सरूपता मुक्ती !
कीर्तनात एका म्हटले ते बावाजी,
चारही लोळती मुक्ती चरणामाजी
क्षणभरी जरी नर देवद्वारामाजी
थांबला !
मग पुढे चारही मुक्तींचे महिमान
सांगता जाहले बावाजी तल्लीन
मी मनात माझे गणले भाग्य महान
हर्षलो!
ज्याचिया स्मृतींनी केवळ, लवते मान,
रक्तात सळसळे स्वत्वाचा अभिमान
त्या छत्रपती शिवबांचा सेवक दीन
एक मी !
देवाचे घ्यावे नाम जाणुनी खूण
बाणवू बघावे अंगी त्याचे गूण
मिरवावे जगती त्याचा भक्त म्हणून
नेहमी!
सहवास लाभता थोडा जरि देवाचा
शांतता शिरी ये, अमृतमय हो वाचा
जन्मोजन्मीच्या हिशेब अन पापांचा
संपतो !
मग पुन्हा जन्मणे नाही, म्हणती संत,
असलीच जरी का एक एवढी खंत
ते असो, भेटला कसा मला भगवंत,
सांगतो!
वेढ्यात पन्हाळा होता महिने चार
जाहलो मराठे आम्ही पुरे बेजार,
पण मनातून मानतो कधी नच हार,
मावळा!
नाईके शोधिली वाट अरुंद जिथून
वाटले शक्य जाणे वेढा चकवून,
गनीमांस गनीमी काव्याने हरवून,
सावध!
त्यासाठी मजला बोलावुन सदरेला
गुप्त बेत सारा त्यांनी मज सांगितला
आरंभ मुक्तिच्या वाटेला मग झाला
माझिया!
नेसते वस्त्र देवाचे होय प्रसाद
शिर नमवुनिया परिधान करावा मोद
अनुभवून घ्यावा अनन्यतेचा नाद
अंतरी !
ल्यायलो प्रभूंची वस्त्रे, माळा कंठी
शिरपेच शिरी अन चंद्रकोर ती माथी
नकळता नाम ते आले माझ्या ओठी
जगदंब !!
नादात दर्पणी पाहात होतो रूप
तो मागे माझ्या दिसले मज शिव भूप
जो स्वातंत्र्याचा मूर्तिमंत संकल्प
भूवरी !
दर्पणात दिसला देव मला माझ्यात
मी देव जाहलो, देवास्तव, साक्षात
ही सरूपता माझ्या लिहिली दैवात
ईश्वरे !
शिवप्रभूंस मुजरा करावया मी जाता
त्यांनी थांबविले धरून मजला हाता
घातली माळ मम गळ्यात त्यांनी स्वतः
कवड्यांची!
ही जगदंबेची खूण लाभली दैवी
संपले भूत अन संपुन गेले भावी
जाहला मुक्त हा शिवा शिवाच्या नावी
तत्क्षणी!
~ चैतन्य
सुंदर!
सुंदर!
धन्यवाद @अनन्त यात्री
धन्यवाद @अनन्त यात्री
फार फार सुंदर, वेगळा प्रकार,
फार फार सुंदर, वेगळा प्रकार, रचनेचे कौतुक करावे तेवढे कमीच! तुमचे मनःपूर्वक अभिनंदन! अनेक अनेक शुभेच्छा
जबराट!!!
जबराट!!!
अपूर्व, सामो,
अपूर्व, सामो,
मनःपूर्वक धन्यवाद.
अक्षरशः काटा आला शेवटी
अक्षरशः काटा आला शेवटी वाचताना..
खुपच वेगळा पण तितकाच सुंदर..
नमस्कार घ्या _/\_
धन्यवाद आबा _/\_
धन्यवाद आबा _/\_
सुंदर आहे!!
सुंदर आहे!!
शेवटचा परिच्छेद (शिवोहम्) पूर्ण समजला.
कसलं सॉलिड लिहिले आहेस चैतन्य
कसलं सॉलिड लिहिले आहेस चैतन्य. अंगावर काटा आला वाचताना.
पन्हाळ्याची गोष्ट मुलीला सांगताना दरवेळी जेव्हा शेवट सांगते तेव्हा डोळे पाणावतात.
आज हे वाचताना पण मन भरून आले . खूप सुरेख लिहिले आहेत.
माझ्या मुलीला पोवाडा म्हणायला आवडतो. हे हि तिच्याकडून पाठ करून घ्यावेसे वाटतेय. चालेल का?
धन्यवाद सामी. उशिरा प्रतिसाद
धन्यवाद सामी. उशिरा प्रतिसाद देतोय त्याबद्दल क्षमस्व. हे कुणाला तरी आपल्या मुलीकडून पाठ करून घ्यावंसं वाटलं, यातच मी धन्य झालो
सुंदर!
सुंदर!