माझी शाळा- एक नोंद!

Submitted by वावे on 23 July, 2023 - 00:09

आमच्या गावातली प्राथमिक शाळा या शैक्षणिक वर्षी अधिकृतपणे बंद झाल्याचं मला काही दिवसांपूर्वी कळलं. जिल्हा परिषदेची, मराठी माध्यमाची एका खेडेगावातली ही छोटीशी शाळा. गेली काही वर्षे ती बंद पडण्याच्या दिशेने जात असल्याचं लक्षात येत होतंच. तरीही, ती खरोखरच बंद झाल्यावर खूप वाईट वाटलं. मी शाळेत असताना साधारणपणे साठ ते पासष्ट विद्यार्थी शाळेत असायचे. पहिली ते चौथी, हे चारही वर्ग मिळून ही संख्या होती. ही संख्या त्याआधी आणि त्यानंतरही अनेक वर्षे स्थिर होती. नंतर मात्र सावकाश, पण निश्चित ओहोटी सुरू झालेली होती.

माझ्या लहानपणी आणि त्याआधी कित्येक वर्षे, कोकणातल्या बहुतेक सगळ्या खेडेगावांप्रमाणे आमच्या गावातलेही बरेचसे पुरुष हे मुंबईला नोकरी करायचे, पण कुटुंबं गावात असायची. प्रत्येक कुटुंबाची थोडीफार शेती, थोडीफार गाईगुरं होती. हा सगळा संसार बायका सांभाळायच्या. पावसाळ्यात जेव्हा शेतात नांगर धरावा लागतो, तेव्हा बरेचसे पुरुष गावी येत आणि शेतीची कामं उरकून परत जात. एरवी मग गणपती, होळी अशा सणांच्या आणि लग्नसराईच्या दिवसांत मुंबईकर गावाला येत. हा क्रम कित्येक वर्षांपासून साधारण वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत अव्याहत चालू होता.

तेव्हाची पिढी, म्हणजे माझ्या बरोबरीच्या मुलामुलींच्या आईवडिलांची पिढी कमी शिकलेली होती. त्यांचं उत्पन्नही कमी असायचं. इतर गावांचं मला माहिती नाही, पण आमच्या गावाची मुंबईला ’गावकीची खोली’ होती. प्रत्येकाला स्वतंत्र खोली घेऊन राहणं परवडत नसल्यामुळे ही कॉमन मोठी खोली असायची. सगळेजण मिळून भाडं भरायचे. पुढची पिढी शिकलेली आणि त्यामुळे जास्त उत्पन्न मिळवणारी झाली. आर्थिक स्थिती सुधारली, तसे पुढच्या पिढीतले पुरुष आपल्या बायका-मुलांना मुंबईलाच राहण्यासाठी घेऊन जाऊ लागले. मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालू लागले. हळूहळू गाव रिकामं होऊ लागलं. बरीचशी घरं वर्षातला बराच काळ बंद दिसू लागली. गावाला सुट्टीत थोडे दिवस येऊन राहणं अशीच पद्धत पडली.

पूर्वी, म्हणजे माझ्या लहानपणी गावात भातशेती व्हायची. शिवाय थोड्याफार प्रमाणात नाचणी, वरी अशी धान्यंही पिकवली जायची. दिवाळीच्या सुमारास भात घरात आलं की रब्बी हंगामासाठी वाल लावले जायचे. हळूहळू हेही सगळं बंद झालं. जवळजवळ सगळी शेती ओसाड राहू लागली. कारण शेती कसायला गावात कुणी कायमस्वरूपी रहातच नाही. गावात कायमस्वरूपी राहणार्‍यांची संख्या अतिशय कमी आहे.
समांतरपणे शाळेतल्या मुलांची संख्याही घटत घटत एक आकडी संख्येवर येऊन ठेपली. पण गाडीत तीन प्रवासी जरी असतील तरी एसटी धावतेच, तशी या सात-आठ विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेची ही शाळा काही वर्षं दोन शिक्षकांसह चालत होती. यावर्षी मात्र जिल्हा परिषदेने गावाशी विचारविनिमय करून शाळा अधिकृतपणे बंद केली. कारण दोन विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र शिक्षक, त्यांना दुपारचं जेवण बनवण्यासाठी कर्मचारी, या दोघांचा पगार, वीजबिल वगैरे खर्च खरोखरच परवडण्यासारखा नाही. जे दोन विद्यार्थी शाळेत शिल्लक होते, ते आता दोन किलोमीटरवरच्या गावातल्या प्राथमिक शाळेत जातात.

