मी चोरलेलं पुस्तक
मी त्यावेळी मुंबईला नोकरीला होतो. १९८६-८८चा तो काळ. राहायला मरोळ पोलिस हेडक्वार्टर आणि नोकरी भायखळ्याला. नोकरी १२ तास सलग ड्युटी आणि २४ तास ऑफ अशा रोटेशनमधे होती. त्यामुळे छंद जोपासायला वेळ मिळायचा. फलज्योतिषाचा व्यासंग तर चालूच होता. वाचनाचा नाद असल्यानं दादरला मुंबई मराठी ग्रंथालय आणि विलेपार्लेला महिला संघाचं ग्रंथालय या दोन्हींचा वर्गणीदार झालो. दोन्ही ग्रंथालयांत ज्योतिषाची पुस्तकं थोडीफार असायची. ती वाचायचो. कधी कधी जूनी उत्तम पुस्तकं वाचायला मिळायची. तसं ग्रंथालयांचं आणि माझं फारसं जमायचं नाही.
पार्ल्याच्या महिला संघात कधी कधी शरद उपाध्येंचे ज्योतिष वर्गही असायचे. एकदा मी फलज्योतिषाचा सर्वे घेण्यासाठी मी प्रश्नावली तयार केली होती; ती उपाध्यांना चक्क माहिमला घरी जाऊन दिली. त्यांनी "माझ्या ज्योतिषक्लासला या. तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील", असं सांगितलं. मी सुरुवातीला गेलो. तिथे अनेक सुशिक्षित स्त्रीपुरुष क्लासला यायचे. मी लगेच काही फी भरली नाही. पण मी लक्षपूर्वक ऐकायचो. त्यांचं व्यक्तिमत्व अगदी आकर्षक असायाचं. पांढरा सफारी सूट, पांढरे शूज, पांढरे मोजे, पांढरे केस आणि तुकतुकीत दाढी केलेला बोलका चेहरा. ज्योतिषाचे किस्से ते गोष्टीवेल्हाळ स्वरूपात सांगायचे. ज्योतिषाविषयी शंका घेणाऱ्या पाखंडी लोकांची नंतर कशी दैन्यावस्था झाली, अशी कथापण त्यात असायची. पण मला माझी उत्तरं काही मिळत नव्हती. मग मी तिथे जमलेल्या स्त्री पुरुषांना ती प्रश्नावली वाटली. "तुमच्या गुरुजींना हे प्रश्न जरूर विचारा", असं मी सुचवायचो. ती बंडखोरी त्यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी मला क्लासमधून जवळजवळ हाकलून दिलं. "तुमच्या प्रश्नांची उत्तरं पोस्टानं पाठवेन," असं सांगितलं. अर्थात पुढे पोस्टाने त्यांनी काही उत्तरं पाठवली नाहीत. पण त्या प्रश्नावलीच्या आधारानं पुढे मी अनेक लोकांना छळलं.
एखादा नवकवी जसा आपल्या शबनम पोतडीतून आपल्या कविता बाहेर काढत असे तशी ती सायक्लोस्टाईल्ड प्रश्नावली मी सोबत ठेवत असे. कुणी मिळाले की त्याला पकडत असे. भायखळ्याला नोकरीला होतो तिथे मी एका छोट्या हॉटेलमध्ये जेवायला जायचो. हॉटेलमध्ये एक वेटर होता. त्याच्याशी परिचय झाला. तो माझं हे बाड पहात असे. एकदा तो म्हणला, की मी एमबीबीएसचा विद्यार्थी आहे. मला कौतुक वाटलं. कमवा आणि शिका. मग मी त्याला बी. एन. पुरंदरेंविषयी विचारलं. तो म्हणाला की ते आम्हाला शिकवायला आहेत. मग तो धागा पकडून मी त्याला ती सर्वेक्षणाची प्रश्नावली डॉ. पुरंदरेंना द्यायची विनंती केली. त्यानं ती मान्य केली. "शंका समाधान करायला आम्ही त्यांच्याकडे जात असतो, त्यावेळी ती देईन", असं सांगितलं. त्या सर्वेक्षणामध्ये डॉ. पुरंदरे यांच्याबाबत एक प्रश्न होता. डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी १९८५ च्या ज्योतिषसंमेलनात वैद्यक-ज्योतिषाच्या सेमिनारमध्ये अशी विधानं केली होती :
१. समाजातल्या ७% व्यक्ती धनभारित असतात. २८% व्यक्ती ऋणभारित असतात आणि बाकीचे विद्युतभारदृष्ट्या उदासीन असतात. व्यक्ती कोणत्या प्रकारची आहे हे त्यांच्या तळहातावर रुद्राक्ष धरून ठरवता येतं. धनभारित व्यक्तींमधे आत्मिक सामर्थ्यानं रोग बरा करण्याची, अंतर्ज्ञानानं भविष्य बरोबर सांगण्याची शक्ती असते. अशा व्यक्तींनी पाणी दिलं तरी त्याचं औषध बनतं.
