द्राक्ष - द्राक्षाचा रस - वारुणी

Submitted by छन्दिफन्दि on 28 January, 2024 - 02:17

“दारू म्हणजे रे काय भाऊ? “ हा प्रश्न पडला नव्हता पण “ ते एक मादक द्रव्य असते आणि ते घेतल्यावर माणूस वेड्यासारखा बोलायला लागतो, नव्हे झिंग झिंग झिगाट ही करतो” ही माहिती मात्र मिळाली होती.
म्हणजे असा गैरसमज नसावा की घरी काही समस्या होती की काय. घरीच काय अख्ख्या बिल्डिंग मध्ये “दारू बिरू.. ?” छे छे. नावचं नाही, तर दारूचा ‘ द’ जरी कढला तरी चमकले असते.
आणि कोणतीही दूरसंचार साधने नसतानाही काही क्षणात कुजबुजत ती कर्णोपकर्णी झाली असती. आताचं what's app आणि FB पण मागे पडेल.
अशा बाळबोध वातावरणात वाढताना हे झिंगाट कळायचे कारण म्हणजे ..
आमच्या शेजारच्या एका बिल्डिंग मध्ये होळी असायची. अगदी साग्रसंगीत, रांगोळी, पताका, पूजा, होळीला पुरणपोळी, नारळ अर्पण करणे, झालच तर होळी नंतरच्या बोंबा ठोकणे सगळं अगदी पद्धतशीर चाले. मग सुरू होई मस्त नॉनस्टॉप कोळीगीताचा धमाका, आम्ही मंडळींनी पण त्या गाण्यावर ठेका धरत रंगात आलो.. की अचानक.. त्या रंगाचा बेरंग करायला ते येत.. यजमानांचें तळीराम झालेले नातेवाईक . धड नीट पाऊल पण टाकता येत नसे तरी झोकांड्या देत नाचायचा त्यांचा तो प्रयत्न, तारटवलेले डोळे.. त्यांना तस बघूनच चांगलीच तंतरायची आमची. मग आमचा होलिकोत्सव तिकडेच संपायचा. आम्ही घरी धूम ठोकायचो.
तेव्हापासूनच दारू - दारुड्याविषयी आकस बसला असावा.
वरण भात - साजूक तूप अशा वातावरणात वाढताना कधी काही जाणवलं नाही.

मग पुढे कॉलेजात क्वचित कधी हा दारू पितो, फुंकत असतो वगैरे माहिती मिळताच आपोआप त्यांना दूरच ठेवले जाई.
सगळ्यात गंमत झाली शेवटच्या वर्षाला. ५० मुलांच्या वर्गात फक्त ९ मुली. वर्गाची सहल काढायची टुम काढल्यावर आम्ही आधीच बजावलं त्या पिद्दड गँगला कळाता पण कामा नये ट्रीप विषयी नाहीतर आम्ही काही येणार नाही. खर तर सिनेमा मधील कॉलेज पार्ट्या ट्रीप मध्ये drinking असतच अगदी तेव्हा २०-२५ वर्षांपूर्वी सुद्धा हिरो सोडून बाकी सर्व त्यात सामील असायचे..
इतक्या वर्षांनी कधी तो फोटो समोर आला ट्रीपचा( अर्थात आमच्या सारख्या clean / गुणी मुलांचा ) की नकळत हसू आल्याशिवाय राहत नाही.
मग हळू हळू नोकरी निमित्ताने अजून मोठ्या जगात प्रवेश केला. तेव्हा सोशलायझिंग साठी casual ड्रिंक्स घेणे म्हणजे दारुड्या नव्हे. दोन पेग घेतल्यावर लगेच माणसं डोलायला नाही लागत असाही एक साक्षात्कार झाला.
“अगर नशा दारू मे होता तो बोटल नही नाचती…?” अशा विनोदावरती हशात सामील होणेही सहज झाले
मदिरा मदिराक्षी ह्यांची कधी एखाद्या शायरीत केलेली नजाकत, मन्ना डे च्या आवाजातील मधुशाला अस काही अनुभवताना कधी जुने जाऊ द्या मरणा लागुनी अस वाटून देई..

अमेरिकेत आल्यावर पहिल्यांदाच एका भावाकडे गेल्यावर त्याने सहजच विचारले, “बिअर, किंवा काही ड्रिंक घेता का?”
मी उडाले, म्हटलं, “अरे, तुमच्या कडे येणाऱ्या पाहुण्यांना तुझी आजी - आई चहा विचारायच्या अगदी त्याच सहजतेने तू मला विचारलंस. मला हे जरा नवीन आहे. “ तो फक्त हसला.
नंतर लवकरच जवळच्याच नातेवाईकांचे - वडील आणि मुलगी - संभाषण काना वर पडले “ संध्याकाळी ड्रिंक्स घ्यावे की कसे? कुठले? इ. इ “
घरगुती संभाषणात चहा बरोबर भाजी किंवा बटाटेवडे ही चर्चां अपेक्षित असताना चिकन लॉलीपॉप बरोबर वाइन/बिअर किंवा आणि काय जाईल ही चर्च मला बुचकळ्यात टाकणारी होती येवढे खरे. वाटत राहील जग कुठेतरी पुढे निघून जातय आणि आपला पाय कुठेतरी मागेच अडकलाय..