हे लिहिताना माझा ’गेले ते दिन गेले’ असा सूर लागला असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. कारण माझ्या लहानपणी मी जे माझं गजबजलेलं, नांदतं गाव अनुभवलं, ते आता मला दिसत नाही. शेताडीत गेलं, तर सगळीकडे उंच गवत वाढलेलं दिसतं. मे महिन्याव्यतिरिक्त एरवी गावाला गेलं, तर गाव उजाड वाटतं.

पण असा गतकालविव्हल सूर लावण्याची माझी इच्छा नाही. शिवाय माझ्यासारख्या, स्वतः महानगरात राहणार्‍या, दिवसभर सावलीत बसून काम करणार्‍या, रेस्टॉरंटपासून हॉस्पिटलपर्यंतच्या सर्व सोयी-सुविधा सहज उपलब्ध असणार्‍या व्यक्तीने असा सूर लावणं योग्य नाही, हेही मला १००% मान्य आहे. खेडेगावात कायमस्वरूपी राहण्यातल्या अडचणी मला चांगल्याच माहिती आहेत. हा लेख लिहिण्यामागचा माझा उद्देश माझ्या शाळेच्या छोट्याशा इतिहासाची जमेल तशी नोंद करणं आणि शाळा बंद झाल्याचं समजल्यावर जे वाईट वाटलं, ते व्यक्त करणं असाच आहे, दुसरा काहीही नाही.

आमची ही शाळा १ फेब्रुवारी १९५३ रोजी सुरू झाली. त्यापूर्वी शेजारच्या गावात प्राथमिक शाळा होती. गावातली काही मुलं तिथे जाऊन थोडी शिकायची. जरा मोठं झाल्यावर मुलगे मुंबईला जाऊन कामाला लागायचे. मुली शिकायच्याच नाहीत. आपल्याही गावात शाळा असावी, असं हळूहळू गावातल्या जाणत्या माणसांना वाटू लागलं आणि त्यासाठी प्रयत्न चालू झाले. गाव लहान असलं, तरी एक सकारात्मक बाब होती, ती म्हणजे त्या काळी शिक्षक होण्यासाठी जी पात्रता लागत असे, ती पूर्ण केलेली व्यक्ती गावात होती. माझी आजी व्हर्नाक्युलर फायनल पास झालेली होती. ती शाळेत शिकवायला तयार झाली. सरकारकडून मान्यता मिळाली आणि ’खाजगी शाळा’ म्हणजे त्या वेळी ’व्हॉलंटरी शाळा’ म्हणत असत तशी शाळा १९५३ मध्ये सुरू झाली. योगायोगाची आणि भाग्याची गोष्ट म्हणजे शाळेच्या उद्घाटनासाठी त्यावेळी गो. नी. दांडेकर लाभले होते. ते दिवेआगरला त्यांच्या नातेवाईकांकडे आलेले असताना माझ्या आजोबांनी त्यांना उद्घाटनासाठी येण्याची विनंती केली आणि तेही सहज आले. सुरुवातीला शाळेला स्वतःची इमारतही नसल्यामुळे गावातल्या देवळात शाळा भरत असे. काही वर्षांमध्ये मुंबईकर गावकर्‍यांनी मनावर घेतलं आणि श्रमदानाने शाळेची इमारत बांधली गेली. आर्थिक मदतीसाठी शाहीर साबळे यांचा ’यमराज्यात एक रात्र’ हा प्रयोगही त्यावेळी मुंबईत आयोजित केला होता. अशा तर्‍हेने शाळा स्वतःच्या इमारतीत सुरळीत सुरू झाली. (सध्याची इमारत जिल्हा परिषदेची आहे.) ’खाजगी शाळा’ याचा अर्थ असा, की पटसंख्येवर आधारित अनुदान दरवर्षी शासनाकडून मिळत असे. शिक्षकाचा पगार आणि शाळेचा इतर खर्च हा या अनुदानातून आणि लोकवर्गणीतून भागवणं अपेक्षित असे. गावातल्या माणसांची आर्थिक स्थिती गरिबीची असल्यामुळे लोकवर्गणी वगैरे न काढता या अनुदानातूनच सगळे खर्च भागवले जात. माझी मोठी आत्या ही या शाळेच्या पहिल्या काही विद्यार्थ्यांपैकी एक. तिच्या आठवणीनुसार वर्षाला एकूण तीनशे रुपये सुरुवातीस मिळत असत. म्हणजे महिन्याचे पंचवीस रुपये! शेतीभाती असली, तरी आमच्या कुटुंबासाठीही ’आर्थिक उत्पन्न’ म्हणण्यासारखं हे एवढंच होतं. त्यातही शाळेचा इतर खर्च अर्थात असायचाच. त्यामुळे त्या लहान वयातही तिच्या लक्षात हा आकडा राहिला असावा. असो.

शाळा अशीच सुरळीत सुरू राहिली, ती थेट १९७६ पर्यंत. (तेव्हा अनुदान तीनशेवरून सातशेपर्यंत गेलं होतं.) तेवीस वर्षं शाळेत नोकरी केल्यावर माझी आजी थकली होती. प्रकृतीमुळे तिला दिवसभर शाळेत जाऊन चारही वर्गांना एकटीने शिकवणं कठीण जायला लागलं होतं. शेवटी गावकर्‍यांशी विचारविनिमय करून ही शाळा जिल्हा परिषदेकडे सोपवावी, असा निर्णय झाला. अशा प्रकारे, आजी निवृत्त झाली आणि शाळा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू राहिली. तेव्हापासून ते अगदी गेल्या वर्षीपर्यंत दोन शिक्षक या शाळेत नेहमीच होते. शाळेचा पट साधारणत: साठ ते सत्तरच्या दरम्यान कायम असायचा. पुढे काही वर्षांनी माझी आई या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून आली. तिनेही खूप वर्षे या शाळेत शिकवलं.

आमच्या खेडेगावात एकोणीसशे पन्नासच्या दशकात शाळा सुरू होणं या घटनेचे अनेक दूरगामी परिणाम झाले. पूर्वी मोजकीच मुलं बाहेरगावी जाऊन शिकत असत, त्याऐवजी गावातली सगळी मुलं-मुली किमान चौथीपर्यंत शिकू लागली. त्यांना शिक्षणाची गोडी लागल्यामुळे माध्यमिक शिक्षण घेण्याचं प्रमाणही त्यांच्यात वाढलं. मुख्य म्हणजे मुलीही किमान प्राथमिक शिक्षण घेऊ लागल्या. पूर्वी जेमतेम लिहावाचण्यापुरतं शिकून, किंवा तेवढंही न शिकता मुंबईला जाऊन मिळेल ते काम करणार्‍या माणसांची पुढची प्रत्येक पिढी आधीच्या पिढीपेक्षा जास्त शिकलेली होऊ लागली.
मला आठवतं, नव्वदच्या दशकात सगळीकडे अंगणवाड्या सुरू झाल्या. तेव्हा अंगणवाडीत ’मदतनीस’ म्हणून काम करण्यासाठी सातवी पास असणं ही किमान अट होती. आमच्या गावातल्या ज्या मुली साठ-सत्तरच्या दशकात आजीच्या हाताखाली शिकल्या होत्या आणि नंतरही शेजारच्या गावी जाऊन सातवीपर्यंत शिकल्या, त्यापैकी काही जणींना आता आपापल्या सासरच्या गावांमधे ही ’मदतनिसाची’ नोकरी मिळाली. जो काही तुटपुंजा पगार (याला ’मानधन’ म्हणत.) मिळे, त्यातून मिळणारं, थोडं का असेना, पण एक आर्थिक स्थैर्य त्यांच्या गरिबीच्या संसारासाठी खूप मोलाचं होतं. त्या बायका माहेरी आल्यावर जेव्हा माझ्या आजीला भेटायला येत तेव्हा कृतज्ञतेने म्हणत की तुम्ही तेव्हा आम्हाला शिकवलंत, म्हणून आज आम्हाला नोकरी मिळाली! गृहस्वामिनी शिकलेली असणं आणि कमावती असणं याचा बराच सकारात्मक परिणाम घरावर होतो! तसा तो त्यांच्या घरांवर झाला असणार.

१९७६ पासून शाळा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन शिक्षकांसह सुरू होती. गावाचं पूर्ण सहकार्य कायमच शाळेला आणि शिक्षकांना मिळालं. कधी कसलाच संघर्षाचा प्रसंग उद्भवला नाही. विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण शाळेत देण्याची शासनाची योजना सुरू झाली, तेव्हा पोटभर चविष्ट अन्न मुलांच्या पोटात जाईल, याची गावानेही काळजी घेतली. शिक्षकही चांगले लाभले. २००३ साली जेव्हा शाळेला पन्नास वर्षं पूर्ण झाली, तेव्हा मोठा समारंभ झाला होता. माजी शिक्षकांना आवर्जून आमंत्रणं केली होती. माझ्या आजीचाही तेव्हा सत्कार झाला होता. मात्र, यानंतर वीस वर्षांमध्येच शाळा पूर्ण बंद पडेल असं तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं!

एक मोठा योगायोग म्हणजे शाळेच्या या शेवटच्या दोन विद्यार्थ्यांपैकी एक मुलगा हा शाळेच्या पहिल्या, म्हणजे १९५३ च्या विद्यार्थ्यांपैकी एकाचा नातू आहे!

आमचीच शाळा नव्हे, तर आजूबाजूच्या काही गावांमधल्याही शाळा बंद झाल्या आहेत, काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कारण मुंबईला स्थलांतर सगळ्याच गावांमधून सुरू आहे. याचा परिणाम म्हणजे मी ज्या माध्यमिक शाळेत शिकले, त्या शाळेची विद्यार्थिसंख्याही घटत जाऊन आता दीडशेवर आली आहे. मी शाळेत असताना ती चारशे होती आणि मधल्या काळात ती यापेक्षा जास्तही होती. आता यापुढे मात्र ती घटतच जाणार हे भविष्य स्पष्ट आहे.

माझी प्राथमिक शाळा काय किंवा माध्यमिक शाळा काय, दर्जाच्या दृष्टीने या दोन्ही शाळा अजिबात कमी नाहीत. शहरांमधल्या इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये हजारो-लाखो रुपये शुल्क देऊन आपण मुलांना घालतो. या शाळांच्या मानाने गावातल्या सरकारी/अनुदानित शाळा साध्या असतात, मराठी माध्यमाच्या असतात, मात्र ’शिक्षण’ देण्यामध्ये त्या कुठे कमी पडत नाहीत, असा माझा तरी अनुभव आहे. पण खेडेगावांमधल्या शाळा बंद पडत आहेत ही वस्तुस्थिती आहे.

(हे लिहीत असताना मला कुणालाही किंवा कशालाही दोष द्यायचा नाही. काळाची गती जशी असते, त्याप्रमाणे घटना घडत असतात. सत्तर वर्षांचं आयुष्य मिळालेल्या माझ्या शाळेच्या इतिहासाची एक नोंद व्हावी, याच प्रेरणेने मी हे लिहिलं आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सत्तर वर्षांचा इतिहास Happy ह्दय आठवणी आहेत.

बरेचसे वातावरण, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि इतर बाबतीत लहानपणी खूप खूप साधर्म्य होते. त्यामुळे लेख खूपच मनाला भिडला. माझ्या गावात मराठी शाळा अगदी अशीच होती. बाहेरच्या बाजूला शाळेच्या भिंतीवर कधी प्राचीन काळी लिहिल्याप्रमाणे वाटावीत अशी अक्षरे "देवीचा रोगी कळवा, हजार रुपये मिळवा" आमच्या लहानपणी आणि नंतरही अनेक वर्षे दिसत होती. देवी रोग हद्दपार होऊन दशके झाली तरीही. शाळेतल्या गुरुजींची नावे, त्यावेळचे पहिलावहिले मित्र, शाळेसमोरचे चाफ्याचे झाड सगळे सगळे अगदी स्पष्ट आठवते. या लेखामुळे त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.

