आमचे धोत्रे गुरुजी (भाग ३)

Submitted by मिरिंडा on 9 November, 2023 - 04:50

आजकाल मी गुरुजींना मॉर्निंग वॉकला घेऊन जायला सुरुवात केली. ते बरोबर आले तरी फारसे बोलत नसंत. किंबहुना बोलतच नसंत, असं म्हंटलं तरी हरकत नाही. पण एकतर्फी संवाद झाला,तरी मी तो चालू ठेवीत असे. कधी कधी ते रडवेला चेहरा करीत.कधी किंचित हसत.पण खळाळून हसत नसंत. अजूनही त्यांना आणल्याचा पश्चात्ताप होत नव्हता. कदाचित तो दिशाला होत असावा. पण ती माझ्या भीतीने बोलत नसावी. आता गुरुजींना येऊन महिना होत आला. माझी मुलं सुद्धा त्यांना आजोबा म्हणून हाक मारीत असंत. ते माझ्याकडे अनोळखी माणसाकडे पाहावं तसं पाहात. पण बाहेर फिरुन आल्यावर त्यांचा चेहरा थोडा फुलल्यासारखा वाटे.या दिनचर्येमुळे आम्ही सगळेच त्यांच्या जवळ येऊ लागलो. मध्यंतरी मी डॉक्टरांना फोन करून नंतरची तारीख मागून घेतली ‌ . त्यांचं म्हणणं, तुम्हाला बरं वाटत असेल तर नंतर आलात तरी हरकत नाही,असं पडलं.दिवस बरे चालले होते. परंतू गुरुजींमधे म्हणावी तितकी सुधारणा होत नव्हती.आता नियमित नाही तरी रोज दोन्ही वेळा जेऊ लागले होते.मला अचानक सदाशिवची आठवण झाली. मी सहज म्हणून त्यांची बॅग तपासली.माणूस सहज केलं म्हणतो तरी त्याची कृती हेतुपुरस्सरच असते. असं मी माझ्या मनाचा मागोवा घेतला तेव्हा कळलं.थोडक्यात स्वतःला फसवायला मागेपुढे पाहत नाही,हेच खरं. बॅग शोधता शोधता त्यात लहान पॉकेट डायरी मिळाली. मी ती चाळू लागलो. त्यात खर्चाच्या नोंदींशिवाय काहीच सापडेना. मी निराश होऊन डायरी ठेवणार, तेव्हा डायरी मागच्या कव्हराच्या आतील बाजूस एक फोन नंबर पेन्सिलने लिहीलेला दिसला. "प्लस चिन्हांकित होता". तो नक्कीच दुसऱ्या देशाचा नंबर असणार. मी बाहेर येऊन तो पाहिला .मग लक्षात आलं,की हा अमेरिकेतला नंबर होता. नक्कीच तो सदाशिवचा असणार. परंतू पेन्सिलने लिहिल्याने शेवटचे दोन आकडे दिसत नव्हते. मी भिंग घेऊन पाहण्याचे ठरवले. माझ्या मोबाईल मधे काय सेव्ह करू मला कळेना , तरीही तो नंबर तसाच सेव्ह केला. याचा अर्थ गुरुजींकडे मोबाईल असावा . तेही विचारावं लागेल . म्हणजे सदाशिवशी संपर्क करणं सोपं होईल...माझं डोकं तापलं. मला सदाशिवचा चांगलाच राग आला.माझं मन सदाशिवच्या निर्दयपणाचा विचार करु लागलं. मग विचार केला, त्याला जाब विचारता आला तर बरं होईल. सगळेच जरतारी विचार. आणि मी त्याला कशाचा जाब विचारणार होतो ? वडलांना एकटं सोडलं त्याचा,की त्यांच्या आयुष्याच्या झालेल्या परवडीचा?. जो जो विचार करु लागलो तो तो मला तोच जबाबदार वाटू लागला. पण प्रथम गुरुजींकडून जास्त माहिती मिळायला हवी असं वाटलं.मी काहीतरी करून त्यांना बोलतं करायचं ठरवलं.