कालचक्र

Submitted by mi manasi on 21 April, 2023 - 10:04

कालचक्रा आली गती
प्राण देहा नाकारती
जीव जीवनावरती
भार झाले !!

येता कोरोनाची लाट
फुटे पावलांना वाट
मग नदी नाले घाट
पार झाले !!

ये खबर कानो कानी
आता भेटावे दुरुनी
बंद एकमेका झणी
दार झाले !!

नाही जीवनाची क्षिती
जगण्याची रणनीती
मग उपेक्षांचे किती
वार झाले !!

सुटे धीराची संगती
झाला दीन मूढमती
आले नकार सोबती
यार झाले !!

विश्वरूप विश्वेशाचे
हात झाले आधाराचे
तिथे डोळा आसवांचे
हार झाले !!

मन जाईना माघारी
नको नोकरी चाकरी
निश्चयाचे वारकरी
ठार झाले !!

काळ सर्वांशी समान
हे राखावे अवधान
धुंडाळावे समाधान
सार झाले !!

आता स्वीकारले जिणे
काही नवे काही जुने
जीवनावरी नव्याने
स्वार झाले !!

अस्त उदयी साकार
येरझार अनिवार
आज उद्याचा विचार
फार झाले !!

मी मानसी

* कोरोना काळात लिहिलेली कविता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे.
>>>>>काळ सर्वांशी समान
Death – The Great Equalizer

फार छान लिहिली आहे. आवडली, आणि तो दु:खद काळ अक्षरशः डोळ्यांसमोर उभा राहिला.

बाकी, एक छोटी सुधारणा -
विश्वरूप विश्वेषाचे >> इथे 'विश्वेशाचे' असं पाहिजे. विश्व + ईश = विश्वेश.

धन्यवाद सामो!
हरचंद पालव धन्यवाद! व्हॉइस टायपिंगमुळे ती चूक झाली होती. सुधारणा केली आहे.. लक्षात आणून दिल्याबद्दल मनापासून आभार!