द्राक्ष - द्राक्षाचा रस - वारुणी

Submitted by छन्दिफन्दि on 28 January, 2024 - 02:17

“दारू म्हणजे रे काय भाऊ? “ हा प्रश्न पडला नव्हता पण “ ते एक मादक द्रव्य असते आणि ते घेतल्यावर माणूस वेड्यासारखा बोलायला लागतो, नव्हे झिंग झिंग झिगाट ही करतो” ही माहिती मात्र मिळाली होती.
म्हणजे असा गैरसमज नसावा की घरी काही समस्या होती की काय. घरीच काय अख्ख्या बिल्डिंग मध्ये “दारू बिरू.. ?” छे छे. नावचं नाही, तर दारूचा ‘ द’ जरी कढला तरी चमकले असते.
आणि कोणतीही दूरसंचार साधने नसतानाही काही क्षणात कुजबुजत ती कर्णोपकर्णी झाली असती. आताचं what's app आणि FB पण मागे पडेल.
अशा बाळबोध वातावरणात वाढताना हे झिंगाट कळायचे कारण म्हणजे ..
आमच्या शेजारच्या एका बिल्डिंग मध्ये होळी असायची. अगदी साग्रसंगीत, रांगोळी, पताका, पूजा, होळीला पुरणपोळी, नारळ अर्पण करणे, झालच तर होळी नंतरच्या बोंबा ठोकणे सगळं अगदी पद्धतशीर चाले. मग सुरू होई मस्त नॉनस्टॉप कोळीगीताचा धमाका, आम्ही मंडळींनी पण त्या गाण्यावर ठेका धरत रंगात आलो.. की अचानक.. त्या रंगाचा बेरंग करायला ते येत.. यजमानांचें तळीराम झालेले नातेवाईक . धड नीट पाऊल पण टाकता येत नसे तरी झोकांड्या देत नाचायचा त्यांचा तो प्रयत्न, तारटवलेले डोळे.. त्यांना तस बघूनच चांगलीच तंतरायची आमची. मग आमचा होलिकोत्सव तिकडेच संपायचा. आम्ही घरी धूम ठोकायचो.
तेव्हापासूनच दारू - दारुड्याविषयी आकस बसला असावा.
वरण भात - साजूक तूप अशा वातावरणात वाढताना कधी काही जाणवलं नाही.

मग पुढे कॉलेजात क्वचित कधी हा दारू पितो, फुंकत असतो वगैरे माहिती मिळताच आपोआप त्यांना दूरच ठेवले जाई.
सगळ्यात गंमत झाली शेवटच्या वर्षाला. ५० मुलांच्या वर्गात फक्त ९ मुली. वर्गाची सहल काढायची टुम काढल्यावर आम्ही आधीच बजावलं त्या पिद्दड गँगला कळाता पण कामा नये ट्रीप विषयी नाहीतर आम्ही काही येणार नाही. खर तर सिनेमा मधील कॉलेज पार्ट्या ट्रीप मध्ये drinking असतच अगदी तेव्हा २०-२५ वर्षांपूर्वी सुद्धा हिरो सोडून बाकी सर्व त्यात सामील असायचे..
इतक्या वर्षांनी कधी तो फोटो समोर आला ट्रीपचा( अर्थात आमच्या सारख्या clean / गुणी मुलांचा ) की नकळत हसू आल्याशिवाय राहत नाही.
मग हळू हळू नोकरी निमित्ताने अजून मोठ्या जगात प्रवेश केला. तेव्हा सोशलायझिंग साठी casual ड्रिंक्स घेणे म्हणजे दारुड्या नव्हे. दोन पेग घेतल्यावर लगेच माणसं डोलायला नाही लागत असाही एक साक्षात्कार झाला.
“अगर नशा दारू मे होता तो बोटल नही नाचती…?” अशा विनोदावरती हशात सामील होणेही सहज झाले
मदिरा मदिराक्षी ह्यांची कधी एखाद्या शायरीत केलेली नजाकत, मन्ना डे च्या आवाजातील मधुशाला अस काही अनुभवताना कधी जुने जाऊ द्या मरणा लागुनी अस वाटून देई..

