Submitted by निखिल मोडक on 20 July, 2023 - 07:41
लोकशाहीत, मतदार राजा असतो असे म्हणतात! त्याची संपत्ती काय तर त्याचे एक मत! मतदानाच्या दिवशी तो ती ही संपत्ती देऊन भिकारी होतो, एकाच आशेवर, की वचन पूर्तता होईल, राज्य सुखी होईल. पण..
वचन पूर्तता व्हावी म्हणुनी
राजा एक भिकारी होतो
एक मताचा मारून शिक्का,
राज्य दुज्याच्या नावे करतो
दुजा असे ना भरत तरीही
राम खुशीने वनी राहतो
करील अयोध्या सुखी आपुली
असली आशा लावून बसतो
इकडे रामा काटे वनीचे
मुळे कंद फल खाऊन जगतो
कधी शबरीची बोरे उष्टी
हसत मुखाने चाखून बघतो
लढत राहतो नियतीशी अन
स्व कष्टाने तिला फिरवतो
नरा वानरा घडवून युती
सहकाराचा सेतू बांधतो
तीच अयोध्या असली तरीही
राम आता ना तेथे उरतो
भरत नसू दे, परी कशास्तव
राज्यावरती रावण दिसतो
©निखिल मोडक
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा