अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 February, 2024 - 14:03

अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत
(संदर्भ - मायबोलीवरील चर्चा. (शोधा पुन्हा कधीतरी))

आज माझे आजोबा जिवंत असते तर तब्बल १२० वर्षांचे असते. त्यांचे बालपण मुंबईतच गेले. थोडक्यात मुंबईकर म्हणून आमचा किमान शंभर वर्षांचा ईतिहास आहे असे म्हणू शकतो Happy

आजोबा दक्षिण मुबईतील माझगाव पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर होते. आजही ते पोस्टऑफिस आमच्या मुंबईतील सध्याच्या घरासमोर आहे. पण त्याला जुने पोस्ट ऑफिस म्हटले जाते. कारण शेजारी नव्या ईमारतीत नवीन पोस्ट ऑफिस उघडले आहे. मला मात्र ईंग्रजांच्या काळातील जुने पोस्ट ऑफिसच जास्त आवडते. सध्या जाणे काही दोन्ही पोस्ट ऑफिसात होत नाही. तशी कधी गरजच पडत नाही.

पण तो काळ वेगळा होता. पोस्टाला मान होता. आणि पोस्टमास्तर आजोबांनाही सन्मान होता.
आजोबांना आठ मुले होती. कोणाला याचे फार कौतुक नव्हते. म्हणजे तेव्हाचे कुटुंब नियोजन असेच असावे. लग्नाचे प्रयोजन हेच असावे.

तर आठ मुले आणि त्यांच्यामुळे घरात आलेल्या सूना अधिक जावई मिळून तब्बल सोळा जणांपैकी आठ दहा जण पोस्ट ऑफिस / तार ऑफिसमध्ये कामाला लागले. यालाच नेपोटीजम द घराणेशाही असेही बोलू शकतो.

जसे मुलांची संख्या वाढू लागली तशी जागा कमी पडू लागली. जुने घर सोडून नवीन घरात आलो. मुले मोठी होऊ लागली तशी तिथेही एकाची दोन घरे झाली. पण मुंबई काही सोडली नाही.

पुढे जाऊन मुले लग्नाच्या वयात पोहोचली. मुली आपल्या नवर्‍याच्या घरी गेल्या, तर मुलांनी आपला वेगळा संसार थाटायचा म्हणत एकेक करत मुंबई सोडली. माझे वडील त्यांच्यात लहान, आणि त्यांचे लग्न सर्वात शेवटी म्हणून ते आजोबांसोबत मुंबईतच राहिले. त्यामुळे माझेही बालपण मुंबईतच गेले.

ज्या काकांनी मुंबई सोडली ते कोणी अंधेरीला गेले, तर कोणी विक्रोळीला, कोणी कुर्ल्याला तर एक थेट वसईला गेले. त्यापैकी अंधेरी आणि विक्रोळी असलेल्या काकांकडे दर उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणे व्हायचे. तिथे माझी ओळख मुंबईहून आलेला पाहुणा अशीच असायची. यामागे मुंबई म्हणजे काही तरी ग्रेट, आणि उपनगरे म्हणजे त्याला जोडलेली ठिगळे असा अ‍ॅटीट्यूड बिलकुल नसायचा. कदाचित उपनगरात वसलेली लोकं मुंबईतूनच आलेली असावीत म्हणून असेल, किंवा रोज दादर किंवा बोरीबंदरच्या दिशेने कामाला जाताना ट्रेनच्या गर्दीला झेलत जावे लागते म्हणून असेल, पण ते आमचा उल्लेख मुंबई किंवा प्रॉपर मुंबई असाच करायचे. त्यात उपनगरे जोडायचे नाहीत.

तर या काकांकडे जाताना आजी सोबत असल्याने आणि तिला ट्रेन आवडत नसल्याने बसनेच जाणे व्हायचे. किमान दोन बस बदलून जावे लागायचे. तेव्हा प्रवासात दोन गोष्टी प्रकर्षाने लक्षात यायच्या.

