द्वेष : एक भय गूढकथा
भाग ३
प्रियाने राजाभाऊंचं तिथलं अस्तित्व विसरून जात, आवेगाने पुढे सरसावून श्रीला मिठी मारली. याक्षणी तिला भावनिक आधाराची गरज होती. तो हळूवारपणे तिच्या पाठीवर थोपटू लागला. राजाभाऊही शांतचित्ताने खाली मान करून उभे होते. श्रीच्या प्रेमळ, हळूवार स्पर्शाने प्रिया लगेच शांत झाली. तिची भीती, बावरलेपणा जरासा कमी झाला.
" आय अॅम सॉरी... मी..." जराशी मागे सरत, राजाभाऊंकडे पाहून प्रिया जरा संकोचाने म्हणाली. त्यावर श्री व भाऊ एकमेकांकडे पाहत किंचित हसले.
" कम ऑन प्रिया. तुला माहित आहे, त्याची काही गरज नाही. तू बस इथे." कोपऱ्यात ली एक खुर्ची पुढे ओढून घेत श्री म्हणाला.
प्रिया खुर्चीत बसली. ती काही बोलण्यासाठी तोंड उघडणार तोच तिला अडवत तो म्हणाला -
" थांब. आता सोनाली कॉफी घेऊन येतील. ती घेतल्यावर आपण बोलू. आणि, बी रिलॅक्स. "
प्रिया मग शांत बसली. दोनच मिनिटांनी सोनाली कॉफी घेऊन आल्या. एवढ्या रात्री झोपेतून जागं व्हावं लागूनही, तिच्या चेहऱ्यावर मुळीच त्रासिकपणा किंवा आळसावलेपणाची खूणही दिसत नव्हती. किंचित सावळ्या वर्णाची असली तरी ती नाकी डोळी अत्यंत नीटस होती. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर निराळाच तजेला असे. मध्यम वयाकडे झुकली असूनही आपला फॉर्म चांगला राखून ठेवल्याने ती अजूनही खूप यंग दिसायची. श्रीची ती कोण हे प्रियालाही माहीत नव्हतं. ती श्री सोबतच राहायची. श्री तिचा खूप आदर करायचा. तिचा शब्द प्रमाण मानायचा. तसाच प्रियालाही तिच्या बद्दल खूप आदर, आपुलकी वाटे.
तिने ट्रेमधून चार कप आणले होते. प्रिया शेजारीच बसून तिनं तिच्या हातावर हात ठेवला. तिच्या ओठावर स्मितहास्य होतं. प्रियाने ही तिला हसून प्रतिसाद दिला. तिच्या येण्याने प्रियाला अजूनच बरं वाटलं. तिघेही प्रियाच्या आजूबाजूला कोंडाळे करून बसले होते ; पण त्यात विशेष आश्चर्य नव्हतं. राजाभाऊ कधी कधी श्रीच्या घरी असे थांबायचे. त्यांचं काही काही चालत असे. आणि एवढ्या रात्री तिला आल्याचं पाहून सोनालीने काहीतरी झालं असल्याचा अंदाज केला असेल.
•••••••
कॉफी संपवल्यावर प्रियाने घरी तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार कथन केला. ते ऐकून श्री व राजाभाऊंनी एकमेकांकडे कटाक्ष टाकला. सोनालीच्या चेहऱ्यावर तिच्या बद्दल काळजी स्पष्ट दिसत होती. काही वेळ कुणीच काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
" तुम्हाला विश्वास नाही बसत आहे ना या सगळ्यावर. " प्रिया म्हणाली.
" खरंतर विश्वास बसण्यासारखं नाहीच आहे ; पण तू सांगत आहेस, म्हणजे ते नक्की खरंच असणार." श्री म्हणाला.
" मला कळत नाहीये की माझे पपा मलाच मारायचा प्रयत्न का करत आहेत ? आमचं नातं किती घट्ट होतं हे तुला चांगलच ठाउक आहे. त्यांचं माझ्यावर किती प्रेम होतं. खरं आणि निर्मळ. आणि माझंही त्यांच्यावर अगदी जिवापाड प्रेम होतं. रादर आताही आहे आणि कायम राहील. आमच्यात काहीवेळा थोडे मतभेद व्हायचे. निरागस रूसवे फुगवे व्हायचे ; पण ते एका सुदृढ नात्याचं लक्षण होतं. मात्र संकोच, राग, गैरसमज या गोष्टींना आमच्या मध्ये थारा नव्हता. मग तरी पपा असे का वागत आहेत ? "
" याचंच उत्तर शोधावं लागेल." श्री शांतपणे म्हणाला. तो गंभीर, विचारमग्न झाला होता. क्षणभरात मनाशी काहीतरी निर्णय घेऊन तो म्हणाला -
" बरं. प्रिया तू आता आराम कर. सोनाली ताई तिला तुझ्या खोलीत घेऊन जा."
