कला - एक बूंद पारे की किंमत

Submitted by माधव on 5 December, 2022 - 10:21

बळी तो कान पिळी हे नैसर्गिक निवडीचे तत्व! ज्या प्राण्यांत एकाहून जास्त पिल्ले जन्माला येतात त्यांच्या बाबतीत हे खूप ठळकपणे काम करते. जे पिल्लू अधिक ताकदवान, आधी जन्माला येते ते सहाजीकच जन्मदात्यांनी आणलेल्या अन्नातला अधिकाधिक भाग गट्ट करते. बाहेर अन्नाची विपुलता असेल तर ठीक नाही तर जे पिल्लू कमजोर असते त्याला पुरेसे पोषण मिळत नाही आणि त्याच्या जगण्याची शक्यता कमीकमी होत जाते. काहीसे कटू असले तरी हेच निसर्गाचे तत्व आहे. त्यात त्या सशक्त पिल्लाला त्याचा कसलाच दोष लागत नाही ते निष्पापच असते. पण एकदा का जगणे सुरू झाले की मात्र आपल्या कर्माची फळे स्विकारण्याशिवाय गत्यंतर नसते - कधी ती जगाकडून मिळतात तर कधी आपल्याच मनाकडून!

एका गायिकेच्या घरी एक मुलगी जन्माला येते. जुळे होणार असते पण डॉक्टर सांगतात दुसरं मूल अशक्त होतं, नाही जगू शकलं आणि तो मुलगा होता. आईला त्या जन्माला न आलेल्या मुलाचाच लळा लागतो आणि मग मुलीच्या वाट्याला तिचे प्रेम कधी येत नाही. तो काळ असतो गायिकांच्या वाट्याला भरपूर नावलौकिक आणि पैसा येण्याचा पण तरीही प्रतिष्ठा नसण्याचा! प्रेम नसलं, तरी आईला मुलीची काळजी असतेच. मुलीच्या नावामागे 'बाई' न लागता ती प्रतिष्ठीत गायिका व्हावी यासाठी ती प्रयत्न करत असतेच. पण तिला कळतं की मुलीत गाणं असलं तरी ते गाणं अव्वल दर्जाचं नाहीये. आणि मुलगीही गळ्यातल्या गाण्याला रीयाझाने पैलू पाडण्याऐवजी आईचे प्रेम मिळवण्याकरताच आसूसलेली असते. तिच्याकरता गाणं दुय्यमच असतं - मुळात ती गाते तेच मुळी आइचे प्रेम मिळवण्याकरता !

आई तिचे गाणे एका संगीताच्या कार्यक्रमात पहिल्यांदा सादर करायचा घाट घालते. तीच एकटी गाईल अशी व्यवस्था करते. पण ऐन वेळेला तिच्याच वयाचा एक मुलगा पण गातो. तिच्या गाण्याच्या वेळेस मोजकेच असलेले श्रोते, त्याच्या वेळेस मात्र संख्येने चांगलेच वाढतात. आईला मुलीची काळजी वाटायला लागते. पण त्याचे गाणे ऐकल्यावर मात्र श्रोतेच नाही तर आईही त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडते, त्याच्यात आपला न जन्मलेला मुलगा शोधू लागते. आणि तेंव्हापासून त्या मुलीच्या अधोगतीला सुरुवात होते. आधी आईचे प्रेम मिळण्यासारखी घडपडणारी ती आता त्या मुलाचाही द्वेष करायला लागते. शेवट अटळ असतो.