त्यासाठी आजची रात्र फुकट घालवायची ठरवली. नाहीतरी आज शनिवार होता. डॉक्टरांकडेही जायचं नव्हतं. मी आज लवकरच जेऊन घेतलं. दिशाने तीनचार वेळा तरी एवढी घाई काय असं विचारलं. मी तिला खरं कारण सांगितलं नाही. गुरुजींच्या खोलीत शिरलो. ते थोडे रिलॅक्स होऊन बसलेले दिसले. त्यांनी माझ्या ओळखीचं हास्य केलं. कारण बऱ्याचदा ते ओळख नसल्या सारखे बघत. मी त्यांच्या पाठीवर हात ठेवून विचारले," कसं वाटतंय आता. रुळलात ना इथे." त्यावर ते गोडसं हासून म्हणाले," तू फार काळजी घेतोस बरं का. " आणि खाली मान घालून बसले. " आत्ता जर सदाशिवचा फोन आला तर बरं वाटेल नाही?" मी त्यांची प्रतिक्रिया पाहात होतो.
मी उगाचंच बोललो असं वाटलं. त्यांची चर्या लगेच बदलली. एक प्रकारचा अनोळखी भाव त्यांच्या तोंडावर दिसू लागला.त्यांचा श्वास जड झाल्यासारखा वाटला.मी त्यांच्या पाठीवर आश्वासक हात ठेवीत म्हंटलं," सोडून द्या गुरुजी. आपण उद्या बोलू. " असं म्हणून मी उठलो. तेव्हा माझा हात पकडून ते म्हणाले," मला काही होत नाही,पण त्यांची भीती वाटते रे. तो इथे आला आणि त्यानी दिलेले पैसे परत मागितले तर मी कुठून देणार ?" बोलता बोलता त्यांचा गळा भरून आला. तसेच स्फुंदत स्फुंदत म्हणाले," मी पाठवलेले पैसे तुमची परत देण्याची लायकी तरी आहे का? निगरगट्ट,कोडगे आहात. तुमचं सगळं वागणं खोटं आहे. ". आम्ही परोपरीने त्याला समजावून सांगितलं. माफी मागितली, चूक झाली म्हंटलं,पण त्याला दया आली नाही. ". धोतराच्या सोग्याने त्यांनी नाक डोळे पुसले. मग मी म्हटलं," असे किती पैसे दिले त्यानी? "..." तो दर महिन्याला पाठवायचा. मग तो बऱ्याच वेळा भांडायला आणि शिव्या द्यायला लागला. मग मात्र कधीतरी पैसे पाठवायचा.नंतर मात्र त्याने बंद केलं. आम्ही त्यांचे पैसेही साठवायचो, पण कधी पैसे न पाहिलेले आम्ही काही वेळा खर्चही करायचो.तरीसुद्धा रमणिकलालची काही रक्कम आम्ही फेडली. पण ती नगण्य होती. ती त्याने व्याजापोटी जमा केली. तुला तर माहीतच आहे महागाई केवढी आहे ती. चल, जाऊ दे, आता मी झोपतो. असं म्हणून ते आहे त्या कपड्यावरच झोपले.मी काढता पाय घेतला. त्यांना उत्तेजीत करण्यात काहीच अर्थ नव्हता. माझ्या जवळ विचार करण्या इतपत मटेरियल जमलं होतं.पुढचे दोनतीन दिवस ते माझी ओळख विसरले. पुन्हा त्यांना मार्गावर आणणं कठीण होतं.....असेच काही दिवस गेले. अजूनही मला फोनचे पुढचे आकडे समजत नव्हते. मी अंदाजाने फोन लावून पाहिले. पण काहीच उपयोग झाला नाही.मी पुन्हा डॉक्टरांना फोन लावला. ॲपॉईंटमेंट घेतली. सदाशिवला संपर्क करण्यासाठी काय करावं मला समजेना. मी अस्वस्थ झालो. ....मधेच बॉसने ऑफिसच्या कामासाठी लंडनला जायला सांगितले.तिथे पंधरा दिवसांसाठी जायचं असल्याने मी नकार दिला.त्यामुळे बॉस नाराज झाला. पण मी त्याला समजावून सांगितलं. मग मात्र तो" तुम्हारी मर्जी " असं म्हणून स्वस्थ बसला. पण गुरुजींकडे कोण पाहणार ? हा मोठाच प्रश्न होता. आणि माझा विश्वास दिशावरही याबाबतीत बेताचाच होता. गुरुजींबरोबर वेळ घालवणं मलाही नेहमीच जमत नसे. मग दिशा आणि मुलं त्यांना फिरवू लागली. पण त्यांची तक्रार एकच ते बोलत नाहीत. हळूहळू त्यांचा मॉर्निंग वॉक बंद झाला. वेळ असेल तेव्हा शनिवार रविवारी त्यांना घेऊन बाहेर जायचो. पण त्यामुळे ते आणखीनच कोशात शिरले. मी त्यांना तुम्हाला इतर कोणी म्हणजे, बहिण भाऊ असे नातेवाईक आहेत का विचारलं . पण त्यांनीं उत्तर दिलं नाही.