अमेरिकेत आल्यावर पहिल्यांदाच एका भावाकडे गेल्यावर त्याने सहजच विचारले, “बिअर, किंवा काही ड्रिंक घेता का?”
मी उडाले, म्हटलं, “अरे, तुमच्या कडे येणाऱ्या पाहुण्यांना तुझी आजी - आई चहा विचारायच्या अगदी त्याच सहजतेने तू मला विचारलंस. मला हे जरा नवीन आहे. “ तो फक्त हसला.
नंतर लवकरच जवळच्याच नातेवाईकांचे - वडील आणि मुलगी - संभाषण काना वर पडले “ संध्याकाळी ड्रिंक्स घ्यावे की कसे? कुठले? इ. इ “
घरगुती संभाषणात चहा बरोबर भाजी किंवा बटाटेवडे ही चर्चां अपेक्षित असताना चिकन लॉलीपॉप बरोबर वाइन/बिअर किंवा आणि काय जाईल ही चर्च मला बुचकळ्यात टाकणारी होती येवढे खरे. वाटत राहील जग कुठेतरी पुढे निघून जातय आणि आपला पाय कुठेतरी मागेच अडकलाय..

मग पुढच्या सात आठ वर्षात तिचं या पाश्चिमात्य जगातील सांस्कृतिक महत्त्व, रोजच्या जीवनात केला गेलेला वापर, व्याप्ती, खाद्य संस्कृतीमध्ये असणार तिचं अविभाज्य स्थान ह्या सगळ्याची कल्पना आली.
Old is Gold बहुदा दारू जितकी जुनी तितकी अमूल्य ह्यावरून घेतलं असावं इतकी शंका/ अंदाज येण्या इतपत तिचं असणं माझ्यासाठी नॉर्मलसी ला आल.

३ वर्षांपूर्वी ची गोष्ट, नुकतच जग covid मधून बाहेर येत होत. outdoor समारंभ सुरु झालेले. त्यामुळे मुलांचा ब्लॅकबेल्ट समारंभही संध्याकाळी (औटडोअरला) होता.
४-६ वर्ष मेहनत करून, २-३ दिवसांची कठोर परीक्षा देऊन मुलं इथवर पोहचतात त्यांच्या या प्रवासाची दाद म्हणून हा सोहळा!
पण जसजसा समारंभ पुढे सरकू लागला, जाणवलं की आजूबाजूचे काही पालक, पाहुणे जरा जास्तच जोरात टाळ्या वाजवतायत, पण हे काहीतरी वेगळं वाटतंय .. हर्षवायू , हर्षोन्माद .. टाळ्या वाजत असतानाच डोकं विचार करायला लागलं … ओह ह्या तर खुर्च्यांखाली ठेवलेल्या बाटल्या बोलतायत. मंडळी पूर्ण तयारीनिशी आलेली… त्याचाच परिणाम म्हणून चेकाळलेले ते पालक .. एकाच तर बोलण पण तंतरायला लागलेलं.
त्यांचं ते रूप बघून मला लहानपणीच्या होळीतल्या तळीरामांचीच आठवण झाली. आणि एक वर्तुळ पूर्ण झालं.

दारू म्हणजे दारू असते
अल्कोहोल रक्तात गेल्यावर
जगाच्या पाठीवर कुठेही
तिचं काम ती चोख बजावते..

एका ग्रुपवर द्राक्ष- द्राक्षाचा रस हा धागा पकडून तीन वर्षांपूर्वी कधीतरी डोक्यात पूर्ण झालेलं वर्तुळ लिहून काढलं.

“हा काय लिहायचा विषय आहे? त्याची मजा घ्यायची.. कोणी वाचणार नाही हा तुझा लेख, आणि आवडणार पण नाही कोणाला.. “असा घराचा अहेर तर मिळालाच आहे.

दर वेळा लोकांनी वाचावे आणि त्यांना आवडावे ही अपेक्षा तरी कशाला?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>दर वेळा लोकांनी वाचावे आणि त्यांना आवडावे ही अपेक्षा तरी कशाला?>>>
हे पटलं, आणि लेखन आवडलेही!
कुठल्याच नशेचे समर्थन करणे योग्य नाही!
जैसा देस वैसा भेस! जाउ तिथल्या संस्कृतीचा आदर करावा असे माझे वैयक्तिक मत, मग ती आपल्याला पटो किंवा न पटो!

