विशुद्ध प्रेमाचा अविष्कार - एन्नु निंटे मोइदीन

Submitted by ब्लू कोलंबसे on 25 April, 2024 - 02:36

प्रेम!

विशुद्ध प्रेम! विरहातले प्रेम!! पावसातलं प्रेम!!!

प्रेमाच्या अनेक छटा,एका आयुष्यात न समजणाऱ्या.

७०च्या दशकात अशीच एक प्रेमकथा देशाच्या 'देवभूमी'त, केरळमध्ये फुलली आणि त्यांच्या विरहाने आणि प्रेमकथेच्या दुर्दैवी अंताने अजरामर केली.

एस. विमल यांच्या 'एन्नु निंटे मोइदीन' (तुझाच फक्त, मोईदीन) या २०१७च्या मल्याळम चित्रपटाने भाषा, प्रांताच्या भिंती कधीच न मानणाऱ्या या 'प्रेमाची गोष्ट' चंदेरी पडदयावर आणली आणि जगभरातील लोकांचे डोळे त्या प्रेमवीरांसाठी पाणावले.

ही चित्रकथा घडते कालिकतजवळच्या घनदाट अरण्यात असलेल्या मुक्कम या गावात ! ६० च्या दशकात कांचनमाला (पार्वती तिरुवोतू कोत्तूवट्टा) MBBSच्या पहिल्या वर्गात शिकणारी, विचार-आचाराने पुरोगामी अशी. ४ बहिणी व १ भाऊ असणाऱ्या कट्टर हिंदू घरातली! तर मोईदीन(पृथ्वीराज सुकुमारन), स्वप्नाळू डोळयांचा 'लाल बावट्या'ने तत्कालीन इंदिरेच्या समाजवादी विचारसरणीला आव्हान देऊ पाहणारा, गावच्या क्लबचा Hero फुटबॉलपटू, गावचा पुरोगामी तरुणवीर !

अशा दोघांची केरळच्या सतत आपली छत्रछाया धरणाऱ्या मायाळू, शृंगारिक पावसातली भेट, 'या हृदयीचे त्या हृदयी' होणारी ती नजरानजर आणि मग त्या भावनेची सप्तरंगी उधळण दोन्ही हृदयांमध्ये !!

मात्र चित्रपट इतर प्रेमपटांपेक्षा वेगळा ठरतो, तो पुढच्या काही अनाकलनीय, मात्र 'प्रेमाच्या घट्ट बंधांमुळे फिक्या पडणाऱ्या अडचणींवरच्या प्रवासा'मुळे! मोईदीनचे वडिल कट्टर समाजवादी, मुसलमान, गावचे प्रमुख. जरी कांचनमालेच्या सारखीनचे वडिलांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध असले तरी हिंदू-मुस्लिम विवाह, तेही ६०च्या दशकात?? अब्र्हमण्यम !!

मात्र यामुळे घरकैदेत पडलेल्या कांचनमालेशी मोईदीनचा होणारा 'कोड वर्ड पत्रां'चा संवाद, मुल्यांची लागणारी कसोटी आणि त्यातून तावून सुलाखून निघणारे कांचनमाला-मोईदीनचे प्रेम, यामुळे हा चित्रपट वेगळ्या उंचीवर जातो, मनाला खोल कुठेतरी भिडतो!

चित्रपटाला लाभलेले संगीतही केवळ स्वर्गीय ! गोपी सुंदरचे 'mukkaththe Penne...(मुक्कत्ते पेण्णे)' हे गाणे पार्श्वसंगीतासारखे चित्रपटभर सोबत राहते. त्यात पडणारा पाऊस पूर्ण वेळ या प्रेमाच्या पाठी सखा म्हणून उभा राहतो आणि ही कथा सत्य घटनेवर आधारित असल्याने त्याची यथार्थता अजूनच वाढते.

आपल्या सर्व बहिणींच्या लग्नानंतरही अविहित राहून आपल्या प्रेमवचनावर अढळ राहणारी कांचनमाला पार्वतीने सुंदर साकारलीय. पृथ्वीराजचे 'प्रेमवीर' भाव खरेच त्याच्या अभिनयाचा उत्कृष्ट नमुना दाखवतात. चित्रपटाचा व त्यांच्या प्रेमाचा करूण अन हृदयद्रावक शेवट आपल्याला त्यांच्या विरहकल्लोळात बुडवून टाकतो, दुःखी करतो.

प्रेमाच्या सुंदर भावनेचा सद्यस्थितीला शिकवणारा उत्तम पाठ आहे 'एन्नु निंटे मोईदीन' !

चित्रपटात आक्षेपार्ह असे काही नसले, तरी मोईदीन आणि कांचन‌मालेच्या भावाची एका रात्री दाखवलेली Fight दाखवली नसती तरी चालले असते. बाकी सत्यकथा २१ व्या शतकात दाखवताना दिग्दर्शकाने जी विशु‌द्धता जपलीय, त्यामुळे हा चित्रपट केरळी थिएटरात २०० दिवस चालू शकला.

चित्रपटाची लांबीही अंमळ जास्तच, मात्र तुम्ही एकदा त्या विश्वात रमला की, मग अनेक प्रसंग तुम्हाला समोरच घडतायत असे वाटतात, इतका जिवंत अभिनय यात झालाय. पत्रांच्या दुनियेत आपले अनोखे 'पत्रप्रेम' अमर ठेवणाऱ्या कांचन-मोईदीनच्या या कथेत एकदा तरी स्वतःला झोकुन घ्या. तुम्हाला 'प्रेम' या संकल्पनेचा आजच्या Breakupच्या जमान्यात नव्याने बोध नक्कीच होईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

These two are adults they could have just gotten married. Unnecessary regard for parental restrictions. Hero me dum nahi but Kerala girls are quite firebrand.

चित्रपटविषयक लेखनासाठी चित्रपट हा ग्रुप निवडाल का? धन्यवाद भरत. मी इथे नवीन असल्याने गुलमोहर सेक्शन मधील योग्य तो ग्रुप निवडत होतो. एक शंका: या ग्रुपवर हा व माझे इतर लेख वळवता येतील का?

संपादन करून बदल शक्य झाले. धन्यवाद भरत. गुलमोहर शिवाय इतर प्रकारचे सेक्शन मी कुठे पाहू शकतो?(https://www.maayboli.com/node_add) या लिंकवर पाहिले पण उत्तर मिळाले नाही. @भरत

आहे ना यू ट्यूब वर... काल लगेच पाहिला शोधून... नाव ॲक्च्युअली Ennu Ninte Moiedden च्या ऐवजी Ennu Ninte Kanchna हवं होत अस फार वाटलं... स्लो असला तरी आवडला..

@मी अमि, धन्यवाद. मी हाच व्हिडिओ शोधून काढेपर्यंत तोच व्हिडिओ टाकल्याबद्दल.

सर्व जण आनंद घ्या चित्रपटाचा!

मी व माझ्या काही मित्र-मैत्रिणींनी हा चित्रपट पाहून इतके inspire झालो की थेट मुक्कम(कलिकत, केरळ) इथे जाऊन कांचनमालेस प्रत्यक्ष भेटलो. (28 डिसेंबर, 2016). दैनिक भास्कर व इतर स्थानिक तमिळ, मलयाळम वर्तमानपत्रात याबद्दल भरभरून लिहून आले होते. तेव्हा तरुण पिढीतील लोक ' विशुद्ध, संयमी व संयत प्रेमाची भाषा शिकण्यासाठी ' थेट कांचन मालेस भेटण्यासाठी तिच्या घरी/ ऑफिसमध्ये मोठ्या संख्येने जाऊ लागले.

कांचनमाला सध्या मोईदीन यांच्या नावे एक फाउंडेशन चालवतात.(2017 ची माहिती, त्यात सध्या बदल असू शकेल.)