एक म्हणजे जागोजागी रस्त्याकडेला असलेले उघडे नाले. मुंबईत हा प्रकार दिसायचा नाही. काकांच्या बिल्डींगमध्ये प्रवेश करतानाही एखादा छोटासा नाला ओलांडून प्रवेश करावा लागायचा. त्यामुळे काकांची घरे आमच्यापेक्षा छान, चकाचक, आणि प्रशस्त असली तरी त्या एक नाला प्रकारामुळे शहरातून गावात आल्याची भावना मनात उत्पन्न व्हायची.

दुसरी गोष्ट म्हणजे रिक्षा. जी फक्त मुंबई उपनगरात आणि मायबोलीवर चालते, पण मुंबई शहरात नाही.

लहानपणापासून मुंबई शहर कुठे संपते आणि उपनगर कुठून सुरू होते हे लक्षात ठेवायचा एक महत्वाचा मापदंड म्हणजे रस्त्यावर दिसणारी रिक्षा.
बसच्या प्रवासात खिडकीबाहेर नजर टाकता टॅक्सी दिसायचे बंद होऊन रिक्षा दिसू लागली की आपण मुंबई सोडली असे समजायचे हा थंब रूल घरूनच बालमनावर बिंबवण्यात आला होता.

अर्थात तेव्हा उपनगरे ईतकी विकसित झाली नसल्याने ईतर फरक सुद्धा चटकन जाणवायचे. जसे की, मुंबईत बिल्डींगखाली उतरले की शे-दोनशे मीटर त्रिज्येच्या परीघात हवे नको ते सगळे मिळायचे. पण तेच उपनगरात दहा पंधरा मिनिटांची पायपीट करावी लागायची किंवा वेळप्रसंगी रिक्षा करून मार्केट वा स्टेशनला जावे लागायचे.

टॅक्सीचे मीटर रिक्षाच्या दिडपट असले तरी मुंबईत ती वापरायची गरज फार कमी पडायची. मध्यमवर्गीय लोकांकडे स्वताच्या गाड्या असायचा तो काळ नव्हता. पण पब्लिक ट्रान्सपोर्टबाबत मुंबईमध्ये लोकल ट्रेन आणि बसचे सक्षम पर्याय उपलब्ध होते. हार्बर सेंट्रल वेस्टर्न अश्या तिन्ही रेल्वेलाईन मुंबईत एकत्र यायच्या, तसेच लोकसंख्येची घनता जास्त असल्याने दोन स्टेशनमधील अंतर देखील फार नसायचे. त्यामुळे मुंबईत कुठेही रहात असलो तरी एखाद दुसरे रेल्वेस्टेशन जवळ पडायचे. त्याचसोबत बेस्ट बसेसचे जाळे सुद्धा मुंबईभर पसरलेले होते. जे तुम्हाला दारात पोहोचवायचे.

जेव्हा कोणी काका मामा उपनगरात घर घ्यायचे तेव्हा पहिला प्रश्न हाच असायचा की स्टेशनपासून किती लांब/जवळ आहे? मुंबईत कधी हा प्रश्न पडला नव्हता. पण काका मामांकडे राहायची वेळ आली तेव्हा समजून चुकलो की हा प्रश्न किती महत्वाचा होता. कारण रोजचे शाळा-कॉलेज, ऑफिसला जाताना सुद्धा रेल्वेस्टेशनपर्यंत रिक्षा करावी लागायची. एका अर्थाने रिक्षा ही उपनगरांची लाईफ लाईन होती. आजही असेल.

सध्या मी नवी मुंबईत राहतो तिथे तरी नक्कीच आहे.
मुंबईत लहानपणी बराच वेळ बस आली नाही तर टॅक्सीला हात दाखवला जायचा. पण ईथे मात्र बस हा प्रकार असूनही काही जणांसाठी तो अस्तित्वातच नाहीये. चार पैसे जास्त खर्च करू, पण रिक्षालाच हात दाखवू. शेअर रिक्षामध्ये कोंबून चोंबून भरले जाऊ, पण बसच्या रांगेत उभे नको राहू. मी नवीनच इथे राहायला आलो तेव्हा मला या सगळ्याची आणि लोकांच्या मानसिकतेची गंमत वाटायची. पण लवकरच मी देखील याला सरावलो. आणि रिक्षाला दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून स्विकारले.

