१२ फेब्रुवारी १९८३ हा चंबळ खोर्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी फूलन देवीने आत्मसमर्पण केले आणि बॉलिवूडपर्यंत बँडिट क्वीनची कीर्ति खर्या अर्थाने पोहोचली. तसे बघावे तर बॉलिवूडला लेडी डाकूपटांची ओळख फूलनचे दुधाचे दातही पडले नव्हते त्या काळापासून होती (पुतलीबाई, १९७२). फूलनच्या स्टोरीने त्यांना एक फॅक्टरी प्रॉड्युसिबल टेम्प्लेट मिळवून दिले. त्यानंतर पुढची कैक वर्षे लेडी डाकू हा फॅशनेबल रोल बनला. हा असा रेअर कमर्शिअल रोल होता ज्यात हिरोईनची मुख्य भूमिका असे ना की हिरोची. मग श्रीदेवी, हेमा मालिनी पासून अगदी शिल्पा शिरोडकर, सोनू वालिया पर्यंत सर्वांनी या गंगेत हात धुवून घेतले.
या मायक्रोजॉनरमध्ये डोळ्यासमोर येणारे पहिले नाव शेखर कपूरचा बँडिट क्वीन! परंतु अतीव अभ्यासाअंती आमचे नम्र मत असे आहे की बँडिट क्वीन अतिशय भंपक चित्रपट असून हा मान झीनत अमान अभिनीत डाकू हसीनाला जायला हवा. याची कारणे पुढीलप्रमाणे
अ) कुठलीही गोष्ट परफेक्ट बनण्यासाठी आधी प्रयोग करून पाहावे लागतात. या सिनेमाच्या दिग्दर्शकाने एक नाही, दोन नाही तर तब्बल तीन लेडी डाकूपट बनवले आहेत. अशोक रॉयने १९७२ मध्ये पुतलीबाई मार्फत पदार्पण केले. मग १९८५ मध्ये कहानी फूलवती की बनवला. या दोन चित्रपटांमध्ये केलेल्या चुकांमधून (अनुक्रमे जयमाला व रिटा भादुरी) बोध घेऊन त्याने १९८७ मध्ये झीनतला घेऊन डाकू हसीना बनवला. हा इतका परफेक्ट आहे की परत त्याने कुठलाच सिनेमा बनवला नाही.
आ) जनरली लेडी डाकू बनण्यासाठी एका मेंटॉरची गरज असते. डाकू हसीनामध्ये हा मेंटॉर रजनीकांत आहे.
इ) डाकू हसीना दरोडेखोर शोभते. बँडिट क्वीनमध्ये जेमतेम दीड दरोडे (एक थोडा बरा, एक आपला असाच) आहेत, ज्यात सीमा बिस्वासचा सहभाग नगण्य आहे. ती स्वत: एकही खून करत नाही. अगदी बेहमाईच्या कुप्रसिद्ध सीनमध्येही ती केवळ एक गोळी, ती देखील कोणाच्या तरी नडगीवर, झाडताना दाखवली आहे. संपूर्ण सिनेमात ती फक्त एकदाच (उपरोक्त सीनमध्ये) बंदूक चालवते. डाकू बिरुदाला साजेशी कोणतीच कामे करताना ती दिसत नाही. याउलट झीनत कमीत कमी वीस खून, तीन संपूर्ण लांबीचे दरोडे आणि रॉबिन हूडसदृश धनवाटप करताना दाखवली आहे.
ई) *** सर्वात महत्त्वाचे कारण ***
डाकू हसीनाचा एक (ऑलमोस्ट सीन टू सीन) रिमेक आहे - हीराबाई (२०००). या रिमेकमध्ये डाकू हसीनाचे बरेचसे संवाद हसीनाच्या जागी हीराबाई फाईंड/रिप्लेस करून जसेच्या तसे घेतलेले आहेत. या नादात यमकभंग झाला आहे पण तरीही हे केले गेले आहे. मुद्दा असा की हीराबाईचा संवादलेखक आहे बशीर बब्बर. जे स्थान मनमोहन देसाईपटांमध्ये कादर खानचे तेच स्थान कांति शाहपटांमध्ये बशीर बब्बरचे. (कानाच्या पाळ्यांना स्पर्श करून) गुंडाचे अजरामर संवाद लिहिण्याचे महान कार्य करणारा पुण्यपुरुष म्हणजे बशीरभाई बब्बर!
जर गुंडाचा संवादलेखक वेळप्रसंगी यमकभंग सहन करूनही एखाद्या चित्रपटातील संवाद जसेच्या तसे वापरत असेल, तर विचार करा की तो काय लेव्हलचा चित्रपट असेल!
तरी अशा लॉस्ट मास्टरपीसचे रसग्रहण करण्याचा हा अल्पसा प्रयत्न!
०) पूर्वाभ्यास
सर्वप्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की डाकू हसीना लेडी डाकू/आऊटलॉ मायक्रोजॉनरमध्ये मोडतो. अन्यथा हा चित्रपट बघण्यात काहीही हशील नाही. मायक्रोजॉनर ही संज्ञा १९७०च्या दशकात फ्रेंच समीक्षकांनी रुढ केली. मायक्रोजॉनरचा अगदी सोप्या शब्दात अर्थ सांगायचा तर कलाप्रकाराचे एखादे हायपर-स्पेसिफिक/नीश प्रारुप! उदा. नुजाबेसने मेलडी आणि हिपहॉप बीट्सची सांगड घातलेल्या डाऊनटेम्पो प्रकारातल्या संगीताचे पुढे लो-फी (लो-फिडेलिटी) हिप-हॉप या मायक्रोजॉनरमध्ये रुपांतर झाले. यातल्या काही काही बीट्स इतक्या स्पेसिफिक आहेत की रोलँड एस-पी सीरिजच्या सँपलरमध्ये "लो-फी इफेक्ट" असे वेगळे बटण यायला लागले.
लेडी डाकू हा माझ्यामते जगातला सर्वात जुना मायक्रोजॉनर आहे. अगदी ढोबळ मानाने सांगावे तर यात हिरोईनवर काहीतरी अन्याय होतो - बलात्कार, आई-वडलांचा खून, वारसा हक्क न मिळणे इ. इ. याने ती सूडाने पेटून उठते आणि त्या त्या संस्कृतीतील नीतिमूल्यांशी फारकत घेतलेला मार्ग चोखाळते. जर ती भारतीय उपखंडातील असेल तर ती डाकू बनते. जर ती ब्रिटिश असेल तर ती हायवेवुमन/रॉबिनहूड बनते. जर ती अमेरिकन असेल तर ती बिली द किड/बेले स्टार्र मोल्ड मधील आऊटलॉ बनते. जर ती आयबेरिअन पेनिन्शुलामधील असेल तर ती झोरो किंवा पायरेट बनते. जर ती जपानी असेल तर ती नेझुमी-कोझोवर बेतलेली निंजा असते. डाकू बनल्यानंतर तिने आपल्या सूडाशी संबंधित नसलेला एकतरी गुन्हा करणे अनिवार्य आहे अन्यथा तो रिव्हेंज फ्लिक बनतो. बव्हंशीवेळा लेडी डाकू या अटीची पूर्तता एखादा दरोडा घालून करतात. जवळपास सर्व भाषांत याप्रकारचे कॅरेक्टर आढळते. या सर्वांचे एक नीट डिसिजन ट्री बनवता येते आणि त्यानुसार लेडी डाकू आणि तिची गँग काय काय करू शकते, तिच्यावर कोणकोणते अन्याय होऊ शकतात, ती बदला घेण्यासाठी काय लेव्हलचा अचाटपणा करू शकते याचे प्रचंड स्पेसिफिक नियम-पोटनियम मांडता येतात. उदा. जर चित्रपट हिंदी असेल आणि चित्रपटाच्या सुरुवातीला जुळ्या बहिणी दाखवल्या तर १५-२० मिनिटाच्या रेंजमध्ये काय सीन येतो तो चेक करावा. जर त्या सीनमध्ये दोघींपैकी एकजण कोठ्यात पोहोचली असेल तर अजून मॅक्स पाऊण तासात तिच्यावर बलात्कार होईल, कोठ्याच्या मालकिणीचा ती खून करेल आणि डाकू बनेल. तिची बहीण पोलिस इन्स्पेक्टर तरी असेल किंवा टांगेवाली असेल, दुसरे प्रोफेशन शक्य नाही. जर सीन कोठ्यातील नसेल आणि दाखवलेली बहीण टांगेवाल्याकडे गेली नसेल तर ती डाकू बनेल पण तिच्यावर अतिप्रसंग होईलच असे नाही. जर ती टांगेवाल्याकडे गेली असेल तर दुसरी बहीण एका डाकूकडे वाढेल, डाकू बनेल आणि तिच्यावर अतिप्रसंग होणार नाही. या सर्व केसेसमध्ये मुख्य व्हिलनने त्यांच्या वडलांना लहानपणी मारलेले असेल. त्या दोघींची एका पॉईंटला अदलाबदल होईल आणि बदला घेण्याकरता याने मदत होईल. शेवटी लेडी डाकू कोणाला ना कोणाला वाचवायला मध्ये तडमडून मरेल, अर्थातच व्हिलनला गोळी घातल्यानंतर.
तात्पर्य काय तर, लेडी डाकू इज युनिव्हर्सल!
अस्मादिकांच्या अभ्यासानुसार १९३१ सालचा 'द टेक्सास रेंजर' हा या मायक्रोजॉनरचा पहिला चित्रपट आणि कार्मेलिटा गेरटी ही पहिली लेडी डाकू. लिखित साहित्यामध्ये याहूनही जुनी उदाहरणे आढळतात, जसे की बंकिमचंद्रांची देबी चौधुरानी. फूलन देवीच्या समर्पणानंतर बॉलिवूडला दशकभर तरी या मायक्रोजॉनरची भुरळ पडली. इतकी की लेडी डाकू बनल्याशिवाय तुमचे हिरोईनपण सिद्ध होत नसावे.
लेडी डाकूपटांच्या कमर्शिअल लाटेत लेखक राजीव कौलने १९८७ साली डाकू हसीना लिहिला. तर दिग्दर्शक हर्मेश मल्होत्राने १९८८ साली श्रीदेवीला घेऊन शेरनी बनवला. गंमतीची बाब अशी की याच दोघांनी एकत्र येऊन १९९७ मध्ये दुल्हे राजा बनवला. जर अगदी बारकाव्याने पाहिले तर दुल्हे राजातील सेटपीसेसची स्टाईल डाकू हसीनात बघायला मिळते. केवळ जॉनर चुकल्याने राजीव कौलचे टॅलेंट पूर्णपणे एक्सप्रेस झालेले नाही. स्लॅपस्टिक लिहायची संधी मिळताच त्याने तिचे सोने केले आणि दुल्हे राजामध्ये त्याच्या टॅलेंटचे खर्या अर्थाने चीज झाले.
१) दलाल डाकू
पहिल्याच सीनमध्ये एक म्हातारा अवधी बोलीत लिहिलेल्या रामचरितमानसचे खेमराज कृष्णदास यांनी छापलेले हिंदी भाषांतर वाचत श्रीहनुमन्नमस्कारः (म्हणजे मनोजवं मारुत तुल्य वेगं) हे पारंपारिक संस्कृत स्तोत्र म्हणतो आहे. अशा रीतिने पहिल्या पंधरा सेकंदातच आपल्याला हा सिनेमा मास्टरपीस असल्याचे कळते. मग कॅमेरा वळतो नंदिता पुरीकडे (सोनी टीव्हीच्या कुछ तो लोग कहेंगे मध्ये इशिता शर्माची आई). इथे आपल्याला जबरदस्त लेव्हलवरची सप्लाय चेन बघायला मिळते. आधी दोन गावकरी हिला स्पॉट करतात. मग त्यातला एक तिच्या आईला काही बहाण्याने तिकडून घालवतो. तोवर दुसरा मेन सप्लायरला जाऊन बातमी देतो. मेन सप्लायर मग आपली गँग घेऊन तिथे हजर होतो.
मेन सप्लायर आहे जोगिंदर. जोगिंदरला डाकूपेक्षा कमी दर्जाचा रोल देणे शक्य नसल्याने तो डाकू आहे. डाकू लोकांचा इनकम सोर्स दरोडे, अपहरण, खंडणी इ. असल्याचा अस्मादिकांचा समज जोगिंदरने धुळीस मिळवला आहे कारण त्याचा मुख्य धंदा बायका पुरवणे आहे. डाकू लोक आल्याने कीर्तनास आलेल्या गावकर्यांची पळापळ होते. पण नंदिताला बरोब्बर अडवले जाते. मग जोगिंदर येतो आणि तिला उचलून पुरवठा करायला निघतो. या पुरवठ्याचे मागणीदार दारु ढोसत बसले आहेत. आता आपली सिनेमाच्या उर्वरित व्हिलन्सशी ओळख होते (इन ऑर्डर ऑफ अपिअरन्स)
लाला - चंद्रशेखर दुबे (राम तेरी गंगा मैली मधला पंडित)
ठेकेदार - युनुस परवेझ
राणा - रुपेश कुमार
राजा - रझा मुराद
यात रझा मुराद मुख्य व्हिलन आहे हे कोणीही सांगू शकतं. कारण या सर्वांमध्ये त्याला एकट्यालाच दारु चढलेली नाही. तसेच आपण व्हिलन आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्याला छाती खाजवणे, डोळे वटारणे इ. करण्याची जरुर भासलेली नाही, त्याची डायलॉग डिलीव्हरीच पुरेशी आहे. डीलनुसार जोगिंदर नंदिताला घेऊन यांच्या ठिकाणी येतो. येथे जोगिंदरच्या वेषभूषेबद्दल दोन शब्द खर्च केले पाहिजेत. अलिफ लैलामधील दुष्ट राक्षसिणींची ड्रेपरी आपल्याला सहा वर्षे आधी इथे बघावयास मिळते (आय थिंक दामिनीप्रिया अर्थात शहरजादे सुद्धा एका एपिसोडमध्ये हा ड्रेस घालते बट आय डायग्रेस). ड्रेसप्रमाणेच क्लिअरली त्याच्या मापाचा नसलेला विग, खोटी दाढी आणि मण्या-मण्यांचा कंबरपट्टा दिला आहे. हा दुष्ट डाकू आहे हे सिद्ध करण्यासाठी गळ्यात दोरी ओवून एक कडे घातले आहे.
* लेडी डाकूपटांचे पोटनियम - जर डाकू पुरुष असेल आणि त्याने गळ्यात दोरी ओवून कडे घातले असेल तर तो दुष्ट असतो. *
हे जोगिंदरबाबतही सिद्ध करावे लागते कारण लेडी डाकूपटांत जोगिंदरही चांगला डाकू असू शकतो (गंगा जमुना की ललकार,१९९१). इथे याचे नाव दुर्जन असल्याचे कळते. दुर्जन मूर्ख आहे. किंबहुना या सिनेमातले सर्वच्या सर्व व्हिलन मूर्ख आहेत. केवळ इतर जनतेच्या तुलनेत ते किमान नवकोट नारायण (https://www.youtube.com/shorts/1n4ilvyzll0) आणि कमाल अंबानी लेव्हलचे श्रीमंत असल्याने त्यांची व्हिलनगिरी अडीच तास चालते. अन्यथा झीनत-रजनीकांत समोर ते अडीच मिनिट देखील टिकले नसते. वानगीदाखल दुर्जन नंदिताला आपला हात चावू देतो. युनुस परवेझ तिला आपल्या बॉक्स ऑफिसवर लाथ मारू देतो. एक्सपर्ट व्हिलनने नंदिताला बेशुद्ध करूनच आणले असते. दुर्दैवाने आपल्याला असले थर्ड क्लास व्हिलन अडीच तास सहन करावे लागणार आहेत. नंदिताने १९८७ सालापर्यंत आपले हिरोईनपण सिद्ध केले नसल्याने तिचा प्रतिकार फार काळ टिकत नाही. ट्रिगर वॉर्निंग: इथून पुढे ठाकूरवर्गीय हिंदी व्हिलनच्या आद्य कर्तव्याचा सीन आहे जो त्याकाळच्या सिनेमांच्या मानाने बराच ग्राफिक आहे. पुढची दोन मिनिटे स्किप करू शकता.
या दोन मिनिटात नोंद घेण्यालायक दोनच गोष्टी आहेत - १) गावातले पोलिस उपयोगशून्य आहेत, २) आपले सर्व व्हिलन्स ठार वेडे आहेत. ठाकूरगिरी केल्यानंतर रझा मुराद नंदितावर सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक थैली रिती करतो - तुम्हारे बदन पर हमारे हाथों जितनी भी खराशे लगी हैं, उन खराशों की इन सोने की गिन्नियों से ढक लेना. रुपेशकुमारच्या डायलॉगवरून हे सर्वजण अशी एक थैली घेऊन आलेले आहेत. हा काय मुद्दा आहे? एकंदरीत सर्व गाव यांच्या मुठीत दिसते. वेळ पडल्यास या लोकांची पैसे मोजायची तयारी आहे. मग एवढा एलॅबोरेट सेटअप आणि जोगिंदर कशाला पाहिजे?
२) हिरवीणीची कूळकथा
२.१) अॅक्युरेट भूगोल
कॅलिडोस्कोपिक ब्याकग्राऊंडवर श्रेयनामावली झळकते. त्यानंतर काही लोकांना एक व्यक्ती बदडताना दिसते. केस कधी कुरळे तर कधी सरळ आहेत. स्टंटमॅनला सेम विग द्यायला काय प्रॉब्लेम होता कोणास ठाऊक? भारतीय जनता आपले आद्य कर्तव्य - गठ्ठ्याने बडवले जाणारे लोक बघायला गर्दी करणे - पार पाडते आहे. अचानक "भय्या" अशी हाक ऐकू येते. मग कळते की हा मारधाडकारक, झीनतचा भाऊ, राकेश रोशन आहे. यांची सिनेमात नावे आहेत रुपा सक्सेना व रणजित सक्सेना. हिरोईन-केंद्री चित्रपटाच्या हिरोचे, त्यातही राकेश रोशनचे, नाव रणजीत ठेवून राजीव कौलने आपली विनोदबुद्धि प्रदर्शित केली आहे.
अॅपरंटली हे लोक मुलींची छेड काढत असतात. गांव की गोरी रुपा येऊन आपल्या भय्याला सांगते की या लोकांना शरम की मार मारली पाहिजे. त्यानुसार या लोकांची शब्दश: तोंड काळं करून गाढवावरून धिंड काढली जाते. या प्रसंगातून हिरोईन मुळातच तडफदार असली पाहिजे या लेडी डाकूपट नियमाची पूर्तता केली आहे. पुढे असे कळते की या दोघांचे वडील पूर्वी हवालदार होते. त्यामुळे वडील या पराक्रमावर खूश असतात. पण मध्यमवर्गीय आईचे मात्र "कोणी सांगितल्यात नसत्या उचापती" मताची असते. तिची जयपुरी पद्धतीची बांधणी साडी नोट करा. याचा अर्थ कथावास्तु आग्नेय राजस्थानाजवळ आहे. आपले कथानक चंबळ खोर्यात घडते आहे. चंबळ राजस्थानच्या आग्नेय सीमेवरून वाहते. याचा अर्थ हे गाव राजस्थान-मध्य प्रदेश बॉर्डरजवळ आहे. प्लस डाकूंसाठी लपायला जंगल हवे. अशी दोन जंगले आहेत - रणथंबोर आणि कुनो अभयारण्य. पण यांच्या हिंदीवरील उर्दू प्रभाव बघता हे कथानक मध्य प्रदेशात कुनो अभयारण्याजवळ घडत असल्याची शक्यता अधिक. तसेच पोलिस स्टेशन वगैरे बघता हे तालुक्याचे गाव जवळच असावे. असे गाव गूगल करताच शिवपुरी असल्याचे सांगता येते. याचा अर्थ हे कथानक शिवपुरी परिसरात घडत असल्याचे सांगता येते. उर्वरित चित्रपट बघितल्यावर हे भौगोलिक अनुमान शंभर टक्के बरोबर असल्याचे लक्षात येते.
२.२) साईड हिरवीणीची "तोंडओळख"
कट टू पुढचा सीन. असे कळते की राकेश रोशनला पोलिसात नोकरी मिळाली आहे. झीनतच्या डोळ्यांतून गंगा-जमुना वाहत आहेत. रारो विचारतो की काय झालं? इथून झीनतचे खतरा डायलॉग्ज सुरु होतात - भय्या पोलिस ऑफिसर बना ये जानकर दिल तो बहुत खुश हुआ पर ये आंखे, जिन्हे तुम्हारी जुदाई की आदत नही, खामखां रो पडी. इथेच या सिनेमातली चेकॉव्ह्ज गन धडाडायला लागते. झीनत म्हणते की आता मी तुला पोलिसाच्या गणवेषात बघायला आतुर आहे तर रारो म्हणतो की मला तुला वधू म्हणून सजलेली बघायला आतुर आहे. या दोन्ही इच्छा पूर्ण होणार आहेत पण त्या ज्या पद्धतीने पूर्ण होतात ते बघून स्पोक टू सून म्हणावे लागेल.
झीनतच्या "पहले उस झुल्फोंवाली से तो बात पक्की कर लो" चा क्यू घेऊन रारोच्या हिरोईनची एंट्री होती. जीने नही दूंगा या अजरामर चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेली रोशनी रारोची हिरोईन आहे. आणि रोशनीला हिरोईन म्हणवून घ्यायचा हक्क आहे कारण ती डाकू हसीनाच्या एक वर्ष आधी डाकू बिजलीमध्ये डाकू बिजली म्हणून झळकलेली आहे. रोशनी स्कूल ऑफ अॅक्टिंगशी परिचित असलेल्या वाचकांसाठी विशेष नोंद: हा रोशनी स्कूल ऑफ अॅक्टिंगचा एकमेव डिसेंट नमुना. रोशनी एका धबधब्यापाशी रारोची वाट बघत थांबली आहे. तिची साडी सिंथेटिक वाटते आहे, ज्यावरून ती गांव की गोरी नसून शहर की लडकी असल्याचे सांगता येते. रारो तिला उत्साहाने आपले अपॉईंटमेंट लेटर दाखवतो. इथे बॅकग्राऊंडला एकजण महत्त्वाच्या कामासाठी नदीकाठी उकिडवा बसला आहे. बट रोशनी इज नॉन-प्लस्ड! तिची रिअॅक्शन - हा मिळाली तुला नोकरी. मग काय आता २६ जानेवारीला महाराष्ट्राच्या फ्लोटवर नाचू? इथे ही भावना दर्शविण्याकरता रोशनीच्या तोंडी "कम-ज़र्फ़" असा भरभक्कम उर्दू शब्द दिलेला पाहून प्रेक्षकाच्या घरात अश्रूंचा पूर येतो. रारोदेखील पोचलेला मनुष्य आहे. त्याने रोशनीकडून आधीच वचन घेतले होते की नोकरी मिळाली तर तू जुम्मा आणि मला चुम्मा. ती थोडे आढेवेढे घेते आणि मग अत्यंत अवघडलेला किस देते.
३) मीनिंगफुल रिपिटिशन फॉर क्लॅरिटी
लेडी डाकूंचा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तरी डाकू हसीनाची पटकथा स्पेशल आहे. यात मीनिंगफुल रिपिटिशन्स आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्याला दोन-दोन वेळा दाखवली जाते. जसे जॅकी चॅन आणि हाँगकाँगचे दिग्दर्शक प्रत्येक पंच आणि किक दोन वेळा (आधी वाईड शॉट मग क्लोज अप) दाखवून अधिक परिणाम साधतात. तसेच डाकू हसीनामध्ये प्रत्येक सेटअप दोन वेळा दाखवून (एकदा ढोबळ (वाईड शॉट) सेटअप दुसर्यांदा त्याचे संभावित परिणाम, कंगोरे इ. (क्लोज अप)) क्लॅरिटी साधली जाते. तसेच यात गांव की गोरी ते खतरनाक डाकू हे प्रोग्रेशनही सटली अधोरेखित केले आहे. अभ्यास करताना हे लक्षात ठेवणे त्यामुळे क्रमप्राप्त ठरते.
३.१) हिरोईनवर अत्याचार
एवढा वेळ झाला तरी एकही गाणे झालेले नाही. हे बॉलिवूड की शान के खिलाफ आहे. त्यानुसार "प्यार के मोड पर" ही कव्वाली सुरु होते. गायक आहेत दिलावर बाबू आणि परवीन साबा. माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार हे दोघेही नामवंत राजस्थानी कव्वाल आहेत. राजस्थान -> आग्नेय सीमा -> कुनो अभयारण्य. पुन्हा एकदा १००% अॅक्युरेट भूगोल! संगीत दिले आहे उशा खन्ना यांनी. उशा खन्ना बॉलिवूडमध्ये दुर्मिळ अशा महिला संगीतकार आहेत. त्यांची काही प्रसिद्ध गाणी म्हणजे "छोडो कल की बातें", "शायद मेरी शादी का ख्याल", आणि "चंद्रकांता की कहानी". अगदी स्पष्ट सांगायचे तर ही क्लासिक कव्वाली आहे. जश्न-ए-आदाब सारख्या नामवंत साहित्योत्सवांमध्ये ही कव्वाली अजूनही सादर केली जाते. कव्वाली संगीतप्रकारात रस असेल तर व्हिडिओकडे दुर्लक्ष करून केवळ गाणे ऐका. इथे राजीव कौलने आपली कव्वालीची आवड दाखवली आहे -> दुल्हे राजामध्ये कव्वालीचा सामना दाखवला आहे. नैना म्युझिकवरील एकतरी "जंगी सामना" व्हिडिओ किंवा तत्सम प्रकार बघितला असेल तरच याचा व्हिडिओ बघा. त्याशिवाय याच्या टेकिंगमधल्या सर्व इंटरेस्टिंग जागा स्पॉट करणे अवघड आहे. तसेही कथानकाच्या दृष्टीने या गाण्याच्या आड जे घडते आहे ते अधिक महत्त्वाचे आहे.
प्रेक्षकाला आता या चित्रपटातील व्हिलनची मोडस ऑपरंडी ठाऊक आहे. इथे आता डिटेलिंग बघायला मिळते. जर प्रत्येकवेळी जोगिंदर किर्तनाच्या कार्यक्रमातच मुली पळवायला लागला तर प्लॅनिंग फेल जाईल त्यामुळे व्हिलन्स अतिहुषारी दाखवत यावेळी कव्वालीचा आडोसा घेतला आहे. तसेच पंचक्रोशीतील देखण्या मुलींचा डेटाबेस ठेवणे अशक्य असल्याने कव्वालीच्या एंजॉय करण्याच्या नावाखाली हे चौघे प्रत्यक्षात मुली ताडून कोणावर अत्याचार करायचा हेही ठरवत आहेत. ऑफकोर्स या केसमध्ये त्यांची नजर झीनतवर पडते. इथे झीनतच्या एक्सप्रेशन्सवरून तिलाही शंका आल्याचे दाखविले आहे, पण तिचे काही एक चालणार नाही आहे कारण सिनेमा पुढे सरकायला हवा. जनरली बॉलिवूडमध्ये उलटे असते - व्हिलन टाळता येण्यासारख्या चुका करतात जेणेकरून हिरो लोक जिंकावेत. इथे झीनत इतकी ओव्हरपॉवर्ड हिरोईन आहे की व्हिलन लोकांना व्हिलनगिरी करता यावी म्हणून ती गुंगीचे औषध घातलेले सरबत पिते.