सिनेमा खूप तरल आहे आणि इतक्या तरलतेत अशी कथा बसवणे खूप अवघड असते. दुसरे म्हणजे ९९% सिनेमात नायक / नायिकेच्या वाईट वागण्याचे उदात्तीकरण केलेले असते. ते या सिनेमात जराही नाही. नायिकेची अधोगती बघताना वाईट नाही वाटत, खूप भकास वाटते. सिनेमात दोन प्रसंग असे आहेत की ते बाहेरच्या जगात घडतात पण त्यांचे आईच्या गर्भातल्या घटनांशी खूप साधर्म्य आहे आणि त्यांचे चित्रण लाजवाबच आहे. एक म्हणजे तो मुलगा तिच्या घरी येतो तेंव्हा अंगणात गर्भातल्या जुळ्यांच्या आकॄतीत त्या दोघांवर घेतलेला शॉट आणि दुसरा त्या मुलाने फास लाऊन घेतल्यावर खाली पडणारा दोर ना़ळेची आठवण करून देतो - ती जिवंत आणि तो मेलेला. आधी घडलेली निसर्ग निवड आणि आता त्याचे फास लाऊन घेणे - दोन्ही मृत्यूच पण त्यातला फरक हा सिनेमा दाखावून देतो. आईने तिला कोकिळा म्हणणे त्या दोन प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर अधिकच गहिरे होते. (त्यातला संदर्भ थोडा चुकला आहे बहुदा - कोकिळेचे पिल्लू कावळ्याच्या पिल्लाला घरट्याबाहेर ढकलते हा संदर्भ हवा होता.)

दोन गाणी - अर्धवटच असली तरी - खूप सुरीली आणि सुंदर आहेत - तिचे बाबुल मोरा आणि त्याचे उड जायेगा. उड जायेगा तर अप्रतिमच. कुमारजींचे गाणे ऐकल्यावर आणखी कुठली चाल त्या गाण्याला बसूच शकत नाही असेच वाटत आलेले मला - पण हे गाणे खूप वेगळे आणि तितकेच सुंदर आहे.

तृप्ती दिमरी - काय लिहावे? बुलबुल मध्ये ती आवडली होतीच आणि यात तर तिच्या सम तीच अशी अवस्था आहे. निरागस चेहरा, गोड हसू सांभाळत कारस्थाने करणारी नायिका तिने अतिशय दमदारपणे उभी केली आहे. नायिकेचा राग न येऊ देणे आणि तिच्याबद्दल वाईटही न वाटू देणे या दोन टोकांवरची कसरत तिने अगदी सहज केली आहे. कुठच्याही एका बाजूला तिचे पात्र झुकले असते तर सिनेमा अगदी सामान्य होऊन गेला असता. तो असामान्य झालाय त्याचे श्रेय प्रामुख्याने तिला आणि दिग्दर्शिकेला! स्वस्तिका मुखर्जीची आई पण मस्तच - तिच्या भूमिकेला पूर्ण न्याय देणारी ! त्या दोघींपुढे इतर पात्रे लक्षात कमीच राहतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> स्वाती, गुरू की करनी गुरू जायेगा, चेले की करनी चेला ही ओळ बहुदा चित्रपटातील गाण्यात नाहीये
बरोबर, चित्रपटात तो गायला लागतो आणि जवळपास लगेचच त्याला थांबावं लागतं. पण म्यूझिक अल्बममध्ये आहे, तसंच भजन माहीत असल्यामुळे तो संदर्भ भिडतो!

काल लिहायचं राहिलं - जगन यात व्हिक्टिम वाटतो खरा, पण तोही जिवंत असेतोवर सोयीचाच खेळ खेळत असतो. कलाची घुसमट तो प्रत्यक्ष पाहातो, स्वतः कलाकार आणि अनाथ असल्यामुळे त्याचं गांभीर्य त्याला नक्कीच कळत असणार, पण त्याला त्यात पडायचंच नाहीये. त्याला ना कलाबद्दल सहानुभूती आहे ना तिच्या आईबद्दल (अन्यथा त्याला संधी मिळवून देण्यासाठी तिने तिचं स्त्रीत्व पणाला लावण्यावरून तो चकित/दु:खी झाला असता)! त्याला मिळालेली शिडी तेवढी दिसते आहे आणि तीवर चढायला तो पूर्णतया उत्सुक आहे. सगळीच पात्रं ग्रे शेड्समध्येच रंगवलेली आहेत.