पण मन अजूनही तिथेच मुंबईत आहे,
त्यामुळे कोणी रिक्षांचा किस्सा सांगताना त्या जागेचा उल्लेख मुंबई असा केला तर तोंडातून चटकन बाहेर येतेच,
अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत
आणि यामागे कुठलाही खोडसाळपणा नसतो. पण ती अमुक तमुक जागा मुंबईत येत नाही का हा वाद ठरलेलाच असतो Happy

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजोबांच्या पोस्टाचे वर्णन आवडले. आम्ही सुद्धा पोस्टात मोठे झालो त्यामुळे त्याबद्दल अजून जिव्हाळा आहे.

मुंबई मध्ये दीड वर्षे काम केल्याने टॅक्सी आणि रिक्षा यांतला फरक नक्कीच कळला होता. त्यावेळेस पवईहून बसने कांजूर मग ट्रेनने भायखळा आणि मग दुसऱ्या बसने वरळी असा प्रवास केल्याने भरपूर अनुभव गाठीला आहे असे म्हणता येईल. मग वरळीत कुठे इतर ठिकाणी जायचे असेल आणि बससाठी थांबायचे नसेल की हमखास टॅक्सी केली जायची. त्यावेळेस प्रीमियर पद्मिनी बऱ्याच होत्या. मग संत्रो वगैरे आल्या. मात्र पवई मध्ये किंवा मुलुंड ठाणे इकडे रिक्षा वापरली जायची. अगदी अंधेरी मध्ये पण रिक्षा चालायची त्यामुळे दादरच्या पुढे काही तरी वेगळीच दुनिया आहे असे वाटायचे.

खरी मुंबई म्हणजे पहिल्या सात बेटांमधे असलेले कुलाबा नि माझगाव मधले बेट. नंतर सात जोडून माहिमपर्यंत आले. मग उपनगरापर्यंत . त्याच्या रिक्षा शी संबंध नाही. रिक्शा न चालू देण्याचे कारण टँक्सी युनियन. पण गमतीचा भाग हा कि मूळ ऑटो पंडीत नेहरूंना घेऊन राज्यपाल सदनाजवळ चालवण्यात आलेली होती. काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवामधे ह्यावर एक प्रश्नमंजुषा घेतली होती.

शीव आणि माहिमच्या पुढे ओटोरिक्षांना फिरता येते. चेंबूर घाटकोपरच्या रुग्णांना मात्र सायन हॉस्पिटलमध्ये (लोकमान्य टिळक ) ओटोमध्ये आणता येते.
खरा मुंबईकर 'बेस्ट' बसने जातो, जात असे. बाकीचे अंतर पायीच. पण '८० पर्यंत बेस्ट बसेस अतिशय स्वच्छ असायच्या.

मुंबईत आणि उपनगरात जेव्हा फिरलो, तो काळ खिशात फार पैसे नसण्याचा आणि पायी चालणे आणि लोकल ट्रेन्सच्या गर्दीत घुसणे ह्या दोन्हीचा कंटाळा नसण्याचा होता. माझ्या आवडत्या महानगरांपैकी एक महानगर!

मस्त लिहिलय.

खर आहे, प्रोपर मुंबई म्हणजे तिथे रिक्षा नाहीत, बेस्ट चे मोठे जाळे.
माटुंगा सेंट्रल की sion ? आणि माहिम की बांद्रा ? च्या पुढे रिक्षा चालू होतात.

छान.
मुंबई शहरात रिक्षा जात नाही उपनगरांत जाते. यात न पटण्यासारखं काय होतं?

मस्त लिहिलं आहे!
पुणेकरांनो सॉरी, पण इथे ऋन्मेषने जे लिहिलं आहे की मुंबई म्हणजे काही तरी ग्रेट आणि उपनगरे म्हणजे काही तरी कमी असा अ‍ॅटीट्यूड नसायचा, ते पुण्यात खूप वेळा दिसतं. म्हणजे तो अ‍ॅटीट्यूड दिसतो. सगळेच दाखवतात असं म्हणायचं नाहीये आणि मुंबईतही सगळेच दाखवत नसतील असंही नाही. पण मला हा अ‍ॅटीट्यूड आवडत नाही. आपण पेठेत/डेक्कनला राहतो म्हणजे आपलं लोकेशन भारी आणि एखादा कात्रज किंवा वाकडला राहतो म्हणजे काही तरी कमी.

माझ्या मुलाला मणिपालच्या मुंबई ग्रुप मधे घेतले नाही कारण आम्ही ठाण्यात रहातो Happy आम्ही जवळपास १६ वर्षे NCR (Gurgaon) मधे होतो. तर त्याला दिल्लीच्या ग्रुप मधे लगेच घेतले. मुंबई/पुण्यात पण काही लोकांना भयंकर Superiority Complex आहे. मी ह्या लोकांकडे दुर्लक्ष करतो. मला दोन्ही शहर आवडतात.

मुंबई मध्ये सगळं भेद लोकल केंद्रित आहे.

सेंट्रल - वेस्टर्न
मुख्य स्टेशन स अडळी मशाली स्टेशन्स..
ईस्ट West
पार्ले ईस्ट आणि पार्ले वेस्ट जमीन अस्मानाचा फरक ..

रोज रोज Attitude देतीलच असे नाही.. पण महत्त्वाचे निर्णय घेताना ( जसे लग्न, जागा घेणे) स्थानाचा खूप विचार होतो/व्हायचा.

आपण पेठेत/डेक्कनला राहतो म्हणजे आपलं लोकेशन भारी आणि एखादा कात्रज किंवा वाकडला राहतो म्हणजे काही तरी कमी. >> म्हंजे अजून तुम्हाला नदीपलीकडचे आणि अलिकडचे हा मूलभूत भेद कळलेला दिसत नाही! खऱ्या पुण्याला चतुःसीमाही नाहीत. शनिवारवाडा, लकडीपूल, आणि स्वारगेट ही तीनच टोके आहेत. Biggrin
इतक्या वर्षांत माबो वर या बाबतीत चर्चा झाली नाही?! हे कसं शक्य आहे? Lol
ते बरोबरच आहे म्हणा! यात वादाचा आणि चर्चेचा प्रश्न येतो कुठे? Proud

तसेही नदी अलीकडचे लोक परदेशी मुलांकडे असतील.जे इथे आहेत ते आता बाणेर किंवा कोथरूड मध्ये असतील Happy राहिले दुकानदार आणि त्यांचे नातेवाईक. त्यांना धंदा चांगला चालल्याशी मतलब.बाकी कमी बिमी लेखायला वेळ नसेल.

बाकी कमी बिमी लेखायला वेळ नसेल. >> निखालस सत्य आहे. त्या जुन्या पुण्याची शेखी मिरवणारी, रस्त्यावर टांगे आणि मम. द. वा. पोतदार चालत जाताना पहाणारी आमची कदाचित शेवटचीच पिढी. कालाय तस्मै नमः|
(टांगे आणि महामहोपाध्याय एका वाक्यात जोडीनं शेजारी! ही किमया घडवणारं पुणं होते ते. असो, धागा पळवत नाही.)

जे अजून तुम्हाला नदीपलीकडचे आणि अलिकडचे हा मूलभूत भेद कळलेला दिसत नाही! खऱ्या पुण्याला चतुःसीमाही नाहीत. शनिवारवाडा, लकडीपूल, आणि स्वारगेट ही तीनच टोके आहेत. Biggrin
इतक्या वर्षांत माबो वर या बाबतीत चर्चा झाली नाही?! हे कसं शक्य आहे? Lol
ते बरोबरच आहे म्हणा! यात वादाचा आणि चर्चेचा प्रश्न येतो कुठे? >> बघ ना. डे. जिमखाना टोटली रॉक्स. वाकड कोथरूड भुगाव ही काही दूरची खेडी आहेत. उगीच पुणे म्हणवतात. पुणे ४ व पुणे ३० हेच सत्य.