माझ्या मुलाला मी सांगत असतो, "आज जसा मोबाईल खूप किमती गोष्ट आहे तसे तेंव्हा अंगावरचा सदरा ही किमती गोष्ट होती Lol अणि तो फाटू नये किंवा बटन तुटू नये याचीच काळजी घेतली जायची"

"संज्या गळपट सोड... गळपट सोड हां संज्या... अज्जून सांगतोय... आंगराख फाटलं तर लई मारिन हां संज्या..."

तेव्हाच्या मुलांच्या भांडणातल्या संवादाचा नमुना Lol गळपट म्हणजे कॉलर, आंगराख म्हणजे शर्ट. माझ्या मुलाला अगदी कालपरवाच मी हे साभिनय करून दाखवले तेंव्हा तो प्रचंड हसला होता.

तसा काळ होणारही नाही आता. आठवणी जागवणारा खूप छान लेख Happy

लेख पोचला. बंद पडणार्‍या शाळेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या गावाच्या स्थितीत कसा फरक पडत गेला त्याचंही चित्र उभं केलंत. आणि हे चित्र बदलण्याला काही अंशी ती शाळाही कारण ठरली. तुमचं गाव रायगड जिल्ह्यात असावं. तिथे अतिवृष्टीमुळे झालेल्या वाताहतीबद्दल तुम्ही लिहिलेलं आठवतंय.

तुमच्या आजीआजोबा आणि आईकडून तुम्हांला अभिमानास्पद वारसा मिळाला आहे.

काही काही गोष्टींशी रिलेट झालं. माझ्या आईचे काका त्यांच्या गावच्या - मालवणच्या भंडारी हायस्कूलचे प्रिन्सिपल होते. नुकताच त्यांचा पुतळा शाळेत बसवला गेला.

माझे बाबाही लहानपणीच त्यांचं गाव सोडून मुंबईला आले. त्यांच्या शब्दांत - ते त्यांच्या काकाच्या दारावर राहत. स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी मुंबईतल्या गावकर्‍यांचा गावाच्या नावे ग्रामोन्नती संघ स्थापन केला. त्या संस्थेच्या सभांची इतिवृत्त, हिशोबाची चोपडी आणि पावती पुस्तकं आमच्याकडे होती आणि मी ती पाहिली आहेत. त्या काळात वर्गणी आण्यांत घेतली जाई. गावच्या शाळेला सतरंजी आणि नकाशा दिल्याची नोंद आहे. पुढे या लोकांची आर्थिक प्रगती होत गेली (माझे बाबा नेमके त्या वेळी भाड्याच्या घरातून मालकीच्या घरात राहायला आले) तेव्हा ग्रामोन्नती संघ बरखास्त करून गावातील देवी च्या नावे माउली जीर्णोद्धार समिती स्थापन केली. आधी पोटोबा मग विठोबा. ही मंडळी अनेक वर्षे गावातल्या एकेका मंदिराचा जीर्णोद्धार , मग सुशोभीकरण, देवीला दागिने हे सगळं करत आलीत. गेल्या दशकात पुन्हा नव्या पिढीने पुढे येऊन पुन्हा एकदा ग्रामविकासाची वाट धरली आहे. आता गावात जॉगिंग ट्रॅक, अ‍ॅम्ब्युलन्स यासाठी प्रयत्न करतात.
गावातली शाळा आहे का माहीत नाही. माझा पुतण्या (चुलतभावाचा मुलगा ) शेजारच्या गावातल्या कॉन्व्हेंट शाळेत होता.
गावात अजूनतरी कुटुंबे, पुरुष आहेत. पण कामासाठी गोवा इ. ठिकाणी जातात.

अटळ सत्य. लेख पोहोचला.

नुकतंच फेसबुकवर एका तरुणाची पोस्ट वाचली. त्याने खूप उत्तम आणि सरळ शब्दांत तो गावातच रहाणार आहे, wfh शक्य असल्याने शहरात राहण्याऐवजी आपल्या गावात रहाण्याचा त्यानं निर्णय घेतलाय आणि हे स्विकार करणारी पत्नी त्याला हवी आहे. मला त्याचा निर्णय, त्यामागचा विचार आणि स्पष्टपणे सगळं सांगून केलेलं आवाहन खूप आवडलं.