छान लेख!

दारू म्हणजे दारू असते
अल्कोहोल रक्तात गेल्यावर
जगाच्या पाठीवर कुठेही
तिचं काम ती चोख बजावते..
>>>>>
+786

दारू आपल्या मेंदूचा ताबा घेते.
माझ्यासाठी तरी हे एकच कारण पुरेसे आहे दारू न पिण्याचे..

काही वर्षांपू र्वी मी एका इन्डिअन कंपनीत (ऑनसाईट-ऑफशोअर मॉडेल) होते. ऑफिसच्या पार्टीत, एकाला चढली होती. शोभा करुन घेत होता.

लेखातील विचार एकदम पटले आणि रिलेट पण झाले.मला पिक्चर मधले तरल दारूचे, लाल वाईन वाले रोमँटिक डिनर सीन्स बघायला आवडतात.एक दोन वेळा वाईन प्यायली आहे.अर्थात अजूनही मजेची डेफिनेशन चहा कॉफी मसाला दुधातच आहे.कदाचित कॉलेजमध्ये प्यायली असती,त्याच्याशी काही आठवणी असत्या तर मिल बैठेंगे यार मध्ये मजेत अनेक वर्षं राहिलेही असते.

मला पिक्चर मधले तरल दारूचे, लाल वाईन वाले रोमँटिक डिनर सीन्स बघायला आवडतात. >>> मलाही... आणि कुठल्याही स्पोर्ट्स मॅचची फायनल जिंकल्यावर उघडली गेलेली फसफसणारी शॅम्पेन भयंकर थ्रिलिंग वाटायची एके काळी.

<<शोभा करुन घेत होता.>> थोडक्यात उडवायची दारू (क्रॅकर्स) आणि प्यायची दारू, दोन्ही कार्यक्रमात शोभा आणतात. Wink

<<वाटत राहील जग कुठेतरी पुढे निघून जातय आणि आपला पाय कुठेतरी मागेच अडकलाय>> या फोमोमुळे बरेच जण सुरवात करतात. समाजात याचे कळत/नकळत (वर उल्लेखलेले चित्रपटातील सीन्स हे त्यातील उदाहरण) उदात्तीकरण होत रहाते. पूर्वी धूम्रपान सुद्धा सोशल ऍक्टिव्हिटी समजले जायचे.

लेख वाचताना एकदम एकोणिसाव्या शतकातल्या रत्नाकर/वसुन्धरा मासिकातला लेख चुकून री-पब्लिश झाल्यासारखा का फील येतोय ??
(अर्थात आपल्या मतांचा आदर आहेच )

सामो, mi_anu, MazeMan, मानव पृथ्वीकर, राजा मनाचा प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद!

वेग वेगळी मते आणि अनुभव ऐकय्ला मिळाले.

<<वाटत राहील जग कुठेतरी पुढे निघून जातय आणि आपला पाय कुठेतरी मागेच अडकलाय>> या फोमोमुळे बरेच जण सुरवात करतात. >> हो किन्वा माणूस सेल्फ डाऊट मध्ये जातो.
समाजात याचे कळत/नकळत (वर उल्लेखलेले चित्रपटातील सीन्स हे त्यातील उदाहरण) उदात्तीकरण होत रहाते.
पूर्वी धूम्रपान सुद्धा सोशल ऍक्टिव्हिटी समजले जायचे.>>>> बहुतेक अमोल पालेकर च्या सिनेमा मध्ये असायच.

लेख वाचताना एकदम एकोणिसाव्या शतकातल्या रत्नाकर/वसुन्धरा मासिकातला लेख चुकून री-पब्लिश झाल्यासारखा का फील येतोय ??>>> आता ह्यावर काय बोलू?

एकोणिसाव्या शतकातल्या रत्नाकर/वसुन्धरा मासिकातला लेख>>> विसाव्या ??