चित्रपटाच्या सुरुवातीला श्रेयनामावली येते तेव्हा मागे पतंग (मॉथ्स) दिसत राहातात. नंतरही ते जागोजागी दागिने, ब्रूचेस, लॅम्प्शेडस, साड्या वगैरेंवर दिसत राहातात, आणि एका प्रसंगात आरशात स्पष्टपणेच. लाइमलाइटसाठी झेपावणारी, त्याकरता जाळून घ्यायलासुद्धा तयार असलेली पात्रं सगळी तसले पतंगच!
अमितने उल्लेख केलेलं मोराबद्दलचं गाणंही संदर्भ लक्षात आल्यावर भिडतं एकदम! पण ते फक्त जगनबद्दल नाही. जगन कलाचं स्वप्न पळवतो, आणि कला आईचं स्वप्न धुळीला मिळवत असते. म्हणून मग तिचं लग्न करून देऊन कलालाही तशाच पिंजर्‍यात बंदिस्त करणार असते तिची आई!
दुसर्‍याची स्वप्नं किंवा दुसर्‍याकरवी आपली स्वप्नं जगू पाहिलं की काय होणार?!
'सपने तू जूठे चखदा फिरदा - शहद वी खट्टा लगदा!'

बघितला , फार आवडला.
कलाच्या मनाचे भावाविष्कार सादरीकरणातून, मागच्या सेट्स मधून फार सुरेख टिपलेत. तृप्तीने अतिशय सुंदर अभिनय केलायं. तिच्या मेकपमधे आयलायनरचा शून्य वापर केलायं, म्हणजे तिचे डोळे भकास दिसावेत. डोळ्यातून आपला आत्मा दिसत असतो. त्याचे एकाकीपण दाखवलंय. पहिल्या रियाझानंतर आई घराबाहेर काढण्याने जो धक्का बसतो , त्यानंतर जेव्हाजेव्हा तिला आपण अपयशी झालो आहेत हे जाणवते तिची प्रतिक्रिया PTSD सारखी पुन्हा बाहेर पळण्यात होते. बाहेरही बर्फ आहे , त्यातून ते वातावरण मायेच्या उबेपासून वंचित असल्याने आलेला थंड एकटेपणा दाखवते. समोरचे मेझ हे Labyrinthआहेे त्या एकटेपणाच्या भूलभुलैयात ती पुरती अडकली आहे. त्यातून बाहेर जायला ती काहीही करायला तयार होते, जशी त्या पझलमधल्या पाऱ्याला सुटका हवी आहे आहे , तशीच तिलाही. गूढ वातावरण मुद्दाम दाखवलयं म्हणजे काय करायचे ते कळत नसताना जी अनिश्चितता येते , त्याचे सावट असल्यासारखे.त्या सावटाची सवय होऊन हळूहळू ती त्यातचं अदृष्यंं होत असल्याचा आभास निर्माण केलायंं.

>>> कलात ते गुण अजिबातच न्हवते.
नाऊ दॅट्स अनफेअर! +१

तिच्यात गुण होते पण तिच्याआईसाठी ते कधीही पुरेसे नसणार होते. तसं आईने ठरवलेलं होतं. मलाही तीव्र स्वरूपाचे पोस्टपार्टम डिप्रेशन आणि कुठेतरी आपल्या मुलाला हीने गिळलंय व पितृसत्ताक पद्धती . ह्या तिन्हीचे जहरी एकत्रीकरण वाटले. कारण सतत बुलींग झालं , तू सुंदर नाहीस, तुला गाता येत नाही ई म्हणून. ती भाबडी होती , जे समोर आलं ते तिनं केलं. तिला गायिकाही आईसाठी व्हायचं होतं , तिला स्वतःला काय हवं तेच माहिती नव्हतं, स्वसंदेहाचा रंग कोबाल्ट ब्लू , त्यामुळे श्रोत्यांमधे काही जणांना करड्या रंगाच्या खालोखाल दिला आहे. तिचेही सगळे कपडे करडे व शिमरी आहेत. शिमर म्हणजे वरच्या चकाकी खाली लपलेला करडा गहिरा एकटेपणा. करडा म्हणजे काळा नाही वा पांढराही. खऱ्याखोट्यातला फरक न कळणे. नात्यात समोरच्याच्या अपेक्षा कळत नसताना जो संभ्रम व तणाव निर्माण होतो तो डार्क कोबाल्ट ब्लू / मिस्टीक ब्लू रंगाने दाखवलायं. सगळे फर्निचरही तसेच आहे, फायरप्लेसचे मँटलही सुंदर पण उदास छटेचा क्रिम कलर दिलेले आहे. तिला आत्मविश्वास येऊ दिलेला नाही म्हणून ती शोषणाला बळी पडते. तिथेही दोन उघड्या तोंडाचे दोन गॉरगॉईल्स दाखवलेत. ते मला माणसाच्या रूपातल्या गिधाडाचे प्रतिक वाटले. पुढे नदी आहे म्हणजे वाट वा पर्याय नाही.

तो एलेव्हेटर मधे तिला , आज तू जी काही आहेस ती माझ्यामुळे म्हणतो. तेव्हा दुसऱ्या एखादीने कानाखाली जाळ केला असता. पण यशस्वी होऊनही हिचा सेल्फ एस्टीम इतका लो आहे. तिला ते कुठेतरी खरं वाटतंय , शिवाय आत्म्यावर आलेली अपराधी भावना. ती महत्त्वाकांक्षी नव्हती, फक्त मायेसाठी तरसलेली इंट्रोव्हर्ट मुलगी होती. पण ज्यासाठी तिने पाराप्रपंच केला तेही तिला मिळणार नाही हे कळल्यावर गिल्ट मोठा व्हायला लागला. शेवट अजून वेगळा काय असू शकला असता, ते दुःख, गहिरा एकाकीपणा फार मुरत गेलेला होता.

मला तर वाटलं जगनला सत्य लक्षात आलं , कारण त्या कपाटात तो निर्वाणीचं बोलत होता. मलाही गुरू की करनी तितकं भावलं नाही. 'निर्भौ निर्वैर' जगन शिवाय कुणीच नाही तिथं म्हणून ते अधोरेखित केल्यासारखं वाटलं. पाऱ्याला प्रवाही असूनही संपूर्णत्व कधीच मिळत नाही, कारण तो कधीही तुकड्यातुकड्यात विखरतो. त्यामुळे सतत असुरक्षिततेची भावना.

अस्मिता पोस्ट आवडली, सपुर्ण मुव्हिभर एक गहिरी गडद छाया आहे, अगदी बारिक सारिक डीटेल्सवर आर्ट डायरेक्टरने भरपुर मेहनत घेतली आहे.

छान लिहिलंयस.
संदिग्ध रंग आणि प्रकाश वापरलेले कळले होते, पण ' स्वसंदेहाचा रंग कोबाल्ट ब्लू', 'शिमर म्हणजे वरच्या चकाकी खाली लपलेला गहिरा एकटेपणा' अशी संगती नव्हती लागली. कपडे, दागिने, रंगसंगती इ. त्या स्थळकाळाशी सुसंगत म्हणून तसे निवडले असावेत असं धरून चालले होते.

तसंच पार्‍याचे आणखी 'मर्क्यूरियल पर्सनॅलिटी', यशासारखाच तो चकचकीत पण हातात धरून न ठेवता येणारा आणि विषारीही असेही संदर्भ सुचत गेले.

(बाकी गायकाच्या तोंडात थर्मॉमीटर द्यायचा नाही हे म्हणजे जरा हेच हं! Proud )

ईथल्या पोस्ट भारी आहेत एकेक. चित्रपट बघितल्यानंतर हे रसग्रहण वाचायला अजून मजा आली.

चित्रपट एक कलाकृती म्हणून चांगला आहे वा असावा. पण मला आवडला नाही.
प्रामुख्याने दोन कारणे.

१) डिप्रेसिंग आहे फार.
त्यात घडणाऱ्या घटना आणि चित्रपटाची फ्रेम सारेच असे आहे की एकत्रित परीणाम मन उदास करते. आणि आता काही अशुभ घडेल असे वाटत राहणारा हा मूड चित्रपटभर राहतो.

मला अंतर्मुख करणारे चित्रपट आवडतात. ते विचारांना नवी दिशा देतात. पण याने नैराश्य दिले असे वाटले. चित्रपट बनवणाऱ्याचा हाच हेतू असेल तर तो साध्य झाला आहे म्हणून शकतो. पण का? हा प्रश्न उरतोच. अश्या चित्रपटाच्या वाटेला गेलो हि माझीच चूक. नॉट माय टाईप समजायला हवे होते. पण बघितले तर बघतच राहिलो. ज्यांना डिप्रेशन आणणारे चित्रपट नाही झेपत त्यांनी टाळावे हा सल्ला.