" अरे पण..." प्रिया.
" हे बघ प्रिया. तुझी मनस्थिती मी समजू शकतो ; पण तू चिंता करू नकोस. कसं ते मी आता सांगू शकत नाही, पण सगळं काही ठीक होईल. आय प्रॉमिस. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा."
" हो. " एका क्षणाचाही विलंब न करता प्रियाने चटकन उत्तर दिलं.
" गुड. " श्री हसून म्हणाला. " जा मग आता. आराम कर.
सोनाली प्रियाला आपल्यासोबत घेऊन गेली. त्या गेलेल्या दिशेने पाहत तो उभा राहिला.
" श्री." उठता उठता राजाभाऊ म्हणाले " काय ठरवलंत."
त्यावर हसून श्री म्हणाला -
" तुमच्या पासून काही लपून राहत नाही बुवा. मी काहीतरी Decision घेतला सुद्धा हेही तुम्हाला ताबडतोब कळालं. माझ्या सोबत राहून हुशार झाला आहात तुम्हीपण."
" हो, खरंय ते ; पण काय decision घेतलात ? " अशावेळी काहीतरी विनोद करून आपल्या निर्णयाबद्दल किंवा विचाराबद्दल समोरच्याची उत्सुकता ताणून धरण्याची श्रीची ट्रिक त्यांना चांगली ठाऊक होती.
श्री पुन्हा जरासा गंभीर होऊन म्हणाला -
" अजून काय ? एकदा प्रियाच्या घरी जाऊन पाहावं लागेल."
" मी येऊ का सोबत ? "
श्रीने त्यांच्याकडे पाहिलं. तो म्हणाला -
" नाही. नको. तिथे नक्की काय प्रकार आहे, हे आपल्याला अजून ठाऊक नाही. त्याच्या क्षमतेचा अंदाज नाही. अशावेळी तुमचं तिथे जाणं सेफ नाहीये. मला माहित आहे माझ्यासाठी, माझ्यासोबत कुठेही यायची तुमची तयारी आहे ; पण मी तुमचा जीव धोक्यात घालू शकत नाही. आणि तसंही आता फक्त पाहणी करण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे तशी काही मदत लागणार नाही. चला."
दरवाजापर्यंत राजाभाऊ त्याच्या सोबत गेले. तो पुढे जाऊ लागताच ते म्हणाले -
" श्री... तुम्हाला सांगायची गरज नाही ; पण सावध रहा."
" हो." श्री हसून उत्तरला, आणि त्याने बाहेर पाऊल टाकलं.
•••••••
सोनाली शेजारी बेडवर पहुडलेली प्रिया अजूनही टक्क जागी होती. तिच्या पाणावलेल्या टपोऱ्या डोळ्यासमोरून भूतकाळातील आठवणी झरझर सरकून जात होत्या.
लहानपणीच आई वारल्यानंतर, तिच्या पपांनी एकट्यानेच तिचा सांभाळ केला. त्यांच्यात खूप मोकळेपणा होता. छान अंडरस्टॅंडिंग होतं. प्रियासाठी तिचे पपा तिचे सर्वस्व होते. त्यांचं गाव पुण्याशेजारचं. पुणे शहरातल्या एका कंपनीत ती तेव्हा काम करायची. त्यांचं आयुष्य खूप छान सुरू होतं ; पण उतरत चाललेल्या वयात तिच्या वडिलांना काहीतरी दुर्धर आजार झाला, आणि त्यातच त्यांचं दुःखद निधन झालं. वडील गेल्यानंतर सुन्या सुन्या झालेल्या या घरात तिला राहवेना. म्हणून ती मुंबईत राहणाऱ्या आपल्या एका मैत्रिणीकडे निघून गेली. काही काळ उलटून गेल्यानंतर दु:खातून मन जरा सावरल्यावर मग ती पुन्हा आपल्या घरी परतली होती. आणि...
" प्रिया." अचानक आलेल्या आवाजाने ती जराशी दचकली. सोनाली तिच्या जवळ येऊन तिला हाक मारत होती. ती विचारात असतानाच सोनालीची झोप जरा चाळवली गेली होती आणि तिचं लक्ष जाग्या असलेल्या प्रिया कडे गेलं होतं. " काय गं तू अजून जागीच ? आणि हे काय ? तू रडतीयेस ? हे बघ अशी खचून, घाबरून जाऊ नकोस. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत ? ".
प्रियाने हलकेच होकारार्थी मान हलवली.
