ती आई होती म्हणुनी.. !

Submitted by छन्दिफन्दि on 8 July, 2023 - 02:24

संध्याकाळी ऑफिसच्या बसने कॉर्नरला सोडले. तिथून घरापर्यंतचा रस्ता १० मिनिटांचा. नेहेमी प्रमाणे, एका हातात डब्याची बॅग, खांद्यावरची पर्स दुसऱ्या हाताने घट्ट पकडून होता होईल तेव्हढी झर झर पावलं टाकत चाललेली. एका बाजूला थोडं फार खोदकाम, आणि पार्क केलेल्या गाड्या, स्कुटर्स , दुसऱ्या बाजूला मागून येणाऱ्या गाडया.
अचानक एकदम हिसका बसला. तिने चमकून बघितलं तर दोघं जण बाईक वर होते, मागचा तिची पर्स जोराने खेचत होता. अजाणतेपणी तिने पर्स घट्ट पकडून ठेवली तस तो माणूस अजूनच जोराने ओढू लागला आणि पुढच्याने बाईक सुरु केली. पुढचं काही कळायच्या आतच, पर्स त्याच्या हातात होती आणि तिने रस्त्यावर सपशेल लोटांगण घातले होते. कशी बशी उठली आणि तशीच हळू हळू चालत घरी पोहचली.

पर्स, पाकीट, पैसे, कार्ड, मोबाईल तर गेलेच होते. त्याची तक्रार करायला हवी होती, कार्ड कॅन्सल करायला हवे होते. पण ती इतकी हवालदिल झाली होती. आल्या आल्या तिने डॉक्टराना फोन केला, आणि पैसे फाईल घेऊन पहिले दवाखाना गाठला. नशिबाने त्या भयंकर गर्दीत तिला ५ मिनिट का होईना डॉक्टर बघायला तयार झाले होते. डॉक्टरांनी व्यवस्थित तपासलं आणि सगळं नीट असल्याचं सांगितलं तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला.
त्या पाच महिन्याच्या न जन्मलेल्या जीवाला पोटावरून हात फिरवत कुरवाळत तिने हलकेच निश्वास सोडला. तिथून येईपर्यंत चांगलाच उशीर झालेला. घरात पऊल टाकताच तिने तीन वर्षाच्या पिल्लाला उराशी कवटाळले.
त्याच रस्त्यावरून कितीतरी वेळा त्या इवल्या जीवाचा हात पकडून, त्याला घेऊन, ती चालली होती. नशीब थोडक्यात निभावले. आज हातातून पर्स खेचली, कधी जर बाळाचा हात खेचला असता तर ....
त्या माउलीच काळीज पोटातल्या आणि हातातल्या दोन्ही बाळांच्या काळजीने जड झालं होतं. पण रहाट-गाडगं कुणाला चुकलंय? त्या हळव्या क्षणांना डोळ्यातल्या आसवांबरोबर पुसून ती पुन्हा अजून एका उद्यासाठी सज्ज व्हायला आज रात्रीचा दिवा मालवायला गेली.
वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि ... !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेलावून टाकले. अशा परिस्थितीतून गेल्यामुळे तिची अवस्था समजून येतेय.

आबा आणि धनवन्ती _____/\____

अशा परिस्थितीतून गेल्यामुळे तिची अवस्था समजून येतेय. >> ______/\____

छान.... कथा/ लेख आवडला.

<< अशा परिस्थितीतून गेल्यामुळे तिची अवस्था समजून येतेय. >>
-------- कुठल्याही शहरांत किंवा देशांत अशा परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पर्स द्यायला विरोध केला होता म्हणून मुंबई लोकल ट्रेन मधून मुलीला बाहेर फेकल्या जाण्याची घटना आठवली. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. गेलेली पर्स/ पैसे परत मिळविता येतात... खुशाल पर्स घेऊन जा म्हणायचे. आसपासची परिस्थिती बघून निर्णय घ्यायचा आहे.

छान. आवडले.

ती कथा आठवली - एक मुलगा, बायकोच्या सांगण्यकाढतो, आईला ठार करतो व आईचे काळीज काढतो. ते काळीज , स्वतःच्या बायकोला देण्याकरता तो त्या काळजाची कुपी घेउन, घाईघाईने निघतो व त्याला वाटेत ठेच लागते आणि त्या कुपीतून आवाज येतो - बाळा फार लागलं तर नाही ना?
>>>>हे ह्रदय असे आईचे
मी उगाच सांगत नाही
जे आनंदेही रडते
दु:खात कसे ते होई..
'राजहंस माझा निजला' - ही गोविंदाग्रजांची अभूतपूर्व अशी सुंदर कविता येथे आठवली.

सामो, उदय धन्यवाद!

>हे ह्रदय असे आईचे
मी उगाच सांगत नाही
जे आनंदेही रडते
दु:खात कसे ते होई..
'राजहंस माझा निजला' - ही गोविंदाग्रजांची अभूतपूर्व अशी सुंदर कविता येथे आठवली.>>> _____/\_____

राजहंस माझा निजला शोधून वाचली. खूप अंगावर येणारी आहे कविता!

अगं तू गडकरींची कविता वाचलेयस की नाही? नसशील तर ही लिंक बघ - https://sahityachintan.com/books-library/marathi/vagvaijayanti/page1.html
समग्र वग्वैजयंती मिळेल तुला.

हा गडकर्‍यांवरती मी लिहीलेला अगदी लहान लेख - https://www.maayboli.com/node/81148

सामो, वाचते. शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

च्च! जीव कळवळला! >>> ___/\__