प्रिया रागारागाने ताडताड पावलं टाकत रूममध्ये आली. आणि तिने सरळ आपली बॅग भरायला घेतली.
" प्रिया.. प्रिया थांब. काय करतीयेस ? " तिच्या पाठोपाठ घाईघाईने खोलीत येत सोनालीने विचारलं.
" मी जाते आहे." प्रिया.
" अगं कुठे जाणार आहेस ? "
" कुठे म्हणजे ? माझ्या घरीच. मला माझ्या पपांना भेटायचं आहे. मी दुखावलं त्यांना. " प्रिया भावूक होत म्हणाली. " आजही रात्री येतील ते नक्की मला भेटायला.
" प्रिया अगं अशी अविचाराने घाई करू नकोस. तुला काही माहित नाहीये. तिथे धोका आहे."
" धोका आधी असेलही ; पण आता पपांचा माझ्यावर जो काही राग होता तो गेला आहे. माहित आहे मला सगळं. तुम्हीच गैरसमजाने मला परत घेऊन आलात. ठिक आहे ; पण मी नंतर श्रीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरी त्याने माझं ऐकलं नाही. आता तूसुद्धा माझं ऐकत नाहीयेस. आणि सांगतही नाहीत की का असं केलंत ते."
सोनाली गोंधळली होती. प्रियाची अवस्था ती समजू शकत होती. काल रात्री काय घडलं. प्रियाला नक्की काय दिसलं हे त्यांना तिच्याकडूनच समजलं होतं. त्यावर श्रीशी तिचं काही बोलणं झालं नव्हतं ; पण एक गोष्ट ती समजू शकत होती. प्रियाच्या वडलांचा तिच्यावर कसला राग होता हे समजायला मार्ग नव्हता ; पण मग एकाएकी काय झालं होतं ? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काल रात्री त्या घरामध्ये, अंधारात जिना चढणाऱ्या प्रियाच्या हातात एक सुरा होता. तो पाहून सोनालीच्या काळजात चर्र झालं होतं. तो काही चांगल्या गोष्टीचा संकेत नक्कीच नव्हता.
प्रियाचा हात हातात घेऊन हळूवार सुरात सोनाली म्हणाली -
" प्रिया. तुझ्या वडिलांशी, शरद काकांशी तुझी भेट होणार असेल तर ती होऊ नये असं आम्हाला वाटेल का ? आम्ही जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी, तुझ्या सुरक्षिततेसाठीच केलं गं. आणि श्री ने तुला प्रॉमिस केलंय ना, की तो सगळं काही ठीक करेल ? मग नक्की सगळं नीट होईल. Please विश्वास ठेव. आणि त्या घरात आतातरी पाऊल टाकू नकोस. मी रिक्वेस्ट करते तुला." सोनाली अजिजिने बोलत होती. तिच्या बोलण्यातली तळमळ, काळजी प्रियाला स्पष्ट जाणवली. सोनालीच्या हातावरची पकड घट्ट करीत प्रियाने मूकपणे होकार दिला. तिच्या होकाराने सोनालीला जिवात जीव आल्या सारखं वाटलं. तिने हळूवारपणे, प्रेमाने प्रियाच्या गालावर थोपटले.
•••••••
आज मात्र संध्याकाळी साडेसात वाजताच श्री आणि राजाभाऊ घरी परतले. कालच्या प्रकारानंतर प्रिया आपल्यावर रागावलेली असणार हे श्री जाणून होता.
" प्रिया तू माझ्यावर रागावली असशील तर सहाजिकच आहे. मात्र तू हेसुद्धा मान्य करशील की मी तुझ्या आनंदाच्या आड कधीच येणार नाही. मी अगदी खरं सांगतो मी जे काही केलं ते फक्त तुझ्या सुरक्षिततेसाठी." क्षणभर थांबून श्री तिची काय प्रतिक्रिया होते, हे निरखू लागला. प्रिया बोलली काहीच नाही ; पण त्याच्या आश्वासक, प्रेमळ शब्दांनी तिच्या नजरेतली नाराजी, त्याच्या वागण्याबद्दलची नापसंती किंचित विरघळली. तो पुढे बोलू लागला.