२) प्रेडीक्टेबल आहे.
कथानकात नावीन्य नाही असे नाही. पण जे घडते ते फार प्रेडीक्टेबल वाटते. अगदीच धक्कातंत्र नको होते. पण आता काय घडणार याचा अंदाज आधीच येत राहतो. कदाचित त्यामुळेच वर जे मी म्हटलेय की अशुभाची चाहूल आधीपासूनच लागल्याने नैराश्य दाटून येत असावे.

असो. यावर उतारा म्हणून चित्रपट संपताच लगेच दुसरा हलकाफुलका चित्रपट बघायची ईच्छा झाली होती. पण रात्र झाली असल्याने थोडेफार पोरांशी खेळून झोपून गेलो. थोडक्यात मूड चेंज करणे गरजेचे वाटले..

बघितला, आवडला. सविस्तर लिहेन नंतर.
माधव, अमितव थँक्स

माधव, स्वाती, अस्मिता, अमितव सगळ्यांनीच छान लिहिलयत. मजा आली वाचताना. मध्यानंतर थोडा संथ झालाय असं वाटलं...

अजून चित्रपट बघितला नाही. एकसंघ बघणे बहूतेक झेपणारही नाही, टप्प्या टप्यात बघेन. मात्र माधव यांचे परीक्षण आणि त्यावर अमितव, स्वाती, अस्मिता, WHITEHAT यांची चर्चा फार आवडली.

पाहिलेला नाही अजून.
एक बूंद पारे की किंमत यावरून आठवले

- एक चुटकी सिंदूर कि कीमत तुम क्या जानो रमेशबाबू ?
रबा - जान गया हूं अब ..
हर महीने की कीमत
मकान का ईएमआय ६००००
मेन्टेनन्स - ५०००
बिजली - २०००
तुम्हारे ड्रेसेस - २०००
ब्युटी पार्लर - १००००
हॉटेलिंग ३००००
पार्सल्स २००००
मेड - ३०००
और बाकी के २००००
मार लो टोटल

मला बर्फी मधली प्रियांका चोप्रा च आठवत राहिली पूर्ण सिनेमा भर..हिचागेट अप पाहून!!
किती स्लो चालणं बोलणं...!!!

गाणाऱ्या व्यक्तीचा आवाज घालवायला पारा आणि कुंकू वापरणे हे खूप कॉमन आणि क्लिशे आहे. पाऱ्यामध्ये काही रुपक लपलेले आहे असे वाटत नाही.

पाऱ्यामध्ये काही रुपक लपलेले आहे असे वाटत नाही.>>>एकदा शोधलेली रूपकं आम्ही परत लपवत नाही . Proud ( 'एकदा विकलेला माल' च्या चालीत वाचावे.)
धन्यवाद स्वाती, प्राजक्ता, स्वातीताई, अवलताई.

बघितला. मलाही आवडला. डार्क, ग्लुमी, डल असला तरीही आवडला.
माणसाच्या आयुष्यात सगळं रंगीबेरंगी नसतंच.

कला ची दयाच येत राहिली शेवटपर्यंत. मुळात ती वाईट नाहीये पण लव डिप्राईव्ह असल्यामुळे असे कारस्थान करत राहते. त्यामुळे जरी ग्रे व्यक्तिरेखा दाखवली असली तरी चिड नाही आली तिची.
कदाचित तिचा जुळा भाऊ जगला असता तरी आई अशीच वागली असती असंं वाटतं. कारण त्या काळानुसार मुलगा मुलगी भेद असावा किंवा सिनेमा, गायन क्षेत्रात लोकं फिमेलचं शोषण करतात. म्हणून या सगळ्यात मुलानेच पुढे जावं असं तिच्या आईला वाटलं असेल.

आई झालेली अ‍ॅक्टर कोण आहे माहित नाही. पण राखीचा फार भास होत होता.

जगनही साधा नाहीच दाखवलेला. त्यालाही स्वत: च्या गायकीपुढे कोणाची किंfunction at() { [native code] }अ मत नसतेच.