“ बहुतेक अमोल पालेकर च्या सिनेमा मध्ये असायच” - रुपेरी पडद्यावर सिगरेट ओढणारा पहिला हीरो (अँटी-हीरो) म्हणजे अशोक कुमार. त्यानंतरच्या पिढीने (राज-दिलीप-देव) सुद्धा पडद्यावर धुम्रपान केलंय (‘मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गयाँ’). अमोल पालेकर सिनेमात हीरो असण्याच्या काळात अशोक कुमार तोंडात पाईप ठेवून ‘कर्नल ज्युलियस नगेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग‘ झाला होता.

“ एकोणिसाव्या शतकातल्या रत्नाकर/वसुन्धरा मासिकातला लेख चुकून री-पब्लिश झाल्यासारखा का फील येतोय ??” - Lol

वेल, धूम्रपान ही सोशल ऍक्टिव्हीटी हे आपल्याकडे फारसे नव्हते. युरोप, अमेरिकेत, त्यात विशेष करून इंग्लडमध्ये.

छान लिहिलयं!
पाश्चात्य संस्कृतीत अल्कोहोलचा वापर , त्याचा इतिहास याबद्दलच्या लेखाचा दुवा खाली देत आहे. लेख मोठा आहे पण रोचक आहे.
https://www.scientificamerican.com/article/the-conflicted-history-of-alc...

धन्यवाद स्वाती!
लेख रोचक आहे हे खर, पूर्ण नाही वाचला अजुन पण वाचेन.

दारु चे सेवन अनादी कालापासून चालू आहे. त्याची मोहिनी / परीणामही.

घ्यावी न घ्यावी प्रत्येकाचा वैयक्त्तिक प्रश्न आहे. मात्र घेणारे काही तीर मारतात / पुढारलेले असतात. आणि न घेणारे भित्रे / मागासलेले असतात असा एक समज / प्रचार झाला आहे/ किन्वा करुन देण्यात आला आहे . सेल्फ डाऊट (आत्मशन्का) तयार होऊ शकतात )
पण जे ग्लोरिफिकेशन केलं जात ते खर आभासी आहे. आणि वास्तव शास्त्रीय असल्यामुळे जुन्या काळी किंवा आता, कुठल्याही देशात तेच असणार आहे हे लवकरच (वेळेत ) कळले.

सदर व्यक्तीस मद्यपानाचा काही ही अनुभव नाही. असावा अशी काही सक्ती नाही. सांस्कृतिक जिलेबी गो ड आहे.

पाश्चात्य जगात सोशल ड्रिंकिंग हे सामान्य असले तरी काही कंपल्सरी नाही. तुम्ही teetotaler असल्याने काही बिघडत नाही. कुणी तुम्हाला मागासलेले समजत नाही किंवा घ्या म्हणून आग्रहही करत नाही. सोशल लाईफ तर अजिबातच सफर होत नाही. बारमधे नॉन अल्कोहोलिक ऑप्शन्स असतात , अगदी क्राफ्ट बीअर वाल्या ठिकाणीही असतात. त्याशिवाय आजकाल तर इथे ड्राय बारही निघालेत.

माझ्या सुरवातींच्या जॉब्स पैकी एकात, मी मर्चंट नेव्हीत नव्हतो पण, बंदराजवळील मोठ्या जहाजांवर, कोस्ट गार्ड, नेव्ही जहाजांवर आणि ऑफशोअर प्लॅटफॉर्म्सवर जावे लागे. तेव्हा मी सोशल ड्रिन्कर होतो. जमैकन रम, सिंगल माल्ट, फ्रेंच वाईन, जर्मन बिअर, रशीयन व्होडका, शँपेन, कॉनॅक वगैरेंची एकीकडे ओळख झाली आणि दुसरी कडे त्यांचे (जास्त घेणार्‍यांचे) प्रतापही बघायला मिळाले.

मुलांच्या ब्लॅकबेल्ट सेरेमोनीला अल्कोहोल होतं? हा त्यांच्या मार्शल आर्ट्स स्कूलचा अधिकृत सोहोळा होता का?
इथे न्यू जर्सीत असं वाटेल तिथे वाटेल तेव्हा अल्कोहोल कन्झम्प्शन अलाउड नसतं - विशेषतः जिथे मायनर मुलं असतील अशा ठिकाणी.
पार्क्समध्ये वगैरेही इव्हेन्ट प्लॅन करतांना आधी तशी परवानगी घ्यावी लागते.
तुमच्याकडे निराळे नियम आहेत का?

