निसर्ग उद्यान - Hidden Gem of नवी मुंबई (फोटोंसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 July, 2022 - 16:44

बरेच दिवसांपासून मनात होते की वाशीच्या मिनी सी शोअर बद्दल चार शब्द लिहावेत. तिथले चार फोटो माबोकरांशी शेअर करावेत. पण प्रत्यक्षात हा विचार अंमलात आणायला गेलो तर चार हजार शब्दांत आणि चारशे फोटोतही न मावणारा विषय आहे तो. कारण त्या जागेशी एक वेगळेच नाते आहे.

जवळपास सहा वर्षांपुर्वी मी जेव्हा मुंबई सोडून नवी मुंबईकर व्हायचा निर्णय घेतला तेव्हा तो ईतका कठीण होता की मला थेट सारे पाश तोडणे जमलेच नाही. नवी मुंबईत मालकीचे घर घेणे शक्य असूनही मी भाड्याच्या घरात राहायचे ठरवले. आधी आपल्याला हे शहर जमते का बघूया. न जमल्यास गड्या आपली मुंबईच बरी असा त्यामागे विचार होता.

वाशीला जिथे घर भाड्याने घेतले तिथून ऑफिस जवळ, सासुरवाडी हाकेच्या अंतरावर, आणि लेकीला शाळाही जवळचीच शोधली. त्यामुळे एकूणच आयुष्य सुखकर झाले आणि हळूहळू नवी मुंबईबद्दलचे माझे मत अनुकूल होऊ लागले. पण या विचारपरीवर्तनामागे सर्वात मोठा वाटा होता तो मिनी सी शोअरचा. आधी मी त्या परीसराच्या प्रेमात पडलो, नंतर वाशीच्या, आणि अखेरीस नवी मुंबईच्या...

ते भाड्याचे घर अगदी मिनी सी शोअरला लागूनच असल्याने तो घरचाच पडीक कट्टा बनला होता. पण नवीन घर घेताना लक्षात आले जवळपास कुठेही नवीन बांधकाम चालू नव्हते. मला ईतका छान परीसर सोडून जावेसे वाटत नव्हते. पण त्याचवेळी बायकोला नव्या आयुष्याची सुरुवात एखाद्या जुन्या घरात करावीशी वाटत नव्हती. सासुरवाडी जवळच असल्याने मुलांना आजीआजोबांचे सुख मिळावे यासाठी फार दूरही जायचे नव्हते. अखेर या सर्वाचा सुवर्णमध्य साधत वाशीशेजारीच असलेल्या कोपरखैरणेला एक घर बूक केले.

वाशीचा पत्ता बदलून कोपरखैरणे झाला. तरीही दर विकेंडला व्हाया मिनी सीशोअर - सासुरवाडी जाणे व्हायचेच. आमचा पडीक कट्टा काही बदलला नव्हता. पण आयुष्यात काहीतरी बदल होत राहावा, ते एकसुरी होणे टाळावे म्हणून अध्येमध्ये चेंज म्हणून ईतर फिरण्याची ठिकाणेही शोधायचो.

आणि अश्यातच एके दिवशी, म्हणजे कोपरखैरणेला राहायला येऊन तब्बल एक वर्ष उलटल्यावर, एकदा गूगल मॅप बघताना घराच्या बरेपैकी जवळच असलेल्या "निसर्गउद्यान" नामक जागेवर नजर पडली. खरे तर त्याआधीही मॅप चेक करताना तो भलामोठा हिरवा चौकोनी तुकडा नजरेस पडलेला. पण तिथे जवळच डंपिंग ग्राऊंड आहे हे वाचून त्या दिशेला कधी जायचा विचार केला नव्हता.

पण त्या दिवशी संध्याकाळी घरातून निघायला फार ऊशीर झाला होता. एवढ्या उशीरा मिनी सीशोअरला जाण्याऐवजी या नवीन जागेचेच अन्वेषण करूया म्हटले आणि रिक्षा तिथे वळवली. खरे तर रिक्षाचीही गरज नव्हती. ते उद्यान घरापासून चालत पंधरा मिनिटे अंतरावर होते. पण सोबत पोरगा होता. नाहीच आवडली जागा तर तीच रिक्षा फिरवून दुसरीकडे जाऊया म्हटले.