बाकी स्नो चा इतका सुरेख सुंदर वापर क्वचितच बघितलाय. ग्लुमी, गुढ असलं तरी ते वातावरण फार आवडलं.
शेवट शेवटचा सिन जिथे ती संन्याल समोर गात असते, खूप रिटेक होतात. तिचं मानसिक संतुलन बिघडायला लागतं, तिथे तिला वाटतं आजूबाजूला बर्फ आहे. त्यात पाय अडकत चालले आहेत, ती बर्फ असल्याप्रमाणे पाय उचलून टाकतेय, थंडी वाजतेय. फार मस्त झालाय तो सिन.
काहीतरी वेगळे अँगल्स, वेगळे फ्रेम्स नक्कीच लक्षात राहण्यासारखे आहेत या सिनेमातले.

थोडं वेगळं perspective-
मला उर्मिला आणि सान्यालचे सीन्स(बिखरनेका मुझको गाणं आणि मग बेडरूम सीन) बघताना उर्मिला काहीतरी मनाविरुद्ध फक्त फेवर मिळवायला करते आहे असं नाही वाटलं. ती एकाकी विधवा. तो एकाकी मनस्वी देखणा गायक. Two consenting adults टाईप वाटला तो प्रकार. तिने आपल्यासाठी केलं हा जगनचा अंदाज झाला.

पुढे कला सान्यालला सिड्यूस करते व सावध करते की जगनला मदत करू नको, तो तुलाच रिप्लेस करेल तेव्हा तो शांतपणे सांगतो की मला माहीत आहे पण मला काही फरक पडत नाही, संगीत महत्वाचं . त्यावरूनही वाटलं की सन्याल जगनची मदत त्याच्या गुणांसाठी करत आहे. त्याच्या आईवर फेवर म्हणून नाही.

जगन, सन्याल, उर्मिला तिघेही संगीताला सर्वोच्च मानणारे दाखवले आहेत. जगन म्हणतो - मी स्वतःसाठी गातो. उर्मिला एरवी प्रतिष्ठा,स्टेटस याला महत्व देणारी आहे पण संगीताला जातीधर्म नसतो असं मानते व तसं वागतेही. सन्यालला माहीत आहे जगन त्याचा स्पर्धक बनू शकतो पण जगनच्या संगीताला वाव देणं त्याला तरीही करायचंच आहे.
याउलट कला. संगीत तिच्यासाठी फक्त means to an end आहे- आईचं कौतुक आणि मानसन्मान मिळवण्यासाठी.

तृप्ती दिमरी लीली कॉलिन्स सारखी दिसते का? कला बघताना सारखं वाटत होतं ही कोणासारखी तरी दिसते. आज एकदम आठवलं लिली कॉलिन्स तर नाही?

चित्रपट नाही पाहिला. पण अचानक युट्युबवर गाणी समोर आली, ती ऐकली, आवडली.
बलमा घोडे पे सवार है, बिखरने का शौक, निर्गुण निर्वैर आणि फेरो ना नजरिया.
पहिले गाणे ५०-६० च्या दशकातले आहे असा फील येतो. एडिक्टिव्ह वाटते. 'बिखरने का शौक' सर्वात जास्त आवडले त्यानंतर निर्गुण निर्वैर. 'हंस अकेला' वर प्रयोग करणे हे शिवधनुष्यच. आणि ते नीटच उचलेले आहे. 'रुबाईयाँ' मात्र नाही आवडले

हॅट्स ऑफ टू अमित त्रिवेदि.

ही गाणी आवडली असतील तर त्या युट्युबच्या ज्युक बॉक्स मध्ये 'अम्मा पुछदी' नाहीये ते पण ऐका. https://www.youtube.com/watch?v=B7a_AwxPQsw व्हिडिओ इग्नोर करा या लिंक मधला.
ते गाणं आणि त्याचे शोधलेत तर विविध अर्थ हे तर हाँटिंग आहेत. हिमाचल फोक साँग आहे. त्याचा अनेकांना माहित असलेला अर्थ एक आहे आणि चित्रपटात ते अशा वेळी येतं की त्याचा अगदीच विपरित अर्थ लावला जातो.
ते सगळं सोडलंत तरी हे गाणं एकदा ऐकुच थांबुच शकत नाही कॅटेगरी मधलं आहे. नक्की ऐका.

Pages