मुंबईला स्थलांतर किमान कोकणातून तरी कमी होतंय असं वाटतं आहे. जि.प. शाळा बंद होण्यामागे आपली मुलं इंग्रजी माध्यमातून शिकावी ही पालकांची इच्छा कारणीभूत आहे. माझ्या गावी असलेल्या चुलत-मावा भावंडांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात. त्यासाठी शहराच्या ठिकाणी जाऊन राहतात, किंवा मग स्कूल बस वर खर्च करतात.

खूप सुंदर लिहिलं आहेस. जाणून बुजून गावाचं नाव लिहिलं नाहीयेस का ?
आमच्या गावात ही हल्ली मुलांना जवळच्या शाळेत न पाठवता तालुक्याच्या शाळेत पाठवतात जिथे सेमी इंग्लिश मिडीयम जास्त competition आणि अर्थात फी जास्त असल्याने वरच्या आर्थिक स्तरातल्या मुलांची संगत हे सगळं मिळतं. Btw आंब्याच्या बेभरवशी उत्पन्नामुळे आणि बाहेरच्या जगाची ओढ असल्याने आमच्या गावात ही तरुण मुलं बाहेर जातायत पोटा पाण्यासाठी. असो.

खेड्यातच नाही तर इथे ठाण्यात ही सरस्वती सेकंडरी वैगरे चांगल्या समजल्या जाणाऱ्या मराठी शाळांनी cbsc वैगरे अभ्यासक्रम आणले आहेत शाळेतनुसत्या मराठी माध्यमाच्या शाळेने त्यांचा टिकाव लागणं कठीण आहे म्हणून. मुंबईत ही महानगरपालिकेच्या शाळांना रोडवलेली पटसंख्या ही समस्या भेडसावत आहे त्या शाळा ही बंद पडायच्या मार्गावर आहेत.

शाळांची वाढलेली संख्या, कुटुंब नियोजनामुळे मुलांची कमी झालेली संख्या, प्रवासाच्या आणि रस्त्याच्या सुविधेमुळे मुलांना लांबच्या चांगल्या शाळेत घालणं ही कारणं असू शकतात ..
भरत , तुमची देवी माऊली म्हणजे पाट परुळयाची का ?

मनीमोहोर, मूळ मंदिर गोव्यात आहे. हे शांता दुर्गेच रूप किंवा तिची बहीण असं काहीतरी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी माऊली मंदिरे आहेत. माझ्या आठवणीत रेडीचं मंदिर मोठं आहे.

भरत, प्रतिसाद आवडला Happy
हो, माझं गाव श्रीवर्धन तालुक्यात आहे. मी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबद्दल लिहिलं होतं.
बदलत्या परिस्थितीला शाळाही कारणीभूत ठरली हेही खरंच आहे.
अभिमानास्पद वारसा >> नक्कीच! माझे आईवडील, आजी, दोन आत्या, एक मावशी असे सगळे शिक्षकच!
माझ्या आजीचा जन्म १९२७ चा, हर्णै गावातला. तिचे वडीलही तिथे शिक्षक होते. त्या काळी, तशा लहान गावात त्यांनी मुलींना शिकवलं, फायनलच्या परीक्षेला बसवलं याबद्दल त्यांना द्यावं तेवढं श्रेय कमीच आहे.

आमच्याही गावातली माणसं मुंबईला रहायला गेली तरी एकमेकांना आणि गावाला घट्ट धरून असतात.
भ्रमर, कदाचित आता saturation जवळ आलं असावं.
मामी, मनीमोहोर, धन्यवाद!

छान लेख !

स्टेट बोर्डाची मराठी शाळा. आमची एकेकाळची नावाजलेली होती हे नशीब म्हणायला हवे जे त्या पुण्याईने ती आजही सुरू आहे. जाऊन मुलांना दाखवता येते. अन्यथा ही खंत अटळ आहे.. पण लेखात तो सूर टाळला हे छान केलेत.