२. गरोदर स्त्रीच्या पोटावर रुद्राक्ष धरून मुलगा की मुलगी होणार हे आधी कळतं.
३. डॉ. पुरंदरेंनी ऑपरेशन करून एक जुळं काढलं. त्यांचं पोषण करणारी वार एकच होती. वैद्यकशास्त्र सांगतं की अशी जुळी भावंडं अगदी एकसारखी असतात. परंतु तेवढया वेळात चंद्राचं नक्षत्र बदलल्यानं त्या मुली पूर्णपणे वेगळ्या रंगरूपाच्या, गुणाच्या झाल्या.
मला डॉ. बी.एन. पुरंदऱ्यांच्या या भूमिकेबाबत फारच उत्सुकता होती. काही तरी करून ही प्रश्नावली त्यांच्यापर्यंत पोहोचवावी असं मनात होतंच. नंतर पुढच्या वेळी तो वेटर-विद्यार्थी भेटला तेव्हा, "काय, प्रश्नावली दिली का सरांना?" असं मी विचारलं. तो मला म्हणाला, "दिली; पण वाचल्यावर ते खवळले आणि फेकून दिली ना राव!"
मला एकदम कसंतरीच वाटलं. आपल्याला ते भेटायला बोलावतील, कौतुक करतील, असे काहीतरी मनाशी इमले बांधले होते ते कोसळून पडले. पुढे त्या आधारे किर्लोस्कर मासिकात 'फलज्योतिष - एक आढावा' असा लेख लिहिला.
मुंबईत दादर मराठी ग्रंथालयात जायचो. तिथे ज्योतिषाच्या जुन्या पुस्तकांची शोध मोहीम चालू असायची. कार्डेक्सवरून अनेक दुर्मीळ वाटणारी पुस्तकं मागवायचो. पुस्तक चाळायचो आणि फारसे उपयुक्त नसेल तर लगेच परत करायचो. मला बघितलं, की ग्रंथालयातल्या त्या बाईंच्या कपाळावर न लपवता येण्यासारखी आठी पडायची. मी एक पुस्तक वारंवार मागायचो, त्या बाई मागणीचा कागद घेऊन रॅकच्या आड अदृष्य व्हायच्या आणि परत येऊन 'नाही'असं सांगायच्या. असं दोन-तीन वेळा घडलं. एकदा त्या बाई नव्हत्या, तिथे होत्या त्या दुसऱ्या बाईंकडे पुस्तक मागितलं. नसणारच असं गृहित धरलं होतं; पण बाईंनी लगेच काढून दिलं. मीही ते लगेच स्वीकारलं, उघडून बघण्याची पण गरज नव्हती. 'वाचून झाले'वर परत करण्याचा चिकटवलेला कागद मी बघितला, तेव्हा त्यावर गेल्या दहा वर्षांचे ग्रंथालय मोजणीचे फक्त शिक्के होते.