" मग आता निश्चिंत राहा. आणि निवांत झोप. सगळं काही ठीक होईल." तिचे डोळे पुसत सोनाली म्हणाली. आणि हळूवारपणे तिच्या कपाळावर थोपटू लागली. त्यांच्या मायाळू, उबदार स्पर्शाने तिला खूप बरं वाटलं. केव्हा तिचे डोळे मिटायला लागले, आणि तिला गाढ झोप लागून गेली ते तिलाच समजलं नाही.
•••••••
श्री प्रियाच्या घराच्या बंद दरवाजासमोर उभा होता. एक दीर्घ निःश्वास सोडून त्याने दरवाजा उघडला. दार उघडले जाताच आतून थंडगार हवेचा झोत त्याला स्पर्शून गेला. तो शांतपणे आत गेला. मात्र आत पाऊल टाकताच त्याला काहीतरी जाणवलं. त्याचं बलदंड शरीर किंचित थरथरलं. त्याने डोळे मिटले. दाट भुवया किंचित आक्रसल्या गेल्या. मग त्याने डोळे उघडले. खिशातून त्याने पेन टॉर्च काढून त्याचा झोत जमिनीवर टाकला. खालच्या फरशीवर अनेक छोट्या मोठ्या वस्तू विखरून पडल्या होत्या. त्या बाजूला करत तो पुढे जाऊ लागला. त्याला मघाशी झालेली जाणिव गेली नव्हती, उलट त्याच्या पुढे चाललेल्या पावलागणिक ती अधिक तीव्र होत होती ; पण आता त्याने ' तयारी ' केली होती. तिचाच माग काढत तो पुढे जात होता. प्रियाच्या खोलीपाशी जरा थांबून त्याने खोलीत नजर टाकली. आणि लगेच तो पुढे जिन्याकडे निघाला. जिना चढून गेल्यावर समोरच दिसणाऱ्या खोलीचं दार नुसतं लोटलेलं होतं. तो हळूहळू चालत खोलीजवळ गेला. ती जाणिव आता अधिकच तीव्र झाली होती.
" इथे..? पण इथे असं काय आहे ? " तो स्वतःशी विचार करू लागला. " शरद काकांच - प्रियाचे वडील - काही रहस्य...? "
त्याने हलकासा धक्का देऊन दरवाजा उघडला. क्षणभर तो बिलकूल कसलीही हालचाल न करता एकटक आतल्या गडद, काळ्याशार अंधारात पाहू लागला. त्याने सावकाश नकारार्थी मान हलवली.
मग त्याने टॉर्चचा झोत आत टाकला. खोलीचा तिथून दिसेल तेवढा भाग तो निरखत होता. पाहता पाहता, त्याने स्वतःशीच मान हलवली. या अडगळीच्या खोलीत त्यांच्या मनातल्या शंकांचं काही प्रमाणात निरसन होईल, अशी त्याला कल्पना नव्हती. त्याच्या हातातील पेन टॉर्चचा प्रकाश सरकत सरकत एका वस्तूवर पडला. आणि अगदी क्षणाचा अवकाश झाला असेल नसेल तोच आपोआप ती वस्तू त्याच्या दिशेने. मात्र तो चांगला सावध होता. त्याने पटकन हात उचलून अत्यंत सहजतेने ती वस्तू हाताच्या पंजात पकडली. हात खाली घेताना त्याच्या ओठांच्या कडा हास्यात वर उचललेल्या.
" हे पहा, माझ्यासमोर अशा गोष्टी चालणार नाहीत. " समोरच्या खोलीवर नजर रोखून तो हळू पण धारदार आवाजात म्हणाला. चार पाच सेकंदच त्या शांत, अंधाऱ्या खोलीकडे पाहून त्याने दरवाजा पुन्हा बंद केला. आणि तो मागे वळून चालू लागला.
•••••••
श्री काही उलगडा झाला का ? श्री घरी परतताच खोलीत येऊन राजाभाऊंनी अधीरतेने विचारलं.
" हं. काही शंका फिटल्या सारख्या वाटतायत ; पण पुढे अजूनच नवीन शंका, प्रश्न निर्माण झाले आहेत."
" म्हणजे ? " त्याच्या शब्दांचा अर्थ न उमजून भाऊंनी विचारलं.
श्रीने त्यांच्याकडे पाहिलं. क्षणभर थांबून त्याने सांगायला सुरुवात केली.
ते ऐकता ऐकता राजाभाऊंच्या चेहऱ्यावर आश्चर्य, नवल अन काहीशी भीती असे संमिश्र भाव उमटत होते.
क्रमशः
© प्रथमेश काटे
छान झालाय हाही भाग पु भा प्र
छान झालाय हाही भाग
पु भा प्र