेली. तेही "उलटेच" होते. मी घाबरुन पळत सुटलो. लॉजचं गेट जवळ दिसलं तरी लांबच होतं. तो माझ्या मागे रिक्षा घेऊन हात लांब करीत येत म्हणाला,"अरे थांब,आजच्या रात्रीची तरी माझी सोय होऊ दे." पण मी जीव घेऊन पळत होतो. .
मी कसाबसा उघड्या गेट मधून आत शिरलो,तर समोर शेट्टी उभा.तो म्हणाला," इतना देरीसे आनेका नहीं. " तो शेट्टीच होता. कारण मी त्याचा फोटो लॉजच्या प्रवेश द्वारावर पाहिला होता. माझ्या अंगात आता ताप चढत होता. सकाळी शेट्टीचा मुलगा चहा घेऊन आला, तेव्हा त्याला मी हे सांगितल्यावर म्हणाला," क्या साब ,आपण मजाक करता है क्या ? आमारा आप्पा जाके दस साल हो गया. " तो निघून गेल्यावर मला ऑफिसला जाणं शक्यच नव्हतं. दुपारी जेवण केल्यावर लॉजच्या बाहेर आलो. तेव्हा शेट्टीच्या फोटोला चंदनाच्या हार घातलेला दिसला. माझं लक्ष कधी तिकडे गेलंच नाही. त्याला काय करणार ?
दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावर, अर्थातच बॉसच्या शिव्या खाव्या लागल्या.कालचा अनुभव सांगूनही त्याला पटलं नाही. तो म्हणाला," तुम इन्स्पेक्शनसे डर गया और कुछ नहीं " एक दिवसाची माझी रजा मात्र विनावेतन झाली.
( संपूर्ण)
अरुण कोर्डे
©®
९००४८०८४८६
:हाहा:. छान कल्पना!
छान कल्पना!
बापरे!!! छान लिहिलीत.
बापरे!!!
छान लिहिलीत.
जुनाट गोष्ट, घिस्पीती
जुनाट गोष्ट, घिस्पीती
गोष्ट जुनाट असली तरी अशी
गोष्ट जुनाट असली तरी अशी गोष्ट घडली असल्याचे काही वाचकांनी सांगितले. मात्र माझा तसा अनुभव नाही.स्पष्ट मताबद्दल आभारी आहे.
मस्त
मस्त