महिला संघाच्या ग्रंथालयात मात्र माझी पुस्तकांची देवणघेवाण चालू असायची. एका टेबलवर रंगीबेरंगी मुखपृष्ठ असलेल्या कथा-कादंबऱ्या अस्ताव्यस्त पडलेल्या असायच्या. वाचक त्यांतली पुस्तकं निवडून घेत होते. बहुतेक पुस्तकं नवी होती. वाचक मंडळी उदार होऊन दिलेल्या मर्यादित स्वातंत्र्यावर खूष होती. सगळ्या मराठी ग्रंथालयांमध्ये, थोड्या फार फरकानं, हीच परिस्थिती असायची. एकदा मला तिथे 'ज्योतिष कौस्तुभ' हा पंडित रघुनाथशास्त्री पटवर्धन यांनी संपादित केलेला जाडजूड स्मृतीग्रंथ दिसला. एकूणच ग्रंथात टिळकांच्या पंचांग सुधारणेचा प्रयत्न आणि अनुषंगिक पंचांगवाद याची बरीच माहिती होती. मी ते पुस्तक लगेच घेतलं. ग्रंथालयाची सेविका नवीन असावी. दुर्मीळ पुस्तकं ग्रंथालयाबाहेर जाऊ द्यायची नसतात. तिला या ग्रंथाच्या दुर्मीळतेबद्दल माहीत नसावं. पुस्तक पदरी पडल्यावर मी लगेच कलटी मारली. ग्रंथ वाचताना त्याचं महत्त्व लक्षात येत होतं. माझ्याकडे पंचांगवाद आणि फलज्योतिष या विषयांवर इतरही काही जुनी पुस्तकं होती. त्यामुळे 'ज्योतिष कौस्तुभ'मधला वादविवाद आणि विद्वज्जनांचे आपसांतले टोमणे लक्षात येत होते. मग वाटलं की हे पुस्तक आपल्या संग्रही असलं पाहिजे. विचार केला की या ग्रंथालयवाल्यांना अशा पुस्तकांचे काय महत्त्व कळणार?
त्यांच्या दृष्टीनं अनेक पुस्तकांपैकी हे एक पुस्तक. खरी उपयुक्तता आपल्याला आहे. आपण ते पुस्तक ढापू या. पण मग मला त्या पुस्तकावरच्या पहिल्या दोन कोऱ्या आणि शेवटच्या दोन कोऱ्या पानांवरचा ग्रंथालयाचा लंबगोल शिक्का मानसिक त्रास द्यायला लागला. नुकतंच एक व्यंगचित्र पाहिलं होतं . त्यात एक चोर चोरी करायला एका ठिकाणी येतो. तिथे तिजोरीजवळ एक पुतळा असतो. तो त्याच्याकडे रोखून पाहतोय असं त्याला वाटत असतं. त्यामुळे तो अस्वस्थ होतो. मग तो त्या पुतळ्याचे डोळे फडक्याने बांधतो आणि मग निर्धास्त होऊन पुढील चौर्यकर्म करायला लागतो. कदाचित या चित्राचा परिणाम म्हणून मला तो ग्रंथालयाचा शिक्का त्रास देत असावा.
मग मी त्या जुन्या पिवळट पडलेल्या पानावरचा शिक्का पुसट करण्यासाठी केराची माती त्या पानांना चोळली. आता तरी शिक्का पुसट होईल असं वाटलं, पण फार फरक पडला नाही. मग आयडिया केली. डिंक घेऊन ती मुखपृष्ठाजवळची ती दोन कोरी पानं एकमेकांना जोडली. आता शिक्का दिसत नव्हता. मग मलपृष्ठाजवळची दोन पानं एकमेकांना जोडली. आतमधले शिक्के जिरून गेले. हुश्श! मग स्वत:चं नाव पुस्तकावर लिहिलं. आता पुस्तक आपलं झालं.
पण दुसऱ्याच दिवशी पाहिलं तर तो शिक्का, पुन्हा अस्पष्ट का होईना, पण दिसायला लागला. पण विचार केला, खाई त्याला खवखवे. म्हणून आपल्याला तसं वाटतयं. इतरांच्या ते लक्षातही येणार नाही.मग मित्रांना उगीचच ते पुस्तक हाताळायला देऊन पाहिलं. त्यांनी आपलं ते पाहिलं, काहीतरी ज्योतिषाचं दिसतंय म्हणून चाळून परत केलं. अरे वा! म्हणालो, "यांच्या काही लक्षात आलं नाही."
