अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत
(संदर्भ - मायबोलीवरील चर्चा. (शोधा पुन्हा कधीतरी))
आज माझे आजोबा जिवंत असते तर तब्बल १२० वर्षांचे असते. त्यांचे बालपण मुंबईतच गेले. थोडक्यात मुंबईकर म्हणून आमचा किमान शंभर वर्षांचा ईतिहास आहे असे म्हणू शकतो
आजोबा दक्षिण मुबईतील माझगाव पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर होते. आजही ते पोस्टऑफिस आमच्या मुंबईतील सध्याच्या घरासमोर आहे. पण त्याला जुने पोस्ट ऑफिस म्हटले जाते. कारण शेजारी नव्या ईमारतीत नवीन पोस्ट ऑफिस उघडले आहे. मला मात्र ईंग्रजांच्या काळातील जुने पोस्ट ऑफिसच जास्त आवडते. सध्या जाणे काही दोन्ही पोस्ट ऑफिसात होत नाही. तशी कधी गरजच पडत नाही.
पण तो काळ वेगळा होता. पोस्टाला मान होता. आणि पोस्टमास्तर आजोबांनाही सन्मान होता.
आजोबांना आठ मुले होती. कोणाला याचे फार कौतुक नव्हते. म्हणजे तेव्हाचे कुटुंब नियोजन असेच असावे. लग्नाचे प्रयोजन हेच असावे.
तर आठ मुले आणि त्यांच्यामुळे घरात आलेल्या सूना अधिक जावई मिळून तब्बल सोळा जणांपैकी आठ दहा जण पोस्ट ऑफिस / तार ऑफिसमध्ये कामाला लागले. यालाच नेपोटीजम द घराणेशाही असेही बोलू शकतो.
जसे मुलांची संख्या वाढू लागली तशी जागा कमी पडू लागली. जुने घर सोडून नवीन घरात आलो. मुले मोठी होऊ लागली तशी तिथेही एकाची दोन घरे झाली. पण मुंबई काही सोडली नाही.
पुढे जाऊन मुले लग्नाच्या वयात पोहोचली. मुली आपल्या नवर्याच्या घरी गेल्या, तर मुलांनी आपला वेगळा संसार थाटायचा म्हणत एकेक करत मुंबई सोडली. माझे वडील त्यांच्यात लहान, आणि त्यांचे लग्न सर्वात शेवटी म्हणून ते आजोबांसोबत मुंबईतच राहिले. त्यामुळे माझेही बालपण मुंबईतच गेले.
ज्या काकांनी मुंबई सोडली ते कोणी अंधेरीला गेले, तर कोणी विक्रोळीला, कोणी कुर्ल्याला तर एक थेट वसईला गेले. त्यापैकी अंधेरी आणि विक्रोळी असलेल्या काकांकडे दर उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणे व्हायचे. तिथे माझी ओळख मुंबईहून आलेला पाहुणा अशीच असायची. यामागे मुंबई म्हणजे काही तरी ग्रेट, आणि उपनगरे म्हणजे त्याला जोडलेली ठिगळे असा अॅटीट्यूड बिलकुल नसायचा. कदाचित उपनगरात वसलेली लोकं मुंबईतूनच आलेली असावीत म्हणून असेल, किंवा रोज दादर किंवा बोरीबंदरच्या दिशेने कामाला जाताना ट्रेनच्या गर्दीला झेलत जावे लागते म्हणून असेल, पण ते आमचा उल्लेख मुंबई किंवा प्रॉपर मुंबई असाच करायचे. त्यात उपनगरे जोडायचे नाहीत.
तर या काकांकडे जाताना आजी सोबत असल्याने आणि तिला ट्रेन आवडत नसल्याने बसनेच जाणे व्हायचे. किमान दोन बस बदलून जावे लागायचे. तेव्हा प्रवासात दोन गोष्टी प्रकर्षाने लक्षात यायच्या.
