बरेच दिवसांपासून मनात होते की वाशीच्या मिनी सी शोअर बद्दल चार शब्द लिहावेत. तिथले चार फोटो माबोकरांशी शेअर करावेत. पण प्रत्यक्षात हा विचार अंमलात आणायला गेलो तर चार हजार शब्दांत आणि चारशे फोटोतही न मावणारा विषय आहे तो. कारण त्या जागेशी एक वेगळेच नाते आहे.
जवळपास सहा वर्षांपुर्वी मी जेव्हा मुंबई सोडून नवी मुंबईकर व्हायचा निर्णय घेतला तेव्हा तो ईतका कठीण होता की मला थेट सारे पाश तोडणे जमलेच नाही. नवी मुंबईत मालकीचे घर घेणे शक्य असूनही मी भाड्याच्या घरात राहायचे ठरवले. आधी आपल्याला हे शहर जमते का बघूया. न जमल्यास गड्या आपली मुंबईच बरी असा त्यामागे विचार होता.
वाशीला जिथे घर भाड्याने घेतले तिथून ऑफिस जवळ, सासुरवाडी हाकेच्या अंतरावर, आणि लेकीला शाळाही जवळचीच शोधली. त्यामुळे एकूणच आयुष्य सुखकर झाले आणि हळूहळू नवी मुंबईबद्दलचे माझे मत अनुकूल होऊ लागले. पण या विचारपरीवर्तनामागे सर्वात मोठा वाटा होता तो मिनी सी शोअरचा. आधी मी त्या परीसराच्या प्रेमात पडलो, नंतर वाशीच्या, आणि अखेरीस नवी मुंबईच्या...
ते भाड्याचे घर अगदी मिनी सी शोअरला लागूनच असल्याने तो घरचाच पडीक कट्टा बनला होता. पण नवीन घर घेताना लक्षात आले जवळपास कुठेही नवीन बांधकाम चालू नव्हते. मला ईतका छान परीसर सोडून जावेसे वाटत नव्हते. पण त्याचवेळी बायकोला नव्या आयुष्याची सुरुवात एखाद्या जुन्या घरात करावीशी वाटत नव्हती. सासुरवाडी जवळच असल्याने मुलांना आजीआजोबांचे सुख मिळावे यासाठी फार दूरही जायचे नव्हते. अखेर या सर्वाचा सुवर्णमध्य साधत वाशीशेजारीच असलेल्या कोपरखैरणेला एक घर बूक केले.
वाशीचा पत्ता बदलून कोपरखैरणे झाला. तरीही दर विकेंडला व्हाया मिनी सीशोअर - सासुरवाडी जाणे व्हायचेच. आमचा पडीक कट्टा काही बदलला नव्हता. पण आयुष्यात काहीतरी बदल होत राहावा, ते एकसुरी होणे टाळावे म्हणून अध्येमध्ये चेंज म्हणून ईतर फिरण्याची ठिकाणेही शोधायचो.
आणि अश्यातच एके दिवशी, म्हणजे कोपरखैरणेला राहायला येऊन तब्बल एक वर्ष उलटल्यावर, एकदा गूगल मॅप बघताना घराच्या बरेपैकी जवळच असलेल्या "निसर्गउद्यान" नामक जागेवर नजर पडली. खरे तर त्याआधीही मॅप चेक करताना तो भलामोठा हिरवा चौकोनी तुकडा नजरेस पडलेला. पण तिथे जवळच डंपिंग ग्राऊंड आहे हे वाचून त्या दिशेला कधी जायचा विचार केला नव्हता.
पण त्या दिवशी संध्याकाळी घरातून निघायला फार ऊशीर झाला होता. एवढ्या उशीरा मिनी सीशोअरला जाण्याऐवजी या नवीन जागेचेच अन्वेषण करूया म्हटले आणि रिक्षा तिथे वळवली. खरे तर रिक्षाचीही गरज नव्हती. ते उद्यान घरापासून चालत पंधरा मिनिटे अंतरावर होते. पण सोबत पोरगा होता. नाहीच आवडली जागा तर तीच रिक्षा फिरवून दुसरीकडे जाऊया म्हटले.
उद्यानाच्या जवळ पोहोचलो आणि लक्षात आले की शेजारीच डंपिंग ग्राऊंड म्हणत असले तरी ना कचर्याचा त्रास, ना कसला वास. कदचित निव्वळ नामधारी डंपिंग ग्राऊंड असावे. बरेच लोकांची वर्दळ त्या दिशेने जात होती. आम्ही देखील त्या वर्दळीचा भाग बनलो. आणि प्रवेशद्वारातून आत शिरत जे उजवीकडे नजर टाकली ते..... आहाहा!
काय विलोभनीय दृश्य होते ते! नजर जाईल तिथवर पसरलेला हिरवागार बगीचा. त्याही पलीकडे सपाट मैदान, त्यापलीकडे न दिसणारी खाडी, पण दूर क्षितिजावर आपल्यासोबत संध्याकाळचा चहा घेण्यास आलेले साक्षात सुर्यनारायण
आणि मग मी तिथेच जागेवर थिजून हा पहिला फोटो टिपला. सुर्य मावळू लागलेला. अंधार पडू लागलेला. त्यामुळे तितका क्लीअर आला नसावा. पण घरी जाऊन हे बघा, आम्ही एक नवीन फिरायची जागा शोधली, म्हणून तिचे सौंदर्य दाखवायला पुरेसा होता.
१
२
जितके मन आनंदून गेले तितकेच डोकेही भणभणले. अशी एखादी जागा आपल्या नव्या घरापासून चालत जावे ईतक्या जवळ होती आणि आपल्याला तिथे पोहोचायला वर्ष लागले.
त्यानंतर महिन्याभरात अजून काही संध्याकाळ तिथे घालवल्या आणि अजून काही सुर्यास्ताचे फोटो टिपले.
३
४
५
.
डिसेंबरचा महिना होता. नवीन वर्षाचा संकल्प जवळ आलेला. बरेच दिवस मॉर्निंग वॉल्कचा संकल्प मनात घोळत होता. पण चालायला जावे तर कुठे या प्रश्नावर येऊन घोडा अडत होता. तेव्हा या निसर्गउद्यानाची आठवण झाली. सुर्यास्ताची मजा फार लुटली, आता मॉर्निंग वॉल्कच्या निमित्ताने एखादा सुर्योदय बघूया म्हटले. शुभस्य शीघ्रम म्हणत दुसर्या दिवशी भल्या पहाटेच तिथे पोहोचलो. आणि पुन्हा एकदा डोके भणभणले. मी पुन्हा एक महिना फुकट घालवला होता. सकाळच्या प्रहरी फिरण्यासाठी, निसर्गउद्यान या नावाला जागणारी, यापेक्षा सुंदर जागा असूच शकत नव्हती.
६
७
८
.
संध्याकाळी दिसणारी हौश्या-गवश्यांची गर्दी सकाळी कुठेच नव्हती. जी काही रहदारी होती ती फिटनेस आणि आरोग्याप्रती जागरूक असणार्यांची होती. कोणी चालत होते. कोणी धावत होते. कोणी योगा करत होते. कोणी ओपन जिमचा वापर करत होते. तर कोणी गवतावरच सुर्यनमस्कार घालत होते. काही नाही तर कोणी सकाळच्या कोवळ्या उन्हावर अंग शेकत होते. कोणी चक्क गाण्याचा रियाझ करत होते. तर बॅडमिंटन खेळाचा एक वेगळाच फॅन क्लब होता. एकंदरीत रिकामटेकड्यांना ईथे बसायलाही लाज वाटावी असे वातावरण होते. आणि मला हेच हवे होते.
मी सुद्धा त्यांच्यातीलच एक होत फेर्या मारायला घेतल्या. त्यासाठी छान आखीव रेखीव असे रस्ते बांधले होते. ठिकठिकाणी विविध प्रकारचे बाकडे होते. ऊनपावसापासून वाचायला तंबूच्या आकाराचे शेड (Gazebo) होते. सर्वात महत्वाचे म्हणजे कमालीची स्वच्छता होती. चालायच्या वाटेवर कुठलाही कचरा तर नव्हताच. पण ज्या एकमेव कारणासाठी लोकं "आय हेट डॉग्ज" म्हणतात, ते कुत्र्यांचे पराक्रमही नव्हते. अन्यथा हल्ली सकाळीच कुठे चालत जायचे म्हटले तर, 'छई छप्पा छई, छप्पाक छई' करतच चालावे लागते.
९
१०
११
१२
१३
१४
.