कुलाब्या पासून सायन/शीव पर्यंतच मुंबई शहर वसलेले होते आणि इथेच मुंबईची शीव ( पक्षी वेस ) होती तिथून पुढे उपनगरे वसण्यास आणि बकाल होण्यास सुरुवात झाली.

१००% मुंबईकरांचा ह्यावर विश्वास आहे
#propermumbai

खरंय ऋ , जिथे टॅक्सी असतात ती मुंबई आणि रिक्षा जिथे ते उपनगर अशी ढोबळ व्याख्या आहे. मुंबई मे ये सब jaante है! फॅक्ट आहे Happy
त्यात ही टाऊन वेगळे, ती एक वेगळीच मुंबई आहे.

उपनगरात स्टेशन पासुन घर किती लांब हे फार महत्वाचे असते. मुंबई मध्ये जे नातेवाईक आहेत (टाऊन नाही) म्हणजे गिरगावात तिथे चर्नी रोड ला उतरून चालत जातात. त्या वाड्या स्टेशन ला लागूनच आहेत. प्रॉपर टाऊन ला राहणार्‍या लोकांना स्टेशन किती लांब याचा फारसा फरक पडत नसावा. त्यांचा लोकलशी संबंध येतच नसेल.

अहो पुणेकर लोक्स... धागा कुठे हायजॅक करताय..

@ धनि,
पोस्टाच्या जिव्हाळ्याबद्दल +७८६
त्याचा वेगळा धागा निघेल

@ असामी,
खरी मुंबई म्हणजे पहिल्या सात बेटांमधे असलेले कुलाबा नि माझगाव मधले बेट.
>>>>>
हे तर बेस्ट, आम्ही माझगाव बेटावरचे Happy

@ फेरफटका,
पायी चालणे आणि लोकल ट्रेन्सच्या गर्दीत घुसणे ह्या दोन्हीचा कंटाळा नसण्याचा होता.
>>>
पायी चालणे +७८६
ट्रेनची गर्दी मात्र कधीच झेपली नाही. कारण आयुष्य गर्दीच्या उलट दिशेने प्रवास करण्यात गेले.

@ अमितव,
मुंबई शहरात रिक्षा जात नाही उपनगरांत जाते. यात न पटण्यासारखं काय होतं?
>>>>>>
ते न पटण्यासारखे नव्हते. तर मुंबईत रिक्षा नसते हे सवयीने म्हटले गेले की मग उपनगरे मुंबईत येत नाहीत का असा वाद पुढे वाढतो.

@ वावे,
अ‍ॅटीट्यूड चा मुद्दा +७८६

बाकी तुर्तास आलेल्या आणि नंतर येणार्‍या सर्वच प्रतिसादांचे आभार.

अहो पुणेकर लोक्स... धागा कुठे हायजॅक करताय.. >>>

हो ना!
धागा हायजॅक हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो इतर कोणी हिरावून घेतला तर खपवून घेतले जाणार नाही.
असे लिहायला हवे होते तू

अरेच्चा पण ही तर पुणेरी पाटी झाली Wink

असो
मूळ विषयावर येऊ

मुंबई मॅरॅथॉन वरळी सी लिंक संपला की लीलावती पासून परत माहीम कडे वळवतात

मन्नत कुठे आहे?
वांद्र्याला आहे ना ! मुंबईच्या शीवे च्या आत येते की बाहेर

मन्नत कुठे आहे?
वांद्र्याला आहे ना ! मुंबईच्या शीवे च्या आत येते की बाहेर>> आत्ता गं बया. रिक्षा घ्यावी लागेल न्हवं.

कुलाबा ते शिव - सायन ही मुंबई आणि बाकी उपनगरे हे सर्व जुन्या / जन्मापासून मुंबईकरांना माहित असते. अगदी बांद्रा-खार-जुहू जरी असले तरी ते उपनगरच, इट्स अ फॅक्ट.

बाकी (उपनगरांसकट) मुंबई इज लव्ह.