शिवाय अल्कोहोल/धूम्रपान यांचं सोशल सेवन 'आपल्याकडे' नव्हतं कधी? विड्या माहीत आहेत का?

हा त्यांच्या मार्शल आर्ट्स स्कूलचा अधिकृत सोहोळा होता का? हो

मुलांच्या ब्लॅकबेल्ट सेरेमोनीला अल्कोहोल होतं? नाही.
काही लोक/पालक स्वतः च घेऊन आले होते.. सेलिब्रेशन म्हणून

मुलांनी कष्टाने काही कमावलं तर ते सजत करायला मुलांना जे प्यायच नाही ते स्वतः ढोसत होते .. विचीत्रपणा

हा event एका पार्कींग लॉट मध्ये होता.... सगळं प्रायव्हेट /outdoor म्हणून त्यांनी केलं असावं तस ..

“हा त्यांच्या मार्शल आर्ट्स स्कूलचा अधिकृत सोहोळा होता का? हो” - हे खरंच आश्चर्यकारक आहे. सहसा मार्शल आर्ट्स वगैरे गोष्टींच्या सेरेमनीज बर्यापैकी ‘पारंपारिक एशियन‘ पद्धतीनं, त्या कलेचा आदर आणि सेरेमनीचं गांभीर्य राखून साजर्या होतात.

Mat / डोजो वर आणि कोचेस - students अगदी शिस्तप्रिय, आदर पूर्ण असतं सगळं...

काही पालक वेगळ्या विचाराचे असतात... किंवा त्यांची तशीच पद्धत असावी..
मोकळ्या जागेत असल्यामुळे त्यांना हवं ते त्यांनी केलं...

कारण काय आणि कस माहीत नाही पण झालं होत खर असं..

स्वाती, thank you for sharing the Link.

माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली.

स्वाती, धूम्रपान सोशल ऍक्टिव्हिटी म्हणजे सोशल इव्हेंट्स पार्टी, डिनर वगैरेत स्मोकिंग करणे हा एक शिष्टाचाराचा भाग मानणे या बद्दल मी वर लिहिले आहे.
त्यातून सोशल स्मोकर ही टर्म आली असावी. सोशल स्मोकर म्हणजे केवळ अशा प्रसंगी धूम्रपान करणारे. यात रेग्युलर स्मोकर न होता फक्त अशा प्रसंगीच स्मोकिंग करत राहण्याचे प्रमाण कमी असावे.
विड्या ओढणारे माझ्यामते कन्फर्म्ड आणि सिरीयस स्मोकर्स असतात.

>>> म्रपान सोशल ऍक्टिव्हिटी म्हणजे सोशल इव्हेंट्स पार्टी, डिनर वगैरेत स्मोकिंग करणे हा एक शिष्टाचाराचा भाग मानणे
ओके, आलं लक्षात. धन्यवाद. Happy

मला वाटले लोक धूम्रपान गटग वगैरे करतात की काय Happy

वाचला लेख. त्यातला दारू ही टोटल निषिद्ध असण्यापासून अगदी सहज घेतली जाण्यापर्यंतचा बदल आणि त्यातील कल्चरल शॉक रिलेट झाला. पण त्यातील पीअर प्रेशर, न घेणार्‍यांना तु.क. मिळणे वगैरे भारतातच पाहिले आहे. इथे कधीच नाही. किंबहुना अमेरिकेत जे दारू पितात त्यांनाच पार्ट्यांमधे इतरांबरोबर "कीप अप" करायचे पीअर प्रेशर जास्त असते असे पाहिले आहे. टेकिला शॉट्स, रेस्टॉ मधे विकत घेतलेल्या बाटल्या संपवण्याकरता नको असेल तरी ग्लासात ओतून प्यायला लावणे वगैरे.

मात्र लेखातील मजकुराचा आणि द्राक्षाचा काय संबंध समजले नाही. लेखात जे जे "दारू"चे उल्लेख आहेत त्याचा द्राक्षे व त्यातून बनणार्‍या वाईनशी काहीच संबंध नाही. ते दारूचे किस्से बीअर, व्हिस्की, व्हॉडका, टेकिला ई मधल्या अल्कोहोल संबंधी असतात.

Pages