एक दिवस मी त्यांना मोबाईल दाखवून, तुमच्या कडे आहे का असं विचारलं. त्यावर ते फक्त हसले. मी याचा अर्थ काय घ्यायचा मला कळेना. मग मी त्यांच्या अपरोक्ष परत गावी जायचं ठरवलं आणि त्यांच्या बद्दल माहिती काढायचं ठरवलं. दिशाला लक्ष ठेवायला सांगून मी एका शनिवारी गावी गेलो. मात्र स्टॅण्ड जवळच्या हॉटेल मधे राहायचं ठरवलं. चौकशी साठी मी त्यांच्या शाळेत गेलो. प्रिन्सिपॉल जगदाळे यांना भेटलो. तेही फार माहिती द्यायला उत्सुक दिसले नाहीत. त्यांना मी गुरुजींच्या पैशांवर हक्क सांगायला आलोय असं वाटलं.त्यामुळे त्यांनी कोणतीही मदत केली नाही.म्हणून मी त्यांचा निरोप घेऊन निघालो ‌ . शाळेच्या गेट बाहेर पडत असताना,एक शिपाई वजा स्त्री धावत,मला हाका मारत आली. " सर, सर थांबा. तुम्हाला धोत्रे गुरुजींबद्दल माहिती हवी ना ? मग माझ्या घरी या. मी इथे जवळच राहते. ". मग तिने आपला पत्ता मला सांगितला आणि ती घाईघाईने निघून गेली.माझ्याजवळ वेळ कमी होता. मी थोडा वेळ शाळेपासून दूर जाऊन,शाळेच्या गेटवर लक्ष ठेवलं.सुमारे अर्ध्या तासाने शाळा सुटल्याची घंटा वाजली. पाचदहा मिनिटांनी ती स्त्री बाहेर आली. ती इकडेतिकडे बघत मी उभा होतो तिथे आली व तिच्या मागोमाग मला चलण्याची खूण केली. मी थोडं अंतर ठेवून तिच्यामागे निघालो. तिची खोली एका बैठ्या जुनाट चाळीत होती. गुरुजींबद्दल बोलायला ही एवढी काळजी का घेत्ये मला कळेना. कदाचित गाव लहान असल्याने तिला भीती वाटत असावी. आम्ही थोड्याच वेळात एका बोळवजा रस्त्याला लागलो. तिथे तिची चाळ होती. ती एका खोलीसमोर उभी राहिली व कुलूप उघडले आणि इकडेतिकडे पाहून मला मागून येण्याची खूण केली. मला हे रहस्यकथेतल्या सारखं वाटलं. मी तिच्या खोलीत शिरलो. तिने पुन्हा इकडेतिकडे पाहून दार लावून घेतले.आत दोन खोल्या असाव्यात. बाहेरची खोली जिथे एका खाटेवर एक पोरसवदा आजारी मुलगा पडला होता. त्याने तिला "आई !" अशी हाक मारली. त्याचं बोलणं थांबवून ती मला चहा घ्या म्हणून म्हणाली. पण मीच नको म्हणून तिला काहीतरी सांगणार आहात ना असं विचारलं. ती काही बोलणार एवढ्यात दरवाजा ठोकल्याचा आवाज झाला. तिने मला लपायला सांगितलं. का ते माहीत नाही. मी एका जुनाट लाकडी कपाट मागे लपलो. तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली होती. ती दरवाजा कडे गेली.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त सुरु आहे कथा. उत्सुकता वाढत आहे पण तुम्ही नविन भाग टाकायला उशीर करत आहात. अशा कथा एका झटक्यात वाचायला मजा येते.