जुन्या / जन्मापासून मुंबईकरांना माहित असते## मुंबईत बाहेरून आलेल्या साठी कुलाबा ते भाईंदर आणि मुलुंड पर्यंत मुंबईच आहे. ह्याचे कारण पुन्हा पोस्ट ऑफिसच आहे, पिन कोड 400 0xx असल्याने सगळी आहे ती मुंबईच

आत्ता गं बया. रिक्षा घ्यावी लागेल न्हवं.
>>>>>
नाही. गरज नाही. उपनगरात टॅक्सी जाते. पण मुंबई शहरात रिक्षा नाही येऊ शकत. बाकी हल्ली अश्या प्रवासाना ओला स्वस्त आणि सोयीस्कर पडते टॅक्सीपेक्षा.

पिन कोड 400 0xx असल्याने >>> महानगरपालिका सुद्धा एकच आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशी कामकाजासंदर्भात अधिकृत विभागणी आहे.. (बहुधा)
....
आता गूगल केले.
हे विकीवर लिहिले आहे. माहितीसाठी म्हणून चिकटवतो. .
Mumbai Suburban district (Marathi: Mumbai Upanagar Jilhā) is the second most populous district of Maharashtra in the Konkan Division. With its administrative headquarters in Bandra, the district consists of three subdivisions or tehsils (townships): Kurla, Andheri, and Borivali.[1] The district along with Mumbai City district and other suburban localities make up Greater Mumbai.

छान लेख आणि आठवणी..!

तुमचा लेख वाचून मुंबईच्या माझ्या काही आठवणी लिहिते. माझे आजोबा ( आईचे वडील) रेल्वे मध्ये ( माटुंगा रेल्वे वर्कशॉप) कामाला होते आणि चुलत आजोबा मिल कामगार होते. दोन्ही भाऊ राहायचे हि माटुंग्यालाच..! आमचे बरेच नातेवाईक आणि ज्ञाती बांधव प्रभादेवी, दादर, माहिम - माटुंगा परिसरात फार वर्षांपासून स्थायिक आहेत. पूर्वी त्यांच्या वाड्या असायच्या. चुलत आजी म्हणायची की, तिच्या वडिलांची दादर परीसरात शेती होती. आजोबा राहायचे ती चाळ टाइप बिल्डींग होती ( सिरीयल मध्ये दाखवतात अगदी तशीच.) .. अजून आहे पण आता जुनी झालीयं .. चाळीत आमचे बरेचसे नातेवाईक राहायचे आणि बाकीचे मालवणातले शेजारी होते.. मला आठवतेय जोपर्यंत मी जायचे तिथे, तोपर्यंत एकही परप्रांतिय चाळीत राहायला नव्हता. मराठी वस्ती जास्त होती. आईच्या एका आठवणीनुसार जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली होती आणि शिवसैनिकांनी एकदा मुंबई बंद ठेवली होती.. तत्कालीन तरुणवर्ग मराठी लोकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी झाला होता.. मुंबईत तोडफोड झाली होती.. परप्रांतियांची दुकानं फोडली होती ... आंदोलनात सहभागी असलेल्या परिसरात राहणाऱ्या शिवसैनिकांची पोलिसांनी धरपकड केली होती.. त्यांना पकडण्यासाठी सगळ्यांच्या घराची झडती पोलिसांनी घेतली होती.. आजोबांच्या घराची सुद्धा झडती घेतली होती.

लहानपणी मुंबानगरीच खूप आकर्षण वाटायचं.. मुंबईतल्या आमच्या बऱ्याच नातेवाईकांची लग्न , सामाजिक कार्यक्रम, बक्षिस समारंभ मुंबईत आयोजित केलेले असायचे.. तेव्हा नेहमीच मुंबईला जाणं व्हायचं.. ( ऋन्मेष, तुम्ही किर्ती कॉलेजला होतात ना, कॉलेजच्या अगदी बाजूच्या आमच्या समाज बांधवांचा हॉल आहे.. तिथे मी लग्नाला, कार्यक्रमाला यायचे.. तो हॉल तुम्हांला कदाचित माहित असेल.)