मग पुढच्या सात आठ वर्षात तिचं या पाश्चिमात्य जगातील सांस्कृतिक महत्त्व, रोजच्या जीवनात केला गेलेला वापर, व्याप्ती, खाद्य संस्कृतीमध्ये असणार तिचं अविभाज्य स्थान ह्या सगळ्याची कल्पना आली.
Old is Gold बहुदा दारू जितकी जुनी तितकी अमूल्य ह्यावरून घेतलं असावं इतकी शंका/ अंदाज येण्या इतपत तिचं असणं माझ्यासाठी नॉर्मलसी ला आल.

३ वर्षांपूर्वी ची गोष्ट, नुकतच जग covid मधून बाहेर येत होत. outdoor समारंभ सुरु झालेले. त्यामुळे मुलांचा ब्लॅकबेल्ट समारंभही संध्याकाळी (औटडोअरला) होता.
४-६ वर्ष मेहनत करून, २-३ दिवसांची कठोर परीक्षा देऊन मुलं इथवर पोहचतात त्यांच्या या प्रवासाची दाद म्हणून हा सोहळा!
पण जसजसा समारंभ पुढे सरकू लागला, जाणवलं की आजूबाजूचे काही पालक, पाहुणे जरा जास्तच जोरात टाळ्या वाजवतायत, पण हे काहीतरी वेगळं वाटतंय .. हर्षवायू , हर्षोन्माद .. टाळ्या वाजत असतानाच डोकं विचार करायला लागलं … ओह ह्या तर खुर्च्यांखाली ठेवलेल्या बाटल्या बोलतायत. मंडळी पूर्ण तयारीनिशी आलेली… त्याचाच परिणाम म्हणून चेकाळलेले ते पालक .. एकाच तर बोलण पण तंतरायला लागलेलं.
त्यांचं ते रूप बघून मला लहानपणीच्या होळीतल्या तळीरामांचीच आठवण झाली. आणि एक वर्तुळ पूर्ण झालं.

दारू म्हणजे दारू असते
अल्कोहोल रक्तात गेल्यावर
जगाच्या पाठीवर कुठेही
तिचं काम ती चोख बजावते..

एका ग्रुपवर द्राक्ष- द्राक्षाचा रस हा धागा पकडून तीन वर्षांपूर्वी कधीतरी डोक्यात पूर्ण झालेलं वर्तुळ लिहून काढलं.

“हा काय लिहायचा विषय आहे? त्याची मजा घ्यायची.. कोणी वाचणार नाही हा तुझा लेख, आणि आवडणार पण नाही कोणाला.. “असा घराचा अहेर तर मिळालाच आहे.

दर वेळा लोकांनी वाचावे आणि त्यांना आवडावे ही अपेक्षा तरी कशाला?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धूम्रपान गटग >> Lol Lol

पाश्चात्य जगात सोशल ड्रिंकिंग हे सामान्य असले तरी काही कंपल्सरी नाही. >> एकंदरीतच 'आग्रह करणे' निषिद्ध असल्यामुळे ज्याला जे खायचं आणि प्यायचं आहे, त्याचा आदर तोंडावर तरी राखला जात असावा.

धूम्रपान गटग > ते cigar loungeअसतात ना . माझ्या मुलाचा एक मित्र सिगार शौकीन आहे त्यामुळे कळले.
माझ्या आवडत्या ग्रीक रेस्टॉरंटच्या शेजारी हुक्काबार आहे तिथे बरेच जण घोळक्याने जातात.

>>त्याचा आदर तोंडावर तरी राखला जात असावा>> मुळात ड्रींक्स घेणे म्हणजे काही 'विशेष' करत आहोत असे त्यांच्या मनात नसते त्यामुळे 'घेत नाही' यालाही तसेच घेतले जाते. आपण आपले 'न घेणे' मिरवले नाही तर ते सहजतेने घेतात. फक्त ग्रुपने कुठे जाणार तर तुम्ही डेझिग्नेटेड ड्रायवर असता आणि लिमिटेड बार वाली पार्टी असल्यास तुमच्या वाटच्या कुपन्सवर फ्रेंड्स आधीपासून क्लेम लावतात. Happy

धूम्रपान गटग आम्ही तरी केलेत एकेकाळी. Proud
हॉस्टेलला धूम्रपान सुरू करणारे सुट्टीत गावी आले की दोन चार दिवसात भेटायला हवे, भेटले तरी परत भेटायला हवे करत मुद्द्यावर येऊन मग धूम्रपान गटग ठरत असे.
शहरात सोपे असते, गावात नीट प्रयोजन करावे लागे.