नंतर ग्रंथालयाचं पुस्तक परत करण्याविषयी पत्र आलं. मी ते फाडून टाकलं. जणू काही आपण ते पत्र पाहिलंच नाही. नंतर त्या विलेपार्ल्याच्या दिशेला फिरकलोच नाही. डिपॉझिटच्या रकमेपेक्षा पुस्तकाचं मूल्य माझ्या दृष्टीनं कितीतरी जास्त होतं. पुढे यथावकाश माझी बदली पुण्यात झाली. मग माझ्या पुस्तकांची एक ट्रंक आणि कपड्याची एक बॅग असा संसार घेऊन मी पुण्यात आलो. मुंबईतल्या ग्रंथालयाच्या पुस्तकांमधून काही संदर्भ मिळत गेले. ते मी डायरीमधे लिहीत गेलो. पण प्रवासात ती छोटी डायरी हरवली. पण शं.बा दीक्षितांचे 'भारतीय ज्योतिषशास्त्र' अथवा 'भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास' या पुस्तकाचा शोध चालू झाला. सदाशिव पेठेत मित्राच्या घराजवळ एक मातृस्मृती ग्रंथालय होतं. तिथे ते पुस्तक होतं. मित्र तिथे सभासद होता. पुस्तक दुर्मीळ असल्यानं ते ग्रंथालायच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, हे त्या बाईंना माहीत होतं. मग मित्रानं आपली सात्विक पत पणाला लावून ते पुस्तक मला मिळवून दिलं.
प्रा. र. वि. वैद्यांनी याचं इंग्रजी भाषांतर केलं होतं. हिंदीत तो अनुवादित झाला. भारत सरकार प्रकाशन आणि प्रकाशन ब्युरो सूचना विभाग उ. प्र. यांनी तो प्रकाशित केला. पण मराठीत मात्र ते पुस्तक दुर्मीळ राहिलं होतं. मी त्याच्या रॉकेलवाल्या झेरॉक्स काढल्या. दुर्मीळ पुस्तकाच्या झेरॉक्स काढताना फार टेन्शन यायचं. एकतर ती पुस्तकं जीर्ण, खिळखिळी झालेली असतात. झेरॉक्स काढताना पुस्तकाच्या शिवणीवर ते पालथं टाकायला लागायचं. पुस्तकाच्या बाईंडिगची वाट लागायची. झेरॉक्सवाल्याला हळुवार हाताळण्याची विनंती केली तरी कामाच्या रगाड्यात ते त्यांना शक्य व्हायचं नाही. झेरॉक्स होईपर्यंत जीव खालीवर व्हायचा. या तीस पैसेवाल्या रॉकेलच्या झेरॉक्सचा प्रयोग अगदी केविलवाणा झाला. तीस पैसावाले ते काळेकुट्ट कागद काहीच नसण्यापेक्षा गोड मानून घेतले. हे पुस्तक महत्प्रयासानं मिळवलं होतं, त्यामुळे ढापण्याचा विचार मनात येणं शक्यच नव्हतं.
काही काळानं अत्रे सभागृहात वरदा बुक्सचं एक प्रदर्शन भरलं होतं. तिथे ते पुस्तक अचानक दृष्टोत्पत्तीस पडलं. मी घाईघाईत ते पुस्तक घेतलं आणि काऊंटरवर पैसे देऊन लगेच कलटी मारावी, या हिशोबाने चारशे रुपये सुट्टे देऊन निघालो. थोडं पुढे गेल्यावर काउंटरवरच्या माणसाने शुकशुक करून बोलावलं. मला वाटलं, हा आता म्हणतोय की हे पुस्तक विकायचं नाहीये, चुकून ठेवलं गेलं. पण तसं काही झालं नाही. तो म्हणाला, "अहो, यावर शंभर रुपये डिस्काउंट आहे. हे १00 रुपये परत घ्या." हुश्श!