एक म्हणजे जागोजागी रस्त्याकडेला असलेले उघडे नाले. मुंबईत हा प्रकार दिसायचा नाही. काकांच्या बिल्डींगमध्ये प्रवेश करतानाही एखादा छोटासा नाला ओलांडून प्रवेश करावा लागायचा. त्यामुळे काकांची घरे आमच्यापेक्षा छान, चकाचक, आणि प्रशस्त असली तरी त्या एक नाला प्रकारामुळे शहरातून गावात आल्याची भावना मनात उत्पन्न व्हायची.
दुसरी गोष्ट म्हणजे रिक्षा. जी फक्त मुंबई उपनगरात आणि मायबोलीवर चालते, पण मुंबई शहरात नाही.
लहानपणापासून मुंबई शहर कुठे संपते आणि उपनगर कुठून सुरू होते हे लक्षात ठेवायचा एक महत्वाचा मापदंड म्हणजे रस्त्यावर दिसणारी रिक्षा.
बसच्या प्रवासात खिडकीबाहेर नजर टाकता टॅक्सी दिसायचे बंद होऊन रिक्षा दिसू लागली की आपण मुंबई सोडली असे समजायचे हा थंब रूल घरूनच बालमनावर बिंबवण्यात आला होता.
अर्थात तेव्हा उपनगरे ईतकी विकसित झाली नसल्याने ईतर फरक सुद्धा चटकन जाणवायचे. जसे की, मुंबईत बिल्डींगखाली उतरले की शे-दोनशे मीटर त्रिज्येच्या परीघात हवे नको ते सगळे मिळायचे. पण तेच उपनगरात दहा पंधरा मिनिटांची पायपीट करावी लागायची किंवा वेळप्रसंगी रिक्षा करून मार्केट वा स्टेशनला जावे लागायचे.
टॅक्सीचे मीटर रिक्षाच्या दिडपट असले तरी मुंबईत ती वापरायची गरज फार कमी पडायची. मध्यमवर्गीय लोकांकडे स्वताच्या गाड्या असायचा तो काळ नव्हता. पण पब्लिक ट्रान्सपोर्टबाबत मुंबईमध्ये लोकल ट्रेन आणि बसचे सक्षम पर्याय उपलब्ध होते. हार्बर सेंट्रल वेस्टर्न अश्या तिन्ही रेल्वेलाईन मुंबईत एकत्र यायच्या, तसेच लोकसंख्येची घनता जास्त असल्याने दोन स्टेशनमधील अंतर देखील फार नसायचे. त्यामुळे मुंबईत कुठेही रहात असलो तरी एखाद दुसरे रेल्वेस्टेशन जवळ पडायचे. त्याचसोबत बेस्ट बसेसचे जाळे सुद्धा मुंबईभर पसरलेले होते. जे तुम्हाला दारात पोहोचवायचे.
जेव्हा कोणी काका मामा उपनगरात घर घ्यायचे तेव्हा पहिला प्रश्न हाच असायचा की स्टेशनपासून किती लांब/जवळ आहे? मुंबईत कधी हा प्रश्न पडला नव्हता. पण काका मामांकडे राहायची वेळ आली तेव्हा समजून चुकलो की हा प्रश्न किती महत्वाचा होता. कारण रोजचे शाळा-कॉलेज, ऑफिसला जाताना सुद्धा रेल्वेस्टेशनपर्यंत रिक्षा करावी लागायची. एका अर्थाने रिक्षा ही उपनगरांची लाईफ लाईन होती. आजही असेल.
सध्या मी नवी मुंबईत राहतो तिथे तरी नक्कीच आहे.
मुंबईत लहानपणी बराच वेळ बस आली नाही तर टॅक्सीला हात दाखवला जायचा. पण ईथे मात्र बस हा प्रकार असूनही काही जणांसाठी तो अस्तित्वातच नाहीये. चार पैसे जास्त खर्च करू, पण रिक्षालाच हात दाखवू. शेअर रिक्षामध्ये कोंबून चोंबून भरले जाऊ, पण बसच्या रांगेत उभे नको राहू. मी नवीनच इथे राहायला आलो तेव्हा मला या सगळ्याची आणि लोकांच्या मानसिकतेची गंमत वाटायची. पण लवकरच मी देखील याला सरावलो. आणि रिक्षाला दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून स्विकारले.