बागेतला क्राऊड अगदी सुशिक्षित, सुसंस्कृत आणि टापटिप दिसत होता. त्यामुळे आपण वेगळे वाटायला नको म्हणत मी सुद्धा दुसर्याच दिवशी दोनेक ट्रॅक पँट ऑर्डर केल्या. त्याला साजेसे टीशर्ट शोधून काढले. चालण्यासाठी उत्तम अश्या शूजची खरेदी झाली. वाढदिवसाला बायकोने गिफ्ट म्हणून दिलेले, मी नाक मुरडत स्विकारलेले, आणि एवढे दिवस पडून असलेले स्मार्टवॉच वापरायला काढले. तहान लागली की पाण्याची बाटली खिश्याशी हवी हे लक्षात येताच एक छोटीशी बाटली खरेदी झाली. चालता चालता गाणी ऐकायला कानात एखादा ईयरफोन हवा असे आता नुकतेच वाटू लागले आहे.. तो ही येईल लवकरच! छे, लेख प्रकाशित करेपर्यंत आलाही
पण महत्वाचे म्हणजे अर्धे वर्ष उलटले तरी अध्येमध्ये खंड पडत का होईना माझा निसर्गाच्या सानिध्यातील मॉर्निंग वॉल्क कायम आहे. आणि याचे पहिले श्रेय निसर्ग उद्यालानाच जाते. तर हे असेच चालता चालता टिपलेले काही फोटो...
.
हे माझ्या फार आवडीचे झाड
१५
१६
.
आणि हा माझ्या फार आवडीचा बेंच !
१७
१८
१९
२०
२१
२२
.
हे रस्ते उद्यानाच्या आतच आहेत. सकाळी सकाळी वर मस्त पक्ष्यांची शाळा भरली असते.
२३
२४
.
बारच्या बाहेर पानपट्टीवाला असावा तसे नवी मुंबईच्या बहुतांश उद्यानात ओपन जिम आढळतेच. तिचा मुद्दाम असा फोटो काढला नाही. ती एक गजबजलेली जागा असल्याने मी तिथे फारसा फिरकतही नाही. तरी एकदा हा लेकीचा फोटो तिथे टिपलेला...
२५
.
हो, पोरांचेही हे उद्यान आवडीचे झाले आहे. विशेष म्हणजे तिथे कुठलेही झोके, घसरगुंड्या नसूनही मुले तिथे रमतात. कारण गवतावर चालता चालता त्यांना असे सवंगडी भेटतात
२६
२७
.
आणि हो, नाहीच झेपले एके दिवशी भल्या पहाटेचे उठणे, तर खुशाल ताणून द्यावी मोकळ्या आभाळाखाली. कोणी काssही बोलत नाही
२८
.
पावसाळ्यात या जागेचे सौंदर्य अजून खुलून येत आहे. भिजलेल्या वाटा चालायचा आनंद वाढवत आहेत.
२९
.
आपापल्या बूटांची तेवढी काळजी घ्यावी. पण ती नसल्यास तुम्ही असे पाण्यात उतरून आनंद द्विगुणित करू शकता
३०
.
एकदा सकाळच्या शुद्ध हवेची चटक लागली की संध्याकाळच्या कोलाहलात मन रमत नाही फार. तरीही एखाद्या मधल्या आणि कमी गर्दीच्या दिवशी तिथे सुर्यास्त बघायच्या लालसेने फेरी मारणे होतेच.
३१
.
आणि हो, ईथे आम्ही सुर्याच्या नजरेत नजर टाकून त्याच्याशी संवाद साधू शकतो
३२
.
अरे हो, धागाकर्ता या नात्याने एक फोटो स्वतःचा हा माझा हक्क आहे, त्याशिवाय समजणार कसे ही जागा खरेच पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे आणि मी तिथे गेलो आहे
हा एका मॉर्निंग वॉल्कचा फोटो. हा फोटो दुसर्याच दिवशीचा आहे. तेव्हा मॉर्निंग वॉल्कच्या पोशाखाची खरेदी झाली नव्हती.
३३
उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी सुलभ शौचालय आहे. आजवर ते वापरायची वेळ आली नाही. पण एकूणच स्वच्छतेचा बेंचमार्क पाहता ते ही सुलभ आणि स्वच्छच असावे याची खात्री देऊ शकतो. हवे असल्यास एके सकाळी खास त्याचाही फोटो काढून आणू शकतो
सध्या पावसाळ्याचा सीजन आहे, आधीच सुंदर असलेला परीसर अगदीच हिरवागार झाला आहे. तसेच काही छानसे फोटो टिपले तर ते प्रतिसादात टाकून धागा वर काढायची काळजी माझ्याकडून घेतली जाईलच
---
तळटीप - उद्यान दुपारी बंद आणि सकाळ संध्याकाळच खुले असते. त्या वेळेत कोणा माबो मित्रमैत्रीणीशी भेटायचा योग आला तर मिनीसीशोअरची वाट न पकडता आधी आमचे निसर्ग उद्यानच दाखवण्यात येईल.
पण तुम्ही कधी कोपरखैरणेला आलात तर ईतकेच लक्षात ठेवा, की स्टेशनपासून डीमार्टला जाणारा रस्ता तसाच पुढे जात तुम्हाला या गार्डनपर्यंत पोहोचवेल. रिक्षावाल्याने गल्लीबोळातील कुठलीही वळणे घेत तुम्हाला फसवायचा प्रयत्न केला, तर तिथेच त्याचा कान पिळा
धन्यवाद,
ऋन्मेष
खूपच मोकळी मोकळी जागा.
खूपच मोकळी मोकळी जागा. दुर्मीळ.
छान प्रशस्त आहे. जागा तर मोठी
छान प्रशस्त आहे. जागा तर मोठी आहे. झाडे - फोटो क्र २३,२४ मधली झाडे लावली तर उद्यानाची वाट लागणार. आठवा तुमचे जुने बाप्टिस्टा उद्यान Sandhurst rd stationजवळचे. फोटो २७ मध्ये ठेवलेली रोपटी कोणती आहेत?
वाशी,वाशी स्पोर्टस क्लबजवळचे उद्यानही मोठे छान आहे. पण झाडांची निवड बरोबर नाही. याबाबतीत राणीबाग ठीक आहे.
सायन स्टेशनजवळ धारावी बस आगाराजवळचे निसर्ग उद्यान पूर्वी बरे होते. पण आता ओसाड वाटते. शाळांतील विद्यार्थ्यांना नेण्यासाठी, निसर्ग शिबीर म्हणून राखीव जागा आहे.
तुम्ही आता नवी मुंबईचे ब्रांड अम्बेसेडर. हिंदुस्तान टाईम्स पेपर अशा लेखांना उत्तेजन देतो. तिथे लेख लिहायला सुरू करा.
छान लेख.
छान लेख.
नवी मुंबई ऊद्यानांच्या विषयात समृद्ध आहे. आम्ही नेरुळ राहायला आलो तेव्हा तिथली पावला पावलावर असलेली इतकी उद्याने बघुन थक्क झालेले, चालताना उद्याने मोजायचे, शेवटी सोडुन दिले. आजही नविन उद्याने बनतच आहेत तिथे. मुलगी लहान असताना तिचे क्रेश व आमचे घर या दरम्यान एक भले मोठे उद्यान होते. त्याला गेट बिट काही नव्हते त्यामुळे तो आमच्यासाठी शोर्ट्कट होता. त्यात खुप मोठमोठी मोगर्याची गोल बने होती. सन्ध्याकाळी तिथुन जाताना घमघमाट नुसता… थोडी फुले घरीही यायची. दुसर्या एका बागेत हारात वापरतात त्या पांढर्या लिलीचे खुप मोठे बन होते. बागाच बागा… आणि सगळ्या व्यवस्थीत सांभाळलेल्या..
srd, राणी बागेची गोष्ट वेगळी आहे. ते खरेतर बोटॅनिकल गार्डन आहे. वेगवेगळे दुर्मिळ वृ़क्ष मुद्दाम लावलेले आहेत. नव्या मुंबैत असे गार्डन अद्याप नाही. बहुतेक सगळ्या बागांत आतिल रस्त्यांच्या कडेंना रस्त्याची शोभा म्हणुन झाडे लावलेली आहेत. खारघर सेंट्रल पार्कात दुतर्फा अमलताश व गुलाबी टॅबेबुइया लावलाय. अजुनही खुप वेगवेगळी झाडे मला दिसलेली पण ती सगळी रस्त्याची शोभा वाढवायला लावलीत. मुद्दाम दुर्मिळ झाडे लावलेली अद्याप पाहिलेली नाहीत. खुप ठिकाणी देशी झाडे व त्यातही शिरिष व मुचकुन्द लावलेला पाहिलाय. पुर्व नेरुळमध्ये मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुस शिरिषाचे मोठमोठे जुने वृक्ष आहेत. पश्चिमेला अमलताश.. नवी मुंबै खुपच सुन्दर आहे वृक्षांच्या बाबतीत.