वरदा बुक्सचे प्रकाशक ह. अ. भावे यांनी हा ग्रंथ दुर्मीळ झाल्यानं प्रकाशित केला होता. नंतर भाव्यांना भेटून हा दुर्मीळ ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल आभार मानले. या ग्रंथनिर्मितीसाठी उत्तेजना पुण्याच्या 'दक्षिणा प्राईझ कमिटी'कडून त्यावेळी शं.बा. दीक्षितांना मिळाली. त्यासाठी त्यांनी ४५० रुपयांचं बक्षिसही ठेवलं होतं. ते १८९१मध्ये दीक्षितांना मिळालं. परंतु हा ग्रंथ मुद्रित स्वरूपात १८९६मध्ये आला आणि दोन वर्षांनी दीक्षितांचा मृत्यू झाला. हा ग्रंथ दुर्मीळ झाल्यानं त्याची द्वितीयावृत्ती १९३१ साली आर्यभूषणनंच काढली. यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. वैद्य, गो. स. आपटे यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे, आणि ग्रंथाचं ऋण मान्य केलं आहे. पण त्यानंतर हा ग्रंथ पुन्हा दुर्मीळ झाला. ह. अ. भाव्यांना अशा दुर्मीळ पुस्तकांविषयी खूप आस्था होती. ते अशा ठिकाणी आपली व्यावसायिक गणितं बाजूला ठेवत असत. या पुस्तकामुळे त्यांच्याशी माझा स्नेहबंध जुळला. 'ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद' हे पुस्तक लिहिताना मला त्यातल्या संदर्भांचा उपयोग झाला. नंतर मी त्या रॉकेलवाल्या झेरॉक्स फाडून टाकल्या. आजही ते पुस्तक माझ्याकडे आहे.
माझ्या ग्रंथसंग्रहातली पुस्तकं जेव्हा मी चाळतो तेव्हा अजूनही तो लंबगोल, अस्पष्ट शिक्का असलेलं, महिला संघाच्या ग्रंथालयाचं ढापलेलं पुस्तक मला वाकुल्या दाखवतंच. आता जाणीवपूर्वक ढापलेलं पुस्तक याला चोरी म्हणायची की नाही? घेताना काही ते ढापावं असा मूळ विचार नव्हता. आपण तर ते सद्हेतूनं आपल्याजवळ ठेवलं आहे. ढापणं म्हणजे काही चोरणं नाही काही! उगाच आपले काहीतरी मनाचे खेळ आहेत.
'लोकसत्ते'मधे 'लोकरंग' पुरवणीत सध्या अंजली चिपलकट्टी यांचे थांग वर्तनाचा असं पाक्षिक सदर चालू आहे. ते मी वाचत होतो. त्यात एका ठिकाणी लिहिले होतं, "आपलं वर्तन/ अनुभव आणि आपली नैतिक मूल्यं यांत अंतर पडलं तर मेंदूला विसंगतीला तोंड द्यावं लागतं. सर्वच माणसांचा तो टाळण्याकडे कल असतो, कारण त्यामुळे मनात दु:ख आणि वेदना तयार होतात, ज्या अंतरंगी (visceral) ) असतात. यालाच नैतिक बोधनात्मक विसंगती (moral cognitive dissonance) असं म्हणतात. (नाव मोठं लक्षण खोटं!) समजा, आपण कोणाची तरी फसवणूक केली असेल तर त्यामुळे आलेल्या 'गिल्ट' पायी आपण असं का वागलो याची सफाई म्हणून एक गोष्ट रचतो. आपलं वागणं त्या परिस्थितीत कसं बरोबर होतं या स्पष्टीकरणानं (post-hoc) आपलं दु:ख हलकं होतं. (मग न विचारताही आपण ते लोकांना सांगत सुटतो!)"