पण मन अजूनही तिथेच मुंबईत आहे,
त्यामुळे कोणी रिक्षांचा किस्सा सांगताना त्या जागेचा उल्लेख मुंबई असा केला तर तोंडातून चटकन बाहेर येतेच,
अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत
आणि यामागे कुठलाही खोडसाळपणा नसतो. पण ती अमुक तमुक जागा मुंबईत येत नाही का हा वाद ठरलेलाच असतो
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
छान लेख.
छान लेख.
मुळची ठाणे जिल्ह्यात असलेले पण आता ती शहरं मुंबईत असणारे मुंबईकर डोंबिवलीला गावच समजतात पण त्यांना हे समजत नाही की डोंबिवलीत स्थायिक झालेले बरेचसे मुळ अगदी प्रॉपर मुंबईकर आहेत, दादर गिरगांवचे.
मला आवड्ते प्रॉपर मुंबई, उपनगरे आणि ठाणे जिल्हाही. माझा जन्म तर प्रॉपर माहीमचा आहे त्यामुळे मी जन्माने जिथे रिक्षा नसते अशा ठीकाणची आहे. दीड वर्षांची असेपर्यंत आम्ही विद्याविहारला रहायचो, नंतर डोंबिवलीत आलो त्यामुळे सध्याच्या मुंबई उपनगरातून आलेलो आम्ही, डोंबिवलीत रमलो. नवरा कोकणातून काही वर्ष काळबादेवीत होता, चाळीत एका खोलीची जागा होती सासऱ्यांची तिथे मोठे दीर राहायचे मग तो शिकायला आला. नंतर हे सर्व नालासोपारा इथे शिफ्ट झाले.
माझे आजोबा ( आईचे वडील) रेल्वे मध्ये ( माटुंगा रेल्वे वर्कशॉप) कामाला होते >>> हे माटुंगा झेड ब्रिजच्या खाली असणारे का. झेड ब्रिजवरुन आतेकडे माहीम (माटुंगा रोड) ला जायच्या असंख्य आठवणी आहेत.
काका काही वर्ष माटुंग्यात पोस्ट मास्टर होते त्यामुळे तिथेही जाणं व्हायचं.
गिरगावला एक आते रहात असल्याने लोकल प्रवास नंतर बेस्टने प्रवास करायची मजा औरच.
डोंबिवलीनंतर मला आवडणारी आणि जिव्हाळा वाटणारी ठिकाणे म्हणजे माटुंगा रोड आणि माहीम परिसर, दोन नंबर मुलुंड ईस्ट. तीन नंबर वर विद्याविहार येईल.
अॅटिट्युडच्या मुद्द्याला
अॅटिट्युडच्या मुद्द्याला थोडं धरुन. मी हुजूरपागेत शिकायला होते. रहायला वानवडी भागात. दोन्हीत म्हणजे वाडा संस्कृती आणि थोडं आ ऊटस्कर्टस वातावरण खरच फरक होता. दोन्ही आपापल्या जागी मस्तच होते. शेवटी लहानपणच ते आपण आपल्या आपल्या इकोसिस्टीममध्ये रमून जातोच.
पण वाडासंस्कृती वेगळी होती. भारीही होती. मस्त होती.
पण मी दोन्हीत कोणती श्रेष्ठ अशी तुलना करणार नाही.
रुपाली, प्रतिसादात एक लेखच
रुपाली, प्रतिसादात एक लेखच लिहीलात
विमानतळ परीसराच्या आठवणीबद्दल +७८६, मी सुद्धा लहानपणी पहिल्यांदा तो परीसर पाहिला तेव्हा असाच धक्का बसला होता. कारण डोक्यात कल्पना आणखी वेगळ्या होत्या.