मस्त आहेत फोटो.मुलांचे पावसात
मस्त आहेत फोटो.मुलांचे पावसात, बाकड्यावर फोटो आवडले.
मुंबई विशेषतः ठाणे नवी मुंबई एरियाचे इतके सुंदर हिरवाई वाले फोटो आलेत बघण्यात की आता आजूबाजूचं पुणं कमी झाडंवालं वाटायला लागलं.
उदयपूरची साजन बाग दोनशे वर्षे
उदयपूरची साजन बाग दोनशे वर्षे जुनी आहे आणि भारतीय वृक्ष आहेत.
मनावर घेतल्यास इथेही तशी बाग होऊ शकेल वीस वर्षांत. मग लोक {planned city }चंदिगढ पाहण्याऐवजी नवी मुंबई पाहायला येतील.
छान आहेत फोटो आणि माहिती.
छान आहेत फोटो आणि माहिती.
कधी नवी मुंबईला जाण झाल्यास भेट देईन नक्कीच
छान लेख.
छान लेख.
परत जीवाची मुंबई करायला येईन तेव्हा हे नक्की बघेन.
सगळेच फोटो सुंदर टिपलेत, मला क्र 20 , क्र 21 फार फार आवडले.
मस्त!
मस्त!
हिरवे गवत ( lawn ) आणि
हिरवे गवत ( lawn ) आणि चालण्यासाठी पायवाट/ trail हे मानव निर्मीत आणि कृत्रिम वाटते. याला निसर्ग उद्यान का म्हणावे?
प्रत्येक चौरस फुटावर विविध प्रकारचे झाडे/ झुडपे लावणे अपेक्षित नाही पण एव्हढ्या मोठ्या जागेवर monoculture गवतच? (opposite to biodiversity and nature)?
हिंदुस्तान टाईम्स इंग्लीश
हिंदुस्तान टाईम्स इंग्लीश मधून निघतो का ?
फोटो बघूनच जर इतकं छान वाटलं,
फोटो बघूनच जर इतकं छान वाटलं, तर..... !
धन्यवाद .
अरे वा!
अरे वा!
या उद्यानाबद्दल माहिती नव्हतं.
कधीतरी मुद्दाम जाऊन बघायला हवं.
@ गारंबीचा शारूक , होय.
@ गारंबीचा शारूक , होय.
वा फारच सुंदर आहे.
वा फारच सुंदर आहे.
या उद्यानाबद्दल माहिती नव्हतं.
कधीतरी मुद्दाम जाऊन बघायला हवं. >>> ललिता +१
साधना, तुझी पोस्टही आवडली.
साधना, तुझी पोस्टही आवडली.
धन्यवाद सर्वांचे,
धन्यवाद सर्वांचे,
आणि हो. मी व्हॉटसप स्टेटस आणि फेसबूकला फोटो टाकायचो तेव्हा ईथली वाशी कोपरखैरणेला राहणारी जनताही मला विचारायची हे कुठे आहे?
नेमक्रे कधी निर्माण झाले बघायला हवे पण फारसे लोकांना माहीत नाही म्हणूनच शीर्षक असे दिलेय.
@Srd,
झाडे - फोटो क्र २३,२४ मधली झाडे लावली तर उद्यानाची वाट लागणार.
>>>>
ती झाडे त्या उद्यानातून जाणारा रस्ता आहे तेथील आहेत. अर्थात तो ही उद्यानाच्या गेटच्या आतच आहे. वॉकसाठीच आहे.
पण त्या झाडांनी वाट लागेल असे का म्हणालात? तिथे बरेच पक्षी आसरा घेतात आणि तिथून चालताना ईतर उद्यानाच्या तुलनेत सावलीही मिळते हाच मला फायदा वाटतो त्यांचा.
आठवा तुमचे जुने बाप्टिस्टा उद्यान Sandhurst rd stationजवळचे.