मद्याबद्दल पाश्चात्य विरुद्ध भारतीय अशी तुलना उगाच केली जाते असे मला वाटते.

Glorification of alcohol.
किंवा फक्त alcohol यावर एक सर्च करून बघा पाहु.

प्रत्येकाला google search मध्ये वेगळे रिझल्ट मिळतात.
परंतु मला प्रश्नाचा रोख नाह कळला..

द्राक्ष काजू संत्रे मोसंबी फळांचा रस घेण्यात कोणाला मजा वाटेल तर कोणाला त्याची दारू करून पिण्यात आनंद असेल. दोन्ही मध्ये व्यक्ती/कर्म स्वातंत्र्य हा फक्त एकच मुद्दा ध्यानात ठेवला की पुरे !!

जेवढं दारू आणि धुम्रवलयांबद्दल तिटकारा त्याहून काकणभर जास्त ते तंबाखू आणि गुटखावाल्या पीचकाऱ्यांचा मारा करणाऱ्यांबाबत आहे. तरी वरचा मुद्दा महत्वाचा असल्याने मौन बरे.

अल्कोहोल सेवनामुळे होणारे मृत्यू (लॉंग अब्युज करणाऱ्या व्यक्तींचे हेल्थ इश्युजमुळे, इन्फ्लुएन्स मध्ये असताना ड्रायव्हिंग, मारामारी सगळे धरून), अल्कोहोल सेवनाचे व अशा मृत्यूचे वाढते प्रमाण ही पश्चात देशात सुद्धा चिंतेची बाब आहे आणि alcohol glorification हे अल्कोहोल सेवनाच्या वाढत्या प्रमाणाच्या कारणांपैकी एक मुख्य कारण आहे याची तिथेही केव्हापासून दखल घेतली जात आहे.
देशानुसार वेगळे गुगल सर्च येतील पूर्ण कल्पना आहे आणि म्हणुनच सर्च करून बघा असे सांगितले.

हा DuckDuckGo सर्च रिझल्ट (इथुन गुगल सर्च केल्यास जिओआयपी मुळे भारत स्पेसिफिक रिझलट्स येतील म्हणुन DuckDUckGo वापरले.

Screenshot_2024-03-04-07-25-00-57_e4424258c8b8649f6e67d283a50a2cbc_0.jpg
.
Screenshot_2024-03-04-07-25-28-59_e4424258c8b8649f6e67d283a50a2cbc.jpg

थोडक्यात ही भारत किंवा तत्सम आशियाई देशांची समस्या नसून पाश्चात्य देशांचीही आहे.

पिण्या बाबतीत कल्चरल डिफरन्सेस, कल्चरल शॉक्स(सिंगल माल्ट कोक मध्ये!) , पेट पिव्ह्ज इत्यादि ठीकच आहे.

पण भारतीय लोकांना कसे प्यावे माहीतच नाही, नीट (इथे नीट शब्दावरील कोटी ठोकळेबाज होईल मिलॉर्ड) प्यायला शिकले की झालं, पाश्चिमात्य जगात सगळं व्यवस्थित असतं असेही नाहीये.
दारूचे उदात्तीकरण ही जागतिक समस्या आहे, ते टाळलेले बरे.

कळलं..
पाश्चात्य देशातही अल्कोहोलिस्म आणि निर्व्यसन केंद्र हे पण बघितलं आहे.. अर्थात जास्त करून सीरिअल्स आणि movies मध्ये

***

एक गोष्ट..
एक पुस्तक वाचत्ये ब्रिटिश लेखकच, एक अमेरिकन माणूस १९२० -३० दरम्यानच्या काळात काही वर्षांसाठी आशियात / भारतात जातो.
तिथून तो युरोपात त्याच्या सनेह्याना भेटतो.. त्यांच्या पद्धती नुसार ते त्याच्यासाठी ड्रिंक्स विचारतात... तो नाही म्हणतो मग आग्रह..
तो म्हणतो, मला आशियात इतकं (safe) सुरक्षित/ स्वच्छ पणी प्यायला मिळालं.. त्यामुळे मी आता दारू पित नाही. मला पाणीच द्या..

ते वाचताना स्वाती नी दिलेली लिंक आठवली.. कारण त्या दोन्हींचा बरोबर ताळ मेळ बसतोय ... अर्थात मी वर्ष साल यांचा ताळमेळ घातला नाहीये अजून.

Pages