मग काय व्हायचे ते होते - जोगिंदर येतो आणि बेशुद्ध पडलेल्या झीनतला पळवून नेतो. इथे डिटेलिंग - जर एखादा गावकरी शौर्य दाखवायच्या फंदात पडलाच तर त्याचे काय होईल: झीनतच्या मैत्रिणीला जोगिंदर बिनदिक्कतपणे गोळी घालतो. पुन्हा एकदा ट्रिगर वॉर्निंग: रझा मुराद झीनत शुद्धीवर यायची वाट बघतो आणि व्हिलनच्या आद्य कर्तव्याचा दुसरा (आणि अधिक ग्राफिक) सीन होतो. झीनत पुरती शुद्धीवर आलेली नसल्याने तिचा प्रतिकार तोकडा पडतो. त्यात रझा मुरादचे झीनतच्या वडलांशी काही जुने वैर असते. इथे असे सूचित केले आहे की रझा रारो गावाबाहेर पडण्याची वाट बघत होता. रारो पोलिस ट्रेनिंगसाठी जाताच रझाने डाव साधला. त्यानुसार जोगिंदर जाऊन तिच्या आई-वडलांना ठार करतो आणि तिच्या घराला जाळतो. इकडे नेहमीप्रमाणे काम झाल्यावर रझा आणि कंपनी झीनतला सोन्याची नाणी देऊन दारू प्यायला निघून जातात. हा रिपीट कार्यक्रम असल्याने यावेळेस आऊटकम वेगळे आहे. झीनत बंगल्याच्या पहारेकर्याच्या डोक्यात व्हिस्कीची बाटली फोडून तिथून पळ काढते.
३.२) पुनरावृत्तीचे विपरीत परिणाम
इथून मीनिंगफुल रिपीटिशन सुरु होते. नंदिताच्या केसमध्ये नंदिता पॉसिबली मारली गेली आणि तिचे आई-वडील पोलिसात गेले होते. इथे झीनत जिवंत राहते आणि तिचे आई-वडील मारले जातात. पोलिस तिच्या मागावर असतातच. ठाणेदार तिला चौकीवर नेतो आणि चौकीचे दार बंद करतो. झीनतच्या डोक्यात लगेच प्रकाश पडतो. मग तो ठाणेदार खुल्लमखुल्ला सांगतो की तू तक्रार केलीस तरी मी असा रिपोर्ट बनवेन की तुला या लोकांनी सोन्याची नाणी दिली होती आणि तू वाईट चालीची आहेस. पण जर तू मला कोऑपरेट केलंस तर मी जमेल तेवढी तुझी मदत करेन. इतर व्हिलन्सप्रमाणे हा ठाणेदारही माठ आहे. झीनत आता पूर्ण शुद्धीत आहे. जी तरुणी एखाद्याच्या तोंडाला काळे फासून त्याची गावात धिंड काढू शकते तिला अंडरएस्टिमेट करणे म्हणजे आपल्या मृत्युपत्रावर सही करणे. तसेच होते - झीनत चहाचा कप घ्यावा तसे त्याच्या हातून पिस्तुल काढून घेते आणि त्याला चार गोळ्या घालते (खून क्र. १). इथे तिचे मोरल हायस्टँडिंग दाखवण्यासाठी तिला टेबलावर उभे केले आहे.
पिस्तुलाचा आवाज ऐकून इतर पोलिस धावत येतात आणि झीनतला तिथून पळ काढावा लागतो. पोलिसाचा खून केल्यामुळे तिच्यामागे बरेच पोलिस लागतात आणि अखेर तिला एका दरीच्या कडेला पकडतात. निरुपाय म्हणून ती दरीत उडी घेते. अजिबात झीनतसारखा न दिसणारा एक पुतळा दरीत पडतो आणि तिच्या किंचाळीचा आवाज दरीत चहा पीत बसलेल्या एका डाकूच्या कानी पडतो. पोलिसांना वाटते की झीनत मेली. आपल्या परिवाराची झालेली राखरांगोळी खांद्यावर बेल्ट घेऊन हिंडणार्या रारोच्या कानी पडते. तो लगेच गावी परत जायच्या गप्पा करतो. गंजीफ्रॉक घातलेला त्याचा एक सहपाठी म्हणतो की तू असा पॅनिक होऊ नकोस. तुझी फॅमिली तर सगळी ठार झाली मग तू आता गावी जाऊन काय करणार? जर तू कायदा हातात घेतलास तर तुझ्यात आणि व्हिलन्समध्ये काय फरक राहिला? इथे रारो म्हणू शकला असता की अरे भंपक माणसा, माझ्या फॅमिलीचा अंत्यविधी तर करावाच लागेल ना! गावाला जाऊन बदला घेणे एवढं एकच काम आहे का मला? पण एवढी बुद्धि त्याच्या डोक्यात भरलेली नसल्याने (आता रोशनीच्या प्रेमात पडणारा हिरो बुद्धिमान असून कसे चालेल? जसा जीने नही दूंगा मध्ये बाज रब्बर तसा इथे रारो) तो हताश होऊन बसकण मारतो.
३.३) मेंटॉरची एंट्री
प्रेक्षकाला पुनरावृत्तीचा विपरीत परिणाम दाखवल्यानंतर पुढच्या पुनरावृत्तींचे सेटअप करायला घ्यायला हवेत. यासाठी झीनत डाकू बनणे अनिवार्य आहे. हिंदी चित्रपटांमध्ये लेडी डाकूला मेंटॉर असणे आवश्यक आहे. मेंटॉर असला/ली की रेडिमेड गँग, डाकूगिरीचे ट्रेनिंग, सपोर्ट सिस्टिम, गावागावांमधले काँटॅक्ट्स आयते मिळतात आणि हे सर्व तिने कसे मॅनेज केले असेल असे प्रश्न प्रेक्षकाला पडत नाहीत. याला बॉलिवूडमधील एकमेव अपवाद - तिलकची (१९९२) शिल्पा शिरोडकर. तरी आता मेंटॉरची एंट्री क्रमप्राप्त आहे.
झीनत शुद्धीवर येते तर तिला दिसते की आपण एका किल्ल्यात आहोत आणि आपल्या चारही बाजूंना खूपसे डाकू आहेत. पुन्हा एकदा: हा किल्ला पोहरीचा किल्ला आहे जो शिवपुरी जिल्ह्यात आहे. राजस्थान >> आग्नेय सीमा >> कुनो अभयारण्य >> शिवपुरी जिल्हा >> पोहरी किल्ला. १००% अॅक्युरेट भूगोल! नंतर सिनेमात नरवर किल्ल्याचेही दर्शन घडते जो पुन्हा शिवपुरी जिल्ह्यातच कुठेशी आहे. इतका अॅक्युरेट भूगोल अगदी क्वचित बघायला मिळतो.
इथे एका डाकूचे नाव रहमतुल्ला दाखवून ही टोळी धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवले आहे. जो डाकू दरीत चहा पीत बसला होता तो सांगतो की या टोळीच्या सरदाराचे नाव मंगलसिंह आहे आणि त्याने तिचा जीव वाचवला. झीनत भडकते. एका खूनी डाकूने तिचा जीव वाचवावा हे तिला सहन होत नाही. नोंद घ्या की इथे ती तिचे संवाद अॅबनॉर्मल वेगात म्हणते. याने ती आपले नैतिक उच्चस्थान अधोरेखित करण्याचा प्रयत्न करते आहे. याचीही पुनरावृत्ती होणार आहे.
हरिया नामक डाकू याने चिडतो. तो झीनतला धमकावतो की आमच्या सरदारला नावं ठेवलीस तर परिणाम वाईट होतील.
*लेडी डाकूपटांचे पोटनियम - लेडी डाकूच्या मेंटॉरच्या गँगमध्ये जो मेंबर मेंटॉरच्या नावाखाली अनावश्यक अॅग्रेशन दाखवतो तो नंतर गद्दारी करतो. त्यामुळे आपण आत्ताच सांगू शकतो की हरिया गद्दार निघणार आहे.*
हरियाचा चढलेला आवाज ऐकून किल्ल्याच्या इमारतीतून रजनीकांत बाहेर येतो. हाच मंगलसिंह. इथून पुढचा सीन ही अनुभवण्याची चीज आहे - https://youtu.be/LJkKht_sYGM?t=200
झीनतचे म्हणणे असते की डाकू वाईट असतात. रजनीकांतला हे म्हणणे खोडून काढायचे आहे. त्यामुळे तोही आपले नैतिक स्थान अधोरेखित करण्यासाठी आवाजात अॅबनॉर्मल चढउतार करतो. तो म्हणतो की तूही खूनी आहेसच की. ती म्हणते की एकतर तू खूप जास्त खून केले आहेस आणि दुसरे म्हणजे मी स्वसंरक्षणासाठी त्या ठाणेदाराला मारलं. रजनीकांत हसून म्हणतो की मग मी पण कोणा ना कोणाला वाचवण्यासाठीच लोकांना मारलं. इथे दोघेही आपापली नैतिकता अधोरेखित करण्याच्या नादात काहीही बोलत आहेत. हे प्रेक्षकाच्या मनावर ठसवले जाते जेव्हा रजनीकांत डाकूची स्वप्नाळू व्याख्या सांगतो - जंगल जिसका ठिकाना, पत्थर जिसका बिछोना, आसमान जिसकी छत वो डाकू हैं, बागी हैं.
झीनत म्हणते की हे सगळं ठीक आहे पण म्हणून डाकू बनायचं? एका कसलेल्या मेंटॉरप्रमाणे रजनीकांतच्या लक्षात येते की हिला आपला फ्लॅशबॅक सांगितल्याशिवाय ही नाही ऐकायची. तो तिला हाताला धरून ओढत नेतो आणि एका ट्रंकसमोर उभं करतो. ट्रंकमध्ये वकीलाच्या वेषातील विजय अरोराचा फोटो असतो. विजय अरोरा रजनीकांतचा धाकटा भाऊ सोमनाथ आहे. रजनीकांत झीनतवर खेकसतो की हा फोटो उचल. त्या फोटोखाली विजय अरोराच्या रक्तबंबाळ प्रेताचा फोटो. झीनत हादरते. तिच्या लक्षात येते की एक म्हणजे रजनीकांतवरही काहीतरी जबरदस्त अन्याय झाला आहे आणि दुसरे म्हणजे रजनीकांतचे स्क्रू ढिले आहेत - आपल्याच भावाच्या प्रेताचा फोटो काढून, तो फ्रेम करून कोण ठेवतं?
रजनीकांतच्या डोळ्यांतील अश्रू सांगत आहेत की फ्लॅशबॅकमध्ये काहीतर डेंजर प्रकार घडला आहे. अर्थातच रजनीचा फ्लॅशबॅक ऐकून झीनत डाकू हसीना बनते. पण कथा पुढे अभ्यासण्याआधी एक अल्पविराम जेणेकरून एवढा अभ्यास पचवता यावा. उर्वरित रसग्रहण लवकरच प्रतिसादात.
पुढील विश्लेषणाच्या प्रतिसादांच्या लिंका
(४) - https://www.maayboli.com/node/83794#comment-4927886
(५) - https://www.maayboli.com/node/83794#comment-4928261
(६) - https://www.maayboli.com/node/83794#comment-4928593
(७) - https://www.maayboli.com/node/83794#comment-4929076
(८) - https://www.maayboli.com/node/83794#comment-4929306
(९) - https://www.maayboli.com/node/83794?page=1#comment-4929476
(१०) - https://www.maayboli.com/node/83794?page=1#comment-4929731
(११) - https://www.maayboli.com/node/83794?page=1#comment-4930000
(१२) - https://www.maayboli.com/node/83794?page=1#comment-4930301
(१३) - https://www.maayboli.com/node/83794?page=1#comment-4930605
(संपूर्ण)
जबरी
जबरी
जबरदस्त! काय अभ्यास काय
जबरदस्त! काय अभ्यास काय अभ्यास!!! लो फी काय, आग्नेय सीमा वगैरे भौगोलिक अनुमान काय, शिवाय पायस स्टाईलमध्ये पात्रे आणि प्रसंगांचे चौफेर रेफ्रनसेस सगळंच भारी. मागे तुझ्या एक दोन प्रतिसादात या चित्रपटाचा उल्लेख केला होतास तेव्हाच जाणवलं होतं की यावर कधी सविस्तर लिहिलंस तर ते अफलातून असणार आहे. त्याची प्रचिती आली. आम्हा पामरांची क्षमता लक्षात घेऊन सध्या एवढ्यावरच थांबवलंस याबद्दल आभार. हे अजून पचवतो आहे. आता पुढच्या तुझ्या पोस्ट्स वाचायचीही उत्सुकता आहेच.
जबरदस्त! काय अभ्यास काय
दु प्र
जबरदस्त उतरलाय लेख. केवढा तो
जबरदस्त उतरलाय लेख. केवढा तो अभ्यास _/\_
पुढचा भाग लवकर येऊदे
जबरदस्त! काय अभ्यास काय
जबरदस्त! काय अभ्यास काय अभ्यास!!! >>> +१
पुभाप्र आहेच, पण आधी हेच पचवायला आमचा वैचारिक अजगर होणार आहे काही दिवस पण तोपर्यंत काही आवडलेले कोट्स
"पहले उस झुल्फोंवाली से तो बात पक्की कर लो" >> इथे मला डाकू हसिना जुल्फोवाली जाने जहाँ असे काही गाणे घालू शकले असते असे वाटले.
तो रोशनीचा पॅरा धमाल आहे. बाय द वे राकेश "रोशन" करता हिरॉइन "रोशनी" हे ज्या कास्टिंग डायरेक्टरने केले त्याला एक स्पेशल रिस्पेक्ट. मला एकदम "अब्दुल रहमानकी मै अब्दुल रहमनिया" ची आठवण झाली
तो रोशनीचा पॅरा धमाल आहे. "डाकू बिजली" मधे ती डाकू बिजलीच आहे या माहितीबद्दल आभार. डाकू बिजली सिनेमात(ही) जर तुम्ही लीड रोल मधे नसाल तर तुम्हाला करियर चॉइसचा गांभीर्याने विचार करायची गरज आहे. रोशनीला बहुधा मी फक्त "हुकूमत" मधे पाहिले आहे. ती जरा तेव्हा गरिबांची अनिता राज वाटायची.
भय्या पोलिस ऑफिसर बना ये जानकर दिल तो बहुत खुश हुआ पर ये आंखे, जिन्हे तुम्हारी जुदाई की आदत नही, खामखां रो पडी >>> हे झीनतच्या तोंडी आहे? कोण होतीस तू, काय झालीस तू! एकेकाळी अमिताभवर नेम धरून त्याला टरकावणारी इथे थेट अलका कुबल झाली!
बाकी बॉक्स ऑफिसवर लाथ, महत्त्वाच्या कामासाठी उकिडवा बसलेला माणूस (literally a party p***er
) , टेबलावरचे मॉरल हायस्टॅण्डिंग, अजिबात झीनतसारखा न दिसणारा पुतळा वगैरे सुपरलोल. हे कोणाचेही म्हणून चालतील असे पुतळे धरमवीर स्कूल ऑफ पुतळा मेकिंग मधून घेतले असावेत 
ब्रिटिश अभिनेत्यांना जसे एकदा तरी किंग लिअर किंवा शेक्सपियर व्यक्तिरेखा करावी लागते, मराठी नाट्यअभिनेत्यांना एकदा तरी नटसम्राट व्हावे लागते तसे ८०ज मधे मेन करियर उतरणीला लागले की तेवढा एक लेडी डाकू रोल करूनच मगच आपल्यापेक्षा वयस्कर हीरोची थोरली भाभी ते आई का करियर ग्राफ चालू करावा असे हिरोईन्सना वाटत असावे.
छान ! काय अब्यास, काय अब्यास.
छान ! काय अब्यास, काय अब्यास. 'गधड्या, सिनेमा इतका लक्ष लावून बघतोस तितका लक्ष देऊन अब्यास केला असतास तर दहावीला सर्व विषय पहिल्याच प्रयत्नात सुटले असते ना! ' हे वाक्य बहुदा लेखकाचा कानात अजूनही घुमत आहे !
हा लेख रोज एकेक परिच्छेद वाचावा लागणार, दुसर्या विन्डो मध्ये सिनेमा लावून !
जबरी लिहिलेय…. भुगोलाचा काय
जबरी लिहिलेय…. भुगोलाचा काय जबरी अभ्यास केलाय!!!!
मी थोडा बघितला. झिनतचे उतारवय दिसते पण आवाज मात्र तसाच आहे. व्हिलनच्या आद्य कर्तव्याला यु ट्युबवर बर्यापैकी सेन्सॉरिंग केले आहे.
मस्त हो पायस… बाकी
मस्त हो पायस… बाकी जिओग्राफिकल अभ्यास विशेष आवडला.
माझा आता रुमाल
माझा आता रुमाल

महाष्ट्रातून आता डाकू हसीना चे youtube वर अचानक views वाढणार आहेत
हा लेख रोज एकेक परिच्छेद वाचावा लागणार, दुसर्या विन्डो मध्ये सिनेमा लावून !+१११
सर्व वाचकांचे आभार
सर्व वाचकांचे आभार

जावेद_खान, हरचंद पालव, rmd, फारएण्ड, vijaykulkarni, साधना, MazeMan, किल्ली >> प्रतिसादाकरता धन्यवाद
यावर कधी सविस्तर लिहिलंस तर ते अफलातून असणार आहे. त्याची प्रचिती आली. >>
तुला बघताना काही जेम्स सापडले तर लिहीच.
'गधड्या, सिनेमा इतका लक्ष लावून बघतोस तितका लक्ष देऊन अब्यास केला असतास तर दहावीला सर्व विषय पहिल्याच प्रयत्नात सुटले असते ना! ' हे वाक्य बहुदा लेखकाचा कानात अजूनही घुमत आहे ! >> विकु
वैचारिक अजगर >> अब्दुल रहमानकी मै अब्दुल रहमनिया >> "डाकू बिजली" मधे ती डाकू बिजलीच आहे या माहितीबद्दल आभार >> फा
पण तुझ्या डोक्यात जी हुकुमतची हिरोईन आहे ती रोशनी नव्हे, ती स्वप्ना. रोशनी म्हणजे रोशनी स्कूल ऑफ अॅक्टिंग - https://youtu.be/rhPHcV8lSx4?t=1793
अवांतर: डाकू बिजली ही एकमेव अमेरिकेत शिकलेली डाकू आहे
कारण तिच्याच शब्दांत "मेरे आने की कीमत हैं सौ हजार और जाने की कीमत दो सौ हजार"
कथानक पुढे नेऊ.
४) कल की भोली भाली रुपा, आज
४) कल की भोली भाली रुपा, आज की डाकू हसीना
४.१) अशिक्षिताचे जीवन फार वाईट
लेडी डाकूपटांमध्ये मेंटॉरचा फ्लॅशबॅक दाखवणे बंधनकारक नाही पण दाखवला तरी काही बिघडत नाही. अशोक रॉयच्या आधीच्या दोन प्रयोगांमध्ये त्याने मेंटॉरचा फ्लॅशबॅक दाखवला नव्हता त्यामुळे यावेळेस त्याने वेगळा ऑप्शन ट्राय केला आहे. तर, डाकू बनण्यापूर्वी मंगल एक सामान्य शेतकरी होता. सामान्य शेतकर्याला साजेसे कर्जाच्या भाराने पिचलेले त्याचे जीवन! फ्लॅशबॅकची सुरुवातच त्याच्या तोंडावर धान्य फेकून होते. त्याचे टुच्चे स्टेटस दर्शविण्यासाठी धान्य फेकताना मागून चिमणीचा आवाज टाकला आहे. फ्रेममध्ये रजनी, विजय अरोरा, आणि दिनेश हिंगू दृष्टीस पडतात. दिनेश हिंगू एमएलएचा मुनीम दाखवला आहे. एमएलए आहे चंद्रशेखर वैद्य - बॉलिवूडमधील घाऊक वकील/न्यायाधीश/पोलिस.
चालू असलेली गडबड ऐकून वैद्य स्वत:च बाहेर येतात. साधारण सिचुएशन अशी - रजनीने शेतजमीन गहाण ठेवून कर्ज घेतले होते, बहुधा विजय अरोराच्या शिक्षणाकरिता. रजनी अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन वैद्याने त्याची जमिन गिळंकृत केली. आपल्या भावाच्या लाचारीने संतप्त होऊन विजयनेच खंडाचे धान्य रजनीच्या तोंडावर फेकले. वैद्य म्हणतात - ये कैसा शोर हैं. रजनी - ये मेरा भाई सोमनाथ, इसने बीए पास किया हैं. वैद्य - ओह तो ये बीए का शोर हैं.
वैद्य पण धोरणी गडी आहे. तो मधाळपणे विजयला म्हणतो की अरे मी गंमत केली. तुझ्या भावाचे कर्ज केव्हाच फिटलं, या मुनिम दिनेश हिंगूला पारशी मिमिक्री करण्यातून वेळ मिळत नाही म्हणून कागदी कार्यवाही काय ती बाकी आहे, उद्याच करून टाकू! इथे विजयने त्याला सन्नदिशी वाजवायला हवी - गंमत? गहाणवटीचे कागद ही काय गंमत करण्याची गोष्ट आहे? पण थोडक्यात मजा हे त्याला कळतं म्हणून तो आणि रजनी परत फिरतात. इथे रजनीच्या तोंडी शिक्षणाचे महत्त्व सांगणारा संदेश आहे - सिर्फ बीए पास करके तुने नेता को ठीक कर दिया. अगर और पढ लेगा तो सारा देश ठीक हो जाएगा.
दुसर्या दिवशी हे दोघे गहाणखत परत आणायला निघतात तर वाटेत त्यांना एका बाईने केलेला धावा ऐकू येतो. इथे प्रेक्षकाला दिसते की एक माणूस आणि त्याची बाईल खोटेखोटेच नाटक करत आहेत. विचक्षण प्रेक्षक लगेच सांगू शकतो की हा तर जोगिंदरचा सेटअप आहे. पुन्हा एकदा: मीनिंगफुल रिपिटिशन्स! जोगिंदरची मोडस ऑपरंडी दोन माणसे पाठवून, डिस्ट्रॅक्शन निर्माण करून हल्ला करणे आहे. रजनी विजयला एकट्याला सोडून काय गडबड आहे ते बघायला जरा दूर जातो. लगेच पाच-सहा साथीदार घेऊन दाढी नसलेला जोगिंदर येतो. पद्मिनीत बसून वैद्य हे सर्व बघत असतोच. तो म्हणतो की "बीए के सर्टिफिकट पर मौत का इस्टार बना दो". जोगिंदर आणि त्याचे साथी बंदूकींचा शिमटीसारखा वापर करून विजयला रासवटपणे ठार करतात. काम पूर्ण करून परत जाणार्या जोगिंदरला रजनी बघतो.
रजनी परत येईपर्यंत खूप उशीर झाला आहे. रक्तबंबाळ विजय शेवटचे आचके देतो आहे. जाता जाता "हे एमएलएचे कारस्थान होते" हे रजनीला कळायला हवे. मग रजनी विजयला खूपशा पप्प्या देतो. या धक्क्याने ऑलमोस्ट ढगात गेलेला विजय मेसेज देण्यापुरता परत येतो. दुर्दैवाने त्याच्या गळ्यावर बंदुकीच्या दस्त्याचा मार पडल्याने त्याला इच्छा असूनही बोलता येत नाही आहे. रजनी म्हणतो की ते काही नाही, जर तू मला प्लॅनरचं नाव सांगितलं नाहीस तर मी सार्या जगाला आग लावेन. विजयचा निरुपाय होतो. तो जमिनीवर रक्ताने इंग्रजीत "एमएलए" लिहून मरतो. पण मंगल अशिक्षित, हा मेसेज त्याला कसा कळणार? मंगल फावडे घेऊन तो डायिंग मेसेज लिहिलेला जमिनीचा तुकडाच खणून काढतो आणि तो तुकडा घेऊन गावातल्या मास्टरजीचे घर गाठतो. मास्टरही आधी त्याचा अवतार बघून हादरतो पण मग परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तो रजनीला मेसेज वाचून दाखवतो.
पुढच्या सीनमध्ये एमएलए शिधावाटप करत आहे. रजनी रक्ताळलेला डायिंग मेसेज घेऊन त्याची वाट बघत जेवणाच्या रांगेत. वैद्यांना कळते की आपली शंभरी भरली. रजनी त्यांचे डोके मफलरमध्ये पकडून दहा ठिकाणी आपटतो. मध्येच आपल्याला " ||श्री|| धर्मसाला में बिश्राम करते समय ध्यान रखे, कचरा न फैलाये" हा सूचना फलकही दिसतो. एमएलएच्या रक्ताचा कचरा पसरवून अशा रीतिने रजनी आपला पहिला अपराध करतो. जोगिंदर इतका पेशन्स नसल्याने, रजनी फार मारहाण करत नाही, सुरा भोसकून कामगिरी फत्ते.
४.२) रुपाचे रुपांतर
रजनी म्हणतो की यानंतर मी दाढी वाढवली, गळ्यात एक रुद्राक्ष बांधलं आणि किसान मंगलसिंहचा खून केला. जेणेकरून डाकू मंगलसिंह जन्मावा. झीनतला लक्षात येतं की धिस इज नॉट दॅट बॅड ऑफ अ डील! पोलिसात गेली तर जेलमध्ये तरी जाईल किंवा पुन्हा कोणी अत्याचारी सामोरा येईल. जर नाही गेली तर जंगलात वणवण भटकेल. डाकू बनली तर डोईवर छप्पर, बदला घेण्याची संधी, आणि थ्रिलिंग लाईफ! ती म्हणते,
"जहां तुमने किसान मंगल को मारा, वहां एक कत्ल और कर दो. जिस रुपाने तुमपर इल्जाम लगाया, उसे मार दो. ताकि एक दुसरी रुपा जन्म ले सके."
रजनी बालेखानला (दरीत चहा पीत बसलेला डाकू) म्हणतो की माझी जुनी बंदूक घेऊन ये. झीनतच्या मापाच्या शर्ट-पँटचाही जुगाड केला जातो आणि तिचं ट्रेनिंग सुरु होतं. किल्ल्यात एका बाजूला टार्गेट प्रॅक्टिससाठी काही जणांचे फोटो लावून झीनत बंदूक चालवायला शिकते. ठाणेदाराला पॉईंट-ब्लँक रेंजमध्ये गोळी घातली म्हणून ठीक होतं पण दरवेळी अशी संधी मिळेल असे नाही. हा विचार करून रजनी तिला थोड्या दुरुन नेम साधायची असाईनमेंट देतो. नॅचरली सुरुवातीला तिचा नेम लागत नाही. गँगमधले सगळे डाकू हसतात. पण रजनीने जो बोलरचा ग्रोथ माईंडसेटचा कोर्स केलेला आहे. तो म्हणतो की तुम्हाला तरी पहिल्या फटक्यात कुठे नेम धरता आलेला? ती प्रयत्न करते आहे तिला प्रोत्साहन द्या. तो म्हणतो की उठ आणि पकड. झीनत उठते आणि पकडते. तो म्हणतो मला नाही बंदुकीला पकड. त्याच्या गळ्याभोवती हातांची मिठी घालून ती त्याच्यासोबत बंदूक पकडते. नेम तरी साधला जात नाहीच. मग रजनी टॅकटिक्स बदलतो. तो म्हणतो की विचार कर की समोर टार्गेट्स नाहीत तर तेच कुत्रे आहेत ज्यांनी तुझ्यावर अत्याचार केले. धांय धांय धांय धांय. पुढच्याच सेकंदाला झीनत त्या टार्गेट्सचे डोळे फोडते.
लेडी डाकू बनण्याची प्रोसेस पूर्ण करायला फक्त दोन्ही प्रकारचे घोडे चालवता येणं बंधनकारक आहे - पहिला घोडा तर झीनतला जमला. आता दुसरा घोडा. तिच्यासाठी एक उमदा पांढरा घोडा आणला जातो. एव्हाना गँगमेंबर्सनाही झीनतच्या मेहनतीचे कौतुक वाटायला सुरुवात झालेली आहे. ती रपेट करण्याच्या प्रयत्नात घोड्यावरून पडते. ते काळजीपोटी तिच्या मदतीला धावू बघतात तेवढ्यात रजनी आडवा येतो. तो म्हणतो की ग्रोथ माईंडसेटसाठी नुसतं इंटरव्हेन्शन नाही तर टार्गेटेड इंटरव्हेन्शन करायचं. इथे तिला मदतीची गरज नाही, तिचं ती शिकायला समर्थ आहे. आता एवढा एक्सपर्ट शिक्षणतज्ज्ञ शिकवणार म्हणजे हा दुसरा घोडाही जमणारच. झीनतला रपेट करताना दाखवून प्रेक्षकाला हे कळवले जाते. बंदूक जमली, घोडेस्वारी जमली. म्हणजे ती डाकू झालीच. आता औपचारिक शिक्कामोर्तबच काय ते बाकी.
एकदाचा तिचा युनिफॉर्म शिवून येतो. काळे रायडिंग बूट टॉकटॉक वाजवत झीनत पायर्या उतरून तळमजल्यावर येते. रजनी देवपूजा करतो आहे. मग तळपायापासून चेहर्यापर्यंत कॅमेर्याचा प्रवास पूर्ण होतो. काळ्या रंगाचे शर्ट पँट, शर्टचे पहिलं बटण उघड सोडलेलं. दोन बेल्ट, एकाला गोळ्या ठेवण्यासाठी जागा (गनबेल्ट) पण आत्ता मोकळा. तर दुसरा ओटीपोटापाशी फॅशनेबल बेल्ट ज्याला चेन जोडून ती तशीच लटकती सोडली आहे. दोन्ही मनगटात स्पाईकी ब्रेसलेट्स. उजव्या हातात चंबळ डाकू श्टँडर्ड १२ गॉज डबल बॅरल रायफल, डाव्या हातात रायफलच्या गोळ्यांचा खांद्यावर घेण्याचा पट्टा. लांब केसांचा विग काढल्यामुळे - सॉरी टोळीतल्या कामचलाऊ न्हाव्याने कापल्यामुळे विस्कटलेले, मानेवर रुळणारे केस. झुलपे डोळ्यांवर येऊ नयेत म्हणून कपाळावर बांधलेली लाल रंगाची पट्टी. ही वेशभूषा बघितल्यावर आपल्याला लक्षात येते की झीनत आता अधिकृतरित्या डाकू बनली आहे.
४.३) गँगप्रवेश
रजनी आपल्या गँगच्या सगळ्या लोकांना बोलावून घेतो. तो म्हणतो की बघा काय झालं
"गजब हो गया. जंगल की हिरणीने शेरणी की खाल पहन ली हो"
झीनत - "खालही नही पहनी, सीने में शेरनी का दिल भी लगा लिया हैं. अब इस शेरनी को शिकार की जरुरत हैं. मुझे सुनार के पास ले चलो मंगल."
रजनीदेखील विचारात पडतो. या बयोचं सोनाराकडे काय काम? पहिला दरोडा सोनाराच्या दुकानावर घालते की काय? चेकॉव्हज गनचा विचार केला की असे प्रश्न नाही पडत. आत्तापर्यंत चित्रपटात सोन्याचा उल्लेख एकदाच झालेला आहे - बलात्कार केल्यानंतर रझा सोन्याच्या नाण्यांची थैली देतो तेव्हा. झीनतलाही त्याने सोन्याची नाणी दिली होती. त्यांचं काय झालं? म्हणजे त्या नाण्यांचा इथे वापर होणे अनिवार्य आहे नाहीतर त्या सेटअपला काही अर्थ नाही.
तसेच होते. आधी सोनार घाबरतो पण झीनत त्याला म्हणते की शांत हो, माझं काम आहे तुझ्याकडे. या सोन्याच्या नाण्यांपासून चार सोन्याच्या गोळ्या बनव आणि त्या गोळ्यांवर चार लांडग्यांची नावं घालून दे. झीनतवर रजनीचा प्रभाव पडल्याची ही पहिली लक्षणे. तिचा प्लॅन आहे की त्या लांडग्यांनी दिलेलं सोनं ती त्यांनाच ठार करायला वापरणार - प्रत्येकाचे नाव एका गोळीवर लिहिलेलं आहेची स्वॅगर-मॅक्स आवृत्ति! उर्वरित सिनेमात झीनतचा स्वॅगर प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढतच जाणार आहे. या सीनमध्ये तिने खांद्यावरून सतरंजी घेतल्याचे नोट करा. हे तिचे वाढलेले पोट लपवण्यासाठी आहे. झीनत या चित्रपटातील काही सीन्समध्ये ८ महिन्यांची प्रेग्नंट आहे. तिने दिलेल्या मुलाखतीवरून (https://www.deccanherald.com/content/55256/zeenat-aman-trailblazer.html) हे शूटिंग तिच्या संमतीने केले गेले असावे असे मानायला वाव आहे, शी डझन्ट सीम टू हॅव एनी रिग्रेट्स. अगदीच कंटाळा आला तर झीनत कोणत्या सीन्समध्ये प्रेग्नंट आहे आणि कोणते सीन्स पोस्ट-डिलीव्हरी आहेत हे ओळखण्याचा खेळ खेळता येतो. कमिंग बॅक, सोनार तिची ऑर्डर घेतो आणि याविषयी कोठेही वाच्यता न करण्याचे मान्य करतो. रजनी आणि झीनत त्याला पैसे देऊन होम डिलीव्हरी करायला सांगतात.
तिकडे अड्ड्यावर झीनत पूजेतल्या देवीच्या मूर्तीला आपल्या डाव्या अंगठ्याच्या रक्ताचा अभिषेक करते. त्यातलेच थोडेसे रक्त घेऊन गँगचा पुजारी तिला तिलक करतो. आता ती अधिकृतरित्या टोळीची सदस्य झाली. त्यानुसार तिचे नाव बदलायला हवे.
"जुल्म के माथे पर तू मौत का पसीना हैं, आज के बाद तू रुपा नही हसीना हैं"
डाकू हसीना आता चंबळच्या खोर्यात थैमान घालायला सज्ज आहे. तिची साहसे लवकरच पुढील भागात.
फा Lol पण तुझ्या डोक्यात जी
फा Lol पण तुझ्या डोक्यात जी हुकुमतची हिरोईन आहे ती रोशनी नव्हे, ती स्वप्ना. रोशनी म्हणजे रोशनी स्कूल ऑफ अॅक्टिंग >>> अरे हो की!
टोटल मिक्स झाले डोक्यात! मग रोशनीलाही कोठेतरी पाहिलेले आहे. आता आठवत नाही.
रोशनीलाही कोठेतरी पाहिलेले
रोशनीलाही कोठेतरी पाहिलेले आहे
>>
पाकिस्तानी मौला जट्ट चा रिमेक होता ना कोणता तरी. त्याच्यात होती
हीच ती
हीच ती
https://youtu.be/zNKrAOs5nqA
५) डाकू जीवनाची पहिली पाऊले
५) डाकू जीवनाची पहिली पाऊले
५.१) आधुनिकोत्तरवाद
मौत का पसीना बनलेल्या डाकू हसीनाला कळवले जाते की आता तिला "इस खून के तिलक की कीमत अदा करनी होगी". सोप्या शब्दांत क्लब मेंबरशिपची फी भर. अजून स्पष्ट शब्दांत या टोळीमध्ये सामील झालेल्या प्रत्येक सदस्याला एका दिवसासाठी टोळीचा सरदार बनवले जाते. त्या दिवशी या तात्पुरत्या सरदाराने टोळीचे नेतृत्व करून एक दरोडा घालणे अपेक्षित आहे. तो दरोडा यशस्वी झाला तर तुम्ही कीमत अदा केली. इथे असे मूकपणे सूचित केले आहे की दरोडा अयशस्वी झाला तर तुमचे सदस्यत्व रद्द! हा पूर्णपणे आधुनिकोत्तरवादी टेक आहे, जो भारतीय लेडी डाकूंसाठी खूपच युनिक आहे. यावर थोडे विचारमंथन करूया -
बेसिकली, आधुनिकोत्तरवादामध्ये (postmodernism) डिकन्स्ट्रक्शन ही एक मेजर थीम आहे. लेडी डाकू बनणे म्हणजे काय? जर तुम्ही डाकू बनून फक्त तुमच्यावर अत्याचार केलेल्यांचा विरोध करणार असाल तर डाकू बनणे एक सोशल ट्रॅन्झॅक्शन झाली - प्रस्थापित डाकू टोळीने तुमचा बदला अंगावर का घ्यावा? जनरली या प्रश्नावर उत्तर म्हणून भारतीय दिग्दर्शक असे दाखवतात की लेडी डाकूचे वडील डाकू सरदार आहेत किंवा तिचा प्रियकर डाकू सरदार आहे आणि डाकू सरदारास लेडी डाकूला मदत करण्याचे सबळ कारण मिळते. पण मग ती ही सोशल ट्रॅन्झॅक्शन गृहित धरून फक्त तिच्या गुन्हेगारांवरच हल्ला करते, उदा. सीतापुर की गीतामधील हेमा मालिनी.
या उलट जर लेडी डाकूने स्वत:च्या हिंमतीवर एखादा दरोडा प्लॅन करून एक्झिक्यूट केला तर सर्व टोळीला तिला सीरिअसली घ्यावेच लागेल. तसेच ती जनरिक बदला घेणारी हिरवीण राहणार नाही. याशिवाय संपूर्ण टोळीला एक कॅपिटलिस्ट कॉर्पोरेट स्ट्रक्चर मिळेल - तिलक की कीमत रसम ही टोळीतील पोझिशनसाठीचा कोडिंग इंटरव्ह्यू नाही का? त्या काळच्या समाजवादी विचारधारणेस जवळ असलेल्या भारतात जर एक डाकू टोळी भांडवलवादी पद्धतीने कारभार हाकत असेल तर त्यांनाच बागी म्हणवून घ्यायचा हक्क आहे.
इन थिअरी, कोणीतरी हा सेटअप खूप विचार करून लिहिला आहे. त्यांचे एक्झिक्यूशन बघितल्यावर मात्र प्रेक्षकाचे तात्विक विचारमंथनाचे विमान दणकन सत्याच्या जमिनीवर आदळते.
५.२) पहिला दरोडा
कल्ला नावाचा सदस्य सोनाराची गोळ्यांची होमडिलीव्हरी, चार गोळ्या एका नेकलेसमध्ये बसवलेल्या, घेऊन येतो. तो म्हणतो की असं कळलंय की कोणा राजा प्रतापसिंहने त्याची फेमस नटराजच्या मूर्ती विकायला काढली आहे. उद्या सकाळी ती डिलीव्हरीला बाहेर पडणार आहे.
झीनत - "सुबह तब होगी कल्ला जब सूरज निकलेगा. और सूरज तब निकलेगा जब नटराज की मूर्ती सरदार मंगलसिंह के हाथों मे होगी."
इथे ती तो गोळ्यांचा नेकलेस मंगळसूत्राप्रमाणे गळ्यात घालते. हा इतका भारी नेकलेस आहे की तिच्या सगळ्या डाकूगिरीमध्ये एकदाही तो गळ्यातून खाली पडत नाही.
मग भर दुपारी हे सगळे दरोडा घालायला निघतात. साधारण झीनतसारखा दिसणारा/री स्टंट डबल पूर्ण घोडदौडीच्या सीक्वेन्समध्ये सर्वात पुढे आहे, प्रॉप्स फॉर दॅट. आता झीनतचं प्लॅनिंग बघूयात. डोंगरावरील एका वाड्यात ही मूर्ती आहे. तिच्या राखणीसाठी बरेच गार्ड्स आहेत. मंगलसिंह आणि बरीचशी गँग घोडे घेऊन पुढच्या दरवाज्यासमोर जातात. मग ते घोड्यांवरून उतरून घोडे एंट्रन्सच्या जिन्यावरून आत सोडतात. या घोड्यांना बघून ते गार्ड्स चक्रावतात. ते घोड्यांना आवरू बघतात. या डिस्ट्रॅक्शनचा फायदा घेऊन रजनी आणि कंपनी पाठीमागून येऊन त्यांना गोळ्या घालतात.