पण वाडासंस्कृती वेगळी होती.
पण वाडासंस्कृती वेगळी होती. भारीही होती. मस्त होती. >>> हे मुंबईतील चाळ संस्कृतीसारखेच झाले. जेव्हा आमच्या ईथले कोणी नवीन घर घेतल्यावर फ्लॅट संस्कृतीत राहायला जायचे तेव्हा त्यांची मुले अक्षरशा रडायची. दक्षिण-मध्य मुंबई चाळ संस्कृती हा स्वतंत्र लेखाचा नाही तर कधीही न संपणार्या लेखमालेचा विषय आहे
माटुंगा झेड ब्रिजच्या खाली
माटुंगा झेड ब्रिजच्या खाली असणारे का. झेड ब्रिजवरुन आतेकडे माहीम (माटुंगा रोड) ला जायच्या असंख्य आठवणी आहेत>> हो अन्जू.. त्या ब्रिज खालीच असणारे वर्कशॉप..! मी एकदाच पाहिले होते ब्रिजवरून.. माहिम - माटुंगा परिसर मला आवडायचा.. रस्त्याने फुललेले गुलमोहर आणि शिरीषचे वृक्ष.. आता आहेत की नाही काय माहित..!
असतील अजूनही. मी कित्येक
असतील अजूनही. मी कित्येक वर्षात गेलेली नाहीये. आते नाही आता, ते घरही बंद. भावंडे दुसऱ्या शहरात असतात.
रुंमेश छान व्यक्त केले आहे,
रुंमेश छान व्यक्त केले आहे, कालच एक नवीन राहायला आलेली महिला भेटली, इथे ती कोणाला ओळखत नाही, इकडची भाषा बोलत येत नाही, मी मराठी बोलणारी भेटल्यावर ती खूप आनंदी झाली. तिच्याशी बोलताना मीही सांगितले की इथे येण्यापूर्वी माझा आयुष्य कस मुंबई नंबर २५, २८, ०८, १२, १३ मध्येच मर्यादित होत आणि हा लेख वाचला.
वाचून मलाही माझ्या लहानपणीची आठवण आली. मुंबई मध्ये राहणं आणि उपनगरात राहणं किंवा ठाण्यात नवी मुंबईत राहणं यात काहीही मोठेपण किंवा लहानपण नाही, माझ्याही निरागस मनावर तुझ्यासारखे विचार बिंबले होते. वडील बृहन्मुबई महानगरपालिकेत असल्यामुळे मुलुंड चेकनाका व दहिसर चेकनाका , असे शब्द असतं, त्यापुढे बृहन्मुंबई ची हद्द संपते, तसेच मुंबई आणि मुंबई उपनगरे हे मिळून बृहन्मुंबई होते असे समजले.तेव्हा नकाशात मुंबईची मूळची बेटं शोधलI, शॉपिंग ल जायचो ते kolaba causeway आणि कधी ना ऐकलेल माहीम causeway चा इतिहास शोधला, त्यामुळे मामा उपनगरात राहतो हे ज्ञान लहानपणीच मिळालं. त्यानंतर नवीन घर शोधताना आम्ही भावंडांनी भांडुप लां राहायला जायला नकार दिलेला कारण तिकडे नाला असतो! Internship च्या वेळेस बांद्रा पण suburb मध्ये येत हे ट्रेन ने माहीम ची खाडी पार करताना एक वास येतो , तेव्हा उगाचच आठवायचे.
आणि माझ्या लग्नाच्या वेळेस माझे बाबा गाल फुगवून बसलेले त्याचं ( अनेक कारणांपैकी) एक कारण होत, नवी मुंबई दू ~~~~~र आहे! नवरा मुलगा मुंबईत राहत नाही!
नवी मुंबई दू ~~~~~र आहे......
नवी मुंबई दू ~~~~~र आहे..........+१..
