श्रेष्ठ रामभक्त श्री लक्ष्मणजी
जनक वचन पूर्ति राघवे शिरोधार्या
सहज वनी निघाले सोडूनी ती अयोध्या
प्रभु तरी मज तुम्ही बंधू सौमित्र बोले
विचरत तुज पाठी काननी सौख्य झाले
रमत न मन भक्ता भोग भिंगुळवाणे
चरण तरी प्रभूचे योगचि मुख्य होणे
समजुत बहु काढी राघवे लक्ष्मणाची
वचन मज निभाया कानने एकलाचि
दृढतर वचनांनी बंधू नाकारिले ते
तुज सह तरी येणे हेचि कर्तव्य साचे
विरघळत प्रभूचे चित्त या भक्त योगे
सहचर सुख मोठे काननी राघवाते
विपरित जरी काही येत दृष्टीपुढे ते
कर तरी पुढती ये घेतसे वार मोठे
ध्वज जरी प्रभू होये दंड सौमित्र पूर्ति
लपवित स्वपणाला उंचवी राम किर्ती
जगती बहुत किर्ती रामचंद्रांसी होता
सहज हटत मागे भक्त हा श्रेष्ठ भ्राता
सकल विजनवासा सावली साथ देई
मन तरी प्रभुचे ते वाचण्या सज्ज होई
दिनकर शशि नांदे जोवरी येथ पाही
झळकत जगी नामे रामलक्ष्मणास तेही
अतुल अचल निष्ठा राघवापायी दिव्य
स्मरत सतत जाता राघवा कृपा योग्य
...............................................
सौमित्र....लक्ष्मण, सुमित्रेचा पुत्र
कानन....वन, अरण्य
भोग....राजभोग
भिंगुळवाणे.... निरुपयोगी, न सुखवणारे
श्रीरामचंद्रांच्या वडिलांनी म्हणजेच राजा दशरथाने कैकयीला दिलेले वचन पाळण्यासाठी ( रामाने चौदा वर्षे वनवासात जावे) श्रीराम प्रभू राज्याभिषेक नाकारुन वनात जाण्यास निघाले.
त्यावर लक्ष्मणही प्रभूंबरोबर वनात जावयास सज्ज होतो.
तो म्हणतो - हे प्रभो, तुम्ही इथे नसताना हे राजभोग मला कदापिही सुखकारक होणार नाहीत. तुमच्या चरणांचा/प्रभूचरणांचा सतत योग असणे हीच माझ्या जीवनाची सार्थकता आहे.
यावर श्रीरामचंद्र वेगवेगळ्या पद्धतीने त्याची समजूत काढून त्याला वनवासापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात.
पण या कशालाही लक्ष्मण बधत नाही व अतिशय दृढपणे वनवासात प्रभूंबरोबर जाण्यास सिद्ध होतो.
आपल्या या भक्तराजाचे अद्भुत प्रेम बघून प्रभूही विरघळतात व त्याला आपल्याबरोबर येण्यास मान्यता देतात.
यापुढील सर्व काही आ. विनोबांच्या "गीता प्रवचने" या पुस्तकातील विचारातून घेतलेले आहे. विनोबांनी श्री तुलसीदासांच्या दोह्यांचा आधार घेत लक्ष्मणाच्या भक्तीचे विलक्षण कौतुक केलेले आहे.
आपल्या डोळ्याच्या दिशेने कोणी वार केला वा दगड वगैरे काही फेकला तर डोळ्याचे रक्षण करण्यासाठी आपला हात जसा आपोआपच पुढे होऊन तो वार झेलतो तसे लक्ष्मणाचे होते. प्रभूंप्रति त्याचे सहज प्रेम होते, सहज सेवाभाव होता.
रामकिर्तीची ध्वजा ज्या काठीमुळे/दंडामुळे उंच फडकत होती त्या दंडाचे नाव म्हणजे लक्ष्मण.
रामकिर्ती जगभर पसरत जावी या एकमेव कारणासाठी आपले स्वतःचे अस्तित्व त्याने पूर्णपणे लोपवून टाकले होते.
संपूर्ण वनवासात लक्ष्मणाने श्रीरामांची सावलीसारखी साथ दिली.
तो जणू प्रभूंचे मनच झाला होता.
जोपर्यंत या पृथ्वीवर सूर्यचंद्र असतील तोपर्यंत श्रीरामलक्ष्मण ही नावेही असणारच,
अशा या श्रेष्ठ भक्तराजाचे आपल्याला नित्य स्मरण राहिले तर आपण खचितच श्रीरामकृपेला पात्र होऊ.
श्रीरामचंद्रार्पणमस्तु
छानच. जिथे प्रभू रामचंद्र
छानच. जिथे प्रभू रामचंद्र तिथे वन वास कसा असेल? असा भाउ सर्वांना मिळावा. भरता वर पण लिहा.
कसली सुंदर रचना आहे.
कसली सुंदर रचना आहे.
छान. मालिनी वृत्तात लिहिणे
छान. मालिनी वृत्तात लिहिणे सोपे नाही. चांगला प्रयत्न आहे.
वचन मजचि निभाया कानने एकलाचि >> इथे एक अक्षर/मात्रा जास्त झाली आहे. वचन मज निभाया - असे लिहिल्यास काम होईल (पण अर्थ नीट कळला नाही)
हरचंदजी,
हरचंदजी,
गडबड दाखवून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
वनवासात जाण्याचे वचन मला एकट्यालाच निभवायचे आहे. याकरता हे लक्ष्मणा, तुला वनात यायची गरज नाही - असे प्रभू लक्ष्मणाला सांगून त्याने वनात येऊ नये म्हणून प्रयत्न करीत होते.
____/\____
अच्छा, आता लक्षात आलं. त्यात
अच्छा, आता लक्षात आलं. त्यात क्रियापद नसल्यामुळे आधी अर्थ कळला नव्हता. उलगडून सांगितल्याबद्दल आभारी आहे.
सुरेख रचना _/\_.
सुरेख रचना _/\_.
अप्रतिम आहे..
अप्रतिम आहे..
<<जिथे प्रभू रामचंद्र तिथे वन वास कसा असेल? असा भाउ सर्वांना मिळावा.>>>
+१११
कविता आवडली.
कविता आवडली.
विवेचनही फारच सुरेख !
कविता आणि विवेचन... दोन्हीही
कविता आणि विवेचन... दोन्हीही सुरेख !
ध्वज जरी प्रभू होये दंड
ध्वज जरी प्रभू होये दंड सौमित्र पूर्ति
अहाहा अशा अनेक सुंदर जागा आहेत या काव्यात....
आपली किर्ती व्हावी असे लक्ष्मणाला न वाटणे.... निष्काम कर्मयोगच की.....
लक्ष्मण येण्याने वनवास सुखकर होईल हा विश्वास...केवढा उच्च कोटीचा भ्रातृभाव....
नितांत सुंदर....
नितांत सुंदर. +११
नितांत सुंदर. +११
वृत्तबद्ध कविता लिहिणे खूप कठीण. त्यात ती इतकी रसाळ.
खूप आवडली कविता.