भावना अगदी पोहचल्या वावे. चांगलं लिहिलं आहेस.प्रगती अपरिहार्य आहे.मोजक्या विद्यार्थी संख्येसाठी शाळा चालवणं शक्य नाही.
त्यातल्या त्यात मार्ग म्हणजे चांगल्या शाळेत वेळेत नेणारी आणणारी एखादी फुकट किंवा अगदी कमी खर्चात बस सेवा सोय मुलांना मिळावी.
मुलं, मुली शिकणं खूप गरजेचं आहे.

>>>गावातल्या सरकारी/अनुदानित शाळा साध्या असतात, मराठी माध्यमाच्या असतात, मात्र ’शिक्षण’ देण्यामध्ये त्या कुठे कमी पडत नाहीत>>>

ही परिस्थिती काही वर्षांपूर्वी होती. आता कितीतरी शिक्षकांच्या जागा खाली आहेत . एका शाळेतली परिस्थिती... एक शिक्षिका...वर्ग खोल्या सहा‌ आणि शिक्षिका एक...पट ७५, सगळे वर्ग एका खोलीत .... सरकारी नियम ३० मुलांना एक शिक्षक, पट कमी म्हणून शिक्षक कमी....दर्जा घसरला आणि खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढल्या... गावकरी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू लागले..... राजकीय शिक्षण सम्राट तयार झाले.

सर्व शालेय शिक्षण शहरात घेतलेल्या माझ्या सारख्यापर्यंतही भावना पोचल्या. आत तुटलं काहीतरी.

शळेच्या निमित्ताने एक संक्रमणच डोळ्यांसमोर उभं केलंस. अगदी हृदयस्पर्शी लिखाण!

वावे फार छान वारसा लाभलाय. शाळेच्या आठवणी आणि एकंदर आढावा हृदयस्पर्शी.

भरत प्रतिसाद मस्त.

सर्वांचे प्रतिसाद वाचनीय.

तुमच्या आजीआजोबा आणि आईकडून तुम्हांला अभिमानास्पद वारसा मिळाला आहे. >>
शळेच्या निमित्ताने एक संक्रमणच डोळ्यांसमोर उभं केलंस. अगदी हृदयस्पर्शी लिखाण! >>> +१

गावाकडचे वर्णन वाचून इंग्रजीत It takes a village म्हणतात त्याची आठवण झाली. वाचून शाळेच्या व गावाच्या अवस्थेबद्दल वाईट वाटते पण एकदम वाचनीय लेख.

अतिशय हृद्य लेख.
ज्यांनी लहानपणी अशा शाळा अनुभवल्या असतील त्यांना ह्या लेखाने स्मृतीविव्हल केले असेल.
कालाय तस्मै नमः, दुसरे काय?

शाळेच्या निमित्ताने एक संक्रमणच डोळ्यांसमोर उभं केलंस. अगदी हृदयस्पर्शी लिखाण! >>अगदी अगदी.

लेख अत्यंत सुंदर आहे. शाळा बंद झाली हे वाचून वाईट वाटलेच.

=====

एक थोडा वेगळा मुद्दा:

काही कारणाने ग्रामीण भागातील शाळांशी नियमित संपर्क होत असतो. तेथील शैक्षणिक दर्जा व शहरी ( / इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा) यात दुर्दैवी तफावत जाणवते. येथे मी अर्थकारणामुळे असलेल्या फरकाबाबत लिहीत नसून प्रत्यक्ष शैक्षणिक दर्जाबद्दल लिहीत आहे.

मुळात माध्यमच इंग्रजी असल्याने पडणाऱ्या फरकाबद्दलही लिहीत नाही.

प्रमाण भाषा (चर्चेचा विषय आहे हे मान्य ! ) या बाबीचा आग्रह न धरला जाणे, व्यवहारात इंग्रजी भाषा प्रामुख्याने वापरली जाते हे बघून इंग्रजीवर विद्यार्थ्यांना प्रभुत्व मिळवता यावे यासाठी विशेष आग्रही नसणे, साधे साधे लेखनही विद्यार्थ्यांना वाचता येत नाही याबाबत उदासीन असणे असे काही प्रकार मला हमखास बघायला मिळाले.