>>>
डॉकयार्ड रोड स्टेशनजवळचे. त्याच्या वरच आहे. त्याचेही आता बरेच रिनोवेशन झालेय असे ऐकलेय. जायचा विचार आहे तिथेही लवकरच.
नवी मुंबई ऊद्यानांच्या विषयात
नवी मुंबई ऊद्यानांच्या विषयात समृद्ध आहे. >>> +७८६, अगदीच. मी अजूनही मूळचा मुंबईकरच आहे. पण हे नेहमी ईथले बोलून दाखवतो. वाशीलाही राहायचो तर दर चार कंपांऊंड सोडून एक छोटीशी जागा उद्यानासाठी असायची. मग भले ते छोटेसे असेल, तरी हिरवळ, चालायला जागा, त्या भोवताली झाडे, लहान मुलांना खेळायला झोका-घसरगुंडी हे प्रत्येकाला शेपाचशे पावलावर मिळायलाच हवे. रोज त्यातले एखादे गार्डन पकडावे आणि फेरफटका मारून यावा. वाशीच्या तुलनेत कोपरखैरणेला कमी गार्डन्स दिसले, पण मग हे मिळाले.
जाई, वर्णिता, नक्की भेट द्या.
जाई, वर्णिता, नक्की भेट द्या.
@ वर्णिता,
२० आणि २१ फोटो सर्वात लेटेस्ट आता चार दिवसांपूर्वीचेच आहेत. अजून ते फोटो व्हॉटसप स्टेटसलाही नाही टाकलेत ते आधी ईथे या लेखात प्रकाशित केलेत
पावसाळा सुरू झाल्यानंतर आणखी छान दिसू लागलेय उद्यान. जरूर या बघायला
@गा शा : पु ले प्र
@गा शा : पु ले प्र
सुंदर फोटो. प्रत्येक
सुंदर फोटो. प्रत्येक शहरातल्या प्रशासकांना असे उद्यान बनवण्याची सुबुध्दी व्हावी.
छान लेख.
छान लेख.
नवी मुंबई ऊद्यानांच्या विषयात
नवी मुंबई ऊद्यानांच्या विषयात समृद्ध आहे. ..>> +१११
वाशी आधी डेव्हलप झाली असल्याने बरीच नियोजन बद्ध वाटते मला.. म्हणूनच उद्यानेही जास्त असावीत. खारघरचे उद्यानही मस्तच आहे.
आता घणसोलीलाही असेच मोठे उद्यान झालेय.. बाहेरून पाहिले आहे. आत जाऊन बघायला हवय.
कोपरखैरणे मुळात ९९ साला नंतर वाढले. म्हणजे रस्ते वगैरे.. त्यामुळे वाशी इतकी उद्याने नसावीत.
इथली जुनी लोकं सांगतात की त्यावेळी वाशी कोपरखैरणे रस्ताही नव्हता; तर कोपरखैरणे घणसोली आतला रस्ता हा २००६ च्या सुमारास झाला.. पण घणसोलीने बरीच कात टाकलीय आता.
हे उद्यान सगळ्यात आवडती जागा. मी नवी मुंबईत रहायला आले तेंव्हा सतत पुण्याची आठवण होत असे.. पुण्यात कसे काही नाही तर सिंहगड तरी आहेच निसर्गाजवळ जायला आणि आजुबाजूला खुप गोष्टी आहेत फिरायला.. मग हे उद्यान होतय हे कळाले आणि आवडायलाही लागले. मुंबईत इतकी मोकळी जागा पहिल्यांदा पाहिल्याने असेल.. पण मनात घर केले ते कायमचेच. अगदी सगळी प्रगती या उद्यानाची जवळून बघीतलेली आहे.. त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अगदी गेल्या १० वर्षात, पण नियोजनबद्ध रितीने, छान डेव्हलप केले आहे.
लेख आवडलाच!
अरे वाह नीलाक्षी ग्रेट !
धन्यवाद, वीरू, शर्मिला, फलक से जुदा ...
अरे वाह नीलाक्षी ग्रेट ! तुम्हाला या उद्यानाबद्दल माहीत आहे आणि ते ही त्याच्या जन्मापासून
वाशी कोपरखैरणेबद्दलची माहितीही अचूक. माझीही सासुरवाडी ईथे नव्वदीच्या दशकात स्थायिक झाली तेव्हा वाशीलाही धुळीचे रस्ते होते असे ते सांगतात तिथे कोपरखैरणे विचारायलाच नको.
आणखी एक विशेष बाब म्हणजे या उद्यानात अजूनही काही काम चालू असलेले दिसतेय. अर्थात अजूनही बरेच काही करायला स्कोप आहेच. पण वाशीच्या मिनीसीशोअरलाही सुशोभिकरणाचे काम चालूच असते, भर पडतच असते.
थोडक्यात, ईथे उद्याने बनवून नुसते सोडून देत नाहीत. त्यांची स्वच्छताही जपतात, निगाही राखतात, आणि डेव्हलपमेंटही चालूच राहते. हे फार चांगले आहे.
सीमंतिनी यांचा स्ट्रीट आर्टचा लेख वाचला, त्यानंतर वाशी आणि सी शोअर परीसरातील भिंती बघताना लक्षात आले की तिथे जवळपासच्या खाजगी सोसायट्यांच्या कंपाऊंड वॉल सुद्धा चित्रांनी रंगवल्या आहेत. ज्या रस्त्याला जावे तिथे यावरच नजर फिरत होती. हे जाणीवपुर्वक पाहिल्याने लक्षात आले. पण त्यामुळेच तो एकूणच परीसर स्वछ आणि सुंदर भासत होता हे लक्षात आले. कारण कळकट मळकटपणाला वावच ठेवला नाही..
हे तर माझ्या आईच्या
हे तर माझ्या आईच्या घरापासूनही जवळच असेल.. पुढच्या वेळेस आले की इथेही जाईनच.. बाय द वे य, हे अगदीच अमेरीकेतल्या एखाद्या पार्क सारखं वाटतंय.
१८ आणि १९ फोटोमधे आकाशही मस्त नीळं दिसतंय.. मला ठाण्याच्या घरातून इतकं क्लिअर स्काय कधी दिसल्याचं फार आठवत नाही
हे तर माझ्या आईच्या
हे तर माझ्या आईच्या घरापासूनही जवळच असेल.>>>> हो अगदीच
पुढच्या वेळेस आले की इथेही जाईनच.>>>> हो नक्कीच
बाय द वे य, हे अगदीच अमेरीकेतल्या एखाद्या पार्क सारखं वाटतंय.>>> हो, फक्त थोडी माणसे जास्त असतील ईथे मी सर्वात शेवटी बाहेर पडतो तेव्हाच मोकळ्या ढाकळ्या गार्डनचे फोटो काढतो. तू टाक की तुमच्या गार्डनचे २-४ फोटो..
१८ आणि १९ फोटोमधे आकाशही मस्त नीळं दिसतंय..>>>> पावसाळ्यात वरचेवर दिसते ईथे असे आकाश. जेव्हा ढग अचानक क्लीअर होतात सोबत प्रदूषणही घेऊन जातात.
मस्तच उद्यान. बघायला पाहिजे.
मस्तच उद्यान. बघायला पाहिजे.
हो, ये बघायला कधी ईथे येशील
धन्यवाद आणि हो, ये बघायला कधी ईथे येशील तेव्हा.
एक मॉर्निंग वॉल्क गेटटूगेदर देखील ठेवता येईल.
गेले चार दिवस मुसळधार पावसाने ईथे जाणे झाले नाही. अन्यथा रोज पोराला शाळेत सोडून तसेच पुढे जायचे हा सध्याचा रूटीन आहे. या रेड अलर्ट पावसाचा जोर ओसरल्यानंतर बघायला हवे.
मस्तच रे ऋन्मेऽऽष ! लेख आवडला
मस्तच रे ऋन्मेऽऽष ! लेख आवडला. ठाण्याला तलावांचे शहर म्हणतात तर नवी मुंबईला उद्यानांचे शहर म्हणतात.
उद्यान छान आहे, या
उद्यान छान आहे, या उद्यानाच्या जागेवर पूर्वी कचरा डम्पिंग ग्राऊंड होत.
ओके वाईकर,
ओके वाईकर,
तरी म्हटले डम्पिंग ग्राऊंडचा काय सीन आहे.
आताही तिथे शेजारी डेपो आहे जिथे कचर्याच्या गाड्या उभ्या असतात. पण रिकाम्या असतात, कचर्याचा वा वासाचा त्रास नसतो, अर्थात, नाहीतर कोण येईल तिथे..
Pages