उद्यानाच्या जवळ पोहोचलो आणि लक्षात आले की शेजारीच डंपिंग ग्राऊंड म्हणत असले तरी ना कचर्‍याचा त्रास, ना कसला वास. कदचित निव्वळ नामधारी डंपिंग ग्राऊंड असावे. बरेच लोकांची वर्दळ त्या दिशेने जात होती. आम्ही देखील त्या वर्दळीचा भाग बनलो. आणि प्रवेशद्वारातून आत शिरत जे उजवीकडे नजर टाकली ते..... आहाहा!

काय विलोभनीय दृश्य होते ते! नजर जाईल तिथवर पसरलेला हिरवागार बगीचा. त्याही पलीकडे सपाट मैदान, त्यापलीकडे न दिसणारी खाडी, पण दूर क्षितिजावर आपल्यासोबत संध्याकाळचा चहा घेण्यास आलेले साक्षात सुर्यनारायण Happy

आणि मग मी तिथेच जागेवर थिजून हा पहिला फोटो टिपला. सुर्य मावळू लागलेला. अंधार पडू लागलेला. त्यामुळे तितका क्लीअर आला नसावा. पण घरी जाऊन हे बघा, आम्ही एक नवीन फिरायची जागा शोधली, म्हणून तिचे सौंदर्य दाखवायला पुरेसा होता.


IMG_20220709_233119.jpg


IMG_20220709_233401.jpg

जितके मन आनंदून गेले तितकेच डोकेही भणभणले. अशी एखादी जागा आपल्या नव्या घरापासून चालत जावे ईतक्या जवळ होती आणि आपल्याला तिथे पोहोचायला वर्ष लागले.

त्यानंतर महिन्याभरात अजून काही संध्याकाळ तिथे घालवल्या आणि अजून काही सुर्यास्ताचे फोटो टिपले.


IMG_20220709_233323.jpg


IMG_20220709_233344.jpg


IMG_20220709_234116.jpg

.

डिसेंबरचा महिना होता. नवीन वर्षाचा संकल्प जवळ आलेला. बरेच दिवस मॉर्निंग वॉल्कचा संकल्प मनात घोळत होता. पण चालायला जावे तर कुठे या प्रश्नावर येऊन घोडा अडत होता. तेव्हा या निसर्गउद्यानाची आठवण झाली. सुर्यास्ताची मजा फार लुटली, आता मॉर्निंग वॉल्कच्या निमित्ताने एखादा सुर्योदय बघूया म्हटले. शुभस्य शीघ्रम म्हणत दुसर्‍या दिवशी भल्या पहाटेच तिथे पोहोचलो. आणि पुन्हा एकदा डोके भणभणले. मी पुन्हा एक महिना फुकट घालवला होता. सकाळच्या प्रहरी फिरण्यासाठी, निसर्गउद्यान या नावाला जागणारी, यापेक्षा सुंदर जागा असूच शकत नव्हती.


IMG_20220709_233230.jpg


IMG_20220709_233657.jpg


IMG_20220709_233722.jpg

.

संध्याकाळी दिसणारी हौश्या-गवश्यांची गर्दी सकाळी कुठेच नव्हती. जी काही रहदारी होती ती फिटनेस आणि आरोग्याप्रती जागरूक असणार्‍यांची होती. कोणी चालत होते. कोणी धावत होते. कोणी योगा करत होते. कोणी ओपन जिमचा वापर करत होते. तर कोणी गवतावरच सुर्यनमस्कार घालत होते. काही नाही तर कोणी सकाळच्या कोवळ्या उन्हावर अंग शेकत होते. कोणी चक्क गाण्याचा रियाझ करत होते. तर बॅडमिंटन खेळाचा एक वेगळाच फॅन क्लब होता. एकंदरीत रिकामटेकड्यांना ईथे बसायलाही लाज वाटावी असे वातावरण होते. आणि मला हेच हवे होते.

मी सुद्धा त्यांच्यातीलच एक होत फेर्‍या मारायला घेतल्या. त्यासाठी छान आखीव रेखीव असे रस्ते बांधले होते. ठिकठिकाणी विविध प्रकारचे बाकडे होते. ऊनपावसापासून वाचायला तंबूच्या आकाराचे शेड (Gazebo) होते. सर्वात महत्वाचे म्हणजे कमालीची स्वच्छता होती. चालायच्या वाटेवर कुठलाही कचरा तर नव्हताच. पण ज्या एकमेव कारणासाठी लोकं "आय हेट डॉग्ज" म्हणतात, ते कुत्र्यांचे पराक्रमही नव्हते. अन्यथा हल्ली सकाळीच कुठे चालत जायचे म्हटले तर, 'छई छप्पा छई, छप्पाक छई' करतच चालावे लागते.


IMG_20220709_233436.jpg

१०
IMG_20220709_233511.jpg

११
IMG_20220709_233558.jpg

१२
IMG_20220709_233912.jpg

१३
IMG_20220709_233956.jpg

१४
IMG_20220709_234024.jpg

.

बागेतला क्राऊड अगदी सुशिक्षित, सुसंस्कृत आणि टापटिप दिसत होता. त्यामुळे आपण वेगळे वाटायला नको म्हणत मी सुद्धा दुसर्‍याच दिवशी दोनेक ट्रॅक पँट ऑर्डर केल्या. त्याला साजेसे टीशर्ट शोधून काढले. चालण्यासाठी उत्तम अश्या शूजची खरेदी झाली. वाढदिवसाला बायकोने गिफ्ट म्हणून दिलेले, मी नाक मुरडत स्विकारलेले, आणि एवढे दिवस पडून असलेले स्मार्टवॉच वापरायला काढले. तहान लागली की पाण्याची बाटली खिश्याशी हवी हे लक्षात येताच एक छोटीशी बाटली खरेदी झाली. चालता चालता गाणी ऐकायला कानात एखादा ईयरफोन हवा असे आता नुकतेच वाटू लागले आहे.. तो ही येईल लवकरच! छे, लेख प्रकाशित करेपर्यंत आलाही Happy

पण महत्वाचे म्हणजे अर्धे वर्ष उलटले तरी अध्येमध्ये खंड पडत का होईना माझा निसर्गाच्या सानिध्यातील मॉर्निंग वॉल्क कायम आहे. आणि याचे पहिले श्रेय निसर्ग उद्यालानाच जाते. तर हे असेच चालता चालता टिपलेले काही फोटो...

.
हे माझ्या फार आवडीचे झाड
१५
IMG_20220709_233453.jpg

१६
IMG_20220709_233532.jpg

.
आणि हा माझ्या फार आवडीचा बेंच !
१७
IMG_20220709_233806.jpg

१८
IMG_20220709_234235.jpg

१९
IMG_20220709_234259.jpg

२०
IMG_20220709_234321.jpg

२१
IMG_20220709_234344.jpg

२२
IMG_20220709_234627.jpg

.
हे रस्ते उद्यानाच्या आतच आहेत. सकाळी सकाळी वर मस्त पक्ष्यांची शाळा भरली असते.
२३
IMG_20220709_233828.jpg

२४
IMG_20220709_233851.jpg

.

बारच्या बाहेर पानपट्टीवाला असावा तसे नवी मुंबईच्या बहुतांश उद्यानात ओपन जिम आढळतेच. तिचा मुद्दाम असा फोटो काढला नाही. ती एक गजबजलेली जागा असल्याने मी तिथे फारसा फिरकतही नाही. तरी एकदा हा लेकीचा फोटो तिथे टिपलेला...

२५
IMG_20220709_233635.jpg

.

हो, पोरांचेही हे उद्यान आवडीचे झाले आहे. विशेष म्हणजे तिथे कुठलेही झोके, घसरगुंड्या नसूनही मुले तिथे रमतात. कारण गवतावर चालता चालता त्यांना असे सवंगडी भेटतात Happy

२६
IMG_20220709_233207.jpg

२७
IMG_20220709_233930.jpg

.