आमच्या गल्लीतला एकजण चेंबूरला रहायला गेला त्यावेळी कित्ती लांब रहायला गेला ना असं बोलणे घरात झालेले आठवते.नंतर आपलीच दया येते.
गल्लीच्या टोकावर समोरासमोर बसस्टॉप होते.शाळा चालत तर कॉलेज बसने झाले.ट्रेनशी संबंध आला नाही.नाही म्हणायला ठाण्याला कधीकाळी गेलो तर गावाला गेल्याचे फील यायचे.
ठाण्याला कधीकाळी गेलो तर
ठाण्याला कधीकाळी गेलो तर गावाला गेल्याचे फील यायचे.>>>
असेल... पूर्वी म्हणजे ८० च्या दशकात, ठाणे खूप वेगळं होतं. खूप अरुंद रस्ते वगैरे. कळव्याला तर मला आठवतंय रस्त्यात गयी वगैरे असायच्या.
पण नंतर ठाण खूप झपाट्याने बदलत गेलं..
२००० नंतर तर ठाण्याच्या रिअल इस्टेट ने जे काही स्वरूप धारण केलं, exponential growth म्हणजे काय ते कळून यावं...
घोड बंदर रोड, भिवंडी/ नाशिक रोड, कळवा, खारेगाव सगळ्या बाजून ते वाढतंय.
मग त्या बरोबर मोठ मोठे मॉल्स... दुकान.. मल्टिप्लेक्स
दर पाच वर्षात एखादा मोठा प्रोजेक्ट उभा राहतोय.
मनोगत आवडले.
मनोगत आवडले.
ऋन्मेष भारी लेख लिहिला आहेस
ऋन्मेष भारी लेख लिहिला आहेस आणि आठवणी सुद्धा कमाल आहेत. (सोबतीला डोळ्यात बदाम असणारी बाहुली)
माझ्या आवडत्या शहरांपैकी सगळ्यात वरती असणारे शहर म्हणजे मुंबई. देशातील आणि विदेशातील शहरे बघितली पण मुंबईची सर त्यांना नाही. मुंबईला सारखे येणे होत नाही पण वर्षातून एखादी तरी चक्कर घडते आणि त्या थोड्याश्या वेळात टॅक्सी, लोकल, बेस्ट बस आणि जमल्यास रिक्षा (तुझ्या लेखा नुसार मुंबई बाहेरील भागात) असा प्रवास करण्याचा योग येतो. लहानपणी तर मला वसई, विरार, ठाणे, कल्याण हे सुद्धा मुंबईतच आहेत असे वाटायचे
अजूनही मुंबईत आलो तर तुझ्या लेखात जो मुंबईचा भाग आहे तिथे फिरण्याची मजा येते.
रुपाली, आणि अंजू तुमच्या
रुपाली, आणि अंजू तुमच्या कॉमेंट्स वाचताना मलाही बरच जुन काय काय आठवलं...
माटुंगा cenrral- वेस्टर्न दोन्हीकडे नातेवाईक असल्याने z ब्रीज बऱ्याच वेळेला वापरलाय.
११ वी नंतर कॉलेजला म्हणून मुंबईला( मुलुंड ला ) जायला ट्रेन पकडायची आणि तिथून मुंबईत वावर/ रेल्वेचा प्रवास सगळ्याची
सुरुवात झाली.
मग पुढे नवी मुंबईत इंजिनिअरिंग कॉलेज क्या निमित्ताने चार व रोजचे जाणे येणे सुरू राहिले. विद्यालंकार classes दादरला.. त्यामुळे. तिकडे नेमाने जने येणे असे.. नरिमन पॉईंट ल सहा महिने कॉम्प्युटर क्लास ल होतो , तेव्हा तर सकाळी ६.३० ते रात्री ११ तिकडेच पडीक असायचो त्यामुळे फोर्ट, नरिमन पॉइंट, चर्चगेट, cst हे पण बराच पायाखालून घातलय, अंधेरीला नोकरी होती त्यामुळे सिप्झ, आकृती तो एरिया मांहीत्ये.. तिकडच्या तुंगा, गंगा क्या आठवणी आहेत. .. तो भयंकर traffic अनुभवलाय..
झालच तर मालाड, jvpd ( जुहू - विले पार्ले scheme ) ek एरिया आहे posh म्हणता येईल असा... तिकडे अमिताभचा बंगला पण आहे.. तिकडे त्याच्या बंगल्यातून एक गुजु कंपनी ( Comp startup ) Ani computer classes चालवायचा.. तिकडे ही काम केलेलं..
वसईला एका इंडस्ट्रिअल इस्टेट मध्ये फायनल year Cha project करायला जायचो त्यामुळे तो भाग बघितलाय.
कल्याण- विठ्ठल वाडीला पण जॉब केलाय त्यामुळे तिथला अनंत हलवाई माहित्येय.
मालाडचा एक मोठा हलवाई तो पण खूप प्रसिद्ध आहे आता त्याच नाव नाही आठवत..
लोअर परेल च अप्पर वरली झाल्यानंतर त्या अती प्रचंड आणि उंच १००+(?) मजल्यांच्या बिल्डिग मध्येही ( सेंटर one ka?? ) काही काळ कामानिमित्त जायला मिळाले ल.. बऱ्याच लिफ्ट होत्या .. एक फक्त ३० मजल्यांपर्यंत जाणारी, दुसरी अजून वरती जायचो.. तिसरीच अजून काही तंत्र होत...
घणसोली ला - म्हाप्याला तयार झालेलं DAKC, ते बघून पण इतकं आश्चर्य वाटलेला. इतका मोठा परिसर, इतका छान , ikdun तिकडे जायला गोल्फ कार्ट २००२ मध्ये ते सगळं खूप नवीन होत
त्यामुळे ११वी पासून नंतरच्या १५-२० वर्षात सेंट्रल आणि वेस्टर्न च्या जवळ जवळ प्रत्येक स्टेशनवर एकेकदा तरी गेलिये.
अंजू आणि रुपाली चे प्रतिसाद वाचताना सगळं आठवत गेलं.. मुंबई.. सगळ्यांना सामावून घेणारी..कायम आपली वाटतं राहिली.. राहते with all it's odd.
दुसरी गोष्ट म्हणजे रिक्षा. जी
दुसरी गोष्ट म्हणजे रिक्षा. जी फक्त मुंबई उपनगरात आणि मायबोलीवर चालते, पण मुंबई शहरात नाही.
>>>
या नुसार "लावण्यवती मुंबई" या माझ्या जुन्या धाग्याची "रिक्षा" . धाग्यात शब्द कमी आणि फोटो जास्त आहेत त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आवडतील अशी अपेक्षा करतो आणि बरं का फोटोसाठी सेपिया टोन वापरली आहे त्यामुळे थोडे नॉस्टॅल्जिक झालात तर माझ्यावर रागावू नका प्लिज
"लावण्यवती मुंबई"
https://www.maayboli.com/node/61537
>>अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत
>>अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत<<
बरं, मग? एक रिक्शावाला मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यात जाउन बसला आहे, त्याला चालवुन घेताय नां?
लेख ,आठवणी आवडल्या. छान
लेख ,आठवणी आवडल्या. छान लिहिलंय.
मध्यलोक, आपल्या त्या फोटोंवर
मध्यलोक, आपल्या त्या फोटोंवर माझा प्रतिसाद आहे आणि तो सेपिया टोन बद्दलच आहे
छंदी फंदी वाह.. पूर्ण मुंबईभर मुक्काम केलात कामानिमित्त.