आठवीत होते तेव्हा एकदा मुंबईला लग्नाला गेले असताना दादर परिसरात मध्यवर्ती भागात राहणाऱ्या वडीलांच्या आत्येभावाकडे गेले होते.. त्यांचं घरं अगदी गावच्या घरासारखं होतं.. कौलारू , पडवीवर पत्रे असलेले.. पुढे मागे अंगण.. आंबा , टगर, केळी अशी झाडे असलेलं..मला खूप नवल वाटलं.. मुंबईत सुद्धा असं गावासारंख त्यांचं घर..?? आता ते घर जाऊन तिथे बिल्डींग झाली.. त्यांना वाटलं नसेल तेवढं वाईट मला वाटलं.. मुंबईत पूर्वीपासून स्थायिक असलेले आमचे बरेच नातेवाईक आता कुटूंब विस्तारल्याने तसेच जागेचे भाव गगनाला भिडल्याने मूळ मुंबईतून बोरीवली, दहिसर ते पार वसई - विरार पर्यंत फेकले गेलेत.

अजून एक आठवण .. . चौथीत होते तेव्हा मामेभावच्या लग्नाला गेले होते.. मामा सांताक्रूझला राहायचा.. त्याच्या गॅलरीतून विमानतळ दिसायचं.. विमानांचं त्यावेळी भारी आकर्षण.. वेळ होता तर वडिलांच्या मागे लागून विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर पाहायला आम्ही गेलो.. विमानांच्या आकर्षणाने वेड्यासारखे चालत निघालो.. रस्त्याने चालताना विमानतळाच्या बाजूने झोपडपट्टी आम्हांला लागली... तिथून एक नाला होता.. मला वाटते कदाचित ती मिठी नदी असावी.. त्या पाण्यात कुणी आंघोळ करत होतं, कुणी कपडे धुतं होतं तर कुणी दात घासत होतं तर कुणी बाजूला प्रातं:विधी उरकायला बसलेलं.. आजूबाजूला भयंकर बकालपणा होता.. मला त्या वातावरणात गुदमरून गेल्यासारंख झालं.. मी रडायला लागले.. मला नाही पाहायची विमानं.. चला इथून .. मी बाबांना म्हणाले. शेवटी बाबांनी टॅक्सी केली आणि परत मामाकडे आलो.. बिल्डींगच्या गच्चीवर नळ होता.. तिथे कित्ती तरी वेळा हातपाय खसखसून धुतले आणि बऱ्याचदा चूळ भरल्या.. पण ते पाहिलेले दृश्य आजपर्यंत मनातून नाहीसं झालं नाही. लहानपणी पाहिलेलं मुंबईचं एक वास्तववादी चित्र.. लक्षात राहिलेली मुंबईची दुसरी काळी बाजू.. !

असो, नाण्याला दोन बाजू असतातच..!

दक्षिण मुंबईत फिरताना खरंच खूप छान वाटते. तीन वर्ष चर्नी रोडला ऑफीस होतं माझं. लॉकडाऊन नंतर आता राहते त्या परीसरात शिफ्ट केलं..

ब्रिटीशांनी खूप विचारपूर्वक मुंबई शहर वसवलंय असं जाणवते.. मुंबईला स्वप्ननगरी उगाच म्हणत नाहीत.

कथा- कादंबऱ्या, चित्रपट, पुस्तकांतून भेटलेल्या
पुण्याबद्दल सुद्धा मला सुप्त आकर्षण वाटते .. उभ्या आयुष्यात फक्त एकदाच पुण्यात उभ्या - उभ्या आलो होतो.. मला एकदा पुणे फिरायचं आहे पण कधी जमेल काय माहित..? जवळचे कुणी नातेवाईक पुण्यात नाहीत.. नवऱ्याचे ठाण्या- मुंबईचा बराचसा मित्र - परिवार नोकरी निमित्ताने पुण्यात स्थिरावलायं.

प्रतिसाद थोडा अवांतर झालायं पण लिहिल्या शिवाय करमेना म्हणून खरडालायं..!

Pages