ओके, म्हणजे ढापलं, चोरलं काहीही शब्द वापरले तरी आपल्याला गिल्टतर आलेला आहे. मग या पापाचं परिमार्जन ३४ वर्षांनंतर करायचं डोक्यात आलं. इंटरनेटवर महिला संघाचा पत्ता आणि फोन नंबर मिळाला. त्यांना फोन केला; "मी आपल्या ग्रंथालयाच्या एका पुस्तकाचं खूप जुनं देणं लागतो. त्याची भरपाई म्हणून मला आपल्याला देणगी द्यायची आहे." बाई म्हणाल्या, "ठीक आहे. हरकत नाही. संघाच्या पत्त्यावर चेक पाठवा." मग ताबडतोब मी दोन हजाराचा चेक पोस्टाने पाठवला. त्यांना तो मिळाला आणि त्यांनी देणगीची रीतसर पावतीही पाठवली आणि मी पापक्षालित झालो. नाहीतरी आपल्या धर्मात गंगेत स्नान केलं की म्हणे पापं धुवून निघतात. आता तो लंबगोल, अस्पष्ट शिक्का मला त्रास देत नाही.
(ऐसी अक्षरे दिवाळी 2021 मधे प्रकाशित)
ता.क. सदर पुस्तक गेल्याच वर्षी म्हणजे 2022 ला ग्रंथालयाला कुरियरने पाठवून उरले सुरले पापक्षालनही केले आहे.
मी चोरलेलं पुस्तक
Submitted by प्रकाश घाटपांडे on 16 May, 2023 - 08:14
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बघते.
बघते.
श्री प्रकाश घाटपांडे,
श्री प्रकाश घाटपांडे,
मी फलज्योतिष चिकित्सक. जातक, फलज्योतिष अभ्यासक , फलज्योतिष समर्थक ते फलज्योतिष टीकाकार
आपण फलज्योतिष अभ्यासक या नात्याने आपण स्वतः मांडलेल्या प्रश्नांना आपल्याला पटतील अशी उत्तरे मिळाली का ?
२००८ मधे सुरु केलेल्या या प्रक्रियेमधून
फलज्योतिष समर्थक होण्यासाठी आपल्याला काय पटले ?
काय पटले नाही म्हणून आपण टिकाकार आहात ?
दिवारचा फेमस डायलॉग आहे. भाई बोल रहा है के मुजरीम
माझ्या आधीच्या प्रतिक्रिये मधील विधानाचा अर्थ आपल्याला समजला नसावा म्हणुन विषयांतर करुन लिहीतो.
कै बाबासाहेब पुरंदरे याचा श्वास छत्रपती शिवाजी महाराज होते.
शिवाजी महाराजांवर त्यांची नितांत श्रध्दा होती.
असे असताना पुर्वग्रह दुषीत ठेऊन जेम्स लेन ला कै बाबासाहेब पुरंदरे यांनी मार्गदर्शन केले हा आरोप करुन संभाजी ब्रिगेड ने जाहीर बदनामी केली.
आपण माननीय शरद उपाध्ये यांनी दिलेले योगदान न पहाता हाच प्रयोग केलात.
मी कै. दाभोळकरांची न पटलेली मते लिहीताना सुरवातीला भानामतीव, जादुटोणा विरोधी केलेल्या कार्याची जाहीर प्रशंसा करतो. त्यांची ध्येयनिष्ठा पहाता हे करणे योग्य आहे. मग फलज्योतिष शास्त्रा विषयी त्यांच्या टोकाच्या भुमिकेवर लिहीतो.
आपणही हेच करावे असे वाटते. शेवटी कसे वागावे तुम्हालाच ठरवायचे आहे.
बाकी तुमचे लेखन हे बीनविषारी आहे.
नितिनचंद्र,http://mr.upakram
नितिनचंद्र,
http://mr.upakram.org/node/1065 इथे लेखमाला स्वरुपात असलेल्या चर्चेत आलेल्या प्रतिक्रिया वाचाव्यात. त्याला दिलेली उत्तरेही वाचावीत
सर्व गोष्टी आपल्याला पटाव्यात यासाठी मी अट्टाहास करणार नाही. मी तरी सौम्य आहे पण आमचे जेष्ट मित्र दिवंगत मा.श्री रिसबूड हे तर कठोर टिकाकार होते.
कै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक
प्रांजळ लेखन, आवडले.
प्रांजळ लेखन, आवडले.
Pages