कोपरखैरणे समोरील डीएकेसी मध्ये मी सुद्धा दोन वर्षे जॉबला होतो. तिथल्या परिसराच्या, तलावाच्या आणि फूड कोर्टच्या मस्त आठवणी आहेत.. तेव्हा कोपरखैरणे कुठलातरी दुर्गम प्रदेश वाटायचा. आज तिथेच पलीकडे मी घर विकत घेऊन राहतोय
वर्णिता, धन्यवाद
मालाडचा एक मोठा हलवाई तो पण
मालाडचा एक मोठा हलवाई तो पण खूप प्रसिद्ध आहे आता त्याच नाव नाही आठवत..... MM Mithaiwala त्याचे नाव
MM Mithaiwala त्याचे नाव >>
MM Mithaiwala त्याचे नाव >> हो मस्त असतात त्याचे आयटम्स. मधे आग लागल्यामूळे बंड झाले होते. सध्या काय आहे प्रकार माहित नाही.
छंदीफंदी छान कमेंट.
छंदीफंदी छान कमेंट.
पण मुंबईत रिक्षा का चालत
पण मुंबईत रिक्षा का चालत नाहीत? कुणीतरी वाहतुक कोंडी होईल वगैरे कारण दिलं होतं, पण ते अगदीच हॅ आहे! टॅक्सीचा आकार रिक्षापेक्षा मोठाच असतो, मग टॅक्सीपेक्षा रिक्षाने वाहतुक कोंडी जास्त कशी होईल? एक नक्की, की मुंबईचे टॅक्सी ड्रायव्हर्स हे कुठल्याही रिक्षावाल्यांपेक्षा जास्त शिस्तशीरपणे टॅक्सी चालवतात, त्यामुळे ते जर कारण असेल तर मला ते मान्य आहे. पण हे आधीच अँटीसिपेट करून कुणी नियम बनवला असेल असं वाटत नाही.
रिक्शा न चालू देण्याचे कारण
रिक्शा न चालू देण्याचे कारण टँक्सी युनियन ... अशी असामी यांची पोस्ट आहे. तेच प्रकाश टाकतील.
बाकी वर फेमस मिठाईवाला म्हणून उल्लेख निघाला आहे त्यावरून आठवले, प्रॉपर मुंबईमधील फूड कल्चर आणि ती टेस्ट बाहेर गेले की फार मिस होते. इथे नवी मुंबईत तर फारच..
रिक्शा न चालू देण्याचे कारण
रिक्शा न चालू देण्याचे कारण टँक्सी युनियन ... अशी असामी यांची पोस्ट आहे. तेच प्रकाश टाकतील. >> नव्या मुंबई मधे राहतोस तेंव्हा रिक्शा वापरत नाहीस का रे ? सिग्नल ला उभ्या असलेल्या गाड्यंमधे लेन चि बेशिस्त करणारे कोण असतात मुख्यत्वे करून (टू व्हीलर्स वगळता) ? रिक्शा छोट्या आकाराच्या असल्यामूळे कुठेही घुसवतात त्याने वाहतूक कोंडी होण्याचे चान्सेस वाढतात. (बाकीचे वाहने करत नाहीत असे नाही ) आता हे आधीच ओळखणारा द्रष्टा कोण होता हे मला माहित नाही.
त्याच्याकडुन संपूर्ण महानगरीच्या वाहतूकीचे नियोजन करून घ्यायला हवे होते 
प्रॉपर मुंबईमधील फूड कल्चर आणि ती टेस्ट बाहेर गेले की फार मिस होते. इथे नवी मुंबईत तर फारच.. >> तूला संपूर्ण नव्या मुंबईमधे फूड कल्चर आणि टेस्ट सापडली नाहि का रे ? नवी मूम्बई म्हणजे कुठे टींबकटू वगैरे ला गेल्यासारखे का बोलतोयस ?
आता प्रॉपर मुंबईतल्या हेअर
आता प्रॉपर मुंबईतल्या हेअर कटिंग सलुन आणि उपनगरातल्या सलुन यांचा तौलनिक अभ्यास वाचला की सुडोमि!