दुसर्या फ्रंटवर झीनत आणि हरिया या रणधुमाळीचा फायदा उठवत मुख्य इमारतीत प्रवेश करतात. आत एका दालनात सहा गार्ड्स मूर्तीच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. हे दालन एका तळघरात असावे कारण आत येण्याचा जिना उतरता आहे. व्हँटेज पॉईंटवरून झीनत परिस्थितीचा अंदाज घेते. मग ती एक गोळी मूर्तीच्या अलार्म सिस्टिमवर फेकून मारते. गार्ड्स डिस्ट्रॅक्ट होऊन आधी अलार्म सिस्टिम फोडतात. मग झीनत त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते आणि हरिया याचा फायदा घेत तीन गार्ड्सना ठार करतो. इथे झीनतकडे डॉजिंग स्किल्स असल्याचे सिद्ध होते. आता उर्वरित गार्ड्स हरियावर लक्ष केंद्रित करतात. तर झीनत पाठीमागून येऊन त्या तीन गार्ड्सना ठार करते (खून क्र. २,३,४). इथे नोंद घ्या की तिने साधारण चार हातांवरून नेम साधला आहे जो पॉईंट ब्लँक रेंजपेक्षा जास्त दुरून आहे पण अजूनही बराच जवळून. ही नोंद (५.३) मध्ये कामी येईल. बाहेर रजनी मुख्य गार्डाला नेस्तनाबूत करतो. झीनतचे प्लॅनिंग यशस्वी झाले, अगदी अॅग्रेसिव्ह हरियादेखील झीनतच्या प्लॅनिंगला दाद देतो.
५.३) युनुस परवेझचा अंत
कट टू किल्ला. रजनी खुल्या दिलाने मान्य करतो की डाकू हसीना सर्वार्थाने बागी म्हणवून घेण्यास लायक आहे. हे मान्य करावेच लागेल की झीनत अत्यंत सिस्टेमॅटिक डाकू आहे. प्रतापसिंहचा आणि हसीनाचा काहीही संबंध नाही, तो दुष्ट ठाकूर असल्याचा काहीही पुरावा नाही, तरी तिने त्याच्यावर दरोडा घातला. पूर्ण प्लॅनिंग करून. याने तिने दोन गोष्टी साध्य केल्या - टोळीचा विश्वास संपादन केला आणि तिने ट्रायल रन घेतली. भले ती मूर्ती विकून पैसे जास्त मिळतील पण हसीनासाठी हे लो स्टेक्स काम होते. तसेच इतर गँग रसमच्या नावाखाली का होईना, सोबत असल्यामुळे चान्सेस ऑफ फेल्युअर वेअर व्हेरी लो. आता ती आत्मविश्वासाने डाकूगिरी करायला आणि बदला घ्यायला सुरुवात करू शकते.
पुन्हा एकदा: प्रत्येक गोष्ट आपल्याला दोन वेळा दाखवली जाते. मुख्य खुनांच्याआधी झीनत बदल्याशी संबंध नसलेला काहीतरी गुन्हा करते. ती तिची ट्रायल रन असते. मगच ती मुख्य व्हिलन्सपैकी कोणालातरी ठार करायला जाते.
झीनत टेचात म्हणते की आता मी प्रॉपर डाकू झाले. यापुढे मी बदल्यावर लक्ष केंद्रित करणार. पुढे ती तसे करत नाही - इथे सटली झीनत डाकू लाईफ एंजॉय करत असल्याचे अधोरेखित केले आहे. याने ती इतर लेडी डाकूंपेक्षा सरस ठरते कारण तिला आधुनिकोत्तर मोरल रिलेटिव्हिस्टिक बैठक प्राप्त आहे. पण बदलाही घेतला पाहिजेच. त्यानुसार पहिला नंबर युनुस परवेझचा लागतो. युनुस परवेझ दारू ढोसून घरी येतो. त्याने घरी छपरी पलंग घेऊन ठेवला आहे. निद्रादेवीचा आसरा घेण्यासाठी तो पलंगाभोवतीचा पडदा बाजूला करतो तर पलंगावर डाकूच्या वेषात झीनत!
"रुक क्यों गये, मैं तेरी अमावस की रात में पूनम का चांद निकालने आयी हूं"
युनुसची जाम टरकते. त्यात झीनत त्याला फुल्ल रजनी स्टाईल मध्ये पडल्या पडल्या लाथ मारून जवळ बोलावते. त्याची सगळी नशा खाडकन उतरते.
"रुपा?"
"हसीना बोल. डाकू हसीना."
युनुसला कळून चुकते की आज आपली पुण्यतिथी आहे. त्यात झीनतला जो काही स्वॅगर मॅक्स कॉन्फिडन्स आहे की बस. तिने बंदूक पलंगावर ठेवली आहे, युनुसच्या रेंजमध्ये. इतर कोणा व्हिलनने किमान ती बंदूक घ्यायचा प्रयत्न तरी केला असता. पण झीनतला पक्के ठाऊक आहे की युनुसमध्ये शून्य गट्स आहेत. ती त्याला नेकलेस दाखवून म्हणते की तुझं नाव असलेली गोळी काढ. युनुस घाबरत घाबरत "ठेकेदार" लिहिलेली गोळी काढून झीनतकडे देतो. ही गोळी अर्थातच प्रतीकात्मक आहे, सोन्याच्या शेलमध्ये गनपावडर भरली तर ती बंदूकीतच फुटेल. खेद इतकाच की त्या सोनाराने लाल पेंटने त्या गोळीवर ठेकेदार लिहिलं आहे. मला वाटलं भांड्यांवर नाव टाकतात तसं टाकून देईल पण नाही.
मग काय? झीनत बंदूक घेते आणि चार हातांवरून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या युनुसला गोळी घालून ठार करते. (खून क्र. ५) या डायमेन्शन बेंडिंग गोळीमुळे पळणारा युनुस परत पलंगात येतो आणि झीनत कुठे गायब होते कोणास ठाऊक. पण महत्त्वाची गोष्ट काय तर झीनतला आधीच्या ट्रायल रनमुळे आपला नेम काय रेंजमध्ये बसतो हे कळले. म्हणून तिने युनुसला इतक्या जवळून गोळी घातली. जशी ती अजून गुन्हे करेल तसा तिचा नेम सुधारेल आणि ती बदल्यासाठी वेगळे प्लॅन्स आखू शकेल. सिस्टेमॅटिक डाकू!!
पोलिसांना चिठ्ठी लिहून झीनत अजून तीन खून करणार असल्याचे कळवते (स्वॅग!!). पोलिसही रझाला कळवतात की कोणीतरी आहे ज्याच्यापासून तुला सावध राहिले पाहिजे. रझाकडे आत्ता फार ऑप्शन्स नसल्यामुळे तो इन्स्पेक्टरला कसून तपास करायला सांगून निघून जातो.
खेद इतकाच की त्या सोनाराने
खेद इतकाच की त्या सोनाराने लाल पेंटने त्या गोळीवर ठेकेदार लिहिलं आहे. मला वाटलं भांड्यांवर नाव टाकतात तसं टाकून देईल पण नाही.>>>

१. लाल रंगात MLA लिहुन
१. लाल रंगात MLA लिहुन झाल्यावर उरलेला रंग उगीच वाया का घालवा हा समाजवादी विचार असेल.
२. कोरुन नाव घातलेले चटकन दिसत नाही. ठसठशीत लाल रंगात लिहिलेले नाव योग्य वेळी झिनतला पण दिसेल आणि ज्याच्यासाठी बनवलीय त्यालाही दिसेल. उगीच ह्याची गोळी त्याला असे होणार नाही.
साधना पॉईंट आहे.
साधना
पॉईंट आहे.
६) प्रभावक्षेत्राचा विस्तार
६.१) अँटी डाकू इन्स्पेक्टर
बहीण तर डाकू बनली आता भावाचे काय चालले आहे ते पाहुया. मध्यंतरी काही काळ लोटला असावा. रारोचे पोलिस ट्रेनिंग पूर्ण झाले असून आता तो इन्स्पेक्टर बनला आहे. इथे त्याच्या स्टायलिश एंट्रीच्या बॅकग्राऊंडला "हम सब चोर हैं" अशी पाटी ठेवण्याचा दिग्दर्शकीय टच! बहिणीप्रमाणेच यालाही शर्टाचे पहिले बटण न लावण्याची सवय आहे. कुठल्याशा चिंचोळ्या गल्लीच्या टोकाशी जीप थांबते आणि रारो समोरच्या बिल्डिंगचा जिना चढतो. दारावर टकटक केले जाते आणि दार उघडणार्या माणसाला श्वास घ्यायचीही संधी न देता रारो हाणामारी सुरु करतो. भारतीय जनतेत भांडण होते आहे हे जाणवण्याची अतिंद्रिय शक्ती असल्याने लगेच गर्दी जमते. रारो एका उघड्याबंब माणसाला वरच्या मजल्यावरून फेकून देतो. गर्दी या प्राण्यास बहुतही खतरनाक डाकू बशीरा म्हणून ओळखते. याला ऑफस्क्रीन अटक होते. रारो तडफदार पोलिस अधिकारी आहे एस्टॅब्लिश करणे एवढाच या सीनचा हेतु.
कमिशनर रमेश देव रारोच्या पराक्रमाने खुश होऊन त्याला बोलावून घेतो. रमेशला ठाऊक आहे की रारोला त्याच्या गावी बदली करून हवी आहे. पण तिथे कोणी इन्स्पेक्टर रेगे (युनुसची केस बघत असलेला इन्स्पेक्टर) ऑलरेडी आहे आणि रेगेला डाकू हसीनाला जिवंत पकडायचे आहे. (डाकू हसीना आता कुख्यात डाकू बनल्याचे आपल्याला कळवले आहे.) रारो रमेशना सांगतो की तुम्हाला तर माहितीच आहे की माझी संपूर्ण फॅमिली डाकूंकडून मारली गेली. पण झीनतने तर ऑन पेपर आत्महत्या केली. खोटारडा कुठचा! पण रमेशना त्याच्या भाबड्या आत्मविश्वासाचे "मैं धरतीसे सारे डाकूओं का नामोनिशान मिटा दूंगा" कौतुक वाटते. ते म्हणतात की मी तुला इन्स्पेक्टर म्हणून नाही तर एएसपी म्हणून तुझ्या गावी पाठवणार आहे. (हा काय "एमए किया हैं, अरे वाह बीए भी किया हैं" छाप बावळटपणा आहे?") त्याचे प्रमोशन झाले आहे. पण संपूर्ण सिनेमात त्याला रमेश एकटाच एएसपी (असिस्टंट एसपी) म्हणतो बाकी सगळे एसपी म्हणतात. हा नक्की कोणत्या पदावर आहे?
६.२) एकाच वेळी दोन ठोकळे नाचवायचे नसतात
कमर्शिअल कारणांसाठी अधून मधून गाणे टाकणे भाग आहे. त्यानुसार चेक्सचा शर्ट घालून रोशनी येते. रमेश देव हिचे वडील असल्याचे कळते. इथे रारो तिला पाहून काहीतरी चित्रविचित्र आवाज काढतो. हे आवाज बघता कोई मिल गयाच्या हृतिकची क्षणभर आठवण येते. पोलिसात सिलेक्शन झाले तर रारोला चुम्मा मिळाला होता. प्रमोशन झाले तर गाणे व्हायलाच पाहिजे. त्यानुसार रोशनी गुलाबी साडी नेसते पण पहिल्याच फ्रेममध्ये ती पदर बाजूला सारते. ते दोघे पुन्हा त्यांच्या आवडत्या नदीकाठच्या स्पॉटवर जातात आणि रोमान्स सुरु.
बोल आहेत - अंग जले गोरा रंग जले. गायलंय सुरेश वाडकर आणि अलका याज्ञिकने. पहिले गाणे एकदम क्लासिक कव्वाली दिल्यानंतर दुसर्या गाण्यात पाट्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकाला गाण्यातील डान्समध्ये एंटरटेनमेंट शोधावी लागते. ज्यांनी ज्यांनी जीने नही दूंगा पाहिलाय त्यांना ठाऊक आहे की रोशनीला नाचता येत नाही. रारोही नृत्यकुशल नाही. बॉलिवूडचा टॅलेंट पूल पाहता हा काही तेवढा मोठा दोष नव्हे पण त्यासाठी कोरिओग्राफरने हुषारीने या ठोकळ्यांना लपवले पाहिजे. ते जमले नाही की काय होते ते प्रेक्षकाला बघायला मिळते.
उदा. धृवपद आणि पहिल्या कडव्याच्या कनेक्टिंग पीसमध्ये रोशनीच्या उड्यांचा डोळे दिपवून टाकणारा आविष्कार बघावा. तिचा सपोज्डली सेन्शुअल वॉक बेताल तर आहेच पण कॅमेरामनने चुकीचा अँगल लावून ज्या कारणासाठी तिचा पदर ढाळला गेला त्या कारणाचा वापर करू दिलेला नाही. तसेच तिला फूटवर्क नाही आहे. अशावेळी तिचा चेहरा किंवा फिगर डान्समध्ये वापरली पाहिजे. असे असताना तिला उड्या मारायला लावणे म्हणजे हरमनप्रीतला अंपायरवर भडकू नको म्हणण्यासारखे आहे. रारोला गाण्यात डान्सच्या नावाखाली मॉर्निंग वॉक घ्यायला लावायची परंपरा जुनी आहे. उपलब्ध डेटा पॉईंट्सवरून अस्मादिकांच्या मते याचे कारण या गाण्यात चित्रकर्मींनी दोन शत्रू एकाचे वेळी अंगावर घेतले आहेत. रारोचे एकतर फारसे डान्स नाहीतच आणि ज्यात आहेत त्यात एकतरी नृत्यकुशल व्यक्ती त्याच्या सोबत असते व रारो फक्त एकडून तिकडे जातो. यावरून असे म्हणता येते की रारोला रोशनीपेक्षाही कमी डान्स येतो. अशावेळी दोन ठोकळे लपवणे महाकर्मकठीण आहे. सुदैवाने हे गाणे फारसे लांबवलेले नाही.