निल्सन यांस,
अशा कथा एका झटक्यात वाचायला मजा येते हे खरं आहे. गेले दोन दिवस माझ्या मोबाईलवर मायबोली साइट उघडत नाही. त्यामुळे लिहिणं कठीण जातं. मायबोली उघडायला गेलं की पुढील शेरा येतो ,ज्याचा अर्थ समजत नाही. "Configuration cannot be loaded" यावर उपाय सांगावा.मला अशी अडचण कधीच आली नाही.

निल्सन यांस,
अशा कथा एका झटक्यात वाचायला मजा येते हे खरं आहे. गेले दोन दिवस माझ्या मोबाईलवर मायबोली साइट उघडत नाही. त्यामुळे लिहिणं कठीण जातं. मायबोली उघडायला गेलं की पुढील शेरा येतो ,ज्याचा अर्थ समजत नाही. "Configuration cannot be loaded" यावर उपाय सांगावा.मला अशी अडचण कधीच आली नाही.

निल्सन यांस,
अशा कथा एका झटक्यात वाचायला मजा येते हे खरं आहे. गेले दोन दिवस माझ्या मोबाईलवर मायबोली साइट उघडत नाही. त्यामुळे लिहिणं कठीण जातं. मायबोली उघडायला गेलं की पुढील शेरा येतो ,ज्याचा अर्थ समजत नाही. "Configuration cannot be loaded" यावर उपाय सांगावा.मला अशी अडचण कधीच आली नाही.

>>उत्सुकता ताणली गेली आहे.>>+१

>> "Configuration cannot be loaded" यावर उपाय सांगावा.मला अशी अडचण कधीच आली नाही.>>
मिरिंडा,
तुम्ही मोबाईल वरुन मायबोलीची साईट उघडण्याऐवजी मोबाईलसाठीचे मायबोलीचे अ‍ॅप आहे ते वापरुन बघा. त्याने कदाचित ही अडचड दूर होईल. पुढील भागाची प्रतिक्षा आहेच पण तुम्ही लोड नका घेवू. तुमच्या सोयीने कथा पूर्ण करा.

"Configuration cannot be loaded" यावर उपाय सांगावा.मला अशी अडचण कधीच आली नाही.>>
अरे बापरे. मला यातील काही समजत नाही. पटापट लिहा बोलायला माझं काय जातयं. तुम्ही खरचं लोड घेऊ नका, तुम्हाला जमेल तशी कथा पुर्ण करा परंतू अर्धवट सोडू नका.

उत्सुकता ताणली गेली आहे.>>+१

तुम्ही खरचं लोड घेऊ नका, तुम्हाला जमेल तशी कथा पुर्ण करा परंतू अर्धवट सोडू नका. >>>> +१

तिन्ही भाग वाचले. इंटरेस्टिंग वळणावर आहे कथा.
एरर मेसेज अ‍ॅपसाठी येतो आहे की ब्राउसरसाठी? मला वाटतं अ‍ॅपसाठी असावा. फोनमधून अ‍ॅप डिलीट करून पुन्हा इन्स्टॉल करून पहा . किंवा ब्राउसर वरून लिहा.

फोनवरून कथा , लेख लिहिणार्‍यांचं विशेष कौतुक वाटतं.