त्यावरून असेही एक मत तयार झाले की मुळात सर्वांना एकाच दर्जाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे.

मुख्याध्यापक जेव्हा भाषणात 'आभार मानण्याऐवजी' 'स्वागत करतो' असे म्हणतात किंवा 'आभार मानण्याऐवजी' 'अभिनंदन करतो' असे म्हणतात तेव्हा शब्दांच्या अर्थाची अचूकता कायमची हरपते. बाकी 'आज या ठिकाणी' वगैरे निरर्थक व राजकीय नेत्यांची वक्तृत्वकला झाकण्याच्या सोयीसाठी निर्माण झालेले शब्दप्रयोग सोडूनच द्यायला लागतात.

अनुदान असले तरीही साधी कपाटे, खुर्च्या अशा वस्तू शाळेत नसतात. मुलांना वस्तीतून शाळेत आग्रह करून आणावे लागते. स्वच्छतागृहे ही स्वच्छ वाटावीत यासाठी काही करण्याइतकेही पैसे नसतात. भोर येथील एक शाळा, जी आदिवासी मुलांसाठी होती, ती बंद पडली. मुले येईनात आणि पालक त्यांना धाडेनात. मग शिक्षकांनी ती शाळा त्यांच्या वस्तीवरच सुरू केली.

बरेच प्रकार आहेत.

=====

या प्रतिसादामुळे विषय भरकटू नये ही आशा आहे. तसे झाल्यास या प्रतिसादाकडे दुर्लक्ष केले जावे.

=====

लेख अतिशय आवडला. खूप आठवणी जाग्या झाल्या.

अतिशय सुंदर लिखाण. आमची स्टेटबोर्ड ची शहरातली शाळा पण अगदी २००५ पर्यंत नावाजलेली होती. पण गेल्या पंधरा वर्षांत अचानकच डाऊनफॉल झाला. याला वर अनेकांनी म्हणलं आहे तसं पालक आणि शाळा दोघेही काही अंशी जबाबदार आहेत.
अगदी हृद्य आठवणी आहेत शाळेच्या.

शाळेची नोंद आवडली. शाळा, शिक्षणाला महत्त्व देणार गाव, गावकरी सगळच छान वाटलं. काळाच्या ओघात काही गोष्टी मागे पडतात, तसच काहीस झालं.

ठाण्यातही, मनिमोहोर यांनी पण उल्लेख केलाच आहे, अजूनही काही मराठी शाळा cbse/ आयसीएसई झाल्यात/ होतायत.
काही मोक्याच्या जागी असणाऱ्या शाळांच्या जागी मॉल्स/ high rise complex yetayat/ आलेत.

वावे, मन काहीसे उदास करणारी शाळेची नोंद आवडली. किती छान वारसा लाभला आहे तुला. तुझी आजी आणि तिला त्या काळी शिक्षण देणारे तिचे वडील दोघेही ग्रेट ! किती पिढ्या घडवल्या तुमच्या घराने! _/\_

वावे, शाळा बंद पडणे अगदी पोचले. आजीने शाळासुरू करुन किती लोकांना घडवले! भरत म्हणताहेत तसं त्याचा शाळाबंद पडायला हातभार हा काव्यात्म न्याय.
थोडक्यात शाळेचा इतिहास, जडणघडण आणि बदलत जाणार्‍या वहात्या समाजामुळे दुर्दैवाने आता संपलेली गरज हे फार सहज अधोरेखित झालं आहे.
सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत् ताः चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहः ते वन्दिनः ताः कथाः
सर्वं यस्य वशात् अगात् स्मृतिपथं कालाय तस्मै नमः॥
किंवा 'टाईम हॅज चेज्ड!' पुर्ष्या.
पण अशी नोंद फार महत्त्वाची. लेख खूप आवडला.

सुंदर लेख...
शहरात जाणारे जातील, पण ज्यांना याच शाळांचा आधार आहे त्यांची संधी अशा शाळा बंद होण्यामुळे कमी होऊ नये ही अपेक्षा.
सरकारने आणि गावांनीही या शाळांचा दर्जा टिकवणे, वाढवणे, सेमी इंग्लिश माध्यम सुरू होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे

Pages