आणि हो, नाहीच झेपले एके दिवशी भल्या पहाटेचे उठणे, तर खुशाल ताणून द्यावी मोकळ्या आभाळाखाली. कोणी काssही बोलत नाही Happy

२८
IMG_20220709_233420.jpg

.

पावसाळ्यात या जागेचे सौंदर्य अजून खुलून येत आहे. भिजलेल्या वाटा चालायचा आनंद वाढवत आहेत.

२९
IMG_20220709_234209.jpg

.

आपापल्या बूटांची तेवढी काळजी घ्यावी. पण ती नसल्यास तुम्ही असे पाण्यात उतरून आनंद द्विगुणित करू शकता Happy

३०
IMG_20220709_234138.jpg

.

एकदा सकाळच्या शुद्ध हवेची चटक लागली की संध्याकाळच्या कोलाहलात मन रमत नाही फार. तरीही एखाद्या मधल्या आणि कमी गर्दीच्या दिवशी तिथे सुर्यास्त बघायच्या लालसेने फेरी मारणे होतेच.

३१
IMG_20220709_233151.jpg

.
आणि हो, ईथे आम्ही सुर्याच्या नजरेत नजर टाकून त्याच्याशी संवाद साधू शकतो

३२
IMG_20220709_234052.jpg

.

अरे हो, धागाकर्ता या नात्याने एक फोटो स्वतःचा हा माझा हक्क आहे, त्याशिवाय समजणार कसे ही जागा खरेच पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे आणि मी तिथे गेलो आहे Happy

हा एका मॉर्निंग वॉल्कचा फोटो. हा फोटो दुसर्‍याच दिवशीचा आहे. तेव्हा मॉर्निंग वॉल्कच्या पोशाखाची खरेदी झाली नव्हती.

३३
IMG_20220709_233258.jpg

उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी सुलभ शौचालय आहे. आजवर ते वापरायची वेळ आली नाही. पण एकूणच स्वच्छतेचा बेंचमार्क पाहता ते ही सुलभ आणि स्वच्छच असावे याची खात्री देऊ शकतो. हवे असल्यास एके सकाळी खास त्याचाही फोटो काढून आणू शकतो Happy

सध्या पावसाळ्याचा सीजन आहे, आधीच सुंदर असलेला परीसर अगदीच हिरवागार झाला आहे. तसेच काही छानसे फोटो टिपले तर ते प्रतिसादात टाकून धागा वर काढायची काळजी माझ्याकडून घेतली जाईलच Happy

---

तळटीप - उद्यान दुपारी बंद आणि सकाळ संध्याकाळच खुले असते. त्या वेळेत कोणा माबो मित्रमैत्रीणीशी भेटायचा योग आला तर मिनीसीशोअरची वाट न पकडता आधी आमचे निसर्ग उद्यानच दाखवण्यात येईल.

पण तुम्ही कधी कोपरखैरणेला आलात तर ईतकेच लक्षात ठेवा, की स्टेशनपासून डीमार्टला जाणारा रस्ता तसाच पुढे जात तुम्हाला या गार्डनपर्यंत पोहोचवेल. रिक्षावाल्याने गल्लीबोळातील कुठलीही वळणे घेत तुम्हाला फसवायचा प्रयत्न केला, तर तिथेच त्याचा कान पिळा Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही तुमचे फोटो कितीही टाका पण मुलांचे टाकू नका. माझ वैयक्तिक मत. नक्की का व कसा दुरुपयोग होइल ते मलाही माहीत नाही पण टु बी ऑन सेफर साईड.

आज भल्या सकाळी याच गार्डनमध्ये बसल्या बसल्या हा धागा वाचत होतो...
बसल्या बसल्याच मग एक फोटो काढला..

IMG_20220718_114105.jpg

धागा पुढे नेऊया
या विकेंडला ढगाळ वातावरण पाहून ४ वाजताच पावसाळी फेरफटका मारायचा मूड आला..

IMG_20220722_003703.jpg

.

IMG_20220722_003542.jpg

.

IMG_20220722_003618.jpg

.

Pages