हेअर कटिंग सलुन आणि
हेअर कटिंग सलुन आणि उपनगरातल्या सलुन यांचा तौलनिक अभ्यास >>
प्रॉपर मुंबईतल्या हेअर कटिंग
प्रॉपर मुंबईतल्या हेअर कटिंग सलुन आणि उपनगरातल्या सलुन>>> मी कधीच मुंबई मध्ये किंवा उपनगरात केशकार्तनालयात गेलो नाही. पुण्यातली जास्ती चांगली होती असे म्हणेन. तसे आमच्या गावाकडचे तर सर्वोत्तम.

सिप्झ ते कांजूर मार्ग विशेष
सिप्झ ते कांजूर मार्ग विशेष करून हिरानंदानी, आयआयटी ते कांजूरमार्ग रिक्षावाले अशी रिक्षा का ढा य चे.. मला ते आठवून नेहेमी झुरळांची आठवण ती जशी भयंकर पसार्यात झुप झुप करत करत तसच ते तसेच त्या भयंकर traffic मधून रिक्षा काढायचे.
तसच मुकुंद ब्रीज कळवा तिकडेही जबरदस्त traffic असायचा आणि रिक्षावाले बाजू बाजून सटा सट काढायचे.
रिक्षा, मुंबईतले ( जिथे लोकल पोहोचते ती सगळी गावे पकडून) फूड joints आता हा धागा nostalgic होत चाललाय..
सिप्झ ते कांजूर मार्ग विशेष
सिप्झ ते कांजूर मार्ग विशेष करून हिरानंदानी, आयआयटी ते कांजूरमार्ग रिक्षावाले अशी रिक्षा का ढा य चे.. मला ते आठवून नेहेमी झुरळांची आठवण ती जशी भयंकर पसार्यात झुप झुप करत करत तसच ते तसेच त्या भयंकर traffic मधून रिक्षा काढायचे.
तसच मुकुंद ब्रीज कळवा तिकडेही जबरदस्त traffic असायचा आणि रिक्षावाले बाजू बाजून सटा सट काढायचे.
रिक्षा, मुंबईतले ( जिथे लोकल पोहोचते ती सगळी गावे पकडून) फूड joints आता हा धागा nostalgic होत चाललाय..
मुळात रिक्षा हाच प्रॉब्लेम
मुळात रिक्षा हाच प्रॉब्लेम असेल तर तो काही एकट्या मुंबईचा नाही. मुंबईबाहेर रिक्षा का चालतात असा प्रश्न पडेल मग. आता इथे रिक्षा युनियन हे उत्तर असावे. त्यांची अरेरावी फार असते. ओला उबर येऊ नये म्हणून हे लोक संप करतात.
तूला संपूर्ण नव्या मुंबईमधे
तूला संपूर्ण नव्या मुंबईमधे फूड कल्चर आणि टेस्ट सापडली नाहि का रे ?
>>>>>>
खरेच नाही. मुंबई लेव्हलची बिलकुल नाही. मी नंतर वेळ मिळेल तेव्हा सविस्तर लिहितो यावर.. एका धाग्यात सर्व विषय नको..
हेअर कटिंग सलुन आणि
हेअर कटिंग सलुन आणि उपनगरातल्या सलुन यांचा तौलनिक अभ्यास
>>>>
माझे विक्रोळीला राहायला गेलेले काका केस कापायला माझगावलाच यायचे. तेच नाही तर इथे आले की त्यांच्या मुलांचेही केस कापून घ्यायचे. मुले जवळपास 15-16 वर्षांची होईस्तोवर, इतके वर्षे असे ते करत होते
हे वरची पोस्ट वाचून आठवले म्हणून लिहिले. आणि असे करणारे बरेच महाभाग आमच्याकडे होते. पण यावरून कसला निष्कर्ष काढायचा नाहीये.
मी स्वतः सुद्धा मुलांना लहानपणी केस कापायला मुंबईच्या घरी न्यायचो., कारण एका सलूनचे मालक ओळखीचे होते. ते काका घरी येऊन केस कापायचे
Pages