हिमालय - पिंडारी - फुकरिया ते झिरो पॉइंट
आज २ जून उजाडला. आता सगळ्यांना परतीचे वेध लागले होते. टेंटची excitement संपून गादीची आठवण यायला लागली होती. पण अजुन धीर धरायला हवा होता. कारण आजचा ट्रेकिंगचा शेवटचा दिवस असला तरी longest distance कव्हर करायचं होतं. जवळपास १९ किमी.
शेवटचा ग्रुप फोटो
काही ब्रँड्स इतके नावाजले आहेत त्यामुळे त्यांची जाहिरात करतोय असंच वाटेल कुणाला
आधी दोन दिवसांत जितकं केलं तेवढं आज एका दिवसांत करायचं होतं. नेहेमीप्रमाणे सकाळी लवकर चालायला सुरुवात केली. रोजच्या सारखंच चालायला लागल्यावर थंडी जरा कमी झाली. फुकरिया पासून द्वालीला जवळ पास २ तासांत पोचलो. उतरण असल्यामुळे सगळ्यांचा वेग जरा चांगला होता. त्यानंतर मात्र वेगामधे तफावत होऊ लागली. काही जण पुढे गेले. काही रेंगाळत , थांबत निघाले. मुलं टणाटण उड्या मारत पुढेच!
खरं तर तेच जंगल, परत आज नव्याने बघितल्यासारखं वाटत होतं. इतकं मोहक की परत फोटो काढलेच.
काय झाडी, काय डोंगर, काय आकाश...सगळ ओके मधी हाय Mosking
यापेक्षा वेगळं कॅप्शन काय सुचलं नाही या फोटोला
सकाळचं कोवळं ऊन
मोहक जंगल
जंगलात मी
डाव्या गुढग्याची ligament आठवून उतरताना मला जास्त भिती वाटत होती. मी कायम ट्रेक करताना डाव्या गुढग्याला कॅप घालतेच, त्यामुळे उजव्या वर प्रेशर येतं आणि पुढे दोन दिवस तो दुखतो. तो तसा दुखणार असं मी गृहितच धरलं होतं, पण तो दुखलाच नाही. १५ दिवस आधी रनिंग करताना दोन्ही पायांची एकेक नखं दुखावली होती. काळी झाली होती. आत्ता उतरताना शूज मधे पाय हलत होता आणि नखं आपटत होती, ते जाणवत होतं. नंतर नंतर दुखायला लागली होती. मग मी शूज अजुन घट्ट बांधले. त्यामुळे नखं वाचली पण नंतर दुसर्या दिवशी तीन बोटांना ब्लिस्टर्स झाले. अर्थात ते मला तेंव्हा जाणवले पण नाहीत. त्या रात्री कळले आणि दुसर्या दिवशी चालताना जाणवले.
मधे एक वेळ अशी आली की मी एकटीच चालत होते. निरव शांतता, त्यात मधेच एखादा पक्षी गायचा आणि पावलांचा आवाज, हे इतकं अमेझिंग होतं पण तोवर एक गाइड कुठुन तरी प्रकट झाला. असं एकटं शक्यतो राहु नये म्हणून! मग आमचा एक कंपू मला भेटल्यावर तो परत गायब झाला. मधे एक लोकल मेंढपाळ जोडी भटली. त्यांच्या ६००-७०० मेंढ्या आहेत. त्यांच्या एका निवांत क्षणी त्यांच्याशी जरा गप्पा मरल्या. त्यांना विचारून फोटो काढलाय.
ऊन त्यांना सहन होत नव्हतं त्यामुळे त्यांना ब्रेक्स घ्यावे लागत होते. तिथेही ऊन फार वाढलंय असं ते सांगत होते.
आज मी अगदी मजल दरमजल करत हा शेवटचा टप्पा पार केला. एका क्षणी, कुठुन मला इथे यायची दुर्बुद्धी झाली असंही वाटून गेलं, पण साईट गाठल्यावर दु:ख अर्थातच विसरायला झाले. आज आम्ही ७ तास चालत/ चढत आणि जास्त उतरत होतो. आज दुपारचं जेवण उशीरा
साइटला पोचल्यावरच केलं. इथे चार खोल्या मिळाल्या होत्या, त्यामुळे ज्यांना पाठीचे त्रास होत होते, ते आणि मुलं अशी खोल्यांत झोपली. बाकीचे टेंट मधे. रात्री गप्पा, थोडा वेळ शेकोटी असा कार्यक्रम रंगला.
दुसर्या दिवशी गाड्या जिथे येणार होत्या तिथपर्यंत परत चढउतार असल्याने नाइलाजाने दुखर्या पायांवर शूज चढवले. छोट्यांना सगळ्यांच्या समोर Certificate देऊन त्यांना जरा खुश केलं आणि निघालो
आमच्यातल्या ज्यांना जमतंय ते ऐश करण्यासाठी बिनसरच्या महिंद्रा रेसॉर्ट्ला दोन दिवस रहाणार होतो. चेक इन करायला पण कुणाला दम नव्हता. पहिलं काय तर नेट. ते मिळाल्यावर कशाची शुद्ध! रूम्स मिळाल्यावर या खालोखाल दुसरं महत्वाचं काम केलं, ते म्हणजे आंघोळी! गरम पाण्याने आंघोळ आणि केसांना पाणी लगल्यावर एकदम प्रफुल्लित वाटलं.
काही जण आधी आणि काही नंतर फोनला चिकटले.
दोन दिवस इथे जरा बाजारात फिरून, खाण्याचे चोचले करून आम्ही सुंदर आठवणी आणि अनुभव घेऊन आपापल्या गावी परतलो.
समाप्त.
मस्त
मस्त
मस्त मस्त मस्त!
मस्त मस्त मस्त!
झाडी, डोंगर, आकाश एकदम भारी!
मस्तच
मस्तच
सगळी मालिका छान झाली आहे.
सगळी मालिका छान झाली आहे. फोटो बघून अगदी शांत वाटलं.
मस्तच ट्रेक झाला! छान लिहीलंय
मस्तच ट्रेक झाला! छान लिहीलंय सुद्धा.
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना