सार्थक

Submitted by वावे on 31 May, 2023 - 03:07

दिवस कलता कलता बैलगाडी पाचाडजवळ पोचली. गाडीत लवंडलेला येसाजी गाडीच्या कठड्याचा आधार घेत उत्सुकतेने हळूहळू उठून बसला आणि समोर बघू लागला. दिवसभराच्या प्रवासाने कंटाळलेली त्याची नातही आता हुशारली आणि आज्याच्या मागून त्याला बिलगून समोर बघू लागली. गाव माणसांनी फुलून गेला होता. येसाजीची कारभारीण धर्माला म्हणाली, " धर्मा, ल्येका, त्या झाडाच्या बुडाशी सोड गाडी. बैलास्नी पानी पाज. आज लय दमलीत बैलं. तिकडं हीर हाय बग." धर्माने मान हलवली. गाडी झाडाखाली आल्यावर बैलांना चुचकारून खाली उडी मारत तो म्हणाला, " मामी, तू चूल मांड पलीकडं. म्या पानी आनतू." त्याने गाडीतली घोंगडी घेतली आणि दुहेरी घडी घालून पारावर अंथरली. येसाजीला आधार देत त्याने त्याला खाली उतरवलं आणि हळूहळू चालवत घोंगडीवर नीट झाडाच्या बुंध्याला टेकवून बसवलं. तो येसाजीला म्हणाला, "मामा, म्या पानी आनतू. मामी चूल पेटवंल. गरम गरम पानी घ्या अंगावर. म्हंजी बरं वाटंल. लय दमलात आज." येसाजीच्या चेहर्‍यावर हसू उमटलं. तो म्हणाला, "आज म्या धा-ईस वर्सांनी जवान झालोय ल्येका. आता दमबीम कसला?" धर्माचा चेहराही समाधानाने खुलला आणि तो म्हणाला, "म्या गावात दादाची चवकशी बी करतू. त्यो गडावर हाय का नाय ते इचारतू." आपल्या कर्तबगार लेकाच्या आठवणीने येसाजीचा चेहरा आणखीनच उजळला. त्याची नात उत्साहाने जिकडेतिकडे बागडत होती. येसाजीलाही तिच्यासारखंच बागडावंसं वाटत होतं. आता शरीर साथ देत नसलं, एक पाय गमावला असला म्हणून काय झालं? मनाने तो शिवाजीराजाचा तरणाबांड सैनिकच होता. पाठमोर्‍या धर्माकडे बघत तो आठवू लागला. किती वरसं जाली? सतरा-अठरा? व्हय. त्याच्या डोळ्यासमोर तो काळ उभा राहिला.

"येसा, हायेस का घरात?"
सकाळी सकाळी बाजीचा आवाज कानावर पडताच येसाजीला आश्चर्य वाटलं. त्याने मागे वळून आवाज दिला, " काय रं बाजी?" येसाजी सुतार होता. सकाळी उठून तो हत्याराला धार लावत होता. बाजी समोर येऊन बसला. त्याच्याकडे बघत येसाजीने विचारलं," येवड्या लौकर काय काम काडलंस आज?" बाजी म्हणाला," गडावर काम कराया येतूस काय?"
"कंच्या गडावर?"
"म्हंजे तुला म्हाईतच नाय व्हय? आरं शिवाजीराजा गड बांदनार हाय ह्या आपल्या भोरप्या डोंगरावर !"
येसाजी म्हणाला," आसंल बाबा."
बाजी म्हणाला," आसंल न्हाई, हायेच. राजाला चांगला कारागीर पायजे, तुज्यासारका."
येसाला काम मिळालं, तर हवं होतंच. त्याने बाजीबरोबर गडाच्या कामावर जायचं ठरवलं. बाजी पूर्वी चंद्रराव मोर्‍यांकडे होता, पण आता तो शिवाजीराजाला आपलं दैवत मानत होता. येसाजी कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपलं काम नि आपण, असं त्याचं सूत्र होतं. पण शिवाजीराजाने जावळी घेतल्यापासून परिस्थिती सुधारली आहे, हे त्यालाही मनोमन पटलं होतं. आता कुणाची जोर-जबरदस्ती चालत नव्हती. चोराचिलटांचं भय कमी झालं होतं. वतनदाराची मुजोरी कमी झाली होती, हे खरं. शिवाजीराजा काम देत असेल, तर जाऊ डोंगरावर, असा विचार करून तो आपलं सुतारकामाचं साहित्य घेऊन बाजीबरोबर भोरप्या डोंगर चढून गेला. खरोखरच वर कामाची गडबड उडाली होती. तोही त्यात सामील झाला. हळूहळू तो तिथे चांगला रुळला. स्वतः मोरोपंतांना त्याचं काम पसंत पडत होतं.

येसाजी कष्टाळू तर होताच, पण निधड्या छातीचाही होता. जावळीचं जंगल चांगलंच दाट होतं. एकदा संध्याकाळच्या वेळी डोंगर उतरत असताना त्याला खालच्या बाजूने गुराख्यांचा आरडाओरडा ऐकू आला. येसाजी धावतच तिकडे गेला. एका अस्वलाने गुराख्यांपैकी एकाला धरलं होतं. येसाजीने मागचापुढचा विचार न करता त्वेषाने आपल्या हातातल्या करवतीने अस्वलावर वार करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने अस्वल बिथरलं आणि पळून गेलं. गुराख्याचा जीव थोडक्यात वाचला.
ही हकीगत मोरोपंतांपर्यंत आणि नंतर शिवाजीराजांपर्यंत पोचली. गडाचं काम आता संपत आलं होतं. शिवाजीराजे एकदा गडावर आले असता त्यांनी येसाजीला बोलावून घेतलं. ते येसाजीला म्हणाले, "तुझं सुतारकाम तर चांगलं आहेच, पण तू शूर आहेस. अस्वलावर हल्ला करण्याचं धैर्य तुझ्यात आहे. आमच्या सैन्यात सामील हो. तुझ्या धैर्याला साजेसं काम तुला देतो."
त्या दिवशी येसाजीचं आयुष्य बदलून गेलं. तो तलवारबाजी शिकला, भाला फेकायला शिकला. शिवाजीराजे त्याच्यावर प्रसन्न होते. गड बांधून त्याचं नामकरणही झालं होतं-प्रतापगड. विजापूरचा सरदार अफझलखान शिवाजीराजांना पकडून घेऊन जाण्यासाठी येणार, अशा बातम्या येऊ लागल्या होत्या.
प्रचंड सैन्य घेऊन अफझलखान आला खरा, मात्र शिवाजीराजांच्या सैन्याने त्या सैन्याची धूळधाण उडवली. खुद्द अफझलखान मारला गेला. येसाजीने प्रतापगडाखालच्या लढाईत मोलाची कामगिरी बजावली. परंतु त्यात त्याचा पाय गमावला. पायाची जखम बरी व्हायला बरेच दिवस लागले. बरा झाल्यावर तो परत जमेल तसं सुतारकाम करू लागला. शिवाजीराजांनी त्याची नीट व्यवस्था लावून दिली होती. येसाजीचा मुलगा मोठा झाला, तसा त्याने त्यालाही शिवाजीराजांकडे धाडून दिला. तोही येसाजीसारखाच शूर होता, राजांचा लाडका होता. शिवाजीराजांशी एकदा झालेल्या भेटीने त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं होतं.

"मामा, भाकर खाऊन घ्या." धर्माच्या हाकेने येसाजी भानावर आला. अंधार पडायला लागला होता. अजून चार दिवसांनी शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक होणार होता. त्या सोहळ्यासाठी येसाजीला मानाने बोलावणं आलं होतं. आपापल्या गावाहून येसाजीसारखे कितीतरी जण रायगडाकडे आले होते, येत होते. सगळीकडे एखाद्या उत्सवासारखं वातावरण होतं.
जेमतेम अर्धी भाकर खाऊन येसाजीचं पोट भरलं. त्याला आत्ताच्या आत्ता गडावर जाऊन महाराजांना डोळे भरून बघावं असं वाटत होतं. कधी नव्हे, ते त्याला आपल्या अपंगत्वाचा राग येत होता.
याच अस्वस्थतेत रात्र कशीबशी सरली. पहाट झाली. येसाजीचा डोळा लागला. त्याला जाग आली, ती कारभारणीच्या हाकेने.
येसाजीसाठी आणि त्याच्यासारख्या सगळ्यांसाठी गडावरून पालख्या येणार आहेत, असा निरोप होता. येसाजीचं मन भरून आलं. डोळे तर कालपासून सतत भरून येतच होते. ठेवणीतले कपडे करून येसाजी तयार झाला. पालखी आली. धर्माचा हात धरून येसाजी पालखीत बसला. पालखी उचलली गेली. धर्मा, येसाजीची कारभारीण आणि त्याची नात पालखीबरोबर चालू लागले. सामान्यांमधले असामान्यत्व जागवणार्‍या त्यांच्या राजाकडे.

( महाराष्ट्र मंडळ बंगळूरच्या 'सनविवि' या मासिकात गेल्या वर्षी माझी ही कथा प्रसिद्ध झाली होती. 'आणि त्याचे/तिचे आयुष्यच बदलले' असा विषय दिलेला होता. त्या सूत्रावर आधारित ही कथा मायबोलीवर आणायची परवानगी दिल्याबद्दल सनविवि संपादक मंडळाची मी आभारी आहे. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरूवात खूपच उत्कट....
एक सुचवावसं वाटतंय...नात हुशारली च्या ऐवजी तरारली म्हटलं तर तिला आलेला प्रवासाचा कंटाळा सरला आणि ती तरतरीत झाली, ताजीतवानी झाली असा अर्थ होईल. Happy
बाकी कथा सुंदरच..

शिवराज्याभिषेक दिन जवळ आला आहे, त्या निमित्ताने ही कथा इथे प्रकाशित केली आहे.

धन्यवाद कुमार सर, शर्मिला, द.सा. Happy
'तरारणे' हा शब्द मी माणसांच्या बाबतीत नव्हता ऐकला याआधी. त्यामुळे सुचला नाही. हुशारली म्हणजे तिचा कंटाळा गेला, याच अर्थाने वापरला आहे. Happy
('तरारली बघ कमळे सगळी , मकरंदाला फुटली उकळी' (बा.भ.बोरकर) )

खूप खूप खूप छान लिहिलंय..
कालसुसंगत झालेय लिखाण...

हुशारली हा शब्द बरोबर आहे, खूप ठिकाणी वाचलाय.

तरारली बघ कमळे सगळी , मकरंदाला फुटली उकळी >> या वळवाच्या सरी परी तू आलीस माझ्या दारी गं - तीच कविता आहे ना ही? फार छान आहे.

मी अजून वरची कथा वाचली नाही, पण स्क्रीनवर बोरकर नोटिफिकेशन बघून धावत पळत आलो. माझे आवडते कवी. आता कथा वाचून अभिप्राय देईन. Happy

हुशारी येणे हा वाक्प्रचार सिंदबादच्या सात सफरीत बऱ्याचदा वाचला आहे. तो कुठल्या तरी बेटावर अडकतो आणि दमून भागून गेलेला असतो. तेवढ्यात त्याला नारळ सापडतो. त्याचं पाणी तो प्यायला आणि त्याला थोडी हुशारी आली - हे एक पेटंट वाक्य असतं.

धनवन्ती, सामो, आबा, ऊर्मिला, समाधानी, धन्यवाद!
ह.पा., तुम्ही पुलं-सुनीताबाईंची 'एक आनंदयात्रा कवितेची' ऐकली आहे की नाही? यूट्यूबवर आहे.

हो अर्थातच!

कथा आत्ता वाचली. सुंदर लिहिली आहे. अफझलखान वधाचा उल्लेख येणं अगदी बरोबर आहे. शिवरायांच्या आयुष्यातील २-३ प्रसंग असे आहेत, ज्यांमुळे लोकांना हा छोट्या चणीचा राजा काहीतरी चमत्कार करू शकतो आणि मोठमोठ्या पातशाह्यांवर मात करू शकतो असा विश्वास बसला असणार. अफझलखान प्रकरण, लाल महाल प्रकरण, आणि आग्र्याहून सुटका. बाकी प्रकरणे त्यांचं शौर्य, बुद्धिमत्ता वगैरे दाखवतात. पण वरील तीन प्रकरणं अशी आहेत की त्यांची कुणी स्वप्नात देखील कल्पना केली नसेल. हा माणूस सूपरह्यूमन आहे असं नक्कीच पब्लिकला वाटलं असणार.

धन्यवाद ह.पा.
नरहर कुरुंदकराच्या पुस्तकांमधून लक्षात आलेला मुद्दा म्हणजे अफझलखान कधीतरी येणार, हे शिवाजी महाराजांना अपेक्षित होतंच. त्याला तोंड देण्यासाठीची पूर्वतयारी म्हणजे जावळी घेणे. जावळी जिंकणे ते अफझलखान येणे यात जो दीडेक वर्षाचा काळ (चूभूदेघे) महाराजांना मिळाला, त्यात त्यांनी जावळीच्या प्रदेशाची 'व्यवस्था लावली'. ( हा शब्दप्रयोग कुरुंदकरांचा Happy ) जनतेच्या कल्याणाच्या उद्देशाने त्यांनी लावलेल्या व्यवस्थेचा अनुभव जावळीच्या परिसरातल्या लोकांना आला तेव्हा ते शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहिले. अफझलखानाला मारणे ही अर्थातच चकित करणारी घटना होती, पण तेवढं पुरत नाही. आदिलशाहीला दिलेल्या अनपेक्षित धक्क्याचा फायदा घेत पुढे पन्हाळ्यापर्यंत धडक मारणे ही शाश्वत कृती. सामान्य जनतेसाठी कल्याणकारी व्यवस्था रुळवणे ही लोकांसाठी महत्त्वाची कृती.

सहमत. केवळ चमत्कृतीवर साम्राज्य उभं करणं अशक्य आहे. एकीकडे कल्याणकारी व्यवस्थेतून लोकांना त्यांच्याबद्दल आपलेपण वाटलं, लोक त्यांच्या शब्दाकरिता प्राण द्यायला तयार झाले आणि दुसरीकडे ह्या चमत्कृतींमळे 'ह्या राजाला काहीही अशक्य/असाध्य ते साध्य करता येऊ शकतं' असा एक गाढ विश्वास निर्माण झाला. दोन्हींचा परिणाम चांगली आणि विश्वासू माणसं जोडण्यात, आणि संख्येने कमी असतानाही खंबीर, आत्मविश्वासपूर्ण स्वराज्य उभं राहण्यात झाला.