" आणि आता मी तुला फार वाट पाहायला नाही लावणार. तुझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळणार आहेत. आजच." त्याच्या शेवटच्या ठामपणे उच्चारलेल्या शब्दाचा परिणाम म्हणून प्रियाने चटकन मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. सोनालीही एकदम सरसावून बसली. राजाभाऊही चकित झाले होते. हे कदाचित त्यांच्यासाठीही अनपेक्षित होतं.
" म्हणजे... माझे पपा भेटतील मला ? " प्रियाच्या स्वरात एक अधीरता आणि निरागस आशा होती.
श्री एक क्षणभर काहीच न बोलता तिच्याकडे एकटक पाहत राहिला. आणि मग त्याने हलकसं स्मित हास्य केलं.
" श्री, पण तुम्ही..." राजाभाऊ.
" हो राजाभाऊ. मी सांगितलं नाही, कारण खरंतर आतापर्यंत माझा असाकाही स्पष्ट निर्णय झालेला नव्हता ; पण आता फार उशीर करुन चालायचं नाही."
" श्री पूर्ण विचार केला आहेस नं तू ? तिथे धोका आहे." सोनाली काळजीच्या सुरात म्हणाली. वास्तविक श्रीला आतापर्यंत बऱ्याच प्रकरणांमध्ये अनेक भयावह, धोकादायक अनुभवातून जावं लागलं होतं. मुख्यतः असे निर्वाणीचे प्रसंग तर फारच धोक्याचे. हे तिला ठाऊक होतं ; पण यावेळी अगदी अचानकपणे, अनपेक्षितपणे ती वेळ येऊन ठेपली होती.
" हो सोनाली. धोका तर अर्थात असणारच आहे ; पण तुला चांगलं ठाऊक आहे मी नीट विचार केल्याशिवाय कुठलाच निर्णय घेत नाही, आणि निर्णय झाल्यावर कितीही धोका असला तरी मागे हटत नाही."
सोनालीने होकारार्थी मान हलवली. तिच्या नजरेत त्याच्या बद्दलचं कौतुक होत.
" प्रिया आता साडेआठ वाजलेत. आता तू बेडरूममध्ये जाऊन पड. रात्री बारा वाजण्याच्या आधी सोनाली सोबत तिकडे ते."
प्रियाने जागेवरून उठून श्रीला मिठी मारली. मग ती बेडरूमकडे गेली. फारच उत्साहित झाली होती ती. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे श्री बराचवेळ बघत राहिला. त्याचा चेहरा वरवर शांत, कोरा दिसत होता खरा ; पण नजरेत एकाच वेळी अनेक संमिश्र भाव उमटले होते.
•••••••
प्रियाच्या बंगल्याच्या फाटकापाशी श्री आणि राजाभाऊंची जोडी येऊन उभी होती. हिवाळ्यातली रात्र. चहूबाजूला किर्र अंधार. त्या अंधारलेल्या आसमंतात शरीरावर सरसरता शहारा उठवणारी, बर्फाळ थंडी दाटून राहिली होती. आणि शांतता ही. राजाभाऊंच्या मनाला याक्षणी स्थिरता नव्हती. शेवटी तेही चारचौघांसारखे सामान्य माणूसच. प्रेम, दया, माया, राग, द्वेष... आणि भय या मानवी भावनांपासून ते अलिप्त कसे राहू शकणार ? श्री सोबत त्यांना काही काही अनुभव आले होते. बऱ्याच गोष्टी ऐकण्यात, पाहाण्यात आल्या होत्या. श्री दरवेळी जवळ होताच. त्यामुळे मनाला या अनुभवांप्रती एक जराशी - कदाचित फसवी ही - स्थितप्रज्ञता असे, तयारी असे ; पण यावेळी अगदी अचानकपणे, अनपेक्षितपणे 'असा' प्रसंग समोर उभा ठाकल्याने मनाची स्थिरता, धैर्य किंचित डळमळीत झाल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे चहुकडे पसरलेला गडद, काळाशार अंधार, त्यातली ही शरीर शहारवणारी थंडी आणि शांतता या साऱ्यांना राजाभाऊंच्या मनाने एक भयावह रूप दिलं होतं.
" राजाभाऊ " हलक्या, कुजबूत्या आवाजात श्री म्हणाला. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने श्री कडे पाहिलं.
" तयार आहात ? "
" हो." ते एवढंच म्हणाले. खोट्या वल्गना करणं त्यांना पटत नसे. त्यांच्या लगेच आलेल्या उत्तराने खुश होऊन श्रीने स्मित केलं. आणि हळूवार हाताने गेटची कडी काढून दार थोडंसं पुढे ढकललं. तो आणि मागोमाग राजाभाऊ आत आले. श्रीने आपल्यामागे गेट कडी लावून बंद केले. समोरचा तो दुमजली बंगला आता स्पष्टपणे नजरेस पडला. सावधगिरीची प्रतिक्रिया म्हणून राजाभाऊंचं शरीर नकळत किंचित आखडलं गेलं. श्री एकटक बंगल्याकडे पाहत होता. तो म्हणाला -
" राजाभाऊ, कधीकाळी या बंगल्यातही ' उपाय ' करण्यासाठी म्हणून यावं लागेल असं खरंच वाटलं नव्हतं."
त्याच्या शब्दांना भावनिकतेची किनार होती. क्वचित प्रसंगी जाणवणारी. आणि आता ती सहाजिकच होती. राजाभाऊंनी सहानुभूतीने त्याच्याकडे पाहिलं.
" असो. पर्याय नाही. चला." असं म्हणून श्री भरभर पावलं टाकत पुढे चालूही लागला. भावनांवर त्वरित नियंत्रण मिळवण्याची त्याची कला आपल्याला साध्य झाली असती तर किती बरं झालं असतं असं राजाभाऊंना वाटून गेलं.
ते दोघे पायऱ्यांजवळ फूटभर अंतरावर आले असतानाच एकदम पोर्चमधला दिवा आणि घरातले लाईट्स आपोआप लागून बंद होऊ लागले. दोघेही जागीच थांबले
" श्री..." राजाभाऊ उद्गारले. त्यांच्या आवाजात जराशी भीती डोकावलीच.
" हे सहाजिकच नाही का राजाभाऊ ? " श्री शांतपणे, काहीशा मिष्कील स्वरात उत्तरला.
" अं... पण आपण अजून...''
" आत प्रवेश केलेला नाही." श्रीने त्यांचं वाक्य पूर्ण केलं. " राजाभाऊ एखाद्या पिंजऱ्यात डांबलेल्या वाघासमोर जाऊन उभं राहिलं, तर त्याच्यापासून अपाय होण्याची भीती नाही हे खरं ; पण समोर माणूस पाहून तो वाघ चवताळणारच ना. तसंच आहे हे." त्यांचं ते नेमकं उदाहरण ऐकून राजाभाऊ पुढच्या कल्पनेने मनातून चरकले. क्षणभर थांबून श्री निश्चयी, गंभीर, कठोर शब्दांत पुढे म्हणाला -
" आणि आता आपल्याला स्वतःच या पिंजऱ्यात प्रवेश करायचा आहे."
राजाभाऊंनी पुन्हा बंगल्याकडे नजर फिरवली. त्यांच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले होते.
आज मी पहिली. संपली का?
आज मी पहिली.
भारीच लवकर टाका पुढचे भाग
भारीच
लवकर टाका पुढचे भाग
@चैताली पाटील - okay. thanks
@चैताली पाटील - okay. thanks mam
Thank you @किल्ली
छान चालली आहे कथा . लवकर
छान चालली आहे कथा . लवकर पुढचे भाग टाका.
चांगले लिहिताय..पुभाप्र
चांगले लिहिताय..पुभाप्र