६.३) नेक्स्ट लेव्हल रॉबिनहूड
या दोघांची ऑकवर्ड मिठी बघताच दिग्दर्शकाला लक्षात येते की सिनेमा झीनतच्या डाकूगिरीच्या जीवावर सुरु आहे. लगेच आपल्याला एका गावाचे दृश्य दाखवले जाते जिथे एक गावकरी दुरूनच झीनतला बघतो आणि तिला डाकू हसीना म्हणून ओळखतो. आपल्या घोडदळासोबत झीनत गावात प्रवेश करते. तिच्या भीतिने सर्व गावकरी आपापल्या घरांची दारे लावून चिडीचूप बसतात. गावातल्या चौकात सगळे डाकू जमा होतात आणि झीनत लाऊडस्पीकरवर आपल्या मागण्या स्पष्ट करते - पाच मोजायच्या आत मला पाच लाख रुपये हवेत. कॅश किंवा दागिने, चेक्स चालणार नाहीत. जर मला पाचपेक्षा जास्त आकडे मोजायला लागले तर "मैं गाव के किसी भी ठकुरायन को मांग में सिंदूर भरने के काबिल नही छोडूंगी और तुम्हारी औलाद भूखे जानवरों की खुराक बनने के लिए आसपास के जंगलो में पडी होगी." क्लिअरली हा बहमाई हत्याकांडाचा संदर्भ आहे जिथे फूलनदेवीने गावातील सर्व उच्चवर्णीय पुरुषांना ठार केले होते.
पाच मोजल्यानंतर झीनत कत्लेआम सुरु करणार इतक्यात गावकरी पैसे घेऊन हजर होतात. ती गावकर्यांना बांधायला सांगते आणि पैसे घेऊन फरार होते. (दरोडा क्र. २) इथे हसीनाचा वाढता प्रभाव दाखवला आहे. गावकर्यांना तिला खंडणी द्यायला बाध्य करायला आता फक्त तिचे नाव पुरेसे आहे पण ती गब्बर लेव्हलपर्यंत अजून पोहोचलेली नाही. तिला स्वत:ला अजूनही यावे लागते, याचा अर्थ हर सीलिंग इज स्टिल हाय. पुन्हा या गावाचा आणि तिच्या बदल्याचा काही संबंध नाही. तिच्या गळ्यातल्या तीन गोळ्या सांगतात की तिला बदल्याची कसलीही घाई नाही. ती डाकू लाईफ पूर्णपणे एंजॉय करते आहे.
तिचा स्वॅगही वाढला आहे. जनरली बॉलिवूडचे चांगले डाकू एखाद्या मंदिरात पैसे वाटप करतात. त्यांच्या अड्ड्यावर कोणाला येऊ देत नाहीत. बट हसीना डझन्ट गिव्ह ए फ्लाइंग एफ. ती तिच्या किल्ल्यात बसून खुल्लमखुल्ला पैसे आणि अन्नधान्याचे वाटप करते आहे. लोकही पोती भरून शिधा, पैसे, दागिने वगैरे घेऊन जात आहेत. असे दिसते की रारोचे प्रमोशन होईपर्यंत हिने खोर्यातील जवळपास सगळे ठाकूरवर्गीय प्राणी लुटले असावेत कारण ती जेवढे वाटते आहे ते बघता हिच्या किल्ल्यात अलिबाबाच्या गुहेपेक्षाही जास्त खजिना असावा. तरी हरिया तिला म्हणतो की जरा जपून पण तिच्या एका कटाक्षात तो गपगार होतो. झीनत टोळीची एक्झिक्युटिव्ह सरदार असल्याचे क्लिअरली जाणवते आहे, रजनी केवळ नामधारी सरदार.
बरं हिची रॉबिनहूडगिरी एका सार्वभौम राजाला लाजवेल या लेव्हलवर चालली आहे. आंधळ्याला जीवन व्यतित करता यावे म्हणून ती म्हैस देते (ही बया म्हशी पण चोरते??). कोणा चंदाचे लग्न धूमधडाक्यात व्हावे म्हणून थेट हिरवीगार थप्पी काढून देते. जवळ एका घमेल्यात कॅश आणि दागिने न्याहरीच्या टेबलावर फळफळावळ ठेवावे तसे ठेवले आहेत. कहर म्हणजे कोणा मुरलीची जीभ ज्या ठाकूरने कापली त्याला ती त्याच ठाकूरची जमीन परस्पर देऊन टाकते. म्हणजे कागद बिगद नाही देत, तर म्हणते की जा जाऊन जमीन कसायला लाग कारण हिच्या दहशतीने माणसे तर सोडाच जनावरेही त्या जमीनीत घुसण्याचे धाडस करणार नाहीत. काय कॉन्फिडन्स आहे!!!
नोंद: हा मुरली म्हणजेच या सिनेमाचा लेखक राजीव कौल होय.
दान झाले आता न्याय होतो. सिनेमाच्या सुरुवातीला ज्या दोघांनी नंदिता पुरीला (हिचे सिनेमातले नाव कमला) उचलण्यात दुर्जनची मदत केली होती, रजनीने त्यांना शोधून किल्ल्यावर पाठवले आहे. हसीना त्यांना बिनदिक्कतपणे डबल बॅरल शॉटगनने गोळ्या घालते (खून क्र. ६ व ७).
पुढच्या सीनमध्ये ती असाच कुठेतरी दरोडा टाकून परत येत असताना तिला हमरस्त्यावर एक बस आणि विलाप करणारे प्रवासी दिसतात. जोगिंदरने ही बस लुटली आणि या प्रोसेसमध्ये बरेच प्रवासी ठार केले. या रडारडीत एक लहान मुलगी तिच्याच वडलांच्या प्रेताखाली सापडते. तिची आई सोबत नसल्याने ती आईचे नाव घेऊन रडते आहे. इथे एक कंटिन्यूटी मिस्टेक आहे. तिच्या नेकलेसमध्ये आत्ता दोन गोळ्या आहेत पण आत्तापर्यंत तिने चारपैकी फक्त युनुसलाच मारले आहे. पोलिस कधीही येण्याची शक्यता असल्याने बालेखान हसीनाला तिथून निघण्याचा सल्ला देतो. त्यानुसार ते तात्पुरते त्या मुलीला सोबत घेऊन परत फिरतात.
या मुलीमुळे हसीनाच्या आयुष्यात काय वादळ येणार आहे?
सावकाश वाचतो आहे. ५ वर आहे
सावकाश वाचतो आहे. ५ वर आहे आत्ता.
मस्त मस्त. अनेकदा
मस्त मस्त. अनेकदा वाचण्याजोगे आहे. ह्या सर्वांचे पॉडकास्ट करा मालक.
हपा का गेला नाहीत ?
गल्ली चुकली. क्षमा असावी.
मस्त चालू आहे रिव्ह्यू.
धर्मशाळेतल्या सुचनेचे वर्णन
धर्मशाळेतल्या सुचनेचे वर्णन ऐकुन तुमच्या पारखी नजरेची खात्रीच पटली.
७) भावबंध
नवीन प्रतिसादांचे आभार
७) भावबंध
७.१) नस्तं लचांड
किल्ल्यात रजनी यांची वाट बघतो आहे. झीनत त्याला मोठ्या उत्साहाने आपण उचलून आणलेली मुलगी दाखवते. लेकिन जहां आठों पहर गोलियां बरसती हो वहां लोरिया नही पनप सकती. तो म्हणतो की हिला परत सोडून ये. त्याचा मुद्दा व्हॅलिड आहे. ते बसमधले लोक त्या मुलीचे गाववालेच असणार. मग त्यांच्यासोबत ती आपसूकच गावी परत गेली असती. फार फार तर प्रोटेक्शन म्हणून एखादा डाकू सोबत पाठवता आला असता. आता या मुलीला किल्ल्यात कुठे ठेवणार? हिच्या आईला कोण शोधणार? गरीब लोक आपल्याला देवी समजत असले तरी प्रत्यक्षात आपण डाकूच आहोत याचा हसीनाला विसर पडलेला दिसतो.
आता हे दोघे प्रॉपर नवरा-बायकोप्रमाणे भांडत आहेत. मंगल म्हणतो की भावनेच्या भरात वाहून जाणं डाकूंना परवडण्यासारखं नाही. तू या मुलीला एखाद्या अनाथाश्रमात सोडून ये. हसीना फणकार्याने "तुमही इसे छोड आओ" म्हणून रुसून बसते. बाकीचे डाकू सूज्ञपणे पारिवारिक भांडणात न पडता गप्प उभे राहतात. मग ती मुलगी रजनीला म्हणते की मी येते तुझ्यासोबत हसीना आंटीशी भांडू नकोस. पण मला सोडणार असशील तर कडेवर घ्यायचं. रजनी म्हणतो ठीक आहे आणि किल्ला उतरू लागतो.
रजनी तिला तिचे नाव विचारतो. ती म्हणते की मेरे मामा मुझे चुडैल कहते हैं. इथे सटली तिच्या आईच्या माहेरचे छळवादी असल्याचे सूचित केले आहे (मामा मां को बहुत मारते हैं). म्हणून या मुलीला घरी जाण्यात फारसा इंटरेस्ट नाही कारण आता बापही जिवंत नाही. मग ती अक्कलहुषारी दाखवत रजनीला आपल्या खिशात घालते. थोड्या वेळापूर्वीच झीनतला भावनेच्या भरात वाहून जाऊ नको सांगणारा रजनी सेम ट्रॅपमध्ये अडकतो. तो हिला परत घेऊन येतो, तिचे गुड्डी असे नामकरण करतो, आणि किल्ल्यात राहायची परवानगी देतो. झीनत आणि बाकी गँग याने आनंदते.
कट टू रात्र. झीनत रात्रीसुद्धा गळ्यात सोन्याच्या गोळ्यांचा नेकलेस घालूनच झोपते. गुड्डी येऊन तिला म्हणते की मला बाहेर भीति वाटते, झोप येत नाही. झीनत म्हणते की एवढंच ना, माझ्यापाशी झोप. गुड्डी भलतीच लाडात येऊन म्हणते की मी तुला छोटी मां म्हणू? झीनतही पाघळते आणि तिला कवेत घेते. हा लेखकाचा लाँग टर्म सेटअप आहे. चित्रपटातले व्हिलन्स बंडल आहेत. रारो झीनतला या जन्मात तरी पकडू शकणार नाही. त्यामुळे झीनतला काहीतरी वीकपॉईंट देणे गरजेचे आहे. म्हणून या मुलीची योजना केली आहे. झीनतनेही सिनेमा एव्हेंचुअली संपावा म्हणून हा वीकपॉईंट अंगावर घेतला आहे.
७.२) रक्षाबंधन
रारो शिवपुरीत परततो आणि स्टेशनचा चार्ज घेतो. इन्स्पेक्टर रेगे त्याच्या स्वागतास आणि दिमतीस हजर आहेच. रारो रेगेला सांगतो की मला डाकू हसीनाची फाईल पाठवून दे आणि तिच्या नावाचे हे नवे पोस्टर्स गावागावात लाव. तिकडे किल्ल्यात पारिवारिक प्रॉब्लेम्सवर काम सुरु आहे. गुड्डीला आंघोळ करायची आहे पण किल्ल्यात बाथरुम नाही. रजनीला त्याचे गँगमेंबर्स सांगतात की कधी गरज पडलीच नाही. हे कसं शक्य आहे? या बाप्या लोकांना एक काही अडचण येत नसेल पण झीनत जॉईन करून बराच कालावधी लोटला आहे. ती कुठेतरी आंघोळ करत असेलच ना? पण नाही, गुड्डीसाठी स्पेशल बाथरुम.
हा सावळा गोंधळ चालू असताना जग्गा नामक डाकू येतो. तो रजनीला रारोच्या आगमनाची बातमी आणि हसीनाची नवी वाँटेड पोस्टर्स दाखवतो. रारोची पहिली स्ट्रॅटेजी आहे की हसीनाच्या नावावरचं इनाम वाढवून पाच हजार ऐवजी पन्नास हजार करणे. झीनतही तिथे येते. हिला आता नवा युनिफॉर्म मिळाला आहे - हिरवे शर्ट-पँट, पोपटीईश रंगाचा हेडबँड, पांढरे ठिपके असलेला लाल रंगाचा बेल्ट, त्या खाली चकचकीत फॅशनेबल बेल्ट आणि चॉकोलेटी रंगाचे बूट. रजनी तिला सांगतो की तुझ्या डोक्यावरचं इनाम वाढवलं आहे.
झीनत - "हेहे, ये एस पी तो कोई अपना लगता हैं, जिसने कानून के बाजार में मेरा भाव बढाकर मुझे इज्जत बक्षी."
...............
...............
...............
ओह नो, एनीवे
तर झीनत ही बातमी ऐकून खुश आहे. ती खूप मोठी आणि खतरनाक डाकू असल्याचे आता सरकारनेही मान्य केले आहे. जग्गा तिला सांगतो की नव्या एसपीने तिला जिवंत पकडणार असल्याची घोषणा केली आहे. हा कोण बरे उपटसुंभ? जग्गा सांगतो की त्याचे नाव रणजीत सक्सेना. झीनत भूत पाहिल्यासारखी हादरते.
कट टू रारोचे सरकारी घर. एका मोठ्या बंगल्यात हा एकटाच राहतो आहे आणि दिमतीला एक नोकर रामसिंग. रामसिंग म्हणतो की आज रक्षाबंधन आहे तरी मी काही तासांपुरता घरी जाऊन राखी बांधून येतो. रारो झीनतच्या आठवणीने इमोशनल होतो. इथे एक अनाकलनीय प्लॉट पॉईंट आहे. बेसिकली, काही कारणास्तव पोलिस रेकॉर्डमध्ये हसीनाचा एकही फोटो नाही. त्यामुळे रारोला झीनतच डाकू हसीना असल्याचे कळत नाही. तिलकच्या शिल्पा शिरोडकरप्रमाणे झीनत चेहरा झाकून दरोडे घालत असती तर हे कळण्याजोगे होते पण झीनत खुल्लमखुल्ला डाकू म्हणून वावरत असताना तिचा एकही फोटो उपलब्ध नसावा हे पटत नाही.
असो, रारो आतल्या खोलीत येतो तर टेबलावर ओवाळणीचे ताट आणि ताटात राखी. लांब केसांचा विग लावून झीनत त्याच्या समोर येते. रारोचा आधी विश्वासच बसत नाही पण मग तो खूप आनंदतो. तो विचारतो की इतके दिवस कुठे होतीस? ती साळसूदपणे आज कोई सवाल नही करून त्याला उडवून लावते. ती राखी बांधणार तेवढ्यात रारो म्हणतो थांब एक सरप्राईज आहे. मग तो पोलिस युनिफॉर्म घालून आणि पिस्तुल घेऊन बाहेर येतो. टेन्शन घ्यायचं कारण नाही, त्याला फक्त आपल्या बहिणीसोबत आपले यश शेअर करायचे आहे. ती देखील प्रसन्न चेहर्याने त्याच्या शर्टाचे दुसरे बटण लावत त्याला जणू दटावते - आपल्या घरात शर्टाचं पहिलं बटण लावत नाही, दुसरं लावायचं. रारो तिला सांगतो की तुझ्या मृत्युची बातमी ऐकून मला ही वर्दी ओझ्यासारखी वाटत होती.
झीनत - "जब मेरी वर्दी देखोगे भैया, तो जिंदगी तुम पर बोझ बन जाएगी."
राखी बांधण्याचा कार्यक्रम होतो. बाय चान्स झीनत जिवंत असलीच तर तिला ओवाळणी म्हणून त्याने कंगन तयार ठेवले आहे. झीनत म्हणते की आता बांगडी घालतो आहेस, उद्या बेड्या घालशील. तो विचारतो का? ती सावरून घेत म्हणते की मी त्या इन्स्पेक्टरचा नाही का खून केला? तो म्हणतो त्याचं तू टेन्शन नको घेऊस. मी इथे फक्त डाकू हसीनाला बेड्या घालणार आहे जिच्या नावाची दहशत शंभर कोस पसरलेली आहे. मग एक पोलिस डाकू हसीनाची फाईल घेऊन येतो. बिल फार वाढतंय आणि या राखीचा काहीही उपयोग होणार नाही आहे हे लक्षात आलेली झीनत या संधीचा फायदा घेऊन तिथून काढता पाय घेते.
८) नीति-अनिती
८) नीति-अनिती
८.१) डाकूंच्या संस्कृतीचे तौलनिक दर्शन
बराच वेळ जोगिंदरचे दर्शन न झाल्याने दिग्दर्शक जोगिंदरला स्क्रीनटाईम देतो. शिवपुरी जवळच्या दुसर्या किल्ल्यात जोगिंदरचा अड्डा आहे. तुलनेने असंस्कृत डाकू असल्याने भांड्यात अन्न शिजवण्याऐवजी जोगिंदर अख्खी बकरी भाजतो आहे. या बकरीला आगीच्या धगीपासून बिरबलाच्या खिचडीइतक्या उंचीवर टांगल्याने ही कशी काय शिजणार असा प्रेक्षकाला प्रश्न पडतो. इथे एडिटरला आपणही मास्टर एडिटर दाखवायचे असल्याने त्याने जोगिंदरने उलटे लटकावून ठेवलेल्या दोन गँग मेंबर्सना उलट्या बकरीचा ग्राफिक मॅच कट दिला आहे. जोगिंदरसाठी बकरी आणि हे दोघे सेमच हेही प्रेक्षकाला यातून कळते. असे कळते की सुरुवातीला पळवलेली नंदिता अजून जिवंत असून रझाने तिला जोगिंदरला देऊन टाकली आहे. जोगिंदर या दोघांवर इतका भडकला कारण त्यांच्या पहार्यातून नंदिता पळून गेली. तेवढ्यात तिसराच कोणी नंदिताला शोधून परत आणतो.
नंदिता आणि तिला परत आणणारा गँग मेंबर या दोघांचे मेकअप जोगिंदरला लाजवतील इतके भयाण आहेत. नंदिताच्या मॅजेंटा रंगाच्या ब्लाऊजला निळ्या रंगाच्या स्लीव्ह्ज लावल्या आहेत. अस्मादिकांच्या मते विश्वात्मामधील नसीरच्या भयाण मॅजेंटा पगडी निळे उपरणे वेषभूषेची प्रेरणा इथून आली आहे. हे कमी म्हणून तिला इंच दोन इंच जाडीचे चांदीचे दागिने घातले आहेत. जोगिंदरला फॅशनची जरा म्हणून समज नाही. हेही कमी म्हणून तिला परत आणणार्या गँग मेंबरच्या चेहर्याची डावी बाजू पांढर्या तर उजवी बाजू काळ्या रंगाने रंगवली आहे. जोगिंदरनेही नंदिताला मॅचिंग मॅजेंटा-निळ्या कॉम्बोचा ड्रेस घातला आहे. जोगिंदर त्या काळ्या-पांढर्याला पैसे देतो आणि त्याचे डोळे फोडण्याचा आदेश देतो - कारण त्याने जोगिंदरचा अड्डा बघितला. खूप आर्जवे केल्यानंतर जोगिंदर म्हणतो की जर याने स्वत:चे काळे-पांढरे थोबाड आयुष्यभर धुतले नाही तर मी याला माफ करेन.
या काँट्रास्ट म्हणून आपण सुसंस्कृत डाकूंच्या अड्ड्यावर परत येतो. सर्वांचे स्वच्छ धुतलेले युनिफॉर्म्स, खाण्यासाठी विमबारने स्वच्छ केलेली भांडी तर आहेतच, पण आजारी पडलेल्या डाकूंचे इतरांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून क्वारंटाईनची वेगळी खोली. गुड्डीच्या आगमनानंतर तर हे अजूनच माणसाळतात. ती पोरगीही खतरनाक आहे. ताप आलेल्या बालेखानला तुळस घातलेले दूध काय आणून देते (तुळशीच्या दुधाने ताप जातो का?) चाचाच्या जखमेवर हळदीचा लेप लावून देते. तिच्यासाठी यच्चावत गँग आपल्या दाढीमिशांचे जंगल सफाचट करायला तयार होतात. हसीना हे बघून मनापासून हसते.
यात मिठाचा खडा टाकायला रजनीकांत बीनाला घेऊन येतो. बीनाने तिचे हिरोईनपण १९९६ मध्ये सिद्ध केले त्यामुळे या चित्रपटात तिला हिरोईन म्हणता येत नाही. बीना या गुड्डीची विधवा आई तारा. ती पोलिसात रिपोर्ट द्यायला गेली तर करप्ट पोलिसांनी या सिनेमातले व्हिलन जे करतात ते केले (ऑफस्क्रीन). रजनी तिला वाचवून परत घेऊन आला. कंटिन्यूटी मिस्टेक - झीनतच्या गळ्यात दोन गोळ्या, पण फक्त युनुस परवेझच मेला आहे. झीनत तिला वचन देते की जोगिंदर आणि तो पोलिस, दोघांना ती ठार करेल. बीना म्हणते की ते ठीक आहे पण माझी मुलगी मला परत दे. प्रॉब्लेम असा आहे की क्लासिक केस ऑफ स्टॉकहोम सिंड्रोम असल्याने ती मुलगी हसीनाला अॅटॅच झाली आहे. रजनी सुचवतो की आपण व्होट घेऊ. मग ते डाकू आपल्या हृदयावर दगड ठेवून तिने बीनासोबत गेले पाहिजे असे एकमुखी मतदान करतात. ती मुलगी त्यांना शिव्याशाप देत बीनासोबत जाते. इथे देखील अप्रतिम काँट्रास्ट आहे. बीनाला रजनीने स्वत:च्या अड्ड्याची वाट स्वत: दाखवली, डोळ्यांवर पट्टी बांधली नाही. परतही जाऊ दिले, कारण भरोसा. टेक दॅट जोगिंदर.
८.२) रुपेश कुमारचा अंत
आता इमोशनल डिस्ट्रॅक्शन्स आणि लुटायला ठाकूरवर्ग शिल्लक नसल्याने हसीनाला आपला बदला आठवतो. रुपेश कुमार वन विभागाच्या जीपमध्ये बसून चालला आहे. इथे असे कळते की रुपेश कुमार फॉरेस्ट ऑफिसर आहे. त्याने असे ऐकले आहे की या जंगलात "एक अवल वस्त्रहीन वनपरी" हिंडते. हा क्यू घेऊन त्याच्या जीपवर लाल रंगाचे पातळ येऊन पडते. दूरवर जंगलात एक नग्न ललनाही दिसते. हुशार व्हिलन शुड सेन्स अ ट्रॅप हिअर. जंगलात सुंदर स्त्री/वनपरी दिसली तर ती कोणी रानातील रहिवासी असू शकेल पण ती पूर्णपणे विवस्त्र असू शकत नाही. रुपेश हुशार व्हिलन तर नाहीच पण वासनांध देखील आहे. तो एकटाच त्या ललनेच्या मागे मागे दाट झाडीत शिरतो. एका खंडहरवजा जागेत पोहोचल्यावर त्याला कळते की ही ललना तर त्याचीच बहीण आहे.
रुपेश भडकतो. आपल्या बहिणीला विवस्त्र करून जंगलात सोडायची हिंमत कोणाची झाली? घोड्यावर स्वार झीनत एंट्री घेते. सोबत हरिया.
"रुपा?"
"रुपा नही, हसीना बोल कुत्ते! कल की भोली भाली रुपा, आज पूरे देश और सारी पोलिस फोर्स के जबान पर चढा नाम, डाकू हसीना!"
रुपेश विचारतो की ते सगळं ठीक आहे पण माझ्या बहिणीला नागवं का केलंस? झीनत निर्विकारपणे हा ट्रॅप असल्याचे एक्सप्लेन करते. तिला रुपेशला ही जाणीव करून द्यायची आहे की त्याने किती नीच कृत्य केलं होतं. त्यासाठी ती देखील नैतिकदृष्ट्या वाईट काम करते आहे (मोरल रिलेटिव्हिजम). या पॉईंटला हसीना सर्व भारतीय लेडी डाकूंपेक्षा वेगळी पडते. कितीही सूडाला पेटल्या, अगदी आऊटराईट व्हिलन असल्या (तिलकची शिल्पा शिरोडकर) तरीही त्या कधीच एक नैतिक पातळी सोडत नाहीत. हसीना डझन्ट केअर! तिचा कार्यभाग साधताच ती हरियाला रुपेशच्या बहिणीला सहीसलामत परत सोडायला सांगते.
रुपेश पळून जायचा निष्फळ प्रयत्न करतो. पण हसीना त्याला सहज गाठते. पुन्हा एकदा अपने नाम की गोली निकाल सोपस्कार होतो आणि ती त्याला गोळी घालते. आता इतके दरोडे घालून तिचा नेम पुष्कळच सुधारला आहे. ती आता हाकेच्या अंतरावरील रनिंग टार्गेटवर नेम धरू शकते.
त्याला रमेश एकटाच एएसपी
त्याला रमेश एकटाच एएसपी (असिस्टंट एसपी) म्हणतो बाकी सगळे एसपी म्हणतात >> भारी निरीक्षण. असिस्टंट प्रोफेसरला जसं सगळे प्रोफेसरच म्हणतात तसं असावं हे. असिस्टंट म्हटलं तर त्याला वाईट वाटेल किंवा कमी आदर व्यक्त होईल.
हाहाहा… बाज रब्बर ला फिस्सकन
हाहाहा… बाज रब्बर ला फिस्सकन हसलो…
बाकी खास पायस टच अन् पंचेस जबरी
वाचतोय, वाचतोय ! एखाद्या
वाचतोय, वाचतोय ! एखाद्या समीक्षकाने व्हॅन गॉ च्या अमूर्त चित्रातले बारकावे समजावून द्यावेत तसा लेख आहे.
टोटली! अजून दुसर्या भागातच
टोटली! अजून दुसर्या भागातच आहे.
या धक्क्याने ऑलमोस्ट ढगात गेलेला विजय मेसेज देण्यापुरता परत येतो. >>>
हे धमाल आहे. मला "Who else is almost dead?" सीन आठवला
विजय अरोरा एकटाच मरत असतो असे दिसते. नाहीतर असे काहीतरी करता आले असते 
असिस्टंट प्रोफेसरला जसं सगळे
असिस्टंट प्रोफेसरला जसं सगळे प्रोफेसरच म्हणतात तसं असावं हे. असिस्टंट म्हटलं तर त्याला वाईट वाटेल किंवा कमी आदर व्यक्त होईल. >>
हो तसंच दिसतंय.
खास पायस टच अन् पंचेस जबरी >> थँक्स हर्षल
एखाद्या समीक्षकाने व्हॅन गॉ च्या अमूर्त चित्रातले बारकावे समजावून द्यावेत तसा लेख आहे. >> विकु
"Who else is